काही ऍब्स्ट्रॅक्ट रागचित्रे!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
3 Apr 2008 - 7:45 pm

II स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी प्रसन्न II

राम राम मंडळी,

आज मी थोडं तात्विक चित्रविवेचन करणार आहे!

खालील चित्रांत मला काही राग दिसले. या चित्रांना आपण 'ऍब्स्ट्रॅक्ट रागचित्रे' असं म्हणू. आपल्या हिंदुस्थानी अभिजात संगीतातली 'राग', ही पूर्णत: भावनांशी निगडीत असलेली संकल्पना आहे. एकच राग प्रत्येकाला तसाच दिसेल असं नव्हे. रागदारी संगीत किंवा एकंदरीतच कुठलीही कला, ही अनुभवायची गोष्ट आहे. कलेच्या आस्वादाबाबत प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, प्रत्येकाच्या जाणिवा वेगळ्या असतात/असू शकतात! मला जे जे राग जसे जसे दिसले, जसे भावले, ते मी माझ्या बसंतचं लग्न या लेखमालिकेत शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे! माझ्यासारखा कुणी ते अनुभव शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. परंतु नुसताच शब्दात व्यक्त केल्याने हा शोध संपत नाही, तो सुरूच असतो. कारण मुळात कुठलीही कला ही अथांग असते, त्यामुळे आयुष्यभर तिचा शोध, मागोवा घेत राहणे यातच आनंद असतो. हा शोध कधीच संपू नये असं वाटतं आणि जेव्हा हा शोध संपतो तेव्हा आपली रसिकताही संपली असं समजायला हरकत नाही!

'शब्द' हे कला व्यक्त करण्याचं एक माध्यम झालं. तसंच 'चित्रं' हेही एक कलेची अभिव्यक्ति करण्याचं माध्यम आहे. परंतु माझं मन आपल्या रागसंगीतातच अधिकाधिक गुंतलेलं असल्यामुळे बर्‍याचदा मला एखादं चित्रं पाहूनदेखील चटकन एखादा रागच डोळ्यासमोर येतो! ही माझी व्यक्तिगत जाणीव झाली. आणि त्याच जाणिवेनुसार ही चित्रं पाहताना ते ते राग डोळ्यासमोर आले आणि या चित्रांच्या जागी मला काही 'ऍब्स्ट्रॅक्ट रागचित्रं' दिसायला लागली! ही रागचित्रं मी आपल्यासोबत शेअर करत आहे, कशी वाटली ते सांगा!

आता ह्या चित्रांतलं 'ऍब्स्ट्रॅक्ट रागस्वरूप' म्हटलं म्हणजे ते समजावून सांगायला पुन्हा शब्दही आले! ते शब्द मात्र माझे बरं का मंडळी! :)

चित्रसौजन्य - आंतरजालावरून मिळालेली चित्रे.
ऍब्स्ट्रॅक्ट रागस्वरूपाची टिप्पणी-शब्दांकन - तात्या अभ्यंकर.

१)

१) हा तेजिनिधी लोहगोल मला भटियार रागाची आठवण करून देतो. प्रसन्न सकाळी कपाळाला केशरी टिळा लावलेल्या भटियाराचं राज्य असतं! भास्कर महाराजांसोबत अंबारीत बसून लालकेशरी प्रकाशकिरणांचे माणिकमोती उध़ळत हा भटियार अवतरतो! क्या केहेने! भटियारसारखा वैभवशाली राग दुसरा नाही!

