सहप्रवासी
ट्रेनच्या स्लीपर कोचमधून कुठेही जायचं झालं की माझा उत्साह जागा होतो. मला असा प्रवास आवडतो. नवीन अनोळखी माणसं आपल्यासोबत एक दिवस आणि अर्धी रात्र किंवा अर्धा दिवस आणि अख्खी रात्र काढतात. अर्थात् दिवस किती आणि रात्र किती हे आपण कुठून कुठे चाललोय त्यावर अवलंबून असतं म्हणा.
तर या प्रवासात आपल्याला नवे चेहरे दिसतात. काही चांगले काही सामान्य काही वाईट काही अतिवाईट. आपल्या आजुबाजूच्या लोकांशी सामानाची ढकलाढकल, सीटची अदलाबदल, या ना त्या निमित्ताने गप्पागोष्टी सुरू होतात आणि सूर जुळलेच तर चांगली मैत्रीही होते.