रागिणी सुहावनी- किरवाणी

चौकटराजा's picture
चौकटराजा in जनातलं, मनातलं
28 Oct 2012 - 7:01 pm

आपले भारतीय संगीत व आयुर्वेद यांचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. असला पाहिजे. भारतीय संगीत म्हणजे शास्त्रीय संगीत . यात उत्तर भारतीय संगीत व कर्नाटक संगीत असे दोन प्रवाह आहेत. दोन्हीत एका सप्तकात मूल व विकृत असे मिळून बारा स्वर आहे असेच मानतात.या बारा स्वरांच्या रचनेला काही बन्धने आहेत. नियम आहेत त्याना राग असे म्हणतात. अनेक वर्षांच्या वैचारिक व आस्वादात्मक प्रयोगप्रक्रियेनंतर याचे एक शास्त्र बनले आहे. काय बहुतांशी कानांना रंजक वाटले व काय अरंजक वाटले याचा चिकित्सक शोध घेऊन आजचे राग संगीत बनले आहे. यात प्रत्येक गायकाला ( राग संगीतात गायकच नवोन्मेष घडवत असल्याने तोच संगीतकाराची ही भूमिका पार पाडत असतो.) नियमात
बंधित राहूनही रचनेचे अमर्याद स्वातंत्र्य उपभोगता येते.

कर्नाटक संगीतातून काही राग हे उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतात आले त्यात हंसध्वनी, किरवाणी हे राग आहेत की जे उत्तर भारतीय संगीतात तितकेच लोकप्रिय झालेयत. किरवाणी हा राग एक संपूर्ण-संपूर्ण अशा स्वरूपाचा राग आहे. साहजिकच यात आरोह व अवरोहात सातही स्वर येतात. पण गंधार व धैवत कोमल आहेत. यात वादी पंचम तर संवादी स्वर षडज आहे. हा एक मौसमी राग असून वर्षा समयी कधीही गायला जातो. आपल्याकडील संगीतात या रागाचा संचार गायना पेक्षा वादनात जास्त झालेला आढळतो. पण या रागाने सुगम संगीतात अनेक संगीतकारांना मोहिनी घातली आहे.
आपण अवीट गोडीची , पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटणारी अनेक गाणी वारंवार बिलकुल कंटाळा न येता ऐकत असतो, गुणगुणत ही असतो, त्यात किरवाणी रागातील अनेक गीते हिंदी चित्रसंगीतात , मराठी भाव, चित्र्, नाट्य गीतात आहेत. काही गझला देखील या रागात आहे

किरवाणी रागाचा वापर करण्याचा मोह आवरता आला नाही असे प्रमुख संगीतकार म्हंणजे हिंदी चित्रपट संगीतात शंकर जय किशन, ओ पी नय्यर, लक्ष्मीकांत प्यारेलाल . मराठी चित्र- भाव गीतात यशवंत देव व सुधीर फडके.
या रागात मुख्यत: करूण, शुंगार व शांत व भक्तिरसाची रचना खुलते. माझ्या या विधानाचा प्रत्यय खालील गीतातून आपल्याला येत राहील.
संगीतकार शंकर जयकिशन हे भारतीय चितपट संगीताला पडलेले एक चौपदरी गोड स्वप्न. खरे तर स्वप्न नव्हे सत्य !
या द्वयीने किरवाणी रागाचा उपयोग शांत शृंगार व भक्तिरसपूर्ण गीतासाठी केला.
खालील उदाहरणे पहा-
१_ तू प्यारका सागर है ..... - सीमा
२.ध्रीरे धीरे चल चांद गगनमे . लव्ह मॅरेज
३. याद ना जाये बीते दिनोंकी... दिल एक मंदीर
४. ये रात भीगी भीगी ....... चोरी चोरी
५.आज सनम .... चोरी चोरी
६. दिलकी नजरसे --------- आवारा

