डोळ्यांनी फळे खावित का?

स्वधर्म's picture
स्वधर्म in जनातलं, मनातलं
30 Sep 2021 - 12:59 pm

आमच्या डाळिंबांच्या बागेत आलेली ही फळे:

फळे

ही फळे ‘भगवा’ या वाणाची असून गेल्या दोन वर्षात, कसलेही रासायनिक खत न घातलेल्या आणि कोणतेही किटकनाशक न फवारलेल्या झाडांना आलेली आहेत. आमच्या सेंद्रीय शेती अभ्यास गटातील मित्र - मार्गदर्शकास जेव्हा चार फळे खाऊन बघण्यासाठी पाठवली, तेंव्हा त्यांना ती छान वाटली. खरे सांगायचे तर आतले दाणे चांगले डाळिंबी असले, तरी ती दिसायला अजिबात सुंदर नाहीत, आणि खूप खूप गोड नाहीत. मी जेव्हा मित्राला असे विचारले, तेंव्हा त्यांचे म्हणणे होते, की फळाची नैसर्गिक चव तशीच असते. ज्यांना गोडच गोड फळ खायचे आहे, त्यांनी सरळ साखर खावी ना!
तसेच छाटणी घेतली असली तरी शक्यतो नैसर्गिक पध्दतीने वाढवल्यामुळे, झाडावर एकदमच सगळी फळे न येता, वेगवेगळ्या अवस्थेतील फळे एकाच वेळी दिसत आहेत. त्यामुळे बाग एकदम व्यापार्याला देणे शक्य नाही कारण त्यांना एकदम टेंम्पोभरून मालाचा सौदा करायचा असतो. त्या ऐवजी ती आठवड्यातून दोनदा तोडून महिना दोन महिने विकत रहावे लागेल. ते तसे कटकटीचे आहे आणि त्यासाठी त्या पध्दतीने काम करणारा माणूस/ तोडून नेणारा विक्रेता मिळाला पाहिजे. पण सर्वात महत्वाचे म्हणजे, आजूबाजूच्या शेतकर्यांनी जेव्हा ही फळे पाहिली, तेव्हा ‘हॅSSS! ही डाळिंबं कोण घेणार?’ अशी उस्फूर्त प्रतिक्रिया आली. एक दोघांना तोडण्यासाठी विचारले, तर त्यांनीही काही उत्साह दाखवला नाही. तसेच इतरही काही लॉजिस्टिक समस्या आहेत. परिणामी या वर्षी आंम्ही बाग काढण्याचा निर्णय घेत आहोत. डाळिंबांचा प्रयोग फारसा यशस्वी झाला नसला, तरी आमचा दुसरा प्रयोग बर्यापैकी यशस्वी झाला आहे. लवकरच त्याविषयी लिहिण्याचा विचार आहे.

****

अशाच एका शहरातील भाजी बाजार, वेळ संध्याकाळची, गर्दीची. एक सुशिक्षित, मध्यमवर्गीय बाई भाजी घेत घेत एका भाजीवालीजवळ आल्या. तिच्याकडे फुलकोबी (फ्लॉवर) होता, आणि बाईंना तो घ्यायचा होता. पण भाजीवालीकडे दोन वेगवेगळे ढीग होते. एकात मोठ्ठे पांढरेशुभ्र फुलकोबीचे टवटवीत गड्डे होते ८० रु. किलो. तर दुसऱ्या ढिगात थोडे लहान गड्डे होते ६० रु. किलो. बाईंनी दोन्ही ढिगातील भाजी नीट निरखून पाहिली. लहान गड्ड्यांच्या ढिगात त्यांना काही ठिकाणी एखाद् दुसरी अळीसुध्दा फिरताना दिसली. बाईंनी निवडून पण ६० रु. किलोच्या लहान गड्डे  असलेल्या ढिगातील भाजी अर्धा किलो घेतली. हे पाहून भाजीवालीला आश्र्चर्य वाटले. न रहावून तिने विचारले, "ताई, तुंम्ही तर थोडा जास्त दर परवडणार्या व चांगल्या शिकलेल्या वाटता. मग फक्त १० रुपयांसाठी तुंम्ही अळ्या असलेली भाजी का घेतली?" बाई म्हणाल्या, "या ६० रुपये किलोवाल्या फुलकोबीवर अळी आहे, याचाच अर्थ ही भाजी खाऊन ती जगली आहे. दुसऱ्या मोठ्या, टवटवीत फुलकोबी वर तर एकही जीवजंतू दिसत नाही. नक्कीच त्यावर कीटकनाशक फवारले असावे. मग ज्यावर जीवजंतू जगलेच नाहीत, ती भाजी खाऊन माणूस तरी कसा निरोगी जगेल?"

****

झळझळीत रंग असलेली, मोठ्ठी फळे डोळ्यांना आकर्षक वाटतात. खासकरून रासायनिक खते घातल्यावर पिकाला भरपूर पाणीही द्यावे लागते. फळे उत्तम पोसल्यासारखी दिसतात. फळांमध्ये पाण्याचा अंशही जास्ती राहतो. त्यामुळे अशी भाजी व फळे दिसायला टवटवीत, चमकदार दिसतात. पण ती फोपशी असतात. जोडीला किटकनाशके फवारली असतील तर त्यावर कीटक, माशा, अळ्या दिसत नाहीत. पण विचार करा, जे इतर जीवजंतूंसाठी घातक आहे, ते मानवी पचनसंस्थेसाठी देखिल घातकच असणार नाही का? आत्ता लगेच नाही, तरी दिर्घकाळ सेवनाने तरी त्याचा परिणाम भोगावाच लागणार. मी स्वत: पुण्याच्या फुले मंडईत पालेभाजीच्या ढिगावर हिरव्या शेडचे आणि गाजराच्या ढिगावर तांबड्या शेडचे दिवे लावून बसलेले विक्रेते पाहिले आहेत.

म्हणून भाजी व फळे आपण डोळ्यांनी खात असू तर लवकरात लवकर ती सवय बदलली पाहिजे. काय भुललासि वरलिया रंगा | ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा || असे संत चोखामेळा उगीच नाही म्हणून गेले.

समाजजीवनमानशेतीलेखअनुभव

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

30 Sep 2021 - 1:03 pm | चौथा कोनाडा

एकदम भारी !

झळझळीत रंग असलेली, मोठ्ठी फळे डोळ्यांना आकर्षक वाटतात. खासकरून रासायनिक खते घातल्यावर पिकाला भरपूर पाणीही द्यावे लागते. फळे उत्तम पोसल्यासारखी दिसतात. फळांमध्ये पाण्याचा अंशही जास्ती राहतो. त्यामुळे अशी भाजी व फळे दिसायला टवटवीत, चमकदार दिसतात. पण ती फोपशी असतात. जोडीला किटकनाशके फवारली असतील तर त्यावर कीटक, माशा, अळ्या दिसत नाहीत. पण विचार करा, जे इतर जीवजंतूंसाठी घातक आहे, ते मानवी पचनसंस्थेसाठी देखिल घातकच असणार नाही का? आत्ता लगेच नाही, तरी दिर्घकाळ सेवनाने तरी त्याचा परिणाम भोगावाच लागणार. मी स्वत: पुण्याच्या फुले मंडईत पालेभाजीच्या ढिगावर हिरव्या शेडचे आणि गाजराच्या ढिगावर तांबड्या शेडचे दिवे लावून बसलेले विक्रेते पाहिले आहेत.

म्हणून भाजी व फळे आपण डोळ्यांनी खात असू तर लवकरात लवकर ती सवय बदलली पाहिजे. काय भुललासि वरलिया रंगा | ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा || असे संत चोखामेळा उगीच नाही म्हणून गेले.

अगदी खरंय !

कर्नलतपस्वी's picture

1 Oct 2021 - 11:17 am | कर्नलतपस्वी

दिसते तसे नसते म्हणून जग फसता. लेखा द्वारे भाजीपाला खरीदण्यासाठीचा एक वेगळाच दृष्टिकोन मीळाला. उत्तम

गॉडजिला's picture

1 Oct 2021 - 11:21 am | गॉडजिला

नेमक धोरण परस्थितीवरच अवलंबुन आहे पणं या धाग्याने आपल्या सर्वांसाठीच एक महत्वाचा दृष्टिकोन अधोरेखित केला याबद्दल धागाकेखकाचे आभार

गॉडजिला's picture

30 Sep 2021 - 1:13 pm | गॉडजिला

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा || असे संत चोखामेळा उगीच नाही म्हणून गेले.
परफेक्ट शेवट

रंगीला रतन's picture

30 Sep 2021 - 1:26 pm | रंगीला रतन

मस्त.
पुलेशु.

अमर विश्वास's picture

30 Sep 2021 - 2:04 pm | अमर विश्वास

एक चवीने खाणारा .. म्हणून ही प्रतिक्रिया ...

खाताना पंचेंद्रियांना समाधान मिळालेच पाहिजे. त्यामुळे नुसती चवच नाही .. तर दृश्य (appearance), वास, पोत (texture) हे सुध्दा महत्वाचे ..
कृत्रिम रंग किंवा रंगीत दिवे यांना फसू नये हे खरच पण योग्य पारखून पूर्ण समाधान देणाऱ्या फळे / भाज्या यांनाच प्राधान्य

एकच उदाहरण देतो ..
आमच्या इथे चौकात एक पेरूची गाडी (सायकल) असते. त्याच्याकडे गेल्यावर साधारणतः मध्यम आकाराचा तजेलदार, थोडा हिरवा पण पिवळसर पणा कडे झुकणारा, खूप कडक नाही पण अगदी मऊ पडलेला पण नको .. असा पेरू नाकाजवळ नेऊन दीर्घ श्वास घेतला कि जो काही सुवास प्रसन्न करून जातो कि ..
एक पेरू तिथेच कापून खावासा वाटतो (खातोच) ...

स्वधर्म's picture

30 Sep 2021 - 4:43 pm | स्वधर्म

रंग आणि गंध फळांच्या ताजेपणाशी आणि गुणवत्तेशी संबंधित आहेच, पण तो नैसर्गिक पध्दतीने आला असेल तर. त्याला महत्व द्यावे, पण तेच सर्वकाही नव्हे. वॉशिंग्टन सफरचंदावर म्हणे चकाकी येण्यासाठी मेणाचा थर (स्प्रे) देतात. सध्याच्या रासायनिक खते, किटकनाशके यांच्या जमान्यात, खूप काळजीपूर्वक निवड करणे महत्वाचे आहे. खाद्यपदार्थांचे रूप हे फार महत्वाचे होऊन बसले आहे. टीव्हीवर जे खवय्येगिरीचे कार्यक्रम लागतात, त्यात तर पदार्थ दिसतो कसा याला इतके आफाट महत्व दिले जाते, की त्याला फूड पोर्नोग्राफी असेच म्हणावे लागेल. पण असा पदार्थ बनविणे अगर खाणे हे आरोग्यदायी असेलच असे नाही.

