Skip to main content

एक दिलखुलास व्यक्तिमत्व हरवले: मिपा संस्थापक तात्या

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 15/05/2019 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
इथे असलेल्या नव्या सदस्याना कदाचित ठाऊक नसेल मिसळ पाव हे संस्थळ तात्या अभ्यंकर या कलंदर माणसाने सुरू केले. संगीत साहित्य खादाडी अशा अनेक विषयाम्मधे उत्तम गती असलेला तात्या एक भन्नाट व्यक्तिमत्व होता . होता म्हणताना वाइट वाटतेय. मिपच्या रुपाने आपल्या सर्वांना व्यक्त होण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ तात्याने दिले . तात्या आणि त्याच्या मुशाफिरीवर खूप काही लिहून होईल. बोलायला वागायला बिंदास असणारा तात्या गाण्यातला दर्दी होता. त्याने खूप ऐकले होते. तो स्वतः गायचा. तात्या ने मिपावरचा वावर बंद केला त्यालाही बरीच वर्षे झाली. फेसबुकावर त्याने शिळोप्याची ओसरी नामक पेज सुरू केले होते तो तेथे लेखन करायचा मिपावर विसोबा खेचर या नावाने लिहीलेल्या त्याच्या संगीतविषयक चित्रपट विषयक लेखांची जंत्री देता येईल . https://www.misalpav.com/node/10995 देवगंधर्वांचं 'पिया कर..', थोडं गोविंदरावांचं आणि थोडं नारायणरावांचं 'मधुकर वन वन' https://www.misalpav.com/node/2455 बसंतचं लग्न ( ही आख्खी लेखमाला आहे) तात्याची रौषनी तर मला कित्येक संस्थळावर वाचायला मिळाली. https://www.misalpav.com/node/1901 गोपाला मेरी करुना https://www.misalpav.com/node/1346 काही ऍब्स्ट्रॅक्ट रागचित्रे! https://www.misalpav.com/node/20610 https://www.misalpav.com/node/805 आज़ जाने की जि़द ना करो... कालच तात्याच्या रौषनी धाग्यावर तात्या भेटणार नाही असे कोणाला तरी म्हणालो आणि आज तात्या गेल्याची बातमी येते हे धक्कादायक आहे. तात्या ने मिपाला आणि मिपाकराना खूप काही दिलंय. या धाग्यावर तात्या तुम्हाला भेटला त्या च्या काही चांगल्या आठवणी शेअर कराव्यात ही विनंती. इश्वर मृतात्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना _/\_

वाचने 81990
प्रतिक्रिया 152

प्रतिक्रिया

तात्याला अप्रत्यक्षरीत्या भेटलो होतो म्हणजे तो माझ्या लग्नाला बायको कडून आला होता , हेहि मला बऱ्याच कळालं , एक हरहुन्नरी ,वादळी माणूस , लेखन कौशल्यात कोणीही हात धरू शकणार नाही , एकदा / दोनदा आपण नक्की भेटूया एवढ्यावरन पुढे सरकलोच नाही. पुढे अनेक वादविवाद पुढे आल्यावर भेटावं असं वाटलं नाही , पंडित भीमसेन (अण्णा ) ह्यच्या बद्दल भरभरून लिहायचा , अण्णा गेल्यावर सैरभैर होऊन लेख लिहिला होता. इतक्या लहान वयात आंतरजालावर लोकप्रिय असणारे व्यक्तिमत्व हरपणे हे निश्चित दुःखदायक आहे

तात्यांना भावपूर्ण आदरांजली! _/\_

तात्यांना भावपूर्ण आदरांजली! _/\_

तात्यांना भावपूर्ण आदरांजली! _/\_

बोका ए आज़म यांच्या नंतर ही दुसरी बातमी! तात्यांना भावपुर्ण श्रद्धांजली

मला एकदोन वेळा फोन केलावतान तात्यानी. बाकी प्रत्यक्ष भेट नव्हती झाली कधी! पण फेसबुकवर त्यांची प्रत्येक पोस्ट वाचायचो मी. गेले वर्षभर तात्या आणि धोंडोपंत आपटे फेसबुक वरून बाहेर होते त्यामुळे जागा रहीती जाणवायची प्रचंड!!! आता त्यातली एक जागा तर गेलीच कायमची. :(

