Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सस्नेह on Tue, 06/25/2013 - 06:11
लेखनविषय (Tags)
मांडणी
कथा
रेखाटन
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा
मनरक्षिता (१) चैतीला आठवत होतं तसं ती अन आई दोघीच रहात होत्या. तिचा बाप मोठा उमदा माणूस होता असं आई सांगे. गावाशी दावा मांडून जोगतिणीच्या पोरीबरोबर लग्न करणारा हिम्मतवान गडी ! ताराबरोबर लग्न केल्यावर तिला गावाचा त्रास व्हायला नको म्हणून राहता गाव सोडून दहा गावापलीकडच्या उंबरगावात राहायला आलेला. चैती तीन वर्षाची असताना एका दहा वर्षाच्या पोराला पुरातनं वाचवायला म्हणून गेला अन परत आलाच नाही. पोर वाचलं पण हा नदीतनं धारेला लागला. तो गेल्यावर तारानं दुसरा घरोबा केला नाही. चरितार्थाला काम शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण जिथं जाई तिथं तिच्या पुनवेच्या चांदासारख्या उजळ रुपानं घात होई. ..पुन्हा जोगवा मागण्याशिवाय तिला काही पर्यायच उरला नाही. तारा नेक धर्माने वागणारी, कडकडीत व्रते पाळणारी पाक जोगतीण . गावातल्या आया-बाया तिला मानत. काही अडचण आली, काम अडकलं, जिवाला उतार होईनासा झाला, काही कोडं पडलं, उपाय चालेना झाला, की बाया, माणसं, ताराकडं येत. देवीच्या मुखवट्यासमोर हात जोडून व्यथा सांगत. तारा कुणाला घरात ठेवायला मुठभर तांदूळ देई, कुणाला खायला केळे, तर कुणाला देवीचा भंडारा देई घरात उधळायला. काम घेऊन येणारा पाक मनाचा असेल, तर त्याला फळ मिळालं नाही, असं कधीच झालं नाही. पुढच्या खेपेला येताना तो रिकाम्या हाताने काही येत नसे. आजूबाजूच्या पंचक्रोशीत ताराची, एक सत्वशील अन पुण्याईची शक्ती पाठीशी असलेली जोगतीण अशी ख्याती झालेली. ..अन वाईट वंगाळ वागणारे तिला जरा वचकूनच असत. उतारा मागायला येणाऱ्यांची वर्दळ संपली, रात्रीची जेवणं झाली, की तारा चैतीला पोटाशी घेऊन अंगणात चांदण्यांनी भरलेल्या आभाळाखाली बसे. काय-बाय बोलत राही. कधी चैतीच्या बापाच्या आठवणी, कधी देवीची स्तोत्रे, मंत्र सांगे. कधी अडचणीवरचे उपाय, तोडगे कसे वापरायचे ते सांगे. कधी ताऱ्यांची घरे दाखवून गणिते करायला शिकवी. तर कधी मातीच्या, वाऱ्याच्या अन झाडांच्या गंधावरून त्यांच्या अंतरंगात दडलेले गुपित ओळखायला शिकवी. मधूनच दानम्माच्या देवळातला चौघडा दूरवरून मंद साद घालत असे. ‘तू देवीची लै लाडकी हैस बघ..’ आई म्हणे. ‘कशावरून ?’ चैती मोठ्ठाले पिंगट तपकिरी डोळे विस्फारून विचारी. ‘अगं तुझ्या अंगात जल्मापासनच हे गुण हायती. ही झाडं, वारा, चांदण्या समदे तुझ्याबरोबर बोलत्यात. तुला उमगतंय त्यांचं बोलणं...’ ‘चल, कायतरीच... मला कसं समजल त्यांचं बोलणं ?’ ‘ऐक ऐक, कायबी बोलू नको. गप्प ऐक नुसतं...’ असं म्हणून आई चैतीला पोटाशी धरून तिच्या डोळ्यावर हात ठेवी. मग चैती मिटल्या डोळ्यांनी चाहूल घ्यायचा प्रयत्न करी, कधी कधी काहीच व्हायचं नाही. कधी कधी मात्र दानम्माच्या देवळातली वीणा भागामावशी वाजवताना कानात शिरत, तसले मंद स्वर मनात कुठूनसे दरवळून उठत. कधी कधी, एकदम हजार पाखरे कलकलाट करावीत तसा भास होई. कधी माध्यान्हीच्या सूर्याकडं नजर गेल्यावर दिपते तशी दृष्टी उजळून निघे. तर कधी अंगभर एक लाट , एक लय बहरून उठे. चांदण्यांच्या झुल्यावर झुलल्यासारखे वाटे. मग चैतीला खूप गम्मत येई. ती डोळे मिटून झुल्यावर झुलत राही....अन हळू हळू झोपेच्या अधीन होई. ..आत्ता सुद्धा एसटीच्या खिडकीतून दिसणारा रात्रीच्या गाढ निळ्या आभाळाचा तुकडा पाहताना चैतीच्या डोळ्यासमोर तो चांदण्यांनी भरलेला आभाळाचा घुमट उभा राहिला...अन आईचे बोल दूरवर दानम्माच्या देवळातला पडघम वाजावा तसे मनात घुमत राहिले. आजीबरोबर तिच्या खोपट्यात राहू लागल्यावर आजीने तिचे नाव गावातल्या सरकारी शाळेत घातले. चैतीला शाळा बिलकुल आवडली नाही. अन ते मास्तर बघून तर तिला गावाकडच्या अण्णा लोहाराची आठवण झाली. तसेच भट्टीतल्या लालभडक इंगळागत डोळे ,आसुरी नजर अन पानानं लाल झालेल्या तोंडात सैरावैरा फिरत समोरच्याला कैचीत पकडून ऐरणीवर धरणारी घणाघाती जीभ ! आजीला अन तिला बघितल्याबरोबर पानाची पिंक टाकल्यागत तुच्छतेने बोलले, ‘हं ..आता जोगतिणींच्या पण पोरी शाळेत यायला लागल्या तर...!’. चैतीला लई भ्या वाटलं त्यांना बघून. घरी आल्यावर ती आजीला म्हणाली, ‘आज्जे, मी नाय जाणार त्या शाळेत ! त्ये मास्तर बरोबर नाय.’ ‘आगं साळत काय त्येला बगायला जायाचं हाय काय ? आपुन निसतं शिकाय जायाचं.’ आज्जीनं चैतीला अखेर शाळेत धाडलंच. पयल्याच दिवशी मास्तरनी तिच्याकडे पुस्तक नाही म्हणून चार छड्या मारल्या. पोरांना छळण्यात मास्तरला आसुरी आनंद होत असे. महिना होईपर्यंत चैतीचा दम पुरता खलास झाला. .. अन त्या दिवशी तर मास्तरनं हद्दच केली. चैतीच्या मागं बसलेल्या भिरी अन सरावनी भांडू लागल्या तर मास्तरानं त्येंच्याबरोबर चैतीलापण दिवसभर बाहेर उन्हात कोंबडा करून उभा केलं. उन्हानं तिघींची तोंडं लालेलाल झाली . आज्जीकडं तक्रार करून काहीच उपेग नव्हता. रात्री अंथरुणावर आज्जीजवळ कलंडल्यावर मात्र तिच्या डोळ्यातलं पाणी तिला न जुमानता ओसंडू लागलं. ‘आये, कुठं हायस तू ? मला लै भ्या वाटतंय गं.’ तिचं बालमन आक्रंदून उठलं. पिंगट तपकिरी डोळे त्या पाण्यातून निजेच्या काठाकाठावर तरंगताना जागृती-सुषुप्तीच्या सीमारेषेवर एकाएकी काहीतरी घडलं. ..... जाणीव अन नेणीव यांच्या संधिकाळातल्या त्या निसरड्या क्षणी पराकोटीचे भय, तीव्र संताप अन वांझ अगतिकता यांचा एक स्फोटक संयोग झाला आत्यंतिक उद्वेगाच्या दबावाने मन:पटलाचे अनेकरंगी पदर सपासप दूर झाले अन खोलवर एक कळ दाबली गेली कोणतीतरी अनामिक आदिम प्रेरणा कार्यरत झाली तापलेली हवा वर वर जाऊन थंड ढगाला भिडली अन भयाच्या तलम धाग्यावरून वीज सरसरत यावी तशी एक अनोखी संवेदना चैतीच्या अर्धजागृत मनाला स्पर्शून गेली. चक्रीवादळाच्या भोवऱ्यानं केळीला घेरावं तसं त्या भारलेल्या संवेदनेनं चैतीला घेरलं. एकाएकी तिच्या कानात आईचे बोल घुमले, ‘तुला कुणाचं भ्या वाटलं, तर तेला सपनात बघ....’ कुणीतरी भूल घातल्यागत बघता बघता चैतीचे डोळे मिटले गडद झोपेनं गाठता गाठता तिचा मिटला डोळा सपान बघू लागला. ..... वर्गात चैती एकटीच उभी. सगळी पोरं मैदानात खेळायला गेलेली. मास्तर हातात छडी घेऊन तिच्याकडं येत हुता. त्याचे इंगळासारखे लाल डोळे इतके जवळ आले की त्यांच्या धगीनं चैती उभी होरपळू लागली. मास्तरच्या हातातली छडी वर वर जाऊ लागली.... आता ती सपकन खाली येणार एवढ्यात कुणीतरी मास्तरचा हात धरला. एवढ्या गच्च की त्याला तो खालीच करता येइना. बघता बघता मास्तरचा चेहेरा वेडावाकडा झाला. वेदनेने पार पिळवटला...छड्या मारल्यावर पोरांचा होतो, तसा. अन मग त्याचा जणू पुतळा झाला..शाळेच्या बाहेर चौकात गांधीबाबांचा होता तसा. पुढं काय झालं ते चैतीला समजलं नाही, कारण गाढ झोपेने आईसारखं तिला कुशीत वेढून घेतलं. (क्रमश: )
  • Log in or register to post comments
  • 8394 views