नैसर्गीक ताजेपणा हा केव्हाही चांगला परंतु त्याला बंधने आहेत. एखादे फळ किंवा भाजी नैसर्गीक रुपात जास्तीत जास्त २ /३ दिवस चांगली राहु शकते. फळे त्यामानाने जास्त दिवस टिकतात. परंतु तसे लवकर खराब ही होतात. आजच्या काळात जिथे लोकांना केव्हाही ताजे फळ फळ्बागेपासुन शेकडो किलोमीटर दुर असताना हवे असते. म्हणुन त्याचे शेल्फ लाईफ वाढावे म्हणुन काही प्रक्रीया कराव्या लागतात. सफरचंदावर लावलेला मेणाचा थर हा त्यातलाच प्रकार. फळे पिकवणे हा प्रकार नैसर्गीक होण्यासाठी पुर्वी कोठया असायच्या. आता तेच काम केमीकल वापरुन केले जाते.

एकाच प्रकारची पिके घेउन किंवा भरमसाठ पाणी वापरुन पिके घेतली की जमीनीचा पोत खराब होतो. त्याला ठीक करायला एकतर आलटुन पालटुन पिके घेणे , जमीण पडीक ठेवणे किंवा रासायनीक किंवा नैसर्गीक खते (शेण) वापरावी लागतात. त्यामुळे रासायनीक खते वगेरे आज काळाची निकड आहेत. फक्त त्यांचा अतीरेक नको.

सेंद्रीय शेती उत्तम पर्याय आहे. परंतु त्यात लिमीटेशन आहेत. जे आपण खातो ते सारेच सेंद्रीय हवे मग प्रोसेस्ड फूड टाळावे. सध्याच्या काळात तरी मला ते शक्य वाटत नाही . .

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Sep 2021 - 4:28 pm | ज्ञानोबाचे पैजार

एक जूनी म्हण आहे "कळकट मळकट कामाला बळकट"

सध्या कोणाला असे कळकट मळकट आवडत नाही, पण आकर्षक असेल तर त्या वस्तुला जास्त किम्मत येते (उदा बर्‍याचशा चीनी बनावटीच्या वस्तु)

शेंगदाण्याची चटणी म्हटले की नाक मुरडले जाते पण त्या ऐवजी पिनट बटर मात्र आवडीने खाल्ले जाते, मक्याच्या लाह्यांना कॉर्नफ्लेक्स म्हटले की त्यांची किम्मत दुप्पट तिप्पट होते, अशी अनेक उदाहरणे देता येतील.

भाज्यांचे आणि फळांचे पण तसेच होत आहे. आता तर मॉल संस्कृती मधे भाज्या सुध्दा फॉइल पॅक मिळायला लागल्या आहेत.

एकदा रामदेव बाबांनी सांगितले होते की असेच (ताजे) अन्न खा जे जास्तिजास्त तीन दिवसात खराब होते.

शेवट अतिशय आवडला पण सध्या जमानाच "काय भुललासी वरलिया रंगा चा आहे."

पैजारबुवा,

शेंगदाण्याची चटणी म्हटले की नाक मुरडले जाते पण त्या ऐवजी पिनट बटर मात्र आवडीने खाल्ले जाते,
अर्रे हे असे जे कोणी करीत असतील त्यानं खाणे समजले नाही असेच म्हणावे लागेल
दोन्ही पदार्थ खाण्यात मज्जा आहे ...
खमंग वाटतं वाड्यबरोबर दाण्याची चटणीचा पाहिजे आणि साटे सॉस करण्यासाठी पीनट बटर पाहिजे

चौथा कोनाडा's picture

3 Oct 2021 - 1:18 pm | चौथा कोनाडा

बुवा,
"कळकट मळकट कामाला बळकट"
ही माझी आवडती म्हण आहे !
साधी-सुधी दिसणारी माणसे मोठे काम करून जातात !

हेटाळणीच्या सुरात म्हंटलेले वापरले होते.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Sep 2021 - 6:15 pm | अमरेंद्र बाहुबली

छान लेख

सोत्रि's picture

30 Sep 2021 - 7:02 pm | सोत्रि

म्हणून भाजी व फळे आपण डोळ्यांनी खात असू तर लवकरात लवकर ती सवय बदलली पाहिजे

अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला आहे!
अपनी अकल लगाओ दिखावे पे मत जाओ.

- (डोळे उघडलेला) सोकाजी

धर्मराजमुटके's picture

30 Sep 2021 - 7:52 pm | धर्मराजमुटके

दृष्टीआड सृष्टी. आमच्या गावी डाळींबाचे भरपूर बाग आहेत. एकदा ८-१० दिवस गावी राहणे झाले आणि नातेवाईकांबरोबर डाळींबाची शेती पाहिली. दर दिवसाआड कसला ना कसला फवारा / औषध मारावे लागते. डाळींबा इतके दुसरे रासायनिक फळ नसेल. न खालेले जास्त चांगले.

स्वधर्म's picture

30 Sep 2021 - 10:28 pm | स्वधर्म

डाळिंब आणि द्राक्षे ही दोन पिके सध्या महाराष्ट्रात अत्यंतिक फवारणी केली जाणारी पिके आहेत. एक प्रयोग करून अवश्य पाहण्यासारखा आहे. बाजारात सर्वसामान्यपणे मिळणारा एक द्राक्ष घ्या. दोन मिनिटे तो फक्त तोंडात ठेवा; चावू नका. नुसता घोळवायचा. आणि मग बाहेर काढा. तोंडात कसली चव जाणवते आहे पहा. ९९% अप्रिय तुरट चव जाणवेल. ती तशी जाणवली नाही, तर नैसर्गिक पध्दतीने पिकवलेली द्राक्षे आहेत, हे लक्षात येईल. चावल्यानंतर प्राधान्याने गोड चव लागत असल्याने फवारणी केल्याने बदललेली चव, जी बहुधा सालीवरच असते, ती सहसा लक्षात येत नाही.
त्यामुळे तुंम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. ही दोन फळे जवळजवळ ९९% भरपूर फवारणी करूनच पिकवली जातात, आणि शक्य असेल तर ती टाळलेली बरी.

मग ज्यावर जीवजंतू जगलेच नाहीत, ती भाजी खाऊन माणूस तरी कसा निरोगी जगेल?"

हा एकांगी विचार होऊ शकतो.

ज्या झाडाला कीड लागली त्या झाडाची फळे नीट वाढू शकली नसल्यामुळे त्यांना भाव येत नाही असेही होऊ शकते.

दुसरे -- कीटकनाशके मानवी शरीराला अपायकारकच असतात हा सुद्धा एकांगी विचार झाला.

कारण पायरेथ्रीन गटातील कीटक नाशके( डासांना मारण्यासाठी वापरत असलेले गुड नाईट इ ( अलेथ्रीन, डेल्टा मेथ्रीन इ) हि केवळ कणा हीन प्राण्यांवर ( invertebrates) परिणाम करतात. पक्षी प्राणी आणि मानवावर नाही.

हि पायरेथ्रीन गटातील कीटक नाशके सुद्धा crysanthemum या शेवंती गटातील झाडापासूनच तयार होतात. https://en.wikipedia.org/wiki/Pyrethrin

कडूलिंब हे झाड सुद्धा आपल्याला कीटकांनी खाऊ नये म्हणूनच कीटकनाशक द्रव्ये तयार करत असते. https://en.wikipedia.org/wiki/Azadirachtin
https://en.wikipedia.org/wiki/Azadirachta_indica

असे जैविक युद्ध निसर्गात अनंत काळापासून चालू आहे.

तेंव्हा केवळ त्यावर अळ्या किंवा किडे दिसले म्हणून ते सुरक्षित आहे हे समजणे चूक ठरेल. जर निंबोळ्यांचा अर्क फवारला असेल तर त्यावर किडे दिसणार नाहीत.

बाकी फळ वरून चांगले दिसत नसेल तर लोक आतून चांगले असेल याची खात्री कशी बाळगणार?

जर फळ खराब निघाले तर पूर्ण पैसे परत मिळतील हि खात्री असेल तरच लोक विकत घेतील.

जाता जाता -- काय भुललासी वरलीया सोंगा? हे अभंगापुरते ठीक आहे.

लग्नाच्या बाजारात सुंदर मुलगी आणि कमाऊ मुलगाच लवकर खपतो.

स्वभावाने दिलदार असलेल्या गरीब मुलाशी किंवा स्वभावाने चांगली कुरूप मुलगी कोण पत्करून घेतंय?

स्वधर्म's picture

30 Sep 2021 - 11:08 pm | स्वधर्म

>> मग ज्यावर जीवजंतू जगलेच नाहीत, ती भाजी खाऊन माणूस तरी कसा निरोगी जगेल?"
हा एकांगी विचार होऊ शकतो.
हे मान्य, पण ज्यावर किडा मुंगी फिरली ते फळ शहरी माणसे घेत नाहीत; दिसायला चांगले नसलेले फळ स्वाभाविकपणे कमी दर्जाचे समजतात. हा अधिक एकांगी विचार झाला. आणि लेखाचा तोच मुद्दा आहे. अपवाद काढून कोणतीही गोष्ट सिध्द किंवा असिध्द होत नसते, तर सर्वसामान्यपणे काय घडते ते महत्वाचे असते. फळे घेताना निर्जीव वस्तूप्रमाणे स्टराईल फळे भाजी म्हणजेच चांगली असे समजू नये. परदेशात यांत्रिक सौंदर्यदृष्टी लावण्याचे सवय लोकांत इतकी बोकाळली आहे, की सुपर मार्केटमध्ये वाकड्या काकड्या रिजेक्ट केल्या जातात. हे पहा:
https://www.forbes.com/sites/briankateman/2020/03/02/the-time-is-ripe-fo...

******

डॉ. अनिल अवचट यांच्या मुलाखतीमधून
लहानपणी ते खेड्यात वाढले आणि शेतकर्यांच्या मुलांबरोबर खेळत मजा करत शेतातून फिरत असत. असेच एकदा त्यांच्या मित्राबरोबर शेतावर राखणीला गेले आणि पाखरं हाकलण्यासाठी गोफण फिरवू लागले. पाहता पाहता ते मोठ्या जोशात येऊन गोफण फिरवू लागले, इतकी, की जवळपास पाखरं अजिबात ठरेनात. हे पाहून त्यांचा शेतकरी मित्र म्हणाला, ‘अन्या, आरं इतका जोर लावू नको, त्यांचा बी वाटा असतोय!’ अवचट यांना हा प्रसंग वयाच्या ऐंशींव्या वर्षी लक्षात राहण्याइतका महत्वाचा वाटला!

Food waste exists across the food supply chain, thanks to pests and mold, poor climate control and household waste. “Imperfect” produce is often turned away by grocery stores for not meeting strict cosmetic standards – making up around 40% of total food waste.

