प्रेरणा : कर्नल साहेबांचा 'थालीपीठ-एक मराठमोळा पदार्थ' हा धागा आणि त्यावरचा गविंचा हा प्रतिसाद!
दोन-तीन महिन्यांतून करावी लागणारी फार्मच्या रेग्युलर मेंटेनन्सची कामे तिन-चार दिवस चालणार असल्याने नेहमीप्रमाणे शुक्रवारी न येता ह्यावेळी मंगळवारी संध्याकाळीच पेण मुक्कामी येऊन थडकलो. आता पुढचे तीन-चार दिवस रोजच्यापेक्षा अधिक फावला वेळ मिळेल तेव्हा रखडलेल्या 'कोकण, तळ कोकण, गोवा' मालिकेचा पुढचा भाग लिहिता येईल ह्या विचारात होतो पण काल सकाळी-सकाळी मिपावर येणे झाले आणि सगळा मनसुबा बोंबलला 😀
कर्नल साहेबांच्या थालीपीठवाल्या धाग्यावरच्या चर्चेत गवि साहेबांनी 'वांग्याचे थालीपीठ' हा ही भारी प्रकार असल्याचे आपल्या प्रतिसादात म्हंटलेले वाचले आणि (अगदी शब्दशः अर्थ घेऊ नये पण) "मेरे मन को भाया... मैं कुत्ता कांट के खाया" टाईप मानसिकता असल्याने हा पदार्थ आजच दुपारच्या जेवणासाठी बनवून खावा ह्या विचाराने मला पछाडले 😂
वांग्याच्या थालीपिठासाठी नेहमीच्या भाजणीच्या थालीपीठापेक्षा काही वेगळे बदल/ऍडीशन्स कराव्या लागतील का ह्याची विचारणा करायला दिलेल्या प्रतिसादावर मिळालेले "फार वेगळी प्रक्रिया नाही. भरताचे मोठे भाजलेले वांगे, किंवा तयार पण उरलेले भरीत किंवा काहीवेळा उकडलेले वांगे, कांदा इत्यादि मिसळून भाजणीचे पीठ भिजवावे." हे गविंचे उत्तर वाचले आणि कामाला लागलो!
लॉकडाऊनच्या मेहेरबानीमुळे बरेच खाद्यपदार्थ आता चांगल्या प्रकारे बनवता येऊ लागलेत, त्यात भाजणीच्या थालीपिठाचा आणि वांग्याच्या भरीताचा समावेश आहेच. मग एका पंटरला फोन करून बाजारातून भारीताचे वांगे मागवले.
रोजच्या राहत्या घरी असतो तर गॅस किंवा मायक्रोवेव्हमध्ये वांगे भाजावे लागले असते पण सुदैवाने पेणला आलो असल्याने इथे पारंपारिक पर्याय उपलब्ध होते. मग वर्क फ्रॉम होम मधुन थोडी उसंत मिळाल्यावर, जवळच पेण-खोपोली हायवे वरच्या एका परिचिताच्या धाबा टाईप खानावळीत जाऊन चुलीवर ते वांगे मस्त पैकी खरपूस भाजून आणले.
(सोललेले वांगे)
मग एका भांड्यात सोललेल्या वांग्याचे छोटे छोटे तुकडे करून ते चिवडून घेतल्यावर त्यात बारीक कापलेला कांदा, मीठ आणि थोडी कोथिंबीर घालून त्याचे चांगले मिश्रण केले.
हे सर्व होईपर्यंत पावणे पाच वाजले, आता हा पदार्थ संध्याकाळी उशिरा बनवण्याचा निर्णय घेतला आणि हा कच्चा माल सरळ फ्रिजमध्ये ठेऊन दिला.
मग आठ-सव्वा आठच्या सुमारास हा ऐवज फ्रिजमधून काढून रूम टेम्परेचरला येईपर्यंत बाहेर ठेवला.
साधारण तासाभराने त्यातला अर्धी वाटी माल भरीतासाठी एका वाटीत वेगळा काढून ठेवला आणि भांड्यात उरलेल्या मिश्रणात माध्यम आकाराची दोन थालीपीठे होतील अशा अंदाजाने आईने तीन-चार दिवसांपूर्वीच बनवलेली खमंग अशी ताजी भाजणी आणि चमचाभर ओवा घालून मस्तपैकी मळून घेतले आणि दोन गोळे तयार केले!