या आभासी जगात , आभासी जागेत , मराठीचे स्थान बळकट करणारे , मिपाचे संस्थापक कै. तात्या अभ्यंकर यांना विनम्र श्रद्धांजली ... त्यांना बघितलं नाही पण एक मात्र नक्की त्यांनी आपल्यासारख्या बर्याच जणांना एक अशी अनमोल जागा निर्माण करून दिलीय कि त्याला या आभासी जगात कुठेच तोड नाही आहे . मिपा जसेजसे वृद्धिंगत होत जाईल , तशी तशी त्यांची महती दिगंत होत जाईल . हे लवकरात लवकर व्हावे , हि शंभू महादेवाकडे प्रार्थना ...

तात्याला मी फक्त मिपावरील लेखनसाहित्यामुळेच ओळखत होतो. मध्यंतरी फार काही कानावर आलं होतं, पण मला तात्याच लिखाण फार आवडायचं म्हणून मी त्याकडे कधी लक्ष दिलं नाही. सुरवातीला मी तात्याला भेटायचा एक दोन वेळेस प्रयत्न केला होता परंतु भेट काही घडली नाही. कुणासाठी तो कसाही असो माझ्यासाठी तरी तो माझा आवडता लेखक होता. आणि काहीही घडलेलं असलं तरी आपल्या सगळ्यांना मिपाच्या माध्यमातून एकत्र आणणारा होता. तात्याच अकस्मात आणि अश्या पद्धतीने निघून जाण फार धक्कादायक आहे. तात्या मिसळपाव साठी खरच धन्यवाद. तुझ्या आत्म्यास शांती लाभो. ओंम शांती शांती शांती: _____/\____ तुझ्या लेखनाचा पंखा बाबा योगीराज.

मिसळपाव.कॉम चे आद्य प्रणेते व संस्थापक आणि हरहुन्नरी लेखक चंद्रशेखर उपाख्य तात्या अभ्यंकर याना भावपूर्ण श्रद्धांजली . आज सकाळी ९ च्या सुमारास वेन्गुर्लेकर अनिरूद्ध प्रभू यान्चा फोन आला व त्यानन्तर मिपा कायप्पा समूहावर व थोबाडपुस्तकावर पोस्ट टाकली . तात्यांशी तीनचार वेळा फोनवरून बोलणे झालेले . फेसबुकवर काही काळ मित्रयादीत होते , इतका हरहुन्नरी अन हॄदयस्पर्शी लेखन करणारा लेखक माझ्या परिचयात नाही ! आदरांजली !

बऱ्याच दिवसांत न भेटलेलं घरचंच कोणीतरी गेल्यासारखं वाटलं. तात्यांना शांती लाभो.

खरोखर वाईट बातमी, मी मिपावर आलो तेंव्हा तात्या सक्रीय नव्हते पण त्यांचे खूप लेखन आणि प्रतिसाद वाचलेले होते. निकम्मा तम्मा तात्या किंवा बाझवलाभेंचो सारख्या शिव्या देऊन सतीसभौ(मोकलाया फेम) समोर आपली शुध्दलेखनाची हार मानणारे प्रतिसाद, अनुष्का शेट्टीचे फोटो टाकून "हिच्यावर आमचा भारी जीव" असे प्रतिसाद, थिंकमहाराष्ट्रच्या चर्चेनंतर साडेतीन टक्क्याचे ब्रॉडबॅन्ड बूड हलवून ड्रिंकमहाराष्ट्र करायला पळणारे तात्या, मिपासदस्यांशी कौटुंबिक पातळीवर गप्पाटप्पा हाणणारे रंगेल, कलंदर, संगीताचे दर्दी तात्या अशीच इमेज डोळ्यासमोर होती. मध्यंतरी काही कालावधीपुरते ते परत मिपावर लिहिते झालेली. त्यावेळी एकदा माझ्याशी संपर्कही केलेला(त्यांना माझा नंबर कुणी दिला हे अजुनही कळले नाही, आता तर बिलकुल कळणार नाही) होता. थोड्याश्या कौतुकाच्या आणि इतर गप्पानंतर सम्पर्क धंडावला. त्यानंतर तीनचार वर्षानी डायरेक्ट काल विजुभौचा रोषनीवर प्रतिसाद पाहुनच आठवण होते तो हि बातमी. विजुभउंना काय दिसले की काय स्वप्नात असे विचारावे वाटलेले पण सकाळी व्हाटसपावर सॅड न्युज कळली. अशा आत्म्यांना शांती देवो असे आम्ही पामर काय म्हणणार. त्यांच्या दैवतासमान आण्णांच्या संगीताचा, खादाडीचा ते तृप्त मनाने आस्वाद घेत मनसोक्त बैठका रंगवोत इतकीच इच्छा. इत्यलम