Rajesh188's picture

30 Sep 2021 - 11:56 pm | Rajesh188

आणि पटला सुद्धा लेखकाच्या मता शी पूर्ण सहमत आहे. फळ,भाज्या नैसर्गिक रुपात जास्त चकमक करत नाहीत.त्या मुळे जास्त चमकणारी फळ विकत घेवूच नयेत..कीटकनाशक ही उपद्रवी कीटकांना नष्ट करण्याच्या हेतू नी जरी वापरली जात असली तरी त्या मुळे सहयोगी,उपयुक्त सूक्ष्म जीव सुद्धा मारले जातात.
आणि नैसर्गिक चक्रात त्यांचे स्थान खूप महत्वाचे असते.

चौकस२१२'s picture

1 Oct 2021 - 5:12 am | चौकस२१२

डॉक्तरांनी दिलेली माहिती उपयुक्त आहे
परत एकदा असे म्हणावेसे वाटते कि कुठेतरी समतोल गाठला पाहिजे .. टोकाला जाऊन काय होणार?
त्यातल्या त्यात कमी खते घातलेले पदार्थ घेता येतील का? कधी कधी जे मिळतंय ते
आपल्या आर्थिक कुवती मध्ये दोन्ही बसवावे ..

अर्थात हे सगळे करणे तिथे शक्य आहे जिथे फूड लेबलिंग म्हणजे विकले जाणारे पदार्थासंबंधीची माहिती चे नियम काटेकोर आहेत ( त्यात काय आहे , कोणते अनैसर्गिक पदार्थ आहेत इत्यादी ची माहिती देणे)
मिठाई च बघ मुददमून रंग घालू नका... इत्यादी

कोणत्या फळांना ,आणि भाज्यांना कीटक नाशकाची जास्त गरज लागते त्याचे वर्गीकरण करू शकतो.
द्राक्षे, सफरचंद ,डाळिंब, स्ट्रॉबेरी, चेरी, ह्यांच्या वर कीटक नशकांचा जोरदार मारा केलेला असतो.
भाज्या मध्ये.
वाटाणा,टोमॅटो,पालक, पावटा, फुलकोबी, ह्यांच्या वर कीटक नशकाचा मारा केलेला असतो.
आवळा, जांबुळ,चिक्कू, पपई ,नारळ ह्यांना कीटक नाशकांची गरज पडत नाही ते स्वतः रोगाचा प्रतिकार करण्यास खंबीर असतात.

सुबोध खरे's picture

1 Oct 2021 - 10:42 am | सुबोध खरे

आवळा, जांबुळ,चिक्कू, पपई ,नारळ ह्यांना कीटक नाशकांची गरज पडत नाही ते स्वतः रोगाचा प्रतिकार करण्यास खंबीर असतात.

संपूर्णपणे गैरसमजुतीवर आधारित बेलाशकपणे ठोकून दिलेले विधान

https://vikaspedia.in/agriculture/crop-production/integrated-pest-managm...

https://www.agrifarming.in/sapota-pests-diseases-chiku-sapodilla-control...

https://www.tandfonline.com/doi/full/10.1080/15538362.2019.1608889

रावसाहेब चिंगभूतकर's picture

1 Oct 2021 - 9:16 am | रावसाहेब चिंगभूतकर

एका आयुर्वेदिक डॉक्टरांकडे पूर्वी गेलो असताना त्यांनी द्राक्षे अजिबात न खाण्याचा सल्ला दिला होता. द्राक्षे म्हणजे विषाची कुपी असते असं ते म्हणाले होते, त्याची आठवण झाली.

बाकी बाजारात pesticide removers उपलब्ध आहेत त्याबद्दल काय मत आहे: https://www.amazon.in/dp/B089KQ3W4D/ref=cm_sw_r_cp_apa_glt_fabc_68GY1GQ1...

सुरिया's picture

1 Oct 2021 - 11:30 am | सुरिया

तसेही द्राक्षकन्येच्या कुपीला विषच म्हणतात. ;)
poison

रावसाहेब चिंगभूतकर's picture

1 Oct 2021 - 12:27 pm | रावसाहेब चिंगभूतकर

हो बरोबर. घेऊ नये माणसाने. द्या पाठवून. "नष्ट" करतो मी.

मराठी_माणूस's picture

1 Oct 2021 - 10:36 am | मराठी_माणूस

एकुण काय , "पारखी नजर" वेगळ्या अर्थाने वापरली पाहीजे.

कोकणातील जग प्रसिद्ध हापूस आंब्याची चव चाखायला लोकांना मिळतच नाही .झाडावर पूर्ण वाढ झालेले आणि नैसर्गिक रीत्या पिकविलेला आंबा लोकांपर्यंत पोचतच नाही.
आंब्याला फळा चा राजा का म्हणतात ते तेव्हाच समजेल.
आता जी बाजारात असतात ते कृत्रिम रित्या पिकवली जाणारी फळ बेचव.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

1 Oct 2021 - 12:31 pm | रावसाहेब चिंगभूतकर

आंब्याच्या बाबतीत इतका गोंधळ आहे, की अगदी भरवश्याच्या माणसाकडून म्हणून डायरेक्ट मागवलेले आंबे पण बेचव निघालेले पाहिलेत. अशाने आंब्यांची मागणी अक्षरशः कमी झाली आहे.

सुबोध खरे's picture

1 Oct 2021 - 12:40 pm | सुबोध खरे

कृत्रिम रित्या पिकवली जाणारी फळ बेचव.

याला काही शास्त्राधार आहे का?

कि हे पण असंच बेलाशक ठोकून दिलेलं

Rajesh188's picture

1 Oct 2021 - 12:52 pm | Rajesh188

शास्त्रीय कारण तुम्ही डॉक्टर आहात तुम्हीच ध्या.
सर्व सामान्य लोकांना हे चांगले माहीत आहे.
१) झाडावर फळाला पाड लागल्या शिवाय त्या झाडावरची फळ काढायची नसतात.
म्हणजे झाडावर च फळ पिकण्यास सुरुवात झाल्यावर.
२) भात्यान मध्ये ती फळ झाकून ठेवली जातात.
ही नैसर्गिक प्रक्रिया झाली.
दुसरी कृत्रिम पाड लागण्या अगोदरच फळ झाडावरून काढली जातात आणि केमिकल वापरून त्यांचा रंग बदलला जातो ती पिकल्यासारखी फक्त वाटतात.
आणि ह्या दोन्ही पद्धती मधील फळांच्या चवी मध्ये खूप मोठे अंतर असते.
हे अनुभवाने सर्वांस माहीत आहे.
येथील सर्व ह्या वर सहमत होतील.
आता शास्त्रीय कारण काय आहेत ते तुम्ही गूगल वर shodha.
गूगल वरची माहिती सत्य च असते असे नाही.
अनुभव हा सत्य च असतो.

सुबोध खरे's picture

1 Oct 2021 - 1:32 pm | सुबोध खरे

आंबा चिकू फणस इ अनेक फळे झाडावर पिकण्याच्या अगोदरच काढून अधिक ठेवली जातात पिकण्यासाठी आणि हे शतकानुशतके चालू आहे.

सीताफळे चिकू पिकण्यासाठी तांदुळात ठेवले जातात. त्यात पिकण्याची प्रक्रिया काय आणि कशी होते ते समजून घ्या

कृत्रिम प्रक्रिया कशी होते तेही समजून घ्या.त्यात साम्य काय आहे. इथिलिन काय ऍसिटिलीन काय आहे कोणत्या नैसर्गिक प्रक्रियेत कोणता वायू निघतो हे समजून घ्या

मग ठोकाठोकी करा

अनुभव हा सत्य च असतो.

लोकांना भुताचा अनुभव येतो म्हणजेच भुते आहेत का?

थापाथापी कार्याला किमान बुद्धिमत्ता असावी लागते अन्यथा उघडे पडले जाते हे लक्षात ठेवा

Rajesh188's picture

1 Oct 2021 - 2:05 pm | Rajesh188

कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे खाल्ल्याने पोट अस्वस्थ होते कारण अल्कधर्मी पदार्थ हा एक चिडखोर आहे जो पोटातील श्लेष्मल ऊतक नष्ट करतो आणि आतड्यांचे कार्य व्यत्यय आणतो. रसायनाचा दीर्घकाळ संपर्क राहिल्यास पेप्टिक अल्सर होऊ शकतो.

मानवांमध्ये, tyसिटिलीन अनुमत पातळीपेक्षा कमी असल्यास तीव्र विषारी नाही तर जर मर्यादा ओलांडली तर त्याचे इनहेलेशन बेशुद्ध होऊ शकते आणि दीर्घकाळापर्यंत हायपोक्सिया म्हणजेच ऑक्सिजनची कमतरता निर्माण करून न्यूरोलॉजिकल सिस्टमवर परिणाम करू शकते.

कॅल्शियम कार्बाइड हे एक संक्षारक आणि धोकादायक रसायन आहे ज्यात अशुद्धी म्हणून आर्सेनिक आणि फॉस्फरस हायड्राइडचे ट्रेस आहेत.

आर्सेनिक आणि फॉस्फरस विषबाधाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अतिसार (रक्तासह किंवा त्याशिवाय), उलट्या, तहान, अशक्तपणा, ओटीपोटात आणि छातीत जळजळ, गिळण्यात अडचण, डोळे/त्वचेमध्ये जळजळ/जळजळ होणे, घसा खवखवणे, खोकला, दम लागणे यांचा समावेश होतो. श्वास घेणे आणि त्वचेवर व्रण इ.

कॅल्शियम कार्बाइडमध्ये कार्सिनोजेनिक गुणधर्म देखील आहेत.

Dr खरे वरील माहिती १०० वेळा तरी वाचा.नैसर्गिक पने पिकवलेली फळे आणि कृत्रिम पने पिकवली गेलेली फळ ह्या मध्ये काय फरक आहे ते समजेल.
फळ पिकवण्यासाठी वापरली जाणारी रसायने ही शरीरासाठी अत्यंत घातक आहे..
तुम्ही dr असून हेकेखोर आहात मी च शहाणा अशी वृत्ती आहे.
दुसऱ्याची बुध्दी काढायची तुमची सवय आहे.जगात जे काही घडतं ते मला सर्व कळत असा फालतू आत्मविश्वास आहे
विद्या विनयने शोभते.
हे साधे तत्व तुम्हाला माहित नाही.
रासायनिक खत,रासायनिक कीटक नाशक,रासायनिक रिपिंग हे सर्व मानवासाठी अत्यंत घातक आहे हे उच्च दर्जा असलेली संशोधक लोक सांगत आहेत.
मी नाही

गॉडजिला's picture

1 Oct 2021 - 2:11 pm | गॉडजिला

तुम्ही नसता तर डॉक काय करत असते कल्पनाही करता येत नाही.

