Skip to main content

भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 15/03/2021 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच एका परिचितांनी ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा. या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात : १. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो २. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा ३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात. म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा. माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी. … १. आठराविश्वे दारिद्र्य अर्थ : -पूर्ण दारिद्र्य आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो. त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली : अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = 18/20 (https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF…+) ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे) http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%… आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले : १८/२० आणि १८ गुणिले २० ! २. पुराणातली वांगी पुराणात अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर). आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा : “यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”. https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myt… ३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला = हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु] https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8 इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा? ४. परोक्ष मूळ अर्थ : एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष. मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो ! हा पाहा संदर्भ : “अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”. (https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95…+) ५. मेत(थ)कूट याचा सर्वपरिचित अर्थ हा: तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें. यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे. पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे. मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र) दाते शब्दकोश https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95… ...... वानगीदाखल मी काही वर दिले आहे. येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल. **************************************

वाचने 57137
प्रतिक्रिया 124

प्रतिक्रिया

छान चर्चा. सर्वांना धन्यवाद आता एका महत्त्वाच्या चुकीकडे लक्ष वेधतो. एक ढोबळ चूक बहुतेक वेळा पसायदान म्हणताना केली जाते. त्यातील एक वाक्य दुरिताचें तिमिर जावो असे आहे. बहुसंख्य शाळांमध्ये ते दुरितांचे असे चुकीचे म्हटले जाते. ही चूक रूढ व्हायला एक नाटक कारणीभूत ठरले. त्याचे नाव ‘दुरितांचे तिमिर...’ होते ! विकिपीडियावर मात्र अगदी शुद्ध (दुरिताचें) टंकले आहे. पसायदान गाताना लताबाईंनी पण अगदी शुद्ध उच्चार केलेला आहे. बारकाईने ऐकल्यावर कळते. जरूर ऐका ! यावर लोकप्रभामध्ये मी एका भाषातज्ञांचा लेख वाचला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की ‘पातकाचे तिमिर जावो’ असे ज्ञानेश्वरांना म्हणायचे असल्याने इथे दुरित शब्दाचे अनेकवचन करणे अयोग्य आहे आणि त्याची बिलकूल गरज नाही.

• ‘अफलातून’ हा अपभ्रंश तर भलताच रोचक आहे. • मूळ शब्द आहे प्लेटो. म्हणजेच ते प्रसिद्ध ऐतिहासिक तत्त्वज्ञ. • प्लेटो चे अरबीत झाले अफ्लातून • हिंदीत तो ‘अफलातून’ झाला = वह जो अपने आप को औरों से बहुत बड़ा समझता हो • आणि मराठीत अफलातून = अप्रतिम , अलौकिक , सुंदर . आहे की नाही ही शब्दकथा अफलातून !!

मुळ लेख आणि त्यावरील प्रतिक्रिया सर्वच अतिशय रन्जक आणि माहितीप्रद.

भारतीय भाषा, भारतीय प्रकारचे इंग्लिश यासंबंधी काही चांगली माहिती देणारी मुलाखत इथे आहे

कैरीच्या लोणच्याला " तक्कू" (टक्कू) हा जो शब्द आहे त्याचा उगम कोणाला माहिती आहे का ?

‘नमनाला घडाभर तेल’ या वाक्प्रचारात घडाभर हा शब्द अपभ्रंश झालेला असून बहुतेकांच्या तोंडात हाच शब्द असतो. वास्तवातील शब्द धडाभर असा आहे. (https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A8+) धडा हे एक जुने वजनमाप आहे. (मोल्सवर्थ शब्दकोश पु. १ दहा शेरी वजन केलेल्या मालाचें परिणाम. ) https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%BE+

