शाळेचा डबा
शाळेचा डबा हा प्रत्येक आईचा काळजीचा विषय असतो. पौष्टिकही असेल आणि मुलाला आवडेलही असं रोज डब्यात द्यायचं तरी काय, असा प्रश्न प्रत्येक आईला पडतो. ही भाजी नको - ती भाजी नको अशा एक ना अनेक तक्रारींनी नुसता वैताग आणतात ही मुलं. नावडीची भाजी असली की बरीचशी मुलं डबा संपवतच नाहीत. साधारण आठ तास मुलं घराबाहेर असतात. अश्यावेळी योग्य आहार पोटात न गेल्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवतात. मुलांच्या अभ्यासाइतकंच मुलांच्या खाण्यापिण्याकडेही गांभीर्यानं बघायला हवं. शाळेत खाल्लं नाही तर घरी आल्यावर खातील अशी समजुत करून घेणे अत्यंत घातक आहे.