श्रीगणेश लेखमाला - एक रहस्य उलगडताना..

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in लेखमाला
7 Sep 2016 - 8:30 am

.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
}

'आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं' हे आनंद शिंद्यांनी ज्या वर्षी महाराष्ट्राला ठणकावून सांगितलं, साधारण त्याच वर्षी मी रहस्यकथा वाचायला सुरुवात केली असेल. तसा मला वाचनाचा नाद अगदी लहानपणी लागला. मी दीड वर्षाचा असताना एका डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या निदानामुळे माझ्या पोटाची वाट लागली होती. त्यात माझा स्वभाव चळवळ्या. एका जागी स्थिर न बसणारा. थोडा मोठा झाल्यावर मी इतर मुलांमध्ये खेळायला जायला लागलो, पण माझं पोट कायम बिघडलेलं असल्यामुळे मला नीट खेळताही यायचं नाही. परिणामी घरी बसण्याचे आणि आईला आणि आजीला त्रास देण्याचे प्रसंग वारंवार यायला लागले आणि माझा एकलकोंडेपणाही वाढायला लागला. तासनतास घुम्यासारखा बसलेला असायचो. त्यावर इलाज म्हणून एका मावसोबांनी मला पुस्तकं आणून दिली आणि माझ्या हाताला घबाड लागलं. अक्षरशः दर आठवड्याला एक नवीन पुस्तक मी आणायला लावायचो आणि आजी आणि आई यांच्यावर ते वाचून दाखवायची जबाबदारी यायची.

पुढे माझा मी वाचायला लागल्यावर हे वेड आणखीनच वाढलं. सुदैवाने घरात प्रत्येकाला वाचायची आवड असल्यामुळे, किंवा निदान त्याला विरोध नसल्यामुळे अनेक नवीन पुस्तकं हातात पडत गेली. दिवाळीच्या सुट्टीत मोठ्यांच्या किस्त्रीम, हंस, ललित, अबकडई याबरोबर माझ्या किशोर, कुमार, टॉनिक इत्यादी अंकांचीही वर्णी लागायला लागली. शिक्षिका असलेल्या माझ्या आईच्या आधी मला उन्हाळ्याची सुट्टी लागायची. मी घरी काही अत्रंगीपणा करू नये म्हणून ती मला शाळेत घेऊन जायची. तिच्या शाळेची मोठी लायब्ररी होती आणि तिथले ग्रंथपाल मुलांनी हातावर घडी तोंडावर बोट असंच बसावं आणि पुस्तकं कपाटातच चांगली दिसतात अशा विचारांचे नव्हते. त्या लायब्ररीत मला भा.रा. भागवतांची पुस्तकं मिळाली आणि वाचनाची संपूर्ण दिशाच बदलून गेली. भागवतकाका आणि माझे आजोबा हे शाळेतले मित्र. माझी आई आणि मावशी या त्यांच्या 'बालमित्र' या मुलांसाठी काढलेल्या मासिकाच्या पहिल्या वर्गणीदार होत्या. त्यांनी विज्ञानकथा या प्रकाराचा जनक असलेल्या ज्यूल्स व्हर्नच्या कादंबर्‍यांचे केलेले अनुवाद वाचताना एक नवीन जग समोर उलगडल्यासारखं वाटत होतं. भागवतांनी केलेलं ‘जाईची नवलकहाणी’ हे ‘ALICE IN WONDERLAND’चं रूपांतर मराठीमधल्या अभिजात रूपांतरांपैकी एक आहे, असं माझं मत आहे. ती एका स्वतंत्र कलाकृतीच्या पातळीला भागवतांनी नेऊन ठेवलेली आहे. पण दुर्दैवाने बालवाङ्मय लिहिणार्‍या लेखकांना आणि तेही लोकप्रिय, आपल्या देशात समीक्षकांनी गांभीर्याने घेणं जरा कठीणच आहे. असो.