दुसरे संगीतकार म्हणजे ओ पी नय्यर साहेब, यानाही किरवाणीने भ्ररळ घातली. ती खाली दिलेल्या गीतात दिसून येईल.
१, पुकारता चला हुं मै ...... मेरे सनम
२.आँखोंसे जी उतरी है दिलमे--- फिर वही दिल लाया हुं
३.आओ हुजूर तुम् को ..... किस्मत
४.मै प्यार का राही हुं ... एक मुसाफिर एक हसीना

हिदी संगीतकारात लक्ष्मीकांत प्यारेलाल यानीजी किरवाणी रागाचा वापर केला आहे वानगी दाखल खालील दोन गीते पहा.
१. मै शायर तो नही..... बॉबी
२. परबत के उस पार ... सरगम
या खेरीज
रिमझिम गिरे सावन--- मंझील - आर डी बर्मन
तुम्ही मेरे मीत हो - प्यासे पंछी - कल्याणजी आनंदजी
यानीही किरवाणीचा वापर करून मधुर रचना केली आहे.

मराठी नाटट्यगीतात दोन तीन गीतेच मला आठवतात जी किरवाणी रागात आहेत.
१, सुरसुख खनि तू विमला..... विद्याहरण
२. अवमानिता मी झाले--
३. ना तुलना तव वचना

मराठी संगीतकारात यशवंत देवांना "किरवाणी" चिकटूनच बसली आहे असे म्हणावे लागेल.ही उदाहरणेच पहा ना ! .
१. ही चिकमोत्याची माळ
२. विसर गीत विसर प्रीत
३. अशी पाखरे येती.
४. तिन्ही लोक आनंदाने भरूनि गाउ दे
५. कधी बहर कधी शिशिर परंतू दोन्ही एक बहाणे

मराठी चित्रसंगीतात एन दता यांचे स्थानही खास आहे . त्यानी केलेल्या गीतातील किरवाणी पहा.
१.तुझी प्रीत आज कशी स्मरू - अपराध
२.सांग कधी कळणार तुला-- अपराध

आता राहता राहिले आपले लाडके बाबुजी - सुधीर फडके साहेब. यानी गायलेल्या गीतांमधे " किरवाणी" आला आहे हे वर आलेच आहे.पण त्याच बरोबर त्यानी संगीत दिलेल्या गीतात ही किरवाणी डोकावताना दिसतो.
१. एकाच या जन्मी जणू--- आपली माणसं - संगीत सुधीर फडके
२. खराच कधी तू येशील का? - कलंकशोभा- संगीत सुधीर फडके

किरवाणीचा प्रभाव गझल गायकांवरही दिसतो . घ्या या रचना पहा !

पारा पारा हुवा पैरहन ए जान = गुलाम गली
बेसबब बात बढनेकी जुरूरत क्या है - जगजीतसिंग

वरील गीते तयार करताना संगीतकारानी राग नियमाला थोडेसे डावलून इतर स्वर घेण्याचा खटाटोप केला आहे पण त्यामुळे गीतातील लज्जत वाढलेली दिसेल. काही गीते आपण वाद्यावर वाजवून पाहिल्यास कधीमधी शुद्ध धैवत व कोमल निषाद यांचाही वापर करून चालीचा गोडवा वाढवलेलाच दिसेल.

माझा कान मला दगा देत नसेल तर मी असे विधान करतो की किरवाणी रागाने मध्यपूर्वेतही बस्तान बसवलेले दिसते. रॉन गुडविन यांच्या अरेबियन नाईटस या अत्यंत गाजलेल्या अल्बम मधे या रागातील एक नम्बर आहे. तसेच् पुणे आकाशवाणीच्या "आपली आवडची" धुन ही किरवाणी रागात होती हे स्मरतेय !

कलासंगीतमौजमजाआस्वादलेखमाहिती

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

28 Oct 2012 - 8:02 pm | अन्या दातार

छान! अजून इतर रागांबद्दल पण आवर्जून लिहा.