पावणे दहाच्या सुमारास नॉनस्टिक तव्याला थोडे तेल फासून (शक्यतो गोलाकार होईल असा प्रयत्न करून) त्यावर एक थालीपीठ थापले. ह्या पहिल्या थालीपिठाचा वापर एका विशिष्ट उद्देशाने करायचा असल्याने ते शक्य तेवढे पातळ थापले जेणेकरून ते छान कडक आणि क्रिस्पी होईल 😀
एकीकडे तव्या खालचा गॅस पेटवला तर दुसरीकडे भरिता साठी फोडणी बनवायला घेतली. चमचाभर साजूक तुपात थोडे जिरे, हिंग आणि बारीक कापलेली मिरची घालून एकदम खमंग फोडणी बनवली आणि वाटीत काढून ठेवलेल्या ऐवजावर ओतून त्यात थोडे दही घालून छान ढवळून घेतल्यावर एकदम टेस्टी वांग्याचे भरीत तयार झाले.
९० मिली स्मर्नऑफ व्होडका, त्यात एक उभी चीर दिलेली तिखट चवीची हिरवी मिरची आणि लिंबाचे दोन स्लाईस (त्यातला एक ग्लासच्या आत तर एक डेकोरेशनसाठी ग्लासच्या कडेवर 😀) आणि थंड पाणी असा जामानिमा एकीकडे तयार करून झाल्यावर त्याच्या जोडीस खरपूस भाजलेले 'वांग्याचे थालीपीठ' साजूक तूप, दही, अमूल बटर आणि अर्धी वाटी वांग्याचे भरीत चाखायला घेतले!
खरपूस भाजलेले वांग्याचे थालीपीठ आणि वांग्याचे भरीत चवीला उत्तमच झाले होते! वांगे चुलीवर भाजल्याने त्याला झकास स्मोकी फ्लेवर आला होता.
गविशेठ हा चविष्ट पदार्थ सुचवल्या बद्दल धन्यवाद "यु मेड माय लास्ट इव्हिनिंग" 🙏
प्रतिक्रिया
2 Mar 2023 - 6:45 pm | तुषार काळभोर
सगळ्यात आधी ह्या वाक्यासाठी तुमचं अभिनंदन! माझं अत्यंत आवडतं वाक्य आहे :D
वांग्याचा आणि माझा सदतीसचा आकडा असला तरी तुम्ही ज्या मनसोक्तपणे आणि निगुतीने केलंय ते मनाला भिडलं! आणि तो ग्लास... कसला टिपिकल बारमधला ग्लास वाटतो! न सांगताच हे कळे मला, त्या गलासामध्ये व्होडका कसा ओतला... :D
थालीपीठ मात्र अतिशय खमंग दिसतंय. वांगं घातल्याचं मला सांगितलं नाही, तर मला प्रचंड आवडेल!
4 Mar 2023 - 6:41 pm | टर्मीनेटर
कसं असतं, आपले अगदी बालपणापासून काही फंडे असतात आणि ते कुठल्यातरी सिनेमात अगदी समर्पक शब्दांत संवाद स्वरूपात कधी आपल्या जन्माच्याही आधी आलेले असतात तर काही वेळा पुढे कधीतरी येतात, त्यामुळे ते अर्थातच आपल्याला फार आवडतात. "मेरे मन को भाया... मैं कुत्ता कांट के खाया" हे चायना टाऊन चित्रपटात 'जगिरा'च्या तोंडी आलेले वाक्यही तसेच! माझी मानसिकता लहानपणापासूनच ह्या वाक्यातून व्यक्त होणाऱ्या भावनांशी अगदी मिळती-जुळती असल्याने हे वाक्य माझ्याही प्रचंड आवडीचे आहे... अजूनही कित्येक आहेत त्यांचा वापर पुढेमागे लेखनात करीनच!
२००९ पर्यंत मझाही होता... नंतर जवळीक झाली 😀
BTW हा सगळा कार्यक्रम साग्रसंगीत चालू असताना हेडफोन लावून ऐकत असलेले अभिलिप्सा पंडा आणि जितू शर्माने गायलेले एक जबरदस्त गाणे वरती द्यायचे राहूनच गेले...
हर हर शंभू... शंभू
शिवं महादेवा... शंभू... शंभू
(दुर्दैवाने क्रिएटरने एम्बेड करण्यास परवानगी दिली नसल्याने खाली युट्युबची लिंक देत आहे)
https://youtu.be/aRoMeNr1mMQ
2 Mar 2023 - 7:25 pm | गवि
वाह.. फोटो आणि वर्णन बघून, वाचून दिल खूष झाले. धन्यवाद..
2 Mar 2023 - 7:39 pm | कर्नलतपस्वी
कुरकुरीत थालीपीठ चकणा म्हणून वापरलेत , लई भारी क्रिएटिव्हीटी.
4 Mar 2023 - 7:27 pm | टर्मीनेटर
श्री गवि आणि श्री कर्नलतपस्वी (😀)
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@कर्नलतपस्वी
शक्य असेल तोवर शाकाहारी 'चाखणा' खाण्यालाच माझे प्राधान्य असते! ग्रीन सलाड हा तर ऑलटाइम फेवरीट चाखणा, त्याशिवाय (बाकीचे नेहमीचे सटर फटर पदार्थ सोडून) अन्य आवडीचे पदार्थ म्हणजे मक्क्याच्या लाह्या, भाजून मस्तपैकी मीठ,मसाला, लिंबू फासलेले मक्याचे कणीस, उकडलेले मक्याचे दाणे, ग्रीन पीज जिरा बटर फ्राय आणि तूप, मीठ, मसाला भरलेली रोस्टेड भेंडी असे कित्येक... आता त्यात ह्या थलिपिठाची भर पडली आहे. पण पार्टीमध्ये मात्र थोडाफार नॉनव्हेज चाखणा होतो!
2 Mar 2023 - 8:32 pm | कंजूस
आणि वांगं भाजण्याचे औटसोर्सिंग आवडले.
फोटोंमुळे मजा आली.
आमची आजी भाजणी पीठ भिजवून उघडायची ढोकळ्यासारखे. पीठ आंबून जाळी पडणे अपेक्षित नसायचेच. मग लोणच्याबरोबर खायचे. दात नसल्याची सोय.
4 Mar 2023 - 8:03 pm | टर्मीनेटर
कंकाका काल सकाळी तुमचा प्रतिसाद वाचला आणि सकाळचा नाश्ता बाहेर न करता हा पदार्थ घरीच बनवला!
अर्थात मला जाळीदार ढोकळा आवडत असल्याने त्यात इनो घातला होता. भाजणीचा हा ढोकळा छान हलका आणि जाळीदार टेक्श्चरही मस्त आले होते.
पण चवीला मात्र हा पदार्थ अगदीच साधारण वाटला! कदाचित भाजणी पासून बनवलेले पदार्थ हे उकडून पेक्षा भाजून किंवा तळून खाल्ले तरच खमंग लागत असावेत. अर्थात ज्या "दात नसल्याची सोय" ह्या कारणासाठी तुमची आजी हे करायची त्या कसोटीवर मात्र हा एकदम खरा उतरला, चावायचे कष्ट घ्यावेच लागत नाहीत अजिबात. मी हा ढोकळा टोमॅटो केचप आणि तळलेल्या मिरची बरोबर खाल्ला होता पण इडली प्रमाणेच छानशा चटणी बरोबर खाल्ल्यास तो चविष्ट लागू शकेल असं वाटतंय!
5 Mar 2023 - 6:43 am | प्रचेतस
ह्याच्या जवळ जाणारा पदार्थ म्हणजे उकडपेंडी. लोणच्यासोबतच छान लागतो. तुम्ही म्हणता तसा चवीला मात्र साधारणच.
11 Mar 2023 - 6:58 pm | टर्मीनेटर
BTW 'उकडपेंडी' म्हणजे कोणता पदार्थ? तांदुळाचे पीठ, आंबट ताक आणि लसूण घालून 'उकड' हा चविष्ट पदार्थ आई बऱ्याचदा करते. उकडपेंडी अशीच असते कि काही वेगळा प्रकार आहे?
11 Mar 2023 - 7:46 pm | कंजूस
उकड.
8 Mar 2023 - 9:00 pm | कंजूस
ढोकळ्यावर ओततो तशी फोडणी यावर घातली की चव येते.
किंवा चवीसाठी गोड लोणचे,सुरती/जळगावी लोणचे घ्यायचे. दुर्दैवाने ही लोणची बाजारात फारशी मिळत नाहीत. कच्छी मिळतात.
