चिरंजीव, बायकोच्या हातात पाळण्याची दोरी दिल्यावर तुमच्या हातात बाजारहाटाची पिशवी येणे हा निसर्गक्रमच आहे.
असो.
आता एकेक प्रश्न आपण अग्रक्रमाने घेण्यापूर्वी थोडीशी पार्श्वभूमी सांगणे अत्यावश्यक आहे.
बर्याच वर्षानी तुम्ही आम्हाला काहीतरी विचारताय याचा आनंद आहेच पण त्याहूनी आनंद तुम्ही आमच्या पिशवी पंथात सामील झाल्याचा आहे.
पुन्हा एकदा असो.
चांगला हापूस कुठे मिळतो ? : शाकाहारी बहुल वस्ती असलेल्या बाजारात म्हणजे मुंबैत घाटकोपर-मुलुंड -सायन -विलेपार्ले हापूस चांगला मिळतो.
एपीएमसी बाजारात जाण्याचा अतिउत्साह करण्याची ही वेळ नाही .
तुम्हाला दोघांना आणि आल्या गेल्या एखाद्या पाहुण्याला हिशेबात धरून आठवड्याला एखाद डझन आंबा पुरेसा आहे.
तुमच्या उपनगरातल्या बाजारचे पण पोटभाग आहेत. सायनला आंबा चांगला मिळत असेल पण तेगबहादूर नगर म्हणजे जुन्या कोळवाड्यात आंबा चांगला मिळणार नाही. पार्ल्याच्या पूर्व भागात हापूस उत्तम मिळेल पण जूहू स्किममध्ये तोच हापूस दामदुपटीने महाग मिळेल.
मुलुंड पश्चिमेला उत्तर प्रदेशी लोकांची गर्दी असलेल्या बाजारात आंबा घेण्यापेक्षा पूर्वेला पोंक्षे-फडके -नित्सुरे अशी आडनावे असणार्या दुकानदाराकडे आंबा घेणे फारच श्रेयस्कर. हे दुकानदार ग्राहकाशी कडवट -कुत्सीत आवाजात बोलतात पण त्यांच्याकडे आंबा उत्तम मिळतो. भय्ये लोकांकडे आंबा चांगला आंबा मिळत नाही असे काही नाही पण ते व्यापार करत असतात त्यामुळे त्यांच्याकडल्या डझनातल्या बार पैकी आठ हापूस तर चार हापूस सारखे आंबे असतात.
हापूस आणि हापूस सारखा ह्या दोन्हीतल फरक काय ह्या प्रश्नाचे उत्तर बायको आणि बायको सारखी म्हणजे काय अशा प्रतिप्रश्नाने द्यावे लागते.
हापूस देवगडचा की रत्नागिरीचा ? देवगडचा हापूस म्हणजे जुना रत्नागिरीचाच हापूस. जिल्हे बदल आपण केले आहेत आंब्यांनी नाही.
तरी पण सामन्य ज्ञानासाठी म्हणून सांगतो. हापूसची चव ही माती पाण्याप्रमाणे बदलते. तांबड्या कातळावर वाढवलेली खार्या वार्याला दिवसरात्र तोंड देणार्या कलमाची फळे चविला उत्तम असतात. डोंगराच्या उतारवरची कलमे पण चांगली फळे देतात पण त्यांची साल जरा निबर असते.
म्हणजे मी राजापूरचा आणि तुमच्या मातोश्री विजयदुर्गच्या असा विचार केला तर फरक लक्षात तातडीने येणार. असो.
असो. दोन्हीची चव चांगलीच असते.
खरेदीची ओपनींग मुव्ह कशी करावी?
कितीही ज्ञानामृताचे पेले प्याले तरी चतुर दुकानदार नवख्या नवर्यांना चांगलेच ओळखतात. तरीपण एप्रीलच्या पहील्या पंधरवड्यात आमच्या कडे माणगाव किंवा रोह्याचा उत्तम फळ आलंय ते देतो असे म्हणणारा दुकानदार तद्दन खोटारडा असतो. आंबा दक्षिणेकडून उत्तरेकडे पिकत जातो . आधी रत्नागिरी नंतर रायगड आणि सगळ्यात शेवटी वलसाड -गुजरात.
