अवधूत (भाग ६)

विजय पुरोहित's picture
विजय पुरोहित in जनातलं, मनातलं
25 Apr 2016 - 12:38 pm

(मागील भाग )
अवधूत (भाग-५)
अवधूत (भाग-४)
अवधूत (भाग-३)
अवधूत (भाग-२)
अवधूत (भाग-१)

अद्याप आकाशात ब-यापैकी अंधार होता. पूर्वेकडून थोडंसं फटफटू लागलेलं होतं. शुक्राची चांदणी दिमाखात पूर्वेच्या आकाशात चमकत होती. ढगांचं खिन्न, उदास आवरण आता पूर्णपणे हटलेलं होतं. हिवाळी तारकांचे द्राक्षगुच्छ आकाशात आनंदात चमकताना दिसत होते. रस्त्यावर चिखल अद्याप बराच होता. त्याची चाल मंदावली. पौष महिन्यातील कडाक्याची थंडी आणि भरीत भर पाऊस! भयानक गारवा होता. कुडकुडत, हात चोळत कशीबशी ऊब आणीत त्याने चाल वाढवली. कदाचित त्यामुळे उबदार वाटेल!

गाव आता जवळ आलं होतं. गोठ्यातून गुरांच्या घंट्या वाजल्याचा आवाज येऊ लागला. माजघरांतून चूल पेटवण्याची गडबड! ‘फूऽऽ फूऽऽ’ फुंकणी फुकत बायका सादळलेल्या लाकडावर आणि पावसावर करवादत होत्या. खिडक्यांतून बाहेर पडणारा धूर दमट, जड पावसाळी हवेने अद्याप गजांपाशीच घुटमळत होता. आतून खोकल्याचे, क्वचित शिव्या घातल्याचे आवाज ऐकू येत होते. त्याला थोडी गंमतच वाटली. तेवढ्यात एक हाक ऐकू आलीः
‘राम राम महाराज! कुठचं म्हणायचं ओ तुम्ही?’
त्याने उजवीकडे पाहिलं. थोड्याच अंतरावर एका उंचवट्यावरुन एक वृद्धसा मनुष्य मिसरी घासत त्याच्याकडे पहात होता.
‘मी कुठचाच नाही. मी घर सोडून दिलंय.’
‘म्हणजे साधु-संन्यासी म्हणा की?’
‘हो तसंच काहीतरी!’

त्याला स्वतःला हे साधु, संन्यासी, बैरागी वगैरे शब्द आवडायचे नाहीत. जो ईश्वराच्या शोधात निघाला त्याच्यावर कुठला ना कुठला शिक्का मारलाच पाहिजे का? देवाचा शोध राहिला बाजूला आणि पंथ, आखाडा, संप्रदाय, भक्तगण, आश्रम यांचा नवीन प्रपंच स्वतःभोवती विणायचा. निरर्थक आहे हे!

‘या जरा शेकोटीला उबेला. आत्ता इतक्या थंडीचा प्रवास करु नका. थोडं ऊन आलं की मग पुढे जा.’
त्याने विचार केला की काही हरकत नाही. इतक्या थंडीचं फारसं चालवणार नाहीच तसेपण. एका गुलमोहोराच्या बसक्या झाडाखालून एक निसरडी वाट गेली होती म्हाता-याच्या उंचवट्यावरील घरापर्यंत. तिच्यावरुन काळजीपूर्वक चालत तो म्हाता-यापर्यंत पोहोचला. म्हाता-याने त्याला शेकोटीपाशी बसायला गोणपाटाचा तुकडा दिला आणि स्वतः चूळ भरायला निघून गेला.