रंजक ! 'श्रद्धा' चा एक पर्यायी अर्थ इथे सापडला : स्त्री. (प्र.) शर्धा. अपानद्वारा सोडलेला वायु; पाद; पर्दन. (क्रि॰ सोडणें; करणें; सरणें; सुटणें; होणें). 'श्रद्धा करिती अधोद्वारें । नाकीं तोंडीं भरे दुर्गंध ।' -एभा २३.५५८. [सं. शृध् = पादणें] (दाते शब्दकोश)

आपण बहुभाषिक असल्याने होणारे विविध फायदे आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावरील एक चांगला लेख इथे

२०२२ ‘भाषासूत्रे’ हे नवे सदर २०२२ मध्ये ‘लोकसत्ता’च्या ‘विचार’ पानावर असेल. ते आकाराने छोटेसेच असले तरी यास्मीन शेख (लिखित वाक्यरचना) , भानू काळे (शब्दांची व्युत्पत्ती), डॉ. माधवी वैद्य (म्हणी), डॉ. नीलिमा गुंडी (वाक्प्रचार), डॉ. निधी पटवर्धन / सायली कर्लेकर (पर्यायी मराठी शब्द) असे कसलेले सूत्रधार हे भाषासूत्र कथन करणार आहेत. स्वागत आणि प्रतीक्षा !

In reply to by हेमंतकुमार

माहिती साठी धन्यवाद ! नक्की वाचणार हे सदर.

मराठी लेखनात जेव्हापण स्त्रीला संबोधित करतो, तेव्हा अगं असे बहुसंख्य वेळेला लिहिले जाते. अगं या शब्दात ग वर अनुस्वार देणे चूक आहे; त्याची गरज नाही. ही रोचक माहिती वाचा भाषापंडित यास्मिन शेख यांच्याच शब्दात इथे

“Quarantine” गेली दोन वर्षे हा शब्द बहुचर्चित आहे. त्या शब्दाची व्युत्पत्ती, इतिहास आणि बदलते अर्थ रंजक आहेत. म्हणून या विषयावर जरा वाचन केले. त्यातील काही टिपणे : Quarantineकडे जर आपण शब्दशः पाहिले तर त्याचा अर्थ निव्वळ ४० दिवस इतकाच होतो. १. पंधराव्या शतकात या शब्दाचा मूळ अर्थ, ‘जिथे जीझसने चाळीस दिवसांचे उपवास केले ती जागा, असा होता. २. पुढे सोळाव्या शतकामध्ये त्याचा वापर एका वेगळ्याच कारणासाठी होत असे. एखादा पुरुष वारल्यानंतर त्याच्या विधवेला त्या कुटुंबातील ठराविक आर्थिक हिस्सा मिळवून दिला जाई. ती सर्व प्रक्रिया 40 दिवसांच्या आत पूर्ण करावी लागे. ती होईपर्यंत त्या विधवेला वडिलोपार्जित घरात राहण्याचा हक्क असे. ३. पुढे सतराव्या शतकात ‘40 दिवस’ हा अर्थ पक्का झाला. परंतु हे दिवस ठराविक शिक्षा किंवा सेवा देण्यासाठी असायचे. (‘lent’ चे उपवास ४० दिवस असतात). ४. आधुनिक काळातील या शब्दाच्या छटा पाहता त्याचा अर्थ फ्रेंच इटालियन या दोन्ही भाषांतून मिळून जन्मलेला दिसतो. जेव्हा प्लेगची साथ संपूर्ण जगभर जोरात होती त्याकाळात इटलीत प्रथम त्याचा वापर रोगसंसर्ग टाळण्यासाठी लोकांच्या हालचालींवर घातलेले निर्बंध असा होता. सुरुवातीस असे निर्बंध(विलगीकरण) फक्त ३० दिवस होते (trentino = ३०) पुढे कालांतराने बहुदा धार्मिक कारणांसाठी 30 चे 40 करण्यात आले. ५. सन १८०४ मध्ये या शब्दाचे क्रियापद सुद्धा निर्माण झाले आणि त्याचा वापर संसर्गजन्य आजार वगळता इतर अनेक क्षेत्रांमध्ये होऊ लागला. जसे की, आर्थिक किंवा राजकीय बहिष्कार, सामाजिक विलगीकरण, इ.

