कंबोडियाविषयी दोन लेखांची नोंद

गामा पैलवान's picture
गामा पैलवान in जनातलं, मनातलं
16 Oct 2021 - 6:27 pm

लोकहो,

कांभोज देश अर्थात कंबोडिया याबद्दल संदीप कुलकर्णी यांनी दैनिक सकाळ मधल्या पैलतीर सदरात दोन लेख लिहिले होते. सकाळ वर्तमानपत्राचे सदर दुवे कालबाह्य झाले आहेत. म्हणून ते दोन लेख इथे डकवतो आहे.

अशी डकवणी मिपाच्या नियमाविरुद्ध आहे. परंतु नोंद ठेवण्यासाठी या लेखाचा व चर्चेचा उपयोग होईल. तसंच सदर घटनेचा भारताच्या सुरक्षेशी व दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय धोरणांशी अप्रत्यक्ष संबंध आहे. त्यामुळे सदर डकवणीचा अपवाद करावा ही संपादकमंडळास विनंती. __/\__

----x----x----

लेख क्रमांक १ / २

लेखाचा कालबाह्य मूळ दुवा : http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5285922805981958652&Sectio...(%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B0)

लेखाचा कालबाह्य दुवा जिथे सापडला ती जागा : https://www.misalpav.com/comment/861515#comment-861515

लेख जिथनं उचलला तो स्रोत : https://www.facebook.com/mahadevkoliyuva/posts/359580317563769

कंबोडिया.. एक भयानक सत्य! (पैलतीर)
- संदीप कुलकर्णी

बुधवार, 8 एप्रिल 2015 - 05:15 AM IST
Tags: Pailteer, Cambodia, Pol Pot, Sandeep Kulkarni

मला मुळातच प्रवासाची आवड असल्याने संधी मिळेल तेव्हा पर्यटनाला जातच असतो. व्हिएतनाममध्ये येऊन मला दोन वर्षे होत आली होती. या दोन वर्षांत मी संपूर्ण व्हिएतनाम पिंजून काढला; पण शेजारचा कंबोडिया हा देश मात्र बघायचा राहून गेला होता. पेशाने शिक्षक असल्याच्या अनेक फायद्यांपैकी महत्त्वाचा फायदा हा, की भरपूर फिरता येऊ शकते. कारण, शिक्षक हा वर्षातून साधरणत: 200 दिवसच काम करत असतो. एका आठवड्याचा ‘स्प्रिंग ब्रेक‘ मिळाल्यानंतर मी कंबोडियाचा बेत आखला. ‘गुगल‘वरून माहिती घेतली. त्यावेळी अंगकोरवट येथील विष्णूचे पुरातन मंदिर पाहण्यासारखे आहे, असे समजले. सीम रिप या शहरातील अंगकोरवट मंदिर पाहून पुन्हा व्हिएतनामच्या प्रवासाला निघालो. व्हिएतनाम ते कंबोडिया हा प्रवास बसनेही करता येतो. या प्रवासामध्ये आमची बस एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबली. तिथे एक छोटी मुलगी पुस्तकांचा संच विकण्यासाठी आली होती. ‘एकतरी पुस्तक घ्या‘ अशी विनंती ती करू लागली. त्यामुळे फारसा उत्सुक नसतानाही मी तिच्याकडून एक पुस्तक घेतले. ‘फर्स्ट दे किल्ड माय फादर‘ हे त्या पुस्तकाचे नाव.

सहज म्हणून पुस्तकाचे पहिले पान वाचले आणि चक्रावूनच गेलो. प्रवासातील पुढच्या चार तासांमध्ये ते 240 पानांचे पुस्तक मी वाचून संपवले. कंबोडियामध्ये 1975 ते 79 या कालावधीमध्ये प्रचंड नरसंहार झाला. त्या संहारातून बचावलेल्या एका मुलीची आत्मकथा म्हणजे ते पुस्तक. कंबोडिया म्हटले, की बहुतेकांचे आकर्षण अंगकोरवट हेच असते. माणुसकीला लाजवेल, अशा नरसंहाराकडे मात्र साहजिकच दुर्लक्षच होते. व्हिएतनामला परतल्यानंतर एकाच आठवड्यानंतर मी पुन्हा एकदा कंबोडियाला गेलो. त्या नरसंहाराशी निगडीत असलेल्या ठिकाणांना भेट देऊन त्या भयानक सत्याचा जवळून अनुभव घेतला. त्या भीषण संहारामध्ये चार वर्षांतच 20 लाख नागरिक मारले गेले. त्यातील दहा लाख नागरिकांची तर अमानुष कत्तल झाली आणि उर्वरित लोक भूकबळी किंवा रोगांचे शिकार झाले. त्यावेळी कंबोडियावर खमेर रूज लोकांचे राज्य होते. ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ कंबोडिया‘च्या सदस्यांना ‘खमेर रूज‘ म्हटले जात असे. अंदाजे दहा लाख लोकांची जिथे हत्या झाली, त्यांना आता ‘किलिंग फिल्ड्‌स‘ म्हणतात. येथे ट्रकमध्ये कोंबून माणसांना आणले जात असे आणि त्यांची हत्या करून पुरले जात असे. अशा जवळपास 300 जागा कंबोडियात आहेत आणि त्यापैकी केवळ 85 ‘किलिंग फिल्ड्‌स‘चे उत्खनन झाले आहे. आजही हे काम सुरूच असून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सतत वाढतच आहे. या 300 ‘किलिंग फिल्ड्‌स‘पैकी सर्वांत मोठी जागा कंबोडियाच्या राजधानीमध्येच आहे. या देशाची राजधानी फुनाम पेन्ह ही आहे. इथे आतापर्यंत दोन हजारांहून अधिक मृतांचे अवशेष सापडले आहेत. या सर्वांत मोठ्या ‘किलिंग फिल्ड्‌स‘ला भेट देण्याचे ठरविले. तत्पूर्वी, ‘खमेर रूज‘ अस्तित्वात आले कसे आणि त्यांनी या हे सर्व का केले, याची थोडक्‍यात माहिती घेऊ.