तर्री's picture

28 Oct 2012 - 8:32 pm | तर्री

मस्त लिहिले आहे. अजून असेच शिवरंजनी वर ही लिहावे ही विनंती.

संजय क्षीरसागर's picture

28 Oct 2012 - 8:54 pm | संजय क्षीरसागर

साहजिकच यात आरोह व अवरोहात सातही स्वर येतात. पण गंधार व धैवत कोमल आहेत. यात वादी पंचम तर संवादी स्वर षडज आहे.

ये रात भीगी भीगी
आज सनम
दिलकी नजरसे
पुकारता चला हुं मै
मै प्यार का राही हुं

या गाण्यात कोमल ग आणि ध ही काँबिनेशन्स सरसकट नाहीत.

ये रात भीगी भीगी मधे तर कोमल ग कुठेही नाही आणि कोमल ध येतो तो डायरेक्ट अंतर्‍यात .

आजा सनममधे तर शुद्ध ग आहे आणि बरोबर कोमल ध आणि नी आहेत. कोमल ग एकदम कमी आहे.

दिलकी नजरसे मधे कोमल ग अजिबात नाही (धृपदाच्या शेवटी जो फिलर आहे त्यात कोमल ग आणि रे येतो)

पुकारता चला हूं मैं मधे तीव्र मध्यम आहे आणि कोमल नी आहे

मैं प्यार का राही हूं मधे तुम्ही म्हणता तसं असलं तरी शुद्ध ध आणि कोमल नी चा जोरदार उपयोग आहे

आरोह अवरोह हे शास्त्रीय संगीतासाठी चा नियम. बाकी सुगम संगीतात त्या रागाचा एक चेहरा जर गीतात दिसला तर ते त्या रागावर गाणे आधारित आहे असे म्हणावे.ओ. पीं चे कितना हंसी हौ जहां या गीतात भूप रागाच्या स्वरांबरोबर मध्यम व निषाद ही आहेत पण एका फॉलो पीस मधे कोमल गंधार आहे.तरीही त्या गाण्याचा चेहरा भूपाचा दिसतो. फार तर शुध
कल्याणचा !

चौकटराजा's picture

29 Oct 2012 - 6:40 am | चौकटराजा

आता यमन रागाचे उदा पहा. यात नि रे ग म प अशी रचना केली तरी रागाचा चेहरा दिसतो व म ध नि रे सा असा उत्तरांगातील रचनेत ही चेहरा दिसतो. वास्तविक दुसर्‍या रचनेत मूळ आरोहात असणारा पंचम नाही तरीही तीव्र मध्यमाच्या
अस्तित्वाने " यमन" दिसतो. तेंव्हा किरवाणीच्या रचनेत कुठे कोमल गंधार वा कोमल धैवत नसेल तरीही चेहरा दिसत असेल तर ते गीत किरवाणी वर आधारित आहे असे म्हटले पाहिजे.

चौकटराजा's picture

29 Oct 2012 - 6:40 am | चौकटराजा

आता यमन रागाचे उदा पहा. यात नि रे ग म प अशी रचना केली तरी रागाचा चेहरा दिसतो व म ध नि रे सा असा उत्तरांगातील रचनेत ही चेहरा दिसतो. वास्तविक दुसर्‍या रचनेत मूळ आरोहात असणारा पंचम नाही तरीही तीव्र मध्यमाच्या
अस्तित्वाने " यमन" दिसतो. तेंव्हा किरवाणीच्या रचनेत कुठे कोमल गंधार वा कोमल धैवत नसेल तरीही चेहरा दिसत असेल तर ते गीत किरवाणी वर आधारित आहे असे म्हटले पाहिजे.

