✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.

ह
हेमंतकुमार यांनी
Mon, 03/15/2021 - 09:42  ·  लेख
लेख
नुकताच एका परिचितांनी ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा. या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात : १. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो २. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा ३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात. म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा. माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी. … १. आठराविश्वे दारिद्र्य अर्थ : -पूर्ण दारिद्र्य आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो. त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली : अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = 18/20 (https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF+) ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे) http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87 आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले : १८/२० आणि १८ गुणिले २० ! २. पुराणातली वांगी पुराणात अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर). आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा : “यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”. https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-mythology-1670536/ ३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला = हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु] https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8 इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा? ४. परोक्ष मूळ अर्थ : एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष. मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो ! हा पाहा संदर्भ : “अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”. (https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7+) ५. मेत(थ)कूट याचा सर्वपरिचित अर्थ हा: तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें. यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे. पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे. मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र) दाते शब्दकोश https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%9F ...... वानगीदाखल मी काही वर दिले आहे. येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल. **************************************
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
56720 वाचन

💬 प्रतिसाद (124)

प्रतिक्रिया

रोचक धागा

मुक्त विहारि
Tue, 03/16/2021 - 20:27 नवीन
वाखूसा
  • Log in or register to post comments

इंग्लिशमधून मराठीत आलेले शब्द?

चंद्रसूर्यकुमार
Tue, 03/16/2021 - 20:34 नवीन
इंग्लिशमधील a lion's share हा शब्द मराठीत जसाच्या तसा सिंहाचा वाटा म्हणून आला असे दिसते. तसेच इंग्लिशमधील a lot of चेच मराठीत अलोट झाले आहे का हा प्रश्न कधीकधी पडतो.
  • Log in or register to post comments

निवडणुकीत पण आता 'अटीतटीची

सौंदाळा
Tue, 03/16/2021 - 20:51 नवीन
निवडणुकीत पण आता 'अटीतटीची लढत' नसते तर 'काट्याची टक्कर' असते. कुठून आणतात वार्ताहर देवजाणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

चंसूकु,

हेमंतकुमार
Tue, 03/16/2021 - 21:07 नवीन
अलोट = अ + लुट (ट चा पाय मोडलेला) ही व्युत्पत्ती संस्कृत आहे. लुट = गति https://books.google.co.in/books?id=jNaNpCjNApIC&pg=PA47&lpg=PA47&dq=%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%9F+%E0%A4%9A%E0%A5%80+%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80&source=bl&ots=E55p7o5F_R&sig=ACfU3U2-2qbRcgC37qwOvSE4amI9FSUGIA&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjM8NWZkbXvAhXI63MBHSbcBfQQ6AEwAXoECAEQAw#v=onepage&q=%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%9F%20%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80&f=false
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

धन्यवाद

चंद्रसूर्यकुमार
Tue, 03/16/2021 - 21:10 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

तसे असेल तर Lot हा शब्द लूट

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 03/18/2021 - 00:40 नवीन
तसे असेल तर Lot हा शब्द लूट वरुन आलेला असु शकतो असे समजायला वाव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

सिंहाचा वाटा

बबन ताम्बे
Sat, 07/31/2021 - 17:05 नवीन
एखाद्या मोठ्या कामगिरीत एखाद्याचा खूप मोठा वाटा असेल तर त्याला आपण गौरवाने सिंहाचा वाटा म्हणतो. पण मी वाचलेय की सिंहाचा वाटा म्हणजे सिंह स्वतः शिकार न करता सिंहिणींनी शिकार करून आणलेल्या अन्नावर ताव मारतो. त्यासाठी सिंहिणीला त्याचा वेगळा वाटा ठेवायला लागतो. सिंहाचा वाटा याचा असा खरा म्हणजे स्वार्थी अर्थ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

ब ता,

हेमंतकुमार
Sat, 07/31/2021 - 20:26 नवीन
रोचक आणि सहमत आहे. इथे दिलेल्या बऱ्याच जागतिक दंतकथांमध्ये साधारण असेच म्हटलेले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

मदत हवी

हेमंतकुमार
Wed, 03/17/2021 - 09:38 नवीन
मदत हवी या चर्चेत अन्यत्र एकाने खालील ‘ऐकीव’ माहिती दिली आहे. 'वड्याचे तेल वांग्यावर' ही मूळ म्हण “वढ्याची (ओढ्याची) तेढ वांग्यावर” अशी होती. कारण वांगी ओढ्याजवळ लावत. मग त्याचा अपभ्रंश झाला. ….. मला याचा जालसंदर्भ मिळत नाही. कोणी सांगेल ?
  • Log in or register to post comments

