Skip to main content

एक दिलखुलास व्यक्तिमत्व हरवले: मिपा संस्थापक तात्या

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 15/05/2019 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
इथे असलेल्या नव्या सदस्याना कदाचित ठाऊक नसेल मिसळ पाव हे संस्थळ तात्या अभ्यंकर या कलंदर माणसाने सुरू केले. संगीत साहित्य खादाडी अशा अनेक विषयाम्मधे उत्तम गती असलेला तात्या एक भन्नाट व्यक्तिमत्व होता . होता म्हणताना वाइट वाटतेय. मिपच्या रुपाने आपल्या सर्वांना व्यक्त होण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ तात्याने दिले . तात्या आणि त्याच्या मुशाफिरीवर खूप काही लिहून होईल. बोलायला वागायला बिंदास असणारा तात्या गाण्यातला दर्दी होता. त्याने खूप ऐकले होते. तो स्वतः गायचा. तात्या ने मिपावरचा वावर बंद केला त्यालाही बरीच वर्षे झाली. फेसबुकावर त्याने शिळोप्याची ओसरी नामक पेज सुरू केले होते तो तेथे लेखन करायचा मिपावर विसोबा खेचर या नावाने लिहीलेल्या त्याच्या संगीतविषयक चित्रपट विषयक लेखांची जंत्री देता येईल . https://www.misalpav.com/node/10995 देवगंधर्वांचं 'पिया कर..', थोडं गोविंदरावांचं आणि थोडं नारायणरावांचं 'मधुकर वन वन' https://www.misalpav.com/node/2455 बसंतचं लग्न ( ही आख्खी लेखमाला आहे) तात्याची रौषनी तर मला कित्येक संस्थळावर वाचायला मिळाली. https://www.misalpav.com/node/1901 गोपाला मेरी करुना https://www.misalpav.com/node/1346 काही ऍब्स्ट्रॅक्ट रागचित्रे! https://www.misalpav.com/node/20610 https://www.misalpav.com/node/805 आज़ जाने की जि़द ना करो... कालच तात्याच्या रौषनी धाग्यावर तात्या भेटणार नाही असे कोणाला तरी म्हणालो आणि आज तात्या गेल्याची बातमी येते हे धक्कादायक आहे. तात्या ने मिपाला आणि मिपाकराना खूप काही दिलंय. या धाग्यावर तात्या तुम्हाला भेटला त्या च्या काही चांगल्या आठवणी शेअर कराव्यात ही विनंती. इश्वर मृतात्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना _/\_

वाचने 81990
प्रतिक्रिया 152

प्रतिक्रिया

गेल्या आठवड्यात जेव्हा व्हॉटसअ‍ॅप वर दुखःद बातमी कळाली तेव्हा धक्का बसला... त्यांच्या आईच्या परिस्थितीबद्दल विचार करवत नाहीये... मीही मिपामुळे लिहिता झालो. मिपामुळेच आंतरजालावर (मराठी)वाचताही झालो. पूर्वी मनोगत/उपक्रम, आता ऐसी - अश्या ओळखी झाल्या ... छान कसदार वाचायला मिळतं. मध्यंतरीच्या काळात "तात्यांच्या" मिपावर बर्‍याच घडामोडी झाल्या होत्या. आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. असो. आता तात्याही नाहीत. ह्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करायला बरीच जूनी मंडळी आलेली दिसतायेत - बरं वाटलं एका अर्थाने.

