बाजार

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
6 Nov 2009 - 1:55 pm

एखाद्या प्रसंगाची प्रत्येकाची अनुभूती वेगवेगळी असते. ती प्रकट करायचे मार्गही वेगवेगळे असतात.
कोणी एखादे काव्य करेल कोणी ललीत लेख लिहील कोणी सपाट गद्य लिहील कोणी त्या अनुभवाला रूपक मानून त्यातून वेगळेच काही उलगडून दाखवेल
अनुभव तोच पण अभिव्यक्ती निराळी.
काल मी दादरला फूल बाजारात गेलो होतो हा एक प्रसंग वेगवेगळे लेखक कसा मांडतील.
डॉ अनील अवचटः
दादरला पुलावरून वेस्ट ला उतरा समोर किच्च गर्दी दिसेल. फ्लायओव्हरच्याखाली कोपर्‍यात एका पानाच्या ठेल्याला लागून चेंगराचेंगरी होणार्‍या लोकल मध्ये असते तशी एकावर एक रचून ठेवलेली टोपल्यांची रास दिसते. तेथे जाऊन एका डोळे तांबरलेल्या केस विस्कटलेल्या हडकुळ्या तरुणाला विचारले.
इथे फूलबाजार कुठे आहे. तो फिस्सकन हसला. म्हणाला इथेच आहे की . चार रुपये द्या तुम्हाला दाखवतो.
त्याला चार रुपये दिले त्याने पानठेल्यावरून गायछापची एक पुडी विकत घेतली. पुडीतली तंबाखू हातात ओतली त्यावर नखभर चूना लावला. हातातला तंबाखू तर्जनी चोळला . आणि ओठ मुडपत दाढेखाले चिमूट दडपत तो पुन्हा एकदा हसला.
काय रे केंव्हा पासून खातोस?
ल्हानपणा पासून. बा च द्यायचा गोळी करून आन मंग च्या द्यायचा
आणि किती खातोस दिवसातून
ये क्या दोन तीन पाकीटे हुत्यात.
कोण देत तुला रोज हे
मिलते है ना लोग. साब दुनिया मे देनेवाले बौत है. मळक्या पँटीला चुन्याचे हात पुसत तो म्हणाला.
छातीचा पिंजरा डोळे लाल केस विसकटलेले. त्याने अंघोळही बहुतेक पाच सहा दिवसांपूर्वी केली असावी.
तू इथे नक्की काय काम करतोस.
साब काम म्हणजे जे पडेल ते करतो. टोपलीया लगाना उतारना. फूल नीट लगाके रखना. मोगरा/गुलाब वगैरे नीट अलग करके रखना.
ये फूल कहांसे आते है?
खेत से आते है. मोगरा नाशीक से आता है.
और गुलाब.
वो भी नाशीक से आता है.
हे बु़के कधी केलेस.
साब बुके इदर नै बनते.
आणि ही गुलाबाची फुल वेगळी का ठेवली आहेत.
वो अलग फूल है साब
म्हणजे
वो सस्ते मे बिकते है
का?
क्या करे साब लोग सस्ते फूल मांगते है मग द्यावे लागतात?
कुठून आणतोस.
वो क्या चर्च वाले लोग जाते है ना उनके कब्रस्तान से उठाके लाते है.

...................
हेच दृष्य सुरेश भट साहेब असे मांडतील.
काल मुक्या फुलांचा मी बाजार पाहीला
पाकळी सवे काट्यांचा शेजार मी पाहीला.
......................................

ना सी फडके....

केसात सुगंधी फुले मालून विचारांचे सौंदर्य वाढत नसते.
सौंदर्य असते ते पहाणाराच्या नजरेत. पहाण्याच्या वेळेत आणि पहाणाराच्या गरजेत.
दादर स्टेशनवरच्या पुलावरून तो खाली उतरला .समोरच फूल बाजार होता.
हारीने रचलेल्या त्या फुलांच्या टोपल्या पाहून त्याच्या मनात विचार आले.......
सौंदर्याला व्यापक पातळीवर नेले की होतो बाजार. फुलांच्या बाजारात मोगरीचे फूल मरगळते. कमळाच्या सात्वीक फुलाला सुद्धा गटडीत वळले जाते.
गुलाबाची फुले एकावरएक कलेवरासारखी पडून रहतात
त्या सगळ्याना सौंदर्य प्राप्त होते ते पहाणारा आणि ती फुले एकेकटे आल्यानन्तर.
अन्यथा तो उरतो नुसता बाजार किलो ...टन.... हारे....टोपल्या अशा घाऊक भाषात बोलला जाणारा बाजार
.......................................
शंकर पाटील....
कंदील जळावा तशी दुपार ढाणढाण जळत होती. रस्त्याला पाऊल टेकू देत नव्हते. त्याने घामेजल्या चेहेर्‍याने समोर पाहिले.
फूलवाला फुलावर पाणी मारत होता. उन्हाच्या रेमट्यात फुले टिकवायचा प्रयत्न करत होता.
रस्त्याच्या कोपर्‍यावर् कुठे पालकट मांडी घालता येते याचा त्याने अंदाज घेतला.
आणिबसून त्याने पिशवतली पुडी उलगडली. भाकर्‍या पार शेळमाटल्या होत्या. रत्नीने मुम्बैला जाणार म्हणून किती हौसेने भाकर्‍या आणि म्हाद्या करून दिला होता. त्याला रत्नी आठवली. चांदणे उगवावे तशी लख्खन हसणारी .भोळी भाबडी त्याच्यावर किती विष्वास ठेऊन तीने त्याला मुम्बैला जायला परवानगी दिली होती.
भाकरीचा घास घशाखाली उतरत नव्हता. समोरच्या हारीने एकावर एक रचलेल्या फुलांच्या टोपल्या घरची आठवण करून देत होत्या.
रत्नीचा जीव तो केवढा. या फुलासारखाच तो ही चेचला गेला होता त्या ओझ्या खाली.