रोचक

Bhakti
गुरुवार, 03/18/2021 - 22:27 नवीन
https://mr.quora.com/vadyacam-tela-vangyavara-yaca-artha-kaya बाकी इथे कोणीतरी सध्या प्रचलित म्हणीचा शब्दशः अर्थ सांगितला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

पेग प्याक

सुरिया
Wed, 03/17/2021 - 23:44 नवीन
दारुच्या पेग चा अपभ्रंश पॅक असा सर्रास वापरला जातो.
  • Log in or register to post comments

येस .....

चौथा कोनाडा
Sun, 12/26/2021 - 21:02 नवीन
टू बी परिसईज प्रिसाईज "प्याक" .. हा .. हा .... हा ... !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरिया

कॅरॅक्टर अ‍ॅक्टर चे शब्दशः

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 03/18/2021 - 00:44 नवीन
कॅरॅक्टर अ‍ॅक्टर चे शब्दशः भाषांतर चरित्र अभिनेता हे विचित्र वाटते. इंग्रजी कॅरेक्टर चे दोन अर्थ आहेत. एक नाटकातील एक पात्र असा होतो आणि दुसरा अर्थ चरित्र. पण दुय्यम भूमिकांना चरित्र असा अर्थ कसा चिकटला हे कोडे आहे. भले ती भूमिका चारित्र्यहिन पात्राची का असेना!
  • Log in or register to post comments

इथे पुन्हा Character हा शब्द

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 03/18/2021 - 00:46 नवीन
इथे पुन्हा Character हा शब्द चरित्र वरुनच बनला असावा असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

...

हेमंतकुमार
गुरुवार, 03/18/2021 - 07:47 नवीन
पेग चा अपभ्रंश पॅक >>> होय, ऐकलाय. का यो, बरोबर. तुम्ही म्हणता ते भाषांतर काहीसे रुक्ष वाटतं. बाकी lot व character या दोन्ही इंग्लिश शब्दांचा शब्दकोशातून शोध घेतला असता ही माहिती मिळते : lot हा Germanic आहे तर character हा मूळचा Old French आहे.
  • Log in or register to post comments

ढवळ्या शेजारी

सौन्दर्य
गुरुवार, 03/18/2021 - 21:14 नवीन
ढवळ्या शेजारी बांधला पवळा, गुण नाही पण वाण आला. ह्यातील 'वाण' शब्दाचा अर्थ सांगू शकाल काय ?
  • Log in or register to post comments

वाण =. वर्ण; रंग. '. म्ह॰

हेमंतकुमार
गुरुवार, 03/18/2021 - 21:26 नवीन
वाण = . वर्ण; रंग. '. म्ह॰ ढवळ्या शेजारी बांधल्या पोवळा वाण नाहीं पण गुण लागला https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3
  • Log in or register to post comments

आणि ...

हेमंतकुमार
गुरुवार, 03/18/2021 - 21:29 नवीन
हा पूर्ण अर्थ : एका शेतकर्‍याजवळ दोन बैल होते. त्‍यांपैकी एक शुभ्र पांढर्‍या रंगाचा होता व दुसरा तांबडसर पोवळ्या रंगाचा होता. त्‍याला पांढरा रंग अधिक आवडत असे. त्‍यामुळे त्‍याला वाटले की पोवळा बैल जर पांढर्‍याच्या शेजारी बांधला तर त्‍याचाहि रंग हळूहळू पांढरा होईल. त्‍याने तसे केले. पण पांढरा बैल माजोरा, मस्‍ती करणारा होता व पोवळा बैल स्‍वभावाने गरीब होता. काही दिवस गेल्‍यावर त्‍या शेतकर्‍यास असे आढळून आले की, पोवळ्या बैलाचा रंग काही पांढरा झाला नाही पण तो पांढर्‍या बैलाप्रमाणें हट्टी व मारकट मात्र झाला. https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE/word
  • Log in or register to post comments

माझी सगळ्यात आवडती म्हण आहे .

Bhakti
गुरुवार, 03/18/2021 - 21:38 नवीन
हो,इथे वाण म्हणजे वर्ण,रंग अर्थ आहे.वाण हा शब्द कसा बदलत वापरला आहे,इथेही थोडक्यात सांगितले आहे. https://educalingo.com/mr/dic-mr/vana-2
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

पुस्तक उपलब्ध आहे.