बॅटमॅन's picture

28 Oct 2012 - 9:16 pm | बॅटमॅन

हे वाचून एकच मनात आलं ते म्हंजे शास्त्रीय संगीताची बेसिक ओळख करून देणारी लेखमाला मिपावर कोणी लिहिली आहे का? असल्यास लिंक द्या , नपेक्षा लेख लिहा ही विनंती :)

एस's picture

29 Oct 2012 - 12:04 am | एस

ज्यांना शास्त्रीय संगीताचा गंधही नाही पण संगीतगंधवेडे आहेत त्यांना मिपावर शास्त्रीय संगीताची अगदी सोप्या भाषेत कोणी ओळख करून दिली तर खूप बरे होईल. नपेक्षा हे काम तुम्हीच करावे अशी आम्ही तुम्हांला विनंती करत आहोत.

ऐला!!!! लै धन्यवाद हो शुचितै या मोठ्या लिष्टसाठी :)

अत्रुप्त आत्मा's picture

28 Oct 2012 - 10:33 pm | अत्रुप्त आत्मा

सलाम.........................................!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! :-)

शुचि's picture

29 Oct 2012 - 6:55 am | शुचि

लेख खूप आवडला.

मूकवाचक's picture

29 Oct 2012 - 8:54 am | मूकवाचक

थोडी भर - कर्नाटक संगीतातले लतांगी, कनकांगी, किर्वाणी यासारखे राग हिंदुस्थानी संगीतात प्रचलित करण्यात उ. अब्दुल हलीम जाफरखाँ या थोर सतारवादकांचा सिंहाचा वाटा आहे.

गाण्यांमागच्या रागाचे नाव समजून आनंद वाटला.
@ शुचि, वाचनीय दुव्यांबद्दल धन्स.

मूकवाचक's picture

29 Oct 2012 - 9:18 pm | मूकवाचक

उ. अब्दुल हलीम जाफरखान (सतार):
http://www.youtube.com/watch?v=p_ZA2PsKA6Y

पं. शिवकुमार शर्मा (संतूर) - झाकिर हुसेन (तबला साथ):
http://www.youtube.com/watch?v=r9ulmSwOBDM

देवाशीश भट्टाचार्य (देववीणा- गिटार) - कुमार बोस (तबला साथ):
http://www.youtube.com/watch?v=Le5ADwf4w70

मेहदी हसन (शोला था जल बुझा हू) - गझल:
http://www.youtube.com/watch?v=Dbht4nVfb2Q

उ. रशीद खान (शास्त्रीय गायन):
http://www.youtube.com/watch?v=PFgil-rMLLM

विद्वान एल शंकर (व्हायोलिन - कर्नाटक संगीतशैली):
http://www.youtube.com/watch?v=ZDsjQvt2g6o

लेख आवडला, विशेषतः त्यातल्या गाण्यांची यादी तर बेहद्द.

चौकटराजा साहेब, अतिशय अप्रतिम लेख झाला आहे.
अजुन वेगवेगळ्या रागांवर आधारीत तुम्ही लिहिलेली लेखमाला वाचायला आवडेल व माझ्या सारख्याला रागांची माहिती होईल
खरच वाचनीय, व कायम लक्षात ठेवावा असा लेख झाला आहे.
तुम्हाला लाख लाख वेळा धन्यवाद. व अश्याच रागांवर आधारीत तुमच्या पुढल्या लेखांच्या प्रतिक्षेत.

पैसा's picture

30 Oct 2012 - 5:57 pm | पैसा

पूर्वी कधीतरी एका कार्यक्रमात विविधभारतीवर रोज एका रागावर आधारित ख्याल, उपशास्रीय आणि सिनेमातील अशी वेगवेगळी गाणी लागत असत. अशाच प्रकारची लेखामाला लिहा ही विनंती. त्याबद्दलच्या चर्चेतून आणखी माहिती मिळत जाते.
शुचि, दुव्यांसाठी आमचा दुवा घे!

अन्या दातार's picture

30 Oct 2012 - 7:15 pm | अन्या दातार

त्या कार्यक्रमाचे नाव.

