भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.

कुमार१'s picture
कुमार१ in काथ्याकूट
15 Mar 2021 - 9:42 am
गाभा: 

नुकताच एका परिचितांनी ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.

या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :
१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.

म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.
माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.

१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : -पूर्ण दारिद्र्य
आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.

त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :
अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = 18/20
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)
ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...

आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !

२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).

आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :

“यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...

३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8

इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?

४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :

“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)

५. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:
तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.

पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.

मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...

......

वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Mar 2021 - 11:11 am | ज्ञानोबाचे पैजार

आरत्यांमधे पण आजकाल नवनवीन ओळी ऐकू येतात:-

उदा:-
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ति हो श्री मंगलमूर्ती,
दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती,
जयदेव जयदेव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा,
पंढरीचा महिमा, द्वारकेचा महिमा वर्णावा किती,
जयदेवी जयदेवी महिषासुरमर्दिनी, हो दैत्यासुरमर्दिनी

आपण आगदी मनापासून आरती म्हणत असताना मधेच असे मीठाचे खडे लागले की आरती म्हणण्यातला उत्साह संपून जातो.

टिव्ही वर ज्या वेगवान मराठी बातम्या दिल्या जातात त्यात उधळली जाणारी "शब्दभेळ" हा तर वेगळ्या संशोधनाचा विषय होईल.

पैजारबुवा,

पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे. >>>

मला वाटते याचा अर्थ स्वतःचे अस्तित्व विसरून मिसळून जाणे असा होईल..

कानडाऊ योगेशु's picture

15 Mar 2021 - 5:34 pm | कानडाऊ योगेशु

एखाद्याचा माल विशेषतः सकाळी सकाळी पहिल्यांदी खरेदी केला तर तो भवानी झाली म्हणुन ते पैसे डोक्याला लावुन दिवसाचा धंदा चालु करतो.
ग्रामीण भागात जे राहिले आहेत त्यांना हे रोज अनुभवयास मिळते. भवानी होणे म्हणजे धंद्याची सुरवात होणे. पण मुंबईत मात्र हा शब्द अपभ्रंश होऊन बोवनी असा झाला आहे. आता कुणी भवानी म्हटले तर लोक काय गावंढळ आहे अश्या नजरेने पाहतात.

नगरी's picture

24 Mar 2022 - 1:23 pm | नगरी

बोहनी

सुरिया's picture

24 Mar 2022 - 1:52 pm | सुरिया

पहिल्यांदी खरेदी केला तर तो भवानी झाली म्हणुन ते पैसे डोक्याला लावुन दिवसाचा धंदा चालु करतो.

मूळ शभ बोहनी हाच आहे. भवानी हा अपभ्रंश आहे. त्यातली अजुन एक गोष्ट म्हणजे बर्याच गोष्टी (उदा. आंबे, फळे ई.) मोजुन देताना विक्रेते एक, दोन असे न मोजता लाभ, दोन, तीन असे मोजतात.

कुमार१'s picture

24 Mar 2022 - 2:00 pm | कुमार१

लाभ, दोन, तीन असे मोजतात.

>>
याच धर्तीवर बरकत, दोन, तीन अशीही एक पद्धत.
https://bruhadkosh.org/words?shodh=+%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%A4

कुमार१'s picture

15 Mar 2021 - 5:54 pm | कुमार१

ज्ञा पै,
अगदी बरोबर. बऱ्याच आरत्यांमध्ये अशी खिचडी झालेली ऐकायला येते.

आनंदा,
बरोबर. असाही अर्थ घेता येतो.

का यो,

होय. मूळ संस्कृत शब्द भवानी आहे. त्याचा मराठीत येताना बोहणी / नी अशी दोन्ही रूपे झाली.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8%...).

कानडाऊ योगेशु's picture

15 Mar 2021 - 8:28 pm | कानडाऊ योगेशु

बोहणी हा शब्द इतका जुना असेल असे मला वाटले नव्हते. आजपावेतो मी असेच समजत होतो कि बोबड्या साहेबाने व त्याच्या पिलावळीने बदलेला हा शब्द असावा. (जसे बिहाईंड द बाझार चे भेंडीबाजर वगैरे.)

बिहाईंड द बाझार चे भेंडीबाजर

>>>
यावरून आठवले :

तेव्हा भारतात अधिकारपदावर असणारे इंग्रज अधिकारी आपल्या हाताखालच्या भारतीय शिपायांना दरवाजा बंद करणे व उघडणे अशी कामे सांगत. आता शिपायांना तर साहेबांचे इंग्रजी कळणे अवघडच आणि साहेबाला इंग्लिश सोडून दुसरी कुठली भाषा येणार ?

मग आपल्यातल्या काही डोकेबाज लोकांनी साहेबांना ती दोन वाक्ये हिंदीतून कशी बोलायची ते शिकवले.

जेव्हा “दरवाजा बंद कर”, असे सांगायचे असेल तेव्हा ‘There was a banker’
आणि “दरवाजा खोल दे” यासाठी ‘There was a cold day’ असे म्हणायचे.

साहेबाने इंग्लिश वाक्ये भरकन म्हंटली त्याचा अपेक्षित ध्वनी हिंदीतून येतो !
करून पाहा !

मुक्त विहारि's picture

15 Mar 2021 - 8:11 pm | मुक्त विहारि

वाचत आहे

कुमार१'s picture

15 Mar 2021 - 8:53 pm | कुमार१

अपभ्रंश पाहा :

घोड्यानें पेंड (पेण) खाणें

वास्तविक पेण =प्रवासांतील टप्पा

प्रत्यक्षात ,
'पेंड’ हा शब्‍द ‘पेण’ याबद्दल चुकीचा वापरतात व खाण्याची पेंड असा असा खुलासा करतात.

घोड्याने पेंड खाल्‍ली म्‍हणजे तो सुस्‍त होतो व पुढे जात नाही. पण ही उपपत्ति चुकीची आहे. दूरच्या प्रवासात विश्रांतीचे निरनिराळे टप्पे (पेणे) ठेवलेले असतात. तेव्हां सरावाचे टप्पे आले की घोडे तेथे अडतात, म्‍हणजे घोडे तेथे पेण खातात.
https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A...

अनन्त्_यात्री's picture

15 Mar 2021 - 10:12 pm | अनन्त्_यात्री

ही आरती म्हणताना म्हणणारी व्यक्ती स्वत:च्या लिंगानुसार "चारी श्रमलो/श्रमले परंतु..." तसेच "साही विवाद करिता पडलो/पडले प्रवाही" म्हणते. प्रत्यक्षात "चारी (वेद) श्रमले" व "साही (=सहाही) (दर्शने) विवाद करिता पडली प्रवाही" असे म्हणणे योग्य असते.

चौकटराजा's picture

16 Mar 2021 - 2:10 pm | चौकटराजा

या माहितीबद्दल आभारी ! ))

चंद्रसूर्यकुमार's picture

15 Mar 2021 - 10:30 pm | चंद्रसूर्यकुमार

सुखकर्ता दुखहर्ता या गणपतीच्या आरतीत संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे ऐवजी संकष्टी पावावे, निर्वाणी रक्षावे असे अनेक ठिकाणी म्हणतात. इतकेच नव्हे तर 'दास रामाचा वाट पाहे सदना' ऐवजी 'दास रामाचा वाट पाहे सजणा' असेही अनेक ठिकाणी ऐकले आहे.

ह्या लोकांपुढे "घालीन लोटांगण" करावे असे वाटते!

सौन्दर्य's picture

15 Mar 2021 - 10:56 pm | सौन्दर्य

रिकामा न्हावी भिंतीला तुंबडे लावी - येथे तुंबडे हे 'टुमणे'चे अपभ्रंशित रूप झाले आहे असे एके ठिकाणी वाचले होते. रिकामा न्हावी भिंतीशी बोलत बसतो असा त्याचा अर्थ. विद्वानांनी ह्यावर प्रकाश पाडला तर उत्तम.

'ऐना का बैना, घेतल्याशिवाय जाय ना' मला वाटते पूर्वी होळीत दारोदारी जाऊन मुले पैसे मागायची व हे गाणे म्हणायची. त्यातील 'ऐना का बैना' म्हणजे 'आई असो की बहीण असो' पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही, असा अर्थ आहे.