Bhakti
गुरुवार, 03/18/2021 - 22:29 नवीन
https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5383027122035755132 हे म्हणींचा पुस्तक वाटत आहे आणि तसेच पाठभेद म्हणजे अपभ्रंश असावा
  • Log in or register to post comments

पसायदान.....

हेमंतकुमार
Fri, 03/19/2021 - 07:39 नवीन
छान चर्चा. सर्वांना धन्यवाद आता एका महत्त्वाच्या चुकीकडे लक्ष वेधतो. एक ढोबळ चूक बहुतेक वेळा पसायदान म्हणताना केली जाते. त्यातील एक वाक्य दुरिताचें तिमिर जावो असे आहे. बहुसंख्य शाळांमध्ये ते दुरितांचे असे चुकीचे म्हटले जाते. ही चूक रूढ व्हायला एक नाटक कारणीभूत ठरले. त्याचे नाव ‘दुरितांचे तिमिर...’ होते ! विकिपीडियावर मात्र अगदी शुद्ध (दुरिताचें) टंकले आहे. पसायदान गाताना लताबाईंनी पण अगदी शुद्ध उच्चार केलेला आहे. बारकाईने ऐकल्यावर कळते. जरूर ऐका ! यावर लोकप्रभामध्ये मी एका भाषातज्ञांचा लेख वाचला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की ‘पातकाचे तिमिर जावो’ असे ज्ञानेश्वरांना म्हणायचे असल्याने इथे दुरित शब्दाचे अनेकवचन करणे अयोग्य आहे आणि त्याची बिलकूल गरज नाही.
  • Log in or register to post comments

अफलातून !!

हेमंतकुमार
Sun, 03/21/2021 - 17:55 नवीन
• ‘अफलातून’ हा अपभ्रंश तर भलताच रोचक आहे. • मूळ शब्द आहे प्लेटो. म्हणजेच ते प्रसिद्ध ऐतिहासिक तत्त्वज्ञ. • प्लेटो चे अरबीत झाले अफ्लातून • हिंदीत तो ‘अफलातून’ झाला = वह जो अपने आप को औरों से बहुत बड़ा समझता हो • आणि मराठीत अफलातून = अप्रतिम , अलौकिक , सुंदर . आहे की नाही ही शब्दकथा अफलातून !!
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर लेख

Nitin Palkar
Mon, 03/22/2021 - 19:34 नवीन
मुळ लेख आणि त्यावरील प्रतिक्रिया सर्वच अतिशय रन्जक आणि माहितीप्रद.
  • Log in or register to post comments

मुलाखत

हेमंतकुमार
गुरुवार, 06/03/2021 - 11:40 नवीन
भारतीय भाषा, भारतीय प्रकारचे इंग्लिश यासंबंधी काही चांगली माहिती देणारी मुलाखत इथे आहे
  • Log in or register to post comments

तक्कू

हेमंतकुमार
Wed, 06/09/2021 - 13:19 नवीन
कैरीच्या लोणच्याला " तक्कू" (टक्कू) हा जो शब्द आहे त्याचा उगम कोणाला माहिती आहे का ?
  • Log in or register to post comments

घडा /धडा !

हेमंतकुमार
Tue, 07/27/2021 - 14:27 नवीन
‘नमनाला घडाभर तेल’ या वाक्प्रचारात घडाभर हा शब्द अपभ्रंश झालेला असून बहुतेकांच्या तोंडात हाच शब्द असतो. वास्तवातील शब्द धडाभर असा आहे. (https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A8+) धडा हे एक जुने वजनमाप आहे. (मोल्सवर्थ शब्दकोश पु. १ दहा शेरी वजन केलेल्या मालाचें परिणाम. ) https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%BE+
  • Log in or register to post comments

रंजक !

हेमंतकुमार
Fri, 07/30/2021 - 14:43 नवीन
रंजक ! 'श्रद्धा' चा एक पर्यायी अर्थ इथे सापडला : स्त्री. (प्र.) शर्धा. अपानद्वारा सोडलेला वायु; पाद; पर्दन. (क्रि॰ सोडणें; करणें; सरणें; सुटणें; होणें). 'श्रद्धा करिती अधोद्वारें । नाकीं तोंडीं भरे दुर्गंध ।' -एभा २३.५५८. [सं. शृध् = पादणें] (दाते शब्दकोश)
  • Log in or register to post comments

बहुभाषिकता

हेमंतकुमार
Sat, 09/18/2021 - 14:10 नवीन
आपण बहुभाषिक असल्याने होणारे विविध फायदे आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावरील एक चांगला लेख इथे
  • Log in or register to post comments