असं सगळं चालू असताना मी भा.रा. भागवतांचं इतर लिखाणही वाचायला सुरुवात केली आणि माझ्या हातात ते पुस्तक लागलं, ज्याने माझ्या मनात रहस्यकथा या प्रकाराविषयी आवड निर्माण केली – गुलमर्गचे गूढ आणि फास्टर फेणे. काश्मीरच्या पार्श्वभूमीवर घडणारं कथानक होतं. मोहर्रमच्या मिरवणुकीत एका माणसाचा झालेला खून, त्यातून फास्टर फेणे आणि त्याचा मित्र अन्वर यांना मिळालेले धागेदोरे आणि शेवटी गुलमर्गजवळच्या वुलर सरोवराजवळ झडलेला क्लायमॅक्स अशी जबरदस्त कथा होती आणि ती भागवतांनी कुमारवयीन वाचकांच्या मनाचा विचार करून इतक्या सुंदरपणे खुलवली होती की त्याला अजूनही तोड नाही. त्याच सुमारास बाली बेलसरे यांनी अनुवाद केलेल्या सत्यजित राय यांच्या फेलुदा कथा हाताला लागल्या. जसा भागवतांनी मराठी बाल आणि कुमारवाचकांना फास्टर फेणे दिला, तसंच राय यांनी बंगाली वाचकांना फेलुदा, तपश आणि लेखक लालमोहन गांगुली उर्फ जटायू या व्यक्तिरेखा दिल्या. राय चित्रकार आणि चित्रपट दिग्दर्शकही असल्यामुळे त्यांच्या कथा वाचकांच्या मनासमोर घटनांचं चित्र उभं करतात; तर भागवत वाचकांना ते प्रत्यक्ष त्या साहसात सहभागी असल्याचा अनुभव देतात.

टीव्हीवर त्याच सुमारास काही कार्यक्रम होते, ज्यांच्यामुळे ही आवड अजून पुढे विकसित झाली. एक दो तीन चार ही चार कुमारवयीन मित्रांच्या कथा असलेली मालिका मला प्रचंड आवडायची. सत्यजित राय प्रेझेंट्स या सत्यजित राय यांच्या कथांवर आधारित असलेल्या मालिकेमधले फेलुदा असलेले भाग – मला अजूनही आठवतंय, शशी कपूर फेलुदा होता, मोहन आगाशे - लालमोहन बाबूंच्या, अलंकार जोशी (तोच शोलेमधला ठाकूरचा नातू) तपशच्या आणि उत्पल दत्त खलनायक मेघराजच्या भूमिकेत. पण सर्वात आवडती मालिका होती ती म्हणजे दर सोमवारी रात्री १० वाजता येणारी ‘करमचंद.’ करमचंद हे अत्यंत जुनाट नाव आणि अत्यंत ओबडधोबड चेहरा असूनही केवळ आपल्या अभिनयाने आणि स्टाईलने पंकज कपूरने करमचंद अजरामर केला. त्याचं ते गाजर खाणं, अत्यंत रुबाबदार पद्धतीने सगळीकडे वावरणं आणि शेवटी रहस्याचा उलगडा झाल्यावर त्याच्या सेक्रेटरी किटीने त्याला "सर, यू आर अ जीनियस" असं कौतुकाने म्हणणं आणि त्याने तिला "शट अप किटी" म्हणणं – हे सगळंच भारून टाकणारं होतं.

इकडे वर्षं वेगाने पुढे जात होती. माझी तब्येतही सुधारली होती. वाचनाची आवडही आणखी विस्तृत झाली होती. एकीकडे पु.लं.ची अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा, वंगचित्रे यांच्यासारखी प्रवासवर्णनं; हसवणूक, गोळाबेरीज यांच्यासारखी ललित पुस्तकं; व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, गुण गाईन आवडी यांच्यासारखी व्यक्तिचित्रं – असं वाचन चालू होतं. दुसरीकडे मला दिवाळीच्या सुट्टीमध्ये अगदी सुट्टीभर वाचता येईल असे दोन दिवाळी अंक मिळाले होते – धनंजय आणि नवल. रहस्यकथा, गूढकथा, थरार यांना वाहिलेले. अनेक चांगले लेखक या दोन्हीही अंकांसाठी लिहायचे. दीर्घकथा, अनुवादित कथा, शिकारकथा, युद्धकथा यांची मेजवानी असायची. तेव्हाच मला चित्रपटांचीही आवड लागली होती. तेव्हा दोन चित्रपट पाहण्यात आले. एक इंग्लिश आणि एक हिंदी - Chase a crooked shadow आणि तीसरी मंझिल. दोन्हीही अप्रतिम रहस्यपट. दोघांमध्ये दिग्दर्शकाने अत्यंत कौशल्याने प्रेक्षक अगदी त्यांच्या खुर्चीवर खिळून राहतील असा निर्माण केलेला ताण आणि दोन्हींमध्ये पार्श्वसंगीताने गडद केलेलं रहस्य. या दोन्ही चित्रपटांनी माझी रहस्यकथांची आवड आणखीनच वाढवली. तीसरी मंझिल हिंदीमध्ये असल्यामुळे समजायला काही प्रश्न आला नाही, पण Chase a crooked shadowचं रहस्य थोडंफार समजावून घ्यावं लागलं.