कुमार१'s picture

16 Mar 2021 - 8:14 am | कुमार१

तुंबडी = रक्तशोषक यंत्र. >>>>

1. तुंबडी लावणें-१ पिच्छा, पाठ पुरविणें. २ वित्त, शक्ति इ॰ चें शोषण करणे.म्ह॰ रिकामा न्हावी कुडाला तुंबड्या लावी.
https://bruhadkosh.org/words?shodh=++%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A...
….

2. पूर्वी न्हावी हे शस्‍त्रक्रियादि साधनांनी रोग्‍यास उपचार करीत असत. तुंबडी लावणें हेहि एक त्‍यांच्या कामापैकी एक असे. मनुष्‍य निरुद्योगी असला म्‍हणजे भलतेच उद्योग करण्याकडे त्‍याची प्रवृत्ति होते.
https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A...

प्रचेतस's picture

16 Mar 2021 - 9:14 am | प्रचेतस

तुंबडीचा मूळ अर्थ जरी रक्त शोषायचे नळीसारखे यंत्र असा असला तरी लौकिकार्थाने तुंबडीस जळू म्हणतात. पूर्वीच्या काळी न्हावी लोकांकडे जळवा असत. अशुद्ध रक्त ओढून काढण्यासाठी जखमांच्या ठिकाणी त्या लावल्या जात.

सौन्दर्य's picture

16 Mar 2021 - 10:52 pm | सौन्दर्य

खुप खुप आभार

श्रीगुरुजी's picture

15 Mar 2021 - 10:59 pm | श्रीगुरुजी

"प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे" या पंक्तीचा अर्थ "खूप परिश्रमाअंती साध्य प्राप्त होते" असा लावला जातो.

परंतु हा अर्थ चुकीचा आहे व संदर्भही चुकीचा आहे.

मूळ पंक्ती अशा आहेत.

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे
तृषार्थाची तृष्णा मृगजळ पिऊनही वितळे
सशाचे लाभे विपिनी फिरता शृंग ही जरी,
परंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी ...

प्रयत्ने वाळूचे कण-" या ओळीचा अर्थ प्रयत्नाने सारे काही साध्य होते, असा मुळीच नाही. माणूस जन्मभर जरी रगडत बसला तरी वाळूच्या कणांवर थेंबभर देखील तेल गळणार नाही. या ठिकाणी कवी पूर्णपणे अशक्य अशा गोष्टींची उदाहरणे देत आहे.

मृगजळाने तहानलेल्या माणसाची (एखाद्या वेळी) तहान भागेल, रानात सशाचे शिंग सापडू शकेल, वाळूच्या कणांतून तेलाचा थेंब गळू शकेल, पण मूर्खाचे हृदय मात्र कधीही धरता येणार नाही. म्हणून ही ओळ प्रयत्नांची स्तुती करणारी मुळीच नाही. कुणी तरी असला खुळचट अर्थ डोक्यात घेतला व त्याची परंपरा होऊन बसली. एखाद्या पुजाऱ्याला पूजा करताना शिंक यावी व ते पाहून पूजेच्या सुरुवातीला शिंकलेच पाहिजे असा क्रम निर्माण व्हावा, तसे या ओळीबद्दल झाले आहे." ...

संदर्भ - http://lahanpan.blogspot.com/2008/07/blog-post.html?m=1

कानडाऊ योगेशु's picture

16 Mar 2021 - 8:22 pm | कानडाऊ योगेशु

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे

बहुदा वाळवंटी प्रदेशात तेलाच्या खाणी सापडल्यामुळे ह्या म्हणीला नवीन अर्थ प्राप्त झाला असावा.

सौन्दर्य's picture

15 Mar 2021 - 11:05 pm | सौन्दर्य

म्हणी व वाक्प्रचार ह्यातील नक्की फरक कोणी सांगू शकेल काय ?

माझ्या माहितीनुसार म्हणी ह्या प्रतीकात्मक किंवा रूपकात्मक असतात, म्हणजेच त्याचा सरळ संबध वस्तुस्थितीशी नसतो. उदा. बैल गेला झोपा केला (ह्यातील 'झोपा' म्हणजे काय ?)
वाक्प्रचार वस्तुस्थिती दर्शक असतात. उदा. घरोघरी मातीच्या चुली, पळसाला पाने तीनच.
माझी ही माहिती बरोबर आहे का ?

श्रीगुरुजी's picture

15 Mar 2021 - 11:37 pm | श्रीगुरुजी

म्हणी' म्हणजे लोकांनी वारंवार उच्चारलेले वाक्य.

म्हण ही कहाणी, उखाणा यांप्रमाणे मूलतः मौखिक अशा लोकसाहित्यात जमा होणारी, पण छोटेखानी गद्य वाङ्‍मयकृती असते.

संक्षेपाबरोबरच यमक, अनुप्रास, अतिशयोक्ती, उपमा इ. अलंकारांमुळे ती चटकदार बनते. त्या त्या समाजाच्या संस्कृतीमधले विशिष्ट विषयाबद्दलचे शहाणपण तिच्यात साठवलेले आणि पुढच्या पिढीच्या हवाली केलेले असते.
म्हणीमध्ये जीवनातील विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती 'म्हण'होय. म्हणी समाजाचा आरसाच आहेत. मानवाच्या चांगल्या वाईट प्रवृत्ती, आचार -विचार, नानाविध चालीरीती ,निरनिराळी नातीगोती इ.चे प्रतिबिंब त्यांत पडलेले असते. कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात. यात उपमा, रूप, पर्यायोक्ती, विरोधाभास, यमक, अनुप्रास अशा विविध भाषा अलंकारां सोबत ठसकेदार रचनेचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग केलेला असतो.

उदाहरणार्थ -
कामापुरता मामा – गरजेपुरता गोड बोलणारा
कुंपणानेच शेत खाल्ले – रक्षकानेच चोरी करणे

वाक्प्रचार हा म्हणीप्रमाणे स्वयंपूर्ण नसतो (म्हणीला तर पंचांसमोरच्या न्यायदानात आधार म्हणून वापरण्याइतकी प्रतिष्ठा असते.) जगातल्या कोणत्याही भाषेत एकेरी शब्दांबरोबर ज्यांचा अर्थ सहजगत्या न लागता रूढीने लागतो असे शब्दसमूह आणि कधी वाक्ये असतात आणि ती लहान मुलाला असो किवा परक्याला असो स्वतंत्रपणे शिकून घ्यावी लागतात. सुटा वाक्प्रचार स्वयंपूर्ण नसतो, सुट्‍ट्या शब्दांप्रमाणे तो संदर्भातच जिवंत होतो.

उदाहरणार्थ -

अंधारात घाव घालणे, उखळ पांढरे होणे.

संदर्भ - गुगल

सौन्दर्य's picture

16 Mar 2021 - 10:54 pm | सौन्दर्य

गुरुजी,
आभार.

कुमार१'s picture

16 Mar 2021 - 10:28 am | कुमार१

बैल गेला झोपा केला (ह्यातील 'झोपा' म्हणजे काय ?)


झोपा = कवाड

एका मनुष्‍याजवळ एक बैल होता. तो ज्‍या ठिकाणी बांधीत असे त्‍या गोठ्‌याला दरवाजा अथवा कवाड नव्हते. अशा स्‍थितीत वाघाचा उपद्रव सुरू झाला तेव्हां त्‍यास गोठ्यास झोपा करावयास त्‍याच्या बायकोने सांगितले, त्‍यानेहि त्‍याप्रमाणें करण्याचा मनात विचार केला
पण रोज काही काही निमित्ताने तो ते काम दिरंगाईवर टाकू लागला. अखेरीस त्‍याने एके दिवशी कवाड जवळजवळ तयार केले व दुसर्‍या दिवशी सकाळी गोठ्‌यास लावावयाचे तो त्‍या रात्री वाघाने बैलास उचलून नेले. याप्रमाणें दिरंगाईमुळे त्‍याचा बैल गेला व त्‍याचे श्रमहि फुकट गेले.

सौन्दर्य's picture

16 Mar 2021 - 10:55 pm | सौन्दर्य

आळसामुळे 'झोपा' चा अर्थ शोधण्याचा प्रयत्न आधी केला नाही. तुमच्यामुळे तो अर्थ कळला. खूप खूप आभार.

सुबोध खरे's picture

17 Mar 2021 - 7:58 pm | सुबोध खरे

मी एक दुसरा अर्थ ऐकला होता

बैल नसून बाईल म्हणजे बायको

आणि झोपा म्हणजे घर (वर्हाडी कि अहिराणी भाषेत असावे)

राहायला घर नसल्यामुळे बायको नवऱ्याशी भुणभुण करत असे. शेवटी नवऱ्याने घर बांधायचे मनावर घेतले परंतु त्या अगोदरच बायको (बाईल) निघून गेली होती

पुन्हा एकदा अप्रतिम धागा..