आगामी

हेमंतकुमार
Sun, 12/26/2021 - 10:26 नवीन
२०२२ ‘भाषासूत्रे’ हे नवे सदर २०२२ मध्ये ‘लोकसत्ता’च्या ‘विचार’ पानावर असेल. ते आकाराने छोटेसेच असले तरी यास्मीन शेख (लिखित वाक्यरचना) , भानू काळे (शब्दांची व्युत्पत्ती), डॉ. माधवी वैद्य (म्हणी), डॉ. नीलिमा गुंडी (वाक्प्रचार), डॉ. निधी पटवर्धन / सायली कर्लेकर (पर्यायी मराठी शब्द) असे कसलेले सूत्रधार हे भाषासूत्र कथन करणार आहेत. स्वागत आणि प्रतीक्षा !
  • Log in or register to post comments

दुवा

हेमंतकुमार
Sun, 12/26/2021 - 10:27 नवीन
https://www.loksatta.com/mumbai/reading-tourism-of-rich-regions-editorial-page-of-loksatta-akp-94-2734427/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

धन्यवाद _/\_

चौथा कोनाडा
Sun, 12/26/2021 - 20:59 नवीन
माहिती साठी धन्यवाद ! नक्की वाचणार हे सदर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

'अगं' नव्हेच !

हेमंतकुमार
Tue, 01/11/2022 - 10:29 नवीन
मराठी लेखनात जेव्हापण स्त्रीला संबोधित करतो, तेव्हा अगं असे बहुसंख्य वेळेला लिहिले जाते. अगं या शब्दात ग वर अनुस्वार देणे चूक आहे; त्याची गरज नाही. ही रोचक माहिती वाचा भाषापंडित यास्मिन शेख यांच्याच शब्दात इथे
  • Log in or register to post comments

रंजक इतिहास

हेमंतकुमार
Sat, 01/15/2022 - 11:26 नवीन
“Quarantine” गेली दोन वर्षे हा शब्द बहुचर्चित आहे. त्या शब्दाची व्युत्पत्ती, इतिहास आणि बदलते अर्थ रंजक आहेत. म्हणून या विषयावर जरा वाचन केले. त्यातील काही टिपणे : Quarantineकडे जर आपण शब्दशः पाहिले तर त्याचा अर्थ निव्वळ ४० दिवस इतकाच होतो. १. पंधराव्या शतकात या शब्दाचा मूळ अर्थ, ‘जिथे जीझसने चाळीस दिवसांचे उपवास केले ती जागा, असा होता. २. पुढे सोळाव्या शतकामध्ये त्याचा वापर एका वेगळ्याच कारणासाठी होत असे. एखादा पुरुष वारल्यानंतर त्याच्या विधवेला त्या कुटुंबातील ठराविक आर्थिक हिस्सा मिळवून दिला जाई. ती सर्व प्रक्रिया 40 दिवसांच्या आत पूर्ण करावी लागे. ती होईपर्यंत त्या विधवेला वडिलोपार्जित घरात राहण्याचा हक्क असे. ३. पुढे सतराव्या शतकात ‘40 दिवस’ हा अर्थ पक्का झाला. परंतु हे दिवस ठराविक शिक्षा किंवा सेवा देण्यासाठी असायचे. (‘lent’ चे उपवास ४० दिवस असतात). ४. आधुनिक काळातील या शब्दाच्या छटा पाहता त्याचा अर्थ फ्रेंच इटालियन या दोन्ही भाषांतून मिळून जन्मलेला दिसतो. जेव्हा प्लेगची साथ संपूर्ण जगभर जोरात होती त्याकाळात इटलीत प्रथम त्याचा वापर रोगसंसर्ग टाळण्यासाठी लोकांच्या हालचालींवर घातलेले निर्बंध असा होता. सुरुवातीस असे निर्बंध(विलगीकरण) फक्त ३० दिवस होते (trentino = ३०) पुढे कालांतराने बहुदा धार्मिक कारणांसाठी 30 चे 40 करण्यात आले. ५. सन १८०४ मध्ये या शब्दाचे क्रियापद सुद्धा निर्माण झाले आणि त्याचा वापर संसर्गजन्य आजार वगळता इतर अनेक क्षेत्रांमध्ये होऊ लागला. जसे की, आर्थिक किंवा राजकीय बहिष्कार, सामाजिक विलगीकरण, इ.
  • Log in or register to post comments

