मनरक्षिता ( १)

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
20 Jun 2013 - 1:20 pm

तिचे पिंगट तपकिरी डोळे भयाने विस्फारले होते. घामेजलेल्या कपाळावर तांबूस भुऱ्या केसांच्या बटा चिपकून बसल्या होत्या. घशातून बाहेर पडू पाहणारा हुंदका ओठावर दाबून धरलेल्या तिच्याच हाताच्या पंजाने शर्थीने रोखून धरला होता. समोरच्या दृश्याचा अर्थ लावण्यात तिच्या आठ वर्षाच्या चिमुकल्या मेदुला अपयश येत होते. पण चालले आहे ते काहीतरी भयंकर आहे अन आपण आवाज न करता गप्प बसण्यातच शहाणपणा आहे, इतके तिला नक्कीच उमजत होते.
दानम्माच्या देवळाच्या अंधाऱ्या ओवरीत ती एका कोपऱ्यात दबकून बसली होती. अन ते चार धटिंगण देवळामागच्या त्या निर्मनुष्य मंडपात, संध्याकाळच्या संधिप्रकाशात तिच्या आईच्या अंगाशी झोंबत होते. आईचे लुगडे पार चिंध्या केले होते त्यांनी. आई सुरुवातीला जोरजोरात किंचाळत होती. पण नंतर आशेची ज्योत विझल्यावर स्फुंदत मुकाट पडून राहिली होती.
पाहता पाहता अंधारून आले. किती वेळ गेला हे चैतीच्या ध्यानीमनी नव्हते. देवळाच्या आवाराच्या भिंतीखालून नदीच्या घोंगावणाऱ्या प्रवाहाचा ‘स्स स्स’ असा आवाज कानावर पडत होता…. आईच्या वेदनामय सुस्काऱ्यासारखा.
ते चार धटिंगण खिदळत, आपापसात मस्करी करत निघून गेल्यावर चैतीचा कोंडून धरलेला हुंदका एकदम बाहेर पडला. ती ओवरीच्या कोपऱ्यातून धडपडत उठली अन रडत रडत तिनं, डोळे मिटून निपचित पडलेल्या आईला मिठी घातली.
‘आई गं , उठ की..उठ ..’ ती कळवळून पुन्हा पुन्हा म्हणत राहिली.
सताठ हाका दिल्यावर आईने डोळे उघडले.
‘अगं चैतू, बाळा..’ म्हणत ती मोठ्या कष्टानं उठून बसली. चिंध्या झालेलं लुगडं तसच सावरून तिनं अंगावर गुंडाळलं. चैतीला दोनी हातानी कवळून ती दबक्या स्वरात स्फुंदू लागली.
‘वैऱ्यानी घात केला गं माझा. ध्याई नासवली...! आई दानम्मा , का दया आली नाही तुला लेकराची..अशी कशी गं कोडगी झालीस ?’
दोघी अंधारात एकमेकीला मिठी घालून मुसमुसत राहिल्या. घटकाभरानं आई कशीबशी उठली. चैतीचा चिमुकला हात तिनं हातात घेतला अन म्हणाली ‘चल..’.
गाभाऱ्याला अर्धा वळसा घालून दोघी देवीच्या समोर आल्या. दोन मोठ्या समयांच्या मंद प्रकाशात देवीचा पितळी मुखवटा अन लाल खड्यांचे डोळे चमकून उठले. आई डोळे मिटून दोन क्षण मूर्तीसमोर उभी राहिली. तिनं डोळे उघडले तेव्हा तिच्या डोळ्यात निर्धार पेटला होता.
‘जन्मभर तुझं व्रत सांभाळलं अन अखेरीस हात सोडलास गं बायो. पण त्याच व्रताची आण हाय तुला. न्याय दे मला. जाणतेपणी येव्हाराला चुकले नसेन तर सजा दे त्या चौघांना. ...या जन्मी इतकीच सेवा तुझ्या पायाशी, गं, माये..’ ती म्हणाली अन तिनं देवीच्या समोर ठेवलेल्या टोपलीतला भंडारा मुठीनं उचलला. मागं वळून आपल्या आठ वर्षाच्या मुलीच्या कपाळावर तो माखला अन म्हणाली,
‘माझ्या पोरी, आयुष्यभराची कमाई देते आहे तुला..संभाळ. वाईट वंगाळाची साथ धरू नको. नेक रस्ता सोडू नको. माझी पुण्याई अन आई दानम्माची किरपा हाय तुझ्या पाठीशी. नीट ऐक... तुझ्याशी कुणी वंगाळ वागलं, तुला कुणाचं भ्या वाटलं, तर तेला सपनात बघ..मग आई दानम्मा अन मी बघून घेऊ सगळं.....
जा आता, तुझ्या आज्जीकडं जा पोरी. अंधार पडायच्या आत सूट...जा..’
अन आईनं चैतीला घाई झाल्यासारखं गावाकडच्या वाटेवर लोटलं.
तिला काहीच समजलं नाही. आईला सोडून आत्ता कुठंही जायचं नव्हतं तिला. पण आईंचा शब्द म्हणजे तिला देवीच्या आज्ञेसारखा. पालथ्या मुठीनं डोळे पुसत ती वाट चालू लागली.
..आज अमावस्या. दुपार टळल्यावर नेहमीप्रमाणे ती अन आई गावाबाहेरच्या टेकडीवरल्या दानम्मा देवीला परडी द्यायला गेल्या होत्या. चैतीचा बाप वारल्यानंतर गेल्या पाच वर्षात हा नेम चुकला नव्हता. अन हा नेम माहिती असलेल्या त्या चौघांनी बरोबर डाव साधला. दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालताना चैती नेहमीप्रमाणे मागच्या नदीच्या प्रवाहातल्या गोल गोल भोवर्‍यांकडे कडे बघत दोन घटका थबकली तेवढ्यात आईची दबकी किंकाळी ऐकून ती धावतच ओवरीत शिरली... अन ते दृश्य बघून तिथेच मुरून बसली ... नको त्या दृश्याची साक्षीदार झाली...
गावाकडे जाणाऱ्या वाटेच्या पहिल्या वळणावर ती वळली असेल नसेल तोच मागून धाडदिशी आवाज आला. मागं वळून बघितलं तर आई दिसेना. पळत पळत ती परत देवळात शिरली. गाभाऱ्याभवती भिरीभिरी फिरली. आईचा पत्ता नाही. काहीतरी मनात येऊन ती एकदम मागच्या आवाराच्या भिंतीपाशी गेली अन तिनं खाली वाकून नदीकडं पाहिलं. खाली, गोल वळण घेऊन गेलेल्या प्रवाहाशेजारी काळ्या कातळावर आईंचा देह रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता ! ..त्या दृश्याचा अर्थ जेव्हा मेंदू भेदून तिला पोरकेपणाची जाणीव करून देऊन गेला तेव्हा ती किंचाळत सुटली. पण किंचाळी अर्धवट असतानाच तिला बेशुद्धीनं घेरलं.
चैतीला शुद्ध आली तेव्हा ती आपल्या आज्जीच्या मिठीत होती. जना जोगतीण, तिच्या आईची आई, पलीकडच्या गावात राहत होती. आपल्या एकुलत्या एक लेकीच्या, ताराच्या, मृत्यूचा अभद्र समाचार समजताच ती टाकोटाक हजर झाली . पोरक्या नातीला कवटाळून ती मूक अश्रू ढाळत होती. चैती दोन दिवस निसुध होती.
ताराच्या देहाला अग्नी दिला तिच्या चुलत दिरानं. भावजय वारलेली समजल्यावर तो चार गावापलीकडून आला होता, भावाचं डबोलं घ्यायला ! पण ताराच्या खोपट्यात रिकामी गाडगी सोडून दुसरं काहीच मिळालं नाही, तसा त्याचा हिरमोड झाला.
दोन दिवस औषधोपचार झाल्यावर आज चैतीनं डोळे उघडले. चैतीचा चुलता आज्जीला सांगत होता.
‘ नाय, आमी सांभाळली असती तिला. पर आमचीबी अडचण हाय. तिच्या चुलतीची तब्येत कुठं धड असती ? आमचं आमाला फुरं झालय बगा जनामामी.’
ताराचं क्रियाकर्म पार पडलं अन जनानं चैतीची होती ती चार कपडे आपल्या पिशवीत घातली. तिला घेऊन गावाची एसटी पकडली. त्या एक दिवसात चैतीला शेजारच्या आयाबायांकडून समजलं ते एवढंच...
... ‘त्या’ चौघांपैकी एक टेकडीवरून खाली येतानाच ठेच लागून पडला ते थेट वाटेखालच्या दगडी सुळक्यावर. डोके फुटून तिथंच खलास झाला.
दुसरा त्याला सावरायला म्हणून गेला अन कुणीतरी ढकलल्यासारखा वाटेवरून गडगडत खाली आला. कपाळ झाडावर आपटून जे बेशुद्ध झाला ते अजून शुद्धीवर आलाच नाही.
बाकीचे दोघे गावात येत असताना एकाएकी उधळलेल्या बैंलाने तिसऱ्याला शिंगावर घेऊन आपटले. त्याचे मणके तुटून आयुष्यभरासाठी अंथरूणाचा धनी झाला.
...अन चौथा त्याच बैंलाचा पिच्छा सोडवण्याच्या प्रयत्नात असताना त्याचा पाय वारुळात पडून नाग डसला. जीव वाचला पण डोळे गेले त्या विषाने...
गावातले लोक ताराबद्दल हळहळत होते अन त्या चौघांच्या दशेचं आश्चर्य करत होते. बायका दबक्या स्वरात कुजबुजत होत्या.. ‘ताराची साधनाच तशी हुती..आई दानम्मानच सजा दिली त्या हलकटांना..’
चैतीच्या मनाच्या कुंद तळ्यावर हे ऐकून खोल कुठेतरी एक तरंग तेवढा उमटला....
‘....हां बरोबर, हे असंच व्हायचं होतं...!!.’
(क्रमश: )