वाचत आहे.. प्रतिसाद हि वाचनीय..

कर्नलतपस्वी's picture

15 Mar 2021 - 11:58 pm | कर्नलतपस्वी

लेक माहा टिकोबा चारी बैले इकोबा,
बोली भाषा व त्यातुनच निर्माण झालेले अपभ्रंश, म्हणी इतक्या सटिक व सशक्त परीणाम कारक असतात.

सुदंरभरम्हणींचचा संग्रह व त्यावर एक लेख लिहिला आहे लवकरच शेअर करेन
धन्यवाद

बापूसाहेब's picture

16 Mar 2021 - 12:48 am | बापूसाहेब

रोचक माहिती.. !!!

सुक्या's picture

16 Mar 2021 - 5:13 am | सुक्या

छान धागा. सुंदर माहीती . . .

नावाच्या बाबतीत पण असेच झालेले पाहिले आहे ..

आसराबाई --> अप्सराबाई???
बिरोबा --> वीरभद्र ??

"अती शहाणा त्याचा बैल रिकामा" यात बैल रिकामा म्हणजे काय अभिप्रेत असावे?

कुमार१'s picture

16 Mar 2021 - 10:22 am | कुमार१

अती शहाणा त्याचा बैल रिकामा" यात बैल रिकामा म्हणजे काय अभिप्रेत असावे?

जो वाजवीपेक्षां जास्त हुषारी दाखविण्याचा प्रयत्न करतो त्याचें मुळींच काम होत नाहीं. फाजील शहाणपणा नुकसानच करतो. एक माणूस आपण बैलाकडून काम करुन घेतलें तर त्याला फार खावयाला घालावें लागेल व मग नुकसान येईल म्हणून त्याला रिकामा ठेवी. या मूर्खपणाबद्दल त्याचें दुप्पट नुकसान झालें. कारण त्याचें मुळींच काम न होतां बैल मात्र पोसावा लागला.

सुक्या's picture

18 Mar 2021 - 1:02 am | सुक्या

धन्यवाद

पूर्वी बैल म्हणजे काही तरी कामासाठी ठेवायचे, नांगरणे किंवा बैलगाडी ओढणे इत्यादी. आणि बैल रिकामा असणे म्हणजे पोसायला एक तोंड आहे पण फायदा काही नाही अशी स्थिती. (म्हणजे तुमच्या कडे टेक्सी आहे पण गॅरेजमध्ये पडून आहे असा प्रकार).

ह्याला एक कथा सुद्धा असे पण आता आठवत नाही.

सुक्या's picture

18 Mar 2021 - 1:02 am | सुक्या

धन्यवाद

आपण सर्वांनीच धाग्यात मौलिक भर घातलेली आहे.
आता विशिष्ट शंकाचे संदर्भ शोधतो व त्यानुसार भर घालेन
धन्यवाद !

येथेही अनेक म्हणी अर्थासहित आहे.
https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A...

कुमार१'s picture

16 Mar 2021 - 10:33 am | कुमार१

धन्यवाद.
हेच लिहीत होतो :

सूचना :

ज्यांना अपभ्रंश इ. बद्दल ‘ऐकीव’ माहिती असेल त्यांनी खालील संस्थळावरून तिची खातरजमा करून घ्यावी.

१. https://bruhadkosh.org/
२. https://www.transliteral.org/dictionary

नंतर चुकीचे/ ऐकलेले व बरोबर अशी एकत्र माहिती लिहावी.
धन्यवाद व स्वागत !

रंगीला रतन's picture

16 Mar 2021 - 10:55 am | रंगीला रतन

चांगला लेख.आवडला.

साहना's picture

16 Mar 2021 - 1:30 pm | साहना

हा लेख मला खूप आवडला.

मैथिली ठाकूर हि एक सुप्रसिद्ध यौतुंबे वरील बालिका आहे. आपल्या सुंदर आवाजांत हि सुंदर गाणी, भजने म्हणते आणि तिचे बाऊ तिला तबला, पेटीवर साथ देतात. आता हि बालिका लाईव्ह शो सुद्धा करते. तिच्यासारखी कन्या प्राप्त होणे हे पालकांचे भाग्य आहे.

पण विविध भजनाच्या सोबत ती एक खा गाणे सुद्धा म्हणते "छाप तिलक सब छिन लोहे मोसे नैना मिलायिके". मैथिलीच नाही तर अनेक लोक हे गाणे विविध ठिकाणी आणि अनेकदा धार्मिक उत्सवांत सुद्धा भजन म्हणून म्हणतात.

प्रत्यक्षांत ह्या शब्दांचा अर्थ खूपच वाईट आहे. कदाचित छाप आणि तिलक हे शब्ध असल्याने लोकांना हे गीत काही तरी धार्मिक आहे असे वाटते, पण तसे अजिबात नाही.

हे गीत अमीर खुसरो ने १२०० च्या काळांत लिहिले. त्या काली दिल्ली वगैरे भागांत इस्लाम आणि हिंदू धर्म ह्यांच्यात बरीच युद्धे होत होती आणि आपली हिंदू ओळख दाखविण्यासाठी वैष्णव लोक छाप (कानशिलावर लावलेले गंधाचे शिक्के) आणि तिलक लावत असत. अमीर खुसरो च्या गीताच्या बोलाचे अर्थ आहेत कि मुस्लिम माणूस निव्वळ आपल्या दृष्टीने हिंदू महिलेच्या मनात वासना निर्माण करतो आणि त्याच्यावर मोहित होऊन हि महिला आपली हिंदू ओळख पुसून इस्लाम कबुल करते. अशी इस्लाम ची जादू आणि इस्लामिक पुरुषाची जादू आहे. ह्या गीतातून हिंदू धर्म आणि त्यांचे सिम्बॉल ह्यावर मुद्दाम हुन अमीर खुसरो ह्यांनी टीका केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=pL9wLxsXKTE&t=99s

सौन्दर्य's picture

16 Mar 2021 - 11:03 pm | सौन्दर्य

मी हे गाणे युट्यूबवर अनेक कलाकारांच्या तोंडून ऐकले आहे. मैथिली ठाकूर उत्तम गाते ह्यात शंकाच नाही, पण ह्या गाण्याचा अर्थ इतका वाईट असेल असं चुकूनही वाटलं नाही. हे गाणे ऐकल्यावर ते एखाद्या उत्तर भारतीय भाषेतील लोकसंगीत असावे असा समज झाला. आता प्रत्येक वेळी ते गाणे ऐकताना अर्थच मनात फिरत राहणार. अरेरे.

छाप तिलक सब छिन लोहे मोसे नैना मिलायिके"

अमीर खुसरो यानी १४व्या शतकात लिहीलेला सुफीयांना कलाम त्या वेळचे सुफी संत हजरत निजामुद्दीन औलीया याच्या बद्दल अवधी भाषेत लिहीला. नुसरत फतेह अली खान, अबिदा परवीन, राहत फतेह अली खान, रिचा शर्मा आणि कितीतरी मान्यवर गायकांनी गायले आहे. रिचा शर्माजी खाली दिलेला शेर गाऊन याची सुरवात करतात. यू ट्यूबवर आहे. अत्यंत सुंदर रचना व प्रस्तुती. माझे आवडते आणी नेहमीच ऐकण्या मधला सुफी कलाम. बाकी माहिती आपण अतंरजाला वर बघु शकता.
कृपया भ्रमीत ना हो आणी सुफीयाना गायकीचा आनंद घ्या.

" कागा सब तन खाइयो
चुनचून मोरा मांस
पर दो नैना मत खाईयो
इसमे साई मीलन की आंस"

तन मज तन मन धन बाजी लागी रे
धन धन मोरे भाग बाजी लागी रे
लागी लागी सब कहें
लागी
लागी
लागी
लागी लागी सब कहें
लागी लगी ना अंग
लागी तो जब जानिए
जब रहे गुरु के संग
मौला
ओ जी मौला

ख़ुसरो रैन सुहाग की
ख़ुसरो रैन सुहाग की
जो मैं जोगी पी के संग
ख़ुसरो बाजी प्रेम की
ख़ुसरो बाजी प्रेम की
जो मैं खेली पी के संग
जीत गयी तो पिया मोरे
जो मैं हारी पी के संग
नमस्कार

राज२००९'s picture

18 Mar 2021 - 10:38 pm | राज२००९

>>कृपया भ्रमीत ना हो आणी सुफीयाना गायकीचा आनंद घ्या. +१

हे मकरंद जे कोण आहेत त्यांनी "छाप तिलक.."ची पार्श्वभूमी लक्षात न घेता विनाकारण या अजरामर गझल्/कव्वालीचा संदर्भ त्या डिबेटमधे जोडलेला आहे. यावर माझी एकच प्रतिक्रिया - कुछ भी...