२)

२) हा मुलतानी! आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातला एक स्वत:च्याच मस्तीत जगणारा राग! 'हम मुलतानी है...!' असं रगेल आणि रंगेलपणे सांगणारा! दुपारी आमरसपुरीचं यथेच्छ जेवून चांगलं ३-४ तास झोपावं, त्यानंतर उठून झकासपैकी माजुरड्या चहाची लज्जत चाखून त्या अंगावर आलेल्या दुपारच्या झोपेची धुंदी थोडी उतरवावी आणि चुना अंमळ जास्त असलेल्या १२० जाफरानी बनारसी पानाचा तोबरा भरून गाण्याच्या मैफलीत रुबाबात पुढे बसून अक्षरश: तुफ्फान जमलेला अण्णांसारख्या एखाद्या कसदार, खानदानी गवयाचा तेवढाच खानदानी मुलतानी ऐकावा! अद्भूत स्वरवैभव लाभलेला मुलतानी! खास किराणा पद्धतीचे निषादाचे तंबोरे झंकारावेत आणि मुलतानीने एका क्षणात सगळी मैफल स्वत:च्या ताब्यात घ्यावी, कह्यात घ्यावी, असा डौल त्या मुलतानीचा! आपणही एकदा हा अनुभव घेऊन पाहाच मंडळी!

एक रुबाबदार, देखणा, आणि खानदानी राग! वरील चित्रात्रला flames of forest ची आठवण करून देणारा तो डोंगर आणि त्याच्या लगतचं ते झोकदार, मस्तीभरं वळण आहे ना, ते वळण म्हणजे मुलतानी!

मंडळी, माझी एक धनश्री लेले नावाची संस्कृत विद्वान मैत्रिण आहे. तिला मी एकदा मुलतानीचा मूड समजावून सांगितला त्यावर तिने किती सुंदर ओळी रचल्या पाहा! याच ओळीं घेऊन मी मुलतानीतली एक बंदिश बांधली आहे. चढवेन कधितरी जालावर!

डाल डाल चुनडी रंग लायी
मधुर भयो हर सास
बोले अंबुवा कुजे कोयलिया
छायो री मधुमास

फुली रे बगिया, डोलत कलिया
लेहरत सौरभ, गुंजत भवरा
केसर बन मे बसंत मन मे
फुलन की अब आस!

खास करून,

केसर बन मे बसंत मन मे
फुलन की अब आस!

या शब्दांत मला मुलतानी दिसतो! आता अनायसे वसंत लागणारच आहे आणि केशराच्या बनातला तो मुलतानी येणार्‍या वसंताला मनात ठेवून फुलू पाहतो आहे, त्याचं स्वागत करू पाहतो आहे! क्या केहेने...!

३)

३) हा आमचा मारवा! हा म्हणजे केवळ अन् केव़ळ फक्त हुरहूर आणि दुसरं काही नाही! नेहमी कुठली अनामिक हुरहूर याला लागून राहिलेली असते तेच समजत नाही. या चित्रात पाहा, हा त्या समुद्राच्या किनारी बसला आहे आणि दूर क्षितिजापलिकडे जाणार्‍या सूर्याला, 'अरे थांब रे अजून जरा वेळ, इतक्यात माझी संगत सोडून जाऊ नकोस!' असं आर्तपणे सांगतो आहे. परंतु याची हाकच इतकी क्षीण आहे, की ती त्या सूर्यापर्यंत पोहोचतच नाही!

'आता जरा वेळाने अंधारून येईल!' ही भिती आहे का त्याला? की, 'काळजी कशाला? उद्या पुन्हा लख्ख उजाडणरच आहे', असा विश्वासच नाही त्याच्या ठायी?? जणू काही दिवसभर हा त्या सुर्याच्या सोबतीने किनार्‍यावर एकटाच बसला होता आणि आता तो सूर्यही याला सोडून चाललाय असंच वाटतं!

"कोकणातल्या त्या मधल्या आळीच्या ओसरीवर, भोवती माडाच्या काळ्या आकृती हालताना ती थकलेली, सुकलेली तोंड तत्वज्ञान सांगायला लागली की काळीज हादरतं!"

