फिरुनी केली मनात दाटी जुन्या क्षणांनी
टिपे जराशी झरुनी गेली गालावरुनी.
जुन्या फुलांचा जुना सुगंध अवती भवती
किती क्षणांची घुटमळ जुन्या रस्त्यावरती
फिरूनी ओठावर येती पुन्हा जुनीच गाणी.
किती रेशीम क्षणांचा गुंता गुंतत असता
कुणी उसवला नाही मी पण व्यापून जाता
पसा गतकाळाचा भरला तुटलेल्या धाग्यांनी.
देठ तुटताना तेव्हा रडले होते पान पान
असे उठले होते वादळ उजाड हा माळरान
सडा सुकलेल्या फुलांचा गेला गंध उडुनी.
प्रतिक्रिया
11 Nov 2022 - 10:13 am | कर्नलतपस्वी
उद्दंड या आठवणी
पुन्हा पुन्हा दाटुन येती
थकल्या भागल्या जीवाची
ऐशी तैशी करून जाती
जाळुन पुरून टाका
त्या आठवणीच्या कलेवराला
नाहीतर उखडून टाकतील
इमारतीचा पाया
हळवी कवीता. छान.
11 Nov 2022 - 12:29 pm | Deepak Pawar
कर्नलतपस्वी सर मनःपूर्वक धन्यवाद.