✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

डोळ्यांनी फळे खावित का?

स
स्वधर्म यांनी
गुरुवार, 09/30/2021 - 12:59  ·  लेख
लेख
आमच्या डाळिंबांच्या बागेत आलेली ही फळे: फळे ही फळे ‘भगवा’ या वाणाची असून गेल्या दोन वर्षात, कसलेही रासायनिक खत न घातलेल्या आणि कोणतेही किटकनाशक न फवारलेल्या झाडांना आलेली आहेत. आमच्या सेंद्रीय शेती अभ्यास गटातील मित्र - मार्गदर्शकास जेव्हा चार फळे खाऊन बघण्यासाठी पाठवली, तेंव्हा त्यांना ती छान वाटली. खरे सांगायचे तर आतले दाणे चांगले डाळिंबी असले, तरी ती दिसायला अजिबात सुंदर नाहीत, आणि खूप खूप गोड नाहीत. मी जेव्हा मित्राला असे विचारले, तेंव्हा त्यांचे म्हणणे होते, की फळाची नैसर्गिक चव तशीच असते. ज्यांना गोडच गोड फळ खायचे आहे, त्यांनी सरळ साखर खावी ना! तसेच छाटणी घेतली असली तरी शक्यतो नैसर्गिक पध्दतीने वाढवल्यामुळे, झाडावर एकदमच सगळी फळे न येता, वेगवेगळ्या अवस्थेतील फळे एकाच वेळी दिसत आहेत. त्यामुळे बाग एकदम व्यापार्याला देणे शक्य नाही कारण त्यांना एकदम टेंम्पोभरून मालाचा सौदा करायचा असतो. त्या ऐवजी ती आठवड्यातून दोनदा तोडून महिना दोन महिने विकत रहावे लागेल. ते तसे कटकटीचे आहे आणि त्यासाठी त्या पध्दतीने काम करणारा माणूस/ तोडून नेणारा विक्रेता मिळाला पाहिजे. पण सर्वात महत्वाचे म्हणजे, आजूबाजूच्या शेतकर्यांनी जेव्हा ही फळे पाहिली, तेव्हा ‘हॅSSS! ही डाळिंबं कोण घेणार?’ अशी उस्फूर्त प्रतिक्रिया आली. एक दोघांना तोडण्यासाठी विचारले, तर त्यांनीही काही उत्साह दाखवला नाही. तसेच इतरही काही लॉजिस्टिक समस्या आहेत. परिणामी या वर्षी आंम्ही बाग काढण्याचा निर्णय घेत आहोत. डाळिंबांचा प्रयोग फारसा यशस्वी झाला नसला, तरी आमचा दुसरा प्रयोग बर्यापैकी यशस्वी झाला आहे. लवकरच त्याविषयी लिहिण्याचा विचार आहे. **** अशाच एका शहरातील भाजी बाजार, वेळ संध्याकाळची, गर्दीची. एक सुशिक्षित, मध्यमवर्गीय बाई भाजी घेत घेत एका भाजीवालीजवळ आल्या. तिच्याकडे फुलकोबी (फ्लॉवर) होता, आणि बाईंना तो घ्यायचा होता. पण भाजीवालीकडे दोन वेगवेगळे ढीग होते. एकात मोठ्ठे पांढरेशुभ्र फुलकोबीचे टवटवीत गड्डे होते ८० रु. किलो. तर दुसऱ्या ढिगात थोडे लहान गड्डे होते ६० रु. किलो. बाईंनी दोन्ही ढिगातील भाजी नीट निरखून पाहिली. लहान गड्ड्यांच्या ढिगात त्यांना काही ठिकाणी एखाद् दुसरी अळीसुध्दा फिरताना दिसली. बाईंनी निवडून पण ६० रु. किलोच्या लहान गड्डे  असलेल्या ढिगातील भाजी अर्धा किलो घेतली. हे पाहून भाजीवालीला आश्र्चर्य वाटले. न रहावून तिने विचारले, "ताई, तुंम्ही तर थोडा जास्त दर परवडणार्या व चांगल्या शिकलेल्या वाटता. मग फक्त १० रुपयांसाठी तुंम्ही अळ्या असलेली भाजी का घेतली?" बाई म्हणाल्या, "या ६० रुपये किलोवाल्या फुलकोबीवर अळी आहे, याचाच अर्थ ही भाजी खाऊन ती जगली आहे. दुसऱ्या मोठ्या, टवटवीत फुलकोबी वर तर एकही जीवजंतू दिसत नाही. नक्कीच त्यावर कीटकनाशक फवारले असावे. मग ज्यावर जीवजंतू जगलेच नाहीत, ती भाजी खाऊन माणूस तरी कसा निरोगी जगेल?" **** झळझळीत रंग असलेली, मोठ्ठी फळे डोळ्यांना आकर्षक वाटतात. खासकरून रासायनिक खते घातल्यावर पिकाला भरपूर पाणीही द्यावे लागते. फळे उत्तम पोसल्यासारखी दिसतात. फळांमध्ये पाण्याचा अंशही जास्ती राहतो. त्यामुळे अशी भाजी व फळे दिसायला टवटवीत, चमकदार दिसतात. पण ती फोपशी असतात. जोडीला किटकनाशके फवारली असतील तर त्यावर कीटक, माशा, अळ्या दिसत नाहीत. पण विचार करा, जे इतर जीवजंतूंसाठी घातक आहे, ते मानवी पचनसंस्थेसाठी देखिल घातकच असणार नाही का? आत्ता लगेच नाही, तरी दिर्घकाळ सेवनाने तरी त्याचा परिणाम भोगावाच लागणार. मी स्वत: पुण्याच्या फुले मंडईत पालेभाजीच्या ढिगावर हिरव्या शेडचे आणि गाजराच्या ढिगावर तांबड्या शेडचे दिवे लावून बसलेले विक्रेते पाहिले आहेत. म्हणून भाजी व फळे आपण डोळ्यांनी खात असू तर लवकरात लवकर ती सवय बदलली पाहिजे. काय भुललासि वरलिया रंगा | ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा || असे संत चोखामेळा उगीच नाही म्हणून गेले.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
शेती
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अनुभव