“Quarantine” च्या माहिती

चौथा कोनाडा
Fri, 03/04/2022 - 17:52 नवीन
“Quarantine” च्या माहिती बद्दल धन्यवाद, कुमार१. जीझसच्या कहाणीतली Quarant ही जागा (अर्थात स्थान) अजुनही आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

चौको,

हेमंतकुमार
Fri, 03/04/2022 - 18:37 नवीन
इथे माहिती आहे. इसराएलमध्ये दिसते आहे. अभ्यासक नक्की सांगू शकतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

चांगली माहिती

Nitin Palkar
Sat, 01/15/2022 - 19:45 नवीन
नविनच माहिती.
  • Log in or register to post comments

मुद्दा...

हेमंतकुमार
Mon, 02/14/2022 - 20:43 नवीन
मुद्याचा/गुद्यामुळे वरील लेखनामध्ये काय चूक झाली आहे ते लक्षात येते आहे का? बऱ्याच जणांकडून ती होऊ शकते यासंबंधी इथे वाचा : https://www.loksatta.com/sampadkiya/visheshlekh/remember-the-meaning-of-the-word-wrong-word-plan-the-meaning-of-the-sentence-is-wrong-akp-94-2802372/ जानेवारीपासून यास्मिन शेख यांचे हे चांगले सदर सुरू झालेले आहे.
  • Log in or register to post comments

मराठी शब्दवापर

हेमंतकुमार
गुरुवार, 02/17/2022 - 09:57 नवीन
भाषासूत्र : प्रकाशनविश्वात मराठी https://www.loksatta.com/sampadkiya/visheshlekh/proof-copy-proofreading-pitting-press-these-words-printing-akp-94-2806722/ त्या लघुलेखातील हे शब्द आवडले: शीर्षकपान’, ‘प्रकाशनमुद्रा’ ‘प्रशस्ती’, ‘पुस्तकओळख’ ‘टंक’, ‘मुद्राक्षरे’, ‘अक्षरजुळणी', ‘परिचयओळी’, ‘चित्रओळ’ . … वाचनखूण आणि प्रताधिकार आपण इथे वापरतोच.
  • Log in or register to post comments

अभिजात ?

हेमंतकुमार
गुरुवार, 03/03/2022 - 20:44 नवीन
मराठी भाषा खरंच अभिजात आहे का यासंबंधी एक वेगळा विचार : आज असंख्य मराठी जनांची मराठी ही ‘बोली’ आहे. तिला ‘अभिजात’ म्हणणे एका परीने या बोलीला ‘बोल’ लावल्यासारखे होईल! "अभिजात हे विशेषण आंग्ल भाषेतील ‘classical’ याचा मराठी (संस्कृत) पर्याय आहे. ग्रीक व लॅटीन भाषा, साहित्य, शिल्प, संस्कृती यांसाठी ते वापरले जाते. भारतीय वैदिक संस्कृत, पाली, प्राकृत या अभिजात आहेत. इसवी सनोत्तरात अस्तित्वात आलेली माझी मराठीमाय अभिजात कशी असेल? "
  • Log in or register to post comments

वरील दुव्यातील लेखाशी

प्रचेतस
Fri, 03/04/2022 - 09:25 नवीन
वरील दुव्यातील लेखाशी बहुतांशी सहमत आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

लोकसत्तातील आजच्या

हेमंतकुमार
Sat, 03/05/2022 - 08:42 नवीन
लोकसत्तातील आजच्या भाषासूत्रात अर्थभ्रंशाची 3 सुंदर उदाहरणे दिली आहेत. अपरोक्ष , विरोधाभास, राजीनामा जरूर पहा
  • Log in or register to post comments

