अवधूत (भाग-२)

मांत्रिक's picture
मांत्रिक in जनातलं, मनातलं
30 Aug 2015 - 12:55 pm

भाग १

डोक्यात असं विचारचक्र चालू असतानाच अचानक वरून येणा-या घंटेच्या टणटण आवाजाने त्याची तंद्री भंग पावली. आरती सुरु झाली वाटतं! त्याची पावले नकळत वेगाने चालू लागली. आत्ताशी ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ सुरु झालं होतं. आईची आरती थोड्याच वेळात चालू होईल, त्याच्या आत पोहोचावं, असा विचार करून भराभर पाय उचलू लागला.

थोड्याच वेळात तो मंदिराच्या गर्भगृहात पोहोचला. समोर जगदंबेची भव्य मूर्ती उभी. त्याने नम्रपणे नमस्कार केला. फुलांचा द्रोण पुजारीबाबाकडे दिला. कुणा धनिकानं दीपदान सोहळा केलेला होता. देवीपुढे गाभा-यात १०८ साजूक तुपाची निरांजनं तेवत होती. बघताना असं वाटत होतं की एका नाजूकशा झाडावर सोनचाफ्याची शेकडो फुलंच उमललेली असावीत. सर्व गाभारा व मंडपभर धुपाचा दरवळ भरून राहिलेला. भक्तांनी अर्पण केलेली नाना प्रकारची फळे, फुले, नैवेद्य, अगरबत्त्या या सर्वांचा एक संमिश्र असा वास तेथे भरून राहिलेला होता. फार फार आवडायचा त्याला तो वास. घंटेचा टणटण आवाज, भक्तांचा गंभीर आवाजात आरती गाईल्याचा स्वर, धुपाचा पवित्र दरवळ, निरांजनांचा सौम्य प्रकाश, त्यात मंदमंद उजळून निघालेली जगदंबेची भव्य मूर्ती! एका वेगळ्याच विश्वात हरवल्यासारखं झालं त्याला.

आरती संपली. महानैवेद्य देवीसमोर झाकून ठेवण्यात आला. धनिक महाशय सर्वांना प्रसाद वाटत फिरू लागले. याच्यासमोरही आले. या तेजस्वी साधूला पाहून नमस्कार केला. “ महाराज, सर्व काही आहे. पण मनाला शांतता नाही. जगदंबेचं दर्शन कसं होऊ शकेल काही उपाय सांगाल?” तसा हा चटकन मागे सरला. “अजून मला तो अधिकार नाही.” हातातला प्रसाद मुठीत घट्ट धरून तसाच वेगाने गड उतरु लागला. डोळ्यातून अश्रू येऊ लागले. अजून किती करायचा शोध तिचा? वेड्यासारखं घरदार सोडून सतत ११ वर्षं शोध करतोय. आईला अजून अजिबात कणव येऊ नये?

आज पुन्हा गावाकडे वळलाच नाही. लहान मुलासारखा स्फुंदत स्फुंदत मार्कंडेय पर्वत चढू लागला. आताशा वाटेचं भानच नव्हतं. डोक्यातली प्रचंड वावटळ काहीच सुचू देत नव्हती. वर पठारावर कधी आला तेही कळलं नाही त्याला. धपापलेल्या उराने जेव्हा खाली बसला तेव्हाच त्याला आपल्या कष्टांची, भुकेची जाणीव झाली. पण मनातला उद्रेकही तेवढाच जोरदार होता. माझ्या कष्टांची काहीच जाणीव नाही? माझी काहीच किंमत नाही तुझ्या दरबारात? डोक्यात जणू तुफानच सुटलेलं होतं.

समोरचं चांदणं हळूहळू अस्पष्ट दिसू लागलं. भुकेनं गुरगुरणारं पोट पावसात भिजलेल्या कुत्र्याप्रमाणं हळूहळू आकसत आकसत पाठीच्या आश्रयाला जाऊन निजलं. कधीतरी त्याला देखील झोप लागली. कितीवेळ गेला कुणास ठाऊक? पण कुणीतरी त्याला हलवून जागं करत होतं. घट्ट मिटलेले डोळे ऐकायला तयार नव्हते. पण सुग्रास अन्नाच्या घमघमीत वासानं निद्रेवर मात केली. डोळे चोळत, धडपडत काप-या हातावर शरीराचा भार देऊन तो उठून बसला. मघाचाच धनिक, आणखी कुठल्यातरी माणसासह! त्या माणसाच्या हातात भोजनाची थाळी होती. बहुतेक सेवक असावा. त्या दोघांनी त्याला थोडं खाऊन घ्यायचा आग्रह केला.