1953 मध्ये फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कंबोडिया हा देश म्हणून उभा राहत होता. 1970 च्या दशकाच्या सुरवातीस देशात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला होता. 1970 मध्ये सिंहौक या पंतप्रधानास पायउतार व्हावे लागले. अमेरिकेच्या मध्यस्थीने लॉन नूल या लष्करी अधिकाऱ्याकडे देशाची सूत्रे सोपविण्यात आली. पण तोदेखील या भ्रष्टाचाराला आळा घालू शकला नाही. सामान्य जनतेचा, विशेषत: ग्रामीण भागातील गरीब कंबोडियन जनतेचा सरकारवर आणि सरकारी कर्मचाऱ्यांवरील राग वाढतच होता. भरीस भर म्हणून व्हिएतनाम-कंबोडियाच्या सीमेवर होणाऱ्या अमेरिकी सैन्याच्या बॉम्बहल्ल्यांमुळे तेथील जनता अधिकच संतापली. या सगळ्याचा फायदा घेत ‘कम्युनिस्ट पार्टी‘ने आपले बस्तान बसवले. त्यांचा प्रमुख होता पॉल पॉट. या पक्षाच्या सैनिकांना ‘खमेर रूज‘ म्हणून ओळखले जात असे.

17 एप्रिल 1975 रोजी पॉल पॉटच्या सैन्याने कंबोडियाच्या राजधानीवर सशस्त्र हल्ला करत ताबा मिळवला. यामुळे सुरवातीला अनेकजण आनंदी झाले. पण त्यांचा हा आनंद अगदी काही तासांपुरताच टिकला. कारण, त्या दिवसापासून कंबोडियन जनतेच्या आयुष्यातील सर्वांत भीषण काळाला सुरवात झाली होती. त्या काळात 30 लाख लोकसंख्या असलेले फुनाम पेन्ह हे शहर 48 तासांत रिकामे करण्यात आले. या सर्व शहरवासीयांना बळजबरीने खेड्यांकडे नेण्यात आले. ज्यांनी विरोध केला, त्यांना सरळ ठार केले जात होते. पॉल पॉटने त्याच्या स्वप्नातला कंबोडिया प्रत्यक्षात आणायला सुरवात केली. पॉल पॉटच्या ‘खमेर रूज‘कडे जेमतेम 15,000 सैनिक होते. त्यातही प्रामुख्याने अशिक्षित आणि ग्रामीण भागातील तरुण होते. ‘शहरात राहणारा, शिकलेला, लॉन नूलच्या काळात कोणत्या ना कोणत्या प्रकारे शासनात काम करणारे, शिक्षक, वकील, डॉक्‍टर, इंजिनिअर हे आपले शत्रू आहेत,‘ अशी पॉल पॉटची ‘थिअरी‘ होती. या सर्वांची हत्या करण्याचे पॉटने आदेश दिले. त्यानंतर कोणतीही चौकशी न करता सर्व शिक्षितांच्या हत्या करण्याचे धोरण ‘खमेर रूज‘ने स्वीकारले. त्यामुळे सर्वसामान्य जनता आपली ओळख लपवायला लागली. पण त्याचा फार काही फायदा झाला नाही. एखाद्याकडे पुस्तक सापडणे, हादेखील त्याच्या शिक्षित असण्याचा पुरावा गृहीत धरला जात असे. त्यामुळे लोकांनी आपापली पुस्तके लपवली, जाळली. चष्मे असणाऱ्यांनी आपले चष्मेही फेकून दिले. पण त्यानंतर चष्मा घातल्याने नाकावर उमटणाऱ्या खुणांद्वारे शिक्षित असल्याचा निष्कर्ष काढून लोकांना ठार करण्यास ‘खमेर रूज‘ने सुरवात केली. 1975 ते 1976 या एका वर्षात शहरांत राहणारे जवळपास दोन लाख नागरिक मारले गेले. ‘खमेर रूज‘ने देशाच्या सर्व सीमा बंद केल्याने या कालावधीत कुणीही देशातून बाहेर पळून जाऊ शकत नव्हता. विमानतळ, बस, रेल्वे या सगळ्या सेवा पूर्णपणे बंद केल्या होत्या. मारल्या गेलेल्यांचा दोष एकच.. त्यांना लिहिता-वाचता येत होते किंवा ते शहरात राहत होते.