भाईकाकांच्या अंतुबर्व्यातल्या वरील ओळी अक्षरश: अंगावर येतात आणि मला नेहमी मारव्याचीच आठवण करून देतात!! आयुष्यभर फुरश्यासारख्या पायात गिरक्या घेणार्‍या कोकणी भाषेत पिंका टाकत हिंडणार्‍या अंतुबर्व्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी मला फक्त मारवाच दिसतो! कारण विचाराल तर ते मी सांगू शकणार नाही, कदाचित वरील चित्रं सांगू शकेल!

-- तात्या अभ्यंकर.

कलासंगीतसंस्कृतीविचारअनुभवआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Apr 2008 - 7:56 pm | llपुण्याचे पेशवेll

मारव्याचे तात्याने केलेले वर्णन आणि त्यात आयुष्याच्या संध्याकाळी मारवा आठवणार्‍या अंतु बर्व्याचे योजलेले रुपक अक्षरशः काळीज कातरून जाते. तात्या, वसंतराव मारवा फार सुंदर गायचे हो वेड लागते तो मारवा ऐकून. जेव्हा वसंतराव गेले तेव्हा 'भीमण्णा' पण म्हटले होते की 'महाराष्ट्रातला मारवा गेला'.

पुण्याचे पेशवे

सुवर्णमयी's picture

3 Apr 2008 - 8:08 pm | सुवर्णमयी

तात्या शब्दांकन मस्त झाले आहे.
कलेच्या अभिव्यक्ती एकमेकींशी निगडित असतात किंवा त्यात परस्परसंबंध शोधता येतो/ दिसू शकतो असे मी वाचले होते. त्याचे प्रत्यय आला.
सोनाली

केशवसुमार's picture

3 Apr 2008 - 10:31 pm | केशवसुमार

तात्या शब्दांकन मस्त झाले आहे.
कलेच्या अभिव्यक्ती एकमेकींशी निगडित असतात किंवा त्यात परस्परसंबंध शोधता येतो/ दिसू शकतो असे मी वाचले होते. त्याचे प्रत्यय आला.

केशवसुमार

ठणठणपाळ's picture

3 Apr 2008 - 9:12 pm | ठणठणपाळ

सुंदर लेख. लगे रहो तात्या.
तुमच्या मैत्रिणीने केलेल्या ओळी खासकरून आवडल्या. एखाद्या प्रतिभावान कवीने केल्यासारख्या वाटतात. पण मला त्या मुलतानीच्या वाटल्या नाहीत.

प्राजु's picture

4 Apr 2008 - 12:44 am | प्राजु

अहो... त्या मुलतानीच्या नहियेत.. त्या धनश्रीच्या आहेत.. :)))

तात्या,
लेख केवळ सुंदर. आणि हुरहुरणारी सांज मला जास्ती भावली. मारव्याचा मूड दाखवणारे चूक चित्र आहे ते.

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

विसोबा खेचर's picture

4 Apr 2008 - 12:49 am | विसोबा खेचर

लेख केवळ सुंदर. आणि हुरहुरणारी सांज मला जास्ती भावली.

धन्यवाद प्राजू, पण..

मारव्याचा मूड दाखवणारे चूक चित्र आहे ते.

काय चुकलं ते सांग तरी!

की तुला अचूक म्हणायचं आहे? :)

आपला,
(प्राजूचा आणि जगदीशभावजींचा मित्र!) तात्या.

प्राजु's picture

4 Apr 2008 - 12:52 am | प्राजु

अहो... अचूक मधलं अ खाल्लं मी ....

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

अविनाश ओगले's picture

3 Apr 2008 - 10:10 pm | अविनाश ओगले

केवळ अप्रतिम...

मुक्तसुनीत's picture

3 Apr 2008 - 10:32 pm | मुक्तसुनीत

आवडले. दोन्ही समर्पक वाटले.

प्रभाकर पेठकर's picture

3 Apr 2008 - 10:54 pm | प्रभाकर पेठकर

श्री. तात्या....