व्वाह! काय छान वाटत होतं. एकदम शरीरात शिरलेली थंडी कुठल्या कुठे पळाली. चूळ भरुन म्हातारा परत आला. येतानाच त्याने दारातून आत डोकावून कुणालातरी बाहेर चहा द्यायला म्हणून सांगितलं.
‘कुठल्या गावचे हो तुम्ही?’
परत तेच…
‘अहो मी ते सर्व सोडून आलोय. मी कुठचा, कोण, माझे आईबाप कोण हे मी लोकांना सांगत बसणं बरोबर नाही. आणि तुम्ही पण असले प्रश्न विचारु नयेत.’
म्हातारा एकदम गप बसला. आपण काहीतरी चुकीचं बोलून बसलो याची त्याला जाणीव झाली असावी. थोडा वेळ दोघेही निरुद्देश शेकोटीवर हात शेकत निवांत बसले. म्हाता-याची जिज्ञासा पुन्हा जागृत झाली.
‘सध्या कुठे असता?’
‘सप्तशृंग किंवा मार्कंडेयावर’
तेवढ्यात एक पन्नाशीकडे झुकलेली स्त्री चहाचे पेले घेऊन बाहेर आली. तिने दोघांच्या हातात चहाचे पेले दिले आणि आत निघून गेली. चहाचे एकदोन घोट घेतल्यावर त्याला एकदम उल्हसित वाटू लागलं.

म्हाता-याचे प्रश्न चालूच होते.
‘मग कुठं चालला आहात?’
‘त्र्यंबकेश्वरला’
‘का?’
‘काही नाही. असंच जाऊ वाटलं.’
‘तुम्हांला देव दिसला का हो?’
फुर्र्र्र्र्र करत त्याच्या तोंडातून चहा उडाला. एकदम जोरात हसू फुटलेलं. म्हातारा कावराबावरा झाला.
‘अहो हसायला काय झालं इतकं?’
‘काही नाही हो. तो प्रश्न विचारताना तुमच्या तोंडावरचे हावभाव इतके मजेशीर होते की मी हो म्हटलो असतो तर तुम्ही बेशुद्धच पडला असता.’
यावर म्हातारा देखील हसू लागला. आता ब-यापैकी उजाडलेलं होतं. सगळीकडे स्पष्ट दिसू लागलेलं.
‘मी अजून साधक आहे. वाटचाल चालूच आहे. पुढचे काय सांगू शकत नाही.’
‘बाकी निघालात कधी सप्तशृंगावरुन?’
‘काल संध्याकाळी’
‘रात्री राहिलात कुठे मग?’
‘गावाच्या बाहेरच एक जुनाट घर लागतं ना तिथे. उंचवट्याच्या खाली आहे बघा ते?’
म्हाता-याचे डोळे मोठे झाले.
‘ते घर? नक्की?’
‘हो! अहो तेथे एक वृद्ध बाई होत्या. त्यांनीच मला आश्रय दिला रात्री घरात. मी तापाने बेजार होतो. त्यांनी मला औषध आणि जेवण दिले. रात्री मी झोपलो देखील तिथेच. आत्ता पहाटे तिथूनच दूध पिऊन मी निघालो.’

म्हातारा हसू लागला. आता हसण्याची पाळी म्हाता-याची होती.
‘अरे बाबा. ते घर गेली दहा-बारा वर्षं ओसाड आहे. त्या कुटुंबातील तरुण मुलगा युद्धात मारला गेल्यानंतर त्याचा बाप अंथरुणावरच तळमळत मेला. त्याची आई देखील नंतर भ्रमिष्टावस्थेत मरण पावली. त्यानंतर तिथे कुणीही राहिलेलं नाहीये. ज्या कुणी असं धाडस केलं त्यांना काहीतरी वाईट अनुभव आलेतच तिथे. तुझं नशीब चांगलं म्हण की तुझ्या वाट्याला तिथे काही भयानक आलं नाही ते.’
आश्चर्याचा धक्काच बसला त्याला. आजवर त्याने अशा अनेक कथा कहाण्या ऐकलेल्या होत्या. पण इतका जिवंत अनुभव त्याने कधीच घेतलेला नव्हता. त्या स्त्रीचे दुःखाने भरलेले डोळे त्याला आठवू लागले. अचानक एका झटक्यासरशी तो उठला.

म्हातारा त्याच्याकडे आश्चर्याने पहात होता.
‘का रे बाबा? काय करतोयस?’
एक शब्दही न बोलता तो आल्या वाटेवर माघारी फिरला. म्हातारा आश्चर्याने तोंडाचा आ वासून त्याच्याकडे पाहत राहिला.