‘खमेर रूज‘च्या काळात पॉल पॉटने सर्व प्रकारच्या उत्सवांवर बंदी घातली होती. प्रेम, भावना आणि धर्माच्या कुठल्याही गोष्टीवर त्याच्या राज्यात बंदी होती. सर्वांना सारखेच कपडे घालण्याची सक्ती होती. हा ‘गणवेश‘ म्हणजे काळा शर्ट, काळी पॅंट आणि लाल मफलर. ‘शिक्षण घेतल्याने आपली विचारसरणी लोकशाही व स्वातंत्र्यास अनुकूल होते,‘ असे सांगत पॉटने शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ बंद केले. ‘कंबोडियामध्ये सर्वजण फक्त तांदुळाचीच शेती करतील आणि प्रत्येकाला दिवसभरात दोन वाटी भात असाच आहार मिळेल,‘ असाही आदेश लागू करण्यात आला. ‘खमेर रूज‘च्या राज्यात सर्वजण सकाळी 7 ते सायंकाळी 7 शेतात काम करतील, हा नियम होता. या दिनक्रमात दुपारी एका तासाची सुटी असे. ‘दिवसभरात मिळणारे अन्न खाऊन काम करण्याची ताकद आपल्यात असलीच पाहिजे; अन्यथा मरायला तयार राहा‘ असा वटहुकूमच पॉल पॉटने काढला होता. या व्यवस्थेला विरोध करणाऱ्याची हत्या निश्‍चित होती. सर्वांनी एकत्रच राहायचे, असाही आदेश होता. त्यामुळे वैयक्तिक घर, मालकी हक्क वगैरे गोष्टी पूर्णपणे नामशेष झाल्या होत्या. कंबोडियाचे चलनही पूर्णपणे नष्ट झाले होते. पुरुष आणि स्त्रिया वेगवेगळ्या झोपड्यांमध्ये राहायच्या. अशा प्रकारचे अत्याचार सतत चार वर्षे सुरू होते. त्यातच शिक्षित लोक सापडले, की त्यांच्या हत्या करण्याचे सत्रही सुरूच होते. पण या हत्या करण्यासाठी बंदुकीच्या गोळ्या ‘खर्च‘ होत होत्या. त्यावेळी पिकवलेल्या तांदुळाचा मोबदला म्हणून चीनकडून कंबोडियाला शस्त्रास्त्रे मिळत असत. बंदुकीच्या गोळ्या महाग असल्याने ‘मिळेल त्या हत्याराने हत्या करा‘ असा आदेश पॉल पॉटने ‘खमेर रूज‘ला दिला. त्यामुळे ‘खमेर रूज‘च्या सैनिकांनी कुदळ, फावडे, सुरे यांनीही हत्या करण्यास सुरवात केली. ही हत्यारे आजही फुनाम पेन्हमधील वंशसंहाराच्या संग्राहलयात पाहता येतात. यातील बहुतांश हत्या ‘किलिंग फिल्ड्‌स‘मध्ये केल्या जात असत.

फुनाम पेन्हमधील एक एकराच्या ‘किलिंग फिल्ड‘मध्ये गेल्यावर प्रथम मी घाबरलोच. एरवी स्मशानभूमीत जातानाही आपण थोडा विचार करतो. ही स्मशानभूमी तर 20 हजार प्रेतांची आहे आणि या सर्वांना केवळ चार वर्षांतच ठार मारण्यात आले आहे! या ‘किलिंग फिल्ड‘मध्ये एकूण 13 ‘विशेष जागा‘ आहेत. इथे फिरताना आपल्याकडे एक रिमोट दिला जातो. प्रत्येक ‘स्पॉट‘वर गेल्यानंतर या रिमोटने त्या जागेचा क्रमांक दाबला, की ‘रनिंग कॉमेंट्री‘ सुरू होते. प्रत्येक ठिकाणी काय व्हायचे, याचे वर्णन त्यात केले जात असे. तिथे असलेले ‘स्पॉट‘
खालीलप्रमाणे :

ट्रक स्पॉट : ज्यांची हत्या करायची आहे, त्यांना ट्रकमध्ये भरून आणायचे आणि या ‘स्पॉट‘वर उतरवायचे.

डार्क अँड ग्लूमी डिटेन्शन : सहसा येथे दिवसा उजेडी कैद्यांना आणले जात असे. त्यांना रात्री ठार मारले जायचे. दिवसभर त्यांना या अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवले जात असे.

वर्किंग ऑफिस : ज्यांची हत्या होणार आहे, त्यांच्या नोंदी इथे ठेवल्या जात असत.

केमिकल सब्स्टन्स स्ट्रॉंग रूम : मृतदेहांचा वास येऊ नये म्हणून त्यांच्यावर डीडीटी फवारले जात असे. त्याचा साठा या खोलीत असे.

मास ग्रेव्ह 1 : या खड्ड्यात 450 मृतदेह सापडले.
मास ग्रेव्ह 2 : या खड्ड्यात 166 मृतदेह सापडले.
मास ग्रेव्ह 3 : या खड्ड्यात 200 मृतदेह सापडले.
वॉक ऑन द हॉरर लेक : या तळ्यात अनेक मृतदेह फेकले गेले. त्यातील 200 हून अधिक मृतदेह तरंगत होते. तळ्यात असलेले असंख्य मृतदेह अद्यापही बाहेर काढण्यात आलेले नाहीत.
आणि 10 ग्लास बॉक्‍स 1 आणि 2 : येथे ठार मारण्यात आलेल्यांचे कपडे होते.
चायनीज सेरेमोनियल किओस्क