प्रतिक्रिया द्या
33132 वाचन

💬 प्रतिसाद (82)

प्रतिक्रिया

बरोबर आहे.

वामन देशमुख
Sun, 10/03/2021 - 17:11 नवीन
फळ झाडावर पुर्ण पिकु दिले तर त्याचा गोडवा आधी काढलेल्या फळांपेक्षा निश्चीतच अधीक असतो... पण झाडावर पिकलेले फळ बाजारात आणुन विकता येत नाही.
बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

कैऱ्या झाडावरून

Rajesh188
Sun, 10/03/2021 - 17:34 नवीन
फळ ही कच्या अवस्थेत म्हणजे कैऱ्या असलेल्या अवस्थेत झाडावरून सर्व काढल्या आणि असे प्रतेक वर्षी करत गेलो तर त्या झाडाची फळधारणा क्षमता कमी होते हे पारंपरिक ज्ञाना वर आधारित गृहितक आहे. आणि practically खरे पण आहे. वारंवार गर्भपात केल्या मुळे स्त्री ची प्रजनन क्षमता कमी होते का? ह्याच्या शी हा प्रश्न पण निगडित आहे माहिती गार लोकांनी मत व्यक्त करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

काहीही आमचा एक आंब्याच झाड

धनावडे
Mon, 10/11/2021 - 16:06 नवीन
काहीही आमचा एक आंब्याच झाड तीन पिढ्या जगल, आणि एक फणसाचं झाड कमीत कमी १५० वर्ष तरी जुने असेल, आणि अशी गावात जुणी झाडे खूप मिळतील तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

प्रामाणिक म्हणून हनतीचं

प्राची अश्विनी
Sun, 10/03/2021 - 16:41 नवीन
प्रामाणिक म्हणून हनतीचं नुकसान होताना पाहून वाईट वाटलं. ती डाळिंब विकता नाही का येणार? ग्राहक संघटना वगैरेंच्या कुणाशी बोलता येईल का?
  • Log in or register to post comments

#मेहनतीचं

प्राची अश्विनी
Sun, 10/03/2021 - 16:41 नवीन
#मेहनतीचं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

अश्विनीजी,

स्वधर्म
Wed, 10/06/2021 - 13:59 नवीन
धन्यवाद. या वर्षीचा हंगाम संपला आहे. मुख्य प्रश्न थोडी थोडी तोडणी करून ती शहरात पाठवण्याचा. इथे इकॉनॉमी ओफ स्केल चा प्रॉब्लेम आला. फळ बाग ही खूप लक्ष देऊन करण्याची गोष्ट आहे. खरं तर मला स्वत:ला आमच्या मेहनतीपेक्षा झाडांचा मृत्यू जास्त दु:खदायक वाटला. पण नैसर्गिक पध्दतीने हंगामी पिके करण्याचे सुरूच ठेवणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

स्वधर्म

Rajesh188
Wed, 10/06/2021 - 14:14 नवीन
नैसर्गिक पद्धतीने फळ झाडे,फुल झाडे किंवा कोणतेही पीक हे जोरदार येणारच .तो निसर्गाचा नियम च आहे. म्हणून तर पृथ्वी विविध वनस्पती,प्राणी ह्यांनी समृद्ध आहे. फक्त ह्याला वेळ लागतो.आज नैसर्गिक शेती केली की लगेच त्याचे परिणाम दिसत नाहीत काही वर्ष जावी लागतात. तुम्ही नक्की यशस्वी होणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

धन्यवाद

स्वधर्म
Wed, 10/06/2021 - 17:40 नवीन
राजेशजी. प्रयत्न नक्कीच सुरू ठेवणार आहे. रासायनिक खते घालून बेसुमार कीटकनाशके वापरून बर्याच शेतकर्यांना तात्कालिक फायदा दिसत असला तरी जमिनीचे लवकर न भरून येणारे नुकसान होते, हे मनोमन पटले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

हे पाहा.

