Skip to main content

एक दिलखुलास व्यक्तिमत्व हरवले: मिपा संस्थापक तात्या

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 15/05/2019 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
इथे असलेल्या नव्या सदस्याना कदाचित ठाऊक नसेल मिसळ पाव हे संस्थळ तात्या अभ्यंकर या कलंदर माणसाने सुरू केले. संगीत साहित्य खादाडी अशा अनेक विषयाम्मधे उत्तम गती असलेला तात्या एक भन्नाट व्यक्तिमत्व होता . होता म्हणताना वाइट वाटतेय. मिपच्या रुपाने आपल्या सर्वांना व्यक्त होण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ तात्याने दिले . तात्या आणि त्याच्या मुशाफिरीवर खूप काही लिहून होईल. बोलायला वागायला बिंदास असणारा तात्या गाण्यातला दर्दी होता. त्याने खूप ऐकले होते. तो स्वतः गायचा. तात्या ने मिपावरचा वावर बंद केला त्यालाही बरीच वर्षे झाली. फेसबुकावर त्याने शिळोप्याची ओसरी नामक पेज सुरू केले होते तो तेथे लेखन करायचा मिपावर विसोबा खेचर या नावाने लिहीलेल्या त्याच्या संगीतविषयक चित्रपट विषयक लेखांची जंत्री देता येईल . https://www.misalpav.com/node/10995 देवगंधर्वांचं 'पिया कर..', थोडं गोविंदरावांचं आणि थोडं नारायणरावांचं 'मधुकर वन वन' https://www.misalpav.com/node/2455 बसंतचं लग्न ( ही आख्खी लेखमाला आहे) तात्याची रौषनी तर मला कित्येक संस्थळावर वाचायला मिळाली. https://www.misalpav.com/node/1901 गोपाला मेरी करुना https://www.misalpav.com/node/1346 काही ऍब्स्ट्रॅक्ट रागचित्रे! https://www.misalpav.com/node/20610 https://www.misalpav.com/node/805 आज़ जाने की जि़द ना करो... कालच तात्याच्या रौषनी धाग्यावर तात्या भेटणार नाही असे कोणाला तरी म्हणालो आणि आज तात्या गेल्याची बातमी येते हे धक्कादायक आहे. तात्या ने मिपाला आणि मिपाकराना खूप काही दिलंय. या धाग्यावर तात्या तुम्हाला भेटला त्या च्या काही चांगल्या आठवणी शेअर कराव्यात ही विनंती. इश्वर मृतात्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना _/\_

वाचने 81990
प्रतिक्रिया 152

प्रतिक्रिया

आदरांजली. काय वय होतं त्यांचं आणि कसे गेले?

सकाळी दहाच्या सुमारास वाट्सपवर मेसेजेस यायला सुरुवात झाली आणि धक्काच बसला. मराठी संस्थळं मुक्त असली पाहिजे, लिहिण्या बोलण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे या ध्येय-धोरणातून मिपाची ज्यांनी स्थापना केली ते तात्या अभ्यंकर, उर्फ चंद्रशेखर अभ्यंकर एक उमदं व्यक्तिमत्व. शास्त्रीय संगीत, ती घराणी, व्यक्तिचित्र, खुसखुशीत लेखन, प्रतिसाद, वाद यासोबत उत्तम लेखन करणारा मिपाकर आज गेला. अतिशय दु:ख होत आहे. भावपूर्ण आदरांजली. -दिलीप बिरुटे

बातमी कळल्यावर फार वाईट वाटले ! आंतरजालावर मराठी संकेस्थळांवरील एक उत्तम लेखक आणि मिपा निर्माता काळाच्या आघाताने हरपला आहे.

तात्या खराखुरा कलंदर माणूस होता. ५० हे काही फार वय नव्हते. मनाला चुटपूट लागली आहे. परमेश्वर मृतात्म्यास शांती देवो.

फारच दुख:दायक बातमी. तात्यांना आदरांजली. अवांतर : मिपावर एखादे बॅनर लावायला काहीच हरकत नव्हती.