चिपळूणचा आंबा मे च्या पहील्या हप्त्यात-रोहा अलीबाग त्या पाठोपाठ आणि बाकी सगळे आल्सो रॅन मधले...
केमीकलवाला आंबा कसा ओळखायचा ?
आंबा व्यापार्यावर इंप्रेशन मारण्यासाठी कार्बाईड आणि कलटार ,हथ्था हे शब्द वापरणे म्हणजे लिंक्डइनच्या प्रोफाईलच्या जोरावर नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघण्यासारखे आहे. व्यापार्याला हे सगळे ऐकवणारी चाळीस माणसं दिवसभरात भेटतात. एकतर आता कार्बाईड कोणी वापरत नाही. हथ्थ्याचा संबंध आंब्याशी नसून फक्त सौद्याशी आहे हे आपल्याला कळत नाही आणि कलटार हे ब्रँड नेम आहे हे कलटार म्हणणार्या ग्राहकाला माहीती नाही हे त्या (धूर्त) व्यापार्याला पक्के माहीती असते. तस्मात काहीही सोंग न घेता डझनभर आंबे घ्यावे आणि घरी यावे.
एकदम पाच डझनाची पेटी घ्यायची का ?
पाच डझनाची पेटी घेणे हा अव्यापारेषु व्यापार आहे. आंब्याचा भाव बाजारात आल्या दिवसापासून उतरतच असतो.म्हणजे उतरत्या भावाच फायदा पाच आठवडे विसरायचा . हे पाच आठवडे संपता संपता उत्साहच संपला असतो. त्याखेरीज पेटी उघडा , गवत अंथरा , आंबे मांडून ठेवा त्यांच्यावर गस्त घाला अशी कामे वाढतात हे वेगळेच..
हे सगळं ऐकल्यावर चिरंजीव तुमच्या लक्षात आलं असेलच की पिशवी संप्रदायाची रिकामी पिशवी पण वजनदार असते.
मग लोकोत्तर पुरुषाने करायचे तरी काय असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर मी मोजकी पाच लक्षणे सांगतो ती लक्षात ठेवा,.
१ हापूस आकाराच्या मानाने वजनदार असावा. कलटार प्राशन केलेल्या झाडाचा आंबा हलका लागतो.
२ आंब्याच्या पोटात पिकण्याची क्रिया चालू असते ,त्यामुळे आंबा हातात धरला की उबदार लागतो.
३ नाकावर आपटलेला आंबा घेऊ नये किंवा गोलाकार आंबा घेऊ नये.
४ नाकाजवळ नेऊन सुगंध घेतला तर तो एक सारखा यावा . त्यात उग्र अशी सेकंड नोट आली तर आंबा नि:संशय कमअस्सल आहे असे समजावे. पण हे तंत्र जमेपर्यंत दुसरा पाळणा घरात हलण्याइतका कालावधी जातो.
५ आंब्याच्या देठाचे निरीक्षण करावे. देठाजवळ पांढर्री बुरशी दिसली किंवा बारीक छिद्रे दिसली तर आंबा जागच्या जागी ठेवून दुकानातुन बाहेर पडावे.
(शेवटी आंबा बघावा देठात आणि पोरगी बघावी ओठात हेच खरे.)
प्रतिक्रिया
4 Apr 2017 - 1:27 pm | अभ्या..
अगागागागागा,
इतकं? इतकं? इतकं?
आंब्यासाठी फक्त?
.
बरं झालं आवडत नाही ते. ;)
4 Apr 2017 - 1:29 pm | लाडू
:) छान लिहिलेय.
4 Apr 2017 - 1:44 pm | अनुप ढेरे
एक नंबर लिहिलय!
4 Apr 2017 - 1:47 pm | सूड
शेवटचे पाच या वेळेस खरेदी करताना उपयोगी येतील बहुधा!
शेवटच्या ओळीचं हल्लीच ऐकलेलं व्हर्जन म्हणजे "(पुरण)पोळी बघावी काठात आणि पोरगी बघावी ओठात"
4 Apr 2017 - 1:55 pm | चिनार
फारच मस्त रामदासकाका !!