तात्या अभ्यंकर ठाणे पूर्व यांचे आज निधन झाले. मध्ये त्यांचा एक लेख आपल्या ग्रुपवर आला होता. ते अचानक वारले वय ५० जेमतेम नचिकेत परांजपे शी बोललो. तो तिथेच आहे. त्याने सांगितले की सकाळी ७/७.३० वाजता गेला. त्याची आई घरात होती. तिला हलता येत नाही त्यामुळे तिने आरडाओरडा केला आणि पोलिसांनी येऊन दार फोडले. आता त्याला सिव्हिल ला नेले आहे तिकडे PM करणार आहेत. डॉक्टर म्हणाले की जोरदार हार्ट अटॅक आला होता असो मृतत्म्यास सद्गती लाभो

काल-परवाच रोशनी धाग्यावर तात्यासंबंधी चर्चा वाचली आणि आज अशी बातमी.. धक्कादायक आहे.

तात्या ओळख https://youtu.be/R0aRJcLp_Z4 यमनकल्याण https://youtu.be/UYt5vnxQpHw सागरा प्राण तळमळला https://youtu.be/tG06flT0N_8 राग बिहाग https://youtu.be/toWTWN-GO5o सोन्याचा पिंजरा https://youtu.be/eQ-m1NKVucg दैव ज्यात दुःखे भरता https://youtu.be/CMh1YdWtibc ईश्वर मृतात्म्यास शांती देवो

तात्या अभ्यंकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.....

गेले नाहीत! त्यांच्या या संस्थलाची देणगी देऊन आपल्याला सांस्कृतिक, संगीतिक, वात्रट व खुसखुशीत लेखनाचा वारसा चालवून त्यांची परंपरा चालू ठेवायची जबाबदारी सोपवली आहे...

मिसळपावमुळे म्हणजे खरं तर तात्यांमुळे माझ्यासारखे अनेक जण 'लिहिते' झाले. इथे अनेक समविचारी मित्र मिळाले. रामदास, बिपीन, विजुभाऊ, भडकमकरमास्तर, चतुरंग, पिवळा डॅमबिस, केशवसुमार, धमु, प्रभाकर पेठकर आणि अर्थात स्वतः तात्या अश्या अनेक दिग्गजांनी मारलेले चौकार, षटकार आणि त्यावरच्या एकेकाच्या अफलातून प्रतिक्रिया हा सगळा एक सोहळा होता. तात्या फॉर्ममध्ये होते तेव्हाचे धमाल किस्से इथल्या जुन्या मंडळींच्या आठवणीत आहेतच. त्या आठवणीच आता सोबत राहतील

यह जिंदगी मेले दुनियामे कम ना होंगे, अफसोस हम ना होंगे, अशीच काहीशी प्रतिक्रिया तात्याची असेल. आजचा दिवस खुपच हुरहूर लावणारा ठरला. आईसमोरच मुलाचा मृत्यु ही गोष्टच छळणारी आहे. ईश्वरीच्छा बलियसी.

