स्मृतीगंध-१० "घर पहावं बांधून.."

वामनसुत's picture
वामनसुत in जनातलं, मनातलं
21 Mar 2009 - 11:54 am

स्मृतीगंध-१
स्मृतीगंध-२
स्मृतीगंध-३
स्मृतीगंध-४
स्मृतीगंध-५
स्मृतीगंध-६
स्मृतीगंध-७
स्मृतीगंध-८
स्मृतीगंध-९

माझे लग्न झाले त्यावेळी आम्ही विष्णुनगरात राहत होतो. एव्हाना प्रभाकराचेही लग्न झाले होते. विष्णुनगरातील जागा अपुरी पडू लागली होती. ती. गं भा वहिनीच्या बहिणीचे पोष्टाजवळ घर होते आणि ती मंडळी जळगावास राहत असत. त्यांचे घर रिकामेच होते म्हणून त्यांनी घराची दुरुस्ती करवून घेऊन आम्हास तेथे राहण्यास सुचवले. बरेच दिवस रिकामे असल्यामुळे लोक त्या घराला भुताचे घर म्हणत पण आम्ही तिकडे लक्ष दिले नाही. त्यांचे घराची डागडुजी करून आम्ही तेथे रहायला गेलो. पुढे दोनेक वर्षे तेथे राहत असताना अम्हाला कोणताही विपरीत अनुभव आला नाही. आता घरात आम्ही तिघे भाऊ आणि सौ. अशी चारजणं कमावती झालो होतो. हातात पैसे येऊ लागल्यावर घराचा विचार परत डोके वर काढू लागला.

बाबूसही घर बांधायचे होतेच. आर्किटेक्ट श्री.सातवळेकर यांच्याकडून आमच्या व बाबूच्या घराचा प्लान काढून घेऊन म्युनिसिपालिटीतून पास करवून घेतला. श्री. पाटणकर यांना घराचे काम देण्यास सातवळेकरांनी सुचवले. त्याकाळी सिमेंट सहजपणे मिळत नसे. कलेक्टरकडून त्यासाठी परमिट घ्यावे लागत असे. आम्ही परमिटसाठी अर्ज केला होता. आता सिमेंटची वाट पाहणे आले. एक दिवस १२० गोणींचा पहिला हप्ता मंजूर केल्याचे पत्र आमचेकडे आले. त्या पत्रात सांगितल्याप्रमाणे आठ दिवसांच्या आत भिवंडीच्या एका विशिष्ट दुकानातून सिमेंट घेणे आवश्यक होते. परमिट आल्यावर माझी धावाधाव सुरू झाली. पाटणकरांनी आमचे ३ डबलरुम्सचे घर १५,००० रु. त तर लळितांचे ४ डबलरुम्सचे घर २०,००० रु.त बांधून देतो असे सांगितले आणि दोन्ही घरे एकदम बांधावयास सुरुवात केली. बाबूने १०,०००रु. दिले पण आमच्या घरासाठी पैसे देण्याचे काहीच बोलणे झाले नाही . पुढे काही दिवसांनी मी त्यांना ६०००रु दिले. दिवाळीपर्यंत दोन्ही घरांचे स्लॅब घालून झाले होते. बाबू दिवाळीच्या सुमारास कोकणातून इकडे आला. येताना २०००रु त्याने आणले होते. जागेसाठी भाड्याने गिर्‍हाइके येऊ लागली. लखु बोडस हे त्यात पहिले. त्यांचेकडून ४०००रु डिपॉझिट घेतले आणि पुढे दीक्षित, केळकर आणि पत्कींकडून १२,००० रु डिपॉझिट मिळाले ते एकूण १६,०००रु पाटणकरांना दिले. आता घर पुरे करण्यास वेग आला आणि डिसेंबरात दोन्ही घरं पूर्ण झाली. बाबूकडे ४ बिर्‍हाडे तर आमचेकडे एक बिर्‍हाड रहावयास आले. आमचेकडे २ डबलरुम्स रिकाम्या होत्या तेथे आम्ही रहायला जाणार होतो पण नांदुर्डीकरांनी त्यांच्या घरातून आम्ही जाऊ नये अशी गळ घातल्याने आम्ही त्या दोन्ही डबलरुम्स भाड्याने दिल्या.

