गोपाला मेरी करूना...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
28 May 2008 - 6:28 pm

१९९३/९४ सालचा सुमार असेल, तेव्हाची गोष्ट.

"ग्रँटरोडचा नॉव्हेल्टी सिनेमा माहीत आहे ना? त्याच्याजवळच रेल्वे हॉटेल म्हणून आहे आणि त्याच्याजवळ एस पी सेन्टर म्हणून साड्यांचं दुकान आहे. तीच बिल्डिंग! ये हां नक्की, मी घरीच आहे!"

दस्तुरसाहेब मला फोनवरून पत्ता सांगत होते!

पं फिरोज दस्तूर आणि त्यांच सुंदर गाणं!

या माणसाच्या मी गेली अनेक वर्ष प्रेमात होतो. त्यांना एकदा भेटावं असं मला खूप वाटत होतं. आणि एके दिवशी तो योग आला. त्यांनी सांगितलेल्या पत्त्यानुसार मी ग्रँटरोडला त्यांच्या घरी पोहोचलो. लाकडी गोलाकार जिने असलेल्या त्या बिल्डिंगमधलं त्यांचं ते टिपिकल पारशी पद्धतीचं घर. भिंतीवरचं घड्याळ, खुर्च्या, सोफे, कपाटं, अगदी सगळं सगळं पारशी पद्धतीचं, ऍन्टिकच म्हणा ना! मला एकदम विजयाबाईंच्या पेस्तनजी सिनेमाचीच आठवण झाली.

गुलाबीगोर्‍या वर्णाचे दस्तुरबुवा समोर बसले होते. मी प्रथमच त्यांना इतक्या जवळून पाहात होतो. सवाईगंधर्वांचे लाडके शिष्य, किराणा गायकीचे ज्येष्ठ गवई, माझे मानसगुरू भीमण्णा यांचे ज्येष्ठ गुरुबंधू! मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं!

"ये, बस!"

दस्तुरांनी माझ्या पाठीवरून हात फिरवत म्हटलं. त्यांचं गाणं जितकं गोड होतं तेवढेच तेही अगदी सुरेख होते, गोडच दिसत होते!

"काय, कुठून आला? गाणं शिकतोस का कुणाकडे?"

दस्तुरबुवा अगदी मोकळेपणानी माझी विचारपूस करू लागले, माझ्याशी बोलू लागले. अगदी साधं-सुस्वभावी बोलणं होतं त्यांचं. जराही कुठे अहंकार नाही, की शिष्ठपणा नाही! गुजराथी-पारशी पद्धतीचं मराठी बोलणं! मला ते ऐकायला खूप गंम्मत वाटत होती. आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. थोड्या वेळाने दस्तुरबुवांनी त्यांच्या स्वयपाक्याला माझ्याकरता चहा करायला सांगितला. घरात ते दोघेच होते. ते आणि त्यांचा स्वयंपाकी. ह्या पारश्याने लग्न केलं नव्हतं! नातेवाईंकांचा गोतावळा खूपच कमी. त्यांचा एक पुतण्या तेवढा होता, तो तिकडे अमेरिकेत होता. दस्तुरबुवा अधनंमधनं त्याच्याकडे रहायला जायचे.

पहिल्या भेटीतच मला दस्तुरांनी त्यांच्याकडची त्यांचं एक यमनचं लाईव्ह रेकॉर्डिंग असलेली कॅसेट ऐकायला दिली. "अरे माझ्याकडे एवढी एकच कॉपी आहे. तू वाटल्यास टेप करून घे आणि ही मला परत आणून दे हां!" खूप भाबडेपणाने दस्तुरसाहेब म्हणाले. त्यांच्या आवाजात जात्याच कमालीचा मृदुपणा होता. त्यांना मुद्दामून मृदु बोलण्याची गरजच नव्हती!

घाटकोपरच्या एका मैफलीतलं यमन रागाचं फार सुंदर रेकॉर्डिंग होतं ते! किराणा पद्धतीची, सवाईगंधर्वांच्या तालमीखाली तावूनसुलाखून निघालेली फार अप्रतीम गायकी होती त्यांची! किराणा पद्धतीनुसार एकेका स्वराची बढत करून विकसित केलेला राग, अतिशय सुरेल अन् जवारीदार स्वर, स्वरांचं अगदी छान रेशमी नक्षिकाम करावं अशी आलापी! खरंच, दस्तुरबुवांचं गाणं म्हणजे सुरेल, आलापप्रधान गायकीची ती एक मेजवानीच असे! असो! दस्तुरबुवांच्या गायकीवर लिहायला मी अजून खूप लहान आहे. आणि त्यांच्या गाण्यावर कितीही जरी भरभरून लिहिलं तरी त्यांच गाणं शब्दातीत होतं हेच खरं!