सर्व्हायव्हर स्टोरी
मास ग्रेव्ह 4 : या खड्ड्यात डोके उडवलेले 150 मृतदेह सापडले

या ‘किलिंग फिल्ड‘मधील हृदय हेलावणारी जागा म्हणजे ‘किलिंग ट्री‘! : माणूस किती नीच पातळीपर्यंत जाऊ शकतो, याचा अनुभव इथे उभे राहिल्यानंतर येतो. तान्ही बाळं, एक-दोन वर्षांच्या मुला-मुलींना मारण्यासाठी या झाडाच्या खोडाचा उपयोग केला गेला. लहान मुलांना मारण्याचेही पॉल पॉटने विचित्र समर्थन केले होते. ‘एखाद्या कुटुंबातील एका व्यक्तीला मारले, तर ते संपूर्ण कुटुंब संपवलेच पाहिजे. ही लहान मुले सोडून दिली, तर भविष्यात ते बदला घेऊ शकतील,‘ अशी त्याची धारणा होती. या झाडासमोरील ‘कॉमेंट्री‘ ऐकताना मी नकळतच रडू लागलो होतो. आतापर्यंत शंभराहून अधिक लहान मुलांचे सांगाडे येथे सापडले आहेत. ‘खमेर रूज‘च्या एका अधिकाऱ्याने 2009 मध्ये न्यायालयात या हत्यांची जबाबदारी स्वीकारली. त्याची कबुली या ‘कॉमेंट्री‘मध्ये ऐकता येते. ते ऐकल्यानंतर ‘तो अधिकारी माणूस तरी असेल का‘ हाच प्रश्‍न मनात येतो. माझे अश्रू थांबतच नव्हते. तिथल्या एका पर्यटकाने मला सावरले.

येथील एका झाडाचे नाव ‘मॅजिक ट्री‘ आहे. याला असे का म्हटले जाते, हे समजले नाही. ‘खमेर रूज‘चे सैन्य रात्री हत्या करत असे, तेव्हा ‘ग्लूमी डार्क रूम‘मध्ये डांबून ठेवलेल्यांना किंचाळण्याचा आवाज ऐकू जाऊ नये, म्हणून या झाडावर ध्वनिवर्धक टांगून ‘खमेर रूज‘च्या ‘वैभवशाली‘ परंपरेचे गीत मोठ्या आवाजात लावले जात असे. ‘कॉमेंट्री‘मध्ये ते गीत सुरू झाले, तेव्हा छातीत धडकीच भरली.

शेवटचा ‘स्पॉट‘ म्हणजे ‘मेमोरियल स्तूप‘! उत्खननामध्ये सापडलेले मानवी सांगडे, कवट्या, हाडे हे सर्व काचेच्या एका उंच कपाटात ठेवण्यात आले आहे. त्यात पुरुष, स्त्रिया, लहान मुले, त्यांना कोणत्या पद्धतीने ठार करण्यात आले अशा विविध प्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वेक्षणानुसार, त्या चार वर्षांमध्ये दर चार कंबोडियन नागरिकांपैकी दोघे मारले गेले.

ही भयानक ‘किलिंग स्पॉट्‌स‘ बघितल्यानंतर मी पॉल पॉटचा खासगी तुरुंग पाहण्यास गेलो. इथे कैद्यांचा अमानुष छळ केला जात असे आणि तेथून ‘किलिंग फिल्ड्‌स‘मध्ये पाठविले जात असे. इथे एक विचार सतत मनात येतो.. आपल्याच देशातील नागरिकांचा बळी घेणाऱ्या ‘खमेर रूज‘च्या सैनिकांची माणुसकी चार वर्षांसाठी इतक्‍या खालच्या थरास कशी गेली? आतापर्यंतच्या वाचनानुसार, माझे मत असे होते की जर्मनीत हिटलरने केलेला नरसंहार हा ठाऊक असलेल्या सर्वांत मोठा आणि भयानक होता. पण कंबोडियात पॉल पॉटने केलेला संहार हिटलरपेक्षा कैकपटीने मोठा आणि भीषण होता. या संहारामध्ये ज्यांनी मारले आणि मेले ते एकाच देशाचे नागरिक होते. त्यांचा धर्म, भाषा, त्वचेचा रंग, संस्कृतीही वेगळी नव्हती. फरक एवढाच, की मारले गेले ते शिकलेले होते आणि ज्यांनी मारले ते अशिक्षित. मी स्वत: व्यवसायाने शिक्षक असूनही पहिल्यांदाच असे वाटले, की शिक्षणानेही आपला जीव जाऊ शकतो. त्या काळात कंबोडियातील जनता शिकली नसती, तर कदाचित त्यांचे जीव वाचलेही असते, हा विचारही तरळून गेला. आयुष्यात प्रथमच मला अशिक्षित असण्याचा ‘फायदा‘ जाणवत होता.

(क्रमश:)

----x----x----

लेख क्रमांक २ / २

लेखाचा कालबाह्य मूळ दुवा : http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5542758527589600251&Sectio...(%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%202)%20(%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B0)

लेखाचा कालबाह्य दुवा जिथे सापडला ती जागा : https://www.misalpav.com/comment/862389#comment-862389

लेख जिथनं उचलला तो स्रोत : http://granthalayat.blogspot.com/2015/04/blog-post_29.html

