यह मेरा काम नही है

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
1 Jul 2022 - 12:08 pm

"अरे सचिन यहा आना तो."

अनिल ने मला त्याच्या कॅबीनमध्ये बोलावले.

अनिल म्हणजे डाटा सेंटरचा हेड मॅनेजर होता. स्वभावाने अगदीच मोकळा नसला तरी एक माणूस म्हणून तो ठिक होता. एखादी गोष्ट, नवी टेक्नॉलॉजी माहीत करून आपल्या डेटा सेंटर मध्ये कशी आणता येईल याबाबत तो नेहमी विचार करत असे.

आता त्याने मला कसल्यातरी कामाला बोलावले होते. तसेही मी काही महत्वाचे काम करत नव्हतो.

"तुम्हे कल शाम को नगर जाना पडेगा. यह अपना पहेलाही प्रोजेक्ट है. वहा जाके कॉम्पूटर को नेटवर्क मे लाना यह काम है." - अनिल.

"मतलब वहा जाकर कॉम्पूटर इंटॉल करना वगैरा काम है क्या?", मी प्रश्न केला.

हा लगभग वही है. नगर अर्बन बॅंक है. उसका प्रोजेक्ट है. ब्रांच मिलाकर १२५ कॉम्पूटर है.

लेकीन सर यह अपना काम नही है, मी उत्तरलो.

यहा देखो.,

असे म्हणून अनिलने त्याच्या डेस्कटॉपमधील टास्कबारमधील नोटीफिकेशन एरीयामधील कॉप्यूटर नेटवर्कींगचे आयकॉन दाखवले व मला विचारले, "यह क्या है?"

मी उत्तर दिले की आपका डेस्कटॉप नेटवर्क मे है उसीके बारे मे यह आयकॉन जानकारी देता है.

"बस, यही तो काम करना है. अपना काम नही भी है, और वह हमे आता है तो करना पडता है. मेरा काम नही है ऐसे नही बोलना चाहीए", अशी पुस्ती त्याने जोडली.

असेही मी या डिपार्टमेंटमध्ये, कंपनीत नवीन होतो. नक्की नाही म्हटले की काय होईल असा विचार करून मी ठासून होकार भरला नाही. पण मला उद्या नगरला जावे लागणार होते हे नक्की.

अनिलने मग सांगितले की प्रोजेक्टमधून दिलेश, तसेच हार्डवेअर मधून प्रसाद हे देखील येत आहेत. त्यांचेबरोबर को-ऑर्डीनेशन करून उद्या निघा.

थोडक्यात अनिलने त्याचे काम बरोबर करून घेतले होते. एकतर मला स्पष्टपणे नाही म्हणाता येणार नव्हते हे त्याला माहीत होते. प्रोजेक्टचे दोन जण तेथे जाणारच होते, पण त्यांच्या मदतील आणखी एखादा असावा म्हणून मला तेथे जायला त्याने भाग पाडले होते.

दुसर्‍या दिवशी आम्ही चार जण एका बसने नगरला पोहोचलो. रात्री आधीच बुक केलेल्या हॉटेलमध्ये मुक्काम केला. सकाळी छान पैकी नाष्टा केला. त्यानंतर तेथे काम सुरू केले. अर्थात तेथे मला तसे काम नव्हते. पण मग रिकामे राहून काय करायचे त्यापेक्षा काहीतरी करावे म्हणून कॉम्पूटर मध्ये ऑपरेटींग सिस्टम टाकत बसलो.

नगर शहरात आम्ही तीन दिवस होतो. तेथील काम अजून चालणार होते. पण मी तिसर्‍या दिवशी घरी निघालो.

त्यानंतर असेच एक दिवस अनिलचे टेलीफोनवर बिलींग टीम बरोबर काही तरी वादाचा प्रसंग चालू असावा अशा अर्थाचे आवाज चढवून काहीतरी बोलणे चालू होते. तेव्हा अनिल अगदी स्पष्टपणे बोलला की, "यह मेरा काम नही है."

जीवनमानतंत्रनोकरीप्रतिसादअनुभव

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

1 Jul 2022 - 12:55 pm | तुषार काळभोर

पन ये मेरा काम नहि है!

