सायन्स फिक्शन - तिकडची आणि इथली

अनुनाद's picture
अनुनाद in जनातलं, मनातलं
4 Sep 2022 - 9:09 pm

श्री. नारायण धारप ह्यांच्यावर भयकथा लेखक हा शिक्का बसला आणि मराठीमधे अतिशय उत्कृष्ट व काळाच्या पुढच्या विज्ञानकथा लिहीणाऱ्या लेखकाची ही बाजू वाचकांसमोर कधीही आली नाही. मराठीत विज्ञानकथा रुजली नाही याला लेखकाची प्रतिभा नव्हे तर वाचकांचं अज्ञान कारणीभूत होतं.
कौटुंबिक सिरीयल्सचा तोच तो चोथा चघळणारे प्रेक्षक आणि जीर्णशीर्ण लव्हस्टोरीज पलिकडे न जाणारं बाॅलिवूड यामुळे मायदेशात सायन्सफिक्शन रूळली नाही पण तरीही धारप लिहीतच राहीले...
X-men (मालिकेतील पहीला चित्रपट) जुलै २००० मधे release झाला.
नारायण धारप यांनी युगपुरुष ही खिळवून टाकणारी विज्ञान कथा १९७० मध्ये प्रकाशित केली.
युगपुरुष आणि X-men या चित्रपटाच्या थीममधे आपल्याला भरपूर साम्य सापडेल.
पण अमेरीकेतली एक गोष्ट जगभर जाते आणि भारतातली एक गोष्ट सूर्यप्रकाशातही येत नाही...

तेरा चित्रपट रिलीज झाल्यावर, X-Men चित्रपट मालिका ही जगभरात आठव्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारी चित्रपट मालिका ठरली, या चित्रपटांनी 6 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. अशा गोष्टी पाहण्या / वाचण्याकरता आता कुठे भारतातील प्रेक्षक mature होत आहेत.

त्यांनी या कथा ज्या काळात लिहिल्या, तेव्हा आजच्यासारखे घराघरात टेलिफोन, TV, कॉम्प्युटर, इंटरनेट हे काहीही अस्तित्वात नव्हते आणि लोकांना विज्ञान कथेची चव नव्हती. पण त्यांच्या कल्पनाशक्तीने आणि भाषा प्रभुत्वामुळे मी नेहमीच भारावून जातो. त्यांची कथा वाचकाला अक्षरशः गळा दाबून धरते. जर ते परदेशात असते, तर बेस्ट सेलर्सच्या यादीत त्यांच्या कथा सर्वोच्च स्थानी अखन्ड विराजमान झाल्या असत्या. परंतु त्यांची कल्पना शक्ती जरी आकाशगंगेमध्ये संचार करत राहिली तरी त्यांनी जमिनी वरचे पाय कधी सोडले नाहीत.
सर्वसामान्यपणे त्यांना भयकथा लेखक म्हणून जरी ओळखलं जात असलं तरी त्यांच्या विज्ञानकथा काळाच्या फार फार पुढच्या होत्या. त्यांना भेटल्यानंतर त्यांची प्रेरणास्थानं असलेले पाश्चात्य लेखक मुळातून वाचले. (त्यांनीच सुचवल्याप्रमाणे)

युगपुरुष ही कथा Time is the simplest thing (Clifford Simak) या कथेवर आधारीत असल्याचा त्यांनी उल्लेख केलाय पण मूळातून ती कथा वाचल्यानंतर पुन्हा नारायण धारप यांना सलाम करावासा वाटतो कारण मूळ कथेतला फक्त ५-१०% भाग त्यांनी वापरला पण बाकी सर्व त्यांचा स्वतःचा कल्पनाविस्तार आणि प्रतिभा आहे. मुख्य म्हणजे आधारीत कथांमधे जी अडखळती awkward भाषाशैली येते त्याचा कुठेही मागमूस नाही, अतिशय ओघवत्या भाषेत लिहिलेली ही कथा ‌‌१००% मराठी मुशीत घडलेली एक अप्रतिम कलाकृती आहे....

त्याची कोणतीही विज्ञानकथा ही बेस्टसेलरच होती पण दुर्दैवानं त्यांना मराठीत तसा प्रतिसाद मिळाला नाही.
मागे किल्लेदारांनी विचारणा केली होती की त्यांच्या कथा कुठे वाचायला मिळतील. (फुकटात) तर बऱ्याच यू ट्यूब चॅनल्सचा धांडोळा घेऊन spoler alert (काही ठिकाणचं मराठी कानातून रक्त आणतं) - शेवटी
SansoVoice या youtube चॅनलवर काही कथा ऐकल्या audiobook स्वरुपात - केवळ उत्कृष्ट...
सायन्स फिक्शनची आवड असेल तर आपलेही आवडते लेखक आणि अनुभव ऐकायला आवडेल...
धन्यवाद - अनुनाद...

वाङ्मयसाहित्यिकतंत्रkathaaविज्ञानव्यक्तिचित्रणविचारआस्वादमाध्यमवेधलेखअनुभवमाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतप्रतिभाभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

हा तुमचा गैरसमज आहे. नारायण धारपांचा वाचकवर्ग मराठीत अमाप होता आणि अजूनही आहे.

आपल्या अभिप्रायातून आपले साहित्यावरचे प्रेम दिसत आहे, आणि त्या बद्दल धन्यवाद. पण मुद्दा हा आहे कि १९७० मध्ये धारपांनी ज्या कथा लिहिल्या त्या धर्तीचे चित्रपट अफाट लोकप्रिय आता होताना दिसत आहेत. अमेरिकेतली एक गोष्ट जगभर जाते आणि भारतात त्या आधी ३० वर्षे लिहिलेली तशाच धर्तीची कथा सूर्यप्रकाशही पाहू शकत नाही. आणि धारपांच्या कथा - भयकथा किंवा संदेहकथा नव्हे प्युअर सायन्स फिक्शन - कुठलीही काढून पहा. त्यातली भाषाशैली, कथेची मांडणी, त्यातून दिसणारे तंत्रज्ञानाचे मोजक्या शब्दात वर्णन - फाफट पसारा टाळून केलेली नेटकी मांडणी - हे सर्वच काळाच्या पुढचं होतं. वानगीदाखल अगदी मोजक्या कथांची नावं देतोय. कुठलीही पुस्तक काढून पहा. वाचून पूर्ण केल्याखेरीज खाली ठेववत नाही. Hugo Gernsback या लेखकाने मांडलेल्या निकषांवर ह्या कथा तंतोतंत उतरतात. Wells, Jules Verne, Arthur Clarke, असिमोव या लेखकांच्या तोडीसतोड लिखाण...
१. युगपुरुष
२. कंताचा मनोरा
३. चक्रावळ
४. जिद्द
५. अनोळखी दिशा (कथा संग्रह)
पुस्तक हाताशी नसेल तर वर उल्लेख केलेल्या यू ट्यूब चॅनेल वर चाळुन पहा.
अनुनाद

सस्नेह's picture

5 Sep 2022 - 8:00 pm | सस्नेह

ऐसी रत्ने मेळवीन
फायकसची अखेर
अबक
या आणखी काही विज्ञान कादंबर्या
धारपांच्या विज्ञान कथा कादंबर्यांची पंखी
-- स्नेहा

अनुनाद's picture

6 Sep 2022 - 11:51 am | अनुनाद

आवडलंय - खरंतर त्यांच्या झाडून सगळ्या कथा वाचल्या आहेत. बऱ्याचश्या संग्रही आहेत. एक छोटा refresher हवा असेल तर लेखांती उल्लेख केलेली यक्ष हि कथा youtube वर ऐकून पहा.

भागो's picture

6 Sep 2022 - 9:26 am | भागो

Wells, Jules Verne, Arthur Clarke, असिमोव या लेखकांच्या तोडीसतोड लिखाण...>>>
हे किंचित अति झाले. ते लेखक ओरिजिनल होते. हा कळीचा मुद्दा आहे. जास्त लिहित नाही. माझ्या मते नारळीकर, बाळ फोंडके, लक्षमण लोंढे, सुबोध जावडेकर हे खरे विज्ञान कथा लेखक! आणि रत्नाकर मतकरी हे खरे भयकथा लेखक.

जेम्स वांड's picture

6 Sep 2022 - 10:33 am | जेम्स वांड

मर्यादित वाचल्यात, पण ज्या वाचल्या आहेत त्यात नारळीकर फारच जास्त आवडले.

१. वामन परत न आला - आज एलोन मस्क म्हणतो "AI is more dangerous than nuclear weapons" तेच नारळीकर सर सुलभ कथा लेखनातून सांगून जातात वामन मध्ये.

२. यक्षांची देणगी - ही तर माझी फेवरेट विज्ञानकथा कलेक्शन म्हणावीत असली चोपडी. Inter Dimensional travelling वर आधारित असलेली "गंगाधरपंतांचे पानिपत" आणि Time Travelling + Mobius Strip + teleportation वर आधारित "उजव्या सोंडेचा गणपती" ह्या विशेष आठवतात.

भागो's picture

6 Sep 2022 - 12:11 pm | भागो

यक्षांची देणगी
अबब! आमेझान वर दहावी आवृत्ति आहे!
"उजव्या सोंडेचा गणपती" हि कथा http://repository.iucaa.in:8080/jspui/bitstream/11007/3098/1/Ujavya%20so... इथे आहे.
Technical Error by Arthur C. Clarke ही पण अशीच कथा आहे. पण Arthur C. Clarke अजून खोलात गेला आहे.

अनुनाद's picture

6 Sep 2022 - 12:23 pm | अनुनाद

अतिशय आवडलेली गोष्ट - मला बहुधा तुम्ही आता नारळीकरांच्या सर्व कथा परत वाचायला लावणार. :)) envelop आणि inversion वरची आकाशात तरंगणारा डोळा नामक कथा आठवत आहे. - गंगाधर पंतांचे पानिपत आणि काळाला तिरका छेद हे खूप साम्य असणारे कथानक. आर्थर क्लार्क ची nine billion names of god नावाची कथा होती - तिचा अनुवाद कालच त्या चॅनेल वर ऐकला - हिमाल मठाचे गूढ या नावाने. ते कथानक लैच भारी होतं .
पण एकूण हे discussion मला खूप समृद्ध करतंय . मनापासून धन्यवाद.

विज्ञानकथा आणि फिक्शन यामध्ये बराच फरक आहे. धारपांच्या कथा फिक्शन या सदरात मोडतात. त्यात कल्पना स्वातंत्र्य भरपूर घेतलेले असते.
काय अफाट कल्पना असायच्या धारपांच्या !!

येस, कळीचा मुद्दा तोच आहे. त्यांच्या युगपुरुष या कथेत - Clifford Simac च्या time is the simplest thing या कथेवर आधारित असलेली असा उल्लेख आहे, पण मूळ कथा वाचून पाहिल्यावर जाणवले कि धारपांनी फक्त ५-१०% मूळ कथेचा आधार, कल्पना म्हणून वापरला आहे. बाकी सर्व त्यांचा कल्पना विलास.. हे खरंच थोर होतं. जिद्द हि कथा - space prison या पुस्तकाचा सही सही अनुवाद आहे. पण आधारित किंवा अनुवादित साहित्यात भाषेचं जे अवघडलेपण दिसतं त्याचा कुठेही मागमूस नाही. एक रिफ्रेशेर म्हणून खरंच ती यक्ष नामक कथा ऐकून पहा.

अनुनाद's picture

6 Sep 2022 - 12:03 pm | अनुनाद

हा हा, खरंय काही वेळा असं होतं कि उत्साहात काही तरी अति होऊन जातं सो क्षमस्व - नारळीकरांच्या आणि बाळ फोंडकेंच्याही सर्व - झाडून सर्व कथा वाचल्या - त्यातल्या फोंडकेंच्या एका कथेत एका astronaut च्या शरीरातून तो अवकाशातून परत आल्या नंतर एक रेडिओ frequency सतत उत्सर्जित होत असते आणि हि कल्पना नंतर काही पक्षी आणि whales ट्रॅकिंग करण्यासाठी वापरली जात आहे - अजूनही - हे भारी होतं. डाव्या सोंडेचा गणपती, वामन आठवतात. हे खरंच थोर होतं... बाकी आधारित असूनही अस्सल मराठी मातीतली वाटणारी कथा हि मला वाटतं - धारपांची ताकद होती. एक छोटा refresher हवा असेल तर लेखांती उल्लेख केलेली यक्ष हि कथा youtube वर ऐकून पहा.

जेम्स वांड's picture

4 Sep 2022 - 10:08 pm | जेम्स वांड

तुमचे विज्ञानकथा ह्या लेखन पद्धती आणि कथा प्रकारातील लिखाणावर असलेले प्रेम नीट पोचले तुमच्या लेखनातून.

@मुटकेजी,

मला वाटतं लेखक धारपांच्या एकंदरीत प्रसिद्धी बद्दल बोलत नसून धारपांच्या विज्ञानकथा लेखक म्हणून (पुरेसे) प्रसिद्ध न वाटण्याबद्दल बोलत असावेत. धारप विज्ञानकथा लेखक होते हे मला प्रामाणिकपणे माहिती नव्हते , अर्थात मी काही अखिल महाराष्ट्रीय मराठी विज्ञानकथा वाचक वर्गाचा प्रतिनिधी नाही तरीही बहुसंख्य लोकांना धारप विज्ञानकथा लेखक असलेलं ठाऊक असेल असे वाटत नाही मला तरी.

धर्मराजमुटके's picture

4 Sep 2022 - 10:47 pm | धर्मराजमुटके

मला वाटतं लेखक धारपांच्या एकंदरीत प्रसिद्धी बद्दल बोलत नसून धारपांच्या विज्ञानकथा लेखक म्हणून (पुरेसे) प्रसिद्ध न वाटण्याबद्दल बोलत असावेत. धारप विज्ञानकथा लेखक होते हे मला प्रामाणिकपणे माहिती नव्हते , अर्थात मी काही अखिल महाराष्ट्रीय मराठी विज्ञानकथा वाचक वर्गाचा प्रतिनिधी नाही तरीही बहुसंख्य लोकांना धारप विज्ञानकथा लेखक असलेलं ठाऊक असेल असे वाटत नाही मला तरी.

घाईत प्रतिसाद देण्यात माझी चूकच झाली. पण मला देखील ते विज्ञानकथा आहेत असे त्या काळी वाटत नव्हते. एकापेक्षा जास्त कथांचे संदर्भ आले तर कदाचित अनुमान काढता येईल. शिवाय ते भयकथा लेखक आहेत असे देखील मला कधी वाटले नाही. ते माझ्यामते गुढकथालेखक जास्त होते. भय हे त्यांच्या कथेचे उपउत्पादन म्हणता येईल कदाचित. अर्थात मला माझेच विचार तपासावे लागतील कारण धारप वाचून पुष्कळ काळ लोटला आहे. आता माळ्यावरुन सुटकेस काढून साठे फायकस आणि अजून काही खजिना असेल तो परत एकदा चाळावा लागेल.

धारप वाचून पुष्कळ काळ लोटला आहे. आता माळ्यावरुन सुटकेस काढून साठे फायकस आणि अजून काही खजिना असेल तो परत एकदा चाळावा लागेल.

खरंय - आणि तुम्हाला त्यात नक्की मजा येईल

अनुनाद's picture

5 Sep 2022 - 12:26 am | अनुनाद

Exactly...

हा हा.. तुम्हाला माझ्या लिहिण्याचं reading between the lines नक्कीच कळलंय. वरील उत्तरातील काही पुस्तकं नक्की चाळून पहा - मजा येईल

तर्कवादी's picture

5 Sep 2022 - 12:22 am | तर्कवादी

तेरा चित्रपट रिलीज झाल्यावर, X-Men चित्रपट मालिका ही जगभरात आठव्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारी चित्रपट मालिका ठरली, या चित्रपटांनी 6 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. अशा गोष्टी पाहण्या / वाचण्याकरता आता कुठे भारतातील प्रेक्षक mature होत आहेत.

काहीसा असहमत
म्हणजे नारायण धारप यांच्या कथा कदाचित चांगल्या असतीलही आणि त्या तितक्याशा प्रसिध्द न पावण्याबाबत सहमती.
X-Men बद्दल माहित नाही. पण हॉलीवूड मध्ये वैज्ञानिक कथानक असलेले अनेक चित्रपट निघतात. पण बहुतेककरुन ते उगाच पांचट असतात .. त्यातली तांत्रिक करामतींसाठीची मेहनत कौतुकास्पद असते पण चित्रपट अनेकदा फसलेले असतात.
अलिकडेच replicas आणि anti matter हे दोन फसलेले चित्रपट पाहिलेत. त्यातल्या त्यात replicas बरा. anti matter पुर्णतः गंडलेला.
आणखी अनेक चित्रपट आठवता येतील. आणि हिंदीत/मराठीत असे चित्रपट काढल्यास त्यांना प्रेक्षक डोक्यावर घेणार नसतील तर प्रेक्षकांना मी अपरिपक्व म्हणणार् नाही

तुमचे म्हणणे बरोबर, आताचे काही हॉलिवूड चित्रपट अति तांत्रिक आहेत पाहवत नाहीत किंवा अंगावर येतात. पण आपल्याकडे जसा हिंदी चित्रपटांचा golden era येऊन गेला तसाच तिकडेही... ६० ते ९० च्या काळातले काही चित्रपट आजही क्लासिक मानले जातात. २००१ a space odyssey किंवा स्टारवॉर्स, स्टारट्रेक - DC कॉमिक्स वगैरे संपूर्ण २-३ पिढ्या समृद्ध करून गेल्या - MIB या चित्रपटात शेवटच्या सीन मध्ये माणूस म्हणून आपल्या खुजेपणाची जाणीव होते. या प्रत्येक चित्रपटातून काही तरी विचाराला चालना मिळते. काही वेगळी दिशा सापडते - तसं काही आपल्याकडे घडताना दिसत नाही - मी या चर्चेत पडत नाही पण काही पुस्तकं (वाचली नसतील तर) निदान चाळून पहा खरंच खूप समृद्ध करणारा अनुभव - पहिल्या comment ला दिलेल्या उत्तरात काही पुस्तकांची नावे दिली आहेत.

या प्रत्येक चित्रपटातून काही तरी विचाराला चालना मिळते. काही वेगळी दिशा सापडते - तसं काही आपल्याकडे घडताना दिसत नाही

प्रत्येक समाजाची आवड निराळी असू शकते. अमेरिकन लोकांना सायन्स फिक्शन मधून वैचारिक /आशयघन सापडत असेल. आपल्याकडे इतर प्रकारच्या चित्रपटांतून

ण आपल्याकडे जसा हिंदी चित्रपटांचा golden era येऊन गेला तसाच तिकडेही.

बरोबर आहे आणि आपल्या हिंदी चित्रपटांच्या सुवर्ण काळात अनेक आशयघन चित्रपट आलेत. व्यावसायिक चित्रपटांतही दिवार सारख्या चित्रपटांतून काही विचार (भावना/ कर्तव्य यातले द्वंद ई) व्यक्त झालेत तर कलात्मक चित्रटांची मोठी यादी देता येईल.
आपल्याकडे सायन्स निर्मात्यांनी फिक्शनला फारसा हात घातला नाही आणि त्यामुळे तो प्रकार लोकप्रिय झाला नाही.
आता वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे...चांगल्या पुस्तकांवर चित्रपट बनलेत व ते योग्य पद्धतीने बनवले गेलेत तर लोकप्रिय होवू शकतील. आता मराठी चित्रपटांचा सुवर्ण काळ आलाय असे म्हणता येइल. मराठी निर्मात्यांनी पुढे येत नवीन प्रयोग करायला हवेत.

हो, तुम्हीही मला आणखी एक वेगळा अँगल दिलाय. थँक यू सो मच...

कंजूस's picture

5 Sep 2022 - 2:02 am | कंजूस

नारायण धारपांच्या पुस्तकांची नोंद केली आहे. वाचून पाहेन. इंग्रजी लेखकांची कमी वाचलीत. ज्यूलस वर्नी मात्र आवडला.

कर्नलतपस्वी's picture

5 Sep 2022 - 7:44 am | कर्नलतपस्वी

लहानपणी नारायण धारप,बाबूराव अर्नाळकर सगळ्यात जास्त आवडते लेखक होते.

अनुक्रमे समर्थ व काळापहाड ह्या व्यक्तिरेखा खुपच भारी वाटायच्या.

चित्रपट तंत्रज्ञान विकसित न झाल्या मुळे व लोकांची आवड ,कल या विषयाकडे कमी असणे हे सुद्धा एक कारण असू शकेल.

साठे व फायकस आणी त्याचा थरार अजुनही डोक्यातून जात नाही. बाकी पुष्कळ रहस्यकथा वाचल्या पण विस्मृतीत गेल्या.

आमचं बालपणी अंगावर काटे आणून थरारक भन्नाट करण्यासाठी दोघाही दिग्गजांना मानाचा मुजरा.

शाम भागवत's picture

5 Sep 2022 - 8:12 am | शाम भागवत

६-७ वीत असताना वाचायचो. रात्री झोप लागायची नाही. एकदा गोष्ट वाचायला सुरवात केली की, थांबताच यायचं नाही. एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटायचे. आता पुन्हा या पुस्तकाला हात लावायचा नाही व पुढची गोष्ट वाचायची नाही असं ठरवायचो. पण ८-१० तासांनी किंवा दुसऱ्या दिवशी पुढची गोष्ट वाचल्याशिवाय चैन पडायचं नाही.
समर्थ ही व्यक्तिरेखा खूप भुरळ घालायची. असं वाटायचं की, ते कुठून तरी येतील व मला वाचवतील. त्या एका भरवशावर वाचायचे धाडस करत असे.

अनुनाद's picture

6 Sep 2022 - 12:30 pm | अनुनाद

exactly समर्थ आणि कृष्णचंद्र ह्या व्यक्तिरेखा म्हणजे एक वेगळेच जग होते - तुम्ही वर्णन केलेला फील मीही अनुभवला आहे. :)) उंबरठा हि कथा आठवते दोन मित्र.. एक नॉर्मल एक सायकिक त्या चॅनेल वर ती हि कथा ऐकली आणि अफाट आवडली होती ...

मला स्वतःला धारपांच्या भयकथा आवडतातच पण विज्ञानकथा त्याहून जास्त आवडतात.

नेनचिम , गोग्रामचा चित्रार , बहुमनी या पुन्हा पुन्हा वाचल्या आहेत.

नेनचिम आवडली असेल तर "कंताचा मनोरा" (वाचली नसेल तर) जरूर निदान चाळून पहा - गोग्रामचा चितार मला आठवतंय - बहुधा ती माझी SciFi वाचनाची सुरुवात असावी. खरंतर भा. रा. भागवत यांच्या चंद्रावर स्वारी, धूमकेतूचे रहस्य इ कथा वाचताना रमून जायला व्हायचं - नंतर कळलं ती Jules Verne ची पुस्तकं होती, पण भागवतांनी खरंच गोडी लावली . नेनचिम म्हणजे अक्षरशः world class documentary होती... Mission to Mars ह्या चित्रपटात तीच कल्पना वापरली आहे.

भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही. आपल्याला फेकाफेकी जास्त पसंत. आताच "दोबारा" नावाचा चित्रपट येऊन "गेला." कुणी बघितला? कित्येक थेटरात शो कॅंसल झाले. अप्रतिम पिक्चर !

भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही

असं नाहीये.. कोई मिल गया, क्रिश, रा वन आणि फार पुर्वी मिस्टर इंडिया हे चित्रपट चालले होते.

आपल्याला फेकाफेकी जास्त पसंत

हॉलिवूडच्या सायन्स फिक्शनमध्येही फेकाफेकीच असते की !!

भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही

"एक डॉक्टरकी मौत" हा आशयघन चित्रपट १९९० मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने कमाई किती केली ते माहित नाही पण हा चित्रपट अनेकांना माहित आहे इतकं नक्की (चर्चेत राहिला)

असं नाहीये.. कोई मिल गया, क्रिश, रा वन आणि फार पुर्वी मिस्टर इंडिया हे चित्रपट चालले होते.>>>
व्वा. कळलंं. हाताला पाच बोट आहेत. अजून एक पिक्चरचे नाव टाका. रोबो?
हॉलिवूडच्या सायन्स फिक्शनमध्येही फेकाफेकीच असते की !!>>
चालायचेच.

अशीच एक दुर्लक्षित विज्ञानकथा
😔

[जाहिरात ]

मी बाबूराव अर्नाळकरांच्या झुंजार व काळापहाड कथा खूपच वाचल्या. 68--70 साली. धारप त्यानंतर आले तोवर माझा रहस्यकथेतला interest संपला होता . व मला तेव्हा त्यांची पुस्तके म्हणजे सायन्स फिक्शन ई० माहित नव्हते कळण्यासही कठीण व भितीदायक वाटल्या . त्याचवेळी मला ऐतिहासिक पुस्तकांचे वेड लागत होते म्हणून नारायण धारप तितकेसे आवडले नाहीत व डोक्यावरूनही गेले. झुंजार व काळापहाड खूप म्हणजे खूप आवडायची. काळापहाडचे चोरांची दुनिया अजूनही चांगले लक्षांत आहे खूप मस्त पुस्तक व वेगळीच
चोरांची दुनिया जी काळापहाडने समाजात उघडकीस आणली व पोलिसांच्या ताब्यात बहुतेक चोर दिले, खूपच मजा आलेली वयाच्या 12/13 व्यवर्षी वाचताना व मस्त घाबरण्याचा थरार घेत रहस्यकथा वाचत असे. नविनच जगाची / पुस्तकांच्या थरारक व़िश्र्वाची ओळख होत होती.

झुंजार तर माझा खूपच आवडता हिरो व हे व्यक्त करणे मला जमायचे नाही व भिती व लाजही खूप वाटे त्या अर्धवट वयात. पण काळापहाड व झुंजार अजूनही खूप आवडतात. पण आता ही पुस्तके मिळत नाही वसमाज, काळ पुढे गेल्याने वाचणार्यांना थरारही वाटणार नाही, शस्त्रास्त्रेही खूप आधुनिक होऊन झुंजारचे ठोसे मारून ठगाला लोळविणे हे सर्वच शब्दासकट खूप बाळबोध वाटते व आहे हल्लीच्या काळात

भागो's picture

6 Sep 2022 - 9:16 am | भागो

झुंझार माझा पण अगदी आवडता हिरो. त्या काळी माझा एक मित्र लायब्ररीतून बाबुराव अर्नाळकर गुपचूप उचलून आणून मला देत असे.
त्यांची पुस्तके अजूनही मिळतात. आमेझान वर आहेत. बुधवार पेठेत मिळतात मला काही रद्दीच्या दुकानात मिळाली.
शोध म्हणजे सापडेल.
आता मी मुलाबरोबर/मुलीबरोबर इंग्लिश वाचायला शिकलो. मग काय खजिनाच खुला झाला.
खूप खूप वाचले.
पण अजूनही मला "गुजबंप्स"अतिशय आवडतात. अचाट भीतिकथा. लहान मुलांसाठी आहेत. पण ओपन आवडीने वाचतो बुवा.

अनुनाद's picture

7 Sep 2022 - 12:28 pm | अनुनाद

आणखी एक - घंटाकर्ण - आपला तिरळा डोळा अस्मानात उडवत त्याने पृच्छा केली... इ. वाक्य असायची... धमाल लिखाणाची शैली...

धारप यांचं कोणतं पुस्तक पहिल्यांदा वाचावं?
तिकडची आवडती सायन्स फिक्शन फिल्म Lucy
कन्सेप्ट जाम आवडतो, आणि मानवाच्या आवाक्यातला विषय आहे.
इकडची आवडती सायन्स फिक्शन नाही आठवत ;)
बाकी केवळ फिक्शनमध्ये अनेक मराठी छान सिनेमा जे आवडतात आहेत .पण धागा भरकटेल नंतर कधीतरी सांगते :)

स्वधर्म's picture

6 Sep 2022 - 3:20 pm | स्वधर्म

धारप यांची ही दीर्घकथा पहिल्यांदा वाचा असे सुचवतो. विज्ञानकथा नाही, भयकथाच आहे; पण धारप ही काय चीज होती, हे समजेल.

मी त्या धाग्या च्या प्रथम लेखात उल्लेख केलेली यक्ष हि कथा sansovoice या you tube चॅनेल वर पहिली - खरंतर त्यातूनच हे लिहावंसं वाटलं - ऐकून पहा

अगदी १४-१५ वर्षांचा असल्यापासून धारप वाचायची गोडी लागली. इथे त्यांचे इतके चाहते आहेत, हे पाहून खूप आनंद झालेला आहे. शब्द किती म्हणून काटेकोर वापरावेत? त्यांच्या ‘दस्त’ या कादंबरीचे फक्त पहिले पान, पहिला परिच्छेद वाचून गार पडलो होतो. एका परिच्छेदात व्यक्तिरेखा मूर्तीमंत समोर उभी करावी, ती धारपांनीच! त्यांच्या बर्याच कथा या विशिष्ट भारित घरांवर, बखळींवर, जागांवर आहेत. त्यात काही अघोरी, अमूर्त आपल्या त्रिमित विश्वापलिकडचं असं असायचं. सर्व कथांचा शेवट सुष्टाचा दुष्टावर विजय छापाच्या असल्या तरी, धारप प्लॉट असा काही फुलवतात, की माणूस अडकून पडलाच पाहिजे.
त्यांच्या विज्ञानकथांपैकी दोन्ही फायकस केवळ अप्रतिम! झाडे एकमेकांशी संपर्कात असणे, त्यांची काही स्ट्रॅटेजी असणे, ही कल्पनाच अफलातून!
नंतर नंतर थोडा साचेबध्दपणा आला, तरी धारप हे ‘न सुचता’ लिहीणारे लेखक नव्हते, म्हणून थोर वाटतात. तुलना कदाचित अप्रस्तुत ठरेल, पण हल्लीचे अनेक लेखक कथाबीजच नसताना पुस्तके ‘पाडतात’ असे वाटते. म्हणजे केवळ मुख्य पात्राच्या मनातील भणभणते विचार हीच कादंबरी, ज्यात काहीही ‘घडत’ नाही. आणि अशा पुस्तकांना पारितोषिकेही मिळतात. अनेक उदाहरणे देता येतील.
धारप हे खास मध्यमवर्गीय कुटुंबात, घरात घडणार्या कथा लिहायचे, पण रोमहर्षक! असा लेखक पुन्हा होणे मुश्किल!

अनुनाद's picture

7 Sep 2022 - 12:36 pm | अनुनाद

अगदी सुरेख लिहीलंयत. वाचकाला गळा दाबून धरणं ही त्यांची खासियत होती. त्यांच्या अझाथोथ वगैरेसारख्या कथांमधून आलेले काही प्राचिन विधींचे उल्लेख आणि वर्णने पाहीली की असं वाटतं की त्यांचा काही सिक्रेट सोसायटीजशी नक्की संबंध असावा... :))

कॉमी's picture

12 Sep 2022 - 10:23 am | कॉमी

अझाथोथ हे लवक्राफ्टीयन नाव वाटते आहे.

वामन देशमुख's picture

12 Sep 2022 - 11:08 am | वामन देशमुख

धारप हे केवळ अद्वितीय आहेत! त्यांच्यासारख्या दुसरा पुन्हा होणे नाही.

सस्नेह's picture

12 Sep 2022 - 11:49 am | सस्नेह

प्रचंड सहमत