तात्याशी माझा परिचय ठाण्यातल्या खवय्या हॉटेलमध्ये एका समान मित्राबरोबर मिसळ मिसळ खाता खाता झाला. त्या देहाचा टेबलावरचा अर्धाच भाग हाफ शर्ट मध्ये कोंबला गेला होता. त्रिकोणी चेहरा , कंगव्या पासून फारकत घेतलेले केस , जाडगेले खांदे , बारीक आणि वेधक डोळे एवढेच दिसत होते. माझा परिचय नव्हता म्हणून मी थोडा गप्प होतो पण त्याचा तात्यावर काहीही परिणाम नव्हता. शाळू सोबती असल्याप्रमाणे तो सलगीने बोलत होता. त्याचा तो खास आवाज , थांबून थांबून बोलणे, मोकळे दिलखुलास हसणे , शिव्यांचा मुक्त वापर , दुसर्याचा विचार पुढे नेत नेत गप्पा हाकण्याची हातोटी हे गुण विशेष माझ्या लक्षात आले होतेच. "मिसळपाव सुरु करतोय , आय. डी. घे " तात्याने पावाचा तुकडा तर्रित बुडवत विनंती काम धमकी काम आज्ञा केली. " अरे वाह ! कधी होणार चालू?" मी गणपती पर्यंत होईल चालू - "तर्री आणि पाव दे रे शिवराम." तात्याला हॉटेल बरेच परिचित असावे. दोन तीन जादा पाव आणि दोन तीनदा तर्री घेवून , चहा पिवून आम्ही उठलो. तात्याचा उर्वरित भक्कम देह त्या " तात्या " नावाला साजेसाच होता. "आणि काय समजले विषयाचे बंधन नाही" विजार वर करत तात्या बोलत होता. "चालू झाली साईट कि फोन करतो" बोलता बोलता गाल्याशी पोहोचलो . तेथे ही प्रदीर्घ परिचय होताच. मित्राने बिल दिले आणि कोणीतरी सोलकढी , ताक प्यायचा आग्रह केला. " ताजी आहे का सोलकढी ? कि कालची फ्रीज मध्ये ढकललेली? तात्या ह ह हसत हसत विचारत होता जो मला उद्धटपणा वाटला. एकदम ताजी असेल तर येतो १० मिनिटात. आम्ही बाहेर आलो आणि तात्याने बार बनवायला घेतला आणि परत मिसळपाव.कॉम वर येण्याची दरडावणी केली . त्या आग्रहात आपण आता चांगले मित्र आहोत ही आपुलकीची भावना ओथंबून वाहत होती. मिसळपाव.कॉम हे तात्याचे जणू स्वप्न होते जे सत्यात येवू घातले जात होते. पुढे काही दिवसातच मिसळपाव.कॉम सुरु झाले. मी तर्री बनून जो आलो तो येथलाच झालो. आज १२ वर्षे , १ तप होते आहे पण मिपा ची नशा उतरली नाही. धन्यवाद तात्या !!! सुरवातीचे दिवस अक्षरशः सुगीचे होते. तात्याने मधुकर वृत्तीने जमवलेले लेखक मित्र होते आणि ते सगळे प्रचंड धुमाकूळ घालत होते. ऑफिस मध्ये काम कमी असेल तेंव्हा आणि प्रसंगी कामात टंगळमंगळ करून सुद्धा मिपा वर पडीक राहणे सुरु होते. तात्या संगीतातले दर्दी होते हा आमची मैत्री जुळणारा आणखी एक बंध तयार झाला. असे एकंदर सुरु असताना तात्याचा परिचय वाढला आणि त्याच्या स्वभावाची दुखरी बाजू दिसू लागली. आज तो गेल्यावर लिहितो आहे म्हणून तो विषय टाळतोय. पण माझ्या स्वभावानुसार मी त्याचाशी झालेल्या मैत्री ला लगाम घातला. त्याचीही तात्याला सवय असावी. तो त्यावाद्दल कधीही विव्हळला नाही. मित्र जोडणे आणि मित्र तुटणे हे जणू एक चक्र होते आणि तो त्यात गुरफटला होता आणी काही मित्रांना गुरफटले होते. मीपाची मालकी लवकरच बदलली आणि प्रथमच मी तात्याला दुखावलेले पहिले. तात्याचा लेखनाचा चाहता होतो म्हणून त्याच्या ब्लॉग , फेसबुक वर होतोच. त्याचे लेखन अनामिक होवून वाचत राहिलो. आपण फारच कातडी वाचवून राहिलो कि असे नसते केले तर तात्याशी वैयक्तिक दुरावा झाला असता हे माहिती नाही. आज त्याला असे टाळल्याचे दुखः होते आहे. त्याच्या जाण्याने एक आनंदाचा अखंड वाहणारा झरा आटला आहे. पु . ल. हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व होते आणि त्यांचे सगळे साहित्य मी वाचले आहे. ह्या जालीय जगात तात्या हा असाच एक लेखक कि त्याचे सारे लेखन मी वाचले आहे. सावरकरांनी मराठी भाषेला अनेक शब्द रत्ने दिली. अनुदिनी, संकेतस्थळ , विदा असे अनेक शब्द येथे मिपा वर समजले. त्यातील काही तात्याने त्याच्या भाषा सिद्धीने निर्माण केलेही असतील. तात्या एक चांगला लेखक होता . पु. ल आणि सावरकर ह्या महान लेखकांचा काही अंश तात्यात नक्की होता. गेला बाजार प्रभाव तर होताच होता. भावपूर्ण श्रद्धांजली :(

मला वाटते की श्री. निलकांत यांनी येथे चार शब्द लिहिल्याशिवाय ही श्रद्धांजली पुर्ण होणार नाही. मधे घडलेला दु:खदायक आणि तापदायक प्रकार विसरुन आपण आपले चार शब्द लिहिले तर आनंद होईल.

In reply to by धर्मराजमुटके

धर्मराजमुटके, तुमच्याशी सहमत आहे. मात्र नीलकांत यांची इच्छा बलीयसी. आ.न., -गा.पै.

तात्या अभ्यंकर (विसोबा खेचर) गेले.वाईट वाटतं.

कधीतरी माझ्या त्या मित्राची गैरहजेरी जाणवते. तात्यामुळे इथे बरीच मंडळी लिहीती झाली. जिथे असशील तिथे तो नेहमीसारख्या आपल्याच मस्तीत जगत असणार हे नक्की