रसायने फळ पिकवण्यासाठी भारत सर्रास वापरली जातात.ठराविक प्रमाण पेक्षा जास्त वापरली जातात.
दुधी भोपळा,भोपळा किंवा बाकी फळ भाज्या आकारणे लगेच वाढव्या म्हणून नको ती रसायने वापरली जातात.
नैसर्गिक शेती चा विरोध काय करताय .डॉक्टर असून सुद्धा

सुबोध खरे's picture

6 Oct 2021 - 6:36 pm | सुबोध खरे

नैसर्गिक शेती चा विरोध काय करताय .डॉक्टर असून सुद्धा
असं तुम्हाला कुठे दिसलं?

हरित क्रांती च्या अगोदर भारतात केवळ नैसर्गिक शेतीच होत होती पण अन्नधान्याचा तुटवडा का होत होता?
याचे समर्पक उत्तर देता येत असेल तर चर्चा करता येईल अन्यथा जे फ़ुकायचे आहे ते फुका

आपण काहीही बेलाशक टंकायचं एवढंच ठरवलंय म्हणून आपल्याला उत्तर द्यावं असं अजिबात वाटत नाही.

कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे खाल्ल्याने पोट अस्वस्थ होते कारण अल्कधर्मी पदार्थ हा एक चिडखोर आहे जो पोटातील श्लेष्मल ऊतक नष्ट करतो आणि आतड्यांचे कार्य व्यत्यय आणतो.

हायला

तुम्ही साला सकटच आंबे किंवा केळी खाता कि काय?

तसे नसेल आणि आंबे चोखून खात असाल तर निदान ते स्वच्छ पाण्याने धुवून खावे एवढं किमान ज्ञान आल्याला शाळेत शिकवलेलं होतं त्याचा विसर पडलेला दिसतोय

स्वधर्म's picture

1 Oct 2021 - 1:12 pm | स्वधर्म

चौथा कोनाडा, कर्नलतपस्वी, गॉडजिला, रंगीला रतन, सुक्या, ज्ञानोबाचे पैजार, चौकस२१२, अमरेंद्र बाहुबली, सोत्रि, धर्मराजमुटके, सुबोध खरे, Rajesh188, रावसाहेब चिंगभूतकर,  सुरिया, मराठी_माणूस तसेच इतर प्रतिसादकांचे आभार!

बरीचशी चर्चा ‘फळे, भाजी खरेदीसाठी’ एक नवा दृष्टीकोन यावर झाली आहे, पण…
बहुसंख्य लोकांचा हळूहळू बदललेला सौंदर्यविषयक दृष्टीकोन हा शेतकर्यांसाठी कसा (चुकीची) दिशा देत आहे, हा ही एक मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रयोगात काही गोष्टी आंम्हाला जरूर साध्य झाल्या. उदा. काहीही खत न टाकता, किटकनाशके न मारता, डाळिंबाचं पीक घेता येतच नाही असा ठाम समज आजूबाजूच्या शेतकर्यांचा होता. आंम्ही ते करू शकलो. पण तरीही अगदी फळे तोडणार्यांपासून विक्रेत्यांपर्यंत असा काही सौंदर्य-नकार मिळत गेला, की बस्स! कदाचित काही सेंद्रीय खते घालून, फवारण्या करून फळांना रंग आणणे, ती मोठी करणे या गोष्टींबाबत प्रयत्न करता येईल, पण अशी सगळी फळे एकदम न येणे पण व्यापार्यांना ती सगळी एकदम हवी असणे इत्यादि लॉजिस्टीक समस्या आहेतच. या लेखाने निदान काही लोकांच्या दृष्टीकोनात जरी बदल झाला, तरी धाग्याचे सार्थक झाले असे वाटेल.

विवेकपटाईत's picture

1 Oct 2021 - 2:16 pm | विवेकपटाईत

खिश्यात पैसे असेल तर डोळ्यांनी आणि नसेल तर डोळ्यांनी. साधा हिशोब आहे.

बापूसाहेब's picture

1 Oct 2021 - 3:12 pm | बापूसाहेब

डाळिंब शेतीचा वयक्तिक अनुभव नसला तरी अनेक मित्र आणि नातेवाईक यांच्या फळबागा मी नेहमीच खुप जवळून पहात आलोय.

डाळिंबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे ती म्हणजे स्वधर्म यांनी धाग्यात लिहिल्याप्रमाणे रासायनिक औषधांचा वापर केल्याशिवाय सुंदर, लालबुंद आणि गोड डाळिंब शेती करणे अशक्य आहे.. डाळिंबाच्या झाडांवर दर दोन ते तीन दिवसांनी कसल्या ना कसल्या औषधाची फवारणी शेतकरी करतात. कीड घालवनारे, कलर आणणारे, गोडी आणणारे, झाडांची वाढ थांबवून फळे आणी फुल आणणारे, फुल आणि फळ गळणे थांबवणारे इ कितीतरी प्रकारचे स्प्रे झाडांवर दर आठवड्याला केले जातात.
आणि आत्ता हे सर्व इतक नॉर्मल झालंय कि असं नाही केल्यास डाळिंब येतच नाहीत. फवारण्या करण्यात खंड पडला तर संपूर्ण सिजन सोडुन द्यावा लागतो.
हीच बाब पेरू, सीताफळ या फळांना सुध्दा लागू आहे.
आमच्या इथे फवारणी न केल्यामुळे संपूर्ण पेरूची बाग सोडुन द्यावी लागली. जे काही पेरू आत्ता आहेत ते सर्वच्या सर्व किडलेले निघतात.

तर सारांश असा की कीटकनाशक आणि रासायनिक खतांच्या वापराशिवाय आजच्या काळात शेती कारणे ( विशेषतः फळांची ) अशक्यप्राय गोष्ट आहे.
सेंद्रिय शेती हा विषय सर्वांचा आवडीचा आणि पर्यावरण पूरक असला तरी हा प्रकार वाटतो तितका सोपा आणि फायदेशीर तर नक्कीच नाही.
याला अनेक कारणे आहेत पण ती नंतर कधीतरी सविस्तर..
बाजारातून आणलेली फळ स्वच्छ धुवून खाणे हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे जेणेकरून रसायने आपल्या श रीरात कमीतकमी जातिल..त्याचसोबत शेतकऱ्यांनी देखील रसायने फवराताना ती योग्य मात्रेमध्ये फावरणे आवश्यक आहे. आता लेखातील दुसऱ्या उदाहरणाकडे येऊ.
ज्या भाजीवर किडे आहेत ती चांगली असा समज पूर्णपणे चुकीचा आहे. कीटक/किडे/अळ्या असलेल्या भाज्या खाणे कधीही आरोग्यासाठी चांगले असू शकत नाही. आम्ही शेतात स्वतः पिकवून खात आसलो तरी कीड लागलेली भ भाजी व फळे वापरत नाही...आणि हाच न्याय लावायचा असेल तर मग मी असेही म्हणू शकतो की माश्या बसलेले खाद्यपदार्थ खाणे हे कधीही चांगले. कारण त्यावर माश्या बसतायेत, खतायेत आणि तरीही जिवंत आहेत याचाच अर्थ खाद्यपदार्थ चांगल्या क्वालिटी चा आहे..

कोणत्याही गोष्टीचे जनरलायजेशन नको.

काही गोष्टी स्वानुभवाने शेअर कराव्यात म्हणून सांगतो. -
१) फळ कधीही स्वच्छ धुवून खावीत
२) सीजन च्या खुप आधी येणारी किंवा सीजन संपून गेला तरी शिल्लक असणारी फळे घेऊ नयेत ( उदा..जानेवारी मध्ये येणारा आंबा किंवा मे महिन्यातील द्राक्षे )
३) फळे घेताना त्यांच्या देठाकडे लक्ष द्या. देठ काळा झालेली किँवा देठ वाळलेली फळे ही कीतीही टवटवीत दिसत असली तरी घेऊ नयेत. ( सफरचंद , द्राक्षे, इ.)
४) टरबूज , कलिंगड इ फळे शक्यतो हातगाडीवर किंवा स्टॉल वर घेऊ नयेत. अश्या ठिकाणीं फळांना विषेश इंजेक्शन देउन गोड आणि आतून कलरफुल बनवुन विकले जाते. शक्यतो डायरेक्ट मार्केट मधून किंवा विश्वासू व्यक्तीकडून खरेदी करावी.
५) १०० टक्के सेंद्रिय ( ऑरगॅनिक ) म्हणून मार्केटिंग करणार्या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवून मार्केट रेट पेक्षा जास्त दर देउन खरेदी करू नये.

बापूसाहेब,
सर्वप्रथम आपल्या प्रतिसादाबद्दल आणि आपला अनुभव सांगितल्याबद्दल आभार!
>>  रासायनिक औषधांचा वापर केल्याशिवाय सुंदर, लालबुंद आणि गोड डाळिंब शेती करणे अशक्य आहे.. 
हे एकदम मान्य.
>> आणि आत्ता हे सर्व इतक नॉर्मल झालंय कि असं नाही केल्यास डाळिंब येतच नाहीत. 
हा समजही शेतकर्यांमध्ये अत्यंत सार्वत्रिक आहे. आमचा प्रयोग नेमका हे न करता डाळिंब पिकवता येतात का? हे पाहण्याचाच होता. तो आर्थिकदृष्ट्या नसला, तरी नैसर्गिकदृष्ट्या यशस्वी झाला हेच सांगायचे होते. केवळ दिसायला चांगली फळे नसल्यामुळे शेतकर्यापुढे कोणत्या समस्या उभ्या राहतात आणि नाईलाजाने बाग काढून टाकण्यासारखे आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक निर्णय घ्यावे लागतात, हे सुजाण ग्राहकांपुढे मांडणे हा धाग्याचा उद्देश होता.

मी वर म्हटल्याप्रमाणे, बरीचशी चर्चा ही दोन मुद्द्यांच्या मधे आलेल्या बोधकथेवरच झाली आहे. ‘निवडून निवडून कीड असलेली भाजीच खा’ असे सांगण्याचा उद्देश नक्कीच नाही. कदाचित मुद्दा अधिक स्पष्टपणे वेगळ्या प्रकारे मांडता येईल. जसे की…
आपल्यासाठी कोणते हितकारक आहे?
अत्यंत, मोठी, रंगीत, अधिक गोड आकर्षक फळे ज्याला भरपूर खते (रासायनिक) दिली असण्याची आणि भरपूर फवारणी केली असण्याची दाट शक्यता आहे. कारण त्या ढीगावर आजिबात कोणत्याही जीवजंतूचे अस्तित्व दिसून येत नाही.
की
थोडी लहान, पाण्याचे प्रमाण कमी असलेली, कमी आकर्षक रंगाची फळे? ज्यावर सहज नैसर्गिकपणे जीवजंतू आकर्षित झाले आहेत? अशा ढीगातून तुंम्ही निवडून चांगली फळे नक्कीच घेऊ शकता. तरीही एखादे फळ किड लागलेले आढळले, तर बाजूला खाढू शकता.

माझ्या पिकाचा एक दाणा किंवा एका फळावरही कोणतीच किडामुंगी असता कामा नये, हा शेतकर्यांचा अट्टाहास किती योग्य आहे? आपण आपल्यासाठीच पिकवतो पण वर अवचट यांच्या गोष्टीत म्हटल्याप्रमाणे त्यांचा काही वाटा मान्य करायला काय हरकत आहे? किडीचा समूळ नाश करणारी औषधे अत्यंत आक्रमकपणे मारून आपण जे पिकवणार ते खरोखरच मानवाला दीर्घकाळ खात राहण्यासाठी योग्य आहे का? हा मुद्दा आहे सर!

कीड किंवा अळ्या असलेले फळ खाल्यास मानवाला किती अपाय होऊ शकतो याचा सहज धांडोळा घेतला असता, अनेक संदर्भ मिळाले. अनेक ठिकाणी अगदी प्रत्यक्ष अळी खाल्ली गेल्यासही गंभीर काही त्रास व आजार होत नाही असेच समोर आले. त्यातला एक दुवा खाली देत आहे. जाता जाता, आतमध्ये विशिष्ट जातीची माशी जाऊन तिने अंडी घातल्याशिवाय अंजीर किंवा उंबर हे तयारच होत नाही, हे आपणास माहित असेलच.
https://askinglot.com/are-fruit-worms-harmful
Are fruit worms harmful?
There are worms in them. Tiny white worms, almost transparent, that will ultimately blossom into fruit flies -- unless you eat them first. Scientists know them as Drosophila suzukii. Before we go on, we should tell you to stop gagging, because they are safe to eat.

बाकी तुंम्ही सांगितलेल्या पाचही मुद्द्यांशी सहमत. खूप सोप्या भाषेत साधक बाधक गोष्टी तुंम्ही सांगितल्या.

वामन देशमुख's picture

2 Oct 2021 - 4:47 pm | वामन देशमुख

माझं स्वतःचं काहीसं असंच मत आणि अनुभव आहे.

उदा. बाजारात वांगी घेताना ज्या विक्रेत्याची वांगी अजिबात किडलेली नाहीत ती वांगी घेण्यापेक्षा, ज्या विक्रेत्याच्या वांग्यांपैकी काही वांगी किडलेली आहेत त्यांतील न किडलेली वांगी निवडून घ्यावीत. अश्या वांग्यांवर कीटकनाशकांचा मारा कमी प्रमाणात झालेला असण्याची शक्यता जास्त असते.

बाकी मूळ लेख आणि त्याखालील काही प्रतिक्रिया माहितीपूर्ण, विचारप्रवर्तक वाटल्या.

निसर्ग चक्रात सर्व जीव स्वतःचे रक्षण करतात तशा वनस्पती स्वतःचे रोगापासून रक्षण करण्याचे प्रयत्न नक्कीच करत असतील.
माझा ह्या वर्षी चे निरीक्षण सांगतो.मी काही जमीन फक स्वतः साठी ठेवलेली आहे जी घरा जवळ ,घराच्या पाठी मागेच.करणार कोणी नसल्या मुळे बाकी करायला दिली आहे.
तर घरा पाठी जे शेत आहे त्या मध्येच कधीच रासायनिक खत वापरले नाही,कधीच कीटक नाशक वापरली नाहीत.
त्या मध्ये घरात लागते त्या डाळी,भुईमूग वैगेरे असतो
ह्या वर्षी पावसामुळे खुरपणी फक्त एकदाच केली गेली आता मागल्या महिन्यात गावी गेलो तर पूर्ण शेतात फक्त आणि फक्त गवत च दिसत होते अगदी विविध जातीचे उंच वाढणारे .पीक कुठेच दिसत नव्हते.
फक्त गवत...
ह्या वर्षी काहीच पीक आले नाही सर्व गेले हातातून असे वाटले.
आणि आत मध्ये शेतात गेलो आणि बघतो तर भुईमूग किंवा बाकी सर्व पीक मस्त होती चांगली फुलली,होती.,भुईमूग ला मदत खूप शेंगा लागलेल्या होत्या .
ह्या चवळी,मग, वाटाणा ,घेवडा नेहमी पेक्षा जास्त झाला .. सांगायचं पॉइंट हा आहे इतके गवत असून सुद्धा पिकानी स्वतःचा बचाव केला होता आणि स्वतःची व्यवस्थित वाढ पण केली होती ..कोणता रोग नाही,कोणती कीड नाही.. . कीटक नाशक न वापरता सुद्धा निरोगी.
आणि असा अनुभव आहे.त्या शेतात किती ही हवामान प्रतिकूल असले तरी पीक जात नाही.
जंगलात विविध झाडे ,फळझाड असतात त्यांच्या कोणते कीटकनाशक,रासायनिक खत वापरली जातात तरी ती झाड,त्यांची फळ निरोगी असतात ना.उलट जोमात वाढलेली असतात.

स्वधर्म's picture

3 Oct 2021 - 4:31 pm | स्वधर्म

राजेशजी,
तुमच्या अनुभवाशी मला जोडून घेता आले. मला पण वाढलेल्या तणांमुळे खूप ताण आला होता. डाळिंबाच्या मध्ये भुईमूग लावला होता, त्यात मोठेच तण आले होते. आजूबाजूचे शेतकरी ते लवकरात लवकर काढून टाका असे सांगत होते. तणाला फुले येईपर्यंत थांबलात तर ती पुन्हा पुन्हा अत्यंत जोमाने येतच राहतात, असे म्हणत होते. रान ‘स्वच्छ’(?) ठेवले पाहिजे असे त्यांचे मत. त्यामुळे एकदा भांगलण करून घेतली. त्याचा बराच म्हणजे रु. ५७०० इतका खर्च आला. तुमची सगळी पोषक द्रव्ये तणच खाते, मग पिकाला काय मिळणार? असे सगळ्यांचे मत. नंतरच्या ट्रीपला गेलो तेंव्हा पुन्हा तण वाढले होतेच आणि पाऊस सुध्दा चालला होता. एका बाजूच्या शेतकर्याने आता भांगलण पुन्हा करू नका असा फायद्याचा सल्ला दिला. मग तण तसेच ठेवले. काढणीच्या वेळेला, काही प्रमाणात तण होते आणि भुईमुगाचे वेल आयुष्य संपल्यामुळे त्यात दिसूनही येत नव्हते. पण काढणी केल्यावर आमच्या शेंगा आजूबाजूच्या खते टाकलेल्या शेतकर्यांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे भरलेल्या आढळून आल्या. आमच्याकडे तण खूप वाढू दिले तर नंतर काढणीच्या वेळेला माणसे (बायका) आत जात नाहीत, सापांची वगैरे भीती वाटते असे म्हणतात. म्हणून भांगलण करावीच लागेल की काय असे वाटते. तणनाशके मारून भांगलणीपेक्षा खूपच कमी खर्च येतो, पण जमिनीचे दीर्घकालीन नुकसान होते. आमच्या शेतात भुईमूग काढताना आंम्हाला बर्याच ठिकाणी भरपूर मुंग्या चावल्या. वैताग आला, तरी आपली जमीन विषारी बनलेली नाही याचे समाधान वाटले. एका डाळिंबाच्या झाडावर तर मधमाशांचे मोहोळ लागलेले पाहिले. खूप बरे वाटले.
पण हे सगळे असले तरी या वर्षी डाळिंब काढण्याचाच विचार करत आहे. कारण पुण्यात राहून फळबाग नैसर्गिक पध्दतीने करणे जमेल असे वाटत नाही.

चौथा कोनाडा's picture

7 Oct 2021 - 5:55 pm | चौथा कोनाडा

+१

आर्थिक गणित किती गुंतागुंतीचे आहे !

स्वधर्म's picture

7 Oct 2021 - 6:41 pm | स्वधर्म

खरंच गुंतागुंतीचे आहे. मी नविन शेतकरी असल्याने मला तर खूप शिकायला मिळत आहे. उदा. एकाच क्षेत्रावर मला भांगलण करण्यासाठी ५७०० खर्च आला आणि शेजार्यांनी तणनाशक मारले, त्यांना १३०० + ४०० मजूरी असा खर्च आला. पण माझे पैसे तिथल्या स्थानिक बायकांकडे गेले तर त्यांचे पैसे तणनाशक कंपनी, विक्रेते यांच्याकडे गेले. जमिनीचे प्रदूषण, उत्पादनाचे विषारीकरण, सूक्ष्मजीवांवरील परिणाम या तर आर्थिकतेपलिकडच्या गोष्टी आहेत.

टीपीके's picture

11 Oct 2021 - 3:59 pm | टीपीके

भांगलण म्हणजे काय?

स्वधर्म's picture

11 Oct 2021 - 4:07 pm | स्वधर्म

फक्त पीक तसेच ठेऊन खुर्प्याने तण काढणे. हे संपूर्णपणे हाताने करावे लागते आणि खूप कष्टाचे काम आहे.

टीपीके's picture

11 Oct 2021 - 6:42 pm | टीपीके

धन्यवाद

झाड लहान असेल, कींवा खतपाणी कमी पडत असेल, कींवा माती चांगली सुपिक नसेल तर फळे तुम्ही दीलेल्या फोटोत आहेत तशी येउ शकतात.
काही वर्षांनी झाड आणखी मोठे झाल्यावर, कींवा खतात सुधारणा / बदल केल्यावर आणखी चांगली फळे येउ शकतील.

आमची शेती नसली तरी सर्व प्रकारची फळझाडे भरपुर आहेत. डाळिंबे, आंबे चीक्कु, नारळी, रामफळा, काजु, फणस, केळी, आवळा, जाम, कोकम, इत्यादी. कोणतीही रासायनीक फवारणी न करताही उत्तम दर्जाची फळे येतात. बरीचशी झाडे कोंकण कृषी विद्यापिठातुन आणल्याचे आठवते.

वर खरे डॉक्टरनी लिहील्याप्रमाणे आंबा फणस चिक्कु वगैरे बरीचशी फळे पुर्ण पिकायचा आधी काढली जातात. त्याचे एक कारण म्हाणजे झाडावर पुर्ण पिकेपर्यंत फळ रहात नाही. ते ठेवले तर वार्‍याने पडते, पक्षी व खारी अर्धवट खातात, अगदी जास्त पिकलेला फणसही कावळे चोची मारुन फोडतात. तसेच झाडावर पुर्ण पिकलेले फळ अगदी अलगद काढावे लागते, नाहीतर खाली पडुन फुटते. आणी अशी जास्त पिकलेली फळे दुकानात विकायला पाठवता येत नाहीत.