एव्हाना सूर्यदेव ब-यापैकी वर आलेला होता. कालच्या पावसाने आज झाडं, वेली चांगली ताजीतवानी दिसत होती. सुकलेल्या पानांचे थरच्या थर खाली रस्त्यावर पडलेले होते. आजूबाजूच्या झाडीतून किड्यांचे, पक्ष्यांचे उत्साही आवाज ऐकू येत होते. एकूणच वातावरणात उत्साह आणि उल्हास भरलेला दिसत होता. कालच्या पावसामुळे सगळीकडे नवीन चैतन्य पसरल्याचं जाणवत होतं. गायींचे कळप घेऊन गुराखी आता रानाच्या दिशेने चालू लागलेले होते. त्यांच्या दुडदुड पायांचा आणि गळ्यातील घंटांचा आवाज मन अगदी प्रसन्न करत होता.

थोड्याच वेळात तो त्या घरापाशी पोहोचला. आता थोडासा लांबच उभा राहिला तो. काल संध्याकाळी त्यानं पाहिलेलं घर ते हे नव्हेच! एक उदासवाणी, अभद्र, भीषण छाया त्या वास्तूवर पसरलेली होती. इतस्ततः विखुरलेल्या कौलांतून गवताचे ढिगारेच्या ढिगारे उगवलेले होते. भिंतीवरील मातीचे पोपडे देखील मोठ-मोठ्या ढलप्या सुटून ढासळू लागले होते. बिजाग-या गंजलेलं दार आता वा-यावर करकर करत खिन्नपणे हलत होतं. वाळवी लागलेल्या खिडकीच्या आत अगदी अनादी अनंत अंधःकार पसरलेला. त्यातून कोणीतरी त्याच्यावर नजर ठेवून असावं बहुतेक! त्याच्या अंगावर शहारा आला.
सावधपणे पायाखाली माजलेल्या गवतातून हलकेच अदमास घेत तो घराच्या दिशेने सरकू लागला. अगदी कंबरभर उंचीचं गवत माजलेलं होतं. मधून मधून काहीतरी चोरटेपणाने सरपटत गेल्याची जाणीव होत असे. तो पंचवीस तीस पावलांचा छोटासा पट्टा ओलांडण्यास त्याला बराच वेळ गेला. सरतेशेवटी एका मोठ्या वारुळाला वळसा घालून तो खिडकीपाशी पोहोचला. जवळच एक मोठं, जाड बुंध्याचं आंब्याचं झाड उभं होतं. त्याची दाट, थंडगार सावली त्या खिडकीवर पडलेली होती. त्यामुळे आतला अंधार अजूनच भयानक वाटत होता.

सावधपणे तो त्या खिडकीवर झुकला. कुजलेल्या, वाळवीने पोखरलेल्या लाकडी पट्ट्यांचा वास तेथे घमघमत होता. आतला अंधार आता क्षणाक्षणाने त्याच्या जवळ येऊ लागला. खिडकीला कपाळ टेकवून तो आत पाहू लागला…
तो काल तिथे होता! त्याच्या मनाने त्याला खात्रीने सांगितलं. होय, इथेच तो काल रात्री होता. कालची घटना हा कसलाही भ्रम नव्हता. त्याने तिला पाहिलेलं होतं, तिच्या हातचं अन्न खाल्लेलं होतं आणि तिच्याच उबदार घरात त्याने काल आश्रय घेतलेला होता.

एक खोल श्वास घेऊन तो हळूच मागे झाला. आंब्याच्या काळोख्या सावलीत येऊन उभा राहिला. अजून त्याच्या छातीत धडधडत होतं. झाडावर एक चुकार पारवा उदासपणे घुमत बसलेला. त्या खिन्न वातावरणात ते घुमणं ऐकायला नको वाटत होते. त्याने त्या पक्ष्याला तिथून हाकलले. झाडाच्या बुंध्याला अलगदपणे पाठ टेकवून तो खाली बसला. येथे थोडीशी बसण्यापुरती जागा होती. कदाचित चुकार जनावरे रात्रीची येथे झाडाखाली आश्रय घेत असावीत.

मी काय करु तुझ्यासाठी? त्याने स्वतःच्या मनातच एक प्रश्न विचारला. काही क्षण गेले. अचानक एक कल्पना डोक्यात आली तसा तो उत्साहाने ताडकन उभा राहिला. त्याला आता अग्नी पाहिजे होता. पहाटे भेटलेल्या म्हाता-याच्या घराकडे तो भराभरा पावले टाकीत चालू लागला. थोड्याच वेळात तो तिथे पोहोचला. या वेळेला बाहेर कुणीही नव्हतं. त्याने चुलीत जळणारी दोन तीन भक्कम लाकडे उचलली आणि परत गावाबाहेरील त्या पडीक घराकडे तो वळला.