In reply to by हेमंतकुमार

“Quarantine” च्या माहिती बद्दल धन्यवाद, कुमार१. जीझसच्या कहाणीतली Quarant ही जागा (अर्थात स्थान) अजुनही आहे का ?

मुद्याचा/गुद्यामुळे वरील लेखनामध्ये काय चूक झाली आहे ते लक्षात येते आहे का? बऱ्याच जणांकडून ती होऊ शकते यासंबंधी इथे वाचा : https://www.loksatta.com/sampadkiya/visheshlekh/remember-the-meaning-of… जानेवारीपासून यास्मिन शेख यांचे हे चांगले सदर सुरू झालेले आहे.

भाषासूत्र : प्रकाशनविश्वात मराठी https://www.loksatta.com/sampadkiya/visheshlekh/proof-copy-proofreading… त्या लघुलेखातील हे शब्द आवडले: शीर्षकपान’, ‘प्रकाशनमुद्रा’ ‘प्रशस्ती’, ‘पुस्तकओळख’ ‘टंक’, ‘मुद्राक्षरे’, ‘अक्षरजुळणी', ‘परिचयओळी’, ‘चित्रओळ’ . … वाचनखूण आणि प्रताधिकार आपण इथे वापरतोच.

मराठी भाषा खरंच अभिजात आहे का यासंबंधी एक वेगळा विचार : आज असंख्य मराठी जनांची मराठी ही ‘बोली’ आहे. तिला ‘अभिजात’ म्हणणे एका परीने या बोलीला ‘बोल’ लावल्यासारखे होईल! "अभिजात हे विशेषण आंग्ल भाषेतील ‘classical’ याचा मराठी (संस्कृत) पर्याय आहे. ग्रीक व लॅटीन भाषा, साहित्य, शिल्प, संस्कृती यांसाठी ते वापरले जाते. भारतीय वैदिक संस्कृत, पाली, प्राकृत या अभिजात आहेत. इसवी सनोत्तरात अस्तित्वात आलेली माझी मराठीमाय अभिजात कशी असेल? "

संडास या शब्दाबद्दल सकाळी हा विनोद वाचला :
संडास शब्दाची उत्पत्ती कशी झाली? फार फार वर्षांपूर्वी जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हाची ही गोष्ट आहे. तेव्हा गोऱ्या साहेबाला सकाळी सकाळी सूर्य उगवायच्या वेळी अनेक लोक हातात कसलं तरी भांडं घेऊन अतिशय वेगाने कोणत्या ना कोणत्या गुप्त जागी जाताना दिसायचे. त्याला ही कसली तरी प्रथा वाटली आणि ह्या प्रथेचा सं बंध सूर्य उगवण्याशी असल्यामुळे आणि ह्या प्रथेत लगबगीने डुलत चालण्यामुळे त्याने ह्याला ‘सन डान्स’ असे नाव दिले. काही दिवसांनी त्याला ह्या प्रथेची सत्यता समजली तरी त्याला त्या कामाला दिलेले सन डान्स हे नाव फार आवडले होते त्यामुळे तेच नाव पुढे सुद्धा वापरले जाऊ लागले.. हळूहळू त्या ‘सनडान्स’ चा अपभ्रंश होऊन आता आपण वापरत असलेला संडास हा शब्द तयार झाला असे तज्ञांचे ठाम मत आहे. :)
हे वाचून करमणूक झाली ! नंतर म्हटलं आता याची खरी व्युत्पत्ती पाहू. बृहदकोशात एवढीच नोंद सापडली : [सं. शुच् = शुद्ध करणें मग जालावर एका प्राध्यापकांचा लेख वाचला. त्यात त्यांनी कुलकर्णी यांच्या व्युत्पत्ती कोशाचा संदर्भ देऊन असे म्हटले आहे : स्थंडिल, षंडिल = शौच जवा योग्य भूमी. गुजरातीतून हा शब्द आलेला दिसतो https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://philarchiv…

In reply to by हेमंतकुमार

स्थंडिल ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ भूमी, जमीन त्यातही यज्ञासाठी तयार केलेली जमीन हाच अर्थ माहीत होता, त्यामुळे ती शौचासाठी कशी असेल हे पटले नाही त्यामुळे कृ. पां. कुलकर्णी यांचा मराठी व्युत्पत्ती कोश चाळून पाहिला तर एक वेगळेच वास्तव समोर आले. पुस्तकात संडास हा शब्द मला तरी आढळला नाही, कदाचित नजरेतून सुटलाही असावा मात्र 'संड' हा शब्द आढळून आला. संड(णे) - टाकणे, सोडणे (to leave, to abandon) संस्कृत - श्वठं , प्राकृत- संठ्ठ टाकणे - टाकण्याची जागा ह्या अर्थी संडास शब्द आला असू शकेल अशीही एक शक्यता आहे. अजून दुसरा शब्द म्हणजे सडा समार्जन -पाणी मारून साफ करणे ही उपपत्तीही ग्राह्य धरता यावी.

एक नेहमी होणारी सदोष वाक्यरचना : पाणी /दारू पिल्यावर .... ते 'प्या' पाहिजे. यावर चांगला लेख इथे

'वेश्या' चे हे समानार्थी परिचित आहेत : रांड, कसबीण, बाजारबसवी, वारांगना,, नाटकशाळा, गणिका, कसबीण, बाजारी माल, वारयोषिता, मुरळी, भोगदासी, सर्वांची इच्छाराणी, अखंड सौभाग्यवती...इ. एक नवा शब्द काल वाचला : पण्यांगना . व्युत्पत्तीच्या शोधात आहे. ... तसेच वारांगना मध्ये वार म्हणजे दिवस याशीं संबंध नाहीं. [सं. वार = समूह) हेही समजले.

In reply to by हेमंतकुमार

काका 'वेश्या' म्हणजे मुरळी नाय.

In reply to by बाबुराव

हे पाहा: https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D… वेश्या रखेली, राख, ठेवलेली बाई, अंगवस्त्र, पात्र, रक्षा, उपस्त्री, विसांव्याची जागा, रंडी, रांड, बाजारबसवी, वारांगना, पण्यांगना, नाटकशाळा, गणिका, कसबीण, बाजारी माल, वारयोषिता, मुरळी, भोगदासी, सर्वांची इच्छाराणी, अखंड सौभाग्यवती, देहविक्रीचें जीवन कंठणारी, सा-या गांवची उतारपेठ, शरिराचा बाजार मांडणारी, सौंदर्य बेचन करणारी. शब्दकौमुदी

In reply to by हेमंतकुमार

प्रत्येक शब्दाच्या अर्थछटेमध्ये फरक असेलही परंतु शब्दकोशात ते सर्व समानर्थी दिलेले दिसतात. मुरळी बद्दल नितीन पालकर यांनी खालील प्रतिसादात लिहिले आहेच.

वेश्या आणि नाटकशाळा यांमध्ये थोडा फरक आहे. वेश्या ही सार्वजनिक भोग्य वस्तू असून तिचे विवक्षित दाम देऊन ठराविक वेळापुरता कोणीही तिचा उपभोग घेऊ शकतो. तर नाटकशाळा ही खाजगी भोगदासी असे. अंगवस्त्र हा ही त्याच अर्थाचा आणखी एक शब्द. मुरळी ही देखील केवळ वेश्या नसे पण त्यांना उदरनिर्वाहासाठी वेश्या करावा लागत असे. या संबंधी एक लेख https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A… इथे वाचता येईल.

मराठीप्रेमाचा चिरतरुण आविष्कार मराठी भाषा आणि व्याकरणतज्ञ्य श्रीमती यास्मिन शेख या 21 जूनला 98 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. अभिष्टचिंतन !!

"तुझ्यासारखे छप्पन्न पाहिलेत" या वाक्यातील छप्पन्न या शब्दाचा उगम काय यासंबंधी भिन्न माहिती मिळाली: १. डॉ. नीलिमा गुंडी यांनी इथे असे लिहिले आहे: छप्पन्न हे मूळ ‘षट्प्रज्ञ’ या शब्दाचे बदललेले रूप आहे. षट्प्रज्ञ म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष, व्यवहार आणि तत्त्वज्ञान या सहा गोष्टी जाणणारा! २. बृहदकोशात अशी माहिती आहे : ५६ देश, भाषा व संस्कृतकोश आहेत अशी समजूत आहे. [सं. षट्पंचाशत; प्रा. छपन्न] (यावरून). छपन्नी, छपन्न्या-वि. १ अनेक देश हिंडून, अनेक भाषा शिकून आलेला (माणूस).

एक शब्द प्रथमच वाचनात आला: निक्षेपक = ठेवीदार क्षेप = टाकणें; फेकणें; खर्च करणें; धनक्षेप = धन खर्च करणे. ठेवीदार खरे तर पैशांची बचत करतो ना. मग तो क्षेपक कसा ? की बँकेला त्याने पैसे (तात्पुरते) ‘देऊन टाकले’ म्हणून ? असे असावे.

आमला" या शब्दाची विविध भाषिक गंमत पहा: आमला (मराठी) = कारकून, अमलदार. (अरबी अमलावरून उगम) … आमला (हिंदी) = आवळा (संस्कृत आमलक >>>प्राकृत आमल) संदर्भ

सूट या मराठी शब्दाचा नेहमीचा अर्थ सर्वांना माहित आहेच परंतु अन्य अर्थही चाकित करणारे आहेत: सूट= १ (कर्ज इ॰ तून) माफ केलेली, सोडलेली रकम. २ (गुलाम, बंदी इ॰ स) बंधनांतून मुक्तता; सुटका; सोडवणूक. ३ रांगेंत मध्यें पडणारा खंड; दोन पदार्थांतील अंतर; फट. ४ (ना.) वीर्यस्खलन. ५ (व.) वाळलेली मिरची * गुलाम, बंदी इ॰ स) बंधनांतून मुक्तता यासाठीचा manumission हा जुना इंग्लिश शब्दही मजेदार आहे. *वीर्यस्खलन हा अर्थ वाचताना प्रथम दचकायला झाले. आता त्याचा आतील अर्थ लक्षात येतोय: " साठलेल्या गोष्टीची एक प्रकारे झालेली सुटका" पण चौथ्या व पाचव्या अर्थाच्या आधीच्या कंसातील ( ना, व) अक्षरांचा अर्थ नाही समजला.

एक अपरिचित शब्द : मंदुरुस्त तंदुरुस्तच्या जोडीने वापरला गेलेला हा शब्द प्रथमच नंदा खरे यांच्या लिखाणात वाचनात आला. बृहदकोशात तरी हा शब्द मला मिळालेला नाही. इथे जो सुबोध जावडेकरांचा खरे यांच्या पुस्तकावर लेख आहे त्यात अशी टिप्पणी केली आहे: "
हीच वृत्ती तंदुरुस्त, मंदुरुस्त आहे (‘मनदुरुस्त’ या नव्या शब्दाची नोंद घ्यावी) "

स्नेहालय ही वंचित मुलांसाठी काम करणारी संस्था आहे. त्यांच्या कारभारात ते 'झोपडपट्टी ' हा शब्द वापरत नाहीत. त्याऐवजी ते सेवावस्ती असे म्हणतात. शब्द आवडला.

‘आयाराम, गयाराम’ चा उगम माहीत नव्हता. तो इथून समजला : https://www.loksatta.com/navneet/bhashasutra-languages-phrase-language-… "
१९६७मध्ये हरियाणातील आमदार गया लाल यांनी एका पंधरवडय़ात तीन वेळा पक्षांतर केले. त्यांच्या नावावरून ‘आयाराम, गयाराम’ हा वाक्प्रचार रूढ झाला".

हे घ्या .. यंदाच्या ( पावसाळी) दिवाळीतला हा नवा संयोगशब्द : ok

In reply to by हेमंतकुमार

सेवावस्ती हा शब्द आवडला. ‘आयाराम, गयाराम’ चा उगम रोचक आहे . छंदिल मस्त विनोदी आहे. मला कायप्पावर बरेच छंदिल भेट मिळाले :-)

‘शब्दांची रोजनिशी’ : मानवी संस्कृतीच्या ऱ्हासाच्या मूलभूत स्त्रोतांचा परिचय करून देणारे नाटक त्या लेखातील काही निवडक :
• ‘गुगल’ नावाची वैश्विक संस्था आपणाला मूर्ख बनवते आणि आपण त्याला बळी पडत आहोत. • जिवंत माणूस मोबाईलचा... आधार कार्डचा नंबर झाला आहे. • ‘वाळवी’ हे एक रूपक या नाटकात येते. लाकूड पोकळ करत जाणारी वाळवी भाषेलाही लागली असावी का? * या नाटकात एका स्थानिक भाषेचा उल्लेख होतो. ‘चहा’ या एकाच पदार्थासाठी त्या भाषेत ३६४ शब्द आहेत.

आभार / धन्यवाद यांतील फरक
मातृभाषेतले किती तरी शब्द आपण एकमेकांना पर्याय म्हणून वापरतो खरे. अशाने त्यातले सूक्ष्म फरक नजरेआड होतात; त्यामुळे भाषिक गोंधळाला आमंत्रण दिल्यासारखे होते. उदा. आभार ‘मानणे’ आणि धन्यवाद ‘देणे’ यात झालेली गल्लत. आभार शब्द संस्कृतमधून (आ + भृ) वरून आलेला आहे. भृ म्हणजे भार. म्हणजेच, या शब्दाच्या मुळाशी ‘भार धारण करायला लावणे’ अशी कल्पना आहे. एखाद्याला ओझे, आवरण धारण करायला लावणे, म्हणजे आभारणे. ..............आभार मानणे यात उपकाराच्या ओझ्याने वाकणे, त्याची जाणीव असणे, त्या दृष्टीने जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे.. .......मात्र ‘धन्यवाद देणे’, म्हणजे स्तुती करून कृतज्ञता व्यक्त करणे. आभार म्हणजे ‘ऑब्लिगेशन’, तर धन्यवाद म्हणजे फेलिसिटेशन ऑर बीइंग ब्लेस्ड टु अटेन ऑब्जेक्ट ऑफ डिझायर’ (दुवा देणे) असे मराठी भाषेसाठीच्या विख्यात मोल्सवर्थ-कँडी यांच्या शब्दकोशात म्हटले आहे.

कूट प्रश्न = हुमाणा असे शब्दखेळात समजले. याचा व्युत्पत्तीप्रवास रंजक आहे. सं.आहनस्या >> (प्राकृत) आहाण >>आहाणा >> उमाणा >> उखाणा.

राज्य सरकारतर्फे स्थापन करण्यात आलेल्या मराठी भाषा प्रमाणलेखन निश्चितीकरण समितीतर्फे प्रमाणलेखनासंबंधीचे नवीन नियम नुकतेच जाहीर झाले आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या नोंदी : १. श आणि ल या अक्षरांची दोन रुपे असतात. त्यातील फक्त देठयुक्त श व पाकळीयुक्त ल याच दृश्यरूपांना मान्यता दिली आहे. २. अब्ज या संख्येनंतरच्या संख्यावाचक शब्दांचा समावेश नाही. ( बातमी: छापील सकाळ 12 नोव्हेंबर 2022, पान ३).

लोकनाथ शब्दाची एक गंमत आहे. त्याचे अर्थ दोन प्रकारे घेता येतात: १. लोकांचा नाथ ( षष्ठी तत्पुरुष समास) २. लोक आहेत नाथ ज्याचे (बहुव्रीही समास) या संदर्भात एक प्रसिद्ध सुभाषित आहे. एक कवी स्वतःला लोकनाथ म्हणवून घेतो म्हणून प्रजाजन खवळतात आणि त्याला राजाकडे नेतात. मग राजा याचे स्पष्टीकरण विचारतो. त्यावर कवी म्हणतो, "
महाराज, तुम्ही पहिल्या अर्थाने लोकनाथ आहात तर मी दुसऱ्या अर्थाने !"
यावर राजा संतुष्ट होतो.

जानेवारी 2022 पासून सुरू असलेले भाषासूत्र हे दैनिक लोकसत्ता मधील सदर आज समाप्त झाले. दर आठवड्यात सोमवार ते शुक्रवार पाच विविध भाषा अभ्यासकांनी यामध्ये लेख लिहिले होते. ते खूप माहितीप्रद आणि रंजक देखील होते. त्यातून मराठी भाषेचे विविध पैलू समजायला चांगली मदत झाली. आपल्या दैनंदिन बोलण्यात आणि लिहिण्यात अनेक चुका अनवधानाने होत असतात. त्याही लक्षात आल्या. मराठी बोलणारा माणूस हा मराठी ‘भाषक’ असतो, भाषिक नव्हे, हा मूलभूत शब्द मनात ठसवला गेला. या सदरातून परकीय भाषांमधून मराठीत आलेले शब्द, मराठी म्हणी आणि वाक्प्रचार यासंबंधी मौलिक माहिती मिळाली. म्हण आणि वाक्प्रचार यात फरक काय, यावर पूर्वी आपण इथे चर्चा केलेली आहे. या आठवड्यातील भाषासूत्रमधील एका लेखात काही मान्यवरांनी केलेल्या म्हणीच्या व्याख्या इथे उद्धृत करतो: · साहित्यसम्राट न. चिं. केळकर : ‘चिमुकले, चतुरपणाचे, चटकदार असे वचन म्हणजे म्हण’. · कोशकार वि. वि. भिडे : ‘ज्यात काही अनुभव, उपदेश, माहिती, सार्वकालिक सत्य किंवा ज्ञान गोवलेले आहे, ज्यात काही चटकदारपणा आहे आणि संभाषणात वारंवार योजतात असे वचन म्हणजे म्हण.’ · डॉ. दुर्गा भागवत : ‘जनतेने आत्मसात केलेली उक्ती म्हणजे म्हण’ · वा. म. जोशी : ‘थोडक्यात व मधुर शब्दांत जिथे पुष्कळ बोधप्रद अर्थ गोवला जातो, त्या वाक्यांना म्हणी असे म्हणतात.’ या चांगल्या वार्षिक उपक्रमाबद्दल लोकसत्ताचे अभिनंदन !!

चौकस हा अगदी परिचित शब्द. तो संस्कृत ‘चतुःकष’ वरून आला आहे. त्या शब्दात असलेले चार ‘कस’ कोणते हा कुतूहलजनक प्रश्न आहे. त्याचे उत्तर एका संस्कृत श्लोकातून मिळाले. ते चार कस असे आहेत: १. हे काय आहे? २. हे झाले कसे? ३. हे कुणी केले असावे? आणि ४. याची साधनसामग्री कोणती ? ह्या चार प्रश्नांची उत्तरे शोधू पाहणारा तो चौकस !