छाप तीलक छिनणे = ओळख हिसकावणे

खो जाना = हरवणे नाहीए छिनणे = हिसकावणे , 'मीटा देना' शी जवळीक आहे. अमीर खुस्रो कुणा सुल्तानांचा भाट नसता तर त्याने असेच लिहिले असते का ? हा प्रश्नच आहे. या वर फुर्सतीने लेख पाडावयास हवा.

खुस्रोचा स्वतःचे प्रेम आणि विवाहसंबंध याबद्दल कुणाकडे संदर्भ असल्यास नक्की द्या. एरवी खुस्रोची आई किंवा देवल राणी या परिस्थितीवश मुस्लीम झालेल्या स्त्रीयांशी या काव्याचा संदर्भ असेल. भाटांना काही झाले तरी परिस्थितीचे कौतुक करणे भाग होते उपलब्ध मर्यादेत स्त्रीदास्यत्वातील भक्ती कितीही मोठी भक्ती असली तरी पराजीत दास्यत्व पराजीत दास्यत्व असते.

मका म्हणे's picture

16 Mar 2021 - 7:13 pm | मका म्हणे

मराठी म्हणी व वाक्प्रचार हे वा.गो.भट यांनी लिहिलेल्या पुस्तकात खूप जुने मराठी वाक्प्रचार व म्हणी वाचायला मिळतील.

मका म्हणे's picture

16 Mar 2021 - 7:13 pm | मका म्हणे

मराठी म्हणी व वाक्प्रचार हे वा.गो.भट यांनी लिहिलेल्या पुस्तकात खूप जुने मराठी वाक्प्रचार व म्हणी वाचायला मिळतील.

मका म्हणे's picture

16 Mar 2021 - 7:23 pm | मका म्हणे

मराठी म्हणी व वाक्प्रचार हे वा.गो.भट यांनी लिहिलेल्या पुस्तकात खूप जुने मराठी वाक्प्रचार व म्हणी वाचायला मिळतील.

मका म्हणे's picture

16 Mar 2021 - 7:24 pm | मका म्हणे

मराठी म्हणी व वाक्प्रचार हे वा.गो.भट यांनी लिहिलेल्या पुस्तकात खूप जुने मराठी वाक्प्रचार व म्हणी वाचायला मिळतील.

अनन्त्_यात्री's picture

16 Mar 2021 - 7:57 pm | अनन्त्_यात्री

लोकसंस्कृतीचे आणि भारतविद्येचे (इंडॉलॉजी) एक प्रतिभावंत अभ्यासक श्री विश्वनाथ खैरे यांच्या मतानुसार प्रमाणभाषांतील (तथाकथित) "शुद्ध"शब्दांचा अपभ्रंश होऊन बोलीभाषा घडत गेल्या नाहीत तर बोलीभाषांतील शब्दांचा उदभ्रंश होऊन म्हणजे त्यांच्यावर प्रमाणभाषामान्य संस्कार करून प्रमाणभाषांची जडणघडण झाली आहे. हे मत मला फारसे पटत नाही पण अशी उद्भ्रंशाची उदाहरणे कोणास ठाऊक असतील तर ते जाणून घेणे रोचक ठरेल.

कुमार१'s picture

16 Mar 2021 - 8:57 pm | कुमार१

उदभ्रंश होऊन

हा शब्दच किती गोड आहे ! आवडला.
कोणी यावर जरूर लिहावे.

मुक्त विहारि's picture

16 Mar 2021 - 8:27 pm | मुक्त विहारि

वाखूसा

चंद्रसूर्यकुमार's picture

16 Mar 2021 - 8:34 pm | चंद्रसूर्यकुमार

इंग्लिशमधील a lion's share हा शब्द मराठीत जसाच्या तसा सिंहाचा वाटा म्हणून आला असे दिसते. तसेच इंग्लिशमधील a lot of चेच मराठीत अलोट झाले आहे का हा प्रश्न कधीकधी पडतो.

सौंदाळा's picture

16 Mar 2021 - 8:51 pm | सौंदाळा

निवडणुकीत पण आता 'अटीतटीची लढत' नसते तर 'काट्याची टक्कर' असते. कुठून आणतात वार्ताहर देवजाणे

कुमार१'s picture

16 Mar 2021 - 9:07 pm | कुमार१

अलोट = अ + लुट (ट चा पाय मोडलेला)

ही व्युत्पत्ती संस्कृत आहे.
लुट = गति

https://books.google.co.in/books?id=jNaNpCjNApIC&pg=PA47&lpg=PA47&dq=%E0...

चंद्रसूर्यकुमार's picture

16 Mar 2021 - 9:10 pm | चंद्रसूर्यकुमार

धन्यवाद

कानडाऊ योगेशु's picture

18 Mar 2021 - 12:40 am | कानडाऊ योगेशु

तसे असेल तर Lot हा शब्द लूट वरुन आलेला असु शकतो असे समजायला वाव आहे.

बबन ताम्बे's picture

31 Jul 2021 - 5:05 pm | बबन ताम्बे

एखाद्या मोठ्या कामगिरीत एखाद्याचा खूप मोठा वाटा असेल तर त्याला आपण गौरवाने सिंहाचा वाटा म्हणतो. पण मी वाचलेय की सिंहाचा वाटा म्हणजे सिंह स्वतः शिकार न करता सिंहिणींनी शिकार करून आणलेल्या अन्नावर ताव मारतो. त्यासाठी सिंहिणीला त्याचा वेगळा वाटा ठेवायला लागतो. सिंहाचा वाटा याचा असा खरा म्हणजे स्वार्थी अर्थ आहे.

कुमार१'s picture

31 Jul 2021 - 8:26 pm | कुमार१

रोचक आणि सहमत आहे.

इथे दिलेल्या बऱ्याच जागतिक दंतकथांमध्ये साधारण असेच म्हटलेले आहे

कुमार१'s picture

17 Mar 2021 - 9:38 am | कुमार१

मदत हवी

या चर्चेत अन्यत्र एकाने खालील ‘ऐकीव’ माहिती दिली आहे.

'वड्याचे तेल वांग्यावर' ही मूळ म्हण “वढ्याची (ओढ्याची) तेढ वांग्यावर” अशी होती. कारण वांगी ओढ्याजवळ लावत. मग त्याचा अपभ्रंश झाला.

….. मला याचा जालसंदर्भ मिळत नाही.
कोणी सांगेल ?

Bhakti's picture

18 Mar 2021 - 10:27 pm | Bhakti

https://mr.quora.com/vadyacam-tela-vangyavara-yaca-artha-kaya बाकी इथे कोणीतरी सध्या प्रचलित म्हणीचा शब्दशः अर्थ सांगितला आहे.

सुरिया's picture

17 Mar 2021 - 11:44 pm | सुरिया

दारुच्या पेग चा अपभ्रंश पॅक असा सर्रास वापरला जातो.

चौथा कोनाडा's picture

26 Dec 2021 - 9:02 pm | चौथा कोनाडा

टू बी परिसईज प्रिसाईज "प्याक" ..

हा .. हा .... हा ... !

कानडाऊ योगेशु's picture

18 Mar 2021 - 12:44 am | कानडाऊ योगेशु

कॅरॅक्टर अ‍ॅक्टर चे शब्दशः भाषांतर चरित्र अभिनेता हे विचित्र वाटते.
इंग्रजी कॅरेक्टर चे दोन अर्थ आहेत. एक नाटकातील एक पात्र असा होतो आणि दुसरा अर्थ चरित्र.
पण दुय्यम भूमिकांना चरित्र असा अर्थ कसा चिकटला हे कोडे आहे. भले ती भूमिका चारित्र्यहिन पात्राची का असेना!

कानडाऊ योगेशु's picture

18 Mar 2021 - 12:46 am | कानडाऊ योगेशु

इथे पुन्हा Character हा शब्द चरित्र वरुनच बनला असावा असे वाटते.

कुमार१'s picture

18 Mar 2021 - 7:47 am | कुमार१

पेग चा अपभ्रंश पॅक >>> होय, ऐकलाय.