4 Apr 2017 - 2:02 pm | धर्मराजमुटके
जब्राट ! का कुणास ठाऊक पण माझ्या लहानपणी मोसमातले पहिले आंबे खाण्याचा मान गुजराती मारवाड्यांकडे असायचा. कोकणी कदाचित एप्रिलच्या शेवटी आणी मे च्या सुरुवातीला खायचा पण घाटी मात्र मे महिना उतरुन गेल्यावरच खायचे. घाटावर रायवळ आंब्यांच्या उपलब्धतेमुळे कदाचित हापूस चे आकर्षण जास्त वाटत नसेल आणि आर्थिक लायकी नसायची ह्यातील कोणते कारण जास्त खरे हे सांगता येणे कठीण आहे.
आंब्याची पेट्या मोसमाच्या सुरुवातीला आणणारा मराठी माणूस म्हणजे नक्कीच त्याच्याकडे डबोलं असण्याचा संभव. शिवाय अशा माणसाला उघडपणे आंबे खाणे मिरवायची पण सोय नव्हती.
एकंदरीत मराठी माणूस म्हणजे किरकोळीचं प्रकरण. मोसमाच्या सुरुवातीला होलसेल आंबे खावेत ते शेटजींनी असा तो काळ होता.
त्यामानाने आता बरयं. मोसमाच्या ओपनींगला पेट्या विकत घेणं पण परवडतयं बर्याच जणांना, शिवाय "इटिंग हापुस आंबा" असा टॅग असलेला फोटो फेसबुकावर टाकायची सोय पण तंत्रज्ञानाने उपलब्ध करुन दिलीय.
आवडलं. फणसावरही येऊद्या एखादा लेख. फणसाची पारख एकंदरीत आम्हा घाटयांना कमीच / नाहीच म्हटली तरी चालेल. कापा आणि बरका एवढे दोन भेद केवळ ऐकून माहित. दोन थेंब उडवा आमच्यावरही जीवनाचे !
4 Apr 2017 - 2:12 pm | किसन शिंदे
काकानू, मग कधी येऊ आमरस खायला? =))
4 Apr 2017 - 2:14 pm | टुकुल
नेहमी सारख सुंदर लिखाण, आणी किति हे ज्ञान :-)
--टुकुल
4 Apr 2017 - 2:14 pm | ५० फक्त
दुस-या एका ग्रुपमधले वझे आणि इथले आनंद वैद्य, गेली चार वर्षे यांच्याकडुन आंबे घेतो आहे, कधीही कमअस्सल किंवा खराब आंबा नाही, हापुस हापुस म्हणजेहापुसच,
अर्थात देशावरचे आंबे हे सगळ्यांपेक्षा भारी असतात हे वैयक्तिक मत, रायवळ आंब्यांचा रस आणि पुरणपोळी हा दरवर्षीचा डायट सोडायचा मेनु आहे.
4 Apr 2017 - 2:32 pm | सूड
वैद्यांचा आयडी काय म्हणे इथला?
4 Apr 2017 - 4:25 pm | ५० फक्त
सिंव्हगड रोडलाच राहतात (९५५२२१४१९९), जाउ आपण दोघं त्यांच्याकडं, रविवारी जायचं का ? सकाळी,
त्यांच्या आख्या बिल्डिंगमध्ये आंब्याचा वास भरुन राहिलेला असतो.
4 Apr 2017 - 4:52 pm | सूड
चालतंय की!!
9 Apr 2017 - 10:14 pm | आनन्दा
माझा नंबर बदललाय. ७७२२०७८८१२
4 Apr 2017 - 2:27 pm | बबन ताम्बे
ही उपमा जाम आवडली आंबा व्यापार्यावर इंप्रेशन मारण्यासाठी कार्बाईड आणि कलटार ,हथ्था हे शब्द वापरणे म्हणजे लिंक्डइनच्या प्रोफाईलच्या जोरावर नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघण्यासारखे आहे
:-)
4 Apr 2017 - 2:38 pm | पाटीलभाऊ
भारी लिवलंय
4 Apr 2017 - 2:39 pm | एस
आज रामनवमीला रामदासांचा लेख आणि तोही आंब्यावर आला आहे! धन्य झालो. पुढील रामनवमी लवकर येवो.
