मनरक्षिता (३)

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
3 Jul 2013 - 6:22 am

मनरक्षिता (१)
मनरक्षिता (२)

सकाळी उठल्यावर चैतीला सपान आठवलं. अंघोळ वगैरे आवरून आज्जीने दिलेला डबा घेतला अन भीत भीतच ती शाळेत गेली.
मास्तर अजून शाळेत आला नव्हता !
तासाभरानं महादू शिपाई सांगत आला. ‘पोरानु, मास्तरला फाटेच्या पारी लकवा मारलाय. एक हात अन एका बाजूच्या अंगावरनं सगळं वारं गेलंय. उठायसुदिक यीना झालंया..!!
‘हुर्रे’ करून सगळी पोरं उधळली.
चैती सपान आठवत घरी आली. पण कुणालाच सपनाबद्दल काय बोलली नाही. आज्जीला सुद्धा !
चार दिवसांनी शाळेत नव्या बाई हजर झाल्या. हसऱ्या, गोड बोलणाऱ्या. चैती हुरूपानं शाळेत जाऊ लागली.
बघता बघता एक यत्ता सरली. चैती दुसऱ्या यत्तेत गेली. मैतरणी, खेळगडी, अभ्यास यात हळूहळू रमून गेली.
शाळा सुटल्यावर रिकाम्या मैदानात खेळ रंगे. सगळी पोरं एकाच चणीची. फक्त सुताराचा नाम्या थोराड होता. एकेका यत्तेत दोनदोनदा गचके खाल्लेला. गडी शाळेत शोभायचाच नाही. वर्गात कधीतरीच दिसणार, पण पोरात दंगामस्ती अन मारामारी करायला मातर पुढं. पोरीच काय, पोरंसुद्धा त्याला टरकून असत. अन तो खुशाल खोड्या काढून मनाला येईल त्याला बुकलत असे.
त्या दिवशी पोरं अन पोरी फरशांचे तुकडे मांडून लगोरी खेळत होत्या. तोच नाम्या आला अन त्यानं मुद्दाम पायानं लगोरीचा ढीग उधळून दिला. चैतीनं सगळ्यांना जवळ बोलावून कानात कुचूकुचू केलं अन सर्वांनी मिळून नाम्याला चारी बाजूनी घेरलं. दांडू, पट्टी, छडी, दोरी जे मिळेल त्यानं सर्वांनी नाम्याला ब-बदडलं. तेव्हापासनं त्याची दादागिरी बंद झाली.
नाम्याला जरा वचक बसला खरा, पण चैतीवर त्यानं डूख धरला. त्यानंतर कुठे दिसेल तिथे तो तिला खुन्नस करू लागला. विखारी नजरेनं तिला कुरतडू लागला. तिच्या कोवळ्या काळजाचा ठाव सुटल्यासारखं झालं. दडपणानं जीव काचून गेला. जेवता घास नीटपणी पोटात जाईनासा झाला.
….त्या दिवशी येरवाळीच घरातलं पाणी संपलं. शाळेची वेळ चुकेल म्हणून चैती आज्जीची वाट न पाहता एकटीच कळशी घेऊन आडावर गेली. आडावर अजून वर्दळ सुरु झाली नव्हती. सरसर पाणी खेचून बादलीतून कळशीत ओतताना कुठूनसा अचानक नाम्या उगवला अन काय समजायच्या आतच त्यानं चैतीला खच्चून धक्का दिला.
चैतीला ओरडायलासुद्धा सुधरलं नाही. अन सुचलं तेव्हा, ओरडायला आ केलेल्या तोंडात अन नाकात भराभरा विहिरीचं थंडगार पाणी जाऊ लागलं. हातपाय मारून ती कशीबशी धडपडत जईवर चढून थरथरत उभी राहिली. दोन मिनिटांनी जरा हुश्शार झाल्यावर ती खच्चून ओरडली, ‘आज्जे, आज्जे गं…’ .
तवर घागर घेऊन आलेल्या हौसामावशीनं तिला विहिरीत पडलेली पाहून आरडून चार बाप्ये गोळा केले. रहाटाच्या दोराचा फास करून विहिरीत सोडला गेला. एक बाप्या विहिरीत उतरला अन त्यानं चैतीच्या कमरेला दोर पक्का बांधला. बाकीच्यांनी तो वर ओढला अन ती वर आली.
नाम्याचं नाव कुणाला बोलली नाही ती. रात्री जेवणं झाल्यावर आज्जीजवळ आडवी झाल्यावर मात्र तो धसका तिच्या काळजाच्या तळातून वर आला. आज्जीच्या मंद घोरण्याचा आवाज ऐकू यायला लागला अन खोल रुतलेला काटा तेल सोडताच वर यावा तशी मनातली नाम्याची धास्ती भसकन वर आली. चैतीनं आईचा आठव केला. घाबऱ्या मनाला कसंतरी काबूत आणलं अन डोळे मिटले.
...भयाची अन असहायतेची परमावधी ! त्या तणावाखाली पुन्हा एकदा ती अज्ञात कळ दाबली गेली. पुन्हा एकदा ती विद्दुल्लतेसारखी संवेदनेची लाट वर उसळली. तिने चैतीला वेढून घेतले अन आपल्यासवे अथांग अपरिचित विश्वात घेऊन गेली.
…..नाम्या विहिरीच्या काठावर उभा होता. विहिरीतल्या अर्धवट प्रकाशात जईवर अंग चोरून उभ्या असलेल्या चैतीला खालून वर पाहताना त्याच्या काळ्याशार चेहेऱ्यावर, तोंडातले पांढरे दात, कुऱ्हाडीच्या चमकत्या पात्यासारखे वाटले. खी: खी: करून हसता हसता त्याने आपले हात पुढे केले अन तो विहिरीच्या काठावरून खाली वाकला. एकाएकी त्याचे हात लांब लांब झाले. सापागत वळवळत चैतीच्या दिशेने झेपावले.
….तिने इकडे तिकडे पाहिले. नाम्याची सावली पडून विहिरीचे पाणीसुद्धा काळेशार दिसत होते. तिचा घास घ्यायला टपलेले…. तिने विहिरीच्या भिंतीला चिकटून त्या हातांचा स्पर्श टाळण्याचा आटोकाट प्रयत्ने केला…. पण अखेर ते हात तिच्यापर्यंत येऊन पोचलेच ! किंकाळी मारण्यासाठी तिने तोंड उघडले, तोच कुणीतरी नाम्याचा हात धरून खेचला. एक झटका बसून नाम्या धाडकन विहिरीत पडला. .पट्टीचा पोहणारा असूनही, विहिरीच्या पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला….
सपान किती अन खरं किती याची जाणीव धुरकट झाली…अन चैती गाढ झोपेच्या अंधारात बुडाली.
सक्काळी सक्काळी सरावनी सांगत आली.
‘नाम्याला हिरीतल्या हडळीनं झपाटलं ! राती हिरीच्या कट्ट्यावर चोरून विडी वढत बसला हुता म्हनं अन येकायेकी हिरीतच पडला ! दोराला धरून वर आला खरा, पन तापानं जळाया लागलाय. आन झोपेत जाबडतोय…ये हडळी, माझा हात सोड, म्हणून..!’
चैतीच्या डोळ्यात खोलवर एक सुटकेचा सुस्कारा उमटला. दानम्माच्या किरपेचा अन आईच्या मायेचा पदर हातात गवसल्यागत ती अंतर्यामी आश्वस्त झाली.
….अन मग गावात एक अनोखं सत्र सुरु झालं.
….सदानकदा वस्सकन पोराबाळांच्या अंगावर येणारा किराणावाला किशाबा , रात्रीतनं मधुमेहाची साखर वाढून तोंडाला फेस येऊन दोघांच्या आधारानं दवाखान्याला गेला, त्याच्या आदल्या दिवशी त्यानं चैतीच्या हातातले दहा रुपये काढून घेतले अन तिला साखर न देता तसंच हाकलून दिलं होतं , हे गावाला माहित नव्हतं.
….एकट्या-दुकट्या मुलांना गाठून त्यांच्यावर तरबत्तर होणाऱ्या दारुड्या संत्याला, ज्या राती पिपळावरच्या समंधानं झपाटलं, त्या संध्याकाळी, गल्लीच्या तोंडावरच, शाळेतून घरी येताना चैती त्याच्या तावडीत गावली होती, हेही गावकऱ्यांना कधी समजलं नाही.
शेतातल्या पेरूच्या झाडाचे दोन पेरू घेतले म्हणून चैतीला अन तिच्या मैतरणीना चिंचेचा फोकाने झोडपल्या दिवशी मध्यराती नागूअण्णाच्या अंगावर नागीण उठली अन कायम वर्गातल्या पोरांच्या अघोरी खोड्या काढणाऱ्या नाऱ्याच्या बोटाला ज्या दिवशी इंगळी डसली त्याच्या आदल्या दिवशी त्यानं चैतीच्या दप्तरात खेकडे घालून ठेवले होते, याचा संबंध जोडण्याचं कुणाला काहीच कारण नव्हतं !
…पण हे सगळे अजुनी एका लक्ष्मणरेषेच्या बाहेर होते. यातल्या कुणाला अजून तिला थेट इजा करण्याची दुर्बुद्धी झाली नव्हती. त्यांच्या विकृतीच्या लवलवत्या ज्वाळांची धग अद्यापि तिच्या निरागसतेला होरपळू लागली नव्हती.
…अन म्हणून तिचं भय आटोक्यात होतं… अन लक्ष्मणरेषेच्या पलीकडील अनर्थसुद्धा !
चैतीची शाळा सुखरूप पार पडली अन उगवतीच्या सूर्याने धरतीला उजळावे तशा तारुण्याच्या खुणा तिचा देह उजळू लागल्या. पिंगट तपकिरी डोळ्यात चंद्रज्योती पेटल्या. आईचे देखणे रूप घेतलेली चैती शुक्राच्या चांदणीगत चमकू लागली. पण तिच्या रुपाला एक वेगळीच धार होती. नजरेत असं काही होतं, की, दुसऱ्यांदा तिला न्याहाळू गेलेला गडी तिच्या, कोऱ्या पात्यासारख्या लखलखीत नजरेला नजर काही भिडवू शकत नसे.
दहावीचा निकाल लागला अन तिचं कौतुक साजरं करून आजी रातच्याला झोपली, ती परत काही उठली नाही. पिकलं पान झोपेतच गळून पडलं. एका रात्रीत चैतीला दाही दिशा उघड्या झाल्या.
कुणीतरी तिच्या चुलत्याला निरोप दिला. अन तो हजर झाला.
सोळावं वरीस लागलेल्या चैतीला बघून त्याची नजर फाटली. तीन दिवस होईपर्यंत त्यानं कळ काढली अन चौथ्या दिवशी चैतीला सामान बांधायला सांगितले.
‘चैतू बाळ, आता मी अन तुझी चुलती हेच तुझे मायबाप बरं. आन आम्हालाबी तुझाच आधार. तवा समदा पसारा गोळा कर. दोनपरी यष्टी हाय आपल्या गावाला जायला.’
तो मायेनं बोलत हुता, तरी पण चैतीला त्याच्या नजरेतल्या धगीचा चटका बसल्याशिवाय राहिला नाही..!
दोन बोचकी घेऊन चैती चुलत्यामागून गाडीत चढली तेव्हा तिला माहिती नव्हतं, उद्या आपल्याला काय सपान पडणार आहे ते.
…अन तिचं धुमारलेलं तारुण्य पाहून पेटलेल्या चुलत्याला माहिती नव्हते की तिला त्याचं किती भ्या वाटणार आहे ते…..!
( समाप्त ).

