चांगल्या बातम्या - १

राघव's picture
राघव in जनातलं, मनातलं
16 Aug 2025 - 12:23 am

नमस्कार!
येथील चर्चेप्रमाणे हा धागा सुरु करत आहे.
आपण सगळ्यांनी देखील जमेल तसा हातभार लावावा.

Sowgood Foundation च्या संचालिका प्रगती चास्वाल यांनी आजतोवर दिल्लीमधील सरकारी आणि खाजगी अशा विविध शाळांमधून, ७२००० मुलांपर्यंत शेती आणि त्याविषयक जाणीव पोहोचवलेली आहे. आपल्या मुलाच्या भाज्यांविषयी असलेल्या नावडी वरून त्यांना मुलांना मातीसमवेत जोडण्याची गरज जाणवली आणि त्यातून त्यांनी हा उपक्रम सुरु झालाय. अधिक माहिती - लिंक

रेल्वेमार्गिकांवरून हत्ती पलिकडे जात असतांना होणारे अपघात तामिळनाडूत जास्त प्रमाणात होत असत. कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून बनवलेल्या वॉर्निंग सिस्टीम मुळे, तामिळनाडू मधे २०२३ पासून आजतोवर, अशा हत्तींच्या कळपांच्या रेल्वेक्रॉसिंगच्या ६०००+ घटनांना टाळले जाऊ शकले आहे. यासाठी १२ टॉवर्स आणि २५ थर्मल कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. ही प्रणाली अशा घटनांची पूर्वसूचना वनअधिकार्‍यांना कळवते आणि अधिकारी त्यानुसार ट्रेन्स ना थांबवतात आणि हत्तींच्या कळपांना क्रॉसिंग करण्यास मदतही करतात. अधिक माहिती - लिंक

समाजजीवनमानतंत्रबातमी

प्रतिक्रिया

राघव's picture

16 Aug 2025 - 12:31 am | राघव

रेल्वेक्रॉसिंगच्या ६०००+ घटनांना

यास,

हत्तींच्या कळपांच्या रेल्वेक्रॉसिंगच्या ६०००+ घटनांत होऊ शकणार्‍या अपघातांना टाळले जाऊ शकले आहे.

असे वाचावे.

गोटिंग्युएन, जर्मनी येथील विद्यापिठातील मुख्य जिओकेमिस्ट डिंग्सु फेंग यांच्या टीमनं, डायनासोर्स च्या दातांच्या अवशेषांच्या अभ्यासातून त्यावेळेच्या वातावरणातील CO2 च्या प्रमाणांचं विश्लेषण केलंय. त्यातून डायनासोर्स च्या मृत्यूच्या आधीचं, मृत्यूच्या वेळचं आणि त्यानंतरचं CO2 चं प्रमाण काय असू शकेल याचा अंदाज बांधण्याची शक्यता निर्माण झालीये. या प्रयोगामुळे इतिहासातील क्लायमेट डायनामिक्सच्या अभ्यासास एक वेगळे परिमाण मिळालेले आहे. अधिक माहिती - लिंक

चित्रगुप्त's picture

18 Aug 2025 - 3:41 am | चित्रगुप्त

भालचंद्र नेमाडे 'माझा कट्टा'वर :
https://youtu.be/-CY9d70GRaA?si=f7GsEqthpI9bYdVH

मारवा's picture

18 Aug 2025 - 11:11 am | मारवा

चांगल्या बातम्या वेचून वेचून इथे देण्याचा प्रयत्न करतो नक्की.
या सुंदर संकल्पनेसाठी तुमचे मनापासून आभार.

राघव's picture

18 Aug 2025 - 11:59 pm | राघव

मन:पूर्वक धन्यवाद !

भारतीय स्पेस स्टार्टअप कंपनी अग्निकुल कॉसमॉस ने आणखी एक मानाचा तुरा भारताच्या शिरपेचात खोवलाय.

कंपनीनं जगातील सगळ्यात मोठं असं "सिंगल पीस थ्रीडी प्रिंटेड इनकॉनल रॉकेट इंजीन" बनवलंय आणि कंपनीनं या डिझाईन अन् मॅन्युफॅक्चरींग प्रणालीचं युएस पेटंटही घेतलंय! हे इंजिन एक मीटर एवढं मोठं आहे आणि कसल्याही जॉईंट्स विना बनलंय.
इनकॉनल म्हणजे एक अत्यंत उच्च कार्यक्षमतेचं सुपर अलॉय आहे, जे अत्यंत मजबूत आणि उष्णतेला प्रतिरोधक मानलं जातं.
अधिक माहिती: लिंक

