साहित्यिक कसले हे !
साहित्यिक नामक जमात - कदाचित बहुसंख्येने - व्यवहारात म्हणजे प्रत्यक्ष जीवनात सुमारे कशी असते याचे प्रतिबिंबच "दरवर्षी" "वाजतगाजत" ( म्हणजे बोंबाबोंब करत ) साजरे होणा-या साहित्य संमेलनात दिसते !!! ते साहित्य संमेलन आले की काही तरी वादविवाद, हाणामारी, पेपरबाजी होणार हे अगदी ठरून गेलंय. म्हंजे एखाद्या साहित्यीकाविषयी काहीतरी भलते सलते लिहून आले की संमेलन आले असे ओळखावे इतके !! साहित्याव्यतिरिक्त अन्य संमेलनाच्या बाबतीत असे का नाही होत ? उदाहरण सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे घ्या. महोत्सवाला हजर न होणारांसाठी वा महोत्सवाच्या तारखा ध्यानात नसणा-या साठी त्याला महोत्सव वृत्तपत्रांतील सचित्र बातम्यांच्या माध्यामातुन दृष्टिस पडतो आणि एक चटका लाउन जातो, हे नक्की. "अशा स्वर्गीय आनंदात आपल्याला प्रत्यक्ष सहभागी होता येत नाहीय! काहीतरी भव्यदिव्य अनुभवायचं राहून जातंय आयष्यात. पण पुढल्या वर्षी आपण नक्की जाउच." असा वादा नक्की एखादा रसिक महोत्सव चुकल्यामुळे स्वत:शी करत असेल हे विधान नाकारता येत नाही इतका सुंदर होतो सोहळा, सालाबादप्रमाणे!
संमेलन आणि महोत्सव यामध्ये फरक असेल ना. पण मुद्दा साहित्य संमेलन आणि सवाई महोत्सव यातल्या तांत्रिक फरकांचा नाहीय. त्यामुळे त्यात कीस पाडत बसण्यात अर्थ नाही. मुद्दा रसिकांना या सोहळ्यातून मिळणा-या अनुभूतीचा आहे. साहित्य संमेलनाचे का नाही असे होत ? एखादे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायचे राहून गेले आणि आपण एका भव्यदिव्याला मुकलो अशी चुटपुट का नाही लागत ? बरं, तसे एखादे असामान्य व्याख्यान वा भाषण असेल ही, पण मुळात अशा एखाद्या भाषणाचा गंध पोचतच नाही, सामान्यजनांपर्यंत ! कारण त्या भाषणाच्या आजुबाजुला संमेलन सुरु होण्याच्या आधीची वर्ष सहा महिने चालणारी बोंबाबोंब आणि प्रत्यक्ष संमेलन सुरु झाल्यावर तिथे हार्डकोर साहित्यिक सोडून राजकारणी आणि धनिकांची दिसणारी फेटेबाजी यातुन या सर्वांच्या मानाने क्षीण किरकोळ कमकुवत असणारा अस्सल वाचक बिचारा पार दबून कुस्करून गेलेला असतो. त्या कुस्करून, गुदमरून जाण्याच्या अनुभवातून जाण्यापेक्षा साहित्य संमेलनाचा सोस नकोच असे वाटते.
एखाद्या वर्षी असा गोंधळ समजू शकतो, पण हे दरच वर्षी - अगदी सालाबाद प्रमाणे - कसे काय होते ? पडणारा उमेदवार जिंकलेल्या उमेदवाराचे भर पेपर मधून वाभाडे काढतो, चार चौघात! कशासाठी ? तर पडणा-याची अध्यक्ष बनण्याची संधी कोणत्या ना कोणत्या कारणांनी हुकली म्हणून ? आजतर एका पेपरात साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जिंकायचे कसे यावर मोठा लेख लिहून आलाय ! म्हंजे कोटा फॉर्मुला - आयआयटीवाल्यांसाठी असतो किंवा लातूर पद्धती दहावीच्या मार्कांसाठी असते तसे काहीसे !!! अरे काय चाल्लय काय ! या सगळ्यात भक्तिभावाने तुमचे साहित्य वाचणा-या आम्हा भीरु वाचकांचे काय ? आम्ही अहो तुमचे साहित्यवाचून तुमच्या विषयी तुमची भव्यदिव्य प्रतिमा आमच्या मनात उभी केली होती. पण प्रत्यक्षात बरेचजण कुडमुडेच असतात. एका अत्यंत महान लेखकाची अतिमहान सेक्युलर अशी प्रतिमा आहे. त्यामुळे सेक्युलर प्रथेप्रमाणे ब्राह्मणाना जोडे मारण्याचे काम या महोदयांना करावे लागते. एका वैयक्तिक बैठकीत त्यांनी कुळकर्णी नामक इसमासाठी जोडे काढले. एका मित्राने त्यांना ते कुळकर्णी ब्राह्मण नाहीत हे सांगितल्यावर लेखक महोदय प्रचंड ओशाळले. आणि नंतर परत परत खाजगीत - उतरेतोवर - "तो कुळकर्ण्या खरच ब्राह्मण नाही?" असे धडधडीत विचारत होते. एका लेखकाची प्रतिक्रिया फार भारी होती त्याला खाजगी भानगडी बद्दल छेडल्यावर : "आमचे पुस्तक वाचा हो , ती आमची प्रतिभा आहे. तो मी आहे. आमच्या खाजगी आयुष्यात नाक खुपसू नका." अशी तंबी दिली. अहो, पण असे नाही चालणार आम्हा वाचकांना, सहन नाही होत ते. "गुळ खाउ नको असा उपदेश देण्याचा मला नैतिक अधिकार नव्हता कारण मलाच मुळात गुळ खायची सवय आहे. त्यामुळे आधी मी माझी सवय बंद केली आणि मग तुझ्या मुलाला मी अधिकारवाणीने गुळ खाऊ नको असे सांगितले, त्यामुळे मी उपदेश करायला थोडा वेळ घेतला " असे नैतिकतेचे अधिष्ठान असलेल्या महान संत साहित्यिकांच्या ओव्या अभंग आणि लिखाणांनी आम्हाला आम्ही वाढताना आमच्यावर संस्कार केले आहेत. आम्हाला समजायला लागले त्यावयात आमच्या आईबापानी घरी आणि शाळेत गुरुजींनी अशाच नैतिकतेचे अधिष्ठान असणा-या संताची वा सावरकरांसारख्या धगधगत्या अग्नीकुंडाची वा बापुजींसारख्या स्वत:वर सत्याचे खडतर प्रयोग करणा-या महंतांची साहित्यिक म्हणून सुरुवातीला ओळख करून दिली आहे. त्यामुळे आम्हाला साहित्याकडे त्याच संदर्भ चौकटीतून बघायची सवय आहे. या अशा पार्श्वभूमीवर तुम्हीजर वैयक्तिक आयुष्यातली तुमची धुळवड आम्ही डोळेझाक करावी असे म्हणत असाल तर तसे नाही ना हो होत !!
"शब्दामध्ये झळकावी ज्ञान कर्म भक्ती, स्वानुभवातून जन्मावा प्रत्येक शब्द I " हे सांगितलंय तुकोबांनी आणि त्यांचे साहित्य आमच्या जगण्याचा श्वास बनलाय. " कोणाचेही वर्म, व्यंग आणि बिंग, जात पात धर्म, काढूच नये I" असे सांगणारे साहित्य आम्ही वाचलंय. पण इथे तर साहित्यिकांचे नेतृत्व जित्या जागत्याची प्रेतयात्राच काढू म्हणते आहे ! "घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द, बोलण्या पूर्वी I" - असे म्हणाले होते ते जगदगुरू साहित्यिक पण इथे तर साहित्यिक आणि त्यांचे नेतृत्व रोज सकाळी दंतमंजन झाल्यावर जिव्हेवर ग्रीसचा लेप लाऊनच बाहेर पडताहेत !!
सर्वधर्मसमभावाचा जोरजोरात नगारा वाजवणारे संमेलनाचे अध्यक्ष रेडीओवर एका कवीचा संदर्भ देताना सतत "मुस्लिम" कवी असा उल्लेख करत होते ! भेद भिनला असेल रक्तात तर ओठात सहजपणे समानता येणार कशी यांच्या ? सगळ्या ठिकाणी नाटक करता येत नाही ना! अरे साहित्यीकांनो, तुमच्या लिखाणातून दिसणारी संवेदना वैयक्तिक तुमच्या आयुष्यात, वागण्याबोलण्यात दिसतच नाही ! त्यामुळे तुमचे साहित्यही तुमच्या संवेदनशील मनाची अनुभूती नसते, तर बाजारात विकण्यासाठी बनवलेले प्रॉडक्ट असते - हे आम्हा येड्या वाचकांना आता कळायला पाहिजे. तुमचे पाय प्रत्यक्ष मातीचेच असतात हे तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाचे वा पुढा-याचे बटिक होताना आम्हाला दिसता त्यावेळी आमच्या ध्यानात यायला पाहिजे. गुळ खाण्याची सवय जाऊ द्या ! रानावनावर फुले पक्षांवरल्या ज्यांच्या कविता वाचून आम्ही निसर्ग शरण गेलो त्या "महाथोर" कवीला बारामतीच्या ढेपेला घट्ट चिकटलेला बघितल्यावर निसर्गावरचे त्याचे भाष्य अनैसर्गिक वाटायला लागले. पक्षांशी पार्टी करणा-या बुजगावण्याच्या कळपातल्या कवीचा स्वर कसे काय आमच्या हृदयाचा ठाव घेईल ? कशाला पाहिजे अशांच्या साहित्याचा सोहळा ? कशाला पाहिजे तुमचे संमेलन ? असे काय देणार आहात तुम्ही त्यातून आम्हाला ? द्यायचे जाऊ द्या आधी तुम्ही स्वत: संवेदनशील माणूस असल्याची पावती तरी देणार का आम्हा भीरु वाचकांना ? तुमच्या साहित्यात तुमच्या संवेदनाशील विचारांचे, स्वानुभवाचे प्रतिबिंब आहे याची खात्री आम्हाला पटवणार का ? "जीभेवारी ताबा, सर्वांसुखदाता, पाणी वाणी नाणी, नासु नये I" एवढी माफक अपेक्षा केलीय रे माझ्या माउलीने, त्याला उतरणार का प्लीज ?
सुधीर मुतालीक
प्रतिक्रिया
जाउध्या हो.. एव्हडे नका मनाला
सगम आणि सास
याच्यापेक्षाही बेसिक फरक
अहो व्यासपिठावर साहित्यिक
टेक इट इझी
खरं आहे.
शिवाय
वाचतोय.
प्रगल्भ काय होतं आणि प्रगल्भ कोण असतं?
सहमत!
हा हा !! सुरु केली व्हायवा !
चर्चा करत राहु.....
१७ व्या क्रमांकाच्या
उपप्रश्न
हम्म..