......................
व.पू. काळे
दादर वेस्ट स्टेशन चा जीना उतरून गेलो की समोर फूलवाले ओळीने बसलेले दिसतात. मला अनेकदा वाटायचे की सुमित्राला इथून एखादा गजरा न्यावा.
पण काय करणार तो गजरा नेला की सगळ्या चाळीला कळणार. मग त्यावरून शेजारपाजारचे चिडवणार. काय पंत यंदा पाळणा हलवणार.असे चेष्टेचे शेरे मारणार.
स्वतःपेक्षा दुसर्‍यांच्या घरतली पाळणे हलवण्याची लोकाना काय हौस असते कळत नाही.
बर पहिल्या वेळेस ठीक आहे हो . पण दुसर्‍या तिसर्‍या वेळेस सुद्धा?
कधीकधी वाटते की भारत सरकार ने कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमात या असल्या टोमण्याना बंदी घालावी .
मनातल्या विचाराना मी स्वतःच हसलो. त्याना काय कळणार.
अचानक समोर लक्ष्य गेले फुलांच्या टोपल्यात फुले होती. वरची वरची ताजी दिसत होती.
रचून ठेवलेल्या टोपलीत खालची फुले दबली गेलेली दिसत होती फुलांच्या ओझ्याखाली फुले दबली गेली होती .फुलांचे सुद्धा ओझे असते फुलाना.
मुले ही देवाघरची फुले असतात हे म्हणणाराना समोरचे ते सत्य दाखवून द्यायचे होते.
लहानपणी सात मुलांच्या घरात आपण ही असेच दबलो गेलो होतो.

तुम्हाला बांधता येताहेत असे काही अंदाज
अगदी मिपावरचे काही लेखक हाच प्रसंग कसे लिहितील ते लिहिलेत तरी चालेल.

वावरविचार

प्रतिक्रिया

हे म्हणजे अफाट आणि अचाट
"हेच दृष्य सुरेश भट साहेब असे मांडतील.
काल मुक्या फुलांचा मी बाजार पाहीला
पाकळी सवे काट्यांचा शेजार मी पाहीला."
थक्क झालो.
"फासुनि रंग चेह-याला खिड्कीतला श्रुंगार मी पाहीला
होते ओठा वरी जरी हसु नजरेतला अंगार मी पाहीला"
जयपाल

==========================================
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

विदुषक's picture

6 Nov 2009 - 3:16 pm | विदुषक

आनील काम्बळे च्या कवितेची आठ्वण झाली
' त्या कोवळ्या फुलान्चा बाजार पाहीला मी
पैशात भावनान्चा व्यापार पाहीला मी !!

मजेदार विदुषक

श्रावण मोडक's picture

6 Nov 2009 - 2:03 pm | श्रावण मोडक

चांगला कल्पनाविलास!!

छोटा डॉन's picture

6 Nov 2009 - 2:54 pm | छोटा डॉन

मोडकांशी सहमत ...
संकल्पना उत्तम आहे लेखाची, काही वाक्ये तर खासच जमली आहेत एकदम ...

बाली सवदीने मिपाकरांच्या स्टायलीची भर घालुच ;)

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Nov 2009 - 4:25 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत. अंमळ मजा आली वाचताना.

बिपिन कार्यकर्ते

धमाल मुलगा's picture

6 Nov 2009 - 6:53 pm | धमाल मुलगा

विजुभाऊ,
सही आहे हो हे साहित्यिक श्टाईलमधलं लेखन :)

बाजार-II कधी?

सुबक ठेंगणी's picture

6 Nov 2009 - 7:36 pm | सुबक ठेंगणी

फक्त गद्यातच नाही तर गझलेतसुद्धा! क्या बात है!

