नादमय सरसर
कोवळ्याशा वाटेवर
कोवळ्या सहा पायांची
चाल होई भरभर
एकामागे दुजा चाले
पुढचे न पाहताना
पुढच्याचे ध्यान नाही
पुढे पुढे चालताना
कधीतरी भांबावून
पुढचा जागी थिजतो
हरवल्या मागच्याला
चार दिशांत शोधतो
मागलाही नकळत
गेलेला पुढे जरासा
थबकून तोही टाके
पुढच्यासाठी उसासा
क्षणातच पुन्हा होई
नजरेत त्यांची भेट
हुश्श मनात करूनि
चालू पुढे त्यांची वाट
- संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, १५/०७/२०२५)
प्रतिक्रिया
21 Jul 2025 - 9:26 pm | विवेकपटाईत
कविता आवडली
22 Jul 2025 - 12:40 am | अभ्या..
इवलुशी प्रेरणा आणि तिचे इवलेसे भुभू आणि तिची इवलुशी कविता.
क्युट क्यूट.
.
आवडली सॅन्डीबाबा.
23 Jul 2025 - 10:24 am | प्रसाद गोडबोले
चो च्विट अभुली
:))))
22 Jul 2025 - 9:53 pm | कंजूस
सहा पायांचा प्राणी कोणता?
23 Jul 2025 - 10:26 am | कपिलमुनी
27 Jul 2025 - 8:10 pm | कर्नलतपस्वी
किटकांना सहा पाय असतात. मुंगी, मधमाशी, झुरळ, फुलपाखरू हे सर्व कीटक आहेत आणि त्यांना सहा पाय असतात.
कमी असतील तर तुटले असतील, जास्त असतील तर जयपूर फुट समजावे.ह.घ्या.
सहा पाय म्हणजे षड्रिपू, षड्रस असे काही आहे का?कवीता उलगडली नाही ती डोक्यावरून गडगडली.
बाकी,कवीता आवडली.
27 Jul 2025 - 9:47 pm | अभ्या..
प्रेरणा दिलीय की चांदणे बुवांनी. त्यावर क्लिकायचे कष्ट घेईना कुणी.
27 Jul 2025 - 6:19 pm | कॉमी
खुप छान.
27 Jul 2025 - 10:36 pm | कर्नलतपस्वी
प्रसंगानुरूप कवीता साधीच असते
का उगाच मन नसलेला अर्थ शोधते?
कवीता न कळल्याने दुर्बोध ठरते,मग,
'आवडली', म्हणून प्रतिसाद देणे उरते
20 Aug 2025 - 9:01 am | गणेशा
वा वा खूप दिवसांनी आलो या विभागात आणि पहिल्या दोन कविता वाचल्या मस्त वाटलं...
बालकवीता करता आली असती ह्या विषयावर तुला.
- गणेशा...
अवांतर : एक महिन्या पूर्वीची कविता २ no वर. कमी लोक आहेत काय काव्य विभागात आजकाल. जुने कुठे गेले पाभे वगैरे
21 Aug 2025 - 1:45 pm | चित्रगुप्त
'पेर्णा' सगळ्यात शेवटे टाकलीत, हे ब्येस केले. त्यामुळे खुमारी आणखीनच वाढली आहे. आधी मलापण कुठल्यातरी कीटकाविषयी, मग षड्रिपु वगैरे वाटू लागले होते. पण त्या दोन पिल्लांची गोड लगबग बघून कविता तर समजलीच, त्याशिवाय खूप गोड, निरागस काही बघण्यातला आनंद आणि समाधान लाभले.
अनेक आभार. असेच प्रयोग करत रहावे ही विनंती.
22 Aug 2025 - 3:54 am | राघव
क्लास! कविता खूप आवडली सँडीभाऊ!
23 Aug 2025 - 8:34 am | प्रचेतस
संदीपशेठ जियो....!