Book traversal links for मनरक्षिता (२)

  • ‹ मनरक्षिता ( १)
  • Up
  • मनरक्षिता (३) ›

प्रतिक्रिया

Submitted by कपिलमुनी on Tue, 06/25/2013 - 08:44

Permalink

छान

मस्त वेग पकडाला आहे ..जरा मोठे भाग येउ द्या
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 06/25/2013 - 08:49

Permalink

जबरदस्त.

जबरदस्त. वातावरणनिर्मिती अतिशय सुरेख.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 06/25/2013 - 09:48

Permalink

जबरदस्त!

अगदी खिळवून ठेवणारी कथा!
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Tue, 06/25/2013 - 09:59

Permalink

दानम्माचा आशिर्वाद आहे तुमच्यावर

हा भागही मस्त जमला आहे. कथा कोणत्या वळणावर जाणार याचा अंदाज यायला लागला आहे. जास्त उत्सुकता न ताणता पुढचे भाग पटापट टाका.
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on Tue, 06/25/2013 - 10:07

Permalink

जबर्या.... अप्रतिम

..... जाणीव अन नेणीव यांच्या संधिकाळातल्या त्या निसरड्या क्षणी पराकोटीचे भय, तीव्र संताप अन वांझ
अगतिकता यांचा एक स्फोटक संयोग झाला आत्यंतिक उद्वेगाच्या दबावाने मन:पटलाचे अनेकरंगी पदर सपासप दूर झाले अन खोलवर एक कळ दाबली गेली कोणतीतरी अनामिक आदिम प्रेरणा कार्यरत झाली तापलेली हवा वर वर जाऊन थंड ढगाला भिडली अन भयाच्या तलम धाग्यावरून वीज सरसरत यावी तशी एक अनोखी संवेदना चैतीच्या अर्धजागृत मनाला स्पर्शून गेली.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 06/25/2013 - 11:26

Permalink

वर्णन खल्लास जमले आहे!!!