सुंदर छायाचित्रे. अभिनंदन.

बाकी आपल्याला रागदारीतले ** काही कळत नाही. क्षमस्व.

दिनेश५७'s picture

3 Apr 2008 - 11:02 pm | दिनेश५७

अतिशय सुंदर...
केवळ कानांना सुखावणार्‍या संगीताचे डोळ्यांना सुखावणारे रंग रसिकतेने उलगडणार्‍या तात्यांना धन्यवाद!

कोलबेर's picture

3 Apr 2008 - 11:03 pm | कोलबेर

कल्पना भन्नाट आहे. ह्यावर आता सर्किट दिगम्भा तात्या आणि जाणकार मंडळींचा एक जोरदार वाद विवाद घडू दे.
रागदारीतले ** कळत नसणार्‍या आमच्या सारख्यांना त्यातुन बरीच माहिती मिळते :)
-कोलबेर

बेसनलाडू's picture

3 Apr 2008 - 11:23 pm | बेसनलाडू

कल्पना भन्नाट आहे. ह्यावर आता सर्किट दिगम्भा तात्या आणि जाणकार मंडळींचा एक जोरदार वाद विवाद घडू दे.
रागदारीतले *ट कळत नसणार्‍या आमच्या सारख्यांना त्यातुन बरीच माहिती मिळते :)
()बेसनलाडू

सर्किट's picture

4 Apr 2008 - 12:05 am | सर्किट (not verified)

तात्या आणि दिगभ्भा, ह्या मेंदूच्या दोन बाजूंच्या प्रतिनिधीत उगाच म्या मेडुला ओबलंगोटाचे काय काम ?

नको रे बुवा ते.

चित्रे छान आहेत तात्या. मागे एकदा, रविशंकर (बहुधा रविशंकरच) वाजवताहेत, आणि हुसेन चित्रे रंगवताहेत, अशी अभिनव जुगलबंदी झाली होती. तसे आता म्युझियम मधल्या प्रत्येक चित्रासमोर तुझे गाणे ठेवावे, असे वाटते.

- सर्किट

कोलबेर's picture

4 Apr 2008 - 12:56 am | कोलबेर

उगाच मी कशाला???

चक्क सर्किट राव लाजतायत? अरेच्या.. गेंड्याच्या कातडीवर चक्क फिकट गुलाबी रंगाची छटा आल्याचा भास होतो आहे आम्हाला! :)))

आणि मेड्युला ओबलंगोटा शिवाय माणसाची 'मज्जासंस्था' तरी कशी पूर्ण होणार? थोडक्यात तुमच्या सहभागा शिवाय काय 'मज्जा' येणार?? :))
तेव्हा होउन जाऊदेच..

(गेंडास्वामी मज्जातंतू) कोलबेर

सर्किट's picture

4 Apr 2008 - 1:05 am | सर्किट (not verified)

अरेच्या.. गेंड्याच्या कातडीवर चक्क फिकट गुलाबी रंगाची छटा आल्याचा भास होतो आहे आम्हाला! :)))

ही अशी ??

(आमच्या शेजारचा छोटा कोलबेर किती गोंडस दिसतोय, नाही ?)

- (लाजाळू) सर्किट

कोलबेर's picture

4 Apr 2008 - 1:09 am | कोलबेर

हा हा हा.. अहो मी फिकट गुलाबी म्हंटलं होत हो...
असो..तुम्ही पाठवलेल्या चित्राचे नाव तर 'संजोपराव आणि अजानुकर्ण' असं दिसतय !!
दोघे मिळून तात्यांना भेटायला चालले आहेत असं वाटत आहे :)))
कृपया भलतेच हलके घ्या रे....
- कोलबेर

सर्किट's picture

4 Apr 2008 - 1:11 am | सर्किट (not verified)

तुम्ही पाठवलेल्या चित्राचे नाव तर 'संजोपराव आणि अजानुकर्ण' असं दिसतय !!

