सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग ८)

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
26 Nov 2016 - 7:32 am

सुम्याच्या काळजी वाटण्याच्या आठवणी

फोनवर म्हटल्याप्रमाणे सुम्याची मुलगी थोड्या दिवसासाठी कोकणात आली होती.तिचा मुलगा आता कॉलेजात जात असल्याने तो आपल्या आपण स्वतंत्रपणे रहात होता.नवर्‍याला आणि मुलाला तिने सांगीतलं की,मी आईकडे असे पर्यंत तुम्ही दोघं संभाळून रहा.

इकडे कोकणात आल्यावर आईची प्रकृती पाहून तिची मुलगी खूपच अचंबीत झाली.आपली आई जास्त दिवस काढणार नाही असं तिला वाटूं लागलं.एकदा तिच्याशी सवित्सर बोलून तिला विचारावं की तू आणि गुरूकाका मुंबईला माझ्याबरोबर यायला तयार अहात का?माझ्या डोळ्यासमोर तुम्ही रहाल आणि मलाही माझी कामं करता येतील.नाहीतर तुमची काळजी करून माझं लक्ष कामापासून सतत विचलीत होत असतं.

खरं म्हणजे सुम्या, तिची मुलगी आल्यापासून, झपाट्याने सुधारत होती.आता तू परत मुंबईला गेलीस तरी चालेल मी आणि तुझा गुरूकाका आम्हाला संभाळून घेऊ असं काहीसं मुलीला सांगावं असं तिच्या एकसारखं मनात येत होतं.पण एव्हड्यात नको सांगुया असं सुम्याला वाटत होतं.ती आणखी थोडे दिवस आपल्या सोबत रहावी असं तिला वाटत होतं.

बरेच दिवस कोकणात राहून सुम्याच्या मुलीला कंटाळा यायला लागला होता.गुरूकाका सकाळीच आणून देत असलेल्या परडीभर सोनचाफ्याची फुलं ती तिच्या बाबांच्या फोटोला हार करून माळत होती.देवालाही वहात होती.तिला आई सुधारत आहे हे पाहून बरं वाटत होतं. न चुकता त्या सोनचाफ्याच्या फुलातलं एक फुल ती आपल्या आईच्या डोक्यात माळीत होती.आपल्या आईचं आणि गुरूकाकाचं लहानपणी प्रेम होतं हे तिला तिच्या बाबाकडून ओघाओघाने कळलं होतं.आता ती बरीच मोठी आणि समजूतदार झाल्याने आईच्या लहानपणीच्या प्रेमाचा ती आदर करीत होती.गुरूकाकावरही ती, तिचे बाबा गेल्यानंतर, वडीलांसारखं प्रेम करीत होती.

हा सर्व विचार करून आईला मुंबईला आपल्याबरोबर येतेस का असं विचारणं त्तिला जीवावर आलं होतं.शेवटी तिची आईच जेव्हा तिला म्हणाली की मी आता खणखणीत बरी झाली आहे तेव्हा तू मुंबईला जा.जड अंतःकरणाने सुम्याच्या मुलीने मुंबईस जाण्याचा विचार केला.इकडे ह्या दोघांची चांगली सोय करून ती मुंबईला जायला निघाली.आईची देखभाल करण्यासाठी तिने एक बाई कामाला ठेवली.

गुरूनाथ आपल्या फावल्यावेळात सुम्याला मदत करीत असायचा.पण अलिकडे त्याचा विसरभोळेपणा जास्त वाढत होता.चावी कुठे ठेवली ते विसरायचा.कुणी अलिकडेच ओळखीचं झालेलं माणूस परत आलं तर तो त्या व्यक्तीची ओळख विसरायचा.पण सुम्याच्या गरजा,तिला लागणारी त्याच्याकडची मदत, तिच्याबरोबर गप्पा मारताना लहानपणाच्या आठवणी अगदी जशाच्या तश्या त्याच्या लक्षात असायच्या. अलझायमर व्याधीचं हे असंच असतं म्हणे.अलिकडच्या गोष्टी निक्षून विसरायला होतात.अलिकडच्याच गोष्टी विसरणं म्हणजे काही विशेष नाही. असं वाटून ह्या व्यक्ती आपलं समाधान करून घेत असतात.
अशावेळी अश्या व्यक्तीनां,हळू हळू प्रगत होत चाललेल्या व्याधीची सारखी सारखी आठवण करून देऊ नेये.असं स्पेशालिस्टचं म्हणणं होतं.फक्त अशा व्य्क्तीवर कसून लक्ष ठेवायची जरूरी असते.

असा एक्का-दुक्का प्रसंग गुरूनाथकडून केला गेला की सुम्या खूप काळजीत जायची.तिला मनात यायचं एव्हडं सोडलं तर गुरूनाथची तशी तब्यत उत्तम होती.आपल्यापेक्षा तो जास्त जगेल असं तिच्या मनात यायचं.परंतु,आता मी आहे तोपर्यंत त्याच्याकडे लक्ष दिलं जातं.माझ्या पश्चात त्याचं कसं होणार?असं तिला मनोमनी वाटायचं.पण मग तिच्या निर्वतलेल्या नवर्‍याचे शब्द तिला आठवायचे.तो तिला म्हणायचा जे होणार आहे ते चुकणार नाही.ही काळ्या दगडावरची रेष आहे.
आपल्या ताब्यात काहीच नसतं.फक्त निसर्गाने आपल्याला विचार शक्ती दिल्याने बरे वाईट विचार करायची आपल्याला मुभा असते.मग अशी मुभा असल्यावर आपण पॉझीटीव्ह विचार करण्याची मुभा का पत्करूं नये?

तो तिला म्हणायचा,ह्या जगातून निघून गेल्यावर ती विचारकरणारी व्यक्ती शंभर टक्के सर्व व्यापातून मोकळी होते.आणि हे प्रत्येकाला माहित असतं.मग आपल्या पश्चात आपण ज्याची काळजी करतो त्या व्यक्तीचं निश्चीतच चांगलंच होणार असा पॉझीटीव्ह विचार का करू नये? सुखी रहावं की दुःखी हे आपल्या हातात असल्याने स्वतःला सुखी ठेवण्याची पराकाष्टा करावी.
सुम्याला आपल्या नवर्‍याची समजूतदारपणे सांगण्याची ही हातोटी आठवून प्रकर्शाने त्याची याद आली.

एकदा त्यानेच तिला तिचे वडील गेल्यानंतर ती त्यांची सतत काळजी करून दुःखी व्हायची हे पाहून तिला सांगीतलं होतं की,लोक गणपतीबाप्पाजवळ जाऊन हात जोडून मनात आठवून आपलं दुःख सांगत असतात.त्यांना कळत असतं की हे केवळ श्रद्धेपोटी केलं जातं.पण त्यामुळे त्यांना मन:शांती मिळत असते.मग तुला ज्यावेळी तुझ्या वडीलांना काही सांगायचं असेल तेव्हा त्यांच्या फोटोजवळ जाऊन मनात आठवून तुझं मन हलकं कर.तुझ्या मनावरचा भार कमी होईल.हे त्याचे उपदेश लक्षात येउन ती भावनावश होऊन त्याच्या फोटोजवळ जाऊन त्याला उद्देशून बोलायला लागली.तिला कळत होतं की तो या जगात नसल्याने त्याला हे काही ऐकायला जाणं शक्य नव्हतं.

देवाला चांगली माणसं आवडतात म्हणून तो त्यांना लवकर आपल्याकडे बोलावीत असतो असं म्हणतात. तुम्ही लवकर गेलात आणि तुम्ही सुखी झालात.गुरूनाथसुद्धा तुमच्यासारखा चांगला असल्याने त्याला आता देवाने बोलावून घ्यावं.तो जास्त दिवस जीवंत राहिल्यास फारच भ्रमीष्ट होईल.त्याने आयुष्यभर दू:खच काढलं आहे आणि माझ्याच्याने हे बघवणार नाही.माझ्या मनात आलेला हा दुष्ट विचार तुम्हाला सांगून माझ्या मनावरचा भार मी हलका करीत आहे एव्हडंच.
असं म्हणून अलगद ती आपल्या बिछान्यावर येऊन लेटली आणि गुणगुणू लागली,

पर्वताच्या उतरणीवर
दिसू लागले आभाळ
चढणीच्या वाटेवर
स्वैर पक्षांचा थवा हेरण्याचा
गेला तो काळ

अपेक्षा लोपून गेली
उमेदीने पाठ फिरविली
नैराशाने गांठ बांधली

भुतकाळातील यातनां
भविष्यकाळातील स्वपनें
मिसळती एकच वेळी
चेहऱ्यावरी दिसती
दुःख अन कष्ट
राहूं कशी मी संतुष्ट?

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)_

कथालेख

प्रतिक्रिया

Ram ram's picture

26 Nov 2016 - 9:33 pm | Ram ram

सुंदर लिखाण