आता ऊन चांगलंच डोक्यावर आलेलं होतं. आंब्याच्या झाडाखाली तो येऊन उभा राहिला. जमिनीवर त्याने एक वर्तुळ काढलं. त्यात ती पेटती लाकडे त्याने व्यवस्थित रचली. मग काही एक विचार करुन हात जोडून त्याने मनापासून जगदंबेस प्रार्थना केलीः
“ या अग्नीच्या साक्षीने मी माझे आजपर्यंतचे उपासनेचे पुण्य खर्ची घालत आहे. पण या स्त्रीच्या आत्म्यास मुक्ती लाभू दे.”

बास! त्याला विधी, क्रिया, कर्म वगैरे काही माहीत नव्हतं. पण त्याला जे सुचलं ते त्यानं केलं. एवढंच त्याला बोलू वाटलं. जास्त काही बोलण्याची गरज नव्हती. अग्नी शांत होईतोवर तो तेथेच बसून राहिला. अग्नी शांत झाल्यावर मग मात्र त्याला नमस्कार करुन तो पुन्हा आपल्या रस्त्याला लागला.

रस्त्यावर थोडेसेच अंतर चालत गेला असेल तो काहीतरी प्रचंड कोसळल्याचा आवाज आला. त्याने दचकून मागे वळून पाहिलं. मधल्या झाडीझुडो-याने काही नीट दिसत नव्हतं. पण त्याने ओळखलं. ‘ते’ घर कोसळलेलं होतं. तिथे आता दगडमातीच्या ढिगा-याव्यतिरिक्त काहीही शिल्लक राहिलेलं नसेल! सगळंसगळं काही मातीशी एकरूप झालं असेल. त्या बाजूच्या झाडांवरुन धुळीचे लोटच्या लोट वर उठत होते.

“ती गेली!” त्याच्या मनाने त्याला सांगितलं.
त्या दिशेला नमस्कार करुन तो पुढे चालू लागला…
( क्रमश: )

कथा

प्रतिक्रिया

पैसा's picture

25 Apr 2016 - 12:42 pm | पैसा

!!!

फारच छान. क्रमशः नाहीये का?

विजय पुरोहित's picture

25 Apr 2016 - 12:51 pm | विजय पुरोहित

नेहमीप्रमाणे जुन्या भागांच्या लिंक्स द्यायला व क्रमशः लिहायला विसरलो आहे. संपादक्स! कृपया मदत करा!

आहा, सुंदर, इतका वेळ लाउ नका हो

बाबा योगीराज's picture

25 Apr 2016 - 1:04 pm | बाबा योगीराज

मांत्रिक बुआ,
देर आये दुरुस्त आये...!!!

नीलमोहर's picture

25 Apr 2016 - 2:11 pm | नीलमोहर

बरं वाटलं 'अवधूत' परत पाहून..
पुभाप्र.

अवधूतचा भाग न येण्याने माझ्या वाचनात एक उणीव राहिली असे वाटायचे!
आज ती भरून निघाली!
दंडवत घ्या!

असंका's picture

25 Apr 2016 - 10:15 pm | असंका

+१...

उणीव..छान मांडलंत. अगदी असंच रीकामपण जाणवायचं.

अवधूतचा भाग न येण्याने माझ्या वाचनात एक उणीव राहिली असे वाटायचे!
आज ती भरून निघाली!
दंडवत घ्या!

शित्रेउमेश's picture

25 Apr 2016 - 2:52 pm | शित्रेउमेश

मस्त... अगदी अप्रतिम.... पण पुढचे भाग लवकर येवुदेत...

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Apr 2016 - 3:11 pm | ज्ञानोबाचे पैजार

हा भागही आवडला थोडा लहान आहे.
पुढचा भाग जराशी मोठा लवकर आणि याचा आयडीने लिहा.
पैजारबुवा,

विजय पुरोहित's picture

25 Apr 2016 - 4:11 pm | विजय पुरोहित

=))
धन्यवाद माउली...

प्रचेतस's picture

25 Apr 2016 - 6:05 pm | प्रचेतस

उत्कृष्ट.

सप्तशृंग आणि मार्कंडेय हा परिसर अतिपरिचयाचा आणि आवडता असल्याने ह्या परिसराभोवती विणलेलं कथानकही अगदी आपलं वाटतं.

प्रचेतस's picture

25 Apr 2016 - 6:05 pm | प्रचेतस

उत्कृष्ट.

सप्तशृंग आणि मार्कंडेय हा परिसर अतिपरिचयाचा आणि आवडता असल्याने ह्या परिसराभोवती विणलेलं कथानकही अगदी आपलं वाटतं.

अभ्या..'s picture

25 Apr 2016 - 6:51 pm | अभ्या..

छान वर्णन.
येऊ द्या अजून.

जव्हेरगंज's picture

25 Apr 2016 - 7:15 pm | जव्हेरगंज

वाह !
मस्त !

राघव's picture

25 Apr 2016 - 7:49 pm | राघव

आधीचे भाग वाचावे म्हटले.. पण सपडले नाहीत.
लिंक्स लावा इथे.

विजय पुरोहित's picture

26 Apr 2016 - 10:30 am | विजय पुरोहित

भागवत साहेब, अतिशय धन्यवाद. संपादकांना विनंती की धाग्याच्या सुरुवातीला या लिंक्स जोडाव्यात तसेच कथेच्या शेवटी क्रमशः असे नमूद करावे.

सस्नेह's picture

26 Apr 2016 - 3:03 pm | सस्नेह

बदल केले आहेत.

कविता१९७८'s picture

25 Apr 2016 - 9:01 pm | कविता१९७८

मस्तच

स्रुजा's picture

25 Apr 2016 - 9:53 pm | स्रुजा

बर्‍याच दिवसांनी उगवलात मांत्रिक बुवा! सुरेख भाग जमलाय हा देखील. शेवटचा ट्विस्ट तर फार च छान. तुमची लेखनशैली अतिशय चित्रदर्शी आहे. संपूर्ण परिसर जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो. पुढच्या भागासाठी फार वाट पाहयला लावू नका आता.

एक एकटा एकटाच's picture

25 Apr 2016 - 9:59 pm | एक एकटा एकटाच

फारच सुरेख

मस्त

पुढचा प्रवास ज़रा बिगी बिगी करा महाराज

लॉरी टांगटूंगकर's picture

25 Apr 2016 - 10:52 pm | लॉरी टांगटूंगकर

मांत्रिकबुवा, तुमची लेखणी जबरदस्त आहे. थोडक्या शब्दात चित्र उभ करता तुम्ही. फारच भारी.
पुभालटा.

रातराणी's picture

26 Apr 2016 - 12:11 am | रातराणी

अप्रतिम! धन्यवाद _/\_

वैभव जाधव's picture

26 Apr 2016 - 1:01 am | वैभव जाधव

सुंदर चित्रदर्शी लिखाण. वाचकास समरस करून घेण्याची ताकद लेखणीस आणि लेखकास लाभलेली आहे.

संयमितपणे आणि आवश्यक तिथे ती वापरावी हि विनंती!

इडली डोसा's picture

26 Apr 2016 - 8:53 am | इडली डोसा

एवढ्या दिवसाच्या गॅप नंतर सुद्धा लगेच लिंक लागली. आता थांबु नका ... थोडा कोण्या एकाची भ्रमण गाथाची आठवण करुन देणारा प्रवास वाटतोय पण ते बहुतेक विषयातल्या साधर्म्यामुळे असेल.

जेपी's picture

26 Apr 2016 - 12:12 pm | जेपी

वाचतोय..
पुभाप्र..

पद्मावति's picture

26 Apr 2016 - 3:19 pm | पद्मावति

वाह, सुरेख!

वीणा३'s picture

27 Apr 2016 - 8:55 am | वीणा३

वचत्ये, पुभाप्र..

राही's picture

27 Apr 2016 - 9:42 am | राही

सुंदर झाला आहे हा भाग आणि पूर्ण मालिकासुद्धा.
आणखी असे सुंदर ललित येऊं दे.

विजय पुरोहित's picture

27 Apr 2016 - 10:23 am | विजय पुरोहित

सर्व वाचक आणि प्रतिसादक धन्यवाद...

सिरुसेरि's picture

11 Aug 2016 - 6:31 pm | सिरुसेरि

थरारक अनुभव