:-) :-)

वरचे चित्र पाहून मला भैरवीची आठवण झाली...

मंडळी, आमची दमदार भैरवी, अशाच लहान सहान रागांना सोबत घेऊन जाते, बरं का ?

फुल गेंडवा ना मारो...

आहा हा, क्या कहने !!

- सर्किट

मुक्तसुनीत's picture

4 Apr 2008 - 3:24 am | मुक्तसुनीत

माझा वाचताना गोंधळ उडाला. ओबामाच्या भाषणाची आणि "अंतर्पटाची " एकदम आठवण झाली. "फ्रॉइडीयन स्लीप" का कायशीशी ती हीच असावी ! ;-)

नंदन's picture

4 Apr 2008 - 3:05 am | नंदन

शब्दांकन आवडले. शेवटचे चित्र पाहून मारव्यासोबतच अपूर्वाईतले 'पूरिया धनश्री'चे वर्णन आठवले.
मुलतानीचे चित्रही सुरेख आहे. ग्रेसच्या एका कवितेत अशा ओळी आहेत -

कंठांत दिशांचे हार, निळा अभिसार,
वेळूच्या रानी
झाडीत दडे, देऊळ गडे,
येतसे जिथुन मुलतानी

हे असलं काही वाचलं की शास्त्रीय संगीतात आवडलं किंवा नाहीं, अशा बायनरी आवडीपलीकडे काही समजत नसल्याची खंत परत जाणवते.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मदनबाण's picture

4 Apr 2008 - 4:46 am | मदनबाण

तात्या सुंदर लेख. मला रागदारीतले काहीच कळत नाही,पण ऐकावयास मात्र आवडते.

(स्वरभास्करांचा अफाट चाहता)
मदनबाण

मीनल's picture

4 Apr 2008 - 4:48 am | मीनल

इतके दिवस साड्यांचीचेच शोरूम माहित होते.

खरे कलासंगम असे असते होय?

संगिता ,चित्रा , लिखिता आणि कला सगळ्या एकत्र जमून वायफळ बडबड नकरता काही तरी प्रॉडक्टिव्ह केलेले दिसते आहे.

Simply Great!

मीनल.

सर्किट's picture

4 Apr 2008 - 8:16 am | सर्किट (not verified)

ह ह पु वा...

- (हसरा) सर्किट

केशवराव's picture

4 Apr 2008 - 7:22 am | केशवराव

तात्यासाहेब,
विवेचनाची सुरूवात वाचून भितीच वाटत होती ; तशीच हुरहुर पण होती. राग आणि चित्रें यांची सांगड घालण्याच्या नावाखाली कधी कधी फार भयंकर प्रकार चालतात , सहनही करावे लागतात. पण आपण कमाल केलीत. 'राग-चित्रें ' अतिशय समर्पक आणि नेमका राग भाव दर्शविणारी आहेत. खास करून ---- 'मारवा'
एक छान मेजवानी मिळाली. कले प्रती आपले मन किती संवेदनशिल आहे याचा प्रत्यय आला.
धन्यवाद. - - - - - - - केशवराव.

चित्र क्र. १ -
greet1

.
.

greet3

चित्र क्र. २ -

greet9

चित्र क्र. ३ -

सांज ढले गगन तले हम कितने एकाकी हैं, छोड चले नैनों को किरनों के ये पाखी
>
>
आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना, हरिश्चंद्र ताराराणी डोम्बाघरी भरती पाणी...

वाटाड्या...'s picture

5 Apr 2008 - 1:04 am | वाटाड्या...

बर्याच दिवसांनी संगितावर लेख वाचुन आनंद झाला. ज्याला शास्त्रीय संगिताची किंमत कळली ना तो सर्वात सुखी..नाही तर मतांची भीक मागणारे कधी सुखी दिसलेत का? असच मलाही यमन गाताना समोर अक्षरशः प्रकाश दिसायला लागतो आणी मध्यरात्री भलताच आनंद होतो...काय सांगु अवस्था....छान लेख....