(पिशवी सांप्रदायिक) एस.
4 Apr 2017 - 2:44 pm | कंजूस
आंब्याचे ललित आवडले. देठाकडे फळाचा भाग वर आलेला दिसला तर ( सुरुवातील बाजारात येणाय्रा फळांबाबत लक्ष ठेवण्यासारखे) तो आंबा पाडालायेण्याअगोदरच झाडावरून उतरवलेला असतो. तो घेऊ नये. मार्केटला भाव चांगला आहे म्हणून अथवा इतर झाडाचे तयार झालेत म्हणून सर्वच झाडांचे काढले जातात. ते कोवळे कच्चे आंबे ( कैय्रा) चवीने पिकत नाहीत.
-कांद्याचं याउलट पातीकडचा भाग कांद्यात गेलेला असला आणि कांदा बसका आडवा दिसला की घेऊ नये. यावेळी फुलाचा दांडा निघायची वेळ येऊन कांद्यातला साठवलेला गर वापरायला सुरुवात होते आणि कांदा चोथट होऊ लागतो.
4 Apr 2017 - 3:21 pm | आदूबाळ
लौल! बेक्कार हसतोय!
4 Apr 2017 - 6:25 pm | चतुरंग
इथेच फिस्सकन हस्लो..
-(आंबेअडाणी)रंगा
4 Apr 2017 - 3:24 pm | नंदन
'जांभूळ आख्यान' रंगायचं तसं हे खास रामदासी शैलीतलं हापूस आख्यान रंगलं आहे. सवडीने पायरी, माणकुराद, रायवळ इत्यादी मानकर्यांचीही वर्दी लागेल अशी आशा करतो.
दंडवत :)
अवांतरः
>>> बर्याच वर्षानी तुम्ही आम्हाला काहीतरी विचारताय याचा आनंद आहेच पण त्याहूनी आनंद तुम्ही आमच्या पिशवी पंथात सामील झाल्याचा आहे.
--- धामणस्करांची 'हस्तांतर' कविता आठवली (दुवा)
4 Apr 2017 - 3:50 pm | मयुरी चवाथे-शिंदे
भन्नाट लिहिलंय...
ज्ञानात भरही पडली
4 Apr 2017 - 3:57 pm | शलभ
सही लिहिलय..
4 Apr 2017 - 4:05 pm | उपेक्षित
१ डझन आंबे १ आठवडा पुरवता तुम्ही काका ?
बाकी लेख एकदम खंग्री झालाय ....
4 Apr 2017 - 4:07 pm | अद्द्या
काका दंडवत घ्या .
4 Apr 2017 - 4:24 pm | अजया
_/\_
आम्र महोत्सव साजरा झाला या लेखामुळे!
4 Apr 2017 - 4:32 pm | वरुण मोहिते
पाडल्याबद्दल रामदासकाकांचे आभार .
काही पंचेस आवडले आंब्यासाठी :))
4 Apr 2017 - 4:51 pm | खेडूत
जब्बरदस्त!
काकाश्री पुनः लिहीते झाले ते जास्त आवडले.
समयोचित लेख आहे, अन थेट उपयोगी आहे.
दुसरा पाळणा हलूनही दशक लोटले तरी आंबे घेताना आम्ही अडाणीच! आतापर्यंत कुणीतरी रेफरन्स दिला म्हणून डोळे झाकून घेतले, अता अडाणीपणा बहुतेक जरा कमी होईल.
4 Apr 2017 - 5:10 pm | गवि
वाह रामदासकाका.. मान गये...
4 Apr 2017 - 6:01 pm | अत्रुप्त आत्मा
लेखाची सुर वात ;) आणी शेवट पाहू जाता,या लेखास हापूस ऐवजी बापूस म्हणावेसे वाट्टे! ==))
4 Apr 2017 - 6:04 pm | प्रचेतस
क्या बात...!!!
4 Apr 2017 - 7:23 pm | पिलीयन रायडर
तुमचं नाव म्हणुन उघडला लेख. नाही तर "आंबा" ह्या विषयावर एक ओळही वाचणार नाही यंदा.
5 Apr 2017 - 2:51 pm | आदूबाळ
मेहिकोचे आंबे मिळतील ना. (ट्रम्पवरून एक ओवाळून टाकलात तर त्याचीही इडापिडा टळेल.)
4 Apr 2017 - 10:09 pm | आषाढ_दर्द_गाणे
काय ते लेखन! काय ते वर्णन!
अचूक, खुसखुशीत आणि खुमासदार!
शब्दाशब्दाशी सहमत, विशेषतः -
मात्र एका विधानाशी पूर्ण असहमती -
ना, ए ना चॉल्बे! 'पुरेसा आंबा' हा एक भ्रम आहे.
रच्याकने, फळाचे देठ वरून पाहताना ते जरा 'आत गेलेले' आहे ना हे पाहावे असे आमचे तात सांगतात...
4 Apr 2017 - 11:07 pm | रातराणी
भारी आहे!
4 Apr 2017 - 11:26 pm | गामा पैलवान
रामदासकाका,
परत लेखनसक्रीय झालात हे पाहून आनंद वाटला. लेख खुमासदार झाला आहे. खुमारी १०० पटीने वाढवण्यासाठी वेगळेच आंबे मनात कल्पावेत. हे वाचून प्रत्येक जण तुमच्या लेखाचे आजूनेक पारायण करणार. या पुनर्प्रत्ययाचं श्रेय मात्र माझंच बरंका! ;-)
आ.न.,
-गा.पै.
वाचकांना विनंती : ज्यांनी हा लेख परत वाचला त्यांनी कृपया तसे जाहीर करावे!
5 Apr 2017 - 8:01 am | मनिमौ
आंबा महोत्सव साजरा झाला हो तुमच्या लेखामुळे.
5 Apr 2017 - 10:42 am | अभिजीत अवलिया
वेलकम बॅक रामदास काका. कृपया आता परत निवृत्ती घेऊ नका.
5 Apr 2017 - 11:14 am | यशोधरा
चविष्ट आणि सुरेख!
5 Apr 2017 - 11:14 am | यशोधरा
चविष्ट आणि सुरेख!
5 Apr 2017 - 11:45 am | संजय पाटिल
वा वा!! जबरदस्त...
आणि समयोचित...
रच्याकने.. .. मी काहि परत लेख वाचला नाहि!
5 Apr 2017 - 12:14 pm | मदनबाण
आम्रवाणी आवडली ! :)
शेवटी आंबा बघावा देठात आणि पोरगी बघावी ओठात हेच खरे.
चांगला "रसाळ" आंबा हाताने अलगद दाबुन, मग ओठांनी अलगद ओढुन आणि चोखुन रस पिण्यात खरी गम्मत असते ! असं माझं व्यक्तिगत मत ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dragon embrace will prove costly for India
5 Apr 2017 - 12:40 pm | आदिजोशी
तुमचं लिखाण मस्तच असतं, त्यावर आम्ही काय बोलणार. फक्त, अजून लिहा, इतकंच म्हणू शकतो :)
5 Apr 2017 - 2:55 pm | Ram ram
रच्याकने पोरींनी पोराचे काय? पहावे.
5 Apr 2017 - 2:55 pm | Ram ram
रच्याकने पोरींनी पोराचे काय? पहावे.
5 Apr 2017 - 3:06 pm | वरुण मोहिते
महत्वाच्या गोष्टींवरती माहितीपूर्ण ज्ञान मिळाल्याने ह्याचा दुसरा भाग पण लवकर टाका हि नम्र विनंती .
म्हणजे कसे वजनावरून तोलायचे...कुठला आंबा नासका आणि कुठला गोड. ह्याबद्दल ..
5 Apr 2017 - 4:36 pm | देशपांडेमामा
अप्रतिम लिहिले आहे !! मस्त खुसखुशित !
देश
5 Apr 2017 - 5:28 pm | पगला गजोधर
आवडलं ...
9 Apr 2017 - 10:49 pm | आनन्दा
खरे तर या धाग्यावर माझी पिंक टाकायला येणार नव्हतो. पण काही गैरसमज वेळेवरच दूर केलेले चांगले..