फारच वाईट बातमी. तात्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

ओह गूडनेस, माझा तात्यांचा परिचय ऑनलाईनच म्हणजे मनोगत संस्थळावरचा, मनोगतच्या लेखकांनी मराठी विकिपीडियावर सुद्धा लेखन करावे असे आवाहन करणारा आणि विकिपीडियाचे फायदे नमुद करणारा लेख मनोगतावर लिहिला . चर्चे दरम्यान विकिपीडियावर भरपूर टिकाही झाली आणि मी त्यास शक्य ती उत्तरे दिली. आक्षेप नोंदवणारी बहुतेक मंडळी नंतर थोडे थोडे का होईना मराठी विकिपीडियावर लेखन करून गेली. जोरदार आक्षेप नोंदवणार्‍यांमध्ये मला तात्या आघाडीवर होते ते आठवते. मी त्यांना उत्तर दिले आणि नंतर त्यांनी मराठी विकिपीडियावर येऊन लेखन केले. माझी तात्यांबद्दलची तेव्हाची प्रतिमा प्र.के.अत्रेंसारखा शब्दांचा वापर करताना भीडभाड न बाळगणारा माणूस अशी होती. त्यांना मराठी विकिपीडियावर लिहिताना पाहताना खरे सांगायचे तर मनातून धास्तावलो होतो कारण त्यांनी त्यांची -ज्ञानकोशाच्या संकेतात न बसणारी- शब्द संपत्ती इतर ठिकाणच्या संकेतस्थळाप्रमाणे मराठी विकिपीडियावर मोकळी केली असती तर असा विचार मला नाही म्हणाले तरी जरासा चिंतीत करून गेला. पण माझी ती चिंता अनाठायी होती हे काही महिन्यातच मला उमगून गेले. मराठी विकिपीडियावर त्यांनी अदमासे २०० ते २५० संपादने केली असावीत मुख्यत्वे शास्त्रीय संगितातील राग आणि काही शास्त्रीय गायक यांच्या बद्दलच्या लेखांची सुरवात त्यांनी केली. त्यांनी दुसरा ऑनलाइन संपर्क केला ते मला मराठी विकिपीडियाबद्दल मराठी विकिपीडियाच्या कक्षेत न बसणारी चर्चा करण्यासाठी मिपाचे व्यासपीठ वापरावे अशी गळ दोन तीनदा तरी घातली असेल. विकिपीडियाला कमी सेंसॉरशीपवाल्या सपोर्टची गरज भासते तसे मला तात्यांच्या संस्थळावर चर्चा करण्याचा विचार मनातून भावला कारण काही झाले तरी मनोगता प्रमाणे तात्या सेंसॉरशीपची तलवार चालवणार नाहीत हा विश्वास होता. पण मी मिपावर बर्‍याच उशीराने लिहिता झालो तो पर्यंत मिपाचे हस्तांतर झाले होते . तात्या करतील त्या पेक्षा सेंसॉरशीपची एक लेयर शक्यता अधिक राहीली तरी खूप जाच करणारी नसल्याने टिकून राहू शकलो आहे. पण मिपावर या या आग्रहाचा त्यांचा संवाद झाला तसा पुन्हा झाला नाही. एक आश्वासक व्यक्तिमत्व काळाच्या आड गेलेल ऐकुन मनाला हुरहूर लागते ती तशी लागली. शोकसभा आयोजीत होत असल्यास या धाग्यावर कळवावे हि नम्र विनंती. तात्या अभ्यंकर अर्थात विसोबा खेचर यांच्या मराठी विकिपीडियावरील योगदानाचा दुवा

वाईट घडले. त्यांच्या आईंबद्दल कोणी बातमी सांगू शकेल का चौकशी करून. कोण सांभाळणारे आहे किंवा कसे.

तात्या गेले .... ! या आवलियाला एकदा भेटायचे होते, आता ते योग नाहित ! ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना _/\_

एका बंडखोर साहित्यिक नेत्याचा उदयास्त...... मृतात्म्यास विनम्र अभिवादन.

फारच वाईट बातमी. तात्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

मिपाचे संस्थापक तात्या अभ्यंकर यांना श्रद्धांजली.

फारच वाईट बातमी. दहा वर्षांपर्यंत भरभरून आपलेपणा देणार्‍या मिसळपावचे संस्थापक तात्या अभ्यंकरांना भावपूर्ण श्रध्दांजली.

मिपावर मी पाककृती वाचून सदस्य झाले. त्यांची गोळयांची आमटी ही पाककृती वाचून माझ्या आजीची आठवण आली. आजी गेल्यावर मी ही आमटी मिस करायचे. पण त्यांनी लिहीलेली पाककृती करुन पाहिली आणि विशेष म्हणजे आजीची तीच चव पुन्हा चाखायला मिळाली. माझा आणि विसोबा खेचर उर्फ तात्या यांचा संपर्क आला तो इतकाच. सदर पाककृती 2008 साली लिहीली असल्याने त्यावर प्रतिक्रीया देऊन त्यांना कळविले नाही. त्यामुळे पण फार वाईट वाटले ही बातमी वाचून.

मिपाचे संस्थापक तात्या अभ्यंकर यांना श्रद्धांजली.

फारच वाइट बातमी. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या नातलगांना हे दु:ख पचवायची ताकद देवो हिच त्या शंभोचरणी प्रार्थना.