विनोद व व्युत्पत्ती

हेमंतकुमार
Sat, 04/23/2022 - 14:32 नवीन
संडास या शब्दाबद्दल सकाळी हा विनोद वाचला :
संडास शब्दाची उत्पत्ती कशी झाली? फार फार वर्षांपूर्वी जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हाची ही गोष्ट आहे. तेव्हा गोऱ्या साहेबाला सकाळी सकाळी सूर्य उगवायच्या वेळी अनेक लोक हातात कसलं तरी भांडं घेऊन अतिशय वेगाने कोणत्या ना कोणत्या गुप्त जागी जाताना दिसायचे. त्याला ही कसली तरी प्रथा वाटली आणि ह्या प्रथेचा सं बंध सूर्य उगवण्याशी असल्यामुळे आणि ह्या प्रथेत लगबगीने डुलत चालण्यामुळे त्याने ह्याला ‘सन डान्स’ असे नाव दिले. काही दिवसांनी त्याला ह्या प्रथेची सत्यता समजली तरी त्याला त्या कामाला दिलेले सन डान्स हे नाव फार आवडले होते त्यामुळे तेच नाव पुढे सुद्धा वापरले जाऊ लागले.. हळूहळू त्या ‘सनडान्स’ चा अपभ्रंश होऊन आता आपण वापरत असलेला संडास हा शब्द तयार झाला असे तज्ञांचे ठाम मत आहे. :)
हे वाचून करमणूक झाली ! नंतर म्हटलं आता याची खरी व्युत्पत्ती पाहू. बृहदकोशात एवढीच नोंद सापडली : [सं. शुच् = शुद्ध करणें मग जालावर एका प्राध्यापकांचा लेख वाचला. त्यात त्यांनी कुलकर्णी यांच्या व्युत्पत्ती कोशाचा संदर्भ देऊन असे म्हटले आहे : स्थंडिल, षंडिल = शौच जवा योग्य भूमी. गुजरातीतून हा शब्द आलेला दिसतो https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://philarchive.org/archive/HEMWA&ved=2ahUKEwjO56r65Kn3AhVGXWwGHdrVBhEQFnoECAsQAQ&usg=AOvVaw1mOQR_nL2YOo_IGyW49uHd
  • Log in or register to post comments

एक मजेदार निरीक्षण

प्रचेतस
Sun, 05/01/2022 - 16:54 नवीन
स्थंडिल ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ भूमी, जमीन त्यातही यज्ञासाठी तयार केलेली जमीन हाच अर्थ माहीत होता, त्यामुळे ती शौचासाठी कशी असेल हे पटले नाही त्यामुळे कृ. पां. कुलकर्णी यांचा मराठी व्युत्पत्ती कोश चाळून पाहिला तर एक वेगळेच वास्तव समोर आले. पुस्तकात संडास हा शब्द मला तरी आढळला नाही, कदाचित नजरेतून सुटलाही असावा मात्र 'संड' हा शब्द आढळून आला. संड(णे) - टाकणे, सोडणे (to leave, to abandon) संस्कृत - श्वठं , प्राकृत- संठ्ठ टाकणे - टाकण्याची जागा ह्या अर्थी संडास शब्द आला असू शकेल अशीही एक शक्यता आहे. अजून दुसरा शब्द म्हणजे सडा समार्जन -पाणी मारून साफ करणे ही उपपत्तीही ग्राह्य धरता यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

धन्यवाद ,

हेमंतकुमार
Sun, 05/01/2022 - 17:47 नवीन
छान. शब्दरत्नाकरनुसार : संडास हिंदीतून आलाय. = शेतखाना सडा = शेणखळा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सडा समार्जन

Nitin Palkar
Wed, 06/15/2022 - 20:19 नवीन
तो जोड शब्द 'सडा संमार्जन' असा आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बोलताना

हेमंतकुमार
Mon, 05/09/2022 - 08:48 नवीन
एक नेहमी होणारी सदोष वाक्यरचना : पाणी /दारू पिल्यावर .... ते 'प्या' पाहिजे. यावर चांगला लेख इथे
  • Log in or register to post comments

'वेश्या'...

हेमंतकुमार
Wed, 06/15/2022 - 10:11 नवीन
'वेश्या' चे हे समानार्थी परिचित आहेत : रांड, कसबीण, बाजारबसवी, वारांगना,, नाटकशाळा, गणिका, कसबीण, बाजारी माल, वारयोषिता, मुरळी, भोगदासी, सर्वांची इच्छाराणी, अखंड सौभाग्यवती...इ. एक नवा शब्द काल वाचला : पण्यांगना . व्युत्पत्तीच्या शोधात आहे. ... तसेच वारांगना मध्ये वार म्हणजे दिवस याशीं संबंध नाहीं. [सं. वार = समूह) हेही समजले.
  • Log in or register to post comments

पण्यांगना

कंजूस
Wed, 11/30/2022 - 13:58 नवीन
मूळ तमिळ असावे. पंचम - पैसे अंगम - शरीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

दुरुस्ती

कंजूस
Wed, 11/30/2022 - 13:59 नवीन
पणम - पैसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

पण्य - पणन म्हणजे विक्री.

प्रचेतस
Wed, 11/30/2022 - 14:48 नवीन
पण्य - पणन म्हणजे विक्री. शरीराची जी विक्री करते ती पण्यांगना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा