एक दिलखुलास व्यक्तिमत्व हरवले: मिपा संस्थापक तात्या

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
15 May 2019 - 12:09 pm
गाभा: 

इथे असलेल्या नव्या सदस्याना कदाचित ठाऊक नसेल मिसळ पाव हे संस्थळ तात्या अभ्यंकर या कलंदर माणसाने सुरू केले.
संगीत साहित्य खादाडी अशा अनेक विषयाम्मधे उत्तम गती असलेला तात्या एक भन्नाट व्यक्तिमत्व होता . होता म्हणताना वाइट वाटतेय.
मिपच्या रुपाने आपल्या सर्वांना व्यक्त होण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ तात्याने दिले .
तात्या आणि त्याच्या मुशाफिरीवर खूप काही लिहून होईल.
बोलायला वागायला बिंदास असणारा तात्या गाण्यातला दर्दी होता. त्याने खूप ऐकले होते. तो स्वतः गायचा.
तात्या ने मिपावरचा वावर बंद केला त्यालाही बरीच वर्षे झाली. फेसबुकावर त्याने शिळोप्याची ओसरी नामक पेज सुरू केले होते तो तेथे लेखन करायचा
मिपावर विसोबा खेचर या नावाने लिहीलेल्या त्याच्या संगीतविषयक चित्रपट विषयक लेखांची जंत्री देता येईल .
https://www.misalpav.com/node/10995 देवगंधर्वांचं 'पिया कर..', थोडं गोविंदरावांचं आणि थोडं नारायणरावांचं 'मधुकर वन वन'
https://www.misalpav.com/node/2455 बसंतचं लग्न ( ही आख्खी लेखमाला आहे)
तात्याची रौषनी तर मला कित्येक संस्थळावर वाचायला मिळाली.
https://www.misalpav.com/node/1901 गोपाला मेरी करुना
https://www.misalpav.com/node/1346 काही ऍब्स्ट्रॅक्ट रागचित्रे!
https://www.misalpav.com/node/20610
https://www.misalpav.com/node/805 आज़ जाने की जि़द ना करो...

कालच तात्याच्या रौषनी धाग्यावर तात्या भेटणार नाही असे कोणाला तरी म्हणालो आणि आज तात्या गेल्याची बातमी येते हे धक्कादायक आहे.
तात्या ने मिपाला आणि मिपाकराना खूप काही दिलंय.
या धाग्यावर तात्या तुम्हाला भेटला त्या च्या काही चांगल्या आठवणी शेअर कराव्यात ही विनंती.
इश्वर मृतात्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना _/\_

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

15 May 2019 - 12:18 pm | मराठी_माणूस

विश्वास बसत नाहीय्ये. हे कसे झाले ? कधी झाले ?

एमी's picture

15 May 2019 - 12:19 pm | एमी

आदरांजली.

काय वय होतं त्यांचं आणि कसे गेले?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 May 2019 - 12:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सकाळी दहाच्या सुमारास वाट्सपवर मेसेजेस यायला सुरुवात झाली आणि धक्काच बसला. मराठी संस्थळं मुक्त असली पाहिजे, लिहिण्या बोलण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे या ध्येय-धोरणातून मिपाची ज्यांनी स्थापना केली ते तात्या अभ्यंकर, उर्फ चंद्रशेखर अभ्यंकर एक उमदं व्यक्तिमत्व. शास्त्रीय संगीत, ती घराणी, व्यक्तिचित्र, खुसखुशीत लेखन, प्रतिसाद, वाद यासोबत उत्तम लेखन करणारा मिपाकर आज गेला. अतिशय दु:ख होत आहे.

भावपूर्ण आदरांजली.

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

15 May 2019 - 12:30 pm | मदनबाण

बातमी कळल्यावर फार वाईट वाटले !
आंतरजालावर मराठी संकेस्थळांवरील एक उत्तम लेखक आणि मिपा निर्माता काळाच्या आघाताने हरपला आहे.

विजुभाऊ's picture

15 May 2019 - 12:44 pm | विजुभाऊ

तात्याच्या ब्लॉगवर त्याचे सगळे लिखाण उपलब्ध आहे

http://tatya7.blogspot.com/

प्रसाद_१९८२'s picture

15 May 2019 - 12:51 pm | प्रसाद_१९८२

भावपूर्ण आदरांजली !

राघव's picture

15 May 2019 - 12:52 pm | राघव

धक्कादायक. :-(

साबु's picture

15 May 2019 - 12:57 pm | साबु

विनम्र श्रद्धांजली !

प्रचेतस's picture

15 May 2019 - 12:58 pm | प्रचेतस

भावपूर्ण आदरांजली.

तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

तात्यांना श्रध्दांजली _/\_

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 May 2019 - 1:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो !

गवि's picture

15 May 2019 - 1:03 pm | गवि

दुःखद बातमी..

कलंत्री's picture

15 May 2019 - 1:04 pm | कलंत्री

तात्या खराखुरा कलंदर माणूस होता. ५० हे काही फार वय नव्हते.

मनाला चुटपूट लागली आहे.

परमेश्वर मृतात्म्यास शांती देवो.

पद्मावति's picture

15 May 2019 - 1:06 pm | पद्मावति

वाइट बातमी :(
विनम्र श्रद्धांजली !

पाषाणभेद's picture

15 May 2019 - 1:06 pm | पाषाणभेद

फारच दुख:दायक बातमी.
तात्यांना आदरांजली.

अवांतर : मिपावर एखादे बॅनर लावायला काहीच हरकत नव्हती.

अभिजीत अवलिया's picture

15 May 2019 - 1:11 pm | अभिजीत अवलिया

फारच वाईट बातमी.
तात्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

माहितगार's picture

15 May 2019 - 1:15 pm | माहितगार

ओह गूडनेस, माझा तात्यांचा परिचय ऑनलाईनच म्हणजे मनोगत संस्थळावरचा, मनोगतच्या लेखकांनी मराठी विकिपीडियावर सुद्धा लेखन करावे असे आवाहन करणारा आणि विकिपीडियाचे फायदे नमुद करणारा लेख मनोगतावर लिहिला . चर्चे दरम्यान विकिपीडियावर भरपूर टिकाही झाली आणि मी त्यास शक्य ती उत्तरे दिली. आक्षेप नोंदवणारी बहुतेक मंडळी नंतर थोडे थोडे का होईना मराठी विकिपीडियावर लेखन करून गेली. जोरदार आक्षेप नोंदवणार्‍यांमध्ये मला तात्या आघाडीवर होते ते आठवते. मी त्यांना उत्तर दिले आणि नंतर त्यांनी मराठी विकिपीडियावर येऊन लेखन केले.

माझी तात्यांबद्दलची तेव्हाची प्रतिमा प्र.के.अत्रेंसारखा शब्दांचा वापर करताना भीडभाड न बाळगणारा माणूस अशी होती. त्यांना मराठी विकिपीडियावर लिहिताना पाहताना खरे सांगायचे तर मनातून धास्तावलो होतो कारण त्यांनी त्यांची -ज्ञानकोशाच्या संकेतात न बसणारी- शब्द संपत्ती इतर ठिकाणच्या संकेतस्थळाप्रमाणे मराठी विकिपीडियावर मोकळी केली असती तर असा विचार मला नाही म्हणाले तरी जरासा चिंतीत करून गेला. पण माझी ती चिंता अनाठायी होती हे काही महिन्यातच मला उमगून गेले. मराठी विकिपीडियावर त्यांनी अदमासे २०० ते २५० संपादने केली असावीत मुख्यत्वे शास्त्रीय संगितातील राग आणि काही शास्त्रीय गायक यांच्या बद्दलच्या लेखांची सुरवात त्यांनी केली.

त्यांनी दुसरा ऑनलाइन संपर्क केला ते मला मराठी विकिपीडियाबद्दल मराठी विकिपीडियाच्या कक्षेत न बसणारी चर्चा करण्यासाठी मिपाचे व्यासपीठ वापरावे अशी गळ दोन तीनदा तरी घातली असेल. विकिपीडियाला कमी सेंसॉरशीपवाल्या सपोर्टची गरज भासते तसे मला तात्यांच्या संस्थळावर चर्चा करण्याचा विचार मनातून भावला कारण काही झाले तरी मनोगता प्रमाणे तात्या सेंसॉरशीपची तलवार चालवणार नाहीत हा विश्वास होता. पण मी मिपावर बर्‍याच उशीराने लिहिता झालो तो पर्यंत मिपाचे हस्तांतर झाले होते . तात्या करतील त्या पेक्षा सेंसॉरशीपची एक लेयर शक्यता अधिक राहीली तरी खूप जाच करणारी नसल्याने टिकून राहू शकलो आहे. पण मिपावर या या आग्रहाचा त्यांचा संवाद झाला तसा पुन्हा झाला नाही. एक आश्वासक व्यक्तिमत्व काळाच्या आड गेलेल ऐकुन मनाला हुरहूर लागते ती तशी लागली.

शोकसभा आयोजीत होत असल्यास या धाग्यावर कळवावे हि नम्र विनंती.

तात्या अभ्यंकर अर्थात विसोबा खेचर यांच्या मराठी विकिपीडियावरील योगदानाचा दुवा

सूर्य's picture

15 May 2019 - 1:18 pm | सूर्य

वाईट घडले. त्यांच्या आईंबद्दल कोणी बातमी सांगू शकेल का चौकशी करून. कोण सांभाळणारे आहे किंवा कसे.

विनम्र श्रद्धांजली

खूप वाईट बातमी,भावपूर्ण श्रद्धांजली

चौथा कोनाडा's picture

15 May 2019 - 1:31 pm | चौथा कोनाडा

तात्या गेले .... !
या आवलियाला एकदा भेटायचे होते, आता ते योग नाहित !
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना _/\_

प्रभाकर पेठकर's picture

15 May 2019 - 1:33 pm | प्रभाकर पेठकर

एका बंडखोर साहित्यिक नेत्याचा उदयास्त......

मृतात्म्यास विनम्र अभिवादन.

नि३सोलपुरकर's picture

15 May 2019 - 1:33 pm | नि३सोलपुरकर

फारच वाईट बातमी.
तात्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

पांथस्थ's picture

15 May 2019 - 1:42 pm | पांथस्थ

भावपूर्ण श्रद्धांजली

तुषार काळभोर's picture

15 May 2019 - 1:43 pm | तुषार काळभोर

मिपाचे संस्थापक तात्या अभ्यंकर यांना श्रद्धांजली.

गॅरी ट्रुमन's picture

15 May 2019 - 1:43 pm | गॅरी ट्रुमन

फारच वाईट बातमी. दहा वर्षांपर्यंत भरभरून आपलेपणा देणार्‍या मिसळपावचे संस्थापक तात्या अभ्यंकरांना भावपूर्ण श्रध्दांजली.

उगा काहितरीच's picture

15 May 2019 - 1:45 pm | उगा काहितरीच

श्रद्धांजली ! एक सिद्धहस्त लेखक __/\__

श्वेता२४'s picture

15 May 2019 - 1:48 pm | श्वेता२४

मिपावर मी पाककृती वाचून सदस्य झाले. त्यांची गोळयांची आमटी ही पाककृती वाचून माझ्या आजीची आठवण आली. आजी गेल्यावर मी ही आमटी मिस करायचे. पण त्यांनी लिहीलेली पाककृती करुन पाहिली आणि विशेष म्हणजे आजीची तीच चव पुन्हा चाखायला मिळाली. माझा आणि विसोबा खेचर उर्फ तात्या यांचा संपर्क आला तो इतकाच. सदर पाककृती 2008 साली लिहीली असल्याने त्यावर प्रतिक्रीया देऊन त्यांना कळविले नाही. त्यामुळे पण फार वाईट वाटले ही बातमी वाचून.

कंजूस's picture

15 May 2019 - 2:01 pm | कंजूस

अतिशय दु:ख होत आहे.

भावपूर्ण आदरांजली.

अर्पित's picture

15 May 2019 - 2:06 pm | अर्पित

मिपाचे संस्थापक तात्या अभ्यंकर यांना श्रद्धांजली.

पुष्कर's picture

15 May 2019 - 2:07 pm | पुष्कर

भावपूर्ण श्रद्धांजली!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

15 May 2019 - 2:09 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

फारच वाइट बातमी.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या नातलगांना हे दु:ख पचवायची ताकद देवो हिच त्या शंभोचरणी प्रार्थना.

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 May 2019 - 2:15 pm | ज्ञानोबाचे पैजार

बातमी वाचून फारच दु:ख झाले. एक चांगला माणूस गेला.
जिकडे असेल तिकडे तो बंडखोरीच करत असेल या बद्दल खात्री वाटते.
त्याला सदगती लाभो
पैजारबुवा,

नरेश माने's picture

15 May 2019 - 2:18 pm | नरेश माने

मिपाचे संस्थापक चंद्रशेखर अभ्यंकर यांना भावपुर्ण श्रध्दांजली!

स्मिता श्रीपाद's picture

15 May 2019 - 2:22 pm | स्मिता श्रीपाद

तात्या गेले ही बातमी वाचुन खुप धक्का बसला.
पूर्वी च्या मिपा वर तात्यांचा मुक्त वावर होता. गेल्या काही वर्षात ते इथे नव्हते.
मिपा मालक अशीच माझ्या मनात त्यांची तेव्हापासुन प्रतिमा होती.
रोज मिपा च्या मुखपृष्ठावर सुंदर सुंदर ललनांचे फोटो टाकायचे तात्या एकेकाळी :-)... आणि बहुतेक सोबत एका पदार्थाचेही..नीटसं आठवत नाही.
मिपा एकदम happening वाटायचं तेव्हा...रोज ऑफिस मधे आलं की पहिलं मिपा वर जाउन बघायचे मी की आज काय नवीन.
तात्यांसोबतच प्राजु, स्वाती दिनेश, अपर्णा ताई, रेवती, चतुरंग ही सगळी मंडळी एकदम खुप खुप जुन्या ओळखीची वाटायची.
तात्यांचा साहित्य, संगीत, खादाडी सगळेकडे मुक्त संचार होता.सगळ्या लेखांवर त्यांची आवर्जुन प्रतिक्रीया असायची.त्यांचे लेखच नव्हे तर प्रतिक्रीया वाचायला पण मला मजा यायची.
आणि प्रतिक्रीया वाचुन तात्या स्वभावाने किती मोकळे ढाकळे असतील याचा अंदाज यायचा.
माझ्या आठवणीप्रमाणे "फोटो बघुन खपलो आहे, वारलो आहे ई ई" अशी कमेंट पाककृती च्या लेखावर द्यायची सुरुवात बहुतेक तात्यांनीच केली असावी.
स्वाती दिनेश च्या सासरेबुवांनी एक लेखमाला इथे लिहिली होती. त्यांच्या संपूर्ण आयुष्यातल्या आठवणी, आत्मचरीत्रपर लेखन होतं ते.
ते लिहिणारी व्यक्ती स्वाती दिनेश चे सासरे आहेत हे शेवटच्या भागात कळलं होतं सगळ्यांना.
" आज मिसळपाव संकेतस्थळ सुरु केल्याचं सार्थक झालं" अशा आशयाची तात्यांची त्यावर काहितरी कमेंट होती त्यावर.
कौतुक करायचं तर दिलखुलास आणि शिव्या पण मोकळेपणाने द्यायच्या अशी माणसं खुप कमी असतात.
तात्या, तुमच्या आत्म्यास शांती लाभो. __/\__

विंजिनेर's picture

22 May 2019 - 12:31 am | विंजिनेर

स्वाती दिनेश च्या सासरेबुवांनी एक लेखमाला इथे लिहिली होती. त्यांच्या संपूर्ण आयुष्यातल्या आठवणी, आत्मचरीत्रपर लेखन होतं ते.

नव्या सदस्यांच्या माहिती साठी - स्मृतीगंध ही ती मालिका. मिपावर गाजली होती खूप.

मिपाचे संस्थापक तात्या अभ्यंकर यांना भावपुर्ण श्रद्धांजली !

जालिम लोशन's picture

15 May 2019 - 2:29 pm | जालिम लोशन

तात्यांना आदरपुर्ण श्रद्थांजली.

गोरगावलेकर's picture

15 May 2019 - 2:37 pm | गोरगावलेकर

भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

कापूसकोन्ड्या's picture

15 May 2019 - 2:39 pm | कापूसकोन्ड्या

फारच वाइट बातमी.
श्रध्दांजली

विजय_आंग्रे's picture

15 May 2019 - 2:55 pm | विजय_आंग्रे

मिपाचे जनक चंद्रशेखर उर्फ तात्या अभ्यंकर यांना विनम्र श्रद्धांजली !
देव त्यांच्या आत्माला शांती देवो.

मी मराठी संस्थाळांवर लिहायला लागलो तेव्हा तात्या लिहायचे बंद झाले होते. मिपावर माझा पहिला आयडी ॲक्टीवेट होत नव्हता तेव्हा त्यांना मेसेज करुन विचारले तेव्हा त्यांनी निलकांत यांना मेसेज करण्यास सांगितले. त्यांच्याशी हा एकदाच संपर्क झाला होता. तात्यांचे लेख आवडायचे. तात्यांना श्रद्धांजली!!

साती's picture

15 May 2019 - 3:01 pm | साती

धक्कादायक बातमी!
श्रद्धांजली!

प्रसाद_१९८२'s picture

15 May 2019 - 3:10 pm | प्रसाद_१९८२
प्रसाद_१९८२'s picture

15 May 2019 - 3:10 pm | प्रसाद_१९८२
नाखु's picture

15 May 2019 - 3:11 pm | नाखु

प्रत्यक्ष परिचय नव्हता, लिखाणातून,किस्, गप्पा कट्टा यातून माहिती मिळत गेली.
गोष्टीवेल्हाळ,माणसात रमणारा,मोकळाढाकळा बहुढंगी व्यक्ती असं असेल.
ज्याची जानपहचान होती आणि संपर्क होता तेच अधिक माहिती देतील

आदरांजली

मूक वाचकांची पत्रेवाला नाखु

दिनेश५७'s picture

15 May 2019 - 3:18 pm | दिनेश५७

श्रद्धांजलि .

तेजस आठवले's picture

15 May 2019 - 3:34 pm | तेजस आठवले

वाईट बातमी. भावपूर्ण आदरांजली.

अत्रुप्त आत्मा's picture

15 May 2019 - 3:41 pm | अत्रुप्त आत्मा

तात्या...! _/\_ श्रद्धांजली.

सोनल परब's picture

15 May 2019 - 3:43 pm | सोनल परब

श्रद्धांजलि .

विसुनाना's picture

15 May 2019 - 3:58 pm | विसुनाना

तात्या ऊर्फ चंद्रशेखर अभ्यंकर यांच्या अकाली निधनाने वाईट वाटले.

मराठी संस्थळांवरच्या सुरुवातीच्या (२००२ पासूनच्या) लेखकांपैकी एक प्रसिद्ध आणि कलंदर माणूस!
त्यांच्याबरोबर त्याचे कर्तुम-अकर्तुम सगळे संपले.
श्रद्धांजली.

मिपा-संस्थापक तात्या अभ्यंकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली __/\__

युयुत्सु's picture

15 May 2019 - 4:40 pm | युयुत्सु

श्रद्धांजली!

रिम झिम's picture

15 May 2019 - 4:43 pm | रिम झिम

फारच वाईट वाटले, असो तात्या अभ्यंकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

विकास's picture

15 May 2019 - 4:46 pm | विकास

आत्ता आमच्या सकाळी काही मित्रांच्या मेसेजेस मुळे ही बातमी वाचली आणि क्षणभर विश्वास बसला नाही.

तात्याला पहिल्यांदा मनोगत संस्थळावर पाहिले होते. तिथल्या शिस्तीच्या विरोधात तो त्याच्या स्वभावाप्रमाणे विरोध करायचा. तिथूनच काही जणांनी उपक्रम हे संस्थळ चालू केले. तेथे पण तो सक्रीय होता. पण परत शिस्तीचे वावडे असल्याने आणि तसेच त्याच्या डोक्यात खरेच मोकळीढाकळी वेबसाईट चालू करायचे आले आणि तशी त्याने मिसळपाव करून दाखवली. तात्याचे या संदर्भातील जे गुण होते ते खरेच एखाद्या entrepreneur ला शोभतील असे होते. त्याने नुसतेच स्थळ चालू केले नाही तर माणसेपण ओढून आणली, मैत्री केली... मराठी संस्थळ अशा पद्धतीने नावारूपाला आणणारा कदाचित तो एकोहम असावा. आणि त्या साठी तो कायम लक्षात राहील.

तात्याला भावपूर्ण श्रद्धांजली.

प्रदीप's picture

20 May 2019 - 10:36 am | प्रदीप

तात्यांचे अकाली जाणे धक्काददयक आहे. माणूस दिलदार होता, दुर्दैवाने त्याचे वाईट दिवस आले व त्यातून तो उठू शकला नाही.

ईश्वर मृतात्म्यास सद्गति देवो.

दुर्गविहारी's picture

15 May 2019 - 4:51 pm | दुर्गविहारी

कलंदर व्यक्तिमत्व काळाच्या पडद्या आड गेले. त्यांनी अश्या काही विषयावर लिहीले की क्वचितच त्यांना कोणी हात घालेल. वर त्यांच्या लिखाणाची लिंक दिलेली आहे, त्यातील घागे वाचल्यानंतर याचा प्रत्यय येईलच. हल्ली त्यांच्या लिखाणाच्या पोस्ट व्हॉटस अ‍ॅपवर फिरायच्या. असो.
एका चौफेर लिखाण करणार्‍या अवलियाला माझी श्रध्दांजल__________/\______________

सुजल's picture

15 May 2019 - 4:53 pm | सुजल

मिसळपाव चे ते जनक आहेत हे माहिती नव्हतं . माझे फेसबुक फ्रेंड आहेत . काही दिवसांपूर्वी त्यांची एक व्हाट्स अप वर पोस्ट पण फिरत होती आयुष्यभराची शिदोरी अशा पद्धतीची गणपतीत मध्ये पुजा सांगायला जातात अशी . धक्कादायक विनम्र श्रद्धांजली

बाळकृष्ण's picture

15 May 2019 - 5:06 pm | बाळकृष्ण

तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आजच त्यांचे जुने लेख वाचत असतानाच ही दुर्दैवी बातमी समजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो.

मुक्तसुनीत's picture

15 May 2019 - 5:51 pm | मुक्तसुनीत

श्रद्धांजली.

चेतन सुभाष गुगळे's picture

15 May 2019 - 6:04 pm | चेतन सुभाष गुगळे

चंद्रशेखर होतं की बिपिन?

त्याने मला tatya7@gmail.com या इमेल पत्त्यावरुन ईमेल पाठविली होती त्याखाली बिपिन अशी सही होती.

गामा पैलवान's picture

15 May 2019 - 6:24 pm | गामा पैलवान

तात्यांना शांती लाभो.

-गा.पै.

सकाळीच फोन आला,अन काय एेकतोय यावर क्षणभर विश्वासच बसेना.
तात्याला प्रत्यक्ष कधी भेटलो नाही पण १-२ वेळा फोनवर बोलणं झालेलं. तात्याशी ओळख झाली ती मनोगत संस्थळावर, मिपाच्या जन्मा आधी. त्याच्या त्या ओघवत्या पण रांगड्या लेखणीचा मी फॅन होतो. अगदी पुलंच्या रावसाहेबासारख्या मधेच येणाऱ्या दोनचार शीव्याही कानाला गोड वाटत. व्यक्तिचित्रण लिहिण्यात त्याची हातोटी होती. अनेकदा त्यात पुलंचा भास होत असे.

अलविदा तात्या.
_/\_

सौंदाळा's picture

15 May 2019 - 6:40 pm | सौंदाळा

भावपुर्ण श्रद्धांजली

भावपूर्ण श्रद्धांजली.

तिमा's picture

15 May 2019 - 6:44 pm | तिमा

बातमी जरा उशीराच कळली. अतिशय दु:खद आणि धक्कादायक! त्यांच्या अत्यंत दिलखुलास आणि बेधडक प्रतिक्रियांचा मी चाहता होतो. जिथे कुठे असतील तिथेही असेच स्वतंत्र राहोत!

तात्याला भेटायची अनेकांची खुप इच्छा होती पण खुप कमी लोक तात्याला भेटले असे दिसतयं.
या सर्व लोकांनी तात्याच्या आठवणी सांगाव्यात ही विनंती.

मैत्र's picture

15 May 2019 - 6:54 pm | मैत्र

धक्कादायक बातमी.
वाईट वाटले.

दिलखुलास कलंदर माणूस.
त्यांच्या मुळे इथे लोक जमत गेले. नवीन लेखनाला खूप प्रोत्साहन द्यायचे.
अनेक जण लिहिते झाले. वाचनीय बरंच काही मिळाले
आज बरेच ग्रुप आहेत जे मिपा मुळे बनत घडत गेले.

फार अचानक आणि लवकर गेले तात्या.
श्रद्धांजली..

माझीही शॅम्पेन's picture

15 May 2019 - 7:02 pm | माझीही शॅम्पेन

तात्याला अप्रत्यक्षरीत्या भेटलो होतो म्हणजे तो माझ्या लग्नाला बायको कडून आला होता , हेहि मला बऱ्याच कळालं , एक हरहुन्नरी ,वादळी माणूस , लेखन कौशल्यात कोणीही हात धरू शकणार नाही , एकदा / दोनदा आपण नक्की भेटूया एवढ्यावरन पुढे सरकलोच नाही. पुढे अनेक वादविवाद पुढे आल्यावर भेटावं असं वाटलं नाही , पंडित भीमसेन (अण्णा ) ह्यच्या बद्दल भरभरून लिहायचा , अण्णा गेल्यावर सैरभैर होऊन लेख लिहिला होता.
इतक्या लहान वयात आंतरजालावर लोकप्रिय असणारे व्यक्तिमत्व हरपणे हे निश्चित दुःखदायक आहे

उपयोजक's picture

15 May 2019 - 7:07 pm | उपयोजक

तात्यांना भावपूर्ण आदरांजली! _/\_

उपयोजक's picture

15 May 2019 - 7:08 pm | उपयोजक

तात्यांना भावपूर्ण आदरांजली! _/\_

उपयोजक's picture

15 May 2019 - 7:08 pm | उपयोजक

तात्यांना भावपूर्ण आदरांजली! _/\_

जव्हेरगंज's picture

15 May 2019 - 7:10 pm | जव्हेरगंज

फारच धक्कादायक बातमी :(

विनम्र श्रद्धांजली!!
_/ \_

दीपक११७७'s picture

15 May 2019 - 7:11 pm | दीपक११७७

बोका ए आज़म यांच्या नंतर ही दुसरी बातमी!

तात्यांना भावपुर्ण श्रद्धांजली

ढब्ब्या's picture

15 May 2019 - 7:22 pm | ढब्ब्या

प्रत्यक्ष परिचय नव्हता पण त्यांचे लिखाण आवडायचे.

भावपुर्ण श्रद्धांजली. _/\_

अत्रुप्त आत्मा's picture

15 May 2019 - 7:24 pm | अत्रुप्त आत्मा

मला एकदोन वेळा फोन केलावतान तात्यानी. बाकी प्रत्यक्ष भेट नव्हती झाली कधी! पण फेसबुकवर त्यांची प्रत्येक पोस्ट वाचायचो मी. गेले वर्षभर तात्या आणि धोंडोपंत आपटे फेसबुक वरून बाहेर होते त्यामुळे जागा रहीती जाणवायची प्रचंड!!! आता त्यातली एक जागा तर गेलीच कायमची. :(

या आभासी जगात , आभासी जागेत , मराठीचे स्थान बळकट करणारे , मिपाचे संस्थापक कै. तात्या अभ्यंकर यांना विनम्र श्रद्धांजली ... त्यांना बघितलं नाही पण एक मात्र नक्की त्यांनी आपल्यासारख्या बर्याच जणांना एक अशी अनमोल जागा निर्माण करून दिलीय कि त्याला या आभासी जगात कुठेच तोड नाही आहे . मिपा जसेजसे वृद्धिंगत होत जाईल , तशी तशी त्यांची महती दिगंत होत जाईल . हे लवकरात लवकर व्हावे , हि शंभू महादेवाकडे प्रार्थना ...

बाबा योगिराज's picture

15 May 2019 - 7:32 pm | बाबा योगिराज

तात्याला मी फक्त मिपावरील लेखनसाहित्यामुळेच ओळखत होतो. मध्यंतरी फार काही कानावर आलं होतं, पण मला तात्याच लिखाण फार आवडायचं म्हणून मी त्याकडे कधी लक्ष दिलं नाही. सुरवातीला मी तात्याला भेटायचा एक दोन वेळेस प्रयत्न केला होता परंतु भेट काही घडली नाही.
कुणासाठी तो कसाही असो माझ्यासाठी तरी तो माझा आवडता लेखक होता. आणि काहीही घडलेलं असलं तरी आपल्या सगळ्यांना मिपाच्या माध्यमातून एकत्र आणणारा होता. तात्याच अकस्मात आणि अश्या पद्धतीने निघून जाण फार धक्कादायक आहे.
तात्या मिसळपाव साठी खरच धन्यवाद. तुझ्या आत्म्यास शांती लाभो.
ओंम शांती शांती शांती: _____/\____

तुझ्या लेखनाचा पंखा
बाबा योगीराज.

मंदार कात्रे's picture

15 May 2019 - 7:35 pm | मंदार कात्रे

मिसळपाव.कॉम चे आद्य प्रणेते व संस्थापक आणि हरहुन्नरी लेखक चंद्रशेखर उपाख्य तात्या अभ्यंकर याना भावपूर्ण श्रद्धांजली . आज सकाळी ९ च्या सुमारास वेन्गुर्लेकर अनिरूद्ध प्रभू यान्चा फोन आला व त्यानन्तर मिपा कायप्पा समूहावर व थोबाडपुस्तकावर पोस्ट टाकली . तात्यांशी तीनचार वेळा फोनवरून बोलणे झालेले . फेसबुकवर काही काळ मित्रयादीत होते , इतका हरहुन्नरी अन हॄदयस्पर्शी लेखन करणारा लेखक माझ्या परिचयात नाही ! आदरांजली !

अकिलिज's picture

15 May 2019 - 7:47 pm | अकिलिज

बऱ्याच दिवसांत न भेटलेलं घरचंच कोणीतरी गेल्यासारखं वाटलं.
तात्यांना शांती लाभो.

शेखरमोघे's picture

15 May 2019 - 7:50 pm | शेखरमोघे

श्रद्धांजली ! __/\__

स्वाती२'s picture

15 May 2019 - 8:09 pm | स्वाती२

फारच धक्कादायक बातमी! श्रद्धांजली!

अभ्या..'s picture

15 May 2019 - 8:09 pm | अभ्या..

खरोखर वाईट बातमी,
मी मिपावर आलो तेंव्हा तात्या सक्रीय नव्हते पण त्यांचे खूप लेखन आणि प्रतिसाद वाचलेले होते. निकम्मा तम्मा तात्या किंवा बाझवलाभेंचो सारख्या शिव्या देऊन सतीसभौ(मोकलाया फेम) समोर आपली शुध्दलेखनाची हार मानणारे प्रतिसाद, अनुष्का शेट्टीचे फोटो टाकून "हिच्यावर आमचा भारी जीव" असे प्रतिसाद, थिंकमहाराष्ट्रच्या चर्चेनंतर साडेतीन टक्क्याचे ब्रॉडबॅन्ड बूड हलवून ड्रिंकमहाराष्ट्र करायला पळणारे तात्या, मिपासदस्यांशी कौटुंबिक पातळीवर गप्पाटप्पा हाणणारे रंगेल, कलंदर, संगीताचे दर्दी तात्या अशीच इमेज डोळ्यासमोर होती. मध्यंतरी काही कालावधीपुरते ते परत मिपावर लिहिते झालेली. त्यावेळी एकदा माझ्याशी संपर्कही केलेला(त्यांना माझा नंबर कुणी दिला हे अजुनही कळले नाही, आता तर बिलकुल कळणार नाही) होता. थोड्याश्या कौतुकाच्या आणि इतर गप्पानंतर सम्पर्क धंडावला. त्यानंतर तीनचार वर्षानी डायरेक्ट काल विजुभौचा रोषनीवर प्रतिसाद पाहुनच आठवण होते तो हि बातमी. विजुभउंना काय दिसले की काय स्वप्नात असे विचारावे वाटलेले पण सकाळी व्हाटसपावर सॅड न्युज कळली.
अशा आत्म्यांना शांती देवो असे आम्ही पामर काय म्हणणार. त्यांच्या दैवतासमान आण्णांच्या संगीताचा, खादाडीचा ते तृप्त मनाने आस्वाद घेत मनसोक्त बैठका रंगवोत इतकीच इच्छा.
इत्यलम

नूतन's picture

15 May 2019 - 8:31 pm | नूतन

भावपूर्ण श्रद्धांजली

अविनाशकुलकर्णी's picture

15 May 2019 - 8:47 pm | अविनाशकुलकर्णी

तात्या अभ्यंकर ठाणे पूर्व यांचे आज निधन झाले. मध्ये त्यांचा एक लेख आपल्या ग्रुपवर आला होता. ते अचानक वारले वय ५० जेमतेम
नचिकेत परांजपे शी बोललो. तो तिथेच आहे. त्याने सांगितले की सकाळी ७/७.३० वाजता गेला. त्याची आई घरात होती. तिला हलता येत नाही त्यामुळे तिने आरडाओरडा केला आणि पोलिसांनी येऊन दार फोडले. आता त्याला सिव्हिल ला नेले आहे तिकडे PM करणार आहेत. डॉक्टर म्हणाले की जोरदार हार्ट अटॅक आला होता
असो
मृतत्म्यास सद्गती लाभो

जेम्स बॉन्ड ००७'s picture

15 May 2019 - 8:49 pm | जेम्स बॉन्ड ००७

काल-परवाच रोशनी धाग्यावर तात्यासंबंधी चर्चा वाचली आणि आज अशी बातमी..

धक्कादायक आहे.

तात्या ओळख
https://youtu.be/R0aRJcLp_Z4

यमनकल्याण
https://youtu.be/UYt5vnxQpHw

सागरा प्राण तळमळला
https://youtu.be/tG06flT0N_8

राग बिहाग
https://youtu.be/toWTWN-GO5o

सोन्याचा पिंजरा
https://youtu.be/eQ-m1NKVucg

दैव ज्यात दुःखे भरता
https://youtu.be/CMh1YdWtibc

ईश्वर मृतात्म्यास शांती देवो

नीलमोहर's picture

15 May 2019 - 9:36 pm | नीलमोहर

भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

फुटूवाला's picture

15 May 2019 - 9:39 pm | फुटूवाला

तात्या अभ्यंकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.....

शशिकांत ओक's picture

15 May 2019 - 9:44 pm | शशिकांत ओक

गेले नाहीत! त्यांच्या या संस्थलाची देणगी देऊन आपल्याला सांस्कृतिक, संगीतिक, वात्रट व खुसखुशीत लेखनाचा वारसा चालवून त्यांची परंपरा चालू ठेवायची जबाबदारी सोपवली आहे...

डॉ.प्रसाद दाढे's picture

15 May 2019 - 9:47 pm | डॉ.प्रसाद दाढे

मिसळपावमुळे म्हणजे खरं तर तात्यांमुळे माझ्यासारखे अनेक जण 'लिहिते' झाले. इथे अनेक समविचारी मित्र मिळाले. रामदास, बिपीन, विजुभाऊ, भडकमकरमास्तर, चतुरंग, पिवळा डॅमबिस, केशवसुमार, धमु, प्रभाकर पेठकर आणि अर्थात स्वतः तात्या अश्या अनेक दिग्गजांनी मारलेले चौकार, षटकार आणि त्यावरच्या एकेकाच्या अफलातून प्रतिक्रिया हा सगळा एक सोहळा होता.
तात्या फॉर्ममध्ये होते तेव्हाचे धमाल किस्से इथल्या जुन्या मंडळींच्या आठवणीत आहेतच. त्या आठवणीच आता सोबत राहतील

संग्राम's picture

15 May 2019 - 9:53 pm | संग्राम

भावपूर्ण श्रद्धांजली !

अंतु बर्वा's picture

15 May 2019 - 10:43 pm | अंतु बर्वा

भावपूर्ण श्रद्धांजली...

कलंत्री's picture

15 May 2019 - 10:43 pm | कलंत्री

यह जिंदगी मेले दुनियामे कम ना होंगे, अफसोस हम ना होंगे, अशीच काहीशी प्रतिक्रिया तात्याची असेल.

आजचा दिवस खुपच हुरहूर लावणारा ठरला. आईसमोरच मुलाचा मृत्यु ही गोष्टच छळणारी आहे.

ईश्वरीच्छा बलियसी.

पिवळा डांबिस's picture

15 May 2019 - 10:45 pm | पिवळा डांबिस

अतिशय दु:ख्खद बातमी. मृतात्म्यास आदरांजली...
तात्याच्या लिखाणामुळेच तर मी मिपावर आलो. वर डॉ. दाढेंनी म्हंटल्याप्रमाणे सुरवातीच्या काळात एक इरसाल ग्रूप जमला होता.
तात्याशी चर्चा, थट्टामस्करी आणि हो, वादही भरपूर घातले.
कुणाचं काही चांगलं लिखाण अतिशय आवडलं की तो ख-प-लो, असं म्हणून त्याचा स्वतःचा हार घातलेला फोटो प्रतिसादात द्यायचा.
इतक्या लवकर ते खरं ठरेल असं अजिबात वाटलं नव्हतं...
कुणी मिपाकर गेल्याचं कळलं तर दु:ख्ख होतंच पण त्यात जर ती व्यक्ती माझ्यापेक्षा वयाने लहान असेल तर जास्त यातना होतात..
असो. ईश्वरेच्छा.

श्रीगुरुजी's picture

15 May 2019 - 10:50 pm | श्रीगुरुजी

माझा तात्यांशी व्यक्तिगत परिचय नव्हता. त्यांच्याशी कधीच संबंध आला नाही. परंतु इतर अनेकांच्या बोलण्यातून त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा परिचय झाला. मिसळपाव हे संकेतस्थळ हे त्यांचे सर्वात मोठे काम. ५० वर्षे हे काही जायचं वय नाही. फार अचानक अकाली गेले तात्या. ६ महिन्यांपूर्वीच बोका-ए-आझम आणि आता तात्या.

तात्यांच्या आत्म्यास शांती लाभो. तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

दादा कोंडके's picture

15 May 2019 - 11:15 pm | दादा कोंडके

तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

मालोजीराव's picture

15 May 2019 - 11:16 pm | मालोजीराव

तात्यांना श्रद्धांजली ...वाईट बातमी

उपाशी बोका's picture

15 May 2019 - 11:48 pm | उपाशी बोका

तात्याला विनम्र श्रद्धांजली !

कुसुमिता१'s picture

15 May 2019 - 11:51 pm | कुसुमिता१

फारच वाईट बातमी... भावपूर्ण श्रद्धांजली तात्यांना!

भंकस बाबा's picture

16 May 2019 - 12:05 am | भंकस बाबा

श्रद्धांजलि

भाग्यश्री's picture

16 May 2019 - 1:13 am | भाग्यश्री

धक्कादायक बातमी! श्रद्धांजली !

जुइ's picture

16 May 2019 - 1:26 am | जुइ

खूप दुर्दैवी बातमी. तात्या अभ्यंकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

मिसळपाव's picture

16 May 2019 - 2:17 am | मिसळपाव

"तात्याबा, 'मिसळपाव' आयडी घेतलाय. चालेल ना?" विचारल्यावर 'खुशाल घे, हे संस्थळ तुझंच आहे' असं दिलखुलासपणे सांगणारा तात्याबा गेला.....छ्या...... :-(

निशाचर's picture

16 May 2019 - 3:20 am | निशाचर

भावपूर्ण आदरांजली!

सोन्या बागलाणकर's picture

16 May 2019 - 4:14 am | सोन्या बागलाणकर

विनम्र श्रद्धांजली!

झेन's picture

17 May 2019 - 7:04 am | झेन

__/\__

निनाद's picture

17 May 2019 - 7:31 am | निनाद

धक्कादायक बातमी!

तात्याने मिपा सुरू केल्यावर आगदी आग्रहाने उपक्रमावरून येथे आणले.

चित्रगुप्त's picture

17 May 2019 - 7:40 am | चित्रगुप्त

आदल्या दिवशी संध्याकाळी का कुणास ठाऊक, कधी नव्हे अशी तात्यांची खूपच आठवण मला येत होती. त्यांचे फेसबुकाचे पान उघडले परंतु त्यात काहीच नव्हते. मग विचार केला सकाळी कुणा मिपाकराला विचारू तात्यांचे काय हालहवाल आहेत ते. पहाटे जाग आल्याआल्या मिपा उघडतो, तो तात्या गेल्याची बातमी. सुन्न, सैरभैर झालो. त्यांचेशी प्रत्यक्ष परिचय वा भेट कधीच झालेली नसली तरी मिपामुळेच मी लिहिता झालो, माझे लिखाण तात्या आवर्जून वाचायचे आणि कौतुक करायचे.
आपणा सर्वांच्या स्मरणात ते सदैव रहातील.
तात्यांच्या सौंदर्यासक्तीला भावेल, अशी एक सुंदर चित्रमय सुमनांजली लवकरच वाहण्याचा विचार आहे.

तात्यांच्या सौंदर्यासक्तीला भावेल, अशी एक सुंदर चित्रमय सुमनांजली लवकरच वाहण्याचा विचार आहे.

कराच.

कानडाऊ योगेशु's picture

17 May 2019 - 8:47 am | कानडाऊ योगेशु

अतिशय धक्कादायक बातमी!
खादाडी सदर व त्यासोबत एखाद्या सुंदर ललनेचा फोटो व सोबतची "ही आमची अनुष्का हीच्यावर आमचा फार जीव"
किंवा
फाट्यावर मारण्यात येत आहे.
चपला घाला आणि त्वरीत चालु लागा.
आणि ते सर्वात लोकप्रिय बाझवला भेंचोद
अश्यासारखे इतर शालजोडीतले खास तात्यांचेच असे ट्रेडमार्क्स होते.
व्यक्तिश: परिचय नसला तरी नेहेमी ओळख असल्यासारखेच वाटायचे.
तात्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

अभ्या..'s picture

17 May 2019 - 9:56 am | अभ्या..

आणी अनुष्का म्हणजे कोहलीचे बदक नाही, बाहुबलीतली देवसेना शेट्टी.
2007 सालीच तिच्यातला चार्म तात्यांनी ओळखला होता. तेव्हापासून मिपाच्या दिवाळी शुभेच्छा ब्यानरावर अनुष्का शेट्टी विराजमान होती

संत घोडेकर's picture

17 May 2019 - 9:02 am | संत घोडेकर

भावपूर्ण श्रद्धांजली !

भारद्वाज's picture

17 May 2019 - 9:08 am | भारद्वाज

भावपूर्ण श्रद्धांजली

चौकटराजा's picture

17 May 2019 - 9:28 am | चौकटराजा

खरे तर मी बराचसा तात्यासारखा आहे असे वाटतेय .... यमन , भीमसेन बालगंधर्व , शिव्या ,,,,मुक्त स्वभाव हे माझयाकडे आहे. मला ही व्यक्ती माझया पेक्षा १६ वर्षाने लहान आहे हे आज कळत आहे. माझा स्वभाव कितीही दिलखुलास असला तरी आपण होऊन परिचय करून घेण्याचा मात्र नाही. त्यामुळे मी विसोबा खेचर या आय डी शी परिचय करून घेतलाच नाही. मला इथे हे काही विद्वान , रसिक ,वात्रट मित्र भेटले त्याचे श्रेय नीलकांत व पर्यायाने तात्यांना जाते. सबब एक मिपावाला म्हणून अपरिचित आप्त गेल्याचे मला दुःख आहे. आत्मा बीत्मा मी काही मानत नसल्याने "सदगती " वगैरे सोडा , जिवंतपणी अभ्यंकर यांनी जे कार्य केले त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे !

जयंत कुलकर्णी's picture

17 May 2019 - 9:42 am | जयंत कुलकर्णी

.

सुधीर's picture

17 May 2019 - 9:56 am | सुधीर

२००२ मध्ये याहू चॅट आणि चॅट रूमची एक क्रेझ होती. मी कधी कधी याहू चॅट रूम्स मध्ये चॅट करायचो. पण कधीतरी २००७ मध्ये काही मराठीतले ब्लॉग्ज नजरेस पडले, तिथूनच मग मनोगत आणि मायबोली या संकेतस्थळाविषयी कळलं. मायबोलीचा पसारा जास्त होता. पण मनोगत खूपच आकर्षक वाटलं. का कुणास ठावूक मायबोलीचा इंटरफेस तितकासा आवडला नाही. मग मायबोली पेक्षा उपक्रम जास्त आवडू लागलं. कारण तिथे "त्यामानाने" फारशी बंधनं नव्हती. लोक खूप चांगल्या विषयावर चर्चा करायचे. मी वाचनमात्रच असायचो, पण चर्चा वाचायचो. बर्‍याच आयडींचा छाप होता. काहींची विद्वत्ता आवडायची. तर काहींचा व्यासंग. त्यातला एक आयडी आठवतो. तो आयडी होता सर्कीट. आणि काहींची काळजाला हात घालणारी पुलं सारखी शैली, अर्थात ती व्यक्ती होती, तात्या अभ्यंकर. तात्या आणि सर्कीटचा याराना त्यावेळेच्या सदस्यांना आठवत असेल. रोशनी सारखे लेख अर्थात उपक्रमच्या एकंदर चौकटीत बसत नव्हते. रोशनी मध्ये उत्सुकता होती आणि तात्यांची बंडखोरी वृत्ती तेव्हा आवडली होती. निलकांत-तात्यांनी मिळून रातोरात नवं संकेतस्थळ उभं केलं ते होतं 'मिसळपाव'. मी पहिल्यादिवशीच आयडी घेतला. लेख सोडा, पण प्रतिसाद तरी लिहिन का? हे माहीत नव्हतं. पण मी या संकेतस्थळाच्या पहिल्या दिवशीच आयडी बनवला. तात्याशी प्रत्यक्षात कधी संबंध आला नाही पण तात्यांच्या मिसळपावने मला अभिव्यक्त व्हायला शिकवलं हेही तितकच खर. आणि तात्यांमुळे मला थोडीफार मराठी गाणी, नाट्यसंगीत आवडू लागलं. तात्यांना शेअर बाजार पण खूप आवडायचा. आणि त्यावेळेस मला शेअर बाजाराविषयी फक्त आकर्षण होतं. संकेस्थळावर पडीक असणं परवडनारं नव्हतं, त्यामुळे पुढे संकेतस्थळावर अधनं मधनं येणं व्हायचं. मधले काही संदर्भ लागले नाहीत पण काही व्यवहारांमध्ये इतर सदश्यांशी आलेल्या कटूतेमुळे "कदाचित" तात्या मिपा सोडून गेले असावेत असा अंदाज मी बांधला. तात्या त्यांच्या 'वल्ली' चितारताना काहीसा उदास शेवट लिहायचे. तात्यांच्या स्वतःच्या कथानकाचा शेवट सुद्धा असा चटका लावून जाणारा असेल असं वाटलं नाही.

अनुप ढेरे's picture

17 May 2019 - 10:13 am | अनुप ढेरे

श्रद्धांजली! मिपामुळेच मराठीब्जालविश्वाची ओळख झाली होती.

चंबा मुतनाळ's picture

17 May 2019 - 10:51 am | चंबा मुतनाळ

तात्याना भावपूर्ण श्रद्धांजली.

आवडाबाई's picture

17 May 2019 - 11:01 am | आवडाबाई

तात्या गेले, धक्का बसला.
मिसळपाव सुरू केले तेव्हा मनोगतवर संदेश करून इकडचे सदस्यत्व घेण्याचा आग्रह केला होता.

बंडखोर आहेत हे तर दिसतच होते, पण किती बंडखोर आहेत हे इथे आल्यावरच कळले. कधी त्यांचे म्हणणे पटायचे, अनेकदा नाही. शिवराळपणा जास्त झाला की कित्येक आठवडे मग फिरकायचे नाही इकडे. पण शेवटी यावेच लागायचे, काहीतरी छान लेखन तेवढ्यात मिस झाले असेल ह्याची जवळ जवळ खात्री असायची.
काहीतरी वेगळाच बिनधास्तपणा होता इथे. असो.

तात्यांचे वय एवढे कमी असेल ह्याची कल्पना नव्हती. त्यांच्या आईंबद्दल वाचून तर दु:खाला काळजीची किनार लागली. (त्यांच्यासाठी काही आर्थिक मदत गोळा होत असेल तर नक्की आवडेल भर घालायला.)

तात्यांना श्रद्धांजली ..

सूर्यपुत्र's picture

17 May 2019 - 11:34 am | सूर्यपुत्र

तात्यांना श्रद्धांजली!

माझा आणि त्यांचा व्यक्तिशः संपर्क फक्त आयडी अ‍ॅक्टिव्हेट करण्यापुरता झाला होता. त्यांच्या लेखनाचा पंखा आहे.

-सूर्यपुत्र.

उपेक्षित's picture

17 May 2019 - 11:36 am | उपेक्षित

अशावेळी काय बोलाव खरच समजत नाही.

फेसबुकावरती ओळख होती आणि २ वेळी बोलणे पण झाले, घरातले कोणीतरी गेल्यासारखे वाटत आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

ज्ञान's picture

17 May 2019 - 11:52 am | ज्ञान

दुःखद बातमी..

अनन्त अवधुत's picture

17 May 2019 - 12:17 pm | अनन्त अवधुत

ईश्वर त्यांना सद्गती देवो. त्यांचे लेख त्यांच्या ब्लॉगवर वाचले आहेत.

इरामयी's picture

17 May 2019 - 12:22 pm | इरामयी

मिसळपाववर बऱ्यापैकी नवी असल्याने मला तात्यांंबद्दल काही माहित नव्हतं. ते त्यांच्या मृत्यूमुळे कळलं हे फार वाईट वाटतं. ईश्वर त्यांच्या पुण्ण्यात्म्याला सद्गती देवो ही प्रार्थना.

नेत्रेश's picture

17 May 2019 - 12:38 pm | नेत्रेश

जुन्या काळात रमणारा हरहुन्नरी माणुस.
जिद्दीने मिसळपाव चालु करुन यशस्वी करुन दाखवले.
तात्यांना श्रद्धांजली =/\=

मैं क्या कई लोग तात्या को रुबरु जानते थे ..उनसे कई बार मुलाकात भी हुई २००८ - २००९ के दरमीयान !वोह दौर हि कुछ और था नायाब दौर ! तात्याके वजह से कईयोंके कलम, तीर - कमान की तरह तरकश से बाहर निकाले जाते और लफ्जोंमे पिरोए जातें.. उन्होंने कईयों को लिखना सिखाया और कईयोंको अच्छा पढना | तात्याने लिखे लेख पढना एक मेजवानी हुआ करती .. तात्या मेजबान और हम सब मेहमान :-) और उन्ही के वजह से मिसलपाव याने आला दर्जे की मेजवानी !! कई लेखकों की एक से एक नायाब तहरीर हमें पढने मिलती और उससे भी ज्यादा उसपर आए हुए एक से एक कमेंट्स याने प्रतिसाद पढना याने Intellectual मेजवानी !
खैर, तात्या जिंदगी के उतार और चढाव बहोत देख चुके थे उस वजह से अज़ीम बनना मुश्किल था लेकीन अजी़ज़ जरुर थे.. उन्हें नसीब ने साथ नहीं दिया शायद उस वजह से दिलफरेबी भी हो गएं लेकीन दिलकश जरुर बनें रहे . माली हालात Financial Situation के वजह से गमगीन थे लेकीन फिर भी लिखते बहोत हि बढिया थे ..आला किस्म की उनकी कलम बहोत हि बढिया तरीके से चलती उस कलम को सलाम !! खुदा ने उन्हें कई फन (कलाओं) से नवाजा अगर वक्त साथ देता तो न जाने उडान भर के किस बुलंदी पे चले जाते | उन्होंने अपने अम्मी की काफी खिदमत की और जिसे अपने अम्मी के खिदमत का मौका मिला उसे खुदा ने और ज्यादा तकलीफ नहीं दी ..खुदा की मर्जी , अपने तरफ जल्द हि बुला लिया . अगर जिंदगी ने इतना बुरा बर्ताव न किया होता तो शायद Financial मामुले में दिल-फरेबी नहीं बनते |
अब खुदा से एक हि गुजारीश, ऐ खुदा, तात्याने जो कुछ जाने - अनजाने गुनाह किए उन सारे गुनाहोंको बक्श दें और उनके बुजुर्ग अम्मी को हौ हिम्मत दें के वोह इस गम बर्दाश्त कर सकें आमीन !! Allah Does not Burden a Soul with more than it can bear : Al-Quran 2:286
अल्लाह, तुम तो गफ्फुरो रहीम हो . तात्या की रुहपर रहमत नाजील फरमा , उनकी रुह को सुकून दें ! अल्लाह उनकी बुजुर्ग अम्मी जो अब भी इस दुनिया में है उनकी हिफाजत फरमा . आमीन !!
~ तात्या के खातीर १० साल बाद मिसलपाव पे कदम रखनेवाली 'वाहीदा'
(विजू भाऊ तुम्हारे लिए वही प्रतिसाद यहां पर भी लिख रही हुं .. अब कलम टुटती हुई सी लग रही है जो लिखता था वोह चला गया ...)

उस खुशनुमा माहौल को सलाम ! उस खुशनुमा नूर की शुरुवात जिसने की उनकी रुह को , तात्या की रुह को सलाम !!
उनकी रुह फरेबी नहीं थी वोह बेचारे वक्त के मारे थे. अगर वक्त ने सही वक्तपे करवट ली होती तो वोह दौर आज भी बरकरार होता.
खैर अब जो भी था जैसा भी था तात्या शख्स दिल का अमीर था यह बात तो हम नहीं नकार सकतें | उन्ही के वजह से हमारी कई आला writer हस्तीयों के articles से मुलाकात हो पायी जैसे के आप , रामदास काका , प्रभूसर , बिपीन कार्यकर्ते, पिवळा डैंबिस , प्राजू, राज जैन , राजेंद्र बापट कितनोंकी किताबें छपी और कितनोंकी सोशल मिडीयापे एक नई पहेचान बन के उभरें. कितने तो आजभी यु-टुब्स पे एक नए इतमाद confidence से घुम रहे हैं ..यह बिल्कुल तात्या की और मिसलपाव कि हि देन हैं. we can never forget what Tatya and 'Misalpav' has given all of us indirectly.
~ वाहीदा

टीपीके's picture

17 May 2019 - 1:22 pm | टीपीके

फारच वाईट झाले.
२००८ ला मी भारताबाहेर गेलो. दिवाळी मध्ये मटा वाचताना ऑनलाईन दिवाळी अंकांचा लेख वाचनात आला, त्यात मराठी आंतरजाल याची ओळख झाली. मला वाटते पहिल्याच वर्षी मिपाने दिवाळी अंक काढला होता.
पहिली काही वर्षे तात्यांचा वावर जबरजस्त होता, त्यांचे लिखाण, प्रतिक्रिया , व्यक्त होणे जानवण्या इतके मोकळे होते, आणि विषयांची व्याप्ती तर फार होती. मला वाटते रामदास यांच्या नंतर इतके अनुभव असणारे मराठी आंतरजालावर फार कमी लोक असतील.
झाले ते वाईट झाले, तात्यांना श्रद्धांजली

ट्रम्प's picture

17 May 2019 - 3:47 pm | ट्रम्प

मनःपूर्वक श्रद्धांजलि !!
/\ /\

प्रमोद देर्देकर's picture

17 May 2019 - 4:32 pm | प्रमोद देर्देकर

तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

स्वाती दिनेश's picture

17 May 2019 - 5:00 pm | स्वाती दिनेश

वाईट बातमी,
स्वाती

प७९'s picture

17 May 2019 - 5:44 pm | प७९

__/\__

शिव कन्या's picture

17 May 2019 - 8:57 pm | शिव कन्या

गेले दोन दिवस तात्यांचे लेखन मिळेल तिथून वाचत आहे.
अशा सच्च्या माणसाने, आमच्या सारख्या मराठी मुलुखापासून हज्जारो मैल दूर राहणाऱ्याना मराठीशी बांधून ठेवले.
मिपा म्हणजे हक्काने लिहिण्याचे माहेरघर. या माहेर रातला बापमाणूस गेला.
कायम हुरहूर.

vcdatrange's picture

17 May 2019 - 10:38 pm | vcdatrange

फेसबुकवर सुपर अॅक्टीव असणार्‍या अपेक्षित मंडळींचे तात्यावरचे मृत्युलेख वाचुन आठवण झाली ती अश्याच एका शापित गंधर्वाची.
संगमनेरातल्या नव्याने वयात येवु घातलेल्या सर्वांना जणु चंद्रशेखर चौकात हजेरी लावल्याशिवाय मिसरुड फुटत नाही , याकारणे आमची पहिली ओळख झाली. .इनमिन काही महिने सुरु झालेल्या आयुर्वेद कॉलेजला अॅडमिशन घेवुन संगमनेरला आला होता. पण त्या थोड्या काळातही तो लक्षात राहिला. पुण्यात शिकायला आल्यावर हा आमचा सिनियर. सु शिच्या दुनियादारीचा अंमल डोक्यात होताचं, त्यात नेमकं सदाशिवातच वर्दळ असल्याने टुकारगिरी या समवाय संबंधाने आमचं लगेचच सूत जुळलं. हडपसरहुन जीप घेवुन यायचा हा. या गाडीतल्या टेपरेकॉर्डरवर मल्लिका शेखचं ' तू तलम अग्निचं पातं' हजार वेळा तरी ऐकलं असेल. . जे काही करायचा ते जीव ओतुन. . आमच्या क्लासचे सर्वजण भर पावसात भुशी डॅमला गेलो होतो. हा आमच्या आधी मोटारसायकलवर तिथे हजर. . .

मध्येच अभ्यासाचं भूत संचारलं , मग आयुर्वेदाचा अभ्यास , मास्तरशी घसट , तीही इतकी मास्तरच्या नव्या कोर्‍या आयकॉनची चावी याच्याकडेच असायची. . . मग अध्यात्म . . . वारी . . सगळं सगळं.

खुनशीवर सदा शिवातच भलं थोरलं चकाचक क्लिनिक टाकलं. आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या जाणार्‍या क्लिनिकल मिटिंगला मान्यवर लेक्चरर म्हणून शेवटचा कधीतरी भेटला. .

अन् मग अदृश्य झाला. . कायमचा।

सुनील's picture

18 May 2019 - 7:16 pm | सुनील

त्याला दोन गोष्टींचा फार शौक! एक म्हणजे गाणे आणि दुसरे खाणे!!

हे दोन्ही शौक पूर्ण करणारे शहर म्हणजे लखनौ. त्याचे आवडते. लखनौच्या रसभरीत आठवणी त्याच्याच तोंडून ऐकाव्यात. अशीच लखनौची एक खासियत म्हणजे हलीम!

दहा वर्षे झाली ह्या गोष्टीला आता.

एकदा घरी हलीम करण्याचा घाट घातला होता. आणि अगदी योगायोगाने म्हणा वा अन्य काही, पण तात्या घरी आला. ग्लेन कुळातील कुठलीशी स्कॉच घरी होतीच. आग्रह झाला.

परंतु, हलीम हा अगदी निगुतीने करण्याचा पदार्थ! तिथे घाई-गडबड करून चालत नाही. पदार्थच बिघडतो. आणि इथे त्याला फार काळ थांबता येणार नव्हते. जाणे भागच होते. आणि तसा तो निघालादेखिल. पण, एकदा अगदी ठरवून, हलीम-स्कॉचचा बेत करायचा, हे पक्के ठरवूनच!

दुसर्‍या दिवशी मिपावर फोटो चढवला आणि त्याची प्रतिक्रिया आली - अरे, कालचा चान्स हुकला रे!

दहा वर्षे झाली. तो चान्स नंतर कधी आला नाही आणि आता तर येणारही नाही!!!