वर्णन खल्लास जमले आहे!!!
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Tue, 06/25/2013 - 12:09

Permalink

जाणीव अन नेणीव यांच्या

जाणीव अन नेणीव यांच्या संधिकाळातल्या त्या निसरड्या क्षणी पराकोटीचे भय, तीव्र संताप अन वांझ अगतिकता यांचा एक स्फोटक संयोग झाला आत्यंतिक उद्वेगाच्या दबावाने मन:पटलाचे अनेकरंगी पदर सपासप दूर झाले अन खोलवर एक कळ दाबली गेली कोणतीतरी अनामिक आदिम प्रेरणा कार्यरत झाली तापलेली हवा वर वर जाऊन थंड ढगाला भिडली अन भयाच्या तलम धाग्यावरून वीज सरसरत यावी तशी एक अनोखी संवेदना चैतीच्या अर्धजागृत मनाला स्पर्शून गेली. चक्रीवादळाच्या भोवऱ्यानं केळीला घेरावं तसं त्या भारलेल्या संवेदनेनं चैतीला घेरलं
जबरदस्त!!!
  • Log in or register to post comments

Submitted by भावना कल्लोळ on Tue, 06/25/2013 - 15:09

In reply to जाणीव अन नेणीव यांच्या by स्पंदना

Permalink

+१

सहमत
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 06/25/2013 - 13:11

Permalink

जब्रा

असं काही स्नेहातै ने लिहिलेलं वाचलं की लै अभिमान वाटतो तिचा. जब्रा लिहिते एकदम
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Tue, 06/25/2013 - 13:38

Permalink

भारी लिवलय!

भारी लिवलय! :)
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 06/25/2013 - 13:46

Permalink

ज-ह-ब-ह-रा-ट!!!!!!

ज-ह-ब-ह-रा-ट!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by पिशी अबोली on Tue, 06/25/2013 - 15:10

Permalink

सुंदर..

सुंदर..
  • Log in or register to post comments

Submitted by Mrunalini on Tue, 06/25/2013 - 15:27

Permalink

वाव.. खुप छान लिह्लय..

वाव.. खुप छान लिह्लय.. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 06/25/2013 - 18:45

Permalink

लईच भारी! लौकर टाका पुढचा भाग

लईच भारी! लौकर टाका पुढचा भाग!
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Tue, 06/25/2013 - 19:51

Permalink

अरे वा..

हा भागही छान जमला आहे, स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक.कुवेत on Tue, 06/25/2013 - 20:36

Permalink

जब्राट

हा हि भाग मस्त. पण एवढा छोटा का? जरा मोठे टाक कि....
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Tue, 06/25/2013 - 23:42

Permalink

कसलं खतरनाक.

काय प्रसंग उभे केले आहेत... अत्यंत समर्पक रुपके. लय भारी. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Wed, 06/26/2013 - 02:51

Permalink

हा भाग पण आवडला..

हा भाग पण आवडला..
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्न्या on Wed, 06/26/2013 - 19:06

Permalink

सुंदर भाषाशैली!

पुढचा भाग लवकर येऊ दे!
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Wed, 06/26/2013 - 20:17

Permalink

काय लिहू तै? वर्णन एवढं

काय लिहू तै? वर्णन एवढं जबरदस्त लिहलंय की मला लिहायला शब्द सुचत नाहीयेत. आणि अशा चमत्कारी छापाच्या कथांनी माझ्या मनाचा एक मोठ्ठा कोपरा व्यापला आहे. _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 06/26/2013 - 22:59

Permalink

छानच लिहिलीये कथा! वाचतिये.

छानच लिहिलीये कथा! वाचतिये.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Wed, 06/26/2013 - 23:31

Permalink

मस्त फ्लो मेन्टेन झालाय.

मस्त फ्लो मेन्टेन झालाय.
  • Log in or register to post comments

Submitted by इन्दुसुता on गुरुवार, 06/27/2013 - 06:46

Permalink

दोन्ही भाग आवडले. पुभाप्र.

दोन्ही भाग आवडले. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 06/27/2013 - 07:51

Permalink

स्सही.

मस्तच. पहिला भाग वाचल्यावरच कथा संपली असं वाटल्यानंतर दुसर्‍या भागात कथेनं पुन्हा चांगला ताल धरलाय. लगे रहो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on गुरुवार, 06/27/2013 - 19:17

Permalink

हे सगळं संपणार कधि ?

मुळात सुरु का झालं वा नॅरॅशन छानच पण... रोचकता कशी टिकणार याबाबत विचार करायला भाग पाडणारं लिखाण.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com