बातमी वाचून फारच दु:ख झाले. एक चांगला माणूस गेला. जिकडे असेल तिकडे तो बंडखोरीच करत असेल या बद्दल खात्री वाटते. त्याला सदगती लाभो पैजारबुवा,

तात्या गेले ही बातमी वाचुन खुप धक्का बसला. पूर्वी च्या मिपा वर तात्यांचा मुक्त वावर होता. गेल्या काही वर्षात ते इथे नव्हते. मिपा मालक अशीच माझ्या मनात त्यांची तेव्हापासुन प्रतिमा होती. रोज मिपा च्या मुखपृष्ठावर सुंदर सुंदर ललनांचे फोटो टाकायचे तात्या एकेकाळी :-)... आणि बहुतेक सोबत एका पदार्थाचेही..नीटसं आठवत नाही. मिपा एकदम happening वाटायचं तेव्हा...रोज ऑफिस मधे आलं की पहिलं मिपा वर जाउन बघायचे मी की आज काय नवीन. तात्यांसोबतच प्राजु, स्वाती दिनेश, अपर्णा ताई, रेवती, चतुरंग ही सगळी मंडळी एकदम खुप खुप जुन्या ओळखीची वाटायची. तात्यांचा साहित्य, संगीत, खादाडी सगळेकडे मुक्त संचार होता.सगळ्या लेखांवर त्यांची आवर्जुन प्रतिक्रीया असायची.त्यांचे लेखच नव्हे तर प्रतिक्रीया वाचायला पण मला मजा यायची. आणि प्रतिक्रीया वाचुन तात्या स्वभावाने किती मोकळे ढाकळे असतील याचा अंदाज यायचा. माझ्या आठवणीप्रमाणे "फोटो बघुन खपलो आहे, वारलो आहे ई ई" अशी कमेंट पाककृती च्या लेखावर द्यायची सुरुवात बहुतेक तात्यांनीच केली असावी. स्वाती दिनेश च्या सासरेबुवांनी एक लेखमाला इथे लिहिली होती. त्यांच्या संपूर्ण आयुष्यातल्या आठवणी, आत्मचरीत्रपर लेखन होतं ते. ते लिहिणारी व्यक्ती स्वाती दिनेश चे सासरे आहेत हे शेवटच्या भागात कळलं होतं सगळ्यांना. " आज मिसळपाव संकेतस्थळ सुरु केल्याचं सार्थक झालं" अशा आशयाची तात्यांची त्यावर काहितरी कमेंट होती त्यावर. कौतुक करायचं तर दिलखुलास आणि शिव्या पण मोकळेपणाने द्यायच्या अशी माणसं खुप कमी असतात. तात्या, तुमच्या आत्म्यास शांती लाभो. __/\__

In reply to by स्मिता श्रीपाद

स्वाती दिनेश च्या सासरेबुवांनी एक लेखमाला इथे लिहिली होती. त्यांच्या संपूर्ण आयुष्यातल्या आठवणी, आत्मचरीत्रपर लेखन होतं ते.
नव्या सदस्यांच्या माहिती साठी - स्मृतीगंध ही ती मालिका. मिपावर गाजली होती खूप.

तात्यांना आदरपुर्ण श्रद्थांजली.

मिपाचे जनक चंद्रशेखर उर्फ तात्या अभ्यंकर यांना विनम्र श्रद्धांजली ! देव त्यांच्या आत्माला शांती देवो.

मी मराठी संस्थाळांवर लिहायला लागलो तेव्हा तात्या लिहायचे बंद झाले होते. मिपावर माझा पहिला आयडी ॲक्टीवेट होत नव्हता तेव्हा त्यांना मेसेज करुन विचारले तेव्हा त्यांनी निलकांत यांना मेसेज करण्यास सांगितले. त्यांच्याशी हा एकदाच संपर्क झाला होता. तात्यांचे लेख आवडायचे. तात्यांना श्रद्धांजली!!

प्रत्यक्ष परिचय नव्हता, लिखाणातून,किस्, गप्पा कट्टा यातून माहिती मिळत गेली. गोष्टीवेल्हाळ,माणसात रमणारा,मोकळाढाकळा बहुढंगी व्यक्ती असं असेल. ज्याची जानपहचान होती आणि संपर्क होता तेच अधिक माहिती देतील आदरांजली मूक वाचकांची पत्रेवाला नाखु

तात्या ऊर्फ चंद्रशेखर अभ्यंकर यांच्या अकाली निधनाने वाईट वाटले. मराठी संस्थळांवरच्या सुरुवातीच्या (२००२ पासूनच्या) लेखकांपैकी एक प्रसिद्ध आणि कलंदर माणूस! त्यांच्याबरोबर त्याचे कर्तुम-अकर्तुम सगळे संपले. श्रद्धांजली.

आत्ता आमच्या सकाळी काही मित्रांच्या मेसेजेस मुळे ही बातमी वाचली आणि क्षणभर विश्वास बसला नाही. तात्याला पहिल्यांदा मनोगत संस्थळावर पाहिले होते. तिथल्या शिस्तीच्या विरोधात तो त्याच्या स्वभावाप्रमाणे विरोध करायचा. तिथूनच काही जणांनी उपक्रम हे संस्थळ चालू केले. तेथे पण तो सक्रीय होता. पण परत शिस्तीचे वावडे असल्याने आणि तसेच त्याच्या डोक्यात खरेच मोकळीढाकळी वेबसाईट चालू करायचे आले आणि तशी त्याने मिसळपाव करून दाखवली. तात्याचे या संदर्भातील जे गुण होते ते खरेच एखाद्या entrepreneur ला शोभतील असे होते. त्याने नुसतेच स्थळ चालू केले नाही तर माणसेपण ओढून आणली, मैत्री केली... मराठी संस्थळ अशा पद्धतीने नावारूपाला आणणारा कदाचित तो एकोहम असावा. आणि त्या साठी तो कायम लक्षात राहील. तात्याला भावपूर्ण श्रद्धांजली.

In reply to by विकास

तात्यांचे अकाली जाणे धक्काददयक आहे. माणूस दिलदार होता, दुर्दैवाने त्याचे वाईट दिवस आले व त्यातून तो उठू शकला नाही. ईश्वर मृतात्म्यास सद्गति देवो.

कलंदर व्यक्तिमत्व काळाच्या पडद्या आड गेले. त्यांनी अश्या काही विषयावर लिहीले की क्वचितच त्यांना कोणी हात घालेल. वर त्यांच्या लिखाणाची लिंक दिलेली आहे, त्यातील घागे वाचल्यानंतर याचा प्रत्यय येईलच. हल्ली त्यांच्या लिखाणाच्या पोस्ट व्हॉटस अ‍ॅपवर फिरायच्या. असो. एका चौफेर लिखाण करणार्‍या अवलियाला माझी श्रध्दांजल__________/\______________

मिसळपाव चे ते जनक आहेत हे माहिती नव्हतं . माझे फेसबुक फ्रेंड आहेत . काही दिवसांपूर्वी त्यांची एक व्हाट्स अप वर पोस्ट पण फिरत होती आयुष्यभराची शिदोरी अशा पद्धतीची गणपतीत मध्ये पुजा सांगायला जातात अशी . धक्कादायक विनम्र श्रद्धांजली

तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आजच त्यांचे जुने लेख वाचत असतानाच ही दुर्दैवी बातमी समजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो.

चंद्रशेखर होतं की बिपिन? त्याने मला tatya7@gmail.com या इमेल पत्त्यावरुन ईमेल पाठविली होती त्याखाली बिपिन अशी सही होती.

सकाळीच फोन आला,अन काय एेकतोय यावर क्षणभर विश्वासच बसेना. तात्याला प्रत्यक्ष कधी भेटलो नाही पण १-२ वेळा फोनवर बोलणं झालेलं. तात्याशी ओळख झाली ती मनोगत संस्थळावर, मिपाच्या जन्मा आधी. त्याच्या त्या ओघवत्या पण रांगड्या लेखणीचा मी फॅन होतो. अगदी पुलंच्या रावसाहेबासारख्या मधेच येणाऱ्या दोनचार शीव्याही कानाला गोड वाटत. व्यक्तिचित्रण लिहिण्यात त्याची हातोटी होती. अनेकदा त्यात पुलंचा भास होत असे. अलविदा तात्या. _/\_

बातमी जरा उशीराच कळली. अतिशय दु:खद आणि धक्कादायक! त्यांच्या अत्यंत दिलखुलास आणि बेधडक प्रतिक्रियांचा मी चाहता होतो. जिथे कुठे असतील तिथेही असेच स्वतंत्र राहोत!

तात्याला भेटायची अनेकांची खुप इच्छा होती पण खुप कमी लोक तात्याला भेटले असे दिसतयं. या सर्व लोकांनी तात्याच्या आठवणी सांगाव्यात ही विनंती.

धक्कादायक बातमी. वाईट वाटले. दिलखुलास कलंदर माणूस. त्यांच्या मुळे इथे लोक जमत गेले. नवीन लेखनाला खूप प्रोत्साहन द्यायचे. अनेक जण लिहिते झाले. वाचनीय बरंच काही मिळाले आज बरेच ग्रुप आहेत जे मिपा मुळे बनत घडत गेले. फार अचानक आणि लवकर गेले तात्या. श्रद्धांजली..