मंडळी, दस्तुरबुवांच्या घरी जाण्याचा, त्यांना भेटण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा अनेकदा योग आला हे माझं भाग्य! मी जरी समोरसमोर बसून त्यांची तालीम घेतली नसली तरी एका अर्थी ते माझे गुरूच होते. किराणा गायकीबद्दल, आलापीबद्दल, गाणं कसं मांडावं, राग कसा मांडावा, घराण्याची गायकी कुठे अन् कशी दिसली पाहिजे इत्यदी अनेक विषयांवर ते माझ्याशी अगदी भरभरून बोलत! त्यांची जुनी ध्वनिमुद्रणं मला ऐकवत! आपण कुणीतरी मोठे गवई आहोत असा भाव त्यांच्या बोलण्यात कधीही म्हणजे कधीही नसे!

एकंदरीत खूपच साधा आणि सज्जन माणूस होता. अतिशय सोज्वळ आणि निर्विष व्यक्तिमत्व! बोलणं मात्र काही वेळेला मिश्किल असायचं!

एकदा असाच केव्हातरी त्यांच्या घरी गेलो होते. नोकराने दार उघडलं.

"दस्तुरसाब है?"

तेवढ्यात, "अरे ये रे. किचनमध्येच ये डायरेक्ट! चहा पिऊ!" असा आतूनच दस्तुरसाहेबांचा आवाज आला. त्यांच्या स्वयंपाक्याने आमच्या पुढ्यात चहा ठेवला. टेबलावर लोणी, ब्रेड ठेवलेलं होतं! दस्तुरबुवांनी स्वत:च्या हाताने लोणी लावून दोन स्लाईस माझ्या पुढ्यात ठेवले! आम्ही लोणीपाव खाऊ लागलो. तेवढ्यात स्वयंपाकघराच्या एका कोपर्‍यातून दोन मोठे उंदीर इकडून तिकडून पळत गेले! च्यामारी, घरात दोन दोन मोठाले उंदीर! त्यांना पाहताच मी दचकलोच जरा! मला दचकलेला पाहून दस्तुरसाहेबांनी एकदम मिश्किलपणे म्हटलं,

"अरे ते मामा लोक आहेत! खेळतात बिचारे. त्यांना तरी माझ्याशिवाय दुसरं कोण आहे?!" :)

आमच्या दस्तुरसाहेबांना विडी ओढायची सवय होती बरं का मंडळी! फार नाही, पण अधनंमधनं म्हातारा अगदी चवीने ती खाकी विडी ओढायचा! "दस्तुरसाहेब, विडी चांगली नाही बरं प्रकृतीला! जास्त ओढायची नाही!" असा मी त्यांना जरा माझ्या लहानपणाचा फायदा घेऊन एकदा प्रेमळ दम दिला होता!

"बरं बरं! यापुढे एकदम कमी ओढीन. मग तर झालं?!" मी घेतलेला लहान तोंडी मोठा घास त्यांनी तेवढ्याच मोठेपणाने आणि खिलाडीवृत्तीने मला परतवला होता! त्यानंतर काहीच दिवसांनी नेमका मी फोर्टमधल्या कुठल्यातरी दुकानात गेलो होतो, तिथे मला हमदोनो पिक्चरमध्ये असतो तसा एक म्युझिकल सिग्रेट लायटर मिळाला. त्या लायटरचे स्वर खूप छान होते. तो लायटर पाहिल्यावर मला एकदम दस्तुरसाहेबांचीच आठवण आली. मी तो त्यांना मुद्दाम प्रेझेंट म्हणून देण्याकरता त्यांच्या घरी गेलो. त्यांनाही तो लायटर खूप आवडला!