11 Mar 2023 - 7:05 pm | टर्मीनेटर
हो, मोहरी, हिंग, जिरे आणि बारीक कापलेल्या मिरचीची फोडणी दिली होती मी, तरी चव काही आली नाही बुवा 😀
लोणचे हा प्रकारच मी अत्यंत कमी प्रमाणात खात असल्याने त्याच्या सोबत नाही खाउन बघीतला!
2 Mar 2023 - 9:09 pm | प्रचेतस
वांगे आवडत नसल्याने थालिपीठाचे हे व्हर्जन खाणार नाही मात्र थालीपीठ चांगलेच खमंग झालेले दिसत आहे. लैच भारी.
6 Mar 2023 - 4:33 pm | टर्मीनेटर
पूर्वी मी पण वांगं खात नव्हतो. घरी (सुकी) भरली वांगी बनवली असतील तर त्यातला खोबऱ्याचा चविष्ट मसाला मात्र आवडीने खायचो पण त्यात वांग्याचा तुकडा अथवा गर अजिबात येणार नाही ह्याची खबरदारी काटेकोरपणे घ्यायचो 😀
२००९ मध्ये कामानिमित्त अंधेरीला जाणे व्हायचे तेव्हा जेवण गरम गरमच खायची सवय असल्याने ती अपेक्षा पूर्ण करणाऱ्या चकाला इथल्या एका दाक्षिणात्य दाम्पत्याच्या कँटीन मध्ये दुपारच्या जेवणासाठी जायचो. तिथे बऱ्याच पदार्थांमध्ये वांग्याचा वापर केलेला असायचा त्यामुळे वांगे किंवा त्याचा भाग नेहमी थाळीत वेगळा काढून ठेवायचो. ग्राहकांची क्षुधाशांती करणाऱ्या ह्या उदात्त कार्याकडे केवळ व्यवसाय म्हणून न बघता प्रत्येकाकडे अगत्याने/आपुलकीने जातीने लक्ष देणाऱ्या त्या दाम्पत्याच्या नजरेतून हि गोष्ट सुटली असती तरच नवल!
एके दिवशी असाच तिथे जेवायला गेलो होतो तेव्हा त्या कॅन्टीनच्या चालक/मालक द्वयींपैकी मामींनी मी ऑर्डर देण्या आधीच वांग्याची भाजी आणि पुऱ्या खाण्यास सुचवले आणि न आवडल्यास इच्छेनुसार दुसरे काहीही देण्याची तयारी दर्शवली. तेव्हा पहिल्यांदा मी त्या भाजीतले वांगे खाल्ले आणि
संत चोखा मेळांचा "ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा" ह्या अभंगाची आठवण आली. वांग्याबद्दलचा पूर्वग्रह गळून पडला आणि "वांगे डोंगे परी गर नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया (आणि आतलीया) रंगा" ह्याची प्रचिती येऊन तेव्हापासून माफक प्रमाणात का होईना पण वांगे खायला लागलो.
पाव-भाजी हा अगदी आवडता पदार्थ! पण उकडलेल्या वांग्याची केलेली पेस्ट हा त्यातला सिक्रेट इंग्रेडिएंट असल्याचे पुढे एका हॉटेल व्यावसायिक मित्राकडून समजले होते तेव्हा थोडे आश्चर्य वाटले होते, पण ज्या ज्या ठिकाणची पाव-भाजी चवीला उत्तम लागते तेव्हा त्यात असलेल्या ह्या सिक्रेट इंग्रेडिएंटची महती पटते 😀
6 Mar 2023 - 7:59 pm | प्रचेतस
क्या बात है...
पावभाजीत सिक्रेट इंग्रेडिएंट म्हणून उकडलेल्या वांग्याची पेस्ट घालतात हे पहिल्यांदाच समजले. खाऊन बघावीच लागेल आता.
8 Mar 2023 - 8:51 pm | विजय_आंग्रे
मुळात वांगे, बटाटे हे वातुळ असल्याने व मी इंजिनियरींग आणि फॅब्ररिकेशन लाईन मधे असल्याने हे पदार्थ खायचे बरेच वर्षे टाळत होतो. (मेटलने झालेल्या जखमा लवकर बर्या होत नाहीत) अशी बहुतेक अफवा असावी
मात्र कुर्डुवाडी येथील श्री विठ्ठल साखर कारखान्यात एक प्रोजेक्ट पूर्ण करत असताना, श्री क्षेत्र अक्कलकोटला, समर्थांच्या दर्शनाला जायचा योग आला व तिथल्या महाप्रसादात बटाटा पुलाव व वांग्याच्या भाजी होती, इतकी अप्रतिम चव त्या जेवणाला होती की त्यानंतर वांगे व बटाटा हे रोजच्या जेवणाचे घटक झाले.
