मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रागिणी सुहावनी- किरवाणी

चौकटराजा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आपले भारतीय संगीत व आयुर्वेद यांचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. असला पाहिजे. भारतीय संगीत म्हणजे शास्त्रीय संगीत . यात उत्तर भारतीय संगीत व कर्नाटक संगीत असे दोन प्रवाह आहेत. दोन्हीत एका सप्तकात मूल व विकृत असे मिळून बारा स्वर आहे असेच मानतात.या बारा स्वरांच्या रचनेला काही बन्धने आहेत. नियम आहेत त्याना राग असे म्हणतात. अनेक वर्षांच्या वैचारिक व आस्वादात्मक प्रयोगप्रक्रियेनंतर याचे एक शास्त्र बनले आहे. काय बहुतांशी कानांना रंजक वाटले व काय अरंजक वाटले याचा चिकित्सक शोध घेऊन आजचे राग संगीत बनले आहे. यात प्रत्येक गायकाला ( राग संगीतात गायकच नवोन्मेष घडवत असल्याने तोच संगीतकाराची ही भूमिका पार पाडत असतो.) नियमात बंधित राहूनही रचनेचे अमर्याद स्वातंत्र्य उपभोगता येते. कर्नाटक संगीतातून काही राग हे उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतात आले त्यात हंसध्वनी, किरवाणी हे राग आहेत की जे उत्तर भारतीय संगीतात तितकेच लोकप्रिय झालेयत. किरवाणी हा राग एक संपूर्ण-संपूर्ण अशा स्वरूपाचा राग आहे. साहजिकच यात आरोह व अवरोहात सातही स्वर येतात. पण गंधार व धैवत कोमल आहेत. यात वादी पंचम तर संवादी स्वर षडज आहे. हा एक मौसमी राग असून वर्षा समयी कधीही गायला जातो. आपल्याकडील संगीतात या रागाचा संचार गायना पेक्षा वादनात जास्त झालेला आढळतो. पण या रागाने सुगम संगीतात अनेक संगीतकारांना मोहिनी घातली आहे. आपण अवीट गोडीची , पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटणारी अनेक गाणी वारंवार बिलकुल कंटाळा न येता ऐकत असतो, गुणगुणत ही असतो, त्यात किरवाणी रागातील अनेक गीते हिंदी चित्रसंगीतात , मराठी भाव, चित्र्, नाट्य गीतात आहेत. काही गझला देखील या रागात आहे किरवाणी रागाचा वापर करण्याचा मोह आवरता आला नाही असे प्रमुख संगीतकार म्हंणजे हिंदी चित्रपट संगीतात शंकर जय किशन, ओ पी नय्यर, लक्ष्मीकांत प्यारेलाल . मराठी चित्र- भाव गीतात यशवंत देव व सुधीर फडके. या रागात मुख्यत: करूण, शुंगार व शांत व भक्तिरसाची रचना खुलते. माझ्या या विधानाचा प्रत्यय खालील गीतातून आपल्याला येत राहील. संगीतकार शंकर जयकिशन हे भारतीय चितपट संगीताला पडलेले एक चौपदरी गोड स्वप्न. खरे तर स्वप्न नव्हे सत्य ! या द्वयीने किरवाणी रागाचा उपयोग शांत शृंगार व भक्तिरसपूर्ण गीतासाठी केला. खालील उदाहरणे पहा- १_ तू प्यारका सागर है ..... - सीमा २.ध्रीरे धीरे चल चांद गगनमे . लव्ह मॅरेज ३. याद ना जाये बीते दिनोंकी... दिल एक मंदीर ४. ये रात भीगी भीगी ....... चोरी चोरी ५.आज सनम .... चोरी चोरी ६. दिलकी नजरसे --------- आवारा दुसरे संगीतकार म्हणजे ओ पी नय्यर साहेब, यानाही किरवाणीने भ्ररळ घातली. ती खाली दिलेल्या गीतात दिसून येईल. १, पुकारता चला हुं मै ...... मेरे सनम २.आँखोंसे जी उतरी है दिलमे--- फिर वही दिल लाया हुं ३.आओ हुजूर तुम् को ..... किस्मत ४.मै प्यार का राही हुं ... एक मुसाफिर एक हसीना हिदी संगीतकारात लक्ष्मीकांत प्यारेलाल यानीजी किरवाणी रागाचा वापर केला आहे वानगी दाखल खालील दोन गीते पहा. १. मै शायर तो नही..... बॉबी २. परबत के उस पार ... सरगम या खेरीज रिमझिम गिरे सावन--- मंझील - आर डी बर्मन तुम्ही मेरे मीत हो - प्यासे पंछी - कल्याणजी आनंदजी यानीही किरवाणीचा वापर करून मधुर रचना केली आहे. मराठी नाटट्यगीतात दोन तीन गीतेच मला आठवतात जी किरवाणी रागात आहेत. १, सुरसुख खनि तू विमला..... विद्याहरण २. अवमानिता मी झाले-- ३. ना तुलना तव वचना मराठी संगीतकारात यशवंत देवांना "किरवाणी" चिकटूनच बसली आहे असे म्हणावे लागेल.ही उदाहरणेच पहा ना ! . १. ही चिकमोत्याची माळ २. विसर गीत विसर प्रीत ३. अशी पाखरे येती. ४. तिन्ही लोक आनंदाने भरूनि गाउ दे ५. कधी बहर कधी शिशिर परंतू दोन्ही एक बहाणे मराठी चित्रसंगीतात एन दता यांचे स्थानही खास आहे . त्यानी केलेल्या गीतातील किरवाणी पहा. १.तुझी प्रीत आज कशी स्मरू - अपराध २.सांग कधी कळणार तुला-- अपराध आता राहता राहिले आपले लाडके बाबुजी - सुधीर फडके साहेब. यानी गायलेल्या गीतांमधे " किरवाणी" आला आहे हे वर आलेच आहे.पण त्याच बरोबर त्यानी संगीत दिलेल्या गीतात ही किरवाणी डोकावताना दिसतो. १. एकाच या जन्मी जणू--- आपली माणसं - संगीत सुधीर फडके २. खराच कधी तू येशील का? - कलंकशोभा- संगीत सुधीर फडके किरवाणीचा प्रभाव गझल गायकांवरही दिसतो . घ्या या रचना पहा ! पारा पारा हुवा पैरहन ए जान = गुलाम गली बेसबब बात बढनेकी जुरूरत क्या है - जगजीतसिंग वरील गीते तयार करताना संगीतकारानी राग नियमाला थोडेसे डावलून इतर स्वर घेण्याचा खटाटोप केला आहे पण त्यामुळे गीतातील लज्जत वाढलेली दिसेल. काही गीते आपण वाद्यावर वाजवून पाहिल्यास कधीमधी शुद्ध धैवत व कोमल निषाद यांचाही वापर करून चालीचा गोडवा वाढवलेलाच दिसेल. माझा कान मला दगा देत नसेल तर मी असे विधान करतो की किरवाणी रागाने मध्यपूर्वेतही बस्तान बसवलेले दिसते. रॉन गुडविन यांच्या अरेबियन नाईटस या अत्यंत गाजलेल्या अल्बम मधे या रागातील एक नम्बर आहे. तसेच् पुणे आकाशवाणीच्या "आपली आवडची" धुन ही किरवाणी रागात होती हे स्मरतेय !

वाचन 6847 प्रतिक्रिया 0