अतिशय दु:ख्खद बातमी. मृतात्म्यास आदरांजली... तात्याच्या लिखाणामुळेच तर मी मिपावर आलो. वर डॉ. दाढेंनी म्हंटल्याप्रमाणे सुरवातीच्या काळात एक इरसाल ग्रूप जमला होता. तात्याशी चर्चा, थट्टामस्करी आणि हो, वादही भरपूर घातले. कुणाचं काही चांगलं लिखाण अतिशय आवडलं की तो ख-प-लो, असं म्हणून त्याचा स्वतःचा हार घातलेला फोटो प्रतिसादात द्यायचा. इतक्या लवकर ते खरं ठरेल असं अजिबात वाटलं नव्हतं... कुणी मिपाकर गेल्याचं कळलं तर दु:ख्ख होतंच पण त्यात जर ती व्यक्ती माझ्यापेक्षा वयाने लहान असेल तर जास्त यातना होतात.. असो. ईश्वरेच्छा.

माझा तात्यांशी व्यक्तिगत परिचय नव्हता. त्यांच्याशी कधीच संबंध आला नाही. परंतु इतर अनेकांच्या बोलण्यातून त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा परिचय झाला. मिसळपाव हे संकेतस्थळ हे त्यांचे सर्वात मोठे काम. ५० वर्षे हे काही जायचं वय नाही. फार अचानक अकाली गेले तात्या. ६ महिन्यांपूर्वीच बोका-ए-आझम आणि आता तात्या. तात्यांच्या आत्म्यास शांती लाभो. तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

तात्याला विनम्र श्रद्धांजली !

फारच वाईट बातमी... भावपूर्ण श्रद्धांजली तात्यांना!

खूप दुर्दैवी बातमी. तात्या अभ्यंकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

"तात्याबा, 'मिसळपाव' आयडी घेतलाय. चालेल ना?" विचारल्यावर 'खुशाल घे, हे संस्थळ तुझंच आहे' असं दिलखुलासपणे सांगणारा तात्याबा गेला.....छ्या...... :-(

__/\__

धक्कादायक बातमी! तात्याने मिपा सुरू केल्यावर आगदी आग्रहाने उपक्रमावरून येथे आणले.

आदल्या दिवशी संध्याकाळी का कुणास ठाऊक, कधी नव्हे अशी तात्यांची खूपच आठवण मला येत होती. त्यांचे फेसबुकाचे पान उघडले परंतु त्यात काहीच नव्हते. मग विचार केला सकाळी कुणा मिपाकराला विचारू तात्यांचे काय हालहवाल आहेत ते. पहाटे जाग आल्याआल्या मिपा उघडतो, तो तात्या गेल्याची बातमी. सुन्न, सैरभैर झालो. त्यांचेशी प्रत्यक्ष परिचय वा भेट कधीच झालेली नसली तरी मिपामुळेच मी लिहिता झालो, माझे लिखाण तात्या आवर्जून वाचायचे आणि कौतुक करायचे. आपणा सर्वांच्या स्मरणात ते सदैव रहातील. तात्यांच्या सौंदर्यासक्तीला भावेल, अशी एक सुंदर चित्रमय सुमनांजली लवकरच वाहण्याचा विचार आहे.

अतिशय धक्कादायक बातमी! खादाडी सदर व त्यासोबत एखाद्या सुंदर ललनेचा फोटो व सोबतची "ही आमची अनुष्का हीच्यावर आमचा फार जीव" किंवा फाट्यावर मारण्यात येत आहे. चपला घाला आणि त्वरीत चालु लागा. आणि ते सर्वात लोकप्रिय बाझवला भेंचोद अश्यासारखे इतर शालजोडीतले खास तात्यांचेच असे ट्रेडमार्क्स होते. व्यक्तिश: परिचय नसला तरी नेहेमी ओळख असल्यासारखेच वाटायचे. तात्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

In reply to by कानडाऊ योगेशु

आणी अनुष्का म्हणजे कोहलीचे बदक नाही, बाहुबलीतली देवसेना शेट्टी. 2007 सालीच तिच्यातला चार्म तात्यांनी ओळखला होता. तेव्हापासून मिपाच्या दिवाळी शुभेच्छा ब्यानरावर अनुष्का शेट्टी विराजमान होती

भावपूर्ण श्रद्धांजली !