कंजूस
Wed, 10/06/2021 - 14:47 नवीन
या Mountain Fairy channelवर खूप आहेत फळांचे विडिओज.
  • Log in or register to post comments

सफरचंदांची एक डॉक्यु पाहिली होती.

कंजूस
Wed, 10/06/2021 - 14:50 नवीन
काही जण सर्व जाती साठवून आहेत. साठपेक्षा जास्त आहेत. पण बाजारात गोल्डन डिलिशस वरायटीच चालते. का? भरपूर पीक.
  • Log in or register to post comments

हरित क्रांती

Rajesh188
गुरुवार, 10/07/2021 - 00:29 नवीन
हरित क्रांती भारतात यशस्वी करून दाखवण्यात त्या वेळचे सरकार, संशोधक - c Subramanian,b.p.pal,. A.b जोशी, m.s. Swaminathan , ह्यांनी प्रचंड कष्ट. घेतले. सरकार,संशोधक,शेतकरी सनदी अधिकारी ह्यांच्या अपार कष्टाने ,आणि रॉकफेलर फौडेशन नी अफाट कष्ट घेतले . आणि जगाला त्याच बरोबर भारताला अन्न धान्य मध्ये स्वयंपूर्ण बनविले. त्या वेळच्या सरकार नी विविध सिंचन योजना,संकरित बियाणे शोध आणि निर्मिती. बियाणे चे शेतकऱ्या पर्यंत पोचवण्यासाठी वितरण व्यवस्था ही सर्व काम अतिशय उत्तम रित्या केली. Noman borlog ह्या आधुनिक काळातील ऋषी नी जगाला भूकबळी पासून मुक्त केले. 1970 चा नोबल पुरस्कार त्यांना देण्यात आला. भारत सरकार नी सुद्धा त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देवून त्यांचा सन्मान केला. त्यांच्या नावाची institude चंदीगड येथे स्थापन केली. धन्य ती लोक आणि धन्य त्या वेळचे भारत सरकार.
  • Log in or register to post comments

कोणतेही नवीन वाण उत्पन्न करून केले तर. . .

कंजूस
गुरुवार, 10/07/2021 - 09:17 नवीन
जुन्यातल्या काही चांगल्या गोष्टी लुप्त होत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

नवीन वान निर्माण करताना जुने नष्ट होतात

Rajesh188
गुरुवार, 10/07/2021 - 09:52 नवीन
हो हे सत्य आहे म्हणून तर भारतीय जातीच्या पिकांचे दुसऱ्या जाती शी संकर करून निर्माण होणारी नवीन जात भारतासाठी उत्तम असते.येथील हवामानात तग राखून राहते. हरित क्रांती झाली तेव्हा ह्याचे व्यवस्थित भान ठेवले गेले. अगदी व्यवस्थित अभ्यासपूर्ण संकरित बियाणे निर्माण केली गेली. सरकार नी महाबीज म्हणून संस्था स्थापन केली होती बियांच दर्जा उत्तम राहण्यासाठी.नवीन संशोधन केंद्र निर्माण केली होती. आता त्याच्या कडे दुर्लक्ष होत आहे. हे राजकीय वाक्य नाही. संकरित बियाणे आणि जनुकीय बदल करून निर्माण केलेले बियाणे ह्या मध्ये खूप मोठा फरक आहे. जनुकीय बदल करून निर्माण केलेल्या नवीन प्रकारच्या जाती मुळे निर्माण होणारा भाजी पाला, धान्य,फळ ह्यांचा मानवी शरीरावर काय विपरीत परिणाम होईल ह्या विषयी ठाम निष्कर्ष अजुन तरी निघाला नाही.समर्थक आणि विरोधक दोन्ही बाजू नी युक्तिवाद चालू असतो. जनुकीय बदल केल्या मुले कीटक,पक्षी,सुष्म जंतू,उपयोगी बॅक्टरिया आणि एकंदरीत च पर्यावरण ह्यांच्या वर अनिष्ट परिणाम होईल अशी पण शक्यता आहे परागीकरण साठी कीटक आवश्यक असतात.त्यांचे अस्तित्व असणे गरजेचे असते.
  • Log in or register to post comments

एक अतिशय बाळबोध प्रश्न

रावसाहेब चिंगभूतकर
Mon, 10/11/2021 - 09:32 नवीन
एक अतिशय बाळबोध प्रश्न विचारतो. खते रासायनिक असतील तर काय फरक पडतो? म्हणजे NPK खतांमध्ये पण तेच घटक असणार जे गांडूळ खतांमध्ये असणार. Pesticides बद्दल समजू शकतो, पण रासायनिक खते वाईट का?
  • Log in or register to post comments