कल्टारचा आंबा हलका असतो हे मिथ आहे. कल्टार हे मुळात एक संप्रेरक आहे. त्या संप्रेरकामुळे झाडाची वाढ करणारे जिब्रेलिन नावाचे संप्रेरक कमी होते. हे संप्रेरक पुन्हा तयार होण्यासाठी आंब्याची बाठ तयार होणे आवश्यक असते, त्यामुळे झाडाला मोहोर टाकून फळधारणा करण्याशिवाय पर्याय नसतो. आता अति कल्तार वाईटच, कारण त्यामुळे झाडाची वाढ पूर्णपणे थांबते आणि त्यामुळे झाड आणि फळावर देखील परिणाम होतो. परंतु तारतम्याने वापरलेले कल्टार हे हमखास उत्पन्नासाठी चांगले असते. कल्टार वापरणारे लोक २ प्रकारचे असतात -
१. झाडाने खाडा देउ नये म्हणून - यामध्ये कल्टारचा सौम्य डोस दिला जातो. त्यामुळे न येणारी झाडे देखील फळे देऊ लागतात. मे महिन्यात का असेना फळ मिळते. काही वेळेस या एका कल्टारच्या डोसाने झाडांचा हार्मोनल बॅलन्स परत रुळावर येतो. आंब्याच्या झाडाचे सायकल दोन वर्षांचे असते. अश्या सौम्य डोसामुळे बागेचे दोन भाग करून अर्ध्या अर्ध्या भागाचे दरवर्षी उत्पादन घेता येते.
२. झाडे लवकर यावी म्हणून - यामध्ये थोडा जास्त डोस दिला जातो - साधारण कंपनीने रेकमेंड केलेला. यामुळे झाडे येतातही लवकर, आणि भाव पण चांगला मिळतो. पण जर डोस जास्त झाला तर फळे लहान होतात आणि पर्यायाने नगद पैसे तुलनेने कमी मिळतात.
याव्यतिरिक्त कलमे भाड्याने घेऊन त्यांना वारेमाप कल्टार घालणारे लोक आहेत, पण त्यांच्याबद्दल काही लिहित नाही कारण झाडांशी काहीही घेणेदेणे असते.
खरा शेतकरी झाडांच्या आरोग्याशी तडजोड करत नाही.
बाकी कल्टारचा आंबा हलका असतो आणि गोमूत्राने कॅन्सर बरा होतो ही दोन्ही वाक्ये सारखीच आहेत.
याबद्दल न बोललेले चांगले. कारण मॉलमधला आंबा तुम्ही हातात धरा आणि अजून कुठे धरा, गारच लागणार. आंबा गरम लागतो कारण तो पिकताना उष्णता उत्सर्जित करतो. परंतु ही आंबा तपासायची लिटमस टेस्ट नाही.
गोलाकार आंबे घेऊ नये हे नक्की मिथ आहे. माझ्या माहितीत तरी गोलाकार आंबे खराब झालेले मी पाहिलेले नाहीत. आपटलेला आंबा घेऊच नये. तो पिकत नाही. अर्थात किती आपटल्यावर घेऊ नये हे सांगणे कठीण. ते अनुभवानेच कळते.
हे अगदी खरे आहे. पण रामदासकांनी लिहिल्याप्रमाणे प्रचंड कठीण आहे. पण एका वर्षी जेव्हा आमच्या आंब्यात मेजर फौल्ट येत होते, तेव्हा आम्ही वासाने असे आंबे बाजूला काढले होते. पण त्यासाठी हजारो आंब्यांचा वास घेऊन नाक तयार व्हायला हवे.
याचा नेमका अर्थ मला कळलेला नाही. पांढरी बुरशी तुम्हाला सहसा चांगल्या आंबेवाल्याकडे मिळणार नाही. सामान्यपणे बुरशी असलेला आंबा ३-४ दिवसात कुसतो. त्यामुळे तुम्हाला हा अनुभव घेता येणे कठीण. कच्चा आंबा म्हणाल तर ही बुरशी साध्या डोळ्याने दिसत नाही. तशी ती दिसत असेल तर आंबा नाही, तर आंबेवाला बदला. ज्याला आपल्या आंब्याची काळजी घेता येत नाही त्याच्याकडून खरेदी करण्यात काय हशील?