पुढे जागेचे भाव वाढू लागले आणि नांदुर्डीकरही डोंबिबलीत आमच्याच घरी येऊन राहिले. त्यांना आता जागा हवी होती. पण आम्ही तर त्यांच्याच सांगण्यावरुन आमच्या जागेत भाडेकरु ठेवून बसलो होतो. घरात वर्षाचा माझा मुलगा आणि प्रभाकराची मुलगी ,आम्ही चौघे, बाळ आणि वहिनी एवढे जण होतो. एकदम जागा तरी कुठे मिळणार? जागेचा भुंगा सतत डोक्याला लागला. एकदा असेच बॅंकेत बोललो असता भागवत म्हणाला," अरे,तू घरावर मजला का नाही चढवत? पैशाची काळजी करू नको. सन्मित्र बँकेतून कर्ज घे. मी तेथे चेअरमन आहे." त्याच्या बोलण्याने धीर आला आणि मी कर्जासाठी बँकेत अर्ज केला. प्रभाकर आणि लेले नावाचा माझा एक मित्र गॅरेंटर राहिले. मला बँकेतून कर्ज पास झाले. आता घराच्या कामाने उचल खाल्ली. कर्जाचा हप्ता जरी दरमहा जाऊ लागला तरी आम्ही चौघं मिळवते होतो त्यामुळे सर्वांनाच आपले घर पूर्ण होण्याची आस लागली. तळमजल्याचे बांधकामाचे वेळी मला त्यातील बरीच माहिती झाली होती त्यामुळे वरचा मजला त्रिभुवनमोहनकडून मीच बांधवून घेतला. अडचणीचे डोंगर तर होतेच. कधी सिमेंटचे परमिट वेळेवर मिळत नसे, कधी कामगारांची कुरबूर चाले. पैशाची चणचण तर कायमचीच.

त्यातच एकदा जीवावर बेतण्याचा प्रसंगही आला. कल्याणचा हसन फ़क्की वाळू पुरवित असे. त्याचे पैसे देण्यासाठी शनिवारी संध्याकाळी ६च्या सुमारास मी पारनाका,कल्याण येथील मुसलमानवाड्यात चाललो होतो. मोहल्ल्यात शिरताना आजूबाजूने शिट्यांचे आवाज येऊ लागले. १०,१५ जणं माझ्या रोखाने येऊ लागले. हसन फक्कीचे घर आले ,दार उघडेच होते आणि हसन समोरच बसलेला होता. मला पाहताच तो बाहेर आला आणि त्याने मला लगबगीने घरात नेले. दंगा सुरु झाल्याचे मला माहित नाही काय? अशी विचारणा केली. तेव्हा त्या शिट्ट्यांचा आणि लोकं माझ्या रोखाने का येत आहेत ते उमजले. त्याच्या बायकोला माझ्याजवळ बसवून मला एकटा न सोडण्याबद्दल तिला बजावून तो परत बाहेर जमलेल्या लोकांसमोर गेला. त्या लोकांशी त्याची बाचाबाची चालली होती. माझ्या छातीत धडकी भरली होती,पण करणार काय? तिथेच मुकाट्याने बसून राहिलो. त्याची बायकोही बाहेरच्या लोकांसमोर गेली आणि त्या दोघांनी जमावाला सांगितले तो आमचा माणूस आहे,त्याला मारण्याआधी आम्हा दोघांना आधी मारा.. हे शब्द मी ऐकताच माझी पाचावर धारण बसली. घर आठवू लागले. पिल्लं डोळ्यासमोर आली. आता पुढे काय ताटं वाढून ठेवले होते ? ५/१० मिनिटे एकदम शांतता पसरली.कोणीच काही बोलेना. वातावरण सुन्न झाले. ही दोघेही दारातून हलायला तयार नव्हती. समोरचा जमावही तसाच होता. थोड्या वेळाने ही दोघे दारातून हलत नाहीत बघून जमाव हळूहळू पांगू लागला. हसन आणि त्याची बायको माझ्याजवळ आली आणि मला भिऊ नका, आम्ही आहोत असा धीर दिला. साधारण तासभर दोघेही माझ्याजवळ बसून होती. त्याकाळी फोन बिन नसल्यामुळे घरी काहीच कळवता येत नव्हते.एव्हाना नऊ वाजायला आले होते. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती. हसनने टांगा आणला आणि ती दोघे मला सोडायला स्टेशनवर आली. मला गाडीत बसवले आणि गाडी चालू झाल्यानंतर ती दोघे परत गेली. मला घाम फुटलेला होता. डोंबिवली स्टेशनात गाडी येईपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. अशा अनंत अडचणी पार करुन एकदाचे घर पुरे झाले.

१९६६ च्या दसर्‍याच्या दिवशी आम्ही आमच्या घरात रहावयास गेलो. मुंबईत आल्यापासून आमची वास्तू होण्यास १६ वर्षे जावी लागली. हे आमचे सीमोलंघनच होते. आमच्या घराभोवती लहानसे अंगण होते. तेथे तुळशीवृंदावन बांधले आणि आवारात थोडी फुलझाडे लावली. दिवाळी लवकरच येऊ घातली होती. आमच्या घरातील ही पहिलीच दिवाळी! व्हेळात वसुबारसेला घरच्या गाईवासराची पूजा होत असे. येथेही घरच्या गाईची पूजा व्हावी या हेतूने वसुबारसेच्याच दिवशी बद्रीभैयाकडून लक्ष्मी तिच्या पांढर्‍या धोप कालवडीसह आमच्या घरात आली. त्या कालवडीचे आम्ही गिरिजा असे बारसे केले. डिसेंबर महिन्यात मला दुसरा मुलगा झाला तर मार्चमध्ये प्रभाकरास मुलगा झाला. घरात गोकुळ भरले पण बाळगोपाळांना घरचे दूध भरपूर उपलब्ध झाले. लक्ष्मी सकाळ संध्याकाळ ५,५ लिटर दूध देत असे. आलागेला,पैपाहुणा आला तरी घरात भरपूर दूध,दही,तूप असे.उरलेले ताक,दूध इतरांना देत असू.पुढे काही महिन्यानी देवधरांच्या तबेल्यातून राणी म्हैस विकत घेतली. ती तर दहा,दहा लिटर दूध देत असे. लक्ष्मीच्या धारा मी काढत असे पण राणीच्या धारा काढणे मला कठिण जाई म्हणून जामू नावाचा काठेवाडी भैया तिच्यासाठी ठेवला.

पुढे पुढे कर्जाचे हप्ते वेळेवर जाईनासे झाले. घरात आम्ही २, आमची २ मुले, प्रभाकर,त्याची पत्नी व २ मुले, बाळ आणि ती. वहिनी अशी १० माणसे होतो. घरातला खर्च दिवसेंदिवस वाढत होता. बँकेच्या हप्ता भरणेबद्दल बँकेकडून तगादा होऊ लागला. ह्याच वर्षी बाळ बी ए झाला व त्याने एलएलबी साठी ऍडमिशन घेतली. पुढे एलएलबी होऊन बाळने एलएलएम सुध्दा पूर्ण केले. ६८ साली बाळचेही लग्न झाले. पुढे बाळने नोकरी सोडून पूर्णवेळ वकिली करण्याचा निर्णय घेतला. घराचा पसारा आता वाढला होता. आम्ही तिघांनी वेगळे व्हायचे ठरवले. त्या दोघांनी वेगळ्या जागा घेतल्या आणि त्यांचा हिस्सा देऊन घर आणि कर्ज आम्ही घेण्याचे ठरवले. एका गावात आमची ३ घरे झाली. वहिनीने आपल्याकडे रहावे असे सर्वांनाच वाटत होते पण आमच्यावरचा कर्जाचा बोजा आणि सौ. ची नोकरी ह्या २ कारणांमुळे वहिनीने आमच्याकडे राहण्याचा निर्णय घेतला.

राहणीअनुभव

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

21 Mar 2009 - 12:04 pm | घाशीराम कोतवाल १.२

वामनसुत साहेब खुप मोठी झेप घेतलित आपण

एव्हाना नऊ वाजायला आले होते. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती. हसनने टांगा आणला आणि ती दोघे मला सोडायला स्टेशनवर आली. मला गाडीत बसवले आणि गाडी चालू झाल्यानंतर ती दोघे परत गेली.
लोकांन मधे अजुन्ही माणसुकिचा अंश शिल्लक आहे याचेच हे उदाहरण ...

*************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

समिधा's picture

21 Mar 2009 - 12:49 pm | समिधा

ह्याही लेखनातले प्रसंग अगदी तुम्ही समोर बसुन सांगताय अस वाटल, =D>
खुप सुंदर लिहीताय, पुढील भागांची वाट बघतीय आणि उद्या पुढचा भाग वाचायला मिळेल याची खात्री आहे.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

प्रकाश घाटपांडे's picture

21 Mar 2009 - 2:56 pm | प्रकाश घाटपांडे

अगदी हेच म्हणतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

श्रावण मोडक's picture

21 Mar 2009 - 2:56 pm | श्रावण मोडक

कल्याणचा प्रसंग आजही अनेकांच्या डोळ्यांत अंजन घालून जाणारा आहे.
सु रे ख ले ख न!

रेवती's picture

21 Mar 2009 - 5:18 pm | रेवती

अनेक अडचणींवर मात करून सर्वांची प्रगती होत होती म्हणून आनंद झाला.
आनंदाचे प्रसंग अथवा अडचणी लिहिताना भाषा तशीच साधी आहे.
तुम्ही ग्रेट आहात!

रेवती

शितल's picture

21 Mar 2009 - 7:22 pm | शितल

सहमत. :)
हा भाग ही मस्त झाला आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Mar 2009 - 7:13 pm | बिपिन कार्यकर्ते

सगळे भाग नीट वाचतो आहे. आधीही बर्‍याच जणांनी म्हणल्याप्रमाणे शैली जबरदस्तच आहे.

रात्रीची जेवणं झाली आहेत. मस्तपैकी अंगणात नाही तर गच्चीवर गाद्या टाकून सगळे जण बसले आहेत. एखादे अतिशय प्रेमळ मायाळू आजोबा आपल्या सुना नातवंडांना जुन्या दिवसांबद्दल सांगत आहेत. आजोबा समाधानी आहेत त्या मुळे या आठवणी "आमच्या वेळी असं नव्हतं हो" या पेक्षा "अरे आमच्या वेळी काय गंमत होती माहिती आहे" अशा अंगाने जात आहे. मला अगदी असंच वाटत आहे वाचताना. वाचता वाचता थोडा हात पुढे केला तर आजोबांच्या हाताला हात लागेल असं वाटत राहतं. हेच शैलीचं यश.

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

22 Mar 2009 - 10:45 am | चतुरंग

चतुरंग

धमाल नावाचा बैल's picture

21 Mar 2009 - 7:18 pm | धमाल नावाचा बैल

अजून किति भाग आहेत ? (|:

क्रान्ति's picture

21 Mar 2009 - 7:49 pm | क्रान्ति

कल्याणचा प्रसंग प्रत्यक्ष घडतोय असा लिहिलाय! सगळा लेखच छान आहे नेहमीप्रमाणेच!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

मदनबाण's picture

21 Mar 2009 - 9:59 pm | मदनबाण

छानच्..आपली झालेली प्रगती वाचुन फार आनंद वाटला... :)

मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

प्राजु's picture

22 Mar 2009 - 7:47 am | प्राजु

हा तुमचा स्मृतीगंध इतका दरवळतो आहे की, प्रत्येक मिपाकर या गंधाने वेडा झाला आहे.
तुमचे शब्द, अनुभव ... आणि एकेक झेप.. सगळंच विलक्षण आहे.
कदाचित फार सोपं आयुष्य नशिबी आलं म्हणूनही हे सगळं विलक्षण वाटत असेल. पण आजोबांच्या तोंडून ज्या काळाचं वर्णन ऐकलं.. तोच काळ आपल्या लेखातून अनुभवायला मिळतो आहे असं म्हंटलं तर चुकीचं ठरू नये.
मस्तच. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

22 Mar 2009 - 8:50 am | विसोबा खेचर

हा तुमचा स्मृतीगंध इतका दरवळतो आहे की, प्रत्येक मिपाकर या गंधाने वेडा झाला आहे.
तुमचे शब्द, अनुभव ... आणि एकेक झेप.. सगळंच विलक्षण आहे.

हेच बोल्तो..

तात्या.

वामनसुत's picture

22 Mar 2009 - 5:18 pm | वामनसुत

सर्व प्रतिसादकांना मनःपूर्वक धन्यवाद.

स्पंदना's picture

21 Oct 2013 - 8:01 am | स्पंदना