रासायनिक खतांचे फायदे आहेतच, पण तोटे अधिक

स्वधर्म
Mon, 10/11/2021 - 12:38 नवीन
रावसाहेब, रासायनिक खतांचे फायदे आहेतच, पण तोटे अधिक आहेत. त्यांचा परिणाम तात्काळ म्हणजे चालू पिकावरच दिसून येतो, त्याउलट जरी कितीही जैविक खते घातली तरी ती तात्काळ त्याच पिकाला मिळतील असे नाही. याचे कारण रासायनिक खते पाण्यात अत्यंत विद्राव्य असतात त्यामुळे अत्यंत वेगाने पीकात शोषली जातात. पण त्याचमुळे बराचसा अंश खोल जमिनीत मुरत जातो, याउलट जैविक खते अधिक वेळ जमिनीच्या वरच्या थरात राहतात व हळूहळू पिकाला मिळत राहतात. परिणामी शेतकर्यांना रासायनिक खतांचा फायदा लगेच दिसून येतो व दूरगामी तोट्याकडे दुर्लक्ष होते. रासायनिक खतांचे तोटे बरेच आहेत, जे राजेश यांनी वर सांगितलेच आहेत. मुख्य तोटा म्हणजे जमिनीचे आणि परिसंस्थेचे दीर्घकालीन नुकसान. पण मी फक्त एक दीर्घकालीन तोटा वानगीदाखल सांगतो. आमच्या शेताच्या आजूबाजूला अनेक शेतकर्यांच्या विहीरी आहेत. पण कोणीही त्यांचे पाणी पिऊ शकत नाही. कुकरमध्ये त्या पाण्यावर डाळ शिजत नाही. वर्षानुवर्षे रासायनिक खते वापरली, जी जमिनीत खोलवर मुरली आणि विहीरींचे पाणी प्रदूषित झाले. आता हा तोटा रासायनिक खतांमुळे झाला हे कळत असूनही ते लोक तो विचारात घेत नाहीत, कारण लघुमुदतीचा पीकाच्या उत्पादनवाढीचा फायदा! याचे मूळ कारण म्हणजे लघुकालीन फायद्याचा विचार दीर्घकालीन तोट्यापेक्षा नेहमीच वरचढ ठरतो. ते सर्व समाजात आहेच. आपण नाही का, मुलांना चांगले ज्ञान देणार्या शाळेपेक्षा परिक्षेत अधिक गुण मिळवून देणार्या शाळेत घालत? यावर बरेच लिहीले गेले आहे. तसेच ‘माझा’ फायदा झाला ना, मग परिसरातील इतरांचा तोटा झाला तरी मला काय फरक पडतो, ही स्वार्थी वृत्तीही येथे काम करते. ती कशी याचा तुंम्हीच विचार करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रावसाहेब चिंगभूतकर

वर्षानुवर्षे रासायनिक खते

सुबोध खरे
Mon, 10/11/2021 - 13:04 नवीन
वर्षानुवर्षे रासायनिक खते वापरली, जी जमिनीत खोलवर मुरली आणि विहीरींचे पाणी प्रदूषित झाले. हे अर्धसत्य आहे. बऱ्याच ठिकाणी उसाच्या शेतीसाठी पाण्याचा बेसुमार उपसा झाल्यामुळे आणि अधिक अधिक खोलवर बोअर वेल खणत गेल्यामुळे येणाऱ्या पाण्यात जमिनीतील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे अविद्राव्य क्षार येतात. यामुळे पाणी जास्त जड होते. रासायनिक खते जर ठिबक सिंचनाद्वारे दिली तर आपण म्हणता तसे खताचे विहिरीच्या पाण्यात उतरणे बहुतांश प्रमाणात कमी होते शिवाय खताची बचत होते आणि पिकाला जास्तीत जास्त मात्रा मिळू शकते. केवळ रासायनिक खताना दोष देऊन काम चालणार नाही. आपण आम्ही ऊसच पिकवणार आणि त्याला भारंभार रासायनिक खतेच घालणार हा खतांचा दोष नाही. सुरीशिवाय जीवन अशक्य आहे. तेंव्हा सुरीने हात कापतो किंवा खून होऊ शकतो म्हणून सुरीला दोष देण्यात अर्थ नाही. लक्षात ठेवा-- भारतात हरित क्रांती होण्यासाठी संकरित बियाणे आणि रासायनिक खते हि मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत.(सिंचन, शेतीचे यांत्रिकीकरण आणि कीटकनाशके हे इतर घटक आहेत.) त्याशिवाय भारत उपाशीच राहिला असता. वर्षानुवर्षं पडणारा दुष्काळ आणि उपासमारी हाच भारताचा इतिहास होता हे विसरून चालणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

‘अर्धसत्य’?