का यो,
बरोबर. तुम्ही म्हणता ते भाषांतर काहीसे रुक्ष वाटतं. बाकी lot व character या दोन्ही इंग्लिश शब्दांचा शब्दकोशातून शोध घेतला असता ही माहिती मिळते :

lot हा Germanic आहे तर
character हा मूळचा Old French आहे.

सौन्दर्य's picture

18 Mar 2021 - 9:14 pm | सौन्दर्य

ढवळ्या शेजारी बांधला पवळा, गुण नाही पण वाण आला. ह्यातील 'वाण' शब्दाचा अर्थ सांगू शकाल काय ?

कुमार१'s picture

18 Mar 2021 - 9:26 pm | कुमार१

वाण =
. वर्ण; रंग. '. म्ह॰ ढवळ्या शेजारी बांधल्या पोवळा वाण नाहीं पण गुण लागला

https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3

कुमार१'s picture

18 Mar 2021 - 9:29 pm | कुमार१

हा पूर्ण अर्थ :

एका शेतकर्‍याजवळ दोन बैल होते. त्‍यांपैकी एक शुभ्र पांढर्‍या रंगाचा होता व दुसरा तांबडसर पोवळ्या रंगाचा होता. त्‍याला पांढरा रंग अधिक आवडत असे. त्‍यामुळे त्‍याला वाटले की पोवळा बैल जर पांढर्‍याच्या शेजारी बांधला तर त्‍याचाहि रंग हळूहळू पांढरा होईल. त्‍याने तसे केले. पण पांढरा बैल माजोरा, मस्‍ती करणारा होता व पोवळा बैल स्‍वभावाने गरीब होता. काही दिवस गेल्‍यावर त्‍या शेतकर्‍यास असे आढळून आले की, पोवळ्या बैलाचा रंग काही पांढरा झाला नाही पण तो पांढर्‍या बैलाप्रमाणें हट्टी व मारकट मात्र झाला.
https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A...

हो,इथे वाण म्हणजे वर्ण,रंग अर्थ आहे.वाण हा शब्द कसा बदलत वापरला आहे,इथेही थोडक्यात सांगितले आहे.
https://educalingo.com/mr/dic-mr/vana-2

Bhakti's picture

18 Mar 2021 - 10:29 pm | Bhakti

https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5383027122035755132 हे म्हणींचा पुस्तक वाटत आहे आणि तसेच पाठभेद म्हणजे अपभ्रंश असावा

कुमार१'s picture

19 Mar 2021 - 7:39 am | कुमार१

छान चर्चा. सर्वांना धन्यवाद
आता एका महत्त्वाच्या चुकीकडे लक्ष वेधतो.

एक ढोबळ चूक बहुतेक वेळा पसायदान म्हणताना केली जाते. त्यातील एक वाक्य दुरिताचें तिमिर जावो असे आहे. बहुसंख्य शाळांमध्ये ते दुरितांचे असे चुकीचे म्हटले जाते. ही चूक रूढ व्हायला एक नाटक कारणीभूत ठरले. त्याचे नाव ‘दुरितांचे तिमिर...’ होते !

विकिपीडियावर मात्र अगदी शुद्ध (दुरिताचें) टंकले आहे.
पसायदान गाताना लताबाईंनी पण अगदी शुद्ध उच्चार केलेला आहे. बारकाईने ऐकल्यावर कळते.
जरूर ऐका !

यावर लोकप्रभामध्ये मी एका भाषातज्ञांचा लेख वाचला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की ‘पातकाचे तिमिर जावो’ असे ज्ञानेश्वरांना म्हणायचे असल्याने इथे दुरित शब्दाचे अनेकवचन करणे अयोग्य आहे आणि त्याची बिलकूल गरज नाही.

कुमार१'s picture

21 Mar 2021 - 5:55 pm | कुमार१

• ‘अफलातून’ हा अपभ्रंश तर भलताच रोचक आहे.

• मूळ शब्द आहे प्लेटो. म्हणजेच ते प्रसिद्ध ऐतिहासिक तत्त्वज्ञ.

• प्लेटो चे अरबीत झाले अफ्लातून

• हिंदीत तो ‘अफलातून’ झाला = वह जो अपने आप को औरों से बहुत बड़ा समझता हो

• आणि मराठीत
अफलातून = अप्रतिम , अलौकिक , सुंदर .

आहे की नाही ही शब्दकथा अफलातून !!

Nitin Palkar's picture

22 Mar 2021 - 7:34 pm | Nitin Palkar

मुळ लेख आणि त्यावरील प्रतिक्रिया सर्वच अतिशय रन्जक आणि माहितीप्रद.

कुमार१'s picture

3 Jun 2021 - 11:40 am | कुमार१

भारतीय भाषा, भारतीय प्रकारचे इंग्लिश यासंबंधी काही चांगली माहिती देणारी मुलाखत इथे आहे

कुमार१'s picture

9 Jun 2021 - 1:19 pm | कुमार१

कैरीच्या लोणच्याला " तक्कू" (टक्कू) हा जो शब्द आहे त्याचा उगम कोणाला माहिती आहे का ?

कुमार१'s picture

27 Jul 2021 - 2:27 pm | कुमार१

‘नमनाला घडाभर तेल’ या वाक्प्रचारात घडाभर हा शब्द अपभ्रंश झालेला असून बहुतेकांच्या तोंडात हाच शब्द असतो.
वास्तवातील शब्द धडाभर असा आहे.

(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A8+)

धडा हे एक जुने वजनमाप आहे.
(मोल्सवर्थ शब्दकोश
पु. १ दहा शेरी वजन केलेल्या मालाचें परिणाम. )
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%BE+

कुमार१'s picture

30 Jul 2021 - 2:43 pm | कुमार१

रंजक !

'श्रद्धा' चा एक पर्यायी अर्थ इथे सापडला :

स्त्री. (प्र.) शर्धा. अपानद्वारा सोडलेला वायु; पाद; पर्दन. (क्रि॰ सोडणें; करणें; सरणें; सुटणें; होणें). 'श्रद्धा करिती अधोद्वारें । नाकीं तोंडीं भरे दुर्गंध ।' -एभा २३.५५८. [सं. शृध् = पादणें]
(दाते शब्दकोश)

कुमार१'s picture

18 Sep 2021 - 2:10 pm | कुमार१

आपण बहुभाषिक असल्याने होणारे विविध फायदे आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावरील एक चांगला लेख इथे

कुमार१'s picture

26 Dec 2021 - 10:26 am | कुमार१

२०२२
‘भाषासूत्रे’ हे नवे सदर २०२२ मध्ये ‘लोकसत्ता’च्या ‘विचार’ पानावर असेल.
ते आकाराने छोटेसेच असले तरी यास्मीन शेख (लिखित वाक्यरचना) , भानू काळे (शब्दांची व्युत्पत्ती), डॉ. माधवी वैद्य (म्हणी), डॉ. नीलिमा गुंडी (वाक्प्रचार), डॉ. निधी पटवर्धन / सायली कर्लेकर (पर्यायी मराठी शब्द) असे कसलेले सूत्रधार हे भाषासूत्र कथन करणार आहेत.

स्वागत आणि प्रतीक्षा !

चौथा कोनाडा's picture

26 Dec 2021 - 8:59 pm | चौथा कोनाडा

माहिती साठी धन्यवाद !
नक्की वाचणार हे सदर.

कुमार१'s picture

11 Jan 2022 - 10:29 am | कुमार१

मराठी लेखनात जेव्हापण स्त्रीला संबोधित करतो, तेव्हा अगं असे बहुसंख्य वेळेला लिहिले जाते.

अगं या शब्दात ग वर अनुस्वार देणे चूक आहे; त्याची गरज नाही.
ही रोचक माहिती वाचा भाषापंडित यास्मिन शेख यांच्याच शब्दात इथे

कुमार१'s picture

15 Jan 2022 - 11:26 am | कुमार१

“Quarantine”

गेली दोन वर्षे हा शब्द बहुचर्चित आहे. त्या शब्दाची व्युत्पत्ती, इतिहास आणि बदलते अर्थ रंजक आहेत. म्हणून या विषयावर जरा वाचन केले. त्यातील काही टिपणे :
Quarantineकडे जर आपण शब्दशः पाहिले तर त्याचा अर्थ निव्वळ ४० दिवस इतकाच होतो.

१. पंधराव्या शतकात या शब्दाचा मूळ अर्थ, ‘जिथे जीझसने चाळीस दिवसांचे उपवास केले ती जागा, असा होता.
२. पुढे सोळाव्या शतकामध्ये त्याचा वापर एका वेगळ्याच कारणासाठी होत असे. एखादा पुरुष वारल्यानंतर त्याच्या विधवेला त्या कुटुंबातील ठराविक आर्थिक हिस्सा मिळवून दिला जाई. ती सर्व प्रक्रिया 40 दिवसांच्या आत पूर्ण करावी लागे. ती होईपर्यंत त्या विधवेला वडिलोपार्जित घरात राहण्याचा हक्क असे.

३. पुढे सतराव्या शतकात ‘40 दिवस’ हा अर्थ पक्का झाला. परंतु हे दिवस ठराविक शिक्षा किंवा सेवा देण्यासाठी असायचे. (‘lent’ चे उपवास ४० दिवस असतात).
४. आधुनिक काळातील या शब्दाच्या छटा पाहता त्याचा अर्थ फ्रेंच इटालियन या दोन्ही भाषांतून मिळून जन्मलेला दिसतो. जेव्हा प्लेगची साथ संपूर्ण जगभर जोरात होती त्याकाळात इटलीत प्रथम त्याचा वापर रोगसंसर्ग टाळण्यासाठी लोकांच्या हालचालींवर घातलेले निर्बंध असा होता. सुरुवातीस असे निर्बंध(विलगीकरण) फक्त ३० दिवस होते (trentino = ३०)
पुढे कालांतराने बहुदा धार्मिक कारणांसाठी 30 चे 40 करण्यात आले.

५. सन १८०४ मध्ये या शब्दाचे क्रियापद सुद्धा निर्माण झाले आणि त्याचा वापर संसर्गजन्य आजार वगळता इतर अनेक क्षेत्रांमध्ये होऊ लागला. जसे की, आर्थिक किंवा राजकीय बहिष्कार, सामाजिक विलगीकरण, इ.

चौथा कोनाडा's picture

4 Mar 2022 - 5:52 pm | चौथा कोनाडा

“Quarantine” च्या माहिती बद्दल धन्यवाद, कुमार१.

जीझसच्या कहाणीतली Quarant ही जागा (अर्थात स्थान) अजुनही आहे का ?

कुमार१'s picture

4 Mar 2022 - 6:37 pm | कुमार१

इथे माहिती आहे. इसराएलमध्ये दिसते आहे.
अभ्यासक नक्की सांगू शकतील

Nitin Palkar's picture

15 Jan 2022 - 7:45 pm | Nitin Palkar

नविनच माहिती.

कुमार१'s picture

14 Feb 2022 - 8:43 pm | कुमार१

मुद्याचा/गुद्यामुळे

वरील लेखनामध्ये काय चूक झाली आहे ते लक्षात येते आहे का? बऱ्याच जणांकडून ती होऊ शकते

यासंबंधी इथे वाचा :
https://www.loksatta.com/sampadkiya/visheshlekh/remember-the-meaning-of-...

जानेवारीपासून यास्मिन शेख
यांचे हे चांगले सदर सुरू झालेले आहे.

कुमार१'s picture

17 Feb 2022 - 9:57 am | कुमार१

भाषासूत्र : प्रकाशनविश्वात मराठी
https://www.loksatta.com/sampadkiya/visheshlekh/proof-copy-proofreading-...

त्या लघुलेखातील हे शब्द आवडले:

शीर्षकपान’, ‘प्रकाशनमुद्रा’ ‘प्रशस्ती’, ‘पुस्तकओळख’ ‘टंक’, ‘मुद्राक्षरे’, ‘अक्षरजुळणी', ‘परिचयओळी’, ‘चित्रओळ’ .

वाचनखूण आणि प्रताधिकार आपण इथे वापरतोच.

कुमार१'s picture

3 Mar 2022 - 8:44 pm | कुमार१

मराठी भाषा खरंच अभिजात आहे का यासंबंधी एक वेगळा विचार :

आज असंख्य मराठी जनांची मराठी ही ‘बोली’ आहे. तिला ‘अभिजात’ म्हणणे एका परीने या बोलीला ‘बोल’ लावल्यासारखे होईल!

"अभिजात हे विशेषण आंग्ल भाषेतील ‘classical’ याचा मराठी (संस्कृत) पर्याय आहे. ग्रीक व लॅटीन भाषा, साहित्य, शिल्प, संस्कृती यांसाठी ते वापरले जाते. भारतीय वैदिक संस्कृत, पाली, प्राकृत या अभिजात आहेत. इसवी सनोत्तरात अस्तित्वात आलेली माझी मराठीमाय अभिजात कशी असेल? "

प्रचेतस's picture

4 Mar 2022 - 9:25 am | प्रचेतस

वरील दुव्यातील लेखाशी बहुतांशी सहमत आहेच.

कुमार१'s picture

5 Mar 2022 - 8:42 am | कुमार१

लोकसत्तातील आजच्या भाषासूत्रात अर्थभ्रंशाची 3 सुंदर उदाहरणे दिली आहेत.

अपरोक्ष , विरोधाभास, राजीनामा

जरूर पहा

कुमार१'s picture

23 Apr 2022 - 2:32 pm | कुमार१

संडास
या शब्दाबद्दल सकाळी हा विनोद वाचला :

संडास शब्दाची उत्पत्ती कशी झाली? फार फार वर्षांपूर्वी जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हाची ही गोष्ट आहे.
तेव्हा गोऱ्या साहेबाला सकाळी सकाळी सूर्य उगवायच्या वेळी अनेक लोक हातात कसलं तरी भांडं घेऊन अतिशय वेगाने कोणत्या ना कोणत्या गुप्त जागी जाताना दिसायचे.
त्याला ही कसली तरी प्रथा वाटली आणि ह्या प्रथेचा सं बंध सूर्य उगवण्याशी असल्यामुळे आणि ह्या प्रथेत लगबगीने डुलत चालण्यामुळे त्याने ह्याला ‘सन डान्स’ असे नाव दिले.
काही दिवसांनी त्याला ह्या प्रथेची सत्यता समजली तरी त्याला त्या कामाला दिलेले सन डान्स हे नाव फार आवडले होते त्यामुळे तेच नाव पुढे सुद्धा वापरले जाऊ लागले..
हळूहळू त्या ‘सनडान्स’ चा अपभ्रंश होऊन आता आपण वापरत असलेला संडास हा शब्द तयार झाला असे तज्ञांचे ठाम मत आहे. :)

हे वाचून करमणूक झाली ! नंतर म्हटलं आता याची खरी व्युत्पत्ती पाहू.
बृहदकोशात एवढीच नोंद सापडली :
[सं. शुच् = शुद्ध करणें

मग जालावर एका प्राध्यापकांचा लेख वाचला. त्यात त्यांनी कुलकर्णी यांच्या व्युत्पत्ती कोशाचा संदर्भ देऊन असे म्हटले आहे :

स्थंडिल, षंडिल = शौच जवा योग्य भूमी. गुजरातीतून हा शब्द आलेला दिसतो

https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://philarchive...

प्रचेतस's picture

1 May 2022 - 4:54 pm | प्रचेतस

स्थंडिल ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ भूमी, जमीन त्यातही यज्ञासाठी तयार केलेली जमीन हाच अर्थ माहीत होता, त्यामुळे ती शौचासाठी कशी असेल हे पटले नाही त्यामुळे कृ. पां. कुलकर्णी यांचा मराठी व्युत्पत्ती कोश चाळून पाहिला तर एक वेगळेच वास्तव समोर आले.
पुस्तकात संडास हा शब्द मला तरी आढळला नाही, कदाचित नजरेतून सुटलाही असावा मात्र 'संड' हा शब्द आढळून आला.

संड(णे) - टाकणे, सोडणे (to leave, to abandon)
संस्कृत - श्वठं , प्राकृत- संठ्ठ

टाकणे - टाकण्याची जागा ह्या अर्थी संडास शब्द आला असू शकेल अशीही एक शक्यता आहे.
अजून दुसरा शब्द म्हणजे सडा समार्जन -पाणी मारून साफ करणे ही उपपत्तीही ग्राह्य धरता यावी.

कुमार१'s picture

1 May 2022 - 5:47 pm | कुमार१

छान.

शब्दरत्नाकरनुसार :
संडास हिंदीतून आलाय. = शेतखाना

सडा = शेणखळा

Nitin Palkar's picture

15 Jun 2022 - 8:19 pm | Nitin Palkar

तो जोड शब्द 'सडा संमार्जन' असा आहे...

कुमार१'s picture

9 May 2022 - 8:48 am | कुमार१

एक नेहमी होणारी सदोष वाक्यरचना :

पाणी /दारू पिल्यावर ....

ते 'प्या' पाहिजे.
यावर चांगला लेख इथे

कुमार१'s picture

15 Jun 2022 - 10:11 am | कुमार१

'वेश्या' चे हे समानार्थी परिचित आहेत :
रांड, कसबीण, बाजारबसवी, वारांगना,, नाटकशाळा, गणिका, कसबीण, बाजारी माल, वारयोषिता, मुरळी, भोगदासी, सर्वांची इच्छाराणी, अखंड सौभाग्यवती...इ.

एक नवा शब्द काल वाचला :
पण्यांगना .
व्युत्पत्तीच्या शोधात आहे.
...
तसेच
वारांगना मध्ये वार म्हणजे दिवस याशीं संबंध नाहीं. [सं. वार = समूह) हेही समजले.

कंजूस's picture

30 Nov 2022 - 1:58 pm | कंजूस

मूळ तमिळ असावे.
पंचम - पैसे
अंगम - शरीर

कंजूस's picture

30 Nov 2022 - 1:59 pm | कंजूस

पणम - पैसे.

प्रचेतस's picture

30 Nov 2022 - 2:48 pm | प्रचेतस

पण्य - पणन म्हणजे विक्री. शरीराची जी विक्री करते ती पण्यांगना.

कुमार१'s picture

30 Nov 2022 - 2:28 pm | कुमार१

धन्यवाद

उग्रसेन's picture

30 Nov 2022 - 4:20 pm | उग्रसेन

काका 'वेश्या' म्हणजे मुरळी नाय.

कुमार१'s picture

30 Nov 2022 - 4:41 pm | कुमार१

हे पाहा:
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%...
वेश्या
रखेली, राख, ठेवलेली बाई, अंगवस्त्र, पात्र, रक्षा, उपस्त्री, विसांव्याची जागा, रंडी, रांड, बाजारबसवी, वारांगना, पण्यांगना, नाटकशाळा, गणिका, कसबीण, बाजारी माल, वारयोषिता, मुरळी, भोगदासी, सर्वांची इच्छाराणी, अखंड सौभाग्यवती, देहविक्रीचें जीवन कंठणारी, सा-या गांवची उतारपेठ, शरिराचा बाजार मांडणारी, सौंदर्य बेचन करणारी.

शब्दकौमुदी

कुमार१'s picture

30 Nov 2022 - 4:44 pm | कुमार१

प्रत्येक शब्दाच्या अर्थछटेमध्ये फरक असेलही परंतु शब्दकोशात ते सर्व समानर्थी दिलेले दिसतात.

मुरळी बद्दल नितीन पालकर यांनी खालील प्रतिसादात लिहिले आहेच.

Nitin Palkar's picture

15 Jun 2022 - 8:14 pm | Nitin Palkar

वेश्या आणि नाटकशाळा यांमध्ये थोडा फरक आहे. वेश्या ही सार्वजनिक भोग्य वस्तू असून तिचे विवक्षित दाम देऊन ठराविक वेळापुरता कोणीही तिचा उपभोग घेऊ शकतो. तर नाटकशाळा ही खाजगी भोगदासी असे. अंगवस्त्र हा ही त्याच अर्थाचा आणखी एक शब्द.
मुरळी ही देखील केवळ वेश्या नसे पण त्यांना उदरनिर्वाहासाठी वेश्या करावा लागत असे. या संबंधी एक लेख https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4... इथे वाचता येईल.

कुमार१'s picture

15 Jun 2022 - 8:17 pm | कुमार१

पूरक माहिती आवडली.
प्रत्येक समानार्थी शब्दाची अर्थछटा वेगळी आहे

कुमार१'s picture

19 Jun 2022 - 10:29 am | कुमार१

मराठीप्रेमाचा चिरतरुण आविष्कार

मराठी भाषा आणि व्याकरणतज्ञ्य श्रीमती यास्मिन शेख या 21 जूनला 98 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.

अभिष्टचिंतन !!

कुमार१'s picture

23 Jun 2022 - 4:30 am | कुमार१

"तुझ्यासारखे छप्पन्न पाहिलेत" या वाक्यातील छप्पन्न या शब्दाचा उगम काय यासंबंधी भिन्न माहिती मिळाली:

१. डॉ. नीलिमा गुंडी यांनी इथे असे लिहिले आहे:

छप्पन्न हे मूळ ‘षट्प्रज्ञ’ या शब्दाचे बदललेले रूप आहे. षट्प्रज्ञ म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष, व्यवहार आणि तत्त्वज्ञान या सहा गोष्टी जाणणारा!

२. बृहदकोशात अशी माहिती आहे :
५६ देश, भाषा व संस्कृतकोश आहेत अशी समजूत आहे. [सं. षट्पंचाशत; प्रा. छपन्न]

(यावरून). छपन्नी, छपन्न्या-वि. १ अनेक देश हिंडून, अनेक भाषा शिकून आलेला (माणूस).

कुमार१'s picture

9 Jul 2022 - 9:10 pm | कुमार१

एक शब्द प्रथमच वाचनात आला:
निक्षेपक = ठेवीदार

क्षेप = टाकणें; फेकणें; खर्च करणें;
धनक्षेप = धन खर्च करणे.

ठेवीदार खरे तर पैशांची बचत करतो ना. मग तो क्षेपक कसा ? की बँकेला त्याने पैसे (तात्पुरते) ‘देऊन टाकले’ म्हणून ?
असे असावे.

कुमार१'s picture

23 Jul 2022 - 10:28 am | कुमार१

आमला" या शब्दाची विविध भाषिक गंमत पहा:

आमला (मराठी) = कारकून, अमलदार.
(अरबी अमलावरून उगम)

आमला (हिंदी) = आवळा
(संस्कृत आमलक >>>प्राकृत आमल)

संदर्भ

कुमार१'s picture

25 Jul 2022 - 3:18 pm | कुमार१

सूट या मराठी शब्दाचा नेहमीचा अर्थ सर्वांना माहित आहेच परंतु अन्य अर्थही चाकित करणारे आहेत:
सूट=
१ (कर्ज इ॰ तून) माफ केलेली, सोडलेली रकम.
२ (गुलाम, बंदी इ॰ स) बंधनांतून मुक्तता; सुटका; सोडवणूक.
३ रांगेंत मध्यें पडणारा खंड; दोन पदार्थांतील अंतर; फट.
४ (ना.) वीर्यस्खलन.
५ (व.) वाळलेली मिरची

* गुलाम, बंदी इ॰ स) बंधनांतून मुक्तता यासाठीचा manumission हा जुना इंग्लिश शब्दही मजेदार आहे.

*वीर्यस्खलन हा अर्थ वाचताना प्रथम दचकायला झाले. आता त्याचा आतील अर्थ लक्षात येतोय:

" साठलेल्या गोष्टीची एक प्रकारे झालेली सुटका"

पण चौथ्या व पाचव्या अर्थाच्या आधीच्या कंसातील ( ना, व) अक्षरांचा अर्थ नाही समजला.

कुमार१'s picture

27 Jul 2022 - 9:53 am | कुमार१

एक अपरिचित शब्द : मंदुरुस्त

तंदुरुस्तच्या जोडीने वापरला गेलेला हा शब्द प्रथमच नंदा खरे यांच्या लिखाणात वाचनात आला.
बृहदकोशात तरी हा शब्द मला मिळालेला नाही. इथे
जो सुबोध जावडेकरांचा खरे यांच्या पुस्तकावर लेख आहे त्यात अशी टिप्पणी केली आहे:

"

हीच वृत्ती तंदुरुस्त, मंदुरुस्त आहे (‘मनदुरुस्त’ या नव्या शब्दाची नोंद घ्यावी) "
कुमार१'s picture

31 Jul 2022 - 8:42 am | कुमार१

स्नेहालय ही वंचित मुलांसाठी काम करणारी संस्था आहे. त्यांच्या कारभारात ते 'झोपडपट्टी ' हा शब्द वापरत नाहीत. त्याऐवजी ते सेवावस्ती असे म्हणतात.
शब्द आवडला.

कुमार१'s picture

29 Sep 2022 - 4:25 am | कुमार१

‘आयाराम, गयाराम’ चा उगम माहीत नव्हता. तो इथून समजला :

https://www.loksatta.com/navneet/bhashasutra-languages-phrase-language-m...

"

१९६७मध्ये हरियाणातील आमदार गया लाल यांनी एका पंधरवडय़ात तीन वेळा पक्षांतर केले. त्यांच्या नावावरून ‘आयाराम, गयाराम’ हा वाक्प्रचार रूढ झाला".
कुमार१'s picture

21 Oct 2022 - 12:02 pm | कुमार१

हे घ्या ..
यंदाच्या ( पावसाळी) दिवाळीतला हा नवा संयोगशब्द :

ok

चौथा कोनाडा's picture

22 Oct 2022 - 6:45 pm | चौथा कोनाडा

सेवावस्ती हा शब्द आवडला.
‘आयाराम, गयाराम’ चा उगम रोचक आहे .
छंदिल मस्त विनोदी आहे.
मला कायप्पावर बरेच छंदिल भेट मिळाले :-)

कुमार१'s picture

23 Oct 2022 - 11:39 am | कुमार१

‘शब्दांची रोजनिशी’ : मानवी संस्कृतीच्या ऱ्हासाच्या मूलभूत स्त्रोतांचा परिचय करून देणारे नाटक

त्या लेखातील काही निवडक :

• ‘गुगल’ नावाची वैश्विक संस्था आपणाला मूर्ख बनवते आणि आपण त्याला बळी पडत आहोत.
• जिवंत माणूस मोबाईलचा... आधार कार्डचा नंबर झाला आहे.
• ‘वाळवी’ हे एक रूपक या नाटकात येते. लाकूड पोकळ करत जाणारी वाळवी भाषेलाही लागली असावी का?
* या नाटकात एका स्थानिक भाषेचा उल्लेख होतो. ‘चहा’ या एकाच पदार्थासाठी त्या भाषेत ३६४ शब्द आहेत.

कुमार१'s picture

27 Oct 2022 - 1:53 pm | कुमार१

आभार / धन्यवाद यांतील फरक

मातृभाषेतले किती तरी शब्द आपण एकमेकांना पर्याय म्हणून वापरतो खरे. अशाने त्यातले सूक्ष्म फरक नजरेआड होतात; त्यामुळे भाषिक गोंधळाला आमंत्रण दिल्यासारखे होते.

उदा. आभार ‘मानणे’ आणि धन्यवाद ‘देणे’ यात झालेली गल्लत. आभार शब्द संस्कृतमधून (आ + भृ) वरून आलेला आहे. भृ म्हणजे भार. म्हणजेच, या शब्दाच्या मुळाशी ‘भार धारण करायला लावणे’ अशी कल्पना आहे. एखाद्याला ओझे, आवरण धारण करायला लावणे, म्हणजे आभारणे.
..............आभार मानणे यात उपकाराच्या ओझ्याने वाकणे, त्याची जाणीव असणे, त्या दृष्टीने जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे..

.......मात्र ‘धन्यवाद देणे’, म्हणजे स्तुती करून कृतज्ञता व्यक्त करणे. आभार म्हणजे ‘ऑब्लिगेशन’, तर धन्यवाद म्हणजे फेलिसिटेशन ऑर बीइंग ब्लेस्ड टु अटेन ऑब्जेक्ट ऑफ डिझायर’ (दुवा देणे) असे मराठी भाषेसाठीच्या विख्यात मोल्सवर्थ-कँडी यांच्या शब्दकोशात म्हटले आहे.

कुमार१'s picture

27 Oct 2022 - 1:58 pm | कुमार१

कूट प्रश्न = हुमाणा असे शब्दखेळात समजले.
याचा व्युत्पत्तीप्रवास रंजक आहे.

सं.आहनस्या >> (प्राकृत) आहाण >>आहाणा >> उमाणा >> उखाणा.

कुमार१'s picture

3 Nov 2022 - 8:25 am | कुमार१

ही म्हण वाचनात आली

मुका मुलगा होणें =
विवाहित मुलीला प्रथम न्हाण येणे अर्थात
मासिक पाळीची सुरुवात

कुमार१'s picture

12 Nov 2022 - 7:55 am | कुमार१

राज्य सरकारतर्फे स्थापन करण्यात आलेल्या मराठी भाषा प्रमाणलेखन निश्चितीकरण समितीतर्फे प्रमाणलेखनासंबंधीचे नवीन नियम नुकतेच जाहीर झाले आहेत.

त्यातील काही महत्त्वाच्या नोंदी
:
१. श आणि ल या अक्षरांची दोन रुपे असतात. त्यातील फक्त देठयुक्त श व पाकळीयुक्त ल याच दृश्यरूपांना मान्यता दिली आहे.

२. अब्ज या संख्येनंतरच्या संख्यावाचक शब्दांचा समावेश नाही.

( बातमी: छापील सकाळ 12 नोव्हेंबर 2022, पान ३).

कुमार१'s picture

30 Nov 2022 - 1:44 pm | कुमार१

लोकनाथ शब्दाची एक गंमत आहे. त्याचे अर्थ दोन प्रकारे घेता येतात:

१. लोकांचा नाथ ( षष्ठी तत्पुरुष समास)
२. लोक आहेत नाथ ज्याचे (बहुव्रीही समास)

या संदर्भात एक प्रसिद्ध सुभाषित आहे.
एक कवी स्वतःला लोकनाथ म्हणवून घेतो म्हणून प्रजाजन खवळतात आणि त्याला राजाकडे नेतात. मग राजा याचे स्पष्टीकरण विचारतो. त्यावर कवी म्हणतो,

"

महाराज, तुम्ही पहिल्या अर्थाने लोकनाथ आहात तर मी दुसऱ्या अर्थाने !"

यावर राजा संतुष्ट होतो.

कुमार१'s picture

30 Dec 2022 - 9:17 am | कुमार१

जानेवारी 2022 पासून सुरू असलेले भाषासूत्र हे दैनिक लोकसत्ता मधील सदर आज समाप्त झाले. दर आठवड्यात सोमवार ते शुक्रवार पाच विविध भाषा अभ्यासकांनी यामध्ये लेख लिहिले होते. ते खूप माहितीप्रद आणि रंजक देखील होते. त्यातून मराठी भाषेचे विविध पैलू समजायला चांगली मदत झाली.

आपल्या दैनंदिन बोलण्यात आणि लिहिण्यात अनेक चुका अनवधानाने होत असतात. त्याही लक्षात आल्या. मराठी बोलणारा माणूस हा मराठी ‘भाषक’ असतो, भाषिक नव्हे, हा मूलभूत शब्द मनात ठसवला गेला.

या सदरातून परकीय भाषांमधून मराठीत आलेले शब्द, मराठी म्हणी आणि वाक्प्रचार यासंबंधी मौलिक माहिती मिळाली. म्हण आणि वाक्प्रचार यात फरक काय, यावर पूर्वी आपण इथे चर्चा केलेली आहे. या आठवड्यातील भाषासूत्रमधील एका लेखात काही मान्यवरांनी केलेल्या म्हणीच्या व्याख्या इथे उद्धृत करतो:

· साहित्यसम्राट न. चिं. केळकर : ‘चिमुकले, चतुरपणाचे, चटकदार असे वचन म्हणजे म्हण’.

· कोशकार वि. वि. भिडे : ‘ज्यात काही अनुभव, उपदेश, माहिती, सार्वकालिक सत्य किंवा ज्ञान गोवलेले आहे, ज्यात काही चटकदारपणा आहे आणि संभाषणात वारंवार योजतात असे वचन म्हणजे म्हण.’

· डॉ. दुर्गा भागवत : ‘जनतेने आत्मसात केलेली उक्ती म्हणजे म्हण’

· वा. म. जोशी : ‘थोडक्यात व मधुर शब्दांत जिथे पुष्कळ बोधप्रद अर्थ गोवला जातो, त्या वाक्यांना म्हणी असे म्हणतात.’

या चांगल्या वार्षिक उपक्रमाबद्दल लोकसत्ताचे अभिनंदन !!

कुमार१'s picture

25 Mar 2023 - 9:51 am | कुमार१

चौकस हा अगदी परिचित शब्द.
तो संस्कृत ‘चतुःकष’ वरून आला आहे.

त्या शब्दात असलेले चार ‘कस’ कोणते हा कुतूहलजनक प्रश्न आहे.
त्याचे उत्तर एका संस्कृत श्लोकातून मिळाले.
ते चार कस असे आहेत:

१. हे काय आहे?
२. हे झाले कसे?
३. हे कुणी केले असावे?
आणि
४. याची साधनसामग्री कोणती ?

ह्या चार प्रश्नांची उत्तरे शोधू पाहणारा तो चौकस !