अवधूत (भाग-७)
दुपार आता उतरत आलेली होती. दिवसभर चांगलंच ऊन तावल्याने सगळं कसं कोरडं ठणठणीत झालेलं होतं. वाटेत एका घरातून त्याला मूठभर फुटाणे आणि रेवड्या मिळाल्या होत्या. रात्री खाता येतील… सध्या थंडीचे दिवस… थोड्याच वेळात अंधारुन येईल. रात्रीपुरता मुक्काम कुठे करायचा? वाटेत कुठे निवारा मिळेल का? रात्री खूप थंडी असणार. नाहीच निवारा मिळाला तर? त्याला थोडी भीतीच वाटली. काल तर केवढा ताप होता! आज तरी सुरक्षित रहावं निदान! इतर वेळी कुठे फारसा विचार करतो आपण?