खरे तर मी बराचसा तात्यासारखा आहे असे वाटतेय .... यमन , भीमसेन बालगंधर्व , शिव्या ,,,,मुक्त स्वभाव हे माझयाकडे आहे. मला ही व्यक्ती माझया पेक्षा १६ वर्षाने लहान आहे हे आज कळत आहे. माझा स्वभाव कितीही दिलखुलास असला तरी आपण होऊन परिचय करून घेण्याचा मात्र नाही. त्यामुळे मी विसोबा खेचर या आय डी शी परिचय करून घेतलाच नाही. मला इथे हे काही विद्वान , रसिक ,वात्रट मित्र भेटले त्याचे श्रेय नीलकांत व पर्यायाने तात्यांना जाते. सबब एक मिपावाला म्हणून अपरिचित आप्त गेल्याचे मला दुःख आहे. आत्मा बीत्मा मी काही मानत नसल्याने "सदगती " वगैरे सोडा , जिवंतपणी अभ्यंकर यांनी जे कार्य केले त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे !

.

२००२ मध्ये याहू चॅट आणि चॅट रूमची एक क्रेझ होती. मी कधी कधी याहू चॅट रूम्स मध्ये चॅट करायचो. पण कधीतरी २००७ मध्ये काही मराठीतले ब्लॉग्ज नजरेस पडले, तिथूनच मग मनोगत आणि मायबोली या संकेतस्थळाविषयी कळलं. मायबोलीचा पसारा जास्त होता. पण मनोगत खूपच आकर्षक वाटलं. का कुणास ठावूक मायबोलीचा इंटरफेस तितकासा आवडला नाही. मग मायबोली पेक्षा उपक्रम जास्त आवडू लागलं. कारण तिथे "त्यामानाने" फारशी बंधनं नव्हती. लोक खूप चांगल्या विषयावर चर्चा करायचे. मी वाचनमात्रच असायचो, पण चर्चा वाचायचो. बर्‍याच आयडींचा छाप होता. काहींची विद्वत्ता आवडायची. तर काहींचा व्यासंग. त्यातला एक आयडी आठवतो. तो आयडी होता सर्कीट. आणि काहींची काळजाला हात घालणारी पुलं सारखी शैली, अर्थात ती व्यक्ती होती, तात्या अभ्यंकर. तात्या आणि सर्कीटचा याराना त्यावेळेच्या सदस्यांना आठवत असेल. रोशनी सारखे लेख अर्थात उपक्रमच्या एकंदर चौकटीत बसत नव्हते. रोशनी मध्ये उत्सुकता होती आणि तात्यांची बंडखोरी वृत्ती तेव्हा आवडली होती. निलकांत-तात्यांनी मिळून रातोरात नवं संकेतस्थळ उभं केलं ते होतं 'मिसळपाव'. मी पहिल्यादिवशीच आयडी घेतला. लेख सोडा, पण प्रतिसाद तरी लिहिन का? हे माहीत नव्हतं. पण मी या संकेतस्थळाच्या पहिल्या दिवशीच आयडी बनवला. तात्याशी प्रत्यक्षात कधी संबंध आला नाही पण तात्यांच्या मिसळपावने मला अभिव्यक्त व्हायला शिकवलं हेही तितकच खर. आणि तात्यांमुळे मला थोडीफार मराठी गाणी, नाट्यसंगीत आवडू लागलं. तात्यांना शेअर बाजार पण खूप आवडायचा. आणि त्यावेळेस मला शेअर बाजाराविषयी फक्त आकर्षण होतं. संकेस्थळावर पडीक असणं परवडनारं नव्हतं, त्यामुळे पुढे संकेतस्थळावर अधनं मधनं येणं व्हायचं. मधले काही संदर्भ लागले नाहीत पण काही व्यवहारांमध्ये इतर सदश्यांशी आलेल्या कटूतेमुळे "कदाचित" तात्या मिपा सोडून गेले असावेत असा अंदाज मी बांधला. तात्या त्यांच्या 'वल्ली' चितारताना काहीसा उदास शेवट लिहायचे. तात्यांच्या स्वतःच्या कथानकाचा शेवट सुद्धा असा चटका लावून जाणारा असेल असं वाटलं नाही.