कथारेखाटनविरंगुळा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

3 Jul 2013 - 6:42 am | यशोधरा

ह्म्म... चैती स्वतःचं सतत रक्षण करण्यासाठी सक्षम बनूदेत.

रेवती's picture

3 Jul 2013 - 7:19 am | रेवती

छान कथा.
आवडली. सुपरहिरोची गोष्ट असते तशी सुपरहिरविची असल्यासारखे वाटले.

प्रचेतस's picture

3 Jul 2013 - 8:55 am | प्रचेतस

कथा आवडली.

पैसा's picture

5 Jul 2013 - 2:14 pm | पैसा

गूढ अज्ञाताच्या प्रदेशातील कथा. आणक्खी काय थरारक वळणे घेतेय बघू!

अग्निकोल्हा's picture

6 Jul 2013 - 1:46 am | अग्निकोल्हा

एक तर मि वाचायला चुकलोय...?
अथवा तुम्हि वाचायला चुकलाय...?
अथवा धाग्याची लेखक लिहायला चुकलि आहे...?
कारण शेवट (समाप्त). असा आहे :)

@स्नेहांकिता-जी
सुरेख नॅरॅशन. केवळ तुमच्या लेखणिच्या जोरावर हा भाग वाचनिय बनला.

आता काहि वेगळे मुद्दे.

