जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : ३ : ख्मेर राजधानी "अंगकोर"

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
1 Mar 2014 - 12:19 am

==================================================================

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२...

==================================================================

...आजचा शेवटचा थांबा बघून झाल्याची मार्गदर्शिकेने घोषणा केली आणि दिवसभराचा शीण उसळून आला. कधी एकदा हॉटेलवर परततो आणि गरम गरम शॉवर घेतो असे झाले.

सहलिचा पुढचा दिवस मोठ्या म्हणजे अगदी फार मोठ्या उत्सुकतेने उजाडला. कारण त्या दिवशी सहललितल्या सर्वोत्तम आकर्षणाकडे जायचे होते. ही सगळी सहल ज्याला मध्यवर्ती ठेऊन आखली होती असे ते ठिकाण होते... ख्मेर साम्राज्याची राजधानी "अंगकोर".

अंगकोरचे अवशेष आताचे कंबूज शहर सिएम रीपच्या जवळ आहेत. अंगकोरच्या जागतीक प्रसिद्धीमुळे सिएम रीप नावारुपाला येऊन एक आघुनिक शहर बनले आहे. तेथे प्रवाश्यांच्या सोईकरता अनेक सुविधा, अनेक प्रकारची तारांकित हॉटेल्स आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

विमानाने आकाशात भरारी घेतली आणि नॉम् पेन् चा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो... आणि थोड्याच वेळात कंबोडियाचा भातशेतीचा भाग दिसू लागला..


 ......

पण ते दृश्य फार काळ टिकले नाही. कारण आमच्या सहली अगोदर दोन महिने कंबोडियात पावसाने हाहा:कार माजवून जलप्रलय केला होता. त्याच्या अजूनही न मिटलेल्या खाणाखूणा आणि शेतजमिनीची झालेली दुर्दशा दिसू लागली. दोन महिने झाल्यानंतही शेतातले पाणी कायमच होते आणि शेते पाण्याच्या ओघाबरोबर वाहून आलेल्या दगड-मातीने भरलेली होती...


 .....
कंबोडियातील महापूराने केलेली शेतीची अवस्था

अंगकोरची, त्याच्या आजूबाजूच्या शेतीची आणि पर्यायाने ख्मेर साम्राज्याची वाताहात होण्यास तेथील बदललेले हवामान आणि त्यामुळे आलेले ओल्या-सुक्या दुष्काळांचे दुष्टचक्र कारणीभूत झाले असा एक सिद्धांत आहे. त्याची एक झलक पहायला मिळाली.

अंगकोरमधील प्राचीन देवळांत पाणी भरण्याचा अंदाज वर्तवला गेला होता आणि त्यामुळे जगभरच्या पुरातत्वसंशोधकांत खळबळ माजल्याचे बातम्यांत वाचले होते. सुदैवाने अंगकोरला त्या वादळी हवामानाचा व महापुराचा फटका अपेक्षेपेक्षा बराच कमी बसला होता आणि तो अंदाज खरा झाला नाही. हे एक दु:खात सुख होते.

२५० किलोमीटरचे अंतर ४५ मिनीटात कापून विमान सिएम रीपवर पोहोचले आणि सुस्थितीतल्या मानवी वस्तीच्या खाणाखूणा दिसू लागल्या. सिएम रीपच्या छोटेखानी विमानतळाची इमारत साध्या पारंपारीक शैलीत बांधलेली आहे...


सिएम रीप आंतरराष्ट्रिय विमानतळ

जरी इमारत लहान होती तरी अनेक देशांची विमाने तिथे उडता-उतरताना दिसत होती आणि प्रवाश्यांची संख्याही लक्षणीय होती.

येथेही मार्गदर्शकाने गाडीत बसल्या बसल्या हॉटेलवर जाण्याऐवजी तडक सहल सुरू करायचा सल्ला दिला. विमानाचा प्रवास फक्त ४५ मिनीटांचा होता, त्याअगोदर सज्जड न्याहरी झालेली होती आणि मुख्य म्हणजे अंगकोर भेटीची आस लागलेली होती त्यामुळे त्या सूचनेला नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता ! सामान गाडीत टाकले आणि तसेच निघालो. अर्ध्या तासातच गाडी जगप्रसिद्ध अंगकोर वट जवळून जाऊ लागली...


अंगकोर वट सभोवती असलेल्या मोटेचे आणि तटबंदीचे प्रथम दर्शन

गाईडने त्याच्याकडे निर्देश करून आपण तेथे नंतर जाणार आहोत, त्याअगोदर इतर महत्वाची ठिकाणे पाहणे जास्त सोईस्कर होईल असे सांगीतले. तेव्हा जरा रागानेच इटिनेररी परत चाललि आणि घ्यानात आले की अंगकोर वट जरी सर्वात जास्त जगप्रसिद्धी मिळालेले आकर्षण असले तरी अंगकोरमध्ये युनेस्को वर्ल्ड हेरिटेज दर्जाची अजून अनेक आकर्षणे आहेत. हे जरी अगोदर वाचलेले असले तरी इतर देवळांची इतकी कमी प्रसिद्धी झाली आहे की त्यांना भेट दिल्यावर आणि वारंवार थक्क झाल्यावरच त्या गोष्टीवर विश्वास बसतो... आणि आपण संपूर्ण अंगकोरच्या चक्क प्रेमात पडतो !

अंगकोर

अंगकोर हे काही एक मंदिर किंवा प्राचीन अवशेषांचे एक आवार नाही. ही आहे सतत ६०० वर्षे दक्षिणपूर्व आशियावर सत्ता असलेल्या आणि दक्षिणपूर्व आशियामार्गे होणार्‍या भारत-युरोप-चीन यांच्यातील व्यापारावर नियंत्रण असलेल्या साम्राज्याची राजधानी. अंगकोर हा शब्द संस्कृत शब्द नगर यावरून ख्मेर भाषेत येता येता "नगर --> नोगोर --> नोकोर --> अंगकोर" असा झाला आहे. इ स ८०२ मध्ये कौडिण्य नावाच्या राजपुत्राने दुसरा जयवर्मन या नावाने राज्याभिषेक करवून स्वतःला ख्मेर साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट घोषित केले आणि राजा हा शिवाचा अंश म्हणून त्याला "देवराजा" असे संबोधण्याची प्रथा सुरू केली हे आपण अगोदरच्या भागांत पाहिले आहेच. नवव्या शतकापासून थायलंडच्या (त्याकाळचा सयाम) आयुथ्थाया (आयोध्या) राज्याने पाडाव करेपर्यंत अंगकोर ही ख्मेर साम्राज्याची राजधानी होती.

या काळात येथे एक हजारापेक्षा जास्त देवळे बांधली गेली... त्यांची आताची अवस्था "शेती आणि माळरानांवर पसरलेले असंख्य विस्कळीत दगड" ते "आकारमानामुळे, स्थापत्यशैलीमुळे आणि कोरीवकामामुळे जगप्रसिद्ध झालेल्या अंगकोर वट सारखे अजून बर्‍याच सुस्थितीत असलेले मंदिर" अशी आहे. त्यातली काही देवळे ते पाषाण मूळ स्थानी बसवून पुनर्स्थापित केली गेली आहेत तर अजून बर्‍याच मंदिरांच्या पुनर्स्थापनेचे काम चालू आहे. आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने आधुनिक पद्धतीने उपग्रहचित्रणाव्दारे इ स २००७ मध्ये केलेल्या पाहणीत असे आढळून आले आहे की अंगकोर औद्योगिक क्रांती होण्याअगोदरच्या काळातील सर्वात मोठे शहर होते. सुमारे १,००० चौरस किमीपेक्षा जास्त क्षेत्रफळावर पसरलेल्या या शहरात पाणी, सांडपाणी, रस्ते, इ सर्व मूलभूत गरजांची उत्तम संरचना (elaborate infrastructure system) होती. (या बाबतीत दोन क्रमांकावरचे शहर माया संस्कृतीतले आताच्या ग्वाटेमाला देशातले "तिकाल" हे आहे. त्याचे क्षेत्रफळ १०० ते १५० चौ किमी होते. आजच्या पुणे शहराचे क्षेत्रफळ ७०० चौ किमी आणि नवी मुंबईचे ३४४ चौ किमी आहे. यावरून अंगकोरच्या भव्यतेची कल्पना यावी.) एवढ्या मोठ्या शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दर देवळासभोवताच्या खंदकांत, मोठमोठ्या तलावांत आणि काही घरांच्या जवळच्या मध्यम ते लहान आकाराच्या तळ्यांत पाणी साठवून ते सर्व पाण्याचे साठे कालव्यांनी एकमेकाला जोडलेले होते. मेकाँग आणि तोन्ले साप नद्यांतील पाणी खास बांधलेल्या कालव्यांतून त्या साठ्यांत सोडले जात असे. याशिवाय या नद्यांच्या तोडीचीच पावसाचे पाणी अडवून कालव्यांत सोडण्याची तिसरी मानवनिर्मित जलप्रणाली त्याकाळच्या ख्मेर अभियंत्यांनी बांधली होती.

अंगकोर शहराच्या चार दिशांना असलेल्या मुख्य चार तलावांपैकी (Baray) सगळ्यात मोठ्या पश्चिमेकडच्या तलावाचा आकार ८ किमी X २ किमी होता. ११ व्या शतकाच्या मध्यात बांधलेला पश्चिम दिशेचा तलाव आजही आस्तित्वात आहे आणि त्यात अजूनही मासेमारीही केली जाते. पूर्ण भरल्यावर या तलावात सद्या ५३० लक्ष घनमीटर पाणी साठते. अंगकोरच्या एकूण लोकवस्तीबद्दल संशोघकात पूर्णपणे एकमत नाही. पण, शहरातील मूलभूत व्यवस्था आणि नैसर्गीक-मानवनिर्मित तळी व कालवे बांधून रचलेल्या शेतीच्या प्रणालींवरून तेथे १०,००,००० (दहा लाख) लोक राहू शकत असावे असा अंदाज आहे ! (२०११ च्या जनगणने प्रमाणे नवी मुंबईची लोकसंख्या साधारण ११ लाख होती.)

देवळांच्या भोवतीचे खंदक हे दुग्धसागराचे प्रतिक, मधले विशाल आणि उंच मंदीर म्हणजे देवनिवास मेरू पर्वत आणि त्याच्या टोकावर असलेल्या गर्भागृहात देवराजाचे शिवलिंगाच्या स्वरूपातले आस्तित्व अशी बर्‍याच देवळांची मांडणी आहे. येथिल अंगकोर वट मंदिर हे जगातील आतापर्यंतचे सर्वकाळचे सर्वात मोठे धार्मिक बांधकाम आहे. दरवर्षी अंगकोरला वीस लाखापेक्षा जास्त प्रवासी भेट देतात आणि त्या संख्येत दरवर्षी भर पडत आहे.

बांधकामाचा वारसा अनेक राजांनाही मिळाला होता. इ स ८८९ मध्ये सत्तेवर आलेला सम्राट यशोवर्मन हा स्वतः नावाजलेला अभियंता होता आणि त्याने यशोधरापुरा नावाची ख्मेर साम्राज्याची जुनी राजधानी वसवली.

अंगकोरच्या मध्यभागाच्या २४ किमी X ८ किमी इतक्या क्षेत्रफळात ७२ मोठी मंदिरे आणि इतर प्राचीन महत्वाच्या इमारती आहेत. याखेरीज याच भागात असलेल्या इतर प्राचीन अवशेषांची संख्या अनेक शेकड्यांत जाते. अंगकोरच्या मध्यवर्ती भागाच्या नकाशावर नजर टाकली तर त्याच्या आवाक्याची थोडीबहूत कल्पना येईल...


अंगकोरच्या मध्यवर्ती भागाचा नकाशा (जालावरून साभार)

हा नकाशा पाहून, सात दिवसांचा प्रवासी पास घेऊन अंगकोर बघायला जाणारे प्रवासीही "अंगकोर काय नीटसं पाहिलं नाही बुवा. परत एकदा यायलाच पाहिजे." असं मनात घोळवीत का परत जातात, हे कळायला सोपं जाईल !

चारशे वर्षांच्या खरोखरच्या वनवासानंतर (तेथे इतके जंगल वाढले होते की अंगकोर जनमानसातून विस्मरणात गेले होते !) १९०१ साली या परिसराचा अभ्यास करण्यासाठी French School of the Far East ने अनुदान देऊन संशोधकांची तुकडी पाठवली... आणि जगाला एका प्राचीन आकारमान, स्थापत्यशास्त्र आणि शिल्पसमृद्धी या सर्व दृष्टीने आश्चर्यकारक असा नजराणा मिळाला!

केवळ "अंगकोर वट" या एका मदिराच्या प्रसिद्धीने आणि वाचनाने खेचून नेलेल्या मलाही तेथे प्रत्यक्ष पोहोचल्यानंतर दुसर्‍या दिवशीच हा सर्व प्राचीन खजीना अपेक्षेपेक्षा कितीतरी पटींनी मोठा आणि जास्त आश्चर्यकारक आहे हे उमजायला लागले होते. त्यामुळे अंगकोर पूर्ण पाहून होण्याअगोदरच "जर कुठली मोठी सफर परत करणे शक्य झाले तर अंगकोरचा क्रमांक पहिला असणार" असे मी जाहीर केले !

चला, आता निघूया हा सगळा खजीना पहायला. अर्थातच सर्व जागा पाहणे तेथे बराच काळ ठिय्या मारून बसल्याशिवाय बघणे शक्यच नाही. तसेच तेथे खरंच काय आहे याची पूर्ण कल्पना स्वतः भेट देऊन डोळ्यानी पाहिल्याशिवाय येणे शक्य नाही. मात्र आमच्या चार दिवसांच्या धावत्या भेटीत बघितलेल्या मुख्य ठिकाणांना एक एक करत माझ्या तुटपुंजा शब्दसंपत्तीतून आणि कॅमेर्‍याच्या डोळ्यातून जेवढे जमेल तेवढे पहायला पुढच्या भागापासून सुरूवात करूया.

(क्रमशः )

==================================================================

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२...

==================================================================

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

1 Mar 2014 - 12:27 am | मुक्त विहारि

त्रिवार दंडवत.

१. तुमच्या लेखनशैलीला.
२. तुमच्या फोटोग्राफीला
३. कुठलाही वैयक्तीक स्वार्थ नसतांना आमच्या सारख्या फुकट्या वाचकांसाठी स्वता:चा वेळ खर्च कर्रून लेखमाला लिहीण्यासाठी.

(प्रत्येकवेळी असाच प्रतिसाद लिहीणे, साध्य होत नसल्याने, हा प्रतिसाद कॉपी-पेस्ट कर्र्रुन ठेवला आहे.)

अनिरुद्ध प's picture

1 Mar 2014 - 11:59 am | अनिरुद्ध प

+१११११ पूर्णपणे सहमत.

लॉरी टांगटूंगकर's picture

1 Mar 2014 - 6:01 pm | लॉरी टांगटूंगकर

+१११११

अत्रुप्त आत्मा's picture

2 Mar 2014 - 12:04 pm | अत्रुप्त आत्मा

++++१११११

प्रचेतस's picture

2 Mar 2014 - 12:39 pm | प्रचेतस

प्रचंड सहमत.

आत्मशून्य's picture

1 Mar 2014 - 1:01 am | आत्मशून्य

.

खटपट्या's picture

1 Mar 2014 - 8:41 am | खटपट्या

मस्त

विवेकपटाईत's picture

1 Mar 2014 - 11:18 am | विवेकपटाईत

अतिशय सुंदर फोटो आणि वर्णन

बॅटमॅन's picture

1 Mar 2014 - 11:56 am | बॅटमॅन

हे फार म्ह. फारच जबरी!!!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Mar 2014 - 12:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुक्त विहारि, आत्मशून्य, खटपट्या, विवेकपटाईत, बॅटमॅन आणि अनिरुद्ध प : धन्यवाद ! पुढच्या भागापासून एक एक मंदिर पाहताना कंबोडियाची खरी सुरू होईल !

यापैकी कोणताही/सगळे आणि असे अनेक शब्द लिहिण्यापेक्षा आणखी जास्त काय लिहु शकतो?

सगळेच फोटो आणि सविस्तर माहिती आवडली हे मात्र आवर्जुन सांगतो.

मुक्त विहारि यांच्या प्रतिसादाला अनुमोदन!

जेपी's picture

1 Mar 2014 - 6:11 pm | जेपी

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:

रेवती's picture

1 Mar 2014 - 6:38 pm | रेवती

वाह! चांगले वर्णन आणि छायाचित्रे आहेत. पुढील सहलीची उत्सुकता आहे.

अनन्न्या's picture

1 Mar 2014 - 7:28 pm | अनन्न्या

आम्ही पण तयार आहोत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Mar 2014 - 9:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

मन्द्या, जेपी, रेवती आणि अनन्न्या : धन्यवाद !

अस्वस्थामा's picture

1 Mar 2014 - 9:40 pm | अस्वस्थामा

मस्त सुरुवात..!
आता वाट पाह्तोय पुढच्या सफरीची.. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Mar 2014 - 12:24 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

मदनबाण's picture

3 Mar 2014 - 10:29 am | मदनबाण

मस्तच ! या मंदिरांच आणि आकाशातल्या तार्‍यांच्या स्थीतीचा काही संबंध आहे,असं काहीस फार पूर्वी वाचल्याचं आठवतयं ! पण नक्की दुवा लक्षात येत नाही.
Angkor Wat
[सॅटेलाईट इमेज :- अंगकोर वट {जालावरुन} }

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Mar 2014 - 12:24 am | डॉ सुहास म्हात्रे

भारत व दक्षिणपूर्वेतल्या प्राचीन काळातील बर्‍याच इमारती ज्योतिशास्त्र (अ‍ॅस्ट्रॉलोजी) आणि / किंवा मंत्र-यंत्र यावर बेतलेल्या आहेत. विषेशतः अंगकोर आणि जावा साम्राज्यात (ज्यांच्यावर भारतिय संस्कृतीचा प्रबळ प्रभाव होता) हे प्रामुख्याने दिसते.

याबाबतीत अंगकोरबद्दल येथे अधिक माहिती आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Mar 2014 - 12:33 am | डॉ सुहास म्हात्रे

आणि येथे नॉम् बाखेंग बद्दल माहिती आहे. ते मंदिर म्हणजे खुद्द एक कॅलेंडर आहे !

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Mar 2014 - 12:36 am | डॉ सुहास म्हात्रे

आणि येथे नॉम् बाखेंग बद्दल माहिती आहे. ते मंदिर म्हणजे खुद्द एक कॅलेंडर आहे !

पैसा's picture

10 Mar 2014 - 2:59 pm | पैसा

प्रचंड माहिती आणि सुंदर छायाचित्रे! आमच्यासारख्यांनी स्वतः तिथे जायचीही गरज नाही. घरबसल्या मस्त सफर होते आहे!