:D

विजुभाऊ's picture

1 Jul 2022 - 1:55 pm | विजुभाऊ

कामाला माणूस नसला आणि तेथे काम केले तर ते टीमसाठी अधीक चांगले असते.
मात्र कंपनीच्या माणसाने त्याच्य अकामाचा बोजा तुमच्या अंगावर टाकला तर " हे माझे काम नाही. ते करण्यासाठी तू आहेस." असे म्हणणे योग्य च आहे

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Jul 2022 - 2:37 pm | ज्ञानोबाचे पैजार

जिथे काम करतो तिथे "यह मेरा काम नही है" असे म्हटल्याने अनेकदा आपलेच नुकसान होते असा अनुभव आहे.

कोणते काम कोणाचे आहे हे आपल्या वरिष्ठांनासुध्दा चांगले माहित असते, पण तरी सुध्दा ते एखादे काम आपल्याला करायला सांगतात त्यात त्यांचा काहीतरी वेगळा हेतू असतो.

बहुतांशवेळी संस्थेचा फायदा हाच उद्देश असतो आणि असे काम करताना आपोआप आपलाही फायदा होत असतो. हे लक्षात घेतले तर मग "यह मेरा काम नही है" असे म्हणावे लागत नाही.

पैजारबुवा,

कर्नलतपस्वी's picture

1 Jul 2022 - 3:17 pm | कर्नलतपस्वी

ये मेरा काम नही है
बोलना पडता है
मगर कब बोलना
इसके लिये सोचना पडता है

छान.....

सर टोबी's picture

1 Jul 2022 - 4:03 pm | सर टोबी

तुम्हाला पूर्ण संदर्भ माहिती होता असे दिसत नाहीय. एक उडत उडत ऐकू आलेल्या वाक्यावरून तुम्ही सोयीचा अर्थ काढल्यासारखं वाटतंय. अर्थात लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण हा अनुभव सार्वत्रिक असतो पण तरी अनिलला संशयाचा फायदा द्यावा असे वाटते.

श्वेता व्यास's picture

1 Jul 2022 - 5:51 pm | श्वेता व्यास

बरीच कामे जमत असतील पण हे माझं काम नाही असं म्हणता येत नसेल तर फार राबावं लागतं, घरातही आणि बाहेरही :)
एक कलीग आहे, तो हे माझं काम नाही असं न म्हणता मी हे करून तुमच्यावर कसे उपकार करत आहे याची मात्र जाणीव वरिष्ठांना करून देत असतो, ते शिकायचंय.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 10:12 pm | अमरेंद्र बाहुबली

मी सुझलोन ह्या पवनचक्की क्षेत्रातील कंपनीत होतो. तिथे ओपरेशन एन्ड मेंटेनन्स ह्या डिपार्टमेंटला मी होतो. त्यात प्रामुख्याने दोन ईंजिनीअर असायचे एक मेकॅनीकलनी दुसरा ईलेक्ट्रीकल. जनरली ईलेक्ट्रीकल ईंजीनीअर मेकॅनीकल कामाला कधी हात लावायचा नाही पण मोकॅनीकल ईंजीनीअरने ईलेक्टरीकल कामेही ऊरकून यावीत अशी त्यांची अपेक्षा असायची. मी हे माझे काम नाही असं सांगून स्पष्ट नकार द्यायचो. कंपनी तुम्हालाही पगार देतेय मग तुमचे काम तुम्ही करायला हवे असं स्पष्ट सांगायचो. ह्यावरून वादावादी व्हायची व नग प्रकरण “केबीन” मध्ये जायचे. तिथे माझे हेड लोक माझी बाजू घ्यायचे व ईलेक्ट्रीकल ईंजी. तोंडावर पडायचे. पण मला आता लक्षात येतंय का हे करून मी माझे नूकसान करून घेतलेय. फूकट मिळनारी मल्टीमीटर वगैरे वापरायची माहीती, ईलेक्ट्रीकल ड्राॅईंग वाचायची माहीती मी स्वतहून घालऊन घेतली.

पाषाणभेद's picture

1 Jul 2022 - 11:25 pm | पाषाणभेद

वर नेमून दिलेले काम खरे तर प्रोजेक्ट डिपार्टमेंटचे होते. त्यासाठी माणसेही नेमलेली होती.
काही व्यक्तींची सवय "मुझे सब आता है" अशी असते. आपल्या अधिकारात ते इतरांना कामाला लाऊ शकतात.

ते काम करून आपल्याला काही फायदा होत नसेल, आपल्या अधिकारावर गदा येत असेल तर स्पष्ट पणे नकार देणे कधीही उचीत असते.

बिलींग डिपार्टमेंटशी बोलतांना अनिल यांनी बोललेले वक्तव्य माझ्याशी बोललेल्या वक्तव्याच्या विरुद्ध आहे.
(तसेच इतर वेळीही तेथे बिलींग डिपार्टमेंटची कामे कसलेही क्रेडीट न मिळता केली जात असत हे मला नंतर समजले. तो संदर्भ वर लिहीला नसल्याने लेख समजण्यास थोडी तृटी जाणवली असेल.)

लोक कशी परस्परविरोधी विधाने, वर्तन करतात, आपला फायदा कसा करवून घेतात हे दर्शवण्याचा हेतू होता.

तुर्रमखान's picture

2 Jul 2022 - 1:19 am | तुर्रमखान

इथं कंटेक्स्ट महत्वाचा असतो. कधिही, 'धिस इज नॉट माय जॉब' वगैरे म्हणू नका, प्रत्येक गोष्टीत नवीन काहितरी शिकण्याची संधी असते वगैरे फ्रेशर्ससाठी ठिक आहे. पण कॉरपोरेट जगतात एकदा तुम्ही स्वतःला सिद्ध केलं की हा प्रश्न सर्वात आधी विचारायचा असतो की हे खरच माझं काम आहे का?
तुमच्या काँट्रॅक्टमध्ये न लिहलेल्या किंवा तुमच्या प्रोफाईल मध्ये नसलेल्या गोष्टीत गरज नसताना पडायचं नसतं. कुणाच्या तरी शेपटीवर उगाच पाय पडू शकतो, अपघात होउ शकतात, अनेक गुंतागुंत होउ शकते अशा अनेक शक्यता असतात. केवळ गूड इंटेशनचा झेंडा दाखवून यातून तुम्ही सुटू शकत नाहीत. असं काही घडलं तर सर्वात प्रथम हे तुम्ही का केलंत? या प्रश्न विचारला जातो.

मी हा धडा खूपच लवकर घेतला. पहिल्या वहिल्या नोकरीत असताना तिथला स्टोअरकीपर ऑफिसबॉय उपलब्ध नव्हता म्हणून इन्वॉइस की काहितरी देण्यासाठी दुचाकीवर जायला तयार झाला आणि त्याचा अपघात झाला होता.

सुक्या's picture

2 Jul 2022 - 10:33 am | सुक्या

तुमच्या काँट्रॅक्टमध्ये न लिहलेल्या किंवा तुमच्या प्रोफाईल मध्ये नसलेल्या गोष्टीत गरज नसताना पडायचं नसतं.
सेपरेशन ऑफ ड्युटी काटेकोर पाळली तर बराच फायदा होतो. दुसर्‍याच्या कामात विनाकारण लुडबुड होत नाही वरुन अगदी जरुर असेल तर तुमचे वरीष्ठ तुम्हाला ते काम करायला बोलावतीलच. तसे झाले तर तो तुमचाच फायदा असतो.

माझे उदाहरण सांगतो, एकदा कंपणीच्या डेटाबेस मधे काहीतरी झोल झाला व त्याचा दायरेक्ट प्रभाव पडुन कंपणीचे आर्थीक नुकसान व्हायला लागले. ८-१० तास झाले तरी तो झोल काही सापडला नाही. माझा मॅनेजर व ज्या देटाबेस मधे झोल झाला त्या टीम चा मॅनेजर पक्के हाडवैरी. शेवटी रात्री २/३ वाजेच्या सुमारास मला त्या मॅनेजर चा फोन आला व तो मदत कर म्हणुन मागे लागला. मी पण कंपणीचे नुकसान होते आहे तेव्हा कशाला भाव खा म्हणुन माझ्या मॅनेजर ला न सांगता तो डीफे़क्ट शोधुन फिक्स करुन दिला.