चतुरंग's picture

19 May 2019 - 7:59 am | चतुरंग

परवा बातमी ऐकून धक्का बसला. मनस्वी, हरहुन्नरी आणि बेधडक तात्याची आणि माझी वैयक्तिक भेट कधी झाली नाही. फोनवरती दोन चारदा बोलणे झाले तेवढेच.
जालावरती मराठीतून मुक्त विचार मांडता यावेत या एका बंडखोर विचारातून आणि जिद्दीतून मिसळपाव संकेतस्थळाची उभारणी तात्याने केली हे त्याचे सर्वात मोठे काम असावे आणि याचसाठी तो कायम स्मरणात राहील. तात्याला असे अकाली मरण यायला नको होते अशी चुटपुट लागून राहिली आहे.
मराठी संकेतस्थळांच्या इतिहासात मिसळपावची झणझणीत तर्री देणार्‍या तात्याला मनःपूर्वक श्रद्धांजली! __/\__
-चतुरंग

नंदू's picture

19 May 2019 - 3:21 pm | नंदू

दुःखद बातमी..

मित्रहो's picture

20 May 2019 - 9:49 am | मित्रहो

भावपूर्ण श्रद्धांजली

अनिरुद्ध.वैद्य's picture

20 May 2019 - 12:25 pm | अनिरुद्ध.वैद्य

तात्यांना श्रध्दांजली

स अर्जुन's picture

20 May 2019 - 5:43 pm | स अर्जुन

भावपूर्ण आदरांजली !

सुमीत भातखंडे's picture

21 May 2019 - 12:23 am | सुमीत भातखंडे

भावपूर्ण आदरांजली.

विंजिनेर's picture

21 May 2019 - 9:14 pm | विंजिनेर

गेल्या आठवड्यात जेव्हा व्हॉटसअ‍ॅप वर दुखःद बातमी कळाली तेव्हा धक्का बसला... त्यांच्या आईच्या परिस्थितीबद्दल विचार करवत नाहीये...
मीही मिपामुळे लिहिता झालो. मिपामुळेच आंतरजालावर (मराठी)वाचताही झालो. पूर्वी मनोगत/उपक्रम, आता ऐसी - अश्या ओळखी झाल्या ... छान कसदार वाचायला मिळतं. मध्यंतरीच्या काळात "तात्यांच्या" मिपावर बर्‍याच घडामोडी झाल्या होत्या. आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. असो. आता तात्याही नाहीत.
ह्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करायला बरीच जूनी मंडळी आलेली दिसतायेत - बरं वाटलं एका अर्थाने.

तर्री's picture

22 May 2019 - 6:33 pm | तर्री

तात्याशी माझा परिचय ठाण्यातल्या खवय्या हॉटेलमध्ये एका समान मित्राबरोबर मिसळ मिसळ खाता खाता झाला. त्या देहाचा टेबलावरचा अर्धाच भाग हाफ शर्ट मध्ये कोंबला गेला होता. त्रिकोणी चेहरा , कंगव्या पासून फारकत घेतलेले केस , जाडगेले खांदे , बारीक आणि वेधक डोळे एवढेच दिसत होते. माझा परिचय नव्हता म्हणून मी थोडा गप्प होतो पण त्याचा तात्यावर काहीही परिणाम नव्हता. शाळू सोबती असल्याप्रमाणे तो सलगीने बोलत होता.
त्याचा तो खास आवाज , थांबून थांबून बोलणे, मोकळे दिलखुलास हसणे , शिव्यांचा मुक्त वापर , दुसर्याचा विचार पुढे नेत नेत गप्पा हाकण्याची हातोटी हे गुण विशेष माझ्या लक्षात आले होतेच.

"मिसळपाव सुरु करतोय , आय. डी. घे " तात्याने पावाचा तुकडा तर्रित बुडवत विनंती काम धमकी काम आज्ञा केली.
" अरे वाह ! कधी होणार चालू?" मी
गणपती पर्यंत होईल चालू - "तर्री आणि पाव दे रे शिवराम." तात्याला हॉटेल बरेच परिचित असावे.

दोन तीन जादा पाव आणि दोन तीनदा तर्री घेवून , चहा पिवून आम्ही उठलो. तात्याचा उर्वरित भक्कम देह त्या " तात्या " नावाला साजेसाच होता.

"आणि काय समजले विषयाचे बंधन नाही" विजार वर करत तात्या बोलत होता.

"चालू झाली साईट कि फोन करतो" बोलता बोलता गाल्याशी पोहोचलो . तेथे ही प्रदीर्घ परिचय होताच. मित्राने बिल दिले आणि कोणीतरी सोलकढी , ताक प्यायचा आग्रह केला.

" ताजी आहे का सोलकढी ? कि कालची फ्रीज मध्ये ढकललेली? तात्या ह ह हसत हसत विचारत होता जो मला उद्धटपणा वाटला.
एकदम ताजी असेल तर येतो १० मिनिटात.

आम्ही बाहेर आलो आणि तात्याने बार बनवायला घेतला आणि परत मिसळपाव.कॉम वर येण्याची दरडावणी केली . त्या आग्रहात आपण आता चांगले मित्र आहोत ही आपुलकीची भावना ओथंबून वाहत होती. मिसळपाव.कॉम हे तात्याचे जणू स्वप्न होते जे सत्यात येवू घातले जात होते.

पुढे काही दिवसातच मिसळपाव.कॉम सुरु झाले. मी तर्री बनून जो आलो तो येथलाच झालो. आज १२ वर्षे , १ तप होते आहे पण मिपा ची नशा उतरली नाही. धन्यवाद तात्या !!!

सुरवातीचे दिवस अक्षरशः सुगीचे होते. तात्याने मधुकर वृत्तीने जमवलेले लेखक मित्र होते आणि ते सगळे प्रचंड धुमाकूळ घालत होते. ऑफिस मध्ये काम कमी असेल तेंव्हा आणि प्रसंगी कामात टंगळमंगळ करून सुद्धा मिपा वर पडीक राहणे सुरु होते. तात्या संगीतातले दर्दी होते हा आमची मैत्री जुळणारा आणखी एक बंध तयार झाला.
असे एकंदर सुरु असताना तात्याचा परिचय वाढला आणि त्याच्या स्वभावाची दुखरी बाजू दिसू लागली. आज तो गेल्यावर लिहितो आहे म्हणून तो विषय टाळतोय. पण माझ्या स्वभावानुसार मी त्याचाशी झालेल्या मैत्री ला लगाम घातला. त्याचीही तात्याला सवय असावी. तो त्यावाद्दल कधीही विव्हळला नाही. मित्र जोडणे आणि मित्र तुटणे हे जणू एक चक्र होते आणि तो त्यात गुरफटला होता आणी काही मित्रांना गुरफटले होते.

मीपाची मालकी लवकरच बदलली आणि प्रथमच मी तात्याला दुखावलेले पहिले. तात्याचा लेखनाचा चाहता होतो म्हणून त्याच्या ब्लॉग , फेसबुक वर होतोच. त्याचे लेखन अनामिक होवून वाचत राहिलो. आपण फारच कातडी वाचवून राहिलो कि असे नसते केले तर तात्याशी वैयक्तिक दुरावा झाला असता हे माहिती नाही. आज त्याला असे टाळल्याचे दुखः होते आहे. त्याच्या जाण्याने एक आनंदाचा अखंड वाहणारा झरा आटला आहे.

पु . ल. हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व होते आणि त्यांचे सगळे साहित्य मी वाचले आहे. ह्या जालीय जगात तात्या हा असाच एक लेखक कि त्याचे सारे लेखन मी वाचले आहे.

सावरकरांनी मराठी भाषेला अनेक शब्द रत्ने दिली. अनुदिनी, संकेतस्थळ , विदा असे अनेक शब्द येथे मिपा वर समजले. त्यातील काही तात्याने त्याच्या भाषा सिद्धीने निर्माण केलेही असतील.

तात्या एक चांगला लेखक होता . पु. ल आणि सावरकर ह्या महान लेखकांचा काही अंश तात्यात नक्की होता. गेला बाजार प्रभाव तर होताच होता.

भावपूर्ण श्रद्धांजली :(

धर्मराजमुटके's picture

22 May 2019 - 7:22 pm | धर्मराजमुटके

मला वाटते की श्री. निलकांत यांनी येथे चार शब्द लिहिल्याशिवाय ही श्रद्धांजली पुर्ण होणार नाही.
मधे घडलेला दु:खदायक आणि तापदायक प्रकार विसरुन आपण आपले चार शब्द लिहिले तर आनंद होईल.

गामा पैलवान's picture

22 May 2019 - 11:18 pm | गामा पैलवान

धर्मराजमुटके,

तुमच्याशी सहमत आहे. मात्र नीलकांत यांची इच्छा बलीयसी.

आ.न.,
-गा.पै.

मिपा आता एक साहित्यीक ठेवा झाले आहे
जिवनात, तात्यांना भावपूर्ण श्रध्दांजली!

आंजाचा बालगंधर्व गेला. त्याच्या सगळ्या बऱ्यावाईट गुणावगुणांना सलाम!