"अरे खूप महाग असेल रे! कशाला एवढे पैसे खर्च केलेस? असं कुणी काही प्रेझेंट दिलं की मला खूपच अवघडल्यासारखं वाटतं! आणि काय रे, एकिकडे मला विडी कमी ओढा म्हणून दम देतोस आणि दुसरीकडे हा लायटर पण देतोस? आता तू हा इतका सुंदर लायटर दिल्यावर माझी विडी कशी कमी होणार सांग बरं!" :)

हे म्हणतांना त्यांच्या चेहेर्‍यावर जे निरागस मिश्किल भाव होते ते मी आजही विसरू शकत नाही! खरंच, देवाघरचा माणूस!

त्यांचे गुरू सवाईगंधर्व, यांच्याबद्दल तर ते नेहमीच भरभरून बोलत. त्यात केवळ अन् केवळ भक्तिच असे. सवाईगंधर्वांच्या काही आठवणी त्यांनी मला सांगितल्या होत्या. एक आठवण सांगतांना त्यांच्या डोळ्यात नेहमी पाणी यायचं!

दस्तुरबुवा १४-१५ वर्षांचे असतानाची गोष्ट. सवाईंचा नाटककंपनीसोबत जेव्हा मुंबईत मुक्काम असे तेव्हा सवाई त्यांना त्यांच्या घरी येऊन गाणं शिकवायचे. एकदा असेच पावसाळ्याचे दिवस होते. रस्त्यावर खूपच चिखल आणि पाणी साचलं होतं. त्या पावसातही सवाईगंधर्व त्यांच्या घरी शिकवणीकरता आले. गुरूने शिष्याला चांगली तास, दोन तास तालीम दिली अन् सवाईगंधर्व जायला निघाले! दारापाशी आले व स्वत:च्या चपालांकडे पाहून त्यांनी क्षणभर दस्तुरांच्या आईकडे अत्यंत कृतज्ञतेच्या भावनेनं बघितलं, हात जोडले, थोडे हसले आणि घराबाहेर पडले! झालं होतं असं की बाहेरच्या पावसा-चिखलामुळे सवाईंच्या चपला खूपच बरबटलेल्या होत्या. मुलाची शिकवणी होईस्तोवर त्या माऊलीने सवाईंच्या चपला स्वच्छ धुऊन, तव्यावर वाळवून कोरड्या करून ठेवल्या होत्या!!

इंडियन आयडॉल, अजिंक्यतारा, महागायक, महागुरू, एस एम एस चा जमाना नव्हता तो!!

सवाईगंधर्व महोत्सवात शेवटच्या दिवशी पहाटे गंगूबाई हनगल, दस्तुरबुवा आणि शेवटी अण्णा हा गाण्याचा क्रम गेली अनेक वर्ष होता. 'गोपाला मेरी करूना' ही अब्दुलकरिमखासाहेबांची ठुमरी आणि दस्तुरबुवांचं काय अजब नातं होतं देवच जाणे! सवाईगंधर्व महोत्सवात त्यांना दरवर्षी न चुकता 'गोपाला...' गाण्याची फर्माईश व्हायची आणि दस्तुरबुवही अगदी आवडीने ते गात! फारच अप्रतीम गायचे! साक्षात अब्दुलकरीमखासाहेबच डोळ्यासमोर उभे करायचे!

अण्णा आणि दस्तुर! दोघेही सवाईगंधर्वांचे शिष्य. त्या अर्थाने दोघेही एकमेकांचे गुरुबंधू होते. आणि तसंच त्यांचं अगदी सख्ख्या भावासारखंच एकमेकांवर प्रेमही होतं! सवाई महोत्सवात एके वर्षी दस्तुर गुरुजींनी कोमल रिषभ आसावरी तोडी इतका अफाट जमवला की तो ऐकून अण्णा दस्तुरांना म्हणाले, "फ्रेडी, आज मला गाणं मुश्किल आहे. आज तुमचेच सूर कानी साठवून मी घरी जाणार!"

अण्णा नेहमी प्रेमाने दस्तुरांना 'फ्रेडी' या नावाने हाक मारायचे! :)

असो..!