दरम्यान शाळा संपली. कॉलेज चालू झालं, आणि मराठी माध्यमात शिकलेल्या बर्‍याच मुलांना येतो तो प्रश्न अगदी पहिल्या दिवसापासून माझ्यासमोर उभा ठाकला. इंग्लिश भाषा. शाळेत इंग्लिश हा एक विषय होता, इथे सगळेच विषय इंग्लिशमध्ये होते, आणि मला काहीही समजत नव्हतं. त्यात मी अट्टाहासाने कलाशाखेत गेलो होतो. इथे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, तर्कशास्त्र वगैरे शाळेत अजिबात नसलेले विषय होते आणि वर्गात शिक्षक जे काही शिकवायचे, ते सगळं डोक्यावरून जात होतं. शिवाय आजूबाजूला बसणारी मुलं आणि मुली फटाफट उत्तरं द्यायची आणि मला यांना एवढे शब्द आणि तेही इंग्लिशमधले, कसे लक्षात राहतात असा प्रश्न पडायचा. एकदा मला वर्गात उभं करून एका शिक्षकांनी प्रश्न विचारला. मला प्रश्न समजला होता, उत्तरही माहीत होतं, पण ते इंग्लिशमध्ये नीट मांडता येत नव्हतं. परिणामी मी शुंभासारखा तसाच उभा राहिलो. शिक्षकांनी खाली बसायला सांगितलं, तेही माझ्या लक्षात आलं नाही. आजूबाजूचे हसायला लागले आणि माझ्या बाजूला बसलेल्या मित्राने मला सांगितलं, तेव्हा मी खाली बसलो.

हा प्रसंग माझ्या जिव्हारी लागला. मी शाळेत फार हुशार वगैरे नव्हतो, पण निदान वर्गात उत्तरं द्यायचो. इथे मात्र लाजच निघाली होती. आता मी इंग्लिश सुधारण्यासाठी प्रयत्न करायचं ठरवलं. अकरावीचं वर्ष कसंबसं संपलं आणि मी उन्हाळ्याच्या सुट्टीत गोरेगावला (जिल्हा रायगड) माझ्या काकांच्या घरी गेलो. तिथे बोलता बोलता हा विषय निघाला आणि काकांनी माझ्या हातात दोन पुस्तकं ठेवली – फ्रेडरिक फोरसाईथ या जगद्विख्यात लेखकाची कादंबरी ‘द निगोशिएटर’ आणि आर्थर कॉनन डॉईलचं ‘अॅडव्हेंचर्स ऑफ शेरलॉक होम्स.’ शेरलॉक होम्सच्या कथा मी मराठीमध्ये वाचल्या होत्या, त्यामुळे त्या इंग्लिशमध्ये वाचायला कठीण गेल्या नाहीत, पण द निगोशिएटर मात्र अक्षरशः एक एक पान अर्थ लावत वाचायला लागली. एकदा वाचल्यावर मी ती दोन-तीनदा परत वाचून काढली. जेव्हा शब्दकोश हातात न घेता इंग्लिश शब्दांचे अर्थ लक्षात यायला लागले, तेव्हा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. लगेचच मी फोरसाईथचीच द डे ऑफ द जॅकल वाचून काढली. या वेळेस अर्थ समजायला फारसा वेळ लागला नाही.

दरम्यान बारावीचं महत्त्वाचं वर्ष सुरू झालं होतं, आणि आता माझी इंग्लिश भाषा बरीच सुधारली होती. मी इतरांशी इंग्लिशमध्ये संभाषणही करायला लागलो होतो. त्याच वेळी माझ्या लक्षात आलं की "तो अस्खलित (fluently) इंग्लिश बोलतो" असं जेव्हा आपण एखाद्याबद्दल म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ हा असतो की त्या माणसाच्या मनात त्याच्या मातृभाषेत वाक्यरचना करणं आणि ते वाक्य इंग्लिशमध्ये भाषांतरित किंवा अनुवादित करणं ही प्रक्रिया इतरांपेक्षा जास्त वेगाने होते. याचा अर्थ इंग्लिश ही ज्याची मातृभाषा नाहीये, तो प्रत्येकच माणूस मनातल्या मनात हे भाषांतर करत असणार. याचाच अर्थ जर मला माझं इंग्लिश सुधरायचं असेल, तर मला माझ्या भाषेतून इंग्लिशमध्ये भाषांतर करण्याची प्रक्रिया वेगाने करायला हवी आणि त्यासाठी इंग्लिश भाषेचा शब्दसंग्रह वाढवायला हवा. तो वाचन आणि इंग्लिश कार्यक्रम आणि चित्रपट या गोष्टींमुळे वाढू शकेल. पण तो वाढवण्याची हुकमी उपाययोजना म्हणजे इंग्लिशमधून मराठी आणि इतर भाषांमध्ये अनुवाद करणं, कारण वाचण्यापेक्षा लिहिण्याने एखादी गोष्ट जास्त चांगली लक्षात राहू शकते.