स्वधर्म
Mon, 10/11/2021 - 15:36 नवीन
डॉक्टर साहेब, एखाद्या गोष्टीला ‘अर्धसत्य’ म्हटल्यामुळे तिच्याबाबत संशय तयार होतो. यात निम्मे असत्य आहे का, दिशाभूल केलीय का, अशी शंका निर्माण होते. आता खालील गोष्टीत काय असत्य आहे, यातील काय विज्ञानाशी विसंगत आहे, ते कृपया सप्रमाण दाखवून द्यावे, ही विनंती. रासानिक खते - अत्यंत विद्राव्य असतात - त्यातील अंश जमिनीत झिरपतो - त्यामुळे भूजल प्रदूषित होते कारण सर्व मात्रा काही पीक शोषून घेऊ शकत नाही. जमिनीचे प्रदूषण अनेक मार्गांनी होत आहे आणि आपण मांडलेले ऊस, बेसुमार पाणी हे मुद्दे मला अमान्य नाहीत; पण इथे रासायनिक खतावरच चर्चा चालू होती. रासायनिक खते ही contributing factor च नाहीत, असे आपल्याला म्हणायचे आहे का? >> केवळ रासायनिक खताना दोष देऊन काम चालणार नाही. मी केवळ शब्द बापरलेलाच नाही. उलट रासायनिक खतांचे फायदे आहेतच असेच मी म्हटले होते. शेत ही एक अत्यंत गुंतागुंतीची परिसंस्था असून तिच्यात अनेक चल (varialbes) काम करत असतात. आपण जे करतो, त्याच्या परिणाम दिसायला वेळ लागतो. तिचे संतुलन हे एकच एका गोष्टीवर अवलंबून नसते. याची जाणिव आहे. रासायनिक खते ही मी वर सांगितल्याप्रमाणे परिणाम करतात की नाही इतकाच मुद्दा घ्या. हरितक्रांती हा जरा मोठा मुद्दा आहे आणि त्याविषयी मी काहीच टिप्पणी केली नव्हती. कोणतीही गोष्ट सर्वकाळ बरोबर आणि फक्त फायदाच देणारी नसते, पण आपल्या प्रतिसादाच्या शैलीमुळे वाचणार्यांना मूळ मुद्दाच चुकीचा आहे, दिशाभूल करणारा आहे, असे वाटू शकते म्हणून हा खुलासा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अर्धसत्यचा दुसरा भाग मी

सुबोध खरे
Mon, 10/11/2021 - 19:56 नवीन
अर्धसत्यचा दुसरा भाग मी लिहिलेलाच आहे कि अतिरिक्त पाणी लागणारी पिके (उदा ऊस) लावल्यामुळे बेसुमार पाण्याचा वापर होतो ज्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावत जाते आणि बोअर विहिरी अधिकाधिक खोल होत जातात ज्यामुळे खोल जमिनीतील अतिरिक्त क्षार पाण्यात उतरतात. लक्षात ठेवा-- सर्वात स्वच्छ आणि शुद्ध पाणी हे पावसाचे असते ज्यात सर्वात कमी क्षार असतात गंगेच्या खोऱ्यात पावसाळ्यात येणाऱ्या पुराबरोबर हिमालयातील गाळाची माती (आणि त्यातील खनिजे) सर्वत्र शेतात पसरते म्हणून गंगेच्या मैदानात जमीन अत्यंत सुपीक आहे. आणि पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावर चालणारी शेती यात क्षाराचे प्रमाण सर्वात कमी आहे. रासायनिक खते हि बेसुमार प्रमाणात वापरली तर त्याचा अंश पाण्यात उतरेल यात काय संशय? पण हा दोष रासायनिक खतांचा नसून वापरणाऱ्या शेतकऱ्यांचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

तरीही रासायनिक खते का वाईट?

स्वधर्म
Tue, 10/12/2021 - 12:24 नवीन
आपण ‘अर्धसत्या’मध्ये सत्यच आहे, हे स्पष्ट केले, त्याबद्दल धन्यवाद. रावसाहेब यांनी विचारलेला मूळ प्रश्न: रासायनिक खते वाईट का? हा होता. तसेच आपण म्हटले आहे: >> रासायनिक खते हि बेसुमार प्रमाणात वापरली तर त्याचा अंश पाण्यात उतरेल यात काय संशय? पण हा दोष रासायनिक खतांचा नसून वापरणाऱ्या शेतकऱ्यांचा आहे. मला वाटते की जैविक खतांच्या तुलनेत रासायनिक खते ही अत्यंत विद्राव्य असतात, त्यामुळे ती अगदी योग्य प्रमाणात वापरली तरी वर्षानुवर्षे वापरत राहिल्यामुळे दरवर्षी त्यांचा थोडा थोडा अंश हा भूजलात खाली जातच राहतो. परिणामी विहीरींचे पाणी आणि एकूण अनेक वर्षांनी का असेना, पण परिसंस्था प्रदूषित होतेच होते. हा धोका जैविक खतांमध्ये असल्याचे दिसत नाही. कारण ती तेवढी विद्राव्य नसतात आणि दीर्घ कालावधीत पण जास्तीत जास्त भाग पिकांना मिळतो व कमीत कमी भाग भूजलात जातो. गेली शतकानुशतके जैविक खते वापरात असूनही जमिनी शेतीयोग्य राहिल्या आहेत. रासायनिक खते वापरायला हरित क्रांतीनंतर फार अलिकडे सुरूवात झाली. त्यानंतर जो विदा मिळाला आहे त्यानुसार रासायनिक खतांमुळे लगेच नाही तरी काही वर्षांनी तरी जमिनीचे नुकसान हे होणारच असे म्हणायला जागा राहते. म्हणून रासायनिक खते वाईट आणि शक्यतो ती औषधाप्रमाणेच वापरावी असे वाटते. त्यामुळे तुमच्या प्रतिसादातील रासायनिक खते वापरत राहावीत, फक्त प्रमाणात. खतांमध्ये काहीही समस्या नसून सगळा दोष हा शेतकर्यांचा आहे, हा मुद्दा का मान्य करण्यासारखा का नाही हे स्पष्ट झाले असावे. बाकी जमिन प्रदूषणाची इतर कारणे, शेतकरी अन्नदाता नसून अन्न उत्पादक वगैरे गोष्टीबाबत आपले म्हणणे रास्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