तात्या गेले, धक्का बसला. मिसळपाव सुरू केले तेव्हा मनोगतवर संदेश करून इकडचे सदस्यत्व घेण्याचा आग्रह केला होता. बंडखोर आहेत हे तर दिसतच होते, पण किती बंडखोर आहेत हे इथे आल्यावरच कळले. कधी त्यांचे म्हणणे पटायचे, अनेकदा नाही. शिवराळपणा जास्त झाला की कित्येक आठवडे मग फिरकायचे नाही इकडे. पण शेवटी यावेच लागायचे, काहीतरी छान लेखन तेवढ्यात मिस झाले असेल ह्याची जवळ जवळ खात्री असायची. काहीतरी वेगळाच बिनधास्तपणा होता इथे. असो. तात्यांचे वय एवढे कमी असेल ह्याची कल्पना नव्हती. त्यांच्या आईंबद्दल वाचून तर दु:खाला काळजीची किनार लागली. (त्यांच्यासाठी काही आर्थिक मदत गोळा होत असेल तर नक्की आवडेल भर घालायला.) तात्यांना श्रद्धांजली ..

तात्यांना श्रद्धांजली! माझा आणि त्यांचा व्यक्तिशः संपर्क फक्त आयडी अ‍ॅक्टिव्हेट करण्यापुरता झाला होता. त्यांच्या लेखनाचा पंखा आहे. -सूर्यपुत्र.

अशावेळी काय बोलाव खरच समजत नाही. फेसबुकावरती ओळख होती आणि २ वेळी बोलणे पण झाले, घरातले कोणीतरी गेल्यासारखे वाटत आहे. भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

ईश्वर त्यांना सद्गती देवो. त्यांचे लेख त्यांच्या ब्लॉगवर वाचले आहेत.

मिसळपाववर बऱ्यापैकी नवी असल्याने मला तात्यांंबद्दल काही माहित नव्हतं. ते त्यांच्या मृत्यूमुळे कळलं हे फार वाईट वाटतं. ईश्वर त्यांच्या पुण्ण्यात्म्याला सद्गती देवो ही प्रार्थना.

जुन्या काळात रमणारा हरहुन्नरी माणुस. जिद्दीने मिसळपाव चालु करुन यशस्वी करुन दाखवले. तात्यांना श्रद्धांजली =/\=

मैं क्या कई लोग तात्या को रुबरु जानते थे ..उनसे कई बार मुलाकात भी हुई २००८ - २००९ के दरमीयान !वोह दौर हि कुछ और था नायाब दौर ! तात्याके वजह से कईयोंके कलम, तीर - कमान की तरह तरकश से बाहर निकाले जाते और लफ्जोंमे पिरोए जातें.. उन्होंने कईयों को लिखना सिखाया और कईयोंको अच्छा पढना | तात्याने लिखे लेख पढना एक मेजवानी हुआ करती .. तात्या मेजबान और हम सब मेहमान :-) और उन्ही के वजह से मिसलपाव याने आला दर्जे की मेजवानी !! कई लेखकों की एक से एक नायाब तहरीर हमें पढने मिलती और उससे भी ज्यादा उसपर आए हुए एक से एक कमेंट्स याने प्रतिसाद पढना याने Intellectual मेजवानी ! खैर, तात्या जिंदगी के उतार और चढाव बहोत देख चुके थे उस वजह से अज़ीम बनना मुश्किल था लेकीन अजी़ज़ जरुर थे.. उन्हें नसीब ने साथ नहीं दिया शायद उस वजह से दिलफरेबी भी हो गएं लेकीन दिलकश जरुर बनें रहे . माली हालात Financial Situation के वजह से गमगीन थे लेकीन फिर भी लिखते बहोत हि बढिया थे ..आला किस्म की उनकी कलम बहोत हि बढिया तरीके से चलती उस कलम को सलाम !! खुदा ने उन्हें कई फन (कलाओं) से नवाजा अगर वक्त साथ देता तो न जाने उडान भर के किस बुलंदी पे चले जाते | उन्होंने अपने अम्मी की काफी खिदमत की और जिसे अपने अम्मी के खिदमत का मौका मिला उसे खुदा ने और ज्यादा तकलीफ नहीं दी ..खुदा की मर्जी , अपने तरफ जल्द हि बुला लिया . अगर जिंदगी ने इतना बुरा बर्ताव न किया होता तो शायद Financial मामुले में दिल-फरेबी नहीं बनते | अब खुदा से एक हि गुजारीश, ऐ खुदा, तात्याने जो कुछ जाने - अनजाने गुनाह किए उन सारे गुनाहोंको बक्श दें और उनके बुजुर्ग अम्मी को हौ हिम्मत दें के वोह इस गम बर्दाश्त कर सकें आमीन !! Allah Does not Burden a Soul with more than it can bear : Al-Quran 2:286 अल्लाह, तुम तो गफ्फुरो रहीम हो . तात्या की रुहपर रहमत नाजील फरमा , उनकी रुह को सुकून दें ! अल्लाह उनकी बुजुर्ग अम्मी जो अब भी इस दुनिया में है उनकी हिफाजत फरमा . आमीन !! ~ तात्या के खातीर १० साल बाद मिसलपाव पे कदम रखनेवाली 'वाहीदा' (विजू भाऊ तुम्हारे लिए वही प्रतिसाद यहां पर भी लिख रही हुं .. अब कलम टुटती हुई सी लग रही है जो लिखता था वोह चला गया ...)

उस खुशनुमा माहौल को सलाम ! उस खुशनुमा नूर की शुरुवात जिसने की उनकी रुह को , तात्या की रुह को सलाम !! उनकी रुह फरेबी नहीं थी वोह बेचारे वक्त के मारे थे. अगर वक्त ने सही वक्तपे करवट ली होती तो वोह दौर आज भी बरकरार होता. खैर अब जो भी था जैसा भी था तात्या शख्स दिल का अमीर था यह बात तो हम नहीं नकार सकतें | उन्ही के वजह से हमारी कई आला writer हस्तीयों के articles से मुलाकात हो पायी जैसे के आप , रामदास काका , प्रभूसर , बिपीन कार्यकर्ते, पिवळा डैंबिस , प्राजू, राज जैन , राजेंद्र बापट कितनोंकी किताबें छपी और कितनोंकी सोशल मिडीयापे एक नई पहेचान बन के उभरें. कितने तो आजभी यु-टुब्स पे एक नए इतमाद confidence से घुम रहे हैं ..यह बिल्कुल तात्या की और मिसलपाव कि हि देन हैं. we can never forget what Tatya and 'Misalpav' has given all of us indirectly. ~ वाहीदा

फारच वाईट झाले. २००८ ला मी भारताबाहेर गेलो. दिवाळी मध्ये मटा वाचताना ऑनलाईन दिवाळी अंकांचा लेख वाचनात आला, त्यात मराठी आंतरजाल याची ओळख झाली. मला वाटते पहिल्याच वर्षी मिपाने दिवाळी अंक काढला होता. पहिली काही वर्षे तात्यांचा वावर जबरजस्त होता, त्यांचे लिखाण, प्रतिक्रिया , व्यक्त होणे जानवण्या इतके मोकळे होते, आणि विषयांची व्याप्ती तर फार होती. मला वाटते रामदास यांच्या नंतर इतके अनुभव असणारे मराठी आंतरजालावर फार कमी लोक असतील. झाले ते वाईट झाले, तात्यांना श्रद्धांजली

वाईट बातमी, स्वाती

__/\__

गेले दोन दिवस तात्यांचे लेखन मिळेल तिथून वाचत आहे. अशा सच्च्या माणसाने, आमच्या सारख्या मराठी मुलुखापासून हज्जारो मैल दूर राहणाऱ्याना मराठीशी बांधून ठेवले. मिपा म्हणजे हक्काने लिहिण्याचे माहेरघर. या माहेर रातला बापमाणूस गेला. कायम हुरहूर.

फेसबुकवर सुपर अॅक्टीव असणार्‍या अपेक्षित मंडळींचे तात्यावरचे मृत्युलेख वाचुन आठवण झाली ती अश्याच एका शापित गंधर्वाची. संगमनेरातल्या नव्याने वयात येवु घातलेल्या सर्वांना जणु चंद्रशेखर चौकात हजेरी लावल्याशिवाय मिसरुड फुटत नाही , याकारणे आमची पहिली ओळख झाली. .इनमिन काही महिने सुरु झालेल्या आयुर्वेद कॉलेजला अॅडमिशन घेवुन संगमनेरला आला होता. पण त्या थोड्या काळातही तो लक्षात राहिला. पुण्यात शिकायला आल्यावर हा आमचा सिनियर. सु शिच्या दुनियादारीचा अंमल डोक्यात होताचं, त्यात नेमकं सदाशिवातच वर्दळ असल्याने टुकारगिरी या समवाय संबंधाने आमचं लगेचच सूत जुळलं. हडपसरहुन जीप घेवुन यायचा हा. या गाडीतल्या टेपरेकॉर्डरवर मल्लिका शेखचं ' तू तलम अग्निचं पातं' हजार वेळा तरी ऐकलं असेल. . जे काही करायचा ते जीव ओतुन. . आमच्या क्लासचे सर्वजण भर पावसात भुशी डॅमला गेलो होतो. हा आमच्या आधी मोटारसायकलवर तिथे हजर. . . मध्येच अभ्यासाचं भूत संचारलं , मग आयुर्वेदाचा अभ्यास , मास्तरशी घसट , तीही इतकी मास्तरच्या नव्या कोर्‍या आयकॉनची चावी याच्याकडेच असायची. . . मग अध्यात्म . . . वारी . . सगळं सगळं. खुनशीवर सदा शिवातच भलं थोरलं चकाचक क्लिनिक टाकलं. आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या जाणार्‍या क्लिनिकल मिटिंगला मान्यवर लेक्चरर म्हणून शेवटचा कधीतरी भेटला. . अन् मग अदृश्य झाला. . कायमचा।

त्याला दोन गोष्टींचा फार शौक! एक म्हणजे गाणे आणि दुसरे खाणे!! हे दोन्ही शौक पूर्ण करणारे शहर म्हणजे लखनौ. त्याचे आवडते. लखनौच्या रसभरीत आठवणी त्याच्याच तोंडून ऐकाव्यात. अशीच लखनौची एक खासियत म्हणजे हलीम! दहा वर्षे झाली ह्या गोष्टीला आता. एकदा घरी हलीम करण्याचा घाट घातला होता. आणि अगदी योगायोगाने म्हणा वा अन्य काही, पण तात्या घरी आला. ग्लेन कुळातील कुठलीशी स्कॉच घरी होतीच. आग्रह झाला. परंतु, हलीम हा अगदी निगुतीने करण्याचा पदार्थ! तिथे घाई-गडबड करून चालत नाही. पदार्थच बिघडतो. आणि इथे त्याला फार काळ थांबता येणार नव्हते. जाणे भागच होते. आणि तसा तो निघालादेखिल. पण, एकदा अगदी ठरवून, हलीम-स्कॉचचा बेत करायचा, हे पक्के ठरवूनच! दुसर्‍या दिवशी मिपावर फोटो चढवला आणि त्याची प्रतिक्रिया आली - अरे, कालचा चान्स हुकला रे! दहा वर्षे झाली. तो चान्स नंतर कधी आला नाही आणि आता तर येणारही नाही!!!

परवा बातमी ऐकून धक्का बसला. मनस्वी, हरहुन्नरी आणि बेधडक तात्याची आणि माझी वैयक्तिक भेट कधी झाली नाही. फोनवरती दोन चारदा बोलणे झाले तेवढेच. जालावरती मराठीतून मुक्त विचार मांडता यावेत या एका बंडखोर विचारातून आणि जिद्दीतून मिसळपाव संकेतस्थळाची उभारणी तात्याने केली हे त्याचे सर्वात मोठे काम असावे आणि याचसाठी तो कायम स्मरणात राहील. तात्याला असे अकाली मरण यायला नको होते अशी चुटपुट लागून राहिली आहे. मराठी संकेतस्थळांच्या इतिहासात मिसळपावची झणझणीत तर्री देणार्‍या तात्याला मनःपूर्वक श्रद्धांजली! __/\__ -चतुरंग