मी त्या वेळी शेरलॉक होम्सच्या कादंबर्‍या वाचायला सुरुवात केली होती. आर्थर कॉनन डॉईलनी होम्सच्या चार कादंबर्‍या लिहिलेल्या आहेत – अ स्टडी इन स्कार्लेट, साईन ऑफ फोर, द हाऊंड ऑफ द बास्करव्हिल्स आणि अ व्हॅली ऑफ फिअर. यातल्या पहिल्या, तिसर्‍या आणि चौथ्या कादंबर्‍यांचे अनुवाद मी स्वतः वाचलेले होते, त्यामुळे ते परत करण्याची माझी इच्छा नव्हती. मी साईन ऑफ फोरचा अनुवाद करायचं ठरवलं आणि करता करता हे आपल्याला जमतंय आणि नुसतं जमत नाहीये, तर आवडतंय हेही माझ्या लक्षात आलं. माझी बहीण गीतांजली ही माझ्या लेखनाची पहिली वाचक. तिला वाचनाची प्रचंड आवड होती आणि आहे आणि तिला जर एखादं पुस्तक पहिल्या अर्ध्या तासात आवडलं नाही, तर ती ते पुढे वाचत नाही. त्यामुळे तिला माझा अनुवाद कसा वाटतोय ही धाकधूक माझ्या मनात होती. मी जे लिहिलं होतं, ते सुदैवाने तिला आवडलं. त्यामुळे मला हुरूप आला.

पुढे पदव्युत्तर शिक्षणासाठी मी पुणे विद्यापीठात आलो. मी दुसर्‍या वर्षाला असताना मला आमचे विभाग प्रमुख असलेल्या प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक विनय धुमाळे यांच्या ‘लोकमान्य’ या मालिकेसाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायची संधी मिळाली. या मालिकेमध्ये ज्या ब्रिटिश व्यक्तिरेखा होत्या, त्यासाठी आम्ही पुण्याच्या रजनीश आश्रमात येणार्‍या आणि अभिनय करू इच्छिणार्‍या लोकांना घेणार होतो आणि त्यांचे संवाद इंग्लिशमध्येच ठेवले होते. ही मालिका दूरदर्शनसाठी होती, आणि त्यांनी आम्हाला आयत्या वेळी हे इंग्लिश संवाद हिंदीमध्ये अनुवादित करून subtitles म्हणून द्यायची विनंतीवजा आज्ञा केली. मी ही जबाबदारी उचलली आणि संपूर्ण मालिकेतल्या इंग्लिश संवादांचा हिंदीमध्ये अनुवाद केला.

त्यानंतर अॅव्हिटेल नावाच्या एका संस्थेसाठी काम करायला मी सुरुवात केली. इथे हिंदी चित्रपटांच्या डीव्हीडी बनवून त्या subtitlesसकट मध्यपूर्व, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड वगैरे ठिकाणी पाठवल्या जात असत. एका नियमानुसार या डीव्हीडींमध्ये इंग्लिश subtitles असणं अनिवार्य होतं. त्यामुळे अनेक चित्रपट – आर.के. फिल्म्स, यशराज फिल्म्स आणि फिल्मक्राफ्ट या ख्यातनाम निर्मिती संस्थांचे चित्रपट – मी अनुवादित केले. त्यात आवारा, श्री ४२०, जिस देशमे गंगा बहती है, मेरा नाम जोकर, सिलसिला, कभी कभी, डर या अनेक विख्यात चित्रपटांचा समावेश होता.