कंबोडिया.. एक भयानक सत्य (भाग २) - संदीप कुलकर्णी
------------------------------------------
कंबोडिया.. काहीसा दुर्लक्षित आणि बराचसा अनोळखी देश.. सध्या व्हिएतनाममध्ये वास्तव्यास असलेले ‘सकाळ‘चे वाचक संदीप कुलकर्णी यांनी पर्यटनाच्या निमित्ताने कंबोडियाला भेट दिली. अंगकोरवट येथील पुरातन मंदिर पाहून परतताना एका लहानग्या विक्रेत्या मुलीने त्यांना एकतरी पुस्तक विकत घेण्याची विनंती केली.. तिचं मन राखण्यासाठी संदीप यांनी एक पुस्तक घेतलं.. ‘फर्स्ट दे किल्ड माय फादर‘ हे ते पुस्तक..! कंबोडियात १९७५ ते १९७९ या चार वर्षांच्या कालावधीत २० लाख नागरिकांची कत्तल झाली.. त्या नरसंहारातून बचावलेल्या एका मुलीची ती आत्मकथा वाचून संदीप कुलकर्णी यांनी मग कंबोडियाचा ‘तो‘ काळा इतिहास वाचून काढला, संबंधित ठिकाणांना भेट दिली आणि त्यातील अनुभव ‘पैलतीर‘साठी शब्दबद्ध केले. हा या मालिकेतील दुसरा आणि अखेरचा भाग.
------------------------------------------

'किलिंग फील्ड‘ बघून मी ‘एस-२१‘कडे निघालो.. ‘एस-२१‘ हा प्रत्यक्षात तुरुंग नसून ती एक शाळा होती. ही त्या काळातील सर्वांत मोठी सरकारी शाळा होती. यात तीन मोठे ब्लॉक आणि प्रत्येक ब्लॉकमध्ये तीन मजले आहेत. प्रत्येक मजल्यावर पाच वर्गखोल्या आहेत. पहिल्या मजल्यावरील वर्गांत साधारणत: ६० ते ७० कैद्यांना दिवसभर डांबून ठेवले जात असे. दिवसभरात सर्व कैद्यांना फक्त मारहारणच केली जात असे. हे वर्ग जसेच्या तसे ठेवण्यात आले आहेत. अजूनही त्या वर्गांमध्ये भीषण अत्याचाराच्या खुणा आढळून येतात. या तुरुंगात चार वर्षांत ३०,००० कैद्यांना डांबून ठेवल्याची नोंद आहे. एकदा ‘एस-२१‘मध्ये रवानगी झाली, की मृत्यू अटळच! या तुरुंगात रवानगी होऊनही केवळ नशीब बलवत्तर असल्याने सात जण वाचले. यापैकी दोघांना पाहण्याचा योग आला होता. योगायोगाने, मी गेलो त्याच दिवशी ‘हिस्टरी चॅनेल‘तर्फे तिथे चित्रिकरण सुरू होते. ‘एस-२१‘मधून बचावलेल्यांपैकी दोघे जण त्या चित्रिकरणासाठी आले होते. ‘क्रूर अत्याचार होणारी जागा‘ म्हणूनच या तुरुंगाची ओळख आहे. वर्गातील फळ्यांचा उपयोग कैद्यांची नावे लिहिण्यासाठी केला गेला होता. मी शिक्षक आहे. ‘भावी नागरिक घडविणारी‘ शाळा हीच नागरिक संपविण्यासाठी वापरली गेली, हे बघून मी पुन्हा हताश झालो. सकाळपासून ‘किलिंग फील्ड्‌स‘ आणि ‘एस-२१‘ तुरुंग पाहिल्यानंतर एक प्रश्‍न सतत मनात येत होता. तो म्हणजे, त्या चार वर्षांत कंबोडियामध्ये सुरू असलेल्या या विचित्र गोष्टींचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काय पडसाद उमटत होते?

या प्रश्‍नाचं उत्तर ‘एस-२१‘मधील दोन नंबरच्या ब्लॉकमध्ये मिळाले. हा ब्लॉक म्हणजे त्या काळातील छायाचित्रांचा संग्रह आहे. लेखाच्या पहिल्या भागात नमूद केल्याप्रमाणे, पोल पोटने कंबोडियाच्या सर्व सीमा बंद केल्या होत्या. त्यामुळे बाह्य जगाशी कंबोडियाचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. कुणीही देशाबाहेर जाऊ शकत नव्हता. अशा पद्धतीने देश चालविणे अवघड जाईल, हे कालांतराने पोल पोटच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने स्वीडनमधील कम्युनिस्ट पक्षाशी संपर्क साधून त्यांच्या नेत्याला कंबोडियामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. १९७८ मध्ये तब्बल चार वर्षांनंतर कंबोडियामध्ये बाहेरील देशातून पहिली व्यक्ती आली. ही व्यक्ती म्हणजे गर्नर बर्गस्त्रोम.. हा नेता दोन दिवस नोम पेनमध्ये थांबला. त्याच्यासाठी ‘खमेर रूज‘च्या अधिकाऱ्यांनी खास मेजवानीचा बेत आखला होता. सर्वत्र ‘शेतात काम करणारे‘ नागरिक त्याला दाखविण्यात आले. ‘कंबोडियाची वाटचाल एका शेतीप्रधान समाजाकडे सुरू असून सर्वजण आनंदी आहेत,‘ असे ‘खमेर रूज‘कडून भासविण्यात येत होते. या समाजबांधणीच्या नव्या प्रयोगात थोडेफार विरोधक असतीलच, त्यांची हत्या झाली; पण ती संख्या थोडीशीच होती आणि देशात सर्व आलबेल आहे, अशी त्याची खोटी समजूत काढण्यात आली. युरोपमध्ये परतल्यानंतर बर्गस्त्रोमने पोल पोट आणि ‘खमेर रूज‘चे कौतुक केले आणि संयुक्त राष्ट्रसंघामध्ये ‘कंबोडियाचा नेता‘ म्हणून पोल पोटचे स्थान पक्के झाले. हे सर्व वाचल्यानंतर मी राग येण्याच्या पलीकडच्या अवस्थेत जाऊन पोचलो.

अक्षरश: जड पावलांनी ‘एस-२१‘च्या बाहेर येऊन टॅक्‍सीने मी हॉटेलवर पोचलो. रात्रीच्या जेवणासाठी भारतीय रेस्टॉरंटचा शोध घेतला आणि पटकन जेवण आटोपून ‘पोल पोटचा शेवट कसा झाला‘ याचे वाचन करण्याचे ठरवले. पलीकडच्या टेबलवर असलेल्या दोन भारतीयांकडे बघून स्मित हास्य केले. त्यांनीही प्रतिसाद दिला आणि आमची चर्चा सुरू झाली. ते पुण्याचे आहेत हे समजल्यावर इंग्रजीतून सुरू झालेले संभाषण पटकन मराठीत आले. त्या भेटीमुळे स्वत:ला खूपच नशीबवान समजतो. कारण, त्या रेस्टॉरंटमध्ये ज्यांच्याशी ओळख झाली, ते भागवत कंबोडियामध्ये गेली दहा वर्षे एका स्वयंसेवी संस्थेतर्फे अहिंसा प्रसाराचे काम करतात. कंबोडियाच्या इतिहासातील माझी गोडी जाणून त्यांनी ‘खमेर रूज‘मध्ये काम केलेल्या सैनिकाची मुलाखत घ्यायला आवडेल का, असे विचारून माझा आनंद त्यांनी द्विगुणित केला. मला तर हे हवेच होते. मी लगेच होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पुन्हा भेटण्याचे ठरले. ‘त्या व्यक्तीला काय विचारावे‘ अशा अनेक प्रश्‍नांनी रात्रभर मनात गोंधळ चालू होता. त्या भेटीच्या उत्सुकतेपोटी मला नीट झोप लागलीच नाही.

सकाळी ११ वाजता ठरलेल्या ठिकाणी आम्ही भेटलो. ती व्यक्ती तशी वयस्करच होती. मेंग उन हे त्यांचे नाव. आता भागवत हे अस्सल कंबोडियन भाषेत बोलू शकतात. ते आणि त्यांचे सहकारी मनोज यांनी आमच्या मुलाखतीमध्ये द्विभाषिकाची भूमिका पार पाडली. मेंग उन ‘खमेर रूज‘मध्ये काम करत होते, तरीही त्यांना कधीच कुणाला ठार मारण्याचे काम आले नव्हते. केवळ बळजबरीमुळे त्यांना ‘खमेर रूज‘मध्ये सामील व्हावे लागले. पोल पोट तसा त्यांच्या कामावर खुश होता. कारण, त्या काळात प्रामुख्याने मासे मिळण्याचे ठिकाण हे मेंग उन यांचे गाव असल्याने त्या गावातील खूपच कमी लोक मारले गेले होते. पण त्यांच्यासमोर होणाऱ्या हत्या मेंग उन कधीच रोखू शकले नाहीत. केवळ दु:ख व्यक्त करण्यापलीकडे त्यांच्या हाती काहीच नव्हते. ते स्वत: शिक्षित होते. तरीही चार वर्षे त्यांनी ओळख लपवून ठेवली. त्यांनी आपले बायबलदेखील एक वर्ष लपवून ठेवले. पण ‘खमेर रूज‘च्या सैनिकांना संशय आला, तेव्हा मेंग उन यांनी सगळ्यात आधी ते बायबल फाडून फेकून दिले. त्यांची दोनदा चौकशीही झाली. त्यांच्या गावातील ‘खमेर रूज‘चा अधिकारी थोडा माणुसकी जपणारा असल्याने ते थोडक्‍यात बचावले. दुसऱ्या चौकशीदरम्यान त्यांना आपला मृत्यू अटळ आहे, असेच वाटले होते. १९७७ नंतर प्रत्येक दिवस हा शेवटचाच, असे म्हणत ते जगले. आपली खरी ओळख कधीही ‘खमेर रूज‘ला कळेल, अशी त्यांची खात्री होती. त्या दरम्यान त्यांनी आपल्या कुटुंबालाही याची जाणीव करून दिली होती. हा प्रसंग ऐकताना नकळत माझ्या अंगावर शहारे आले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ‘धर्मग्रंथ आपला जीव घेऊ शकतो‘ हे मानणे मला तर फारच जड गेले.

‘खमेर रूज‘चा अस्त!

१९७८ च्या डिसेंबरमध्ये पोल पोटने पारंपरिक शेजारी आणि शत्रू असलेल्या व्हिएतनामला विनाकारण डिवचण्यास सुरवात केली. ही पोल पोटची सर्वांत मोठी चूक होती. पण ही चूक कंबोडियन जनतेच्या पथ्यावर पडली. खऱ्या अर्थाने, पोल पोटच्या साम्राज्याचा अस्त व्हिएतनाममुळेच झाला, असे म्हणावे लागेल. डिवचल्याने चिडलेल्या बलाढ्य व्हिएतनामच्या सैन्याने कंबोडियावर आक्रमण केले. व्हिएतनामच्या सशस्र आणि शक्तिशाली सैन्यासमोर ‘खमेर रूज‘च्या निभाव लागलाच नाही. १५ ते २० दिवसांत ‘खमेर रूज‘मध्ये फूट पडली. येथील काही अधिकारी व्हिएतनामच्या सैन्यास जाऊन मिळाले. पोल पोटसह त्याचे काही निष्ठावंत थायलंड सीमेजवळील जंगलात पळून गेले.
अशा प्रकारे ७ जानेवारी, १९७९ रोजी व्हिएतनामचे सैन्य नोम पेनमध्ये घुसले आणि कंबोडियामधील भीषण अवस्था जगासमोर आली. ‘एस-21‘मधील सडलेल्या मृतदेहांची छायाचित्रे व्हिएतनामच्या सैनिकांनी प्रसिद्ध केली. आजही ही छायाचित्रे ‘एस-21‘मध्ये आहेत. पुढील एक-दोन वर्षांत संपूर्ण जगाला याची ओळख होऊ लागली. बळजबरीने खेडेगावात पाठवलेले नागरिक पुन्हा शहरात दाखल होऊ लागले. आता संपूर्ण कंबोडिया व्हिएतनामच्या अधिपत्याखाली होता. ‘खमेर रूज‘कडून फुटलेल्या काही अधिकाऱ्यांकडेच देशाची सूत्रे सोपविण्यात आली. याचा परिणाम व्हायचा तोच झाला..

पोल पोटला कधीच शिक्षा झाली नाही..

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये पोल पोटविरुद्ध खटला सुरू झाला. ‘खमेर रूज‘च्याच अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या कंबोडिया सरकारने पोल पोटच्या विरोधात कधीच सशक्त पुरावे दिले नाहीत. १९९८ पर्यंत पोल पोट थायलंड जवळील जंगलात पत्नी, एक मुलगी आणि त्याच्या काही निष्ठावंतांसोबत राहत होता. १९९० पर्यंत पश्‍चिम कंबोडियाच्या जंगलात लपून त्याच्या कारवाया सुरू होत्या. कंबोडियाच्या नव्या सरकारने पोल पोटवर कधीच सरळ खटला भरला नाही. त्यामुळे हा क्रूरकर्मा व्यवस्थित आपले जीवन जगत होता. १५ एप्रिल, १९९८ रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी हृदयविकाराने पोल पोटचा झोपेतच मृत्यू झाला. आज त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या चार अधिकाऱ्यांवर नावापुरता खटला चालू असून आता फक्त दोषारोपाचा खेळ सुरू आहे.
या सर्वांनंतर माझ्या मनातून दोन विचार जातच नव्हते. एक म्हणजे, लहानपणी शाळेत आणि घरीही मोठ्यांकडून शिकवली गेलेली म्हण.. ‘जैसी करनी, वैसी भरनी‘ ही म्हण पोल पोटच्या बाबतीत पूर्णपणे खोटी ठरली. त्याला त्याच्या कर्माची फळे मुळीच भोगावी लागली नाहीत. त्याला साधे तुरुंगातही जावे लागले नाही. १९९० पासून त्याला त्याच्या राहत्या घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले. यापेक्षा कंबोडियाचे दुर्दैव ते कुठले!

दुसरे म्हणजे, केवळ हिंसेच्या बळावर मिळविलेले ‘पोल पोट‘चे साम्राज्य केवळ चारच वर्षे टिकले. केवळ हिंसेच्या बळावर मिळालेली सत्ता किंवा यश हे कधीच कायमस्वरूपी नसते, याची प्रखर जाणीव झाली. अर्थपूर्ण यश मिळवायचे असेल, तर अहिंसा हा महत्त्वाचा मार्ग असतो आणि हिंसेचा मार्ग चुकीचाच असतो, हे कंबोडियाचा भयानक इतिहास समजल्यानंतर अधिकच प्रकर्षाने जाणवू लागले. नकळतच, भारताला अहिंसेच्या मार्गाने मिळालेल्या स्वातंत्र्याचे महत्त्व वाटू लागले. आपल्या प्रगल्भ लोकशाहीचे गुपित निश्‍चितच गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गात आहे, याची मला प्रकर्षाने जाणीव होऊ लागली. एका सशक्त आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व किती महत्त्वाची भूमिका बजावू शकते, याचाही प्रत्यय आला. त्या काळात दुर्दैवाने कंबोडियामध्ये सशक्त नेतृत्वाचा अभाव असल्याने तो देश अमानवीय काळाकडे लोटला गेला, असा माझा निष्कर्ष होता. शेवटी ‘दे दी हमें आझादी बिना खडक बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल‘ हे बोल नकळत ओठांवर आले आणि कंबोडियाच्या अद्‌भूत भेटीमुळे एका नव्या प्रेरणेने मी ‘अहिंसा‘ या विषयाकडे पाहण्यास सज्ज झालो...

- सकाळ (पैलतीर)
दि. २९/०४/२०१५, बुधवार

----x----x----

असो.

आ.न.,
-गा.पै.

इतिहासविचार

प्रतिक्रिया

diggi12's picture

17 Oct 2021 - 12:47 am | diggi12

धन्यवाद

Rajesh188's picture

17 Oct 2021 - 8:13 am | Rajesh188

आणि त्यांनी लाखो लोकांना आपली शिकार बनवले.ते पण साध्या हत्याराने म्हणजे विरोध बिलकुल झालाच नाही.हिटलर कडे powerful सैन्य होते तो अत्याचार त्यांच्या जोरावर आरामात करू शकला हे मान्य करायला जड जात नाही.
पण ह्या भांड्या कडे powerful सैन्य पण नव्हते तरी त्यांनी लाखो लोकांना ठार मारले.