कथारेखाटनविरंगुळा

प्रतिक्रिया

वा. छान झालाय लेख.. पुभाप्र

अनन्न्या's picture

20 Jun 2013 - 5:52 pm | अनन्न्या

.................

पैसा's picture

20 Jun 2013 - 6:13 pm | पैसा

कथा अगदी सुरेख जमलीय. वेगळ्या जगाचं दर्शन घडवणारी कथा. पुढचा भाग लवकर येऊ दे.

भावना कल्लोळ's picture

20 Jun 2013 - 6:20 pm | भावना कल्लोळ

खूप छान, खिळवून ठेवणारा लेख. मस्त

प्रचेतस's picture

20 Jun 2013 - 6:44 pm | प्रचेतस

तुमच्या नेहमीच्या लिखाणापे़क्षा वेगळ्या धर्तीची कथा
कथा आवडली. पुभाप्र.

चौकटराजा's picture

20 Jun 2013 - 6:53 pm | चौकटराजा

कथा शैलीदार झालीय. इथल्या दशानन या आयडी प्रमाणे आपल्याला ही साहित्यिक शैली आहे. आप्पा दांडेकरांच्या कृतींच्या वाचनाचा संस्कार तर नाही ??
अवांतर- माझ्या आयुष्यात मला त्रास ( विनाकारण ) देणार्‍या किमान दहा जणांना नियतीने शासन केलेले आहे. योगायोग दहाही वेळेला असेल म्हणा !

प्यारे१'s picture

20 Jun 2013 - 7:08 pm | प्यारे१

खतरा सुरुवात!
येऊ दे लवकर लवकर.
आणि नेहमीच्या यशस्वी कलाकारांसाठी एखादा डिस्क्लेमर टाका. :)

कथा खरं तर संपल्यासारखी वाटली.
त्यानंतर 'क्रमशः' वाचून कुतूहल वाढले आहे हे नक्की.

बॅटमॅन's picture

21 Jun 2013 - 5:52 pm | बॅटमॅन

हेच म्हणतो. कथा इथे संपल्यासारखी वाटतेय. जे लुळेपांगळे परंतु जिवंत राहिले त्यांना शासन मिळणे ही लाईन सोडली तर क्रमशः मध्ये काय असेल याची उत्सुकता आहे.