चतुरंग's picture

5 Apr 2008 - 2:29 am | चतुरंग

'भटियार' म्हणाल तर मला ती दूरदर्शनवर राष्ट्रीय साक्षरता मिशन अंतर्गत पूर्वी एक धून लागायची बघा 'पूऽऽरब से सूर्य उगा, ढलाऽऽ उजियारा| जागेऽ हर दिशा दिशा, जागाऽऽ जग सारा' त्याचीच आठवण झाली!
(ही रेकॉर्डिंग ची प्रत एवढी चांगली नाहीये पण ऐकता येईल...)

'मुलतानी', नावच कसलं भारदस्त आहे!!
मला वाटतं आशाबाईंचं मानापमान मधलं 'प्रेमसेवा शरण', हे ह्याच रागातलं (चू.भू.दे.घे.)

चतुरंग

विसोबा खेचर's picture

5 Apr 2008 - 9:38 am | विसोबा खेचर

रंगा,

'भटियार' म्हणाल तर मला ती दूरदर्शनवर राष्ट्रीय साक्षरता मिशन अंतर्गत पूर्वी एक धून लागायची बघा 'पूऽऽरब से सूर्य उगा, ढलाऽऽ उजियारा| जागेऽ हर दिशा दिशा, जागाऽऽ जग सारा' त्याचीच आठवण झाली!

अगदी खरं आहे. फार सुंदर क्लिप होती ही! त्यातली 'जागी हर दिशा दिशा' य शब्दांवर जी सुरावट आहे ना, तो म्हणजे अगदी टिपिकल भटियार. 'जाग जग सारा...' मधल्या 'जग' या शब्दातला कोमल रिषभ पाहा काय सुरेख आहे!

राशिदखानचा भटियारमधला एक मस्तीभरा तराणा इथे ऐक! राशिदचं गाणं खूप छान आहे. अण्णांचा आणि खास करून आमिरखासाहेबांचा त्याच्या गाण्यावर खूप प्रभाव आहे, परंतु कुठेही नक्कल नाही.

'पिया मिलन की आस' ही भटियारमधली बंदिश आमच्या माणिकताई फार छान गायच्या!

मला वाटतं आशाबाईंचं मानापमान मधलं 'प्रेमसेवा शरण', हे ह्याच रागातलं (चू.भू.दे.घे.)

हे गाणं मूळात भीमपलास रागात आहे. करिमखासाहेब हे गाणं भीमपलासातच गायचे. भीमण्णाही भीमपलासातच गातात. भीमपलासात हे गाणं छानच वाटतं, परंतु दिनानाथरावांनी ते बदलून मुलतानीत बांधलं आणि समर्थपणे गाऊनही दाखवलं! भाईकाकांचे रावसाहेब म्हणतात ना, "अहो चाल बदला की, पण अधिकार नको काय तेवढा?! :)

परंतु दिनानाथरावांचा अधिकार इतका जबरदस्त होता की संपूर्ण गाण्यावर मुलतानीची छाया ठेवून शिवाय त्यात त्यांनी मुलतानीत वर्ज्य असलेल्या शुद्ध धैवताचाही अतिशय देखणा वापर केला आहे! ही हिंम्मत दिनानाथरावच करू जाणेत. ते येरागबाळ्याचे काम नव्हे! अरे सबंध गाणं तर सोड, एकट्या 'दास' या शब्दाच्या निषादात त्यांनी अक्षरश: संपूर्ण मुलतानीचं दर्शन घडवलंय! क्या बात है!

चला, निघतो आता. तसं खूप काही सांगण्यासारखं आहे, पण बोलत बसलो तर सबंध दिवस जायचा! :)

दिनानाथरावांचं प्रेम सेवा शरण हे पद इथे ऐक!