अर्धवट निद्रावस्थेत वरणभाताचा पहिलाच घास घेतला असेल, तेवढ्यात बांगड्यांचा किणकिण असा आवाज येऊ लागला. बाईमाणूस तर कुणी नाहीये इथं. मग हा आवाज कुठून येतोय? असो, अतिशय श्रीमंत माणसाच्या घरचं अन्न असणार! भोजनात तुपाचा सढळ वापर. जास्त काही खाता येणार नव्हतं त्याला. अनेक दिवस अतिशय साध्या अन्नावर राहिलेल्या त्याला तसलं अन्न जास्त खाणं त्रासदायक ठरलं असतं. थोडंसं खाल्लं असेल नसेल, डोळ्यावर झोप इतकी प्रबळ झाली, की तो तिथेच आडवा पडला. समोरचं चांदणं आणि ती दोन माणसं अस्पष्ट अस्पष्ट होत गेली.

सकाळी सूर्याच्या तप्त किरणांनी जाग आणली. उठून बघतोय तर त्याच्या अंगावर कुणीतरी शाल ओढून ठेवलेली. नक्कीच तो धनिकच असणार. काय पाहिजे असेल त्याला माझ्याकडून? मी स्वतःच फाटका. याला काय देऊ? दोन तीन दिवसांनी बरं वाटल्यावर गड चढून देवीच्या दर्शनाला गेला. त्या धनिकाची शाल परत करणे हा देखील हेतू होताच. पुजारीबाबाला नमस्कार करून झाली हकिकत सांगितली. मोठमोठ्याने हसत पुजारीबाबा म्हणाला, “तो ढेरपोट्या शेटजी कशाला येतोय तुमच्यामागं तंगड्या तोडत? तो तर इथंच मनसोक्त भोजन करून, पुन्हा पालखीत बसून गड उतरून गेला. दुसरा कुणीतरी असेल हो! आणि ती शाल ठेवा तुम्हालाच. त्या अज्ञात माणसानं प्रेमानं दिली आहे. ठेवून घ्या.”

आश्चर्याने थक्क व्हायची वेळ होती! अगदी हलका पिसासारखा होत तरंगतच गड उतरला तो! त्या बांगड्यांचा किणकिण आवाज कुणाचा होता ते कळलं त्याला. आई स्वतःच आली होती. संशयच नाही. बाळ भुकेलं असेल तर आईला राहवेल का? माझी हाक तिच्यापर्यंत पोहोचू लागली तर! आता मी लांब नाही माझ्या ध्येयापासून!

(क्रमशः)

हे ठिकाण

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

30 Aug 2015 - 1:05 pm | यशोधरा

हा भाग सुरेख उतरला आहे...

मांत्रिका, छान लिहितो आहेस.... लवकर लिहा पुढचा भाग!

बाबा योगिराज's picture

30 Aug 2015 - 1:15 pm | बाबा योगिराज

मस्तच....

और दिखाओ, और दिखाओ

फारच छान! वातावरणनिर्मिती सुरेख!

अभ्या..'s picture

30 Aug 2015 - 2:14 pm | अभ्या..

छान लिहिलेय अगदी.

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Aug 2015 - 2:30 pm | ज्ञानोबाचे पैजार

मनापासून लिहिले की मना पर्यंत पोचतेच.

पुढे काय होणार? ......... अवधुताला आत्मस्वरूपाचे दर्शन घडणार का?

पैजारबुवा,

मांत्रिक's picture

30 Aug 2015 - 2:40 pm | मांत्रिक

पुढील भाग लिहायला घेतलेत. लवकरच टाकेन. पण जरा हे कुंभमेळ्याचं वातावरण जाऊ देत असा विचार करतोय. कारण एकदा का कुंभमेळ्याचे काथ्याकूट पडू लागले की ललित लेखांच्याकडे दुर्लक्ष नक्कीच होणार.

नीलमोहर's picture

31 Aug 2015 - 1:15 pm | नीलमोहर

मनापासून लिहिले की मनापर्यंत पोचतेच.

जेपी's picture

30 Aug 2015 - 2:38 pm | जेपी

आवडल..
पुभाप्र.

मंदिरातील पूजेचं वातावरण तुम्ही इतकं जिवंत उभे केलेय की अक्षरश: तिथे प्रत्यक्ष असल्याचा भास होतोय.
फारच छान. पुढचा भाग वाचण्याची खूप उत्सुकता लागली आहे.