फळ झाडावर पुर्ण पिकु दिले तर त्याचा गोडवा आधी काढलेल्या फळांपेक्षा निश्चीतच अधीक असतो. जर तुमची स्वतःची बाग असेल तर ते तुम्ही नक्कीच अनुभवले असेल. पण झाडावर पिकलेले फळ बाजारात आणुन विकता येत नाही. मी गावी येणार असेल तर आई बरीचशी फळे झाडावर ठेउन देते. त्यातली २५% पण खायला मिळत नाहीत. पडुन फुकट जातात, कींवा पाखरे खातात. आता तर वानरही यायला लागलेत. पण जी मिळतात त्यांची गोडी अविट असते. खाली पडलेली फळे तीथेच कुजुन चांगली माती होते. त्यात होणारे कीडे जमीन आणखी सुपिक करतात.

तर सांगायचे हे की स्वतःची झाडे असतील तर (स्वतःला खाण्यासाठी) रासायनीक खते न वापरतापण उत्कृष्ठ फळे येउ शकतात. झाडावर पुर्ण पिकलेले फळ थोडे जास्त चवदार असते. (अती पिकलेले नव्हे - त्यात कीड पण असु शकते).

फळ शेतीचा अनुभव नसल्याने नो कॉमेंट.

स्वधर्म's picture

3 Oct 2021 - 4:38 pm | स्वधर्म

तुमचे बरोबर आहे. झाडे जोमदार असली तर चांगली फळे येतात. आणि जमीन निरोगी असेल, वाण मुळात चांगला असेल, तरच झाडे चांगली येतात. दुसरे असे की, तुमचे घर कोकणात असावे असे वाटते. मला अशी माहिती मिळाली, की घराच्या परड्यात चार झाडे नैसर्गिक पध्दतीने लावणे वेगळे आणि शेतात बाग लावणे वेगळे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

वामन देशमुख's picture

3 Oct 2021 - 5:11 pm | वामन देशमुख

फळ झाडावर पुर्ण पिकु दिले तर त्याचा गोडवा आधी काढलेल्या फळांपेक्षा निश्चीतच अधीक असतो... पण झाडावर पिकलेले फळ बाजारात आणुन विकता येत नाही.

बरोबर आहे.

Rajesh188's picture

3 Oct 2021 - 5:34 pm | Rajesh188

फळ ही कच्या अवस्थेत म्हणजे कैऱ्या असलेल्या अवस्थेत झाडावरून सर्व काढल्या
आणि असे प्रतेक वर्षी करत गेलो तर त्या झाडाची फळधारणा क्षमता कमी होते
हे पारंपरिक ज्ञाना वर आधारित गृहितक आहे.
आणि practically खरे पण आहे.
वारंवार गर्भपात केल्या मुळे स्त्री ची प्रजनन क्षमता कमी होते का? ह्याच्या शी हा प्रश्न पण निगडित आहे
माहिती गार लोकांनी मत व्यक्त करावे.

काहीही आमचा एक आंब्याच झाड तीन पिढ्या जगल, आणि एक फणसाचं झाड कमीत कमी १५० वर्ष तरी जुने असेल, आणि अशी गावात जुणी झाडे खूप मिळतील तुम्हाला.

प्राची अश्विनी's picture

3 Oct 2021 - 4:41 pm | प्राची अश्विनी

प्रामाणिक म्हणून हनतीचं नुकसान होताना पाहून वाईट वाटलं. ती डाळिंब विकता नाही का येणार? ग्राहक संघटना वगैरेंच्या कुणाशी बोलता येईल का?

प्राची अश्विनी's picture

3 Oct 2021 - 4:41 pm | प्राची अश्विनी

#मेहनतीचं

स्वधर्म's picture

6 Oct 2021 - 1:59 pm | स्वधर्म

धन्यवाद. या वर्षीचा हंगाम संपला आहे. मुख्य प्रश्न थोडी थोडी तोडणी करून ती शहरात पाठवण्याचा. इथे इकॉनॉमी ओफ स्केल चा प्रॉब्लेम आला. फळ बाग ही खूप लक्ष देऊन करण्याची गोष्ट आहे. खरं तर मला स्वत:ला आमच्या मेहनतीपेक्षा झाडांचा मृत्यू जास्त दु:खदायक वाटला. पण नैसर्गिक पध्दतीने हंगामी पिके करण्याचे सुरूच ठेवणार आहे.

Rajesh188's picture

6 Oct 2021 - 2:14 pm | Rajesh188

नैसर्गिक पद्धतीने फळ झाडे,फुल झाडे किंवा कोणतेही पीक हे जोरदार येणारच .तो निसर्गाचा नियम च आहे.
म्हणून तर पृथ्वी विविध वनस्पती,प्राणी ह्यांनी समृद्ध आहे.
फक्त ह्याला वेळ लागतो.आज नैसर्गिक शेती केली की लगेच त्याचे परिणाम दिसत नाहीत काही वर्ष जावी लागतात.
तुम्ही नक्की यशस्वी होणार.

स्वधर्म's picture

6 Oct 2021 - 5:40 pm | स्वधर्म

राजेशजी. प्रयत्न नक्कीच सुरू ठेवणार आहे. रासायनिक खते घालून बेसुमार कीटकनाशके वापरून बर्याच शेतकर्यांना तात्कालिक फायदा दिसत असला तरी जमिनीचे लवकर न भरून येणारे नुकसान होते, हे मनोमन पटले आहे.

काही जण सर्व जाती साठवून आहेत. साठपेक्षा जास्त आहेत. पण बाजारात गोल्डन डिलिशस वरायटीच चालते. का? भरपूर पीक.

Rajesh188's picture

7 Oct 2021 - 12:29 am | Rajesh188

हरित क्रांती भारतात यशस्वी करून दाखवण्यात त्या वेळचे सरकार, संशोधक - c Subramanian,b.p.pal,. A.b जोशी, m.s. Swaminathan , ह्यांनी प्रचंड कष्ट. घेतले.
सरकार,संशोधक,शेतकरी सनदी अधिकारी ह्यांच्या अपार कष्टाने ,आणि रॉकफेलर फौडेशन नी अफाट कष्ट घेतले .
आणि जगाला त्याच बरोबर भारताला अन्न धान्य मध्ये स्वयंपूर्ण बनविले.
त्या वेळच्या सरकार नी विविध सिंचन योजना,संकरित बियाणे शोध आणि निर्मिती.
बियाणे चे शेतकऱ्या पर्यंत पोचवण्यासाठी वितरण व्यवस्था ही सर्व काम अतिशय उत्तम रित्या केली.
Noman borlog ह्या आधुनिक काळातील ऋषी नी जगाला भूकबळी पासून मुक्त केले.
1970 चा नोबल पुरस्कार त्यांना देण्यात आला.

भारत सरकार नी सुद्धा त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देवून त्यांचा सन्मान केला.
त्यांच्या नावाची institude चंदीगड येथे स्थापन केली.
धन्य ती लोक आणि धन्य त्या वेळचे भारत सरकार.

जुन्यातल्या काही चांगल्या गोष्टी लुप्त होत असतात.

हो हे सत्य आहे म्हणून तर भारतीय जातीच्या पिकांचे दुसऱ्या जाती शी संकर करून निर्माण होणारी नवीन जात भारतासाठी उत्तम असते.येथील हवामानात तग राखून राहते.
हरित क्रांती झाली तेव्हा ह्याचे व्यवस्थित भान ठेवले गेले. अगदी व्यवस्थित अभ्यासपूर्ण संकरित बियाणे निर्माण केली गेली.
सरकार नी महाबीज म्हणून संस्था स्थापन केली होती बियांच दर्जा उत्तम राहण्यासाठी.नवीन संशोधन केंद्र निर्माण केली होती.
आता त्याच्या कडे दुर्लक्ष होत आहे.
हे राजकीय वाक्य नाही.
संकरित बियाणे आणि जनुकीय बदल करून निर्माण केलेले बियाणे ह्या मध्ये खूप मोठा फरक आहे.
जनुकीय बदल करून निर्माण केलेल्या नवीन प्रकारच्या जाती मुळे निर्माण होणारा भाजी पाला, धान्य,फळ ह्यांचा मानवी शरीरावर काय विपरीत परिणाम होईल ह्या विषयी ठाम निष्कर्ष अजुन तरी निघाला नाही.समर्थक आणि विरोधक दोन्ही बाजू नी युक्तिवाद चालू असतो.
जनुकीय बदल केल्या मुले कीटक,पक्षी,सुष्म जंतू,उपयोगी बॅक्टरिया आणि एकंदरीत च पर्यावरण ह्यांच्या वर अनिष्ट परिणाम होईल अशी पण शक्यता आहे
परागीकरण साठी कीटक आवश्यक असतात.त्यांचे अस्तित्व असणे गरजेचे असते.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

11 Oct 2021 - 9:32 am | रावसाहेब चिंगभूतकर

एक अतिशय बाळबोध प्रश्न विचारतो. खते रासायनिक असतील तर काय फरक पडतो? म्हणजे NPK खतांमध्ये पण तेच घटक असणार जे गांडूळ खतांमध्ये असणार. Pesticides बद्दल समजू शकतो, पण रासायनिक खते वाईट का?

रावसाहेब, रासायनिक खतांचे फायदे आहेतच, पण तोटे अधिक आहेत. त्यांचा परिणाम तात्काळ म्हणजे चालू पिकावरच दिसून येतो, त्याउलट जरी कितीही जैविक खते घातली तरी ती तात्काळ त्याच पिकाला मिळतील असे नाही. याचे कारण रासायनिक खते पाण्यात अत्यंत विद्राव्य असतात त्यामुळे अत्यंत वेगाने पीकात शोषली जातात. पण त्याचमुळे बराचसा अंश खोल जमिनीत मुरत जातो, याउलट जैविक खते अधिक वेळ जमिनीच्या वरच्या थरात राहतात व हळूहळू पिकाला मिळत राहतात. परिणामी शेतकर्यांना रासायनिक खतांचा फायदा लगेच दिसून येतो व दूरगामी तोट्याकडे दुर्लक्ष होते.
रासायनिक खतांचे तोटे बरेच आहेत, जे राजेश यांनी वर सांगितलेच आहेत. मुख्य तोटा म्हणजे जमिनीचे आणि परिसंस्थेचे दीर्घकालीन नुकसान. पण मी फक्त एक दीर्घकालीन तोटा वानगीदाखल सांगतो. आमच्या शेताच्या आजूबाजूला अनेक शेतकर्यांच्या विहीरी आहेत. पण कोणीही त्यांचे पाणी पिऊ शकत नाही. कुकरमध्ये त्या पाण्यावर डाळ शिजत नाही. वर्षानुवर्षे रासायनिक खते वापरली, जी जमिनीत खोलवर मुरली आणि विहीरींचे पाणी प्रदूषित झाले. आता हा तोटा रासायनिक खतांमुळे झाला हे कळत असूनही ते लोक तो विचारात घेत नाहीत, कारण लघुमुदतीचा पीकाच्या उत्पादनवाढीचा फायदा! याचे मूळ कारण म्हणजे लघुकालीन फायद्याचा विचार दीर्घकालीन तोट्यापेक्षा नेहमीच वरचढ ठरतो. ते सर्व समाजात आहेच. आपण नाही का, मुलांना चांगले ज्ञान देणार्या शाळेपेक्षा परिक्षेत अधिक गुण मिळवून देणार्या शाळेत घालत? यावर बरेच लिहीले गेले आहे.
तसेच ‘माझा’ फायदा झाला ना, मग परिसरातील इतरांचा तोटा झाला तरी मला काय फरक पडतो, ही स्वार्थी वृत्तीही येथे काम करते. ती कशी याचा तुंम्हीच विचार करा.