आपला,
(दिनानाथरावांच्या थोरल्या लेकीचा भक्त!) तात्या.

ऋषिकेश's picture

5 Apr 2008 - 8:50 am | ऋषिकेश

मस्त मस्त आणि केवळ मस्त लेख :)
हा लेख म्हणजे रागदारी, गद्य, पद्य आणि प्रकाशचित्रे आवडणारे अश्या सार्‍यांनाच काहि ना काहि देणारा आहे :)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Apr 2008 - 8:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या,

संगीत आणि चित्र एकमेकांची जब्रा सांगड घातली आहे. मस्तच झालंय लेखन.
मला अनुक्रमे दोन तीन नंबरचे चित्र आणि त्यावरील भाष्य आवडले.
चित्रांवरुन......रुबाबदार, देखणा, आणि खानदानी राग! म्हणजे 'मुलतानी' राग आणि अनामिक हुरहुर म्हणजे 'मारवा' क्या बात है !!!
पहिल्यांदाच रागदारीची अशी ओळख वाचली या पुर्वी असे लेखन वाचनात नाही.

सही रे सही !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

7 Apr 2008 - 7:42 am | विसोबा खेचर

आपुलकीने वाचून प्रतिसाद देणार्‍या सर्व मंडळींचे मनापासून आभार. आपल्यासारख्यांच्यामुळेच लिहायला उत्साह येतो.

ज्यांना हा लेख, बरा-वाईट कोणताच प्रतिसाद देण्याच्या लायकीचा वाटला नाही, त्या मंडळींचेही आभार...!

काही उत्तरे -

मिराशीबुवा,

तात्या, वसंतराव मारवा फार सुंदर गायचे हो वेड लागते तो मारवा ऐकून. जेव्हा वसंतराव गेले तेव्हा 'भीमण्णा' पण म्हटले होते की 'महाराष्ट्रातला मारवा गेला'.

वसंतराव उत्तमच गायचे परंतु मला आमिरखासाहेबांचा मारवा जास्त भावतो.

दिनेशराव,

केवळ कानांना सुखावणार्‍या संगीताचे डोळ्यांना सुखावणारे रंग रसिकतेने उलगडणार्‍या तात्यांना धन्यवाद!

धन्यवाद शेठ! एक प्रयत्न करून पाहिला!

वरूणदेवा,

कल्पना भन्नाट आहे. ह्यावर आता सर्किट दिगम्भा तात्या आणि जाणकार मंडळींचा एक जोरदार वाद विवाद घडू दे.

सर्किट वगैरेसारख्या थोर (!) संगीतज्ञासोबत मी काय वाद घालणार? माझी तेवढी पात्रता नाही. मी अजून विद्यार्थी आहे! दिगम्भांसारखी थोर मंडळी मिपावर फारशी येत नाहीत!

मीनल,

संगिता ,चित्रा , लिखिता आणि कला सगळ्या एकत्र जमून वायफळ बडबड नकरता काही तरी प्रॉडक्टिव्ह केलेले दिसते आहे.

हा हा हा! धन्यवाद... :)

मुकूलराव,

नाही तर मतांची भीक मागणारे कधी सुखी दिसलेत का?

हम्म! खरं आहे...!

ऋषिकेशशेठ,

हा लेख म्हणजे रागदारी, गद्य, पद्य आणि प्रकाशचित्रे आवडणारे अश्या सार्‍यांनाच काहि ना काहि देणारा आहे

धन्यवाद रे सायबा!

-- तात्या.

सुधीर कांदळकर's picture

7 Apr 2008 - 8:22 pm | सुधीर कांदळकर

पण चित्र क्र. ३ मला पूरिया व सोहनीच्या जास्त जवळचे वाटले. अर्थात व्यक्ती तितक्या प्रकृती या नात्याने मतभिन्नता असू शकते.

सुधीर कांदळकर.