या आधी, ३० मे २०२४ ला कंपनीनं स्वत: निर्मित 3D-प्रिंटेड अर्ध-क्रायोजेनिक SOrTeD (SubOrbital Technological Demonstrator) रॉकेटचं यशस्वी उड्डाण करून दाखवलेलं होतं. सिंगल पीस थ्रीडी प्रिंटेड रॉकेट इंजीनचा वापर करण्यात आलेलं SOrTeD रॉकेट हे जगातलं पहिलं रॉकेट आहे. द्रव आणि वायूचे मिश्रित इंधन वापरून अर्ध-क्रायोजेनिक इंजिनने खुद्द भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अद्याप यशस्वीपणे प्रक्षेपण करू शकलेली नसल्यामुळे अग्निकुलचे हे प्रक्षेपण ऐतिहासिक मानले गेले.
अधिक माहिती: लिंक

अनन्त्_यात्री's picture

19 Aug 2025 - 1:18 pm | अनन्त्_यात्री

रोचक माहिती.

या वर्षीचा प्रतिष्ठीत युएनडीपी ई॑क्वेटर इनिशिएटीव पुरस्कार कर्नाटक मधील बिबी फतिमा सेल्फ हेल्प ग्रूप ला मिळाला आहे. धारवाड जिल्ह्यातील तीर्थ गावच्या १५ स्त्रियांनी मिळून सुरु केलेला हा ग्रूप आज ३० गावच्या जवळपास ५००० शेतकर्‍यांचा आधार आहे. हा ग्रूप पर्यावरणपूरक नैसर्गिक शेती पद्धतींचा वापर करून पावसाधारीत शेतजमीनींमधे ज्वारी/बाजरीवर आधारित मिश्र पीक घेण्यासाठी उद्युक्त करतो. सोबतच हा ग्रूप कम्युनिटी सीड बँकही चालवतो, ज्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मोफत बियाणे दिले जातात.
हा पुरस्कार नैसर्गिक पद्ध्तींचा वापर करून शेतीसंबंधातील शाश्वत विकास आणि पर्यावरणपूरक लवचिकता वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांसाठी त्यांना मिळालाय. अधिक माहिती: लिंक

अभ्या..'s picture

19 Aug 2025 - 9:44 pm | अभ्या..

हा ग्रूप पर्यावरणपूरक नैसर्गिक शेती पद्धतींचा वापर करून पावसाधारीत शेतजमीनींमधे ज्वारी/बाजरीवर आधारित मिश्र पीक घेण्यासाठी उद्युक्त करतो. सोबतच हा ग्रूप कम्युनिटी सीड बँकही चालवतो, ज्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मोफत बियाणे दिले जातात.
वाह्ह्ह्ह्ह.
मस्तच.
ह्याची खरी गरज आहे. ओळीतला प्रत्येक शब्द ही भारताची कृषी गीता आहे. पर्यावरण प्पूरक, नैसर्गिक, पावसाधारित, ज्वारी बाजरी आणि मिश्र पिके, कम्युनिटी सीड बँक आणि मोफत बियाणे. वाहवा वाहवा.

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Aug 2025 - 9:48 pm | अमरेंद्र बाहुबली

खरोखर आनंददायी बातमी, अभ्या सरानी सांगितल्याप्रमाणे ओळिओळीत गीता आहे.

गणेशा's picture

21 Aug 2025 - 10:52 am | गणेशा

वाह...
बिबी फातिमा गटाने केवळ महिलांचे जीवन बदलले नाही, तर पर्यावरणपूरक शेती व पोषणसुरक्षेचे उत्कृष्ट उदाहरण दिले आहे.

प्रत्येक चांगल्या बातमीसाठी नवा धागा तयार केल्यास वाचनात अन प्रतिसाद देण्यास सुलभता येईल.

तसं करणं जरा अवघड आहे आणि व्यवहार्यही नाही. पण सूचनेसाठी धन्यवाद.

ग्रीन एनर्जी च्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, भारतानं फ्लोटिंग सोलर पॅनल्स च्या प्रकल्पांवर बरंच आधी काम सुरु केलेलं आहे. फ्लोटिंग सोलर पॅनल्सच्या माध्यमातून भारताची सध्याची या पद्धतीची उत्पादन क्षमता 278 MW आहे. ही क्षमता 280 GW ते 300 GW पर्यंत होऊ शकते हा अंदाज आहे.

एनटीपीसीचा तेलंगणा मधील रामगुंडम फ्लोटिंग सोलर प्रकल्प (100 MW) हा भारतातील सध्याचा सर्वात मोठा फ्लोटिंग सोलर पॉवर प्लॅंट आहे.
ओंकारेश्वर येथील बनत असलेला फ्लोटिंग सोलर प्रकल्प हा या प्रकारातील सर्वात मोठा प्रकल्प होईल (600 MW).

बाष्पीभवनाचा परिणाम कमी होणे, जमीनीचा भाग वाचणे, सोलर पॅनल्सचे ओव्हरहीटींगचे प्रमाण कमी होणे.. हे या तंत्रज्ञानाचे काही फायदे आहेत. बरेच छोटे देश या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात प्रयत्नरत आहेत ज्यांच्या कडे जमीनीची कमतरता असते.
अर्थात् सोलर पॅनल्स पाण्यावर स्थापन करण्याचा आणि त्यांची देखभाल करण्याचा खर्च बराच आहे हाही एक मुद्दा आहेच.

अधिक माहिती: लिंक १, लिंक २, लिंक ३

कंजूस's picture

21 Aug 2025 - 9:58 am | कंजूस

बातम्या आवडल्या आहेत.

राघव's picture

22 Aug 2025 - 3:42 am | राघव

मनःपूर्वक धन्यवाद!

कचरा व्यवस्थापनात केरळ मधे एक सुखद धक्का देणारी गोष्ट घडतेय.
फार्मा साइंटिस्ट सी. एन. मनोज यांनी स्थापन केलेला स्टार्टअप, पेलिकन केन्टेरा प्रा. लि., आज केरळ मधील जवळपास २०० अपार्टमेंट/कॉम्प्लेक्सेस मधे कचरा व्यवस्थापनेचा प्रयोग यशस्वी करून दाखवलेला आहे. २०२१ मधे स्थापन झालेल्या या स्टार्टअपची कार्यपद्धती खूप व्यवहार्य आणि उल्लेखनीय ठरतेय.

कंपनी वेगवेगळ्या अपार्टमेंटसोबत कॉन्ट्रॅक्ट करते (साधारण रु. ३५०/महिना प्रत्येक घर). घरोघरी दारावरून कचरा उचलल्या जातो, प्लास्टिक कचरा वेगळा करून रिसायकल करण्यासाठी पाठवला जातो, बायोमेडिकल कचरा ट्रीटमेंट सेंटर्स ना पाठवल्या जातो, बायोडिग्रेडेबल कचरा अपार्टमेंट मधे केन्टेराने बसवलेल्या कम्पोस्ट युनिटमधे ट्रीट केला जातो.
यातील वेगळेपणा हा की डॉ. मनोज यांनी यासाठी कॉम्पोसॉर्ब नावाचं एक फंगल आधारित इनोक्युलम निर्मित केलंय, जे बायोडिग्रेडेबल कचर्‍याला उत्कृष्ट सेंद्रीय खतात परीवर्तीत करतं. हे इनोक्युलम ओला आणि सुका कचरा एकत्रीत वापरून, त्यात खेळत्या हवेची परिस्थिती निर्माण करतं. यामुळे उत्कृष्ट खत बनायला मदत होते.

अर्थात् यासाठी केरळ सरकारचं आणि लोकांचंही तेवढंच कौतुक करायला हवं कारण ९०% लोकं कचर्‍याचं वर्गीकरण स्वतःहून नीटपणे करतात!!

अधिक माहिती: लिंक १, लिंक २

मला शास्त्रज्ञांचे नेहमीच अप्रूप राहिलेले आहे. त्यांची डोकी म्हणजे खरंच कोडी असतात! त्यांच्या विषयातील संशोधनासाठीच्या संकल्पना आणि त्यासाठीचे प्रयोग हे मला नेहमीच स्तिमित करत आलेले आहेत.
कॅन्सरचे ट्युमर्स काढण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय आहेत. त्यावर कॅलिफोर्नियातील युनिवर्सिटीमधील एका केमिकल आणि नॅनो इंजिनियर्सच्या टीमनं डोकं लढवलं की जर पेशंटची रोगप्रतिकारक प्रणाली स्वतःच अशा ट्युमरना संपवण्यासाठी उद्युक्त झाली तर? या अनुषंगानं संशोधन करतांना टीमला cowpea mosaic virus (CPMV) हा वायरस आढळला की जो कॅनिन कॅन्सर पेशंटच्या ट्युमरमधे इंजेक्ट केला असता पेशंटच्या रोगप्रतिकारक प्रणालीची त्या ट्युमरला ओळखण्याची आणि त्यांना नष्ट करण्याची क्षमता वृद्धींगत होते.
रोगप्रतिकारक प्रणालीची ही अ‍ॅण्टी ट्युमर स्मृती वृद्धींगत झाल्यामुळे, शरिरात इतरत्र पसरलेल्या कॅन्सर ट्युमर्सना सुद्धा ओळखण्याची अन् नष्ट प्रक्रिया सुरु होते.
या संशोधनाला क्लिनिकल ट्रायल्स साठी घेण्याचे प्रयत्न चालू आहेत.
अधिक माहिती: लिंक १, लिंक २