अवधूत (भाग-९)

प्रभास's picture
प्रभास in जनातलं, मनातलं
8 Sep 2016 - 12:29 pm

एकदम बेसावधपणेच तो पाण्यात कोसळला...

ग्ळक्क… ग्ळक्क…

पाण्याचे जोरदार घुटके नाकातोंडात वेगाने शिरले. डोक्यात एकदम जोरदार कळा उठल्या. काही क्षणांतच त्याचे पाय विहिरीच्या तळास लागले.

अचानक तो जाणीवेत परत आला. ही काय भानगड चालू आहे?

बंद झालेले डोळे चटकन उघडले. त्या एक दोन क्षणांतच त्याला मिटल्या डोळ्यांपुढे काहीतरी दिसलेलं होतं. अचानक विजेच्या प्रकाशात वस्तु झळाळून उठतात तसंच. पण ही विचार करण्याची वेळ नव्हती. नवीन श्वास घेणे आवश्यक आहे…

भराभर हातपाय मारत तो पाण्याच्या बाहेर आला. एव्हाना श्वास संपलेला होता. बाहेर येऊन त्याने नाकातोंडात शिरलेलं पाणी थुंकून काढलं. जोरात ढास लागलेली होती. थोडा वेळ तिथेच बसून त्याने पहिला श्वास पूर्ववत केला. मग झालेल्या घटना क्रमवार आठवून पाहिल्या. पाण्यात पडल्यावर त्याला बंद डोळ्यांसमोर जे ठिकाण दिसलेलं होतं ते त्यानं पाहिलं होतं यापूर्वी. कधीतरी तीन चार वर्षांपूर्वी.

‘ते मला आत्ताच का दिसावं? आणि ते ही असं पाण्यात पडल्यावर?’

त्याने बराच वेळ विचार केला…

‘कदाचित मी तिथे जावं असं तर सुचवायचं नाहीये ना कुणाला? पण मग पाण्यात ढकलून देण्याचं कारण काय?’
दोन्ही घटना एकत्र घडणे योगायोग असू शकतो…
‘मी त्या ठिकाणी जावं असंच कुणालातरी सुचवायचं आहे…’ शेवटी याच निष्कर्षाला तो ठामपणे पोहोचला.

एव्हांना विहिरीत पण कोवळी उन्हे आलेली होती. अर्धा अधिक भाग उजळून निघालेला होता. तिथे पाणी आता सौम्य हिरवं-निळं दिसत होतं. मघाचा काळाशार रंग गायब झालेला होता. पाणी खूप सुंदर दिसत होतं. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की मघाच्या गडबडीत कळशी पाण्यातच बुडालेली असण्याची शक्यता आहे. एकदम गार पाण्यात पडल्याने थंडी तर जोरदार वाजून येत होती. पण आत उतरून कळशी शोधण्याशिवाय पर्याय नाही आता.

चला… नाईलाजाने परत त्या थंडगार पाण्यात उतरणे आले…

***

पाण्याने भरलेल्या कळशा घेऊन परत जाताना मात्र त्याला खूप आनंदी वाटत होतं. कारण त्याने काय करायचं, कुठे जायचं हे त्याला मघाशी दिसून आलंय अशी त्याची खात्री झालेली होती. तो खोपटापाशी पोहोचला तेव्हां रंगनाथ बाहेर येऊन त्याची वाट पहात होता असं त्याला दिसलं.
“का रे बाबा? इतका उशीर?”
“काय विशेष नाही. गेलो तसा अंघोळच करुन आलो.” त्याने मुद्दामच बाकीचा काही विषय काढला नाही.
“मला वाटलं रस्ता चुकलास की काय?”
“छे! एवढा नेणता पोरगा आहे काय मी?”

दोघेही आत आले. आत येता-येताच त्याने लगेच पुढे निघण्याचा बेत रंगनाथला सांगून टाकला.
रंगनाथ थोडा नाराज झाला. “अरे जाशील की चार पाच दिवस राहून. इतकी काय घाई?”
“नको. काही महत्वाच्या गोष्टी आहेत. मला गेलेच पाहिजे. वेळ गेली की सगळं गेलं.”
“बरं मग किमान जेवून तरी जा.”
“ठीक आहे.”

***

सूर्य अद्याप डोक्यावर पण आला नव्हता. तेव्हां त्याने रंगनाथचा व त्याच्या पत्नीचा निरोप घेतला. रंगनाथने त्याला आवर्जून परत ये म्हणून सांगितलं. ते दोघे पती-पत्नी त्याला खोपटाच्या दाराशी निरोप देण्यास उभे राहिले. तो टेकाड उतरून जाईपर्यंत बराच वेळ ते त्याला पाहत होते…

पुन्हा वाटचाल सुरु. मऊमऊ धुळीने आणि कुरकुरीत वाळलेल्या पानांनी भरलेला रस्ता. पावलाला कुठे म्हणून काही टोचणार नाही. ऊन पण अगदी भर हिवाळ्यातलं कोवळं. काहीच त्रास होत नव्हता. त्याची चाल झपाट्याने वाढली.

त्याला जे ठिकाण दिसलं होतं ते ब्रह्मगिरीवरील एक मोठी कपार. एका प्रचंड मोठ्या कातळात तीन चार माणसे आरामात बसतील एवढी कपार होती. मूळ कपार छोटी असावी. नंतर कुणीतरी ती वाढवलेली होती. कधीतरी पाचसहा वर्षांपूर्वी तो तिथे गेला होता. तेव्हां ती कपार पाहिल्याचं त्याला आठवत होतं. काय असेल तिथे माझ्यासाठी?

विचार करत करत वेळ कसा गेला कळलं नाही. पण चालता चालता संध्याकाळ होत आली. सूर्य बुडायला थोडाच वेळ होता. जवळच तीन चार छोट्याशा झोपड्या दिसत होत्या. सोबत शेकोटी पण. इथेच आज रात्रीसाठी थांबावं. आपण जवळ पोहोचलोय अगदी. उद्या भल्या पहाटे निघालो तरी सूर्योदयाच्या वेळीच आपण पोहोचतोय आरामात. मग काय ब्रह्मगिरी चढायला फारसा कंटाळा येणार नाही. या विचारासरशी त्याला एकदम बरं वाटलं. आता काय मिळेल ते खाऊन मस्तपैकी ताणून द्यावी.

थोड्याच वेळात तो त्या झोपड्यांपाशी पोहोचला. भटके लोक असावेत. इतस्ततः फिरणारी नागडी मुले. तिथेच काही बाप्ये शेकोटीपाशी बसलेले. आतून झोपडीतून दाटसर धूर बाहेर येत होता. आणि बायकांचा खोकल्याचा आवाज. जेवण बनवण्याचं चालू असावं…

तो येताना बघून तिथल्या बाप्ये मंडळींच्या चेह-यावर थोड्याशा आठ्या पडल्याचं त्याला जाणवलं.
“नमस्कार. मी त्र्यंबकेश्वरला चाललो आहे. आज रात्रीपुरता इथे थांबू का?”
अचानक त्या दोघातिघांनी कसल्या तरी अगम्य भाषेत बडबडणं सुरु केलं. ही भाषा कुठली असावी? आपण त्यांना काय विचारलं हे तरी त्यांना कळलंय का?

नाही… कोण काय बोलतंय हे कुणालाच काहीच कळत नव्हतं. मग फारसा विचार न करता तो सरळ रस्त्यावर चालू लागला. हो, उगाच या माणसांना राग वगैरे आला तर काहीतरी वाईट प्रसंग ओढवायचा… तोच मागून एका माणसाने त्याला हाक मारली आणि आपल्याजवळ बोलवलं.

काय हाक मारली हे त्याला भाषेमुळे कळले नाही. पण तो माणूस त्याला बोलवत होता हे हातांच्या खुणेवरुन कळत होतं. तिथे गेल्यावर त्या माणसांनी त्याला बसण्याची खूण केली. त्यांचा आपापसात काहीतरी विषय चालू होता. पण समजत काही नव्हतं वेगळ्या भाषेमुळे. त्यांचा कदाचित खल चालू असावा या अनोळखी माणसाला इथे राहू द्यावे की नाही याबाबत.

मग थोड्या वेळाने त्यांच्यातील एका माणसाने आत जाऊन एक जुनाट सतरंजीचा तुकडा आणला त्याला बसण्यासाठी. यावरुन त्याने तर्क केला की आपल्याला इथे राहू देण्याबाबत त्यांना काही अडचण नाहीये. लगोलग एक बाई जुनाट पितळी थाळीत ताजी गरमागरम भाकरी आणि चटणी घेऊन बाहेर आली. सोबत पाणी प्यायला गडवा. त्या माणसांनी त्याला खाऊन घ्या अशी खूण केली आणि त्यांच्या त्यांच्या परत गप्पा चालू झाल्या. त्यांना त्याच्याशी फारसं देणं-घेणं नसावं. कदाचित भाषेच्या अडचणीमुळे पण मर्यादा येत असाव्यात. पण त्याच्या दृष्टीने बरंच झालं.

आता चांगलंच अंधारून आलेलं होतं. थंडी देखील बरीच पडलेली होती. ती माणसे देखील आत गेली आता. जाताना त्यांनी त्याला एक जाडजूड घोंगडं दिलं.
‘बिचारे चांगले आहेत लोक हे! कोण कुठचा मी? आणि किती केलं त्यांनी माझ्यासाठी.’ त्याच्या मनात विचारचक्र चालू होतं.

शेकोटी थोडी मंदावली होती. बाजूची थोडी जाड बाभळीची लाकडे उचलून त्याने आगीत टाकली. एकदम धडाधडा करुन लाकडं पेटली. एक-दोन कुत्री देखील तिथेच अंगाचं गोल मुटकुळं करुन शेकोटीभोवती उदासवाणी बसलेली होती. धडधडत्या शेकोटीकडे पाहत पाहत कधी डोळा लागला ते त्यालादेखील कळलं नाही.

(क्रमशः)

कथा

प्रतिक्रिया

शित्रेउमेश's picture

8 Sep 2016 - 12:42 pm | शित्रेउमेश

एवढा छोटा भाग???
पण मस्त अगदि....

बांधून ठेवणारे प्रसंग घडत नाहीत. वर्णन मात्र जोरात चालूय.
लिहिण्याची शैली सुरेख आहे पण व्हेअर इज मूळ कथावस्तू?

बांधून ठेवणारे प्रसंग घडत नाहीत. या उद्देशाने कथा वाचली तर निराशाच होईल. ही एक साधी, आंतरिक सत्याच्या शोधात निघालेल्या माणसाच्या प्रवासाची कथा आहे. आणि याच प्रवासातील सौंदर्य या कथेत अनुभवायला मिळेल. व्यावहारीक साहित्यलेखनाचे सौंदर्य या कथेत मिळणार नाही हे मात्र खरेच! :)

व्हेअर इज मूळ कथावस्तू? ईश्वराच्या शोधात निघालेला एक सामान्य व्यक्ती, त्याचा प्रवास, त्याला भेटणा-या व्यक्ती, त्याला आंतरीक प्रवासात येणारे अनुभव हेच मांडणार आहे कथेतून. रूढार्थाने कदाचित तुम्हाला कथावस्तू दिसली नाही तरी त्यातून मला आंतरीक शोधाचा जो प्रवास मांडायचा आहे तोच माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे...

ओके , नो प्रॉब्लेम.

येऊ द्या.

अमित खोजे's picture

9 Sep 2016 - 12:52 am | अमित खोजे

हे म्हणजे द अलकेमिस्ट सारखंच झालं. लहानपणी जेव्हा वाचले तेव्हा काहिच कळाले नाही. पण नंतर समजले की तो प्रवास हिच एक कथा होती.

"it's not the destination but the journey that matters!"

प्रभास's picture

9 Sep 2016 - 9:23 am | प्रभास

बरोबर. अगदी अचूक बोललात.

क्षमस्व's picture

9 Sep 2016 - 4:58 pm | क्षमस्व

अगदी मनातलं बोललात।
यावरून द दार्जिलिंग एक्सप्रेस हा नितांतसुंदर चित्रपट आठवला।
तसेच जिंदगी ना मिलेगी दोबारा।

वाचतेय. जरा मोठे भाग आल्यास बरे.

प्रभास दादा... कथा एके कथा! आवडलं!!

वरिल सर्व प्रतिसादांशी सहमत . अवधुत हा रंगनाथच्या तावडीतुन अखेर सुटला .

बाबा योगिराज's picture

8 Sep 2016 - 2:24 pm | बाबा योगिराज

हा भाग जरा छोटाच झाला. पुढील भाग जरा लवकर लवकर येऊ द्या.
आम्ही सर्व वाचक मंडळी वाट पाहात आहोत.

बाबा योगीराज.

विजय पुरोहितही हेच होते ना?

कवितानागेश's picture

8 Sep 2016 - 2:35 pm | कवितानागेश

वाचतेय.
माणसांचे आणि वातावरणाचे वर्णन छान वाटतंय वाचायला.

प्रचेतस's picture

8 Sep 2016 - 2:41 pm | प्रचेतस

ब्रह्मगिरीवरील कपार पाहून तिथला भंडारदुर्ग आठवला.
खूप परिचय आहे ब्रह्मगिरिशी.

पैसा's picture

8 Sep 2016 - 2:46 pm | पैसा

एका निवांत लयीत चाललेले निवेदन. मस्त वाटते आहे वाचायला.

पद्मावति's picture

9 Sep 2016 - 12:47 am | पद्मावति

एका निवांत लयीत चाललेले निवेदन. मस्त वाटते आहे वाचायला.

+१

रातराणी's picture

8 Sep 2016 - 3:55 pm | रातराणी

वाचतेय. पुभाप्र!

क्षमस्व's picture

8 Sep 2016 - 6:55 pm | क्षमस्व

दण्डवत घ्या।
खूपच सुंदर।।

एक एकटा एकटाच's picture

8 Sep 2016 - 9:29 pm | एक एकटा एकटाच

छान झालाय

हाही भाग

सर्व वाचक व प्रतिसादकर्ते धन्यवाद!

अलका सुहास जोशी's picture

9 Sep 2016 - 10:43 am | अलका सुहास जोशी

आवडली शैली आणि कथाप्रवासही.

सहावा भाग सापडला नाही.. इतर सगळे भाग वाचले आणि आवडले. पुभाप्र.
अवधूत चा एक भाग वाचताना आठवलं कि सम्राट अकबराची अशी धारणा होती कि तो गेल्या जन्मीचा संन्यासी आहे आणि एका अपुऱ्या इच्छेसाठी त्याला हा राजाचा जन्म घ्यावा लागला आहे.

प्रभास's picture

14 Sep 2016 - 11:30 am | प्रभास
पथिक's picture

14 Sep 2016 - 2:44 pm | पथिक

धन्यवाद.

इनिगोय's picture

14 Sep 2016 - 3:36 pm | इनिगोय

सगळ्या भागांचे दुवे सुरुवातीला द्या प्लीज.
वाचत आहे. पुभाप्र.

प्रभास's picture

15 Sep 2016 - 12:53 pm | प्रभास

सध्या तरी माझ्या ब्लॉगवर क्रमाने वाचायला मिळेल... पुढील भागापासून देत जाईन जुन्या भागांचे दुवे... :)
http://jspandit.blogspot.in/