एक एकटा एकटाच's picture

30 Aug 2015 - 4:04 pm | एक एकटा एकटाच

मस्त

पुढील भागाच्या प्रतिक्षेत

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Aug 2015 - 5:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

वातावरण डोळ्यासमोर उभे करणारी सुंदर लेखनशैली ! पुभाप्र.

बोका-ए-आझम's picture

30 Aug 2015 - 6:15 pm | बोका-ए-आझम

एकदम चित्रदर्शी शैली आहे. पटकथेप्रमाणे प्रसंग हळूहळू वाचकाच्या डोळ्यांसमोर घडतो आहे.पुभाप्र.

नकळत हात जोडले जावेत इतकं सुंदर लेखन!!

_/\_
धन्यवाद!!

रुस्तम's picture

30 Aug 2015 - 7:31 pm | रुस्तम

पुभाप्र...

प्रचेतस's picture

30 Aug 2015 - 9:37 pm | प्रचेतस

लेखन आवडले.
नाशिक हे आजोळ असल्याने सप्तश्रुंगी, मार्कण्डेय परिसर कित्येक वेळा पाहिला आहे. त्यामुळे कथा जास्तच मनाला भिडतेय.

रातराणी's picture

30 Aug 2015 - 11:48 pm | रातराणी

सुरेख! खूप आवडला हा भाग!

थकवा, भुकेने शरीराची झालेली अवस्था,बेभान होउन नकळत वाट चालणारे पाय, किती आणि कशाकशाच कौतुक करावं?
लेखन ओळखीच आहे तरीही असो.
येऊ द्या पुढचे भाग.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Aug 2015 - 7:00 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

हाडुकवाले मांत्रिकबाबा मस्तं जमलेत दोन्ही भाग :).

मांत्रिक's picture

31 Aug 2015 - 10:33 am | मांत्रिक

सर्व वाचक व प्रतिसादकर्ते यांचे मनापासून आभार! लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे. पण मिपाकरांच्या अगदी प्रेमपूर्वक दिलेल्या प्रतिसादांमुळे लिखाणाचा उत्साह दुणावला आहे. परत येईनच लवकर, धन्यवाद!

जरा गोनीदांची आठवण झाली, लेखन आवडले.

तुडतुडी's picture

31 Aug 2015 - 1:10 pm | तुडतुडी

अतिशय सुरेख .

तसा हा चटकन मागे सरला. “अजून मला तो अधिकार नाही.”

हा खरा साधू .
कवडी बांध गाठरीने सब चले आये .
हरी चले पीछे पीछे भक्त न भुखा जाये !

कविता१९७८'s picture

31 Aug 2015 - 1:13 pm | कविता१९७८

खुपच छान लेखन, याप्रकारच लेखन अगदी आवडीच

मूकवाचक's picture

31 Aug 2015 - 2:08 pm | मूकवाचक

पुभाप्र, पुलेशु ...

gogglya's picture

31 Aug 2015 - 4:39 pm | gogglya

पु. भा. प्र.

तुडतुडी's picture

31 Aug 2015 - 4:44 pm | तुडतुडी

मांत्रिक भाऊ , त्या 'बॉमकेस बॅक्षी' कड नका लक्ष देऊ .
साधा 'अवधूत' ह्या शब्दाचा अर्थ माहित नसणारयाकडून काय प्रतिसादाची अपेक्षा करणार ?

अमृत's picture

31 Aug 2015 - 5:50 pm | अमृत

वाचतो आहे

अजया's picture

1 Sep 2015 - 7:30 am | अजया

आवडला भाग.पुभाप्र

पैसा's picture

1 Sep 2015 - 8:03 pm | पैसा

लिखाण आवडले. पुढचा भाग लवकर टाका.

भुकेनं गुरगुरणारं पोट पावसात भिजलेल्या कुत्र्याप्रमाणं हळूहळू आकसत आकसत पाठीच्या आश्रयाला जाऊन निजलं.
क्या बात है!

पथिक's picture

12 Sep 2016 - 11:45 am | पथिक

डोळ्यातून अश्रू येऊ लागले. अजून किती करायचा शोध तिचा? वेड्यासारखं घरदार सोडून सतत ११ वर्षं शोध करतोय.

हे वाचताना रामकृष्ण परमहंसांची आठवण झाली.
शेवट वाचताना डोळे पाणावले..