दुसर्‍या दिवशी माझ्या मॅनेजर ला हे समजल्यावर त्याने मलाच दट्ट्या दिला. मला न सांगता तु हे काम केलेच का वगेरे वगेरे. ज्या ईंजीनियर चे काम होते तो "मला सांगायचे ना. मी केले असते. आता माझा बँड वाजणार" वगेरे बोलुन मलाच दोष द्यायला लागला. शेवटी काम राहीले बाजुला त्याचा पॉलीटीकल बेंडबाजा सांभाळण्यात ३/४ दिवस गेले.

तेव्हापासुन मला कुणी गळ घालुन काम कर म्हणाला की सरळ मॅनेजर ला फोन लाव म्हणुन सांगतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Jul 2022 - 11:11 am | अमरेंद्र बाहुबली

असं सेम माझ्यासोबत झालं. एकाला मदत म्हणून फोनवर सपोर्ट देत होतो. त्याच्याने ते काम काही झाले नाही. तर त्याने माझ्या त्याचेया मंनेजर ला रिपोर्ट केला की त्याने नीट सपोर्ट केला नाही म्हणून काम झाले नाही. त्याच्या मॅनेजरने माझेया मॅनेजरला हे सांगीतलं. माझ्या मॅनेजरने मला फैलावर घेतलं. मग मी (माझ्या मॅनेजरच्डा परवानगीने) डायरेक्ट त्या मॅनेजरला फोन करून झापलं.

वामन देशमुख's picture

2 Jul 2022 - 7:18 am | वामन देशमुख

माझे चार आणे -

एकेकाळी मी नोकरी करायचो. मग सल्लागारी करायला लागलो.

शेवटची नोकरी करताना त्या कंपनीत "प्रत्येक गोष्टीत नवीन काहितरी शिकण्याची संधी असते" अश्या सुविचारांनी भारावून गेलो होतो. कंपनीत प्रत्येकाला मी हवा होतो पण पगार मात्र त्याप्रमाणात मिळत नव्हता. शेवटी शेवटी माझी "jack of all trades master of none" अशी अवस्था झाली होती. नोकरी सोडल्यावर तो कौशल्य-संच बाजारात विकायला गेलो तेंव्हा मात्र फारशी गिऱ्हाईके सापडेनात.

शेवटी "हे माझं काम नाही" हे स्पष्ट बोलून दाखवायचं नाही, पण प्रत्यक्षात मात्र तसेच वागायचे हा धडा मिळाला.

मतभिन्नतेच्या आदरासहित तात्पर्य: "माझं हे काम आहे" या ज्ञानापेक्षा "हे माझं काम नाही" हे भान असणं अधिक महत्वाचं आहे.

कानडाऊ योगेशु's picture

2 Jul 2022 - 12:01 pm | कानडाऊ योगेशु

+१. नाही म्हणता येणे शिकता आले पाहिजे.नाहीतर आपला सांगकाम्या होतो.
बाह्यजगतात (कॉर्पोरेट व सरकारी) कोणीही समाजकार्य करायला बसलेला नसतो. प्रत्येकाचा स्वतःचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे बघण्याचाच दृष्टीकोन असतो. फायदा हा दरवेळेला पैश्यातच मोजला जाईल असे काही नसते.

नोकरी सोडल्यावर तो कौशल्य-संच बाजारात विकायला गेलो तेंव्हा मात्र फारशी गिऱ्हाईके सापडेनात.

मुक्तव्यवसायिक (freelancer) असेल तरीही असेच होतो. कोणत्याही गोष्टीत प्राविण्य मिळत नाही पण सगळ्यांची ओळख होते.
सतत नवीनवीन गोष्टी शिकत राहिल्याने मजा वाटते पण खाजगी आयुष्याला जास्त वेळ न मिळाल्यामुळे इतर त्रास होतात.

अमर विश्वास's picture

2 Jul 2022 - 5:42 pm | अमर विश्वास

बरेचदा आपल्या नेहमीच्या (expected) कामांव्यतिरिक्त इतर कामे करायचा आग्रह होतो / गरज पडते
रिलेशनशिप म्हणून किंवा स्वतः चा अनुभव वाढावा म्हणून काही ज्यादाची कामे करायला हरकत नाही

पण कुठेतरी थांबणे आवश्यक .. नाही म्हणता आलेच पाहिजे ...

one needs to know where to draw a line