सुबोध खरे's picture

11 Oct 2021 - 1:04 pm | सुबोध खरे

वर्षानुवर्षे रासायनिक खते वापरली, जी जमिनीत खोलवर मुरली आणि विहीरींचे पाणी प्रदूषित झाले.

हे अर्धसत्य आहे.

बऱ्याच ठिकाणी उसाच्या शेतीसाठी पाण्याचा बेसुमार उपसा झाल्यामुळे आणि अधिक अधिक खोलवर बोअर वेल खणत गेल्यामुळे येणाऱ्या पाण्यात जमिनीतील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे अविद्राव्य क्षार येतात. यामुळे पाणी जास्त जड होते.

रासायनिक खते जर ठिबक सिंचनाद्वारे दिली तर आपण म्हणता तसे खताचे विहिरीच्या पाण्यात उतरणे बहुतांश प्रमाणात कमी होते शिवाय खताची बचत होते आणि पिकाला जास्तीत जास्त मात्रा मिळू शकते.

केवळ रासायनिक खताना दोष देऊन काम चालणार नाही.

आपण आम्ही ऊसच पिकवणार आणि त्याला भारंभार रासायनिक खतेच घालणार हा खतांचा दोष नाही. सुरीशिवाय जीवन अशक्य आहे. तेंव्हा सुरीने हात कापतो किंवा खून होऊ शकतो म्हणून सुरीला दोष देण्यात अर्थ नाही.

लक्षात ठेवा--

भारतात हरित क्रांती होण्यासाठी संकरित बियाणे आणि रासायनिक खते हि मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत.(सिंचन, शेतीचे यांत्रिकीकरण आणि कीटकनाशके हे इतर घटक आहेत.)

त्याशिवाय भारत उपाशीच राहिला असता.

वर्षानुवर्षं पडणारा दुष्काळ आणि उपासमारी हाच भारताचा इतिहास होता हे विसरून चालणार नाही

स्वधर्म's picture

11 Oct 2021 - 3:36 pm | स्वधर्म

डॉक्टर साहेब,
एखाद्या गोष्टीला ‘अर्धसत्य’ म्हटल्यामुळे तिच्याबाबत संशय तयार होतो. यात निम्मे असत्य आहे का, दिशाभूल केलीय का, अशी शंका निर्माण होते. आता खालील गोष्टीत काय असत्य आहे, यातील काय विज्ञानाशी विसंगत आहे, ते कृपया सप्रमाण दाखवून द्यावे, ही विनंती. रासानिक खते
- अत्यंत विद्राव्य असतात
- त्यातील अंश जमिनीत झिरपतो
- त्यामुळे भूजल प्रदूषित होते कारण सर्व मात्रा काही पीक शोषून घेऊ शकत नाही.
जमिनीचे प्रदूषण अनेक मार्गांनी होत आहे आणि आपण मांडलेले ऊस, बेसुमार पाणी हे मुद्दे मला अमान्य नाहीत; पण इथे रासायनिक खतावरच चर्चा चालू होती. रासायनिक खते ही contributing factor च नाहीत, असे आपल्याला म्हणायचे आहे का?
>> केवळ रासायनिक खताना दोष देऊन काम चालणार नाही.
मी केवळ शब्द बापरलेलाच नाही. उलट रासायनिक खतांचे फायदे आहेतच असेच मी म्हटले होते. शेत ही एक अत्यंत गुंतागुंतीची परिसंस्था असून तिच्यात अनेक चल (varialbes) काम करत असतात. आपण जे करतो, त्याच्या परिणाम दिसायला वेळ लागतो. तिचे संतुलन हे एकच एका गोष्टीवर अवलंबून नसते. याची जाणिव आहे. रासायनिक खते ही मी वर सांगितल्याप्रमाणे परिणाम करतात की नाही इतकाच मुद्दा घ्या. हरितक्रांती हा जरा मोठा मुद्दा आहे आणि त्याविषयी मी काहीच टिप्पणी केली नव्हती. कोणतीही गोष्ट सर्वकाळ बरोबर आणि फक्त फायदाच देणारी नसते, पण आपल्या प्रतिसादाच्या शैलीमुळे वाचणार्यांना मूळ मुद्दाच चुकीचा आहे, दिशाभूल करणारा आहे, असे वाटू शकते म्हणून हा खुलासा.

सुबोध खरे's picture

11 Oct 2021 - 7:56 pm | सुबोध खरे

अर्धसत्यचा दुसरा भाग मी लिहिलेलाच आहे कि अतिरिक्त पाणी लागणारी पिके (उदा ऊस) लावल्यामुळे बेसुमार पाण्याचा वापर होतो ज्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावत जाते आणि बोअर विहिरी अधिकाधिक खोल होत जातात ज्यामुळे खोल जमिनीतील अतिरिक्त क्षार पाण्यात उतरतात.

लक्षात ठेवा-- सर्वात स्वच्छ आणि शुद्ध पाणी हे पावसाचे असते ज्यात सर्वात कमी क्षार असतात

गंगेच्या खोऱ्यात पावसाळ्यात येणाऱ्या पुराबरोबर हिमालयातील गाळाची माती (आणि त्यातील खनिजे) सर्वत्र शेतात पसरते म्हणून गंगेच्या मैदानात जमीन अत्यंत सुपीक आहे. आणि पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावर चालणारी शेती यात क्षाराचे प्रमाण सर्वात कमी आहे.

रासायनिक खते हि बेसुमार प्रमाणात वापरली तर त्याचा अंश पाण्यात उतरेल यात काय संशय? पण हा दोष रासायनिक खतांचा नसून वापरणाऱ्या शेतकऱ्यांचा आहे.

स्वधर्म's picture

12 Oct 2021 - 12:24 pm | स्वधर्म

आपण ‘अर्धसत्या’मध्ये सत्यच आहे, हे स्पष्ट केले, त्याबद्दल धन्यवाद. रावसाहेब यांनी विचारलेला मूळ प्रश्न:
रासायनिक खते वाईट का? हा होता. तसेच आपण म्हटले आहे:
>> रासायनिक खते हि बेसुमार प्रमाणात वापरली तर त्याचा अंश पाण्यात उतरेल यात काय संशय? पण हा दोष रासायनिक खतांचा नसून वापरणाऱ्या शेतकऱ्यांचा आहे.
मला वाटते की जैविक खतांच्या तुलनेत रासायनिक खते ही अत्यंत विद्राव्य असतात, त्यामुळे ती अगदी योग्य प्रमाणात वापरली तरी वर्षानुवर्षे वापरत राहिल्यामुळे दरवर्षी त्यांचा थोडा थोडा अंश हा भूजलात खाली जातच राहतो. परिणामी विहीरींचे पाणी आणि एकूण अनेक वर्षांनी का असेना, पण परिसंस्था प्रदूषित होतेच होते. हा धोका जैविक खतांमध्ये असल्याचे दिसत नाही. कारण ती तेवढी विद्राव्य नसतात आणि दीर्घ कालावधीत पण जास्तीत जास्त भाग पिकांना मिळतो व कमीत कमी भाग भूजलात जातो. गेली शतकानुशतके जैविक खते वापरात असूनही जमिनी शेतीयोग्य राहिल्या आहेत. रासायनिक खते वापरायला हरित क्रांतीनंतर फार अलिकडे सुरूवात झाली. त्यानंतर जो विदा मिळाला आहे त्यानुसार रासायनिक खतांमुळे लगेच नाही तरी काही वर्षांनी तरी जमिनीचे नुकसान हे होणारच असे म्हणायला जागा राहते. म्हणून रासायनिक खते वाईट आणि शक्यतो ती औषधाप्रमाणेच वापरावी असे वाटते.
त्यामुळे तुमच्या प्रतिसादातील रासायनिक खते वापरत राहावीत, फक्त प्रमाणात. खतांमध्ये काहीही समस्या नसून सगळा दोष हा शेतकर्यांचा आहे, हा मुद्दा का मान्य करण्यासारखा का नाही हे स्पष्ट झाले असावे. बाकी जमिन प्रदूषणाची इतर कारणे, शेतकरी अन्नदाता नसून अन्न उत्पादक वगैरे गोष्टीबाबत आपले म्हणणे रास्त आहे.

Rajesh188's picture

11 Oct 2021 - 7:26 pm | Rajesh188

डॉक्टर री भाषेत च सांगून बघतो काय नाहीत कदाचित त्यांना आमचा पॉइंट समजेल.
डॉक्टर्स व्हिटॅमिन च्या गोळ्या घेण्याचे कधी सुचवतात.आणि कोणाला सुचवतात.
ह्याचे जे उत्तर आहे तेच उत्तर रासायनिक खतांची गरज कितपत असते.
ह्या प्रश्नाचं आहे.
वनस्पती ना योग्य वाढ होण्यासाठी पोषक द्रव्यांची गरज असते काही त्या हवेतून मिळवतात,काही पाण्यातून मिळवतात तर काही जमिनीतून च मिळवतात.
जमिनीत एकाधे पोषक द्रव्य कमी असेल तर वनस्पती वाढ योग्य रिती नी होत नाही.तेव्हा ते ओळखून तेच. कमी असणारे पोषक द्रव्य खता मधून दिले जाते.
सर्रास रासायनिक खत विनाकारण दिल्या मुळे,जास्त प्रमाणात दिल्या मुळे त्याचे विपरीत परिणाम होतात.
जसे विनाकारण व्हिटॅमिन च्या गोळ्या डॉक्टर नी खूप दिवस घेण्यास सांगितल्या तर रोगी देवाघरी लवकर जाईल तसाच प्रकार आहे हा.
खत निर्माण करण्याची कला खूप जुनी आहे.
खूप वर्षांपासून माणूस खत वापरत आहे.
रासायनिक खत आता आली.
दारू पिली की तात्पुरते कसे ताकत आल्या सारखे वाटते energy वाटते.
तसाच प्रकार आहे.
कंपोस्ट खत,शेन खत,पक्षांच्या विष्टेपासून मिळणारी खते, मलमुत्र अशा अनेक प्रकार च्या खतापासून पिकांस सर्व पोषक द्रव्य मिळतात.

पिकांची रोग प्रतिकार करण्याची शक्ती वाढते.जमिनीत असणाऱ्या असंख्य bacteria, उपयोगी बुरशी, आणि अनेक सुष्म जीव ह्यांची नीट वाढ होते.
रासायनिक खता ने हे सर्व होत नाही.
कीटक नाशक सारखी वापरल्या मुळे पिकांची रोग प्रतिकार शक्ती कमी होते.जसे माणसाच्या शरीर बाबत घडत तसेच वनस्पती बाबत घडते.
गवत किंवा माणूस पिकवत नसलेल्या अनेक वनस्पती जोमात वाढतात.पण माणूस ज्याची शेती करतो त्यांची वाढ jomat होत नाही.त्यांच्या वर च जास्त रोग पडतात.
त्यांना खत वैगेरे द्यावी लागतात.
का?
ह्या वर विचार करा.

सुबोध खरे's picture

11 Oct 2021 - 8:06 pm | सुबोध खरे

सर्रास रासायनिक खत विनाकारण दिल्या मुळे,जास्त प्रमाणात दिल्या मुळे त्याचे विपरीत परिणाम होतात.

हा दोष रासायनिक खतांचा नसून शेतकऱ्यांचा आहे.

पण कोणी शेतकऱ्यांना काही बोलायचे नाही कारण तो "बळीराजा" आहे आणि स्वतःला "अन्नदाता" म्हणवतो.

SOIL HEALTH CARD किंवा मृदा आरोग्य आलेख काय आहे जमीन आणि पाणी चाचणी प्रयोगशाळा Soil & Water Testing Laboratoryकाय आहे
हे एकदा वाचून पहा.

आपल्या जमिनीत आणि पाण्यात कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे आणि कोणती अन्नद्रव्ये अतिरिक्त आहेत याचे विश्लेषण करून कोणत्या प्रकारचे पीक घ्यायचे आणि कोणत्या तर्हेची खते द्यायची याचा शास्त्रीय अभ्यास आहे.

पण शेती तज्ज्ञांना शेतीत काय कळते? त्यांनी कधी हात काळे केले आहेत? असा सूर लावणारे बहुसंख्य शेतकरी सर्वत्र आढळतात ( अगदी मिपावर सुद्धा).

बाकी चालू द्या.

माती चे परीक्षण करणे,लोकांस मार्ग दर्शन करणे ह्या साठी शेती खाते असते जुन्या सरकार नी काम उत्तम केले आहे आणि करत होते.
शेती अधिकारी त्या साठी नेमला जायचं.आता शेती अधिकारी कुठे दिसत नाही.
जेव्हा रासायनिक खत आली तेव्हा ती कशी द्यायचे ह्याचे मार्गदर्शन सरकार नी केले होते.
काही खत ही झाडाच्या मुळाशी च चिमुटभर दिली जायची तीच पद्धत होती.
हरित क्रांती च्या वेळी सरकार नी उत्तम यंत्रणा राबवल्या होत्या.
खरे साहेबाना शेतकऱ्या विषयी प्रचंड तिरस्कार आहे असे त्यांच्या अनेक कॉमेंट मधून दिसून येतो.
सर्वसामान्य व्यक्ती आहे हो शेतकरी त्याचा तिरस्कार करू नका..
पाण्या मुळे शेतजमिनीत क्षार वाढतात ती नापीक होते असे मला तरी वाटत नाही.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात किंवा नदी किनारी पावसाळी काळात तीन तीन महिने जमीन पाण्याखाली असते पण ती नापीक झालेली मी तरी अजुन पहिली नाही.
लावणीचे भात किती शतके जमिनीत घेतले जाते .
लावणीच्या भातच्या शेती मध्ये जमीन पाण्याखाली असते ती नापीक झालेली मी तरी बघितली नाही.
उसाला जास्त पाणी लागते त्याची बचत करण्यासाठी ठीपक सिंचन वापरावे ही सूचना योग्य आहे लोक वापरू पण लागली आहेत.
खतांचा योग्य वापर,कीटक नाशकांचा योग्य वापर ह्या विषयी सरकारी पातळीवर प्रचार करावा माहिती द्यावी..

सुबोध खरे's picture

12 Oct 2021 - 10:59 am | सुबोध खरे

आपण डोकं वापरायचाच नाही आणि बेफाट काही तरी बडबड करायची असा पणच घेतलाय का आपण?

मी शेतकऱ्यांचा तिरस्कार करतो असे आपले पूर्वग्रहदूषित मत आहे त्याला माझा नाईलाज आहे.

शेतकरी हा अन्नदाता नसून तो अन्न उत्पादक आहे असे मी अनेक वेळेस सप्रमाण लिहिलेले आहे.

( अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांबद्दल लिहिल्यास या न्यायाने शिंपी सुद्धा वस्त्रदाता असायला हवा आणि बिल्डर सुद्धा निवारा दाता )

पाण्या मुळे शेतजमिनीत क्षार वाढतात ती नापीक होते असे मी कुठेही लिहिलेले नाही उगाच नको ते आरोप करण्यापूर्वी किमान थोडा तरी विचार करत जा.

सुबोध खरे's picture

12 Oct 2021 - 11:02 am | सुबोध खरे

माती चे परीक्षण करणे,लोकांस मार्ग दर्शन करणे ह्या साठी शेती खाते असते जुन्या सरकार नी काम उत्तम केले आहे आणि करत होते.
शेती अधिकारी त्या साठी नेमला जायचं.आता शेती अधिकारी कुठे दिसत नाही.

कोणताही धागा असेल तरी त्यात राजकारण आणून विचकाच करायचा विडाच उचलला आहे का आपण?

जमीन सजीव असते. जमिनीच्या एक घनफूट मातीत कोट्यवधी जीवाणू, बुरशी आणि बॅक्टेरिया असतात. त्यामुळेच जमीन सजीव आणि सुपीक बनते. रासायनिक खतांनी जमीन सुपीक बनत नाही तर सुपीक जमिनीतील अन्नद्रव्ये उचलायला मदत करतात. अशा प्रकारे जम‌िनीतून अधिकची अन्नद्रव्ये उचलली जातात तेव्हा जमीन निकस आणि निर्जीव बनत जाते. आजची शेतीची समस्याही निर्जीव किंवा मृत जमिनीने उद््भवलेली समस्या आहे.

डिटेल मध्ये सांगायचे झाले तर खूप मोठी पोस्ट होईल.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

11 Oct 2021 - 12:12 pm | रावसाहेब चिंगभूतकर

मला अजूनही कळलं नाही. जमिनीतले NPK सततच्या वापराने नष्ट होतात म्हणून ते बाहेरून (उदाहरणार्थ युरिया) दिले जातात. रासायनिक खते जमिनीला सुपीक बनवतात आणि म्हणून तर पिके भरघोस येतात.
"रासायनिक खतांनी जमीन सुपीक बनत नाही तर सुपीक जमिनीतील अन्नद्रव्ये उचलायला मदत करतात" म्हणजे?

हे बघा. राजेश यांचे म्हणणे हेच आहे का माहिती नाही

सुरिया's picture

11 Oct 2021 - 7:23 pm | सुरिया

दाळिंबाचे काही बायप्रॉडक्ट वाले मिळू शकतील का? अनारज्यूस वगैरे वाले. त्यांना दाळिंब कसे दिसते पेक्षा कसे लागते हे महत्त्वाचे असते.
काही वर्षापूर्वी माझ्या नात्यातल्या एका मुलीने दाळिंबाची वाईन तिच्या कॉलेज प्रकल्पाअंतर्गत तयार केलेलि होती. पोमोग्रॅनेटा नावाने. त्याचे खूप कौतुक झालेले होते. एका यशस्वी व धनाढ्य दाळींब उत्पादकाने तो प्रोजेक्ट अभ्यासायला मागितला होता पण पुढे काही प्रगती झाली नाही त्याची. त्याची पैसे द्यायची तयारी नव्हती आणि मुलीला फुकट प्रोजेक्ट द्यायचा नव्हता.
तसे कूणी उत्पादन करणारे आहेत का बघू शकता.

स्वधर्म's picture

12 Oct 2021 - 12:50 pm | स्वधर्म

धन्यवाद. आता आंम्ही नाईलाजाने डाळिंबाची बाग काढली आहे. बरेच निर्णय चुकीचे झालेत पण ती शिकण्याची किंमत आहे.
सध्या तरी खर्च निघून कुटुंबाला खायला विषमुक्त अन्न मिळावे इतकाच उद्देश आहे. सर्व अन्न नव्हे, तर मुख्य धान्ये, कडधान्ये व तेलबीया, इतकेच आळीपाळीने करायचा विचार आहे. शेती हा धंदा म्हणून फार अवघड गोष्ट आहे, हे समजलेले आहे. मात्र जे पूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहेत, त्यांची अवस्था बिकट आहे.

टर्मीनेटर's picture

12 Oct 2021 - 1:06 pm | टर्मीनेटर

छोटेखानी लेख आवडला 👍
मी पण गेली तीन-चार वर्षे आवड म्हणून सैन्द्रीय पद्धतीने फळझाडे वाढवण्याचा प्रयत्न करत आहे पण १६ पैकी ४ नारळ (प्रताप), एक पेरू (लखनौ) आणि एक पपई (तैवान) सोडली तर आवळा, जांभूळ, बोर, जाम (लाल आणि सफेद), लिंबू आणि डाळिंब ह्यांची) वाढ फार काही समाधान कारक वाटत नाहीये. अर्थात हौस म्हणून वेळ मिळेल तसे तिकडे लक्ष देता येते. पण असमाधानकारक वाढ बघून आता त्यांना रासायनिक खत देण्याचे विचार डोक्यात यायला लागलेत, जे खरतर मला पटत नाहीये.

Rajesh188's picture

12 Oct 2021 - 1:13 pm | Rajesh188

आवळा आणि जांभूळ तर असेच चांगले फुलते आणि फळते पण .तुम्ही कोणत्या जाती निवडल्या आहेत त्याची एकदा समीक्षा करा.
माझ्या दारात लिंबाचे झाड आहे खत ,कीटक नाशक ह्यांचा कधीच वापर केला नाही.
मदत झाड जोमाने डुलत असते आणि वर्ष भर लिंब असतात.
जांभळी ची मोठ मोठी झाड आमच्या गावात आहेत.
बाह्य सपोर्ट ची त्यांना बिलकुल गरज नाही.
चिंच खूप मोठमोठी झाड आहेत दर वर्षी फुलतात आणि फळतात पण.

टर्मीनेटर's picture

12 Oct 2021 - 1:51 pm | टर्मीनेटर

थोडे दिवस वाट बघा

ठीक आहे. मार्च पर्यत वाट बघतो, नाही काही प्रगती दिसली तर मात्र नाईलाजाने रासायनिक खाते वापरावी लागतील.
धन्यवाद.