आणि वर्णनशैली उत्तमच. वातावरणनिर्मिती खल्लास जमलीये!!!

सुरुवात भडक तरिही अतिशय परिणामकारक. अस्वस्थता मनात लगेच निर्माण झालि.

होय, फँटसी खरीच. पण तुमच्या आमच्या मनात खोलवर दडलेली एक सुप्त फँटसी !

रेवती's picture

21 Jun 2013 - 4:34 am | रेवती

वाचतिये.

स्पंदना's picture

21 Jun 2013 - 4:46 am | स्पंदना

अतिशय दमदार लेखन!
अगदी मुजरा स्विकारा स्नेहाताई!
आपल्याला त्रास देणार्‍या व्यक्तीला, आपण कारण न ठरता होणारे शासन हे दैवीच वाटत मला तरी.

खरंतर अशा गोष्टी वाचायला आवडत नाहीत...पुढे काहीतरी चांगलं घडेल या आशेने ही "साहीत्यकृती" वाचेन.

सस्नेह's picture

21 Jun 2013 - 10:29 pm | सस्नेह

खरं आहे. बरेचदा वास्तव कल्पनेपेक्षा कटू निघते हे पाहिले आहे.....
पण पुढची कथा नक्कीच आवडेल.

मनीषा's picture

21 Jun 2013 - 8:27 am | मनीषा

खूपच हिंसक सुरूवात..
कथेमध्ये पुढे काय घडणार आहे, हे वाचायची उत्सुकता आहे.
(अपराध्यांना नंतर शासन करण्याऐवजी "दानम्मा" ने घटना घडत असतानाच मदतीला यायला हवे होते असे वाटले.)

आणि "मनरक्षिता" या नावाचा संदर्भ देखिल पुढच्या भागात येईल असे वाटते.

वेगळीच कथा. पूर्ण झाल्यासारखी वाटत असूनही क्रमशः मुळे कुतूहल वाढलंय.
पुभाप्र..

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Jun 2013 - 9:49 am | ज्ञानोबाचे पैजार

वेगळे काहितरी लिहिण्याचा प्रयत्न प्रचंड यशस्वी झाला आहे. पुढच्या भागांबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

चित्रगुप्त's picture

21 Jun 2013 - 10:07 am | चित्रगुप्त

क्रमशः मुळे पुढे काय? ही उत्सुकता. लेखन आवडले.

स्वाती दिनेश's picture

23 Jun 2013 - 3:31 pm | स्वाती दिनेश

चित्रगुप्त यांच्यासारखेच म्हणते,
स्वाती

तिमा's picture

21 Jun 2013 - 7:44 pm | तिमा

पुढील भागाची वाट पहात आहे. लिखाण दमदार पण चौघांना लगोलग शिक्षा, हे स्वप्नवत वाटले.

अवांतर- माझ्या आयुष्यात मला त्रास ( विनाकारण ) देणार्‍या किमान दहा जणांना नियतीने शासन केलेले आहे. योगायोग दहाही वेळेला असेल म्हणा !

चौकटराजा लकी आहेत. भूत न होताच त्यांच्या शत्रूंना शिक्षा झाली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jun 2013 - 8:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उत्सुकता लागली पुढे काय होते त्याची. लेखन शैली सुरेख.

-दिलीप बिरूटे

पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

कवितानागेश's picture

23 Jun 2013 - 1:12 pm | कवितानागेश

डेंजर लिवलय..
सुरुवातच अशी तर पुढे काय असेल?

किसन शिंदे's picture

23 Jun 2013 - 4:24 pm | किसन शिंदे

एका वेगळ्याच मालिकेची तेवढ्याच दमदार भागापासून सुरूवात. एकदम वेगळ्या धाटणीची कथा!!

दानम्मा, जोगतीन, देवीचा पितळी मुखवटा हे सगळं वाचताना राजीव पाटीलचा 'जोगवा' डोळ्यासमोर आलाच. :)

दिपक.कुवेत's picture

23 Jun 2013 - 4:57 pm | दिपक.कुवेत

अजुन उत्सुकता ताणु नकोस....पुढिल भाग लवकर टाक