अजून काय लिहू? आता फक्त दस्तुरबुवांच्या आठवणीच सोबतीला उरल्या आहेत! त्या आठवणींतून बाहेर पडवत नाही. खूप भडभडून येतं. अलिकडेच दस्तुरसाहेब वारले. एका महत्वाच्या कामाकरता, एक महत्वाची कौटुंबिक जबाबदारी निभावण्याकरता त्या दिवशी मी पुण्यात होतो. मला तातडीने मुंबईला परतणं शक्य नव्हतं. दस्तुरांचं अंत्यदर्शन मला मिळालं नाही हे माझं दुर्भाग्य म्हणायचं! दुसरं काय? काल संध्याकाळी थोडा वेळ होता म्हणून मुद्दाम ग्रँटरोडला गेलो होतो. त्या इमारतीपाशी गेलो. पण दस्तुरांच्या घरी जाण्याची हिंमत होईना! खूप भरून आलं. पुन्हा काही आठवणी ताज्या झाल्या. मी दिलेला लायटर असेल का हो अजून त्या घरात? मी येऊन गेल्याचं कळलं असेल का हो आमच्या त्या पारशीबाबाला?

रस्त्यावर नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती. लोकं आपापल्या उद्योगात होते. मी मात्र एकटा, एकाकी उगाच त्यांच्या घराबाहेर घुटमळत होतो. मनात 'गोपाला मेरी करूना'चे सूर रुंजी घालत होते!

--तात्या अभ्यंकर.

संगीतवाङ्मयअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

धोंडोपंत's picture

28 May 2008 - 6:58 pm | धोंडोपंत

अप्रतिम तात्या,

फार सुंदर लेख झालाय. आम्हाला गाण्यातलं फारसं कळत नाही पण पं. फिरोज दस्तूर हे फार मोठे गायक होते असे ऐकून आहोत.

ते किती महान माणूस होते हे तुमचा लेख वाचून कळलं.

पुन्हा पुन्हा वाचावा असा लेख.

आपला,
(भारावलेला) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

ऍडीजोशी's picture

28 May 2008 - 7:11 pm | ऍडीजोशी (not verified)

तुमच्यामुळे आमचीही अशा देवतुल्य माणसाशी ओळख झाली तात्या. मनापासून आभारी आहे.

आपला,

ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

चतुरंग's picture

28 May 2008 - 7:21 pm | चतुरंग

मुलाची शिकवणी होईस्तोवर त्या माऊलीने सवाईंच्या चपला स्वच्छ धुऊन, तव्यावर वाळवून कोरड्या करून ठेवल्या होत्या!!

क्या बात है! काय गुरुभक्ती ही!!
ही माणसे आतून बाहेरुन सोन्यासारखी तावून सुलाखून निघालेली होती की त्यांना बाहेरच्या कोणत्या दागिन्यांची गरज पडली नाही हेच खरं.

(दस्तूर बुवांची एखादी ध्वनिफीत असेल तर दुवा देऊ शकाल का तात्या?)

चतुरंग

प्राजु's picture

29 May 2008 - 10:56 am | प्राजु

क्या बात है! काय गुरुभक्ती ही!!
ही माणसे आतून बाहेरुन सोन्यासारखी तावून सुलाखून निघालेली होती की त्यांना बाहेरच्या कोणत्या दागिन्यांची गरज पडली नाही हेच खरं.

तात्या,
एका अतिशय प्रतिभावान , प्रेमळ कलाकाराची ओळख करून दिलीत. आम्हाला हि ओळख त्यांच्या जाण्यानंतर व्हावी यासारख दुर्दैव नाही.
असो. लेख अतिशय छान उतरला आहे.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रियाली's picture

28 May 2008 - 7:31 pm | प्रियाली

वाह! लेख अप्रतिम उतरला आहे. आठवण फारच हृद्य आहे, आवडली.

व्यक्तिचित्र लिहावे तर...... पुढचे सांगण्याची गरज नाही

अवांतरः

दस्तुरसाहेब, विडी चांगली नाही बरं प्रकृतीला! जास्त ओढायची नाही!"

काय फेकताय? हे तुम्ही सांगितलंत? आतापर्यंत मला वाटायचं की तुमची व्यक्तिचित्रे सेंट्-परसेंट सत्याधारित असतात. आता शंका वाटते. ;) ह. घ्या.

सुमीत's picture

28 May 2008 - 7:53 pm | सुमीत

दस्तूर साहेबांची आठवण तुमच्या लेखनी तून वाचायला मिळाली, फार आवडले तुमचे च्यक्ती चित्रण.

प्रियाली ताई लिहिते तिच्या प्रतिसादात, व्यक्तिचित्र लिहावे तर...... पुढचे सांगण्याची गरज नाही
अजून मी काय सांगणार.

तात्या भक्त (मिसळ प्रेमी)
सुमीत

मन's picture

28 May 2008 - 7:59 pm | मन

व्यक्तिचित्र लिहावे तर...... पुढचे सांगण्याची गरज नाही

आणखी काय म्हणणार.
खरच, मस्त जमलाय लेख्.अगदि समोर घडणारी गोष्ट सांगितल्यासारखं वाटतयं.

आपलाच,
मनोबा

मन's picture

28 May 2008 - 7:59 pm | मन

व्यक्तिचित्र लिहावे तर...... पुढचे सांगण्याची गरज नाही

आणखी काय म्हणणार.
खरच, मस्त जमलाय लेख्.अगदि समोर घडणारी गोष्ट सांगितल्यासारखं वाटतयं.

आपलाच,
मनोबा

प्रभाकर पेठकर's picture

28 May 2008 - 9:10 pm | प्रभाकर पेठकर

शास्त्रीय संगिताच्या वार्‍यालाही मी उभा राहात नाही. (हो!आपल्या जांभईने बिचार्‍या गायकाचा हिरमोड होऊ नये, हा उदात्त हेतू).
पण व्यक्तीचित्रणे आवडतात. कोणी मोठा गायक किंवा एखादा कलाकार माणूस म्हणून कसा असतो हे जाणून घ्यायची उत्सुकता असते. तात्या, तुमच्या लेखनातून ही भूक काही अंशी भागते. आवडले तुमचे लेखन. अभिनंदन.

यशोधरा's picture

28 May 2008 - 10:05 pm | यशोधरा

मनापासून लिहिलेलं जाणवत. खूप छान जमलाय हा लेख.

सहज's picture

28 May 2008 - 10:10 pm | सहज

विडी, उंदीर, गुरुंची एक आठवण, मृदू आवाज ....

अतिशय जिवंत व हृद्य तुमच्या आठवणींचे चित्रण शब्दरुपाने आमच्या समोर केलेत.

>आठवण फारच हृद्य आहे, आवडली.
असेच म्हणतो.

बेसनलाडू's picture

28 May 2008 - 10:18 pm | बेसनलाडू

हृद्य ओळख आणि प्रभावी व्यक्तिचित्र. आवडले.
(वाचक)बेसनलाडू

डॉ.प्रसाद दाढे's picture

28 May 2008 - 10:18 pm | डॉ.प्रसाद दाढे

ह्रद्य आठवणीबद्दल धन्यवाद..

संदीप चित्रे's picture

28 May 2008 - 11:21 pm | संदीप चित्रे

तात्या -- मनापासून धन्स .. लेख लिहिल्याबद्दल
सुदैवाने मी पुण्यात लहानाचा मोठा झालो ... कॉलेजमधे असताना आणि नंतरही पुण्यात असेपर्यंत गंगूबाई, दस्तुरजी आणि भीमेसेनजी हा क्रम चुकवला नाही :)
सवाईमध्ये प्रत्यक्ष 'गोपाला...' ऐकणं फारच उत्कट अनुभव असतो ना !
------
अवांतरः माझ्या मनात अण्णांचाही एक 'कोमल रिषभ आसावरी तोडी' अजूनही घुमतोय !!!
-----

पिवळा डांबिस's picture

28 May 2008 - 11:40 pm | पिवळा डांबिस

सुरेख व्यक्तिचित्र!!

हे दोन बावाजी, पं. फिरोझ दस्तूर भारतीय संगीतात आणि झुबिन मेहता पाश्चात्य,
काय श्रेष्ठ योगदान आहे!

व्यक्तिचित्र लिहावे तर...... पुढचे सांगण्याची गरज नाही
पूर्णपणे सहमत!!

-पिवळा डांबिस

विकास's picture

28 May 2008 - 11:50 pm | विकास

तात्या,

हे पारशीबाबाचे व्यक्तीचित्र खूपच आवडले. दस्तुरांची आठवण दस्तुरखुद्द तात्यांच्या शब्दात!

आमच्या सारख्यांना माहीती नसलेली बरीच माहीती त्यानिमित्त कळली. त्यांना संगीताची ते ही शास्त्रीय संगीताची आवड कशी लागली? सवाई गंधर्वांची भेट कशी झाली? अधिक वाचायला आवडेल.

अवांतरः बाकी "गोपाला मेरी करूना" असे शिर्षक वाचले आणि क्षणभर समजले नाही की गोपाला बरोबर राधे ऐवजी मेरी काय करतेय? का आता काही नवीन पूर्व पश्चिम वाद! मग तुमचे नाव वाचले आणि आठवले की हे गाणे आहे म्हणून :-)

भडकमकर मास्तर's picture

28 May 2008 - 11:59 pm | भडकमकर मास्तर

+१______________________________

शितल's picture

29 May 2008 - 12:04 am | शितल

तात्या ,
तुम्हाला प॑. फिरोज दस्तूर या॑च्या बद्दल वाटणारी आपुलकी, प्रेम हे या लेखातुन छान व्यक्त झाले आहे,
आणि आम्हाला ते गायक म्हणुन जेवढे मोठे होते त्याहुन ही त्याच्यातील देवपणाची आम्हाला आज तुमच्या मुळे ओळख झाली.
धन्यवाद.

वरदा's picture

29 May 2008 - 12:12 am | वरदा

हृद्य ओळख आणि प्रभावी व्यक्तिचित्र. आवडले.

हेच म्हणते...

कोलबेर's picture

29 May 2008 - 12:25 am | कोलबेर

..फार छान जमला आहे हा लेख.

मदनबाण's picture

29 May 2008 - 4:07 am | मदनबाण

व्यक्तिचित्र लिहावे तर...... पुढचे सांगण्याची गरज नाही
१००% सहमत!!!!!

मदनबाण.....

धनंजय's picture

29 May 2008 - 6:07 am | धनंजय

धन्यवाद.

आनंदयात्री's picture

29 May 2008 - 11:31 am | आनंदयात्री

धन्यवाद. तात्या ष्टाईल लेख आवडला.

ईश्वरी's picture

29 May 2008 - 7:11 am | ईश्वरी

>> व्यक्तिचित्र लिहावे तर...... पुढचे सांगण्याची गरज नाही

१०० % सहमत!!
फारच छान झाला आहे लेख. पं. द्स्तूरांबद्द्ल बरीच माहिती त्यानिमित्त मिळाली. धन्यवाद.

ईश्वरी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2008 - 9:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या,
दस्तुरबुवां आवडले !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अमिगो's picture

29 May 2008 - 10:48 am | अमिगो

फारच छान ले़ख, तात्या....
७-८ वर्षा मागचा प्रसंग... मि तेंव्हा सवाईगंधर्व महोत्सवाची वेबसाईट केली होती, फिरोज जी इतके खुष झाले होते की त्यांनी मला आवर्जुन बोलावुन घेतले आणि प्रोत्साहन दिले, तो सर्व सवाई (३हि दिवस) मी त्यांच्या बरोबर ऐकला आणि फिरोज जी त्यांना जे जे भेटायला येत त्यांना माझी आवर्जुन माझी ओळख करुन देत... लेख वाचुन आठवण जागी झाली.

अनेक वेळा सवाईमध्ये प्रत्यक्ष 'गोपाला...' अनुभवलेला,
अमिगो

स्वाती दिनेश's picture

29 May 2008 - 12:58 pm | स्वाती दिनेश

सुंदर व्यक्तिचित्र तात्या..भावस्पर्शी आठवणीतून दस्तूरजींना छान उलगडत नेले आहेस.
सवाईला कधीकाळी जात होते,त्या आठवणी जाग्या झाल्या..
स्वाती

अजिंक्य's picture

29 May 2008 - 1:11 pm | अजिंक्य

अतिशय छान लेख!!
मी लेख वाचून इतका भारावून गेलो, की असं वाटलं.... दस्तुरबुवांची भेट आपल्यालाही घेता आली असती तर!

(पण एक गडबड झाली...! सर्व प्रतिक्रियाकारांनी आपापल्या प्रतिक्रियांमधे
सगळेच चांगले शब्द वापरून घेतले की हो! मला वेगळा शब्द वापरायचा होता....
एकदम निशब्द झालो की हो!!!)

ऋषिकेश's picture

29 May 2008 - 6:08 pm | ऋषिकेश

सुरेख व्यक्तीचित्र तात्या! या अतिशय सुंदर ओळखीबद्दल धन्यु!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

स्वाती राजेश's picture

29 May 2008 - 7:34 pm | स्वाती राजेश

तात्या, छान आठवणी सांगितल्या आहेत या लेखात....

बिपिन कार्यकर्ते's picture

29 May 2008 - 11:31 pm | बिपिन कार्यकर्ते

अप्रतिम व्यक्तिचित्र तात्या. मागे एका दस्तुरांच्या एका शिष्यांची कुठे तरी अशीच भेट झाली होती, त्यांनी सुद्धा असेच त्यांच्याबद्दल भरभरून सांगितले होते.

बिपिन.

मुक्तसुनीत's picture

30 May 2008 - 2:41 am | मुक्तसुनीत

...असेच म्हणतो !

चित्रा's picture

30 May 2008 - 9:07 am | चित्रा

लेखन आवडण्यासारखेच.
फिरोज दस्तुरांबद्दल विशेष माहिती नव्हती.

प्रगती's picture

30 May 2008 - 2:16 pm | प्रगती

अशीच छान छान माहीती देत रहा आम्ही वाचत राहू.
पं. दस्तुर यांच्या बद्द्ल ऐकून होते त्यांची ओळख करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद!

विसोबा खेचर's picture

1 Jun 2008 - 10:48 am | विसोबा खेचर

प्रतिसाद देणार्‍या सर्व वाचकांचे मनापासून आभार...!

आपला,
(कृतज्ञ) तात्या.

संजय अभ्यंकर's picture

1 Jun 2008 - 1:53 pm | संजय अभ्यंकर

तात्यानूं,

फार सुंदर व्यक्ती चित्रण!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Jun 2008 - 12:41 am | बिपिन कार्यकर्ते

तात्या, पं. दस्तूर हे एक खूप मोठे पण तसे सर्वसामान्यांसमोर फारसे न आलेले कलावंत. वरती चतुरंग आणि विकास यांनी लिहिल्याप्रमाणे त्यांच्या गाण्याचा एखादा दुवा दिलात आणि त्यांच्या बद्दल अधिक माहिती लिहिता आली तर पहा. मुख्य म्हणजे पारशी समाजात 'आंग्ल' प्रभाव जास्त असून सुद्धा ते अभिजात हिंदुस्तानी संगिता कडे कसे वळले, त्यांना ही आवड कशी लागली, गुरूंची भेट कशी झाली, त्यांची साधना इ. जाणून घ्यायला आवडेल.

बिपिन.

प्रमोद देव's picture

2 Jun 2008 - 8:56 am | प्रमोद देव

गोपाला मेरी करुना..इथे ऐकता येईल.
फिरोज दस्तुर ह्यांच्याबद्दल मलाही अपार उत्सुकता आहे . उस्ताद अब्दुल करीमखां ह्या त्यांच्या (किराणा)घराण्याच्या अध्वर्युची आठवण व्हावी असेच फिरोजजींचे गायन आहे. डोळे मिटून ऐकले तर त्याची प्रचिती नक्कीच येते.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

बहुगुणी's picture

12 Jun 2008 - 1:42 am | बहुगुणी

esakal/06122008/Mumbai7548B37E8F.htm

मुंबई, ता. ११ - किराणा घराण्याचे गायक पं. फिरोज दस्तूर यांचे ध्वनिमुद्रित गायन ऐकण्याची संधी पु. ल. देशपांडे कला अकादमीने रसिकांसाठी दिली आहे.
हा कार्यक्रम येत्या बुधवारी (ता. १८) सायंकाळी ६.३० वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी सभागृहात होणार आहे. रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे.

किराणा घराण्याचे बुजुर्ग गायक पं. भीमसेन जोशी आणि डॉ. गंगूबाई हनगळ यांचे गुरुबंधू असलेले पं. फिरोज दस्तूर यांचे नुकतेक निधन झाले. त्यांनी गायलेली दुर्मिळ गीते या कार्यक्रमात ऐकायला मिळणार आहेत; शिवाय पं. अजय पोहनकर, पं. श्रीकांत देशपांडे, धनश्री पंडित हे पं. दस्तुरांविषयींच्या आठवणी सांगणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरेंद्र धनेश्‍वर करणार आहेत.

विसोबा खेचर's picture

12 Jun 2008 - 6:47 am | विसोबा खेचर

अरे वा! मेजवानीच दिसते आहे, मी निश्चितच या कार्यक्रमला जाईन!

धन्यवाद बहुगुणीराव!

तात्या.