11 Mar 2023 - 7:10 pm | टर्मीनेटर
😂
अशा बऱ्याच 'अफवा' असतात, 'धूम्रपान करणारे लोकं लोणचे खात नाहीत' ही देखील त्यापैकीच एक अफवा! माझा एक मित्र शेकड्यांनी सिगरेट्स ओढतो आणि किलोंनी लोणची खातो 😀
8 Mar 2023 - 9:06 pm | कंजूस
शेंगदाणे,तीळ,चिंच.. त्या मिश्रणातले भरले वांगे चांगले लागते.
15 Mar 2023 - 8:18 pm | मदनबाण
पूर्वी मी पण वांगं खात नव्हतो. घरी (सुकी) भरली वांगी बनवली असतील तर त्यातला खोबऱ्याचा चविष्ट मसाला मात्र आवडीने खायचो पण त्यात वांग्याचा तुकडा अथवा गर अजिबात येणार नाही ह्याची खबरदारी काटेकोरपणे घ्यायचो.
डिट्टो ! वाडीला तर कृष्णाकाठीची वांगी चाखायला मिळतात, शिवाय मसाला देखील भारी असल्याने मी तिकेडेच ही भाजी जास्त खाल्ली आहे. पण हल्ली माझ्यात बदल झाला आहे, वांगी भाजी आता घरात देखील खातो,मसाला नसला तरी [ आधी भरल्या वांग्याला जरास वांग असलेल आवडाच, मसल्या सारणात जास्त इंटरेस्ट असायचा ] पण जास्त करुन भरीत किंवा भरलेलच पसंत !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Ranjithame - Varisu (Tamil) | Thalapathy Vijay | Rashmika | :- Varisu
17 Mar 2023 - 12:53 pm | टर्मीनेटर
असा बदल माझ्यासहीत अनेकांमध्ये झालेला आहे! पुर्वी अजिबात वांगं खात नसलेले बरेच़जण नंतर माफक प्रमाणात का होइना पण वांग्याचे पदार्थ खाउ लागलेत 😀
18 Mar 2023 - 10:41 am | कंजूस
भोपळ्या,वांग्या,दुधी भोपळ्याची.
लग्नानंतर हा बदल होतो.
बाकी पंधरा दिवस होऊन पाककृतीला. भेंडीचं काय करता फार्मा -शेतातल्या?
19 Mar 2023 - 11:31 am | टर्मीनेटर
सध्या फार्मवर कुठल्याही भाज्या लावलेल्या नाहीयेत. काल भेंडी, काकडी, दुधी भोपळा, कार्ली आणि वांग्याच्या बिया आणल्या आहेत. आज दुपारी घरच्या फ्लॉवर बेड मध्ये त्या बिया पेरून त्यांची रोपे तयार करण्यास घ्यायचा विचार आहे. मग जून-जुलै मध्ये पाऊस सुरु झाला कि त्यांना जमिनीत लावीन, तोपर्यंत ती बऱ्यापैकी मोठी झालेली असतील.
2 Mar 2023 - 10:26 pm | Bhakti
सुरेख!खमंग भाजलेले वांगे,खमंग भाजणी,खमंग थालिपीठ आणि ते खमंग पाणी काय ते :) १००%
पाकृसाठी धन्यवाद!
-भरीत प्रेमी
3 Mar 2023 - 10:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाह मालक वा. नंबर एक थालीपीठ जमले आहे.
छायाचित्रही लंबर एक. बाकी, गविशेठ कायम
अनेकांना प्रोत्साहन देत असतात.
-दिलीप बिरुटे
3 Mar 2023 - 11:49 am | चांदणे संदीप
वांगे एकदम जीव की प्राण असल्याने ही पाकृ फारच आवडल्या गेली आहे. आपल्याकडून एकदम कडक सलाम!
सं - दी - प
6 Mar 2023 - 5:13 pm | टर्मीनेटर
भक्ती । प्रा.डॉ.दिलीप बिरुटे । चांदणे संदीप
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
3 Mar 2023 - 12:09 pm | श्वेता व्यास
वांग्याच्या भरीताचे प्रात्यक्षिक मिळाल्यामुळे आता करून बघायला हरकत नाही.
थालीपिठाचा चित्रातूनही सुगंध जाणवावा इतके ते खमंग दिसते आहे :)
4 Mar 2023 - 4:20 pm | रीडर
थालीपीठ आणि भरीत दोन्ही छान...
5 Mar 2023 - 8:24 am | सोत्रि
एक नंबर!
- (वांगेप्रेमी) सोकाजी
5 Mar 2023 - 10:24 am | कुमार१
अतिशय खमंग ! मस्त ..
5 Mar 2023 - 12:14 pm | सरिता बांदेकर
छान दिसतंय.पण मला नेत्रसुखच घ्यावं लागतं.
वांग्याची ॲलर्जी आहे मला.
पण एक मात्र खरं वांगे हे कुठच्याही प्रकारे खाल्ले तरी मस्तच लागतं.
मला वांग्याची ॲलर्जी काही वर्षांपासून आहे.
त्याआधी वांगं अतिशय प्रिय होतं.
पण कधी वांग्याचं थालिपीठ खाण्याचा योग आला नाही.
6 Mar 2023 - 5:24 pm | टर्मीनेटर
अरेरे... माझ्या आईलाही वांगे प्रिय पण मध्यंतरी तिलाही वांग्याची ॲलर्जी झाली होती, पण आता खाल्ले तर मात्र काही त्रास होत नाही! त्यावरून तुम्हाला सुचवतो कि अधून मधून वांगे खाऊन बघा कदाचित तुमच्या बाबतीतही ही ॲलर्जी काही काळापुरती उद्भवली असल्यास आता ती दूरही झाली असू शकते.
6 Mar 2023 - 5:18 pm | टर्मीनेटर
श्वेता व्यास । रीडर । सोत्रि । कुमार१
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏:
9 Mar 2023 - 11:12 am | विवेकपटाईत
कृती आवडली. हा प्रकार एकदा मी करून बघितला होता. थालीपीठ मस्तच लागतात. बाकी वांगे म्हणजे ताज असलेला भाजींचा बादशाह. भरले वांगे, वांगे बटाटे, भाजलेल्या वांग्याचा कुसकरा करून त्यात चिरलेले टमाटो, कांदे हिरवी मिरची कोथिंबीर घालून बनलेला रायता (आमची आई मस्त बनवायची), सांभर मध्ये इत्यादि इत्यादि. बाकी वांगे म्हणजे साक्षात भू लक्ष्मी. वांग्याचे पीक घेऊन शेतकरी कोट्यधीश ही बनतात.
9 Mar 2023 - 11:22 am | शानबा५१२
वांग्याची तिखट भाजी चपातीबरोबर फार लवकर झाली असती व छान लागले असते. वांग्यात 'काड' नावाची सुकी मच्छी व त्याबरोबर चपाती विथ कांदा म्हणजे 'परमानंद' अस काही लोक मानतात.
11 Mar 2023 - 9:05 am | नंदन
झकास बेत जमलाय! जियो!!
11 Mar 2023 - 7:13 pm | टर्मीनेटर
विवेकपटाईत | शानबा५१२ | नंदन
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
16 Mar 2023 - 1:56 pm | आलो आलो
मस्त बेत .... बाकी त्या ग्लासातल्या पाण्याबरोबर घेतल्याने वांग्याची चव वाढली कि वांग्यामुळे ग्लासातील पाण्याची चव वाढली ?
(बा.द.वे. एव्हढं छान पावसाळी वातावरण बघून आज संध्याकाळसाठी वांगे (च) आणावेत काय ? असं काहीसं मनाचे बेत होत आहेत )
17 Mar 2023 - 1:03 pm | टर्मीनेटर
ह्याचा अचूक निष्कर्ष काढणे थोडे अवघड आहे पण दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक ठरल्याने त्यांनी संयुक्तपणे एकमेकांची चव वाढवली असे ढोबळ मानाने म्हणता येईल 😀
मग आणलेत कि नाही? अशा मस्त वातवरणाची मजा तर घेतलीच पाहिजे!!!
21 Mar 2023 - 2:05 pm | यश राज
भरताचे थालीपीठ फारच उत्तम दिसतंय. करून बघावे लागेल.