>>बाजार-II कधी?
हेच विचारते...

महेश हतोळकर's picture

6 Nov 2009 - 2:03 pm | महेश हतोळकर

लै भारी. आजून येऊद्या.

अवलिया's picture

6 Nov 2009 - 2:05 pm | अवलिया

ही आमची फुलवाली ! हिच्यावर आमचा फार जीव.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

sneharani's picture

6 Nov 2009 - 2:16 pm | sneharani

छान.. कल्पना आवडली.
:)

sneharani's picture

6 Nov 2009 - 2:16 pm | sneharani

छान.. कल्पना आवडली.
:)

प्रभो's picture

6 Nov 2009 - 2:16 pm | प्रभो

मस्त ईजुभौ....

काल मुक्या फुलांचा मी बाजार पाहीला
पाकळी सवे काट्यांचा शेजार मी पाहीला.

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

विदुषक's picture

6 Nov 2009 - 2:22 pm | विदुषक

वा वा !!!
कल्पनाविस्तार :)
मजेदार विदुषक

जे.पी.मॉर्गन's picture

6 Nov 2009 - 2:24 pm | जे.पी.मॉर्गन

अफलातून... खूपच आवडले !

परिकथेतील राजकुमार's picture

6 Nov 2009 - 2:44 pm | परिकथेतील राजकुमार

विजुभाऊ कल्पनाविस्तार अप्रतिम 'फुल'वला आहे हो :)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

विनायक प्रभू's picture

6 Nov 2009 - 2:51 pm | विनायक प्रभू

मस्तच लेख

लबाड लांडगा's picture

6 Nov 2009 - 3:02 pm | लबाड लांडगा

असेच बोल्तो.
विनम्र लांडगा

झंडुबाम's picture

6 Nov 2009 - 3:02 pm | झंडुबाम

रचून ठेवलेल्या टोपलीत खालची फुले दबली गेलेली दिसत होती फुलांच्या ओझ्याखाली फुले दबली गेली होती .फुलांचे सुद्धा ओझे असते फुलाना.
मुले ही देवाघरची फुले असतात हे म्हणणाराना समोरचे ते सत्य दाखवून द्यायचे होते.
लहानपणी सात मुलांच्या घरात आपण ही असेच दबलो गेलो होतो.

----वसूल
---क्या बात है.आज व.पुं च पार्टनर परत एकदा वाचून काढावसं वाटतयं.ले़ख एकदम झकास आहे.

समंजस's picture

6 Nov 2009 - 3:18 pm | समंजस

सुंदर!!!! लेखा मागची कल्पना आणि लेख दोन्हीही!!

प्रकाश घाटपांडे's picture

6 Nov 2009 - 3:27 pm | प्रकाश घाटपांडे

लईच भारी कल्पना ईलास .बाजार म्हन्ल कि आम्हाला गावचा बैलांचा बाजारच डोळ्यासमोर येतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

आनंदयात्री's picture

6 Nov 2009 - 3:36 pm | आनंदयात्री

कल्पनाविस्तार अत्यंत आवडला.

अवांतरः अनपेक्षितपणे तुम्ही यावेळेस जिएंना उगाचच यात गोवलेले नाही .. ते रक्तगाभुळलेले वैगेरे टिका करण्यासाठी क्लिशे झालेले शब्द वापरुन एवढ्या चांगल्या लेखाची वाट न लावण्याबद्दल धन्यवाद.

विनायक प्रभू's picture

6 Nov 2009 - 4:06 pm | विनायक प्रभू

टाका हो विजुभौ.
ह्या वेळीस मिपालेखकांच्या स्टाईल मधे.
मी लेखक नाही.
तरीसुद्धा माझ्या नावाचा विचार करावा ही विनंती.

परिकथेतील राजकुमार's picture

6 Nov 2009 - 4:08 pm | परिकथेतील राजकुमार

मी लेखक नाही.

हे असे वाक्य लिहुन आपण लेखक नाही तर 'सिद्धहस्त लेखक' आहोत हे सांगण्याची शैली आवडली हो गुर्जी.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

गणपा's picture

6 Nov 2009 - 4:08 pm | गणपा

आहारे विजुभाय मस्त कल्पनेचे वारु दौडवलेत.
बाकी तुमच्या कल्पना भरारीरी बद्दल शंकाच नाही.
तुम्ही काय बाबा ईमेल मध्ये आणि ढगात बसुन फिरणारी माणसं :)

लबाड लांडगा's picture

6 Nov 2009 - 4:09 pm | लबाड लांडगा

आता लिवा की कोनीतरी तशाच ईश्टाईल मध्ये. कल्पना आवडली-सुरेख,जहबर्‍या अस अजून किती वेळ बोलायच?

विंजिनेर's picture

6 Nov 2009 - 6:13 pm | विंजिनेर

चांगलंय विजुभौ... ते पाटील, अवचट वगैरे अंमळ जमलेत...

स्वाती२'s picture

6 Nov 2009 - 7:02 pm | स्वाती२

छान! अजुन वाचायला आवडेल.

टुकुल's picture

6 Nov 2009 - 9:19 pm | टुकुल

मस्त हो विजुभौ..
एकदम बरोबर जुळुन आल आहे.. दांडग वाचन दिसत तुमच..

--टुकुल.

चतुरंग's picture

6 Nov 2009 - 9:56 pm | चतुरंग

बर्‍याच दिवसांनी काही छान लिहिलेत!

रामदास
-------------
दादर वेस्ट पूल उतरलात की फूलवाला दिसतो.
मुंबईच्या घामट गर्दीत त्याच्याकडे कुणाचे लक्ष जाते माहीत नाही.
फुलं ही रोजच्या जगण्यातली अगतिकता सुगंधी करतात काट्यांसहित. त्या दिवशी कधी न दिसणारी फुलं दिसली. काटेकोरांटी.
"केवढ्याला दिली?"
"घ्या साहेब मोगरा, गुलाब कोणती?"
"अ हं ती, काटेकोरांटी!"
तो हसला "गुलाब किंवा मोगर्‍याबरोबर तशीच न्या त्याला काय भाव नाही!"
परिस्थितीच्या झळांनी निर्माल्य होणार्‍या फुलांना भाव नसतो.
लोकलच्या अजगरी विळख्यातून ठेवा जपत घरी जायचं म्हणजे दिव्य होतं.
इतके दिवस डोक्याच्या जमिनीत पडून असणारं एक बी घरी पोचेतो उगवून आलं होतं 'काटेकोरांटीची फुलं!'

चतुरंग

मिसळभोक्ता's picture

7 Nov 2009 - 1:45 am | मिसळभोक्ता

बर्‍याच दिवसांनी काही छान लिहिलेत!

काहीसे असेच म्हणतो.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

विजुभाऊ's picture

10 Oct 2013 - 4:13 pm | विजुभाऊ

क्या बात है.
रामदास पुन्हा एकदा लिहीते व्हा ......
ही विनन्ति

पक्या's picture

7 Nov 2009 - 12:10 am | पक्या

मस्त कल्पना विलास.

घाटावरचे भट's picture

7 Nov 2009 - 1:10 am | घाटावरचे भट

मस्तच!

मुक्तसुनीत's picture

7 Nov 2009 - 2:15 am | मुक्तसुनीत

विजुभाऊ ,
क्या बात है. एकेकाची शैली हुबेहूब अगदी ! मजा आली राव. अजून लिहा की कुणाचे.

Nile's picture

7 Nov 2009 - 4:03 am | Nile

आवड्या, अजुन लिहा. मिपावरील लेखकांचे ढंग पण आवडतील वाचायला.

लवंगी's picture

7 Nov 2009 - 4:05 am | लवंगी

कल्पनापण आवडली आणी विस्तारपण..

पाषाणभेद's picture

7 Nov 2009 - 9:02 am | पाषाणभेद

एकदम सही. मजा आली वाचायला.
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

मदनबाण's picture

7 Nov 2009 - 1:03 pm | मदनबाण

इजुभाऊ मस्त लिहले आहे... और भी आने दो. :)
दादर चा फूल बाजार डोळ्यासमोर आला.

मदनबाण.....

आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

7 Nov 2009 - 2:21 pm | भाग्यश्री कुलकर्णी

खरच प्रत्येकाची शैली छानच जमलीयं .अजुन वाचायला मजा येईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Nov 2009 - 9:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभौ, काय झकास शैली जमलीय...!!! =D>

-दिलीप बिरुटे

विजुभाऊ's picture

1 Aug 2012 - 12:37 pm | विजुभाऊ

एका मित्राच्यास्तव............

बॅटमॅन's picture

1 Aug 2012 - 12:48 pm | बॅटमॅन

ऐला भारीच!

विटेकर's picture

10 Oct 2013 - 4:23 pm | विटेकर

___/\_____

अप्रतिम ! पुढे आण्खी कोणी भर घातली नाही याचे आषचर्य वाटते.. मिपाच्या खजिन्यात काय काय द्डलं असेल काही सांगता येत नाही !

सोत्रि's picture

10 Oct 2013 - 9:51 pm | सोत्रि

मिपाच्या खजिन्यात काय काय द्डलं असेल काही सांगता येत नाही !

+१००

-(ट्रेजर हंटर) सोकाजी

चाणक्य's picture

11 Oct 2013 - 8:42 am | चाणक्य

+१

अविनाश पांढरकर's picture

11 Oct 2013 - 12:56 pm | अविनाश पांढरकर

मस्त लिहले आहे