अन तिचं धुमारलेलं तारुण्य पाहून पेटलेल्या चुलत्याला माहिती नव्हते की तिला त्याचं किती भ्या वाटणार आहे ते…..! ओके वाचक म्हणुन तिच्या चुलत्याच काय होणार हे सांगायला अर्थातच नव्या लिखाणाची गरज नाही... पण हा शेवट वाचला अन् पहिला प्रश्न निर्माण झाला

१) या कथेचि बहुतांश खलपात्रे पुरुषच का म्हणून ?
२) मनरक्षिताला तुम्हि नक्किच सुपर हिरो बनवु शकता पण तुम्हाला मराठिपणाच्या कक्षा रुदावणारे सुपर व्हिलन निर्माण करावे लागतिल जे चैतिला फार जड/स्पर्धात्मक जाणारे असतिल (मनरक्षणाच्या पातळिवरही)

पैसा's picture

7 Jul 2013 - 6:01 pm | पैसा

लेखाच्या शेवट काय आहे न वाचताच प्रतिक्रिया लिहिली होती. पण 'समाप्त' असाच शेवट असेल तर कथा नक्कीच अर्धी राहिली आहे. खरे तर या विषयावर कथामालिकाच काय कादंबरीही होऊ शकेल. स्नेहांकिताने कादंबरीबद्दल विचार करावा ही विनंती.

सस्नेह's picture

7 Jul 2013 - 9:28 pm | सस्नेह

या कथेचि बहुतांश खलपात्रे पुरुषच का म्हणून ?

अरे हो ! खरंच की. , खलपात्रे पुरुषच आहेत ही गोष्ट तुम्ही सांगेपर्यंत लक्षात आले नाही. लिहिण्याच्या ओघात लिहित गेले.
सूचना मान्य. पुढच्या लेखनाच्या वेळी याची अवश्य दखल घेईन..
मराठीपणाच्या कक्षा रुंदावण्याविषयी मी अनभिज्ञ आहे....

अग्निकोल्हा's picture

8 Jul 2013 - 2:53 pm | अग्निकोल्हा

अरे हो ! खरंच की. , खलपात्रे पुरुषच आहेत ही गोष्ट तुम्ही सांगेपर्यंत लक्षात आले नाही. लिहिण्याच्या ओघात लिहित गेले.

दंडवत.

मराठीपणाच्या कक्षा रुंदावण्याविषयी मी अनभिज्ञ आहे...

शब्दशः अर्थ नका घेउ. हिंट म्हणून जरा भारतियपणाच्या कक्षेचे उदाहरण बघुया... समजा असा विचार केला की व्हॉट इज कुल ? शाहरुख म्हणाला रावनच्या टिमने रिसर्च केला होता की भारतिय लोकांना फेरारि घेणे, बंगला घेणे, सुंदरि सोबत हाय फाय लोकेशनला नाचणे, या गोश्टी सगळ्यात जास्त कुल वाटतात त्या पलिकडे त्यांचि "कुल" ही मनोधारणा पोचतच नाही. कारण ह्याच गोश्टिंची सहजि उपलब्ध्दता कठिण आहे.

याउलट पाश्चात्यांना सगळ्या जगावर संकट आलय त्यातुन पृथ्वि वाचलि आहे वगैरे गोश्टि कुल वाटतात कारण इतर गोश्टि जसे गाडि, घर अन सौंदर्यं तुलनेने सहज उपलब्ध्द असते. हि सामाजिक परिस्थिती भारतात अजुन आलेलि नाहीये. म्हणूनच इछ्चा असो वा नसो बॉलिवुड सुपर हिरोला आयटम साँग्स वगैरे प्रकार करावेच लागतात.

मला वाटतय कि एव्हडी हिंट पुरेसि आहे कक्षा रुंदावणे म्हणजे काय हे समजुन घ्यायला. अर्थात मुळ मातिशी नाळ तोडा अस अजिबात म्हणन नाही कारण मग अ‍ॅक्सेप्टन्स भेटणार नाही पण... जरा मराठीपणाच्या कक्षा या मोठ्या केल्याच पाहिजेत, ज्याचि सुरुवात साहित्यातुन होणे ही काळाचि गरज आहे, अन मनोरंजनाचि हमि सुध्दा :)

कवितानागेश's picture

6 Jul 2013 - 7:51 am | कवितानागेश

समाप्त??

स्पंदना's picture

7 Jul 2013 - 1:41 pm | स्पंदना

मस्त ग!
पुढचं आयुष्य जरा जडगच असणार पण ते आयुष्य ही चैती या मिळालेल्या शक्तीवर काढु शकेल का?
स्वप्न पडायला डोळा मिटावा लागतो म्हंटल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jul 2013 - 6:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कथा.

