अमलतास आणि आत्महत्या करणारे
दिल्लीच्या रिज रोड वर शंकर रोड पासून बुद्ध गार्डन पर्यंत पसरलेले जंगल आहे. जंगलाचा चारी बाजूला भिंत आहे. हे वेगळे, भिंतीत कित्येक ठिकाणी भगदाड आहेत. गुज्जर लोक आपली जनावरे जंगलात चरविण्यासाठी या भगदाडांचा वापर करतात. रिजच्या बस स्टैंड वर तो उतरला. त्याच्या हातात एक पिशवी होती. पिशवीत बायकोची एक जुनी साडी होती. भिंतीत पडलेल्या एका भगदाडातून आत जंगलात शिरला. दुपारचे १२ वाजलेले होते, त्यात मईचा महिना. ऊन मी-मी म्हणत होते. त्याचे सर्वांग घामाने भिजलेले होते. त्याच्या मनात विचारांचा काहूर माजलेला होता. आपल्या माथ्यावरचा घाम पुसत त्याने दूरवर पसरलेल्या जंगलावर एक नजर टाकली.