Subtitles लिहिताना ते शब्दशः भाषांतर नसावं याबद्दल माझा तेव्हाही कटाक्ष होता आणि आत्ताही असतो. प्रत्येक भाषेची एक वेगळी गंमत, वेगळी लय असते. ती दुसर्‍या भाषेत कधीकधी पूर्णपणे आणता येत नाही. कधीकधी काही शब्द हे एखाद्या भाषेत आणि ती भाषा ज्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करते, त्या संस्कृतीत इतके मुरलेले असतात, की त्यांचं भाषांतर करणं हे नुसतंच अशक्य नाही, तर चुकीचंही असतं. उदाहरणार्थ, पिठलं या शब्दाचं भाषांतर कसं करणार? तेच इंग्लिशमधला butler हा शब्द. मी अशा वेळी ते शब्द तसेच ठेवतो.

Subtitles लिहिताना अनेक मजेदार अनुभव आले. श्री ४२०च्या सुरुवातीला जो प्रसंग आहे, त्यात राजू (राज कपूर) रस्त्याच्या कडेला कोणी लिफ्ट देतंय का याची वाट पाहत उभा असतो. तीन-चार गाड्या न थांबता निघून जातात. तेव्हा तो स्वतःशीच म्हणतो – एक कार, दो कार, तीन कार, सब बेकार! यातला 'कार' आणि बे'कार'वरचा विनोद इंग्लिशमध्ये कसा आणणार? मी त्यातल्या त्यात Three cars in a lane, all in vain असं भाषांतर केलं, पण ते मुळातला विनोद व्यक्त करू शकत नाही हे खरं आहे.

सिलसिलाची subtitles करताना अचानक क्लायंटकडून एक विचित्र मागणी आली – गाण्यांचेही subtitles बनवा, तेही गद्य नव्हे, तर गीतांच्या स्वरूपात. मी कवी वगैरे अजिबात नसल्यामुळे हे अशक्य होतं. त्यातल्या त्यात ‘मै और मेरी तनहाई' आणि ‘नीला आसमां सो गया' यांचा थोडाफार अनुवाद करणं जमलं, पण ‘ये कहां आ गये हम’ वगैरे गीतांचा छंदोबद्ध अनुवाद करणं ही माझ्या कुवतीपलीकडली गोष्ट होती.

पुढे टेलिव्हिजन पत्रकारितेत गेल्यावर अनुवादाच्या कौशल्याचा उपयोग झाला. बातम्या मराठी, हिंदी आणि इंग्लिश यातल्या कुठल्याही भाषेतून दुसर्‍या कुठल्याही भाषेत भाषांतरित कराव्या लागायच्या. त्यामुळे तिन्ही भाषांवरची पकड बर्‍यापैकी मजबूत झाली.

२००३मध्ये मी टेलिव्हिजन क्षेत्र सोडून शिक्षणक्षेत्रात गेलो. जयहिंद महाविद्यालय, जिथे मला नोकरी मिळाली होती, तिथे वातावरण पूर्ण इंग्रजाळलेलं होतं. तेव्हा या अनुवाद करण्याच्या सवयीचा प्रचंड उपयोग झाला. जगातल्या कुठल्याही शाळेत किंवा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षक किती शिकलेले आहेत, याने काहीही फरक पडत नाही. ते आपल्या पातळीवर येऊन आपल्याला तो विषय समजवू शकतात का, हे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं होतं. माझ्या अनुवादाच्या सवयीमुळे विषय सोपा करून सांगणं हे मला बर्‍यापैकी जमू शकलं आणि आता प्रशिक्षण क्षेत्रात असताना तर त्याचा खूपच फायदा होतोय. आपल्या देशात प्रचंड विविधता आहे, असं आपण पुस्तकांत वाचलेलं असतंच. पण प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्या विविधतेचा अनुभव येत नाही. पंजाबमध्ये आणि गुजरातमध्ये शिकवताना मला हे समजलं की इथले लोक हिंदी चित्रपट बघत असले, तरी त्यांना आपण बोलत असलेली हिंदी समजतेच असं नाही. पंजाबमध्ये तर पतियाळा, चंदीगड वगैरे दिल्लीच्या जवळ असलेल्या भागांमध्ये लोकांना हिंदी समजते, पण संगरुर, मोरींडा वगैरे अंतर्गत भागात बोलली जाणारी पंजाबी आणि आपल्याला चित्रपटांमध्ये माहीत असलेली पंजाबी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मी विद्यार्थ्यांना हिंदीमध्ये इंग्लिश शिकवतोय आणि ते पंजाबीमध्ये किंवा गुजरातीमध्ये उत्तरं देत आहेत, असा प्रकार बर्‍याच वेळा घडलेला आहे.

मिपावर आल्यावर मी नियमितपणे लिहायला सुरुवात केली. माझी पहिलीच लेखमालिका – अंधार क्षण ही विख्यात पत्रकार आणि वृत्तचित्रकार लॉरेन्स रीज यांच्या Their Darkest Hours या पुस्तकाचा स्वैर अनुवाद होती. दुसर्‍या महायुद्धात लोकांना आलेल्या भीषण अनुभवांवर ही मालिका होती. काही अनुभव तर अंतर्बाह्य ढवळून काढणारे होते. माझ्यासाठी एक प्रकारे त्यांचा अनुवाद करणं हा त्यातून आलेल्या विषण्णतेचा निचरा करून टाकण्याचा प्रयत्न होता. त्याच सुमारास वाचन चालूच होतं आणि अशा वेळी मायकेल कॉनेलींची 'द स्केअरक्रो' ही कादंबरी माझ्या वाचनात आली. तंत्रज्ञान आणि गुन्हेगारी यांचा एक वेगळाच संबंध त्यांनी या कादंबरीत मांडलेला आहे. ती वाचून संपवताक्षणीच माझ्या लक्षात आलं की आपल्या नकळत आपण या कादंबरीचा मनातल्या मनात अनुवाद करून टाकलेला आहे आणि कुठेतरी हे आपण लिहून ठेवायला पाहिजे. त्यामुळे मायकेल कॉनेलींची रीतसर परवानगी घेऊन मी हा अनुवाद मिपावर प्रकाशित केला.

कादंबरी अनुवादित करताना अनेक गोष्टी सामोर्‍या आल्या. कॉनेलीच्या व्यक्तिरेखांचा एक स्वभाव असतो, आणि वेगवेगळ्या परिस्थितीत त्या ज्या प्रकारे प्रतिक्रिया देतात ते इंग्लिशमध्ये वाचणं थरारक होतं आणि ते मराठीमध्ये आणणं हे आव्हान होतंच. शिवाय मुख्य आव्हान म्हणजे कादंबरीचा प्रवाहीपणा सांभाळणं, आणि दुसरं म्हणजे कादंबरीत इंग्लिश भाषेच्या वेगवेगळ्या बोलीभाषा वापरलेल्या आहेत, उदाहरणार्थ काही व्यक्तिरेखा या कृष्णवर्णीय आणि अशिक्षित आहेत. त्यांचं इंग्लिश हे नक्कीच वेगळं असणार. ते मराठीत आणणं आणि तेही कृत्रिम न वाटू देता, हे कठीण होतं. पण वाचकांना आवडलं, त्यावरून मला ते जमलं असावं बहुतेक.

मातृभाषा मराठी, राष्ट्रभाषा हिंदी आणि कार्यभाषा इंग्लिश या तिन्ही भाषा बोलताना, वाचताना आणि लिहिताना आणि एका भाषेतून दुसर्‍या भाषेत अनुवाद करताना जो आनंद मिळतो, त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. आयुष्यातल्या अत्यंत निर्भेळ आणि निखळ अशा आनंदाच्या क्षणांपैकी बहुसंख्य क्षण मला या तिन्ही भाषांनी दिलेले आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त आण़खी एखादी भारतीय आणि एखादी परकीय भाषा शिकून त्या भाषेतल्या साहित्याचा अनुवाद करणं आणि तो आनंद इतरांबरोबर वाटणं हे करण्याची इच्छा आहे. Let us see कैसे मुमकिन होऊ शकेल!

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

7 Sep 2016 - 9:37 pm | खटपट्या

खूप छान लेख आणि ओळख. तुमच्याबरोबर गफ्फा मारायला आवडतील...

+ १

पण ते खूप भाव खातात.

अनिरुद्ध.वैद्य's picture

7 Sep 2016 - 10:07 pm | अनिरुद्ध.वैद्य

खुपच छान लेख!

हे वाक्य फारच आवडले: 'त्या माणसाच्या मनात त्याच्या मातृभाषेत वाक्यरचना करणं आणि ते वाक्य इंग्लिशमध्ये भाषांतरित किंवा अनुवादित करणं ही प्रक्रिया इतरांपेक्षा जास्त वेगाने होते'

अवांतरः
वाचुन शाळेतल्या इंग्रजीच्या सरांची आठवण झाली. ते नेहेमी सांगायचे की, 'आधी जोरात भाषांतर करा, अन नंतर ह्यापुढची स्टेप म्हणजे इंग्लिशमध्येच विचार करा. दॅट वे माय फ्रेंड, यु वुड्ण्ट माईंड स्पीकींग स्मुदली ईन ईंग्लीश.'

इल्यूमिनाटस's picture

7 Sep 2016 - 10:26 pm | इल्यूमिनाटस

मिपा वर पहिल्यांदा आल्यावर कुठून वाचनाला सुरुवात करायची हा प्रश्न होता. पण बोकाजींचं द स्केअर क्रो वाच असा सल्ला मिळाला. अगदी एका दिवसात सगळा अनुवाद वाचून काढला. ओरिजिनल कॉनेली कसा लिहितो हे बघण्यासाठी (खरं तर अनुवाद कसा झालाय हे पाहण्यासाठी!) त्याचं पुस्तक चाळून पाहिलं.
तुमच्या अनुवादात ताकद आहे.
अजून येउद्या!

Rahul D's picture

7 Sep 2016 - 11:00 pm | Rahul D

बोका शेठ पुलेशु...

Rahul D's picture

7 Sep 2016 - 11:00 pm | Rahul D

बोका शेठ पुलेशु...

पगला गजोधर's picture

7 Sep 2016 - 11:23 pm | पगला गजोधर

बोकोबा

अमितदादा's picture

7 Sep 2016 - 11:35 pm | अमितदादा

सुंदर लेख..आवडेश

पिलीयन रायडर's picture

8 Sep 2016 - 12:46 am | पिलीयन रायडर

अत्यंत आवडला लेख!

सुंदर लेख! फार आवडला. एकाच व्यक्तीचे लेख दोन सलग वर्षी या लेखमालेत यावेत यातच काय ते आले. तरी अजून टेलिव्हिजन क्षेत्र वगैरेतल्या अनुभवांवर वेगळे लिहिले नाहीये! फारच प्रेरणादायी आहे तुमचा प्रवास.

मारवा's picture

8 Sep 2016 - 8:29 am | मारवा

आजारपणात जी पुस्तकांची सोबत तुम्हाला मिळाली तशी ती अनेकांना मिळाल्याचे पाहीलेले आहे. व प्रत्येक जण जेव्हा अस जखडुन गेलेला असतो बिछान्याशी वा एकटेपणाशी तेव्हा त्याला तिथुन बाहेर काढुन त्याला जगात मुक्तविहार करवुन आणण्याची पुस्तकांची ताकद अप्रतिम आहे. ती तुमच्या जखडलेल्या मनाला मुक्त करुन टाकतात. पुस्तकांसारखच निसर्गही मदत करतो एकल्या वा पिडीत जीवांना.
दुर्गाबाई भागवत काही आजाराने दिर्घ काळ बिछान्याला जखडुन पडलेल्या होत्या. तेव्हा त्या आजारपणाच्या काळात त्या फक्त सभोवतालच्या निसर्गाचच त्यातील बदलांच सुक्ष्म अवलोकन करत राहील्या बहुधा वर्षभर आणि तेवढेच त्यांना तेव्हा शक्य होते. याच आजारपणामुळे बहुधा त्यांची पी.एच.डी. अर्धवट राहुन गेलेली होती.
आणि त्यातुन आपल्याला "त्रुतुचक्र" सारखं क्लासिक त्या देऊन गेल्या. "When life gives you lemons, make lemonade" हे कधी कधी अर्थहीन टुकार सुभाषित वाटत पण कधी कधी त्याचा झटीती का काय म्हणतात तो प्रत्यय ही येतो.
तुमचे सबटायटल्स चे लेखन करण्याचे अनुभव भारी आहेत. सिलसिला तले अनेक प्रसंग डोळ्यासमोर तरळुन गेले. काही गाणी डायलॉग्ज चा तुम्ही नेमका काय अनुवाद केला असेल कुतुहल वाटल. तीन कारचा अनुवाद भारीच इंग्रजीतही यमक जुळवण म्हणजे गंमतीदारच शिवाय कठीण किती. एक उलट दिशेने हॉलिवुड च्या इंग्रजी चित्रपटांचे आपल्याकडे जे हिन्दीत डब होतात त्यात फारच गंमतीदार शैली आढळते कधी कधी अनुवादक एकदम इंडियन मसाला मारके एखादा डायलॉग अबे ओ लंगुर इ. ने फिरवतो तेव्हा मोठी मौज वाटते. मात्र मुळ भाषा इंग्रजी माहीत असल्यास डबींग नक्कीच रसभंग करते व चित्रपट पाहण्याचा व्हर्जीन अनुभव मार खातो असे वाटते. जी भाषाच माहीत नाही त्याचे सबटायटल्स ने बघणे वेगळी बाब. बाय द वे तुम्ही कभी कभी च्या मेरे घर आयी एक नन्ही परीचा इंग्रजी अनुवाद केला असल्यास प्लीज कृपया शेअर करावा फार आवडेल वाचायला.
पुन्हा एकदा सुंदर प्रांजळ अनुभव कथनासाठी अनेक धन्यवाद.

अभ्या..'s picture

8 Sep 2016 - 1:42 pm | अभ्या..

छान प्रतिसाद.

अभ्यासू आणि मनापासून.

वा. सुंदर छंद. फक्त ते 'अंधारक्षण' तुम्ही जोपर्यंत पूर्ण करत नाहीत तोवर 'मोसाद-बिसाद' वर तुम्ही हजार लेख लिहिले तरी प्रतिक्रिया देणार नाही. अंधारक्षण म्हणजे अंधारक्षण आहे. ते आधी पूर्ण करा ही विनंती. आग्रह समजा हवे तर.

गणामास्तर's picture

8 Sep 2016 - 11:41 am | गणामास्तर

सुंदर अनुभव आणि तितकचं सुंदर लेखन.
तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या मुशाफिरीचे अनुभव सुद्धा येउद्यात कि.

सिरुसेरि's picture

8 Sep 2016 - 2:41 pm | सिरुसेरि

छान माहिती . ती "प्रभाकर" मालिका विनय धुमाळे यांचीच का ?

रातराणी's picture

8 Sep 2016 - 3:38 pm | रातराणी

अतिशय सुंदर लेख!!

बोका भाऊ अतिशय उत्तम लेख. आणि ते भाषांतरा बद्दल सहमत. भाषांतर करताना एखाद्या वाक्यातला संदर्भ/भाव/अर्थ तंतोतंत उतरणे कठीण आहे, जसे कि, हे गाणे बघा

'तेरी गलीया, गलीया, तेरी गलीया'
मुझको भाये, गलीया, तेरी गलीया'

मराठी अनुवाद

'तुझ्या गल्ल्या, गल्ल्या, तुझ्या गल्ल्या'
'मला आवडतात गल्ल्या तुझ्या गल्ल्या'

बाकी ते "Three cars in a lane, all in vain" छानच

अवांतर: मोसाद???

मोहनराव's picture

8 Sep 2016 - 8:13 pm | मोहनराव

छान लेखन. पुढील वाटचालीस शुभेच्छा!!

शिव कन्या's picture

11 Sep 2016 - 10:45 pm | शिव कन्या

बोकेश भाऊ, आवडली तुमची मुशाफिरी.
सिनेमांचे सब टायटल्स करणे हे प्रचंड किचकट आणि प्रसंगी लेखणी खाली ठेवायला भाग पाडणारे काम.
तुमचा प्रवास वाचून हमसफर आहोत हे लक्षात आले.

मस्तच. अनुवाद आणि अनुवादकांवर विशेष प्रेम असल्याने लेख जास्त आवडला.

एकातरी सिनेमाची सबटायटल्स करणे हे तर माझ्या बकेट लिस्टमध्ये आहे.

पिशी अबोली's picture

21 Sep 2016 - 1:45 am | पिशी अबोली

सुंदर लेख.

मला अनुवादकांबद्दल नेहमीच प्रचंड आदर वाटतो. ते अतिशय कठीण काम आहे याची पूर्ण कल्पना आहे. आणि चित्रपटांच्या सबटायटल्सकडे चित्रपटाची भाषा येत असली तरी माझं लक्ष असतं, आणि एखाद्या भाषा-स्पेसिफिक वाक्याला चांगले सबटायटल्स देताना त्या व्यक्तीला किती विचार करावा लागला असेल याचा विचारपण सतत चालू असतो. हा छंद म्हणून जोपासणार्‍या तुम्हाला __/\__

मी-सौरभ's picture

23 Sep 2016 - 7:19 pm | मी-सौरभ

आम्ही फक्त हेच करु शकतो.

प्राची अश्विनी's picture

23 Sep 2016 - 8:34 pm | प्राची अश्विनी

लेख फार आवडला.