-दिलीप बिरुटे

किसन शिंदे's picture

7 Jul 2013 - 6:48 pm | किसन शिंदे

कथा आवडली. नेहमीच्या कथांपेक्षा थोडीशी हटके!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Jul 2013 - 7:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कथा आवडली.

खरं सांगायचं तर सुरूवात वाचून फार अपेक्षा निर्माण झाल्या नव्हत्या. लहान मुलांना आधाराची आवश्यकता असते, लहानपणी त्यांना सावरलं की पुढे ती वयस्क माणसं म्हणून गंडविरहित आयुष्य जगतात, ही सगळ्यात प्रबळपणे वर येणारी शक्यता आवडली. या शक्यतेच्या आजूबाजूने दिसणारं सामाजिक वास्तव, गरीबांना कोणीही पिळा, एकट्या स्त्रियांची होणारी कुचंबणा इ. गोष्टीही प्रभावीपणे आलेल्या आहेत.

... याचा संबंध जोडण्याचं कुणाला काहीच कारण नव्हतं ! हा परिच्छेद एवढा सरधोपटपणे आला नसता तर अधिक आवडलं असतं.

कथेत येणारी पात्रं ही रूपकं असतात; त्यांतून जसाच्या तसा अर्थ काढू नये.

प्यारे१'s picture

7 Jul 2013 - 7:49 pm | प्यारे१

कथा आवडली.

स्वाती२'s picture

7 Jul 2013 - 8:08 pm | स्वाती२

कथा आवडली.

जेपी's picture

7 Jul 2013 - 10:01 pm | जेपी

कथा आवडली . आधी
विनाकारणच याकडे
दुर्लष झाल .

दिपक.कुवेत's picture

8 Jul 2013 - 12:24 pm | दिपक.कुवेत

ईतक्यात संपली.....ते काय नाय.....कथा अजुन पुढे न्यावी हि विनंती.

स्वाती दिनेश's picture

8 Jul 2013 - 5:33 pm | स्वाती दिनेश

कथा आवडली,
स्वाती

हा भागही छान झालाय, पण कथा अर्धी वाटते.

वाचक आणि प्रतिसादकांचे 'मना'पासून आभार'!
काहीशा वेगळ्या विषयावरची अन पार्श्वभूमीची कथा लिहिण्याचा प्रयत्न केला. जमलाय असं वाटलं नव्हतं. प्रतिसाद वाचून काही दुरुस्ती व पुढच्या दिशा अधिक स्पष्ट झाल्या.
..ही कथा कंटिन्यू करेन असं वाटत नाही . पण अशाच एका विषयावरचे कथासूत्र डोक्यात आहे.
पाहूया कधी पीसीवर उतरते ते.

नवीन कथा पण येऊ दे स्नेहातै.
तुझी लेखन शैली आणि विषय खरोखरच अप्रतिम आहेत.
पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा

अमित खोजे's picture

25 Jun 2014 - 12:50 am | अमित खोजे

थोडी अजून पुढे वाढवली असती तरीही चालले असते पण इथे संपवली तरीही ठीक आहे.
पुढचे काय होणार याचा अंदाज येतोच!

तसं तुम्ही वरच्या प्रतिसादात लिहिल आहे कि हि कथा तुम्ही पुढे चालवणार नाहीत. आता साधारण एका वर्षाने विचार बदलला आहेत का बघा! :)

एस's picture

25 Jun 2014 - 11:35 am | एस

कथा प्रचंड इंटरेस्टिंग वळणावर आणून संपवली आहे. उगाच प्रत्येक कथेला स्टिरिओटाईप शेवट असलाच पाहिजे असे नाही. मलातर शेवट खूपच भावला.

नितिन पाठे's picture

25 Jun 2014 - 4:36 pm | नितिन पाठे

जबराट कथा..........थोडी अजून पुढे वाढवली असती तर....

अरे हो ! खरंच की. , खलपात्रे पुरुषच आहेत ही गोष्ट तुम्ही सांगेपर्यंत लक्षात आले नाही. लिहिण्याच्या ओघात लिहित गेले.
सूचना मान्य. पुढच्या लेखनाच्या वेळी याची अवश्य दखल घेईन..

असं नाही. हि कथा तुमच्या मनात आहे तशीच लिहा. वाटल्यास तर स्त्री खलपात्रांना घेवून दुसरी वेगळी कथा लिहा पण कुणीतरी आक्षेप घेतला म्हणून कथा वेगळ्या वळणावर नेवू नका. पुढच्या भागाची उत्सुकता लागलीये .
तसाही खलपात्र बहुदा पुरूषाच असतात ना . ;-)