आंबा बघावा देठात हे तर खरेच, पण काय बघावे हे पण महत्वाचे - आंबा तयार होताना देठाजवळ छोटासा खड्डा पडतो. आंबा जेव्हढा तयार होत जाईल तेव्हढा तो खड्डाआ शष्ट होत जातो. पूर्ण खड्डा झाला तर तो १६ आणे तयार आंबा झाडावरून गळून पडतो. साधारण खड्डा झालेला आंबा १४ आणे तयार होऊन झाडावर पिकतो. त्यात साका तयार झालेला असतो. त्याची चव अप्रतिम असली तर विक्रीला हा आंबा अयोग्य. सामान्यपणे खड्डा तयार व्हायला लागलेले आंबे १२ आणे तयार असतात आणि ते काढल्यापासून ८ दिवसात पिकतात, हे असेच आंबे काढून बाजारात आणले जातात. काही वेळेस झाडाला लाग खूप असतो, अश्या वेळेस पुढचे आंबे तयार व्हावेत म्हणून त्यातल्या त्यात मोठे आंबे काढून मुहुर्त केला जातो. झेला लागल्यावर आंबे लवकर तयार होतात असे म्हणतात.
बाकी हे मस्तच लिहिलेत -
कमीत कमी शब्दात जास्तीत जास्ती माहिती.
आता जाता जाता एव्हढेच सांगेन - चांगला आंबा हा केवळ वासावरूनच ओळखता येतो. नैसर्गिक पिकलेल्या चांगल्या आंब्याला सुगंध हा येतोच. त्यामुळे पिक्का आंबा ओळखायचा असेल तर आंब्याच्या देठाकडे नव्हे, तर चोचीकडे वास घेऊन ओळखावा. ज्या आंब्याला चोचीकडे सुगंध येतो, तो आंबा हमखास पिकला आहे. मग तो हिरवा दिसला तरी बेलाशक कापावा. आणि एखाद्याकडचा सगळा आंबा एकारंतुकतुकीत पिवळ्या रंगाने नटलेला असेल तर शांतपणे चपला सरकवून बाहेर पडावे
एव्हढे बोलून माझे ४ शब्द संपवतो.
10 Apr 2017 - 10:07 am | रामदास
हे वाचल्यावर माझ्याही ज्ञानात भर पडलीचआणि हे पण आठवले,
रेख्ता के तुम ही उस्ताद नहीं हो ग़ालिब
कहते हैं अगले ज़माने में कोई मीर भी था
10 Apr 2017 - 12:16 pm | खेडूत
आज लोकमत मधे हा लेख आलाय. काकांच्या नावासह उल्लेख करायला हवा होता असे वाटले.
17 Apr 2018 - 1:40 pm | मनिम्याऊ
17 Apr 2018 - 4:03 pm | मनिम्याऊ
22 Jan 2021 - 8:34 am | NAKSHATRA
आंबा बघावा देठात हे तर खरेच, पण काय बघावे हे पण महत्वाचे - आंबा तयार होताना देठाजवळ छोटासा खड्डा पडतो. आंबा जेव्हढा तयार होत जाईल तेव्हढा तो खड्डाआ शष्ट होत जातो. पूर्ण खड्डा झाला तर तो १६ आणे तयार आंबा झाडावरून गळून पडतो. साधारण खड्डा झालेला आंबा १४ आणे तयार होऊन झाडावर पिकतो. त्यात साका तयार झालेला असतो. त्याची चव अप्रतिम असली तर विक्रीला हा आंबा अयोग्य. सामान्यपणे खड्डा तयार व्हायला लागलेले आंबे १२ आणे तयार असतात आणि ते काढल्यापासून ८ दिवसात पिकतात, हे असेच आंबे काढून बाजारात आणले जातात. काही वेळेस झाडाला लाग खूप असतो, अश्या वेळेस पुढचे आंबे तयार व्हावेत म्हणून त्यातल्या त्यात मोठे आंबे काढून मुहुर्त केला जातो. झेला लागल्यावर आंबे लवकर तयार होतात असे म्हणतात.
22 Jan 2021 - 12:43 pm | कर्नलतपस्वी
22 Jan 2021 - 12:43 pm | कर्नलतपस्वी
22 Jan 2021 - 12:43 pm | कर्नलतपस्वी