चौकटराजा's picture

30 Oct 2012 - 7:27 pm | चौकटराजा

विविध भारतीवर गेली सुमारे ४० वर्षे सकाळी साडेसात वाजता " संगीत सरिता" हा कार्यक्रम चालू आहे. त्यात भारत देशातील जवळ जवळ सर्व मान्यवर कलाकारानी , संगीत अभ्यासकानी विचार व्यक्त केले आहेत. व रागांची माहिती व
बंदिशी तसेच फिल्मी गीते सादर केलेली आहेत. मला त्या कार्यक्रमामुळेच शास्त्रीय संगीताची गोडी लागली.

पैसा's picture

30 Oct 2012 - 9:58 pm | पैसा

हा कार्यक्रम अजून सुरू आहे का? कित्येक वर्षांत रेडिओ ऐकला नाही त्यामुळे माहिती नव्हती.

चौकटराजा's picture

31 Oct 2012 - 9:49 am | चौकटराजा

आज ही हा कार्यक्रम चालू आहे . कारण नादब्रह्माला अंत नाही.

>> मला त्या कार्यक्रमामुळेच शास्त्रीय संगीताची गोडी लागली. >>कार्यक्रम ऐकावासा वाटत आहे. समृद्ध होण्याची एक संधी.

मनोज श्रीनिवास जोशी's picture

30 Oct 2012 - 8:13 pm | मनोज श्रीनिवास जोशी

मस्त लेक आहे चौकात राजा. किरवाणी रागाची जवळ जवळ सगळी गाजलेली गाणी एकत्र करून दिलीत . धन्यवाद.
:अवांतर:
अनेकांना शास्त्रीय संगीत समजत नाही असा न्यून गंड असतो. शास्त्रीय संगीतामाधले बारकावे - राग , ताल हे न समजताही त्याची मजा घेता येते. थोडे प्रयत्न मात्र करावे लागतात. एकदा का सुरांची बाधा झाली की आयुष्य बदलून जाते. अनेकांना क्रिकेट समजत नाही , सायकल चालवायला सराव लागतो -तसेच हे आहे.
आपल्या कलावंतानी हे संगीत थोडे दुर्बोध केले आहे हे ही खरे. आज चे कलाकार मात्र कसोशीने रसिकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करतात.
विदुषी आश्विनी ताईनी एक रागांची ओळख करून देणारी सी.डी. केली आहे. जवळ जवळ ५० राग आणि त्यांचे २/३ मिनिटांचे छोटे ख्याल अशी ती सी.डी. ४/५ वेळा ऐकली की राग माहिती होतील.
अन्यथा नाट्य संगीत , ठुमरी , दादरे ऐकून ही हया काळे मध्ये रममाण होता येईल.

ह्याच दृष्टीने मी डी.२१ ऑक्टोबर ला "स्वरोन्मे"" हा कार्यक्रम ठाण्याला केला होता. परत असा लेक्चर-डेमो कार्यक्रम करण्याचा विचार आहे. अजून काही करत येईल का ?
चोकट राजा - तुमच्या लेखा वर जरा जास्तच अवांतर लिहिले. समजून घ्यावे, सुरेख लेखा साठी धन्यवाद. पु.भा.प्र.

चौकटराजा's picture

31 Oct 2012 - 9:53 am | चौकटराजा

भावगीतात बाधा शब्दांची असते . तर शास्त्रीय संगीतात ती सुरांची. पण या दोन्ही बाधा होण्यासाठी काही दैवयोगाचीही गरज आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 Oct 2012 - 11:11 am | ज्ञानोबाचे पैजार

चौराकाका,
मस्त लिहिल आहे. तुम्हाला मनापासुन सलाम. इतके छान लिहीले म्हणुन माझ्या आवडत्या गुलाम अली चे नाव चुकवल्या कडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या निमीत्ताने बर्‍याच दिवसांनी पारा पारा हुवा ऐकली. मन प्रसन्न झाले.
पैजारबुवा,