डॉक्टर साहेबाना

Rajesh188
Mon, 10/11/2021 - 19:26 नवीन
डॉक्टर री भाषेत च सांगून बघतो काय नाहीत कदाचित त्यांना आमचा पॉइंट समजेल. डॉक्टर्स व्हिटॅमिन च्या गोळ्या घेण्याचे कधी सुचवतात.आणि कोणाला सुचवतात. ह्याचे जे उत्तर आहे तेच उत्तर रासायनिक खतांची गरज कितपत असते. ह्या प्रश्नाचं आहे. वनस्पती ना योग्य वाढ होण्यासाठी पोषक द्रव्यांची गरज असते काही त्या हवेतून मिळवतात,काही पाण्यातून मिळवतात तर काही जमिनीतून च मिळवतात. जमिनीत एकाधे पोषक द्रव्य कमी असेल तर वनस्पती वाढ योग्य रिती नी होत नाही.तेव्हा ते ओळखून तेच. कमी असणारे पोषक द्रव्य खता मधून दिले जाते. सर्रास रासायनिक खत विनाकारण दिल्या मुळे,जास्त प्रमाणात दिल्या मुळे त्याचे विपरीत परिणाम होतात. जसे विनाकारण व्हिटॅमिन च्या गोळ्या डॉक्टर नी खूप दिवस घेण्यास सांगितल्या तर रोगी देवाघरी लवकर जाईल तसाच प्रकार आहे हा. खत निर्माण करण्याची कला खूप जुनी आहे. खूप वर्षांपासून माणूस खत वापरत आहे. रासायनिक खत आता आली. दारू पिली की तात्पुरते कसे ताकत आल्या सारखे वाटते energy वाटते. तसाच प्रकार आहे. कंपोस्ट खत,शेन खत,पक्षांच्या विष्टेपासून मिळणारी खते, मलमुत्र अशा अनेक प्रकार च्या खतापासून पिकांस सर्व पोषक द्रव्य मिळतात. पिकांची रोग प्रतिकार करण्याची शक्ती वाढते.जमिनीत असणाऱ्या असंख्य bacteria, उपयोगी बुरशी, आणि अनेक सुष्म जीव ह्यांची नीट वाढ होते. रासायनिक खता ने हे सर्व होत नाही. कीटक नाशक सारखी वापरल्या मुळे पिकांची रोग प्रतिकार शक्ती कमी होते.जसे माणसाच्या शरीर बाबत घडत तसेच वनस्पती बाबत घडते. गवत किंवा माणूस पिकवत नसलेल्या अनेक वनस्पती जोमात वाढतात.पण माणूस ज्याची शेती करतो त्यांची वाढ jomat होत नाही.त्यांच्या वर च जास्त रोग पडतात. त्यांना खत वैगेरे द्यावी लागतात. का? ह्या वर विचार करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सर्रास रासायनिक खत विनाकारण

सुबोध खरे
Mon, 10/11/2021 - 20:06 नवीन
सर्रास रासायनिक खत विनाकारण दिल्या मुळे,जास्त प्रमाणात दिल्या मुळे त्याचे विपरीत परिणाम होतात. हा दोष रासायनिक खतांचा नसून शेतकऱ्यांचा आहे. पण कोणी शेतकऱ्यांना काही बोलायचे नाही कारण तो "बळीराजा" आहे आणि स्वतःला "अन्नदाता" म्हणवतो. SOIL HEALTH CARD किंवा मृदा आरोग्य आलेख काय आहे जमीन आणि पाणी चाचणी प्रयोगशाळा Soil & Water Testing Laboratoryकाय आहे हे एकदा वाचून पहा. आपल्या जमिनीत आणि पाण्यात कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे आणि कोणती अन्नद्रव्ये अतिरिक्त आहेत याचे विश्लेषण करून कोणत्या प्रकारचे पीक घ्यायचे आणि कोणत्या तर्हेची खते द्यायची याचा शास्त्रीय अभ्यास आहे. पण शेती तज्ज्ञांना शेतीत काय कळते? त्यांनी कधी हात काळे केले आहेत? असा सूर लावणारे बहुसंख्य शेतकरी सर्वत्र आढळतात ( अगदी मिपावर सुद्धा). बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

त्या साठी शेती खाते असते

Rajesh188
Mon, 10/11/2021 - 21:32 नवीन
माती चे परीक्षण करणे,लोकांस मार्ग दर्शन करणे ह्या साठी शेती खाते असते जुन्या सरकार नी काम उत्तम केले आहे आणि करत होते. शेती अधिकारी त्या साठी नेमला जायचं.आता शेती अधिकारी कुठे दिसत नाही. जेव्हा रासायनिक खत आली तेव्हा ती कशी द्यायचे ह्याचे मार्गदर्शन सरकार नी केले होते. काही खत ही झाडाच्या मुळाशी च चिमुटभर दिली जायची तीच पद्धत होती. हरित क्रांती च्या वेळी सरकार नी उत्तम यंत्रणा राबवल्या होत्या. खरे साहेबाना शेतकऱ्या विषयी प्रचंड तिरस्कार आहे असे त्यांच्या अनेक कॉमेंट मधून दिसून येतो. सर्वसामान्य व्यक्ती आहे हो शेतकरी त्याचा तिरस्कार करू नका.. पाण्या मुळे शेतजमिनीत क्षार वाढतात ती नापीक होते असे मला तरी वाटत नाही. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात किंवा नदी किनारी पावसाळी काळात तीन तीन महिने जमीन पाण्याखाली असते पण ती नापीक झालेली मी तरी अजुन पहिली नाही. लावणीचे भात किती शतके जमिनीत घेतले जाते . लावणीच्या भातच्या शेती मध्ये जमीन पाण्याखाली असते ती नापीक झालेली मी तरी बघितली नाही. उसाला जास्त पाणी लागते त्याची बचत करण्यासाठी ठीपक सिंचन वापरावे ही सूचना योग्य आहे लोक वापरू पण लागली आहेत. खतांचा योग्य वापर,कीटक नाशकांचा योग्य वापर ह्या विषयी सरकारी पातळीवर प्रचार करावा माहिती द्यावी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आपण डोकं वापरायचाच नाही आणि

सुबोध खरे
Tue, 10/12/2021 - 10:59 नवीन
आपण डोकं वापरायचाच नाही आणि बेफाट काही तरी बडबड करायची असा पणच घेतलाय का आपण? मी शेतकऱ्यांचा तिरस्कार करतो असे आपले पूर्वग्रहदूषित मत आहे त्याला माझा नाईलाज आहे. शेतकरी हा

अन्नदाता नसून तो अन्न उत्पादक

आहे असे मी अनेक वेळेस सप्रमाण लिहिलेले आहे.

( अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांबद्दल लिहिल्यास या न्यायाने शिंपी सुद्धा वस्त्रदाता असायला हवा आणि बिल्डर सुद्धा निवारा दाता )

पाण्या मुळे शेतजमिनीत क्षार वाढतात ती नापीक होते असे मी कुठेही लिहिलेले नाही उगाच नको ते आरोप करण्यापूर्वी किमान थोडा तरी विचार करत जा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

माती चे परीक्षण करणे,लोकांस

सुबोध खरे
Tue, 10/12/2021 - 11:02 नवीन
माती चे परीक्षण करणे,लोकांस मार्ग दर्शन करणे ह्या साठी शेती खाते असते जुन्या सरकार नी काम उत्तम केले आहे आणि करत होते. शेती अधिकारी त्या साठी नेमला जायचं.आता शेती अधिकारी कुठे दिसत नाही.

कोणताही धागा असेल तरी त्यात राजकारण आणून विचकाच करायचा विडाच उचलला आहे का आपण?

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

थोडक्यात आणि कमी शब्दात.

Rajesh188
Mon, 10/11/2021 - 10:13 नवीन
जमीन सजीव असते. जमिनीच्या एक घनफूट मातीत कोट्यवधी जीवाणू, बुरशी आणि बॅक्टेरिया असतात. त्यामुळेच जमीन सजीव आणि सुपीक बनते. रासायनिक खतांनी जमीन सुपीक बनत नाही तर सुपीक जमिनीतील अन्नद्रव्ये उचलायला मदत करतात. अशा प्रकारे जम‌िनीतून अधिकची अन्नद्रव्ये उचलली जातात तेव्हा जमीन निकस आणि निर्जीव बनत जाते. आजची शेतीची समस्याही निर्जीव किंवा मृत जमिनीने उद््भवलेली समस्या आहे. डिटेल मध्ये सांगायचे झाले तर खूप मोठी पोस्ट होईल.
  • Log in or register to post comments

मला अजूनही कळलं नाही.

रावसाहेब चिंगभूतकर
Mon, 10/11/2021 - 12:12 नवीन
मला अजूनही कळलं नाही. जमिनीतले NPK सततच्या वापराने नष्ट होतात म्हणून ते बाहेरून (उदाहरणार्थ युरिया) दिले जातात. रासायनिक खते जमिनीला सुपीक बनवतात आणि म्हणून तर पिके भरघोस येतात. "रासायनिक खतांनी जमीन सुपीक बनत नाही तर सुपीक जमिनीतील अन्नद्रव्ये उचलायला मदत करतात" म्हणजे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

हे बघा. राजेश यांचे म्हणणे

टीपीके
Mon, 10/11/2021 - 16:02 नवीन
हे बघा. राजेश यांचे म्हणणे हेच आहे का माहिती नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रावसाहेब चिंगभूतकर

दाळिंबाची वाईन

सुरिया
Mon, 10/11/2021 - 19:23 नवीन
दाळिंबाचे काही बायप्रॉडक्ट वाले मिळू शकतील का? अनारज्यूस वगैरे वाले. त्यांना दाळिंब कसे दिसते पेक्षा कसे लागते हे महत्त्वाचे असते. काही वर्षापूर्वी माझ्या नात्यातल्या एका मुलीने दाळिंबाची वाईन तिच्या कॉलेज प्रकल्पाअंतर्गत तयार केलेलि होती. पोमोग्रॅनेटा नावाने. त्याचे खूप कौतुक झालेले होते. एका यशस्वी व धनाढ्य दाळींब उत्पादकाने तो प्रोजेक्ट अभ्यासायला मागितला होता पण पुढे काही प्रगती झाली नाही त्याची. त्याची पैसे द्यायची तयारी नव्हती आणि मुलीला फुकट प्रोजेक्ट द्यायचा नव्हता. तसे कूणी उत्पादन करणारे आहेत का बघू शकता.
  • Log in or register to post comments

सुरियाजी,

स्वधर्म
Tue, 10/12/2021 - 12:50 नवीन
धन्यवाद. आता आंम्ही नाईलाजाने डाळिंबाची बाग काढली आहे. बरेच निर्णय चुकीचे झालेत पण ती शिकण्याची किंमत आहे. सध्या तरी खर्च निघून कुटुंबाला खायला विषमुक्त अन्न मिळावे इतकाच उद्देश आहे. सर्व अन्न नव्हे, तर मुख्य धान्ये, कडधान्ये व तेलबीया, इतकेच आळीपाळीने करायचा विचार आहे. शेती हा धंदा म्हणून फार अवघड गोष्ट आहे, हे समजलेले आहे. मात्र जे पूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहेत, त्यांची अवस्था बिकट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरिया

छोटेखानी लेख आवडला

टर्मीनेटर
Tue, 10/12/2021 - 13:06 नवीन
छोटेखानी लेख आवडला 👍 मी पण गेली तीन-चार वर्षे आवड म्हणून सैन्द्रीय पद्धतीने फळझाडे वाढवण्याचा प्रयत्न करत आहे पण १६ पैकी ४ नारळ (प्रताप), एक पेरू (लखनौ) आणि एक पपई (तैवान) सोडली तर आवळा, जांभूळ, बोर, जाम (लाल आणि सफेद), लिंबू आणि डाळिंब ह्यांची) वाढ फार काही समाधान कारक वाटत नाहीये. अर्थात हौस म्हणून वेळ मिळेल तसे तिकडे लक्ष देता येते. पण असमाधानकारक वाढ बघून आता त्यांना रासायनिक खत देण्याचे विचार डोक्यात यायला लागलेत, जे खरतर मला पटत नाहीये.
  • Log in or register to post comments

थोडे दिवस वाट बघा

Rajesh188
Tue, 10/12/2021 - 13:13 नवीन
आवळा आणि जांभूळ तर असेच चांगले फुलते आणि फळते पण .तुम्ही कोणत्या जाती निवडल्या आहेत त्याची एकदा समीक्षा करा. माझ्या दारात लिंबाचे झाड आहे खत ,कीटक नाशक ह्यांचा कधीच वापर केला नाही. मदत झाड जोमाने डुलत असते आणि वर्ष भर लिंब असतात. जांभळी ची मोठ मोठी झाड आमच्या गावात आहेत. बाह्य सपोर्ट ची त्यांना बिलकुल गरज नाही. चिंच खूप मोठमोठी झाड आहेत दर वर्षी फुलतात आणि फळतात पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

ठीक आहे. मार्च पर्यत वाट बघतो

टर्मीनेटर
Tue, 10/12/2021 - 13:51 नवीन
थोडे दिवस वाट बघा
ठीक आहे. मार्च पर्यत वाट बघतो, नाही काही प्रगती दिसली तर मात्र नाईलाजाने रासायनिक खाते वापरावी लागतील. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा