मनरक्षिता (२)

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
25 Jun 2013 - 6:11 am

मनरक्षिता (१)
चैतीला आठवत होतं तसं ती अन आई दोघीच रहात होत्या. तिचा बाप मोठा उमदा माणूस होता असं आई सांगे. गावाशी दावा मांडून जोगतिणीच्या पोरीबरोबर लग्न करणारा हिम्मतवान गडी ! ताराबरोबर लग्न केल्यावर तिला गावाचा त्रास व्हायला नको म्हणून राहता गाव सोडून दहा गावापलीकडच्या उंबरगावात राहायला आलेला. चैती तीन वर्षाची असताना एका दहा वर्षाच्या पोराला पुरातनं वाचवायला म्हणून गेला अन परत आलाच नाही. पोर वाचलं पण हा नदीतनं धारेला लागला.
तो गेल्यावर तारानं दुसरा घरोबा केला नाही. चरितार्थाला काम शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण जिथं जाई तिथं तिच्या पुनवेच्या चांदासारख्या उजळ रुपानं घात होई. ..पुन्हा जोगवा मागण्याशिवाय तिला काही पर्यायच उरला नाही.
तारा नेक धर्माने वागणारी, कडकडीत व्रते पाळणारी पाक जोगतीण . गावातल्या आया-बाया तिला मानत. काही अडचण आली, काम अडकलं, जिवाला उतार होईनासा झाला, काही कोडं पडलं, उपाय चालेना झाला, की बाया, माणसं, ताराकडं येत. देवीच्या मुखवट्यासमोर हात जोडून व्यथा सांगत. तारा कुणाला घरात ठेवायला मुठभर तांदूळ देई, कुणाला खायला केळे, तर कुणाला देवीचा भंडारा देई घरात उधळायला. काम घेऊन येणारा पाक मनाचा असेल, तर त्याला फळ मिळालं नाही, असं कधीच झालं नाही. पुढच्या खेपेला येताना तो रिकाम्या हाताने काही येत नसे. आजूबाजूच्या पंचक्रोशीत ताराची, एक सत्वशील अन पुण्याईची शक्ती पाठीशी असलेली जोगतीण अशी ख्याती झालेली. ..अन वाईट वंगाळ वागणारे तिला जरा वचकूनच असत.
उतारा मागायला येणाऱ्यांची वर्दळ संपली, रात्रीची जेवणं झाली, की तारा चैतीला पोटाशी घेऊन अंगणात चांदण्यांनी भरलेल्या आभाळाखाली बसे. काय-बाय बोलत राही. कधी चैतीच्या बापाच्या आठवणी, कधी देवीची स्तोत्रे, मंत्र सांगे. कधी अडचणीवरचे उपाय, तोडगे कसे वापरायचे ते सांगे. कधी ताऱ्यांची घरे दाखवून गणिते करायला शिकवी. तर कधी मातीच्या, वाऱ्याच्या अन झाडांच्या गंधावरून त्यांच्या अंतरंगात दडलेले गुपित ओळखायला शिकवी.
मधूनच दानम्माच्या देवळातला चौघडा दूरवरून मंद साद घालत असे.
‘तू देवीची लै लाडकी हैस बघ..’ आई म्हणे.
‘कशावरून ?’ चैती मोठ्ठाले पिंगट तपकिरी डोळे विस्फारून विचारी.
‘अगं तुझ्या अंगात जल्मापासनच हे गुण हायती. ही झाडं, वारा, चांदण्या समदे तुझ्याबरोबर बोलत्यात. तुला उमगतंय त्यांचं बोलणं...’
‘चल, कायतरीच... मला कसं समजल त्यांचं बोलणं ?’
‘ऐक ऐक, कायबी बोलू नको. गप्प ऐक नुसतं...’ असं म्हणून आई चैतीला पोटाशी धरून तिच्या डोळ्यावर हात ठेवी. मग चैती मिटल्या डोळ्यांनी चाहूल घ्यायचा प्रयत्न करी, कधी कधी काहीच व्हायचं नाही. कधी कधी मात्र दानम्माच्या देवळातली वीणा भागामावशी वाजवताना कानात शिरत, तसले मंद स्वर मनात कुठूनसे दरवळून उठत. कधी कधी, एकदम हजार पाखरे कलकलाट करावीत तसा भास होई. कधी माध्यान्हीच्या सूर्याकडं नजर गेल्यावर दिपते तशी दृष्टी उजळून निघे. तर कधी अंगभर एक लाट , एक लय बहरून उठे. चांदण्यांच्या झुल्यावर झुलल्यासारखे वाटे. मग चैतीला खूप गम्मत येई. ती डोळे मिटून झुल्यावर झुलत राही....अन हळू हळू झोपेच्या अधीन होई.
..आत्ता सुद्धा एसटीच्या खिडकीतून दिसणारा रात्रीच्या गाढ निळ्या आभाळाचा तुकडा पाहताना चैतीच्या डोळ्यासमोर तो चांदण्यांनी भरलेला आभाळाचा घुमट उभा राहिला...अन आईचे बोल दूरवर दानम्माच्या देवळातला पडघम वाजावा तसे मनात घुमत राहिले.
आजीबरोबर तिच्या खोपट्यात राहू लागल्यावर आजीने तिचे नाव गावातल्या सरकारी शाळेत घातले. चैतीला शाळा बिलकुल आवडली नाही. अन ते मास्तर बघून तर तिला गावाकडच्या अण्णा लोहाराची आठवण झाली. तसेच भट्टीतल्या लालभडक इंगळागत डोळे ,आसुरी नजर अन पानानं लाल झालेल्या तोंडात सैरावैरा फिरत समोरच्याला कैचीत पकडून ऐरणीवर धरणारी घणाघाती जीभ ! आजीला अन तिला बघितल्याबरोबर पानाची पिंक टाकल्यागत तुच्छतेने बोलले,
‘हं ..आता जोगतिणींच्या पण पोरी शाळेत यायला लागल्या तर...!’.
चैतीला लई भ्या वाटलं त्यांना बघून. घरी आल्यावर ती आजीला म्हणाली, ‘आज्जे, मी नाय जाणार त्या शाळेत ! त्ये मास्तर बरोबर नाय.’
‘आगं साळत काय त्येला बगायला जायाचं हाय काय ? आपुन निसतं शिकाय जायाचं.’
आज्जीनं चैतीला अखेर शाळेत धाडलंच.
पयल्याच दिवशी मास्तरनी तिच्याकडे पुस्तक नाही म्हणून चार छड्या मारल्या. पोरांना छळण्यात मास्तरला आसुरी आनंद होत असे. महिना होईपर्यंत चैतीचा दम पुरता खलास झाला.
.. अन त्या दिवशी तर मास्तरनं हद्दच केली. चैतीच्या मागं बसलेल्या भिरी अन सरावनी भांडू लागल्या तर मास्तरानं त्येंच्याबरोबर चैतीलापण दिवसभर बाहेर उन्हात कोंबडा करून उभा केलं. उन्हानं तिघींची तोंडं लालेलाल झाली .
आज्जीकडं तक्रार करून काहीच उपेग नव्हता. रात्री अंथरुणावर आज्जीजवळ कलंडल्यावर मात्र तिच्या डोळ्यातलं पाणी तिला न जुमानता ओसंडू लागलं.
‘आये, कुठं हायस तू ? मला लै भ्या वाटतंय गं.’ तिचं बालमन आक्रंदून उठलं. पिंगट तपकिरी डोळे त्या पाण्यातून निजेच्या काठाकाठावर तरंगताना जागृती-सुषुप्तीच्या सीमारेषेवर एकाएकी काहीतरी घडलं.
..... जाणीव अन नेणीव यांच्या संधिकाळातल्या त्या निसरड्या क्षणी पराकोटीचे भय, तीव्र संताप अन वांझ अगतिकता यांचा एक स्फोटक संयोग झाला आत्यंतिक उद्वेगाच्या दबावाने मन:पटलाचे अनेकरंगी पदर सपासप दूर झाले अन खोलवर एक कळ दाबली गेली कोणतीतरी अनामिक आदिम प्रेरणा कार्यरत झाली तापलेली हवा वर वर जाऊन थंड ढगाला भिडली अन भयाच्या तलम धाग्यावरून वीज सरसरत यावी तशी एक अनोखी संवेदना चैतीच्या अर्धजागृत मनाला स्पर्शून गेली. चक्रीवादळाच्या भोवऱ्यानं केळीला घेरावं तसं त्या भारलेल्या संवेदनेनं चैतीला घेरलं. एकाएकी तिच्या कानात आईचे बोल घुमले, ‘तुला कुणाचं भ्या वाटलं, तर तेला सपनात बघ....’
कुणीतरी भूल घातल्यागत बघता बघता चैतीचे डोळे मिटले गडद झोपेनं गाठता गाठता तिचा मिटला डोळा सपान बघू लागला.
..... वर्गात चैती एकटीच उभी. सगळी पोरं मैदानात खेळायला गेलेली. मास्तर हातात छडी घेऊन तिच्याकडं येत हुता. त्याचे इंगळासारखे लाल डोळे इतके जवळ आले की त्यांच्या धगीनं चैती उभी होरपळू लागली. मास्तरच्या हातातली छडी वर वर जाऊ लागली.... आता ती सपकन खाली येणार एवढ्यात कुणीतरी मास्तरचा हात धरला. एवढ्या गच्च की त्याला तो खालीच करता येइना. बघता बघता मास्तरचा चेहेरा वेडावाकडा झाला. वेदनेने पार पिळवटला...छड्या मारल्यावर पोरांचा होतो, तसा. अन मग त्याचा जणू पुतळा झाला..शाळेच्या बाहेर चौकात गांधीबाबांचा होता तसा.
पुढं काय झालं ते चैतीला समजलं नाही, कारण गाढ झोपेने आईसारखं तिला कुशीत वेढून घेतलं.
(क्रमश: )

मांडणीकथारेखाटनविरंगुळा

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

25 Jun 2013 - 8:44 am | कपिलमुनी

मस्त वेग पकडाला आहे ..जरा मोठे भाग येउ द्या

प्रचेतस's picture

25 Jun 2013 - 8:49 am | प्रचेतस

जबरदस्त.
वातावरणनिर्मिती अतिशय सुरेख.

पैसा's picture

25 Jun 2013 - 9:48 am | पैसा

अगदी खिळवून ठेवणारी कथा!

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Jun 2013 - 9:59 am | ज्ञानोबाचे पैजार

हा भागही मस्त जमला आहे. कथा कोणत्या वळणावर जाणार याचा अंदाज यायला लागला आहे. जास्त उत्सुकता न ताणता पुढचे भाग पटापट टाका.

विटेकर's picture

25 Jun 2013 - 10:07 am | विटेकर

..... जाणीव अन नेणीव यांच्या संधिकाळातल्या त्या निसरड्या क्षणी पराकोटीचे भय, तीव्र संताप अन वांझ

अगतिकता यांचा एक स्फोटक संयोग झाला आत्यंतिक उद्वेगाच्या दबावाने मन:पटलाचे अनेकरंगी पदर सपासप दूर झाले अन खोलवर एक कळ दाबली गेली कोणतीतरी अनामिक आदिम प्रेरणा कार्यरत झाली तापलेली हवा वर वर जाऊन थंड ढगाला भिडली अन भयाच्या तलम धाग्यावरून वीज सरसरत यावी तशी एक अनोखी संवेदना चैतीच्या अर्धजागृत मनाला स्पर्शून गेली.

बॅटमॅन's picture

25 Jun 2013 - 11:26 am | बॅटमॅन

वर्णन खल्लास जमले आहे!!!

स्पंदना's picture

25 Jun 2013 - 12:09 pm | स्पंदना

जाणीव अन नेणीव यांच्या संधिकाळातल्या त्या निसरड्या क्षणी पराकोटीचे भय, तीव्र संताप अन वांझ अगतिकता यांचा एक स्फोटक संयोग झाला आत्यंतिक उद्वेगाच्या दबावाने मन:पटलाचे अनेकरंगी पदर सपासप दूर झाले अन खोलवर एक कळ दाबली गेली कोणतीतरी अनामिक आदिम प्रेरणा कार्यरत झाली तापलेली हवा वर वर जाऊन थंड ढगाला भिडली अन भयाच्या तलम धाग्यावरून वीज सरसरत यावी तशी एक अनोखी संवेदना चैतीच्या अर्धजागृत मनाला स्पर्शून गेली. चक्रीवादळाच्या भोवऱ्यानं केळीला घेरावं तसं त्या भारलेल्या संवेदनेनं चैतीला घेरलं

जबरदस्त!!!

भावना कल्लोळ's picture

25 Jun 2013 - 3:09 pm | भावना कल्लोळ

सहमत

अभ्या..'s picture

25 Jun 2013 - 1:11 pm | अभ्या..

असं काही स्नेहातै ने लिहिलेलं वाचलं की लै अभिमान वाटतो तिचा.
जब्रा लिहिते एकदम

कवितानागेश's picture

25 Jun 2013 - 1:38 pm | कवितानागेश

भारी लिवलय! :)

पिलीयन रायडर's picture

25 Jun 2013 - 1:46 pm | पिलीयन रायडर

ज-ह-ब-ह-रा-ट!!!!!!

पिशी अबोली's picture

25 Jun 2013 - 3:10 pm | पिशी अबोली

सुंदर..

Mrunalini's picture

25 Jun 2013 - 3:27 pm | Mrunalini

वाव.. खुप छान लिह्लय.. पुभाप्र.

लईच भारी! लौकर टाका पुढचा भाग!

स्वाती दिनेश's picture

25 Jun 2013 - 7:51 pm | स्वाती दिनेश

हा भागही छान जमला आहे,
स्वाती

दिपक.कुवेत's picture

25 Jun 2013 - 8:36 pm | दिपक.कुवेत

हा हि भाग मस्त. पण एवढा छोटा का? जरा मोठे टाक कि....

अर्धवटराव's picture

25 Jun 2013 - 11:42 pm | अर्धवटराव

काय प्रसंग उभे केले आहेत... अत्यंत समर्पक रुपके.
लय भारी.

अर्धवटराव

शिल्पा ब's picture

26 Jun 2013 - 2:51 am | शिल्पा ब

हा भाग पण आवडला..

अनन्न्या's picture

26 Jun 2013 - 7:06 pm | अनन्न्या

पुढचा भाग लवकर येऊ दे!

किसन शिंदे's picture

26 Jun 2013 - 8:17 pm | किसन शिंदे

काय लिहू तै? वर्णन एवढं जबरदस्त लिहलंय की मला लिहायला शब्द सुचत नाहीयेत. आणि अशा चमत्कारी छापाच्या कथांनी माझ्या मनाचा एक मोठ्ठा कोपरा व्यापला आहे.

_/\_

छानच लिहिलीये कथा! वाचतिये.

विजुभाऊ's picture

26 Jun 2013 - 11:31 pm | विजुभाऊ

मस्त फ्लो मेन्टेन झालाय.

इन्दुसुता's picture

27 Jun 2013 - 6:46 am | इन्दुसुता

दोन्ही भाग आवडले.
पुभाप्र.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jun 2013 - 7:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्तच. पहिला भाग वाचल्यावरच कथा संपली असं वाटल्यानंतर दुसर्‍या भागात कथेनं पुन्हा चांगला ताल धरलाय.
लगे रहो.

-दिलीप बिरुटे

अग्निकोल्हा's picture

27 Jun 2013 - 7:17 pm | अग्निकोल्हा

मुळात सुरु का झालं वा नॅरॅशन छानच पण... रोचकता कशी टिकणार याबाबत विचार करायला भाग पाडणारं लिखाण.