चौथा कोनाडा's picture

17 Oct 2021 - 1:07 pm | चौथा कोनाडा

भीतीदायक आहे हे सर्व !
मास ग्रेव्ह मधली कत्तल अंगावर काटा आणणारी आहे !
मेंग उन ची कहाणी रोचक आहे, अशा वातावरणात जीवंत राहणे म्हणजे मोठे दिव्यच !
एकंदरीत १९व्या शतकातले ८ वे दशक हे प्रचंड उलथापालथी करणारे होते !
धन्यवाद !

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

17 Oct 2021 - 1:33 pm | ॲबसेंट माइंडेड ...

धन्यवाद.

रंगीला रतन's picture

17 Oct 2021 - 3:29 pm | रंगीला रतन

गा.पै.
दोन्ही लेखासाठी धन्यवाद. त्या लिंक्स वर वाचायला मिळाले नव्हते हे लेख.

विकास...'s picture

18 Oct 2021 - 1:51 am | विकास...

धन्यवाद

अंगावर काटा आला .. आणखी माहिती चा शोध चालू केलाय

खालील दोन शब्दावर विचार करायला लावणारी माहिती मिळाली

"भ्रष्टाचार"

"शिक्षण"

मित्रहो's picture

18 Oct 2021 - 7:27 am | मित्रहो

अंगावर काटा आणणारी माहिती आहे. कंबोडिया मधील नरसंहाराची माहिती नव्हती

टर्मीनेटर's picture

18 Oct 2021 - 10:12 am | टर्मीनेटर

धन्यवाद! दोन्ही लेखातून नवीन माहिती मिळाली.

श्वेता व्यास's picture

18 Oct 2021 - 12:07 pm | श्वेता व्यास

भयानक आहे, नवीन माहितीबद्दल धन्यवाद.

जगानी त्या हत्याकांड काळात कंबोडिया ची दखल का घेतली नाही.
जगाला तिथे काय घडतं आहे ह्याची माहिती नसेल हे शक्यच नाही.
सर्व देशांना त्या देशात काय घडत आहे ह्याची गुप्त बातमी नक्कीच असणार.
एका पण देशाला हस्तक्षेप करून त्या मूर्ख भांड्याला भर चौकात गोळ्या घालून ठार मारावे असे वाटले नाही.
व्हिएतनाम चे अनंत उपकार आहेत नाही तर त्या भंड्या नी अजुन किती लोकांची कत्तल केली असती.
भारताने अशा घटना कुठे घडत असतील तर नक्कीच हस्तक्षेप करावा.भारताची बलाढ्य सेना अशा लोकांना चांगलीच अद्दल घडवेल.

भारताने अशा घटना कुठे घडत असतील तर नक्कीच हस्तक्षेप करावा.भारताची बलाढ्य सेना अशा लोकांना चांगलीच अद्दल घडवेल.
>> IPKF वाचा.

रंगीला रतन's picture

18 Oct 2021 - 3:08 pm | रंगीला रतन

IPKF वाचा.
गरज च नाही :=)
सवता शेठ बोलले म्हंजे भारताची बलाढ्य सेना अशा लोकांना चांगलीच अद्दल घडवेल.

Rajesh188's picture

18 Oct 2021 - 1:07 pm | Rajesh188

हळहळ व्यक्त करून पॉल पॉट कसा क्रूर कर्मा होता असा साळसूद आव जगातील सर्व देश आणत आहेत.
हत्याकांड ला जितका पॉल पॉट जबाबदार नाही त्या पेक्षा जास्त अशी राष्ट्र जबाबदार आहेत जे स्वतः ल जगाचे पोलिस समजतात.
कंबोडिया ची सत्ता मूर्ख माणसाच्या हातात जाण्यास अमेरिका जा उजव्या विचार सरणीचा भांडवल वादी देश च कारणीभूत आहे.
व्हिएतनाम ,कंबोडिया ह्या प्रदेशात ह्या स्वार्थी अमेरिका चे काय काम.

कम्युनिस्ट, डावे ,समाजवादी कसे क्रूर आहेत ह्याचे उदाहरण जगा समोर देणे गरजेचे आहे.
तेव्हा लोक उजवी ,रक्त पिपासु व्यवस्था स्वीकारतील म्हणून कंबोडिया च बळी गेला.
Propganda च होता हा.
मला तर पॉल पॉट हा फक्त गुलाम होता काही शक्ती चा असेच वाटत आहे.
खरे रक्त पीपासू ,हत्यारे वेगळेच आहेत.

पाषाणभेद's picture

18 Oct 2021 - 2:54 pm | पाषाणभेद

त्या काळात ३० लाख लोकवस्ती असणारे शहर अन ते पण एका अशा देशात असेल यावर विश्वास बसत नाही.

आकडेवारी चुकली असेल का?

अन आहे ते भयानकच आहे.
सत्तापिपासू इतक्या किळसवाण्या प्रकाराने वागताय याची लाज वाटायला हवी.

गामा पैलवान's picture

19 Oct 2021 - 1:54 am | गामा पैलवान

लोकहो,

माझ्या मते पॉल पॉट क्रूरकर्मा नाही. वरील दोन लेखाचा प्रतिवाद करण्यासाठी सुरुवात म्हणून मी एक स्वतंत्र लेख लिहिला आहे :

कंबोडियाचा पॉल पॉट खरंच क्रूरकर्मा होता ?

धन्यवाद.

आ.न.,
-गा.पै.