कृतघ्न -4

बाप्पू's picture
बाप्पू in जनातलं, मनातलं
10 Mar 2020 - 12:33 am

याआधीचे भाग
भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154
भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159
भाग 3: https://www.misalpav.com/node/46183

आता पुढे....

किसन्याने रामदास चा तो अवतार बघितला आणि त्याची घाबरगुंडी उडाली. जवळच्या विहिरीतून पाणी आणून तो रामदास च्या तोंडावर शिंपडू लागला. रामदास ला थोडीशी शुद्ध आली, पण बोलण्यासाठी कंठ फुटेना. घशातून फक्त पाय पाय असा पुसटसा आवाज येत होता. त्याच्या पायातील त्राण गेले होते. उभा राहण्याचा प्रयत्न केला तरी झोकांड्या खाऊ लागला होता.
किसन्याने दोन तीन माणसे बोलावली, सर्वांनी उचलून रामदास ला उचलून तुकाराम च्या घरी आणले, आणि त्याने घडलेला प्रकार सांगितला. तुकाराम ने रामदास कडे पाहिले, त्याला आता बऱ्यापैकी शुद्ध आली होती. रामदास बोलू लागला "आता मपल्याला बर वाटतंय पण पायाला रग लागल्यागत झालंय, हलवता बी येयना. कंबरच्या खाली जड जड वाटाय लागलंय."
तुकाराम ने रामदास च्या पायाला हात लावून पाय थोडा वर उचलला आणि सोडला तर धपकन तो खाली पडला. तुकाराम विचारात पडला, नेमकं काय झालं असेल?
आज शेतात खूप काम केल्यामुळे पाय दमले असतील.. आजच्या दिवस आराम केला कि बरे वाटेल असे सांगून रामदास ला त्याने झोपायला सांगितले.
रामदास देखील असाच विचार करून झोपी गेला, उद्या पर्यंत सगळं ठीक होईल या आशेवर..
दुसरा दिवस उजाडला. तुकाराम आज लवकरच उठला कारण आज शेतात बरेच काम होते. रामदास ला आता बरं वाटत असेल असा विचार करून तो त्याच्या खोलीच्या दिशेने निघाला. रामदास अजुन झोपलेलाच होता. तुकाराम ने रामदास ला उठवले. रामदासला जाग आली. त्याने हातपाय हलवण्याचा प्रयत्न केला पण त्याचे पाय आज कालच्या पेक्षा जड वाटत होते. काल थोडेफार तर हलवता येत होते पण आज तर शरीरात पाय आहेत कि नाही हे पण समजत नव्हते. कमरेच्या खाली सर्व काही निष्प्राण झाले होते. आणि हात?? आज हात जड झाले होते. हातातील सर्व ताकद कोणीतरी जादूटोणा करून काढून घ्यावी त्याप्रमाणे गायब झाली होती. फार प्रयत्न केल्यानंतर हाताची बोटे थोडेफार हालत होती. रामदास ला काही सुचेना. नेमके काय होतय हेच समजत नव्हते. कालपर्यंत शेतात दणादण काम करणाऱ्या रामदास ला आज एका क्षणात अपंग झाल्यासारखे वाटले. कालपर्यंत शेतात दगड धोंडे तुडवणारे पाय असून नसल्यासारखे झाले होते. 50-50 किलोची पोती लिलया उचलणारे हाथ कोणीतरी दोर्यांनी बांधून टाकावे असे बंदिस्त झाले होते.
तुकाराम ने आजपर्यंत असा कोणताही प्रकार पाहिला नव्हता. त्याने लागोलाग माणसे बोलावली आणि रामदास ला गावच्या दवाखान्यात हलवले. गावातील डॉक्टर ने रामदास ला तपासले पण लक्षणे बघून त्याला कोणतेच निदान होईना. रामदास ला लगेच तालुक्याच्या दवाखान्यात हलवण्याचा सल्ला त्याने दिला.
तालुक्याच्या दवाखान्यात रामदास ची सर्व तपासणी केली, पण तेथील डॉक्टर देखील बुचकळ्यात पडले कि हा नेमका काय प्रकार आहे. XRay, CT scan, सर्व तपासण्या केल्या तरी निदान होईना.
डॉक्टरांनी तुकाराम ला बोलावले, आणि एकंदर परिस्थिती सांगितली. जितक्या तपासण्या केल्या तितक्या तापसण्यातून काहीच बाहेर येत नव्हते. रामदासला शहरातील हॉस्पिटल मध्ये हलवण्याचा सल्ला देऊन शहरातील दवाखान्याची चिट्ठी आणि काही तात्पुरते प्रिस्क्रिप्शन तुकाराम च्या हातावर टेकवले. सोबत हॉस्पिटल चे बिल देखील होते.
बिलावरील आकडा काही हजाराच्या घरात होता.

तुकाराम रामदास जवळ आला. रामदास ची अवस्था आता पहिल्यापेक्षाहि खराब झाली होती. हात आणि पाय दोन्हीच्या सर्व संवेदना गायब झाल्या होत्या. मानेपासून खाली कोणत्याही भागाला केला जाणारा स्पर्श रामदास ला जाणवत सुद्धा नव्हता. स्वतः हुन एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होने देखील त्याला जमत नव्हते. फक्त मान आणि डोके हे दोनच अवयव त्याला जाणवत होते. मानेच्या खाली देखील आपले शरीर आहे हे त्याला कळतच नव्हते.
आपल्याला नेमके काय झालेय हे जाणून घेण्यासाठी रामदासने तुकाराम कडे पाहिले, तुकाराम गोंधळला. काय सांगावे आता रामदासला?? इथे तो स्वतः च सगळा प्रकार पाहून गांगरून गेला होता. अचानक आलेल्या या परिस्तिथीला कसे तोंड द्यावे हे समजेना.
रामदास ना त्याच्या नात्यातला ना गोत्यातला, याला घेऊन आता दवाखाण्याच्या चकरा कोण मारणार? अजुन किती दिवस हा असाच राहणार? हा असाच राहिला तर याचं हागण मुतणं कोण काढणार?? याला ठेवायचं कुठं?? याच्या दवाखान्याचा खर्च कोण करणार?? हा जगणार कि मरणार? असे एक ना अनेक प्रश्न त्याला भेडसावत होते.

तुकाराम दवाखान्यातून बाहेर आला सोबत किसन्या आणि अजुन दोघ जण होते. रामदास च पुढे काय करायचं या विचारात च सगळे चहा च्या टपरीपाशी आले. चहा चा घोट घेता घेता तुकाराम ने जोडीदाराला प्रश्न विचारला, कि ह्याला ससून ला नेलं तर?
दोघा जोडीदारापैकी एक उत्तरला "आर तिकडं बी काय कमी पैका नाय लागत आणि तिथं त्याच्याजवळ कुणी थांबायचं?? "
तुकारामने थोडासा विचार केला आणि म्हणाला, याला आपण बेवारस म्हणून दवाखान्यात नेऊ, तिथे दिवसभर थांबू एकदा का आडमिट केला कि मग आपण तिथून सटकू.. तिथली लोक पुढं बघतील ह्येच काय करायचं ते.
जगला वाचला तर यील परत, नाहीतर तिकडंच खपलं. आपल्याला काय करायचे.

किसन्या आणि सोबतचे दोघे अवाक झाले. तुकाराम असा काही बोलेल असे दोघांनाही वाटले नव्हते. 30 वर्षा पेक्षा जास्त दिवस रामदास त्या घराचा सदस्य होता. आणि त्याला काही दिवस दवाखान्यात ठेवण्याइतपत देखील माणुसकी तुकाराम कडे शिल्लक नव्हती. किंबहुना त्याला नेमका आजार तरी काय झालाय हे देखील जाणून घ्यायचे नव्हते.

किसन्या अवाक होऊन तुकाराम कडे पाहत होता. किसन्या आणि रामदास हे दोघेही खूप वर्षांपासून एकेमेकांना ओळखत होते. रामदास बद्दल प्रत्येक गोष्ट त्याला माहिती होती. दोघेही एकत्रच गुत्त्यावर दारू प्यायचे, एकमेकांना आपली सुख दुःख सांगायचे. स्वतः आता या वयात माऊली च्या बाजूने जाण्यापेक्षा जे आहे तसे जगण्यात रामदासने धन्यता मानलेली होती. माऊलीच्या बाजूनं जाऊन तुकाराम ची नाराजी कशाला ओढवून घ्यायची? माऊली महिन्यातून 2-3 दाच गावी येतात बाकी टाइम शहरातच.. पण आपल्याला तर कायमच गावात राहावे लागणार होते, मग पाण्यात राहून माशाशी वैर कश्याला??
काय बरोबर आणि काय चूक यापेक्षा मला काही त्रास न होता कसे जगता येईल या विचाराने त्याने तुकाराम च्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला होता.
किसन्याला रामदास चा हा निर्णय पटला नव्हता. कदाचित त्याच वागण्याची शिक्षा तर त्याला भेटली नव्हती??

" काय रे..?? काय करायचं पुढं?? न्यायचं का उद्या सकाळी पुण्याला.?? "
तुकाराम च्या आवाजाने किसन्या भानावर आला.
"बगा तुम्हांला जमलं तस करा.. टाका ससून ला निहुन.!! बगु तिथंलं डागतर काय म्हणत्यात !"

किसन्या गुराला पाणी पाजण्याच्या बहाण्याने तिथून गावाकडे जायला निघाला. बाकीचे सगळे दवाखान्यात परत आले.

रामदास ला बेवारस म्हणून ससून ला टाकला तर तो काय वाचणार नाही हे किसन्याला माहिती होते. तिकडे त्याला औषधंउपचार मिळतील कि नाही हे सुद्धा नक्की नव्हते.
त्याला नेमकं काय झालं असेल??
विचार करता करता त्याला माऊलीची आठवण झाली. माऊली गावी नव्हता, त्यामुळे झालेला प्रकार त्याला माहिती नव्हता. रामदास आज माऊलीकडे असता तर त्याला असा कोणी वाऱ्यावर सोडला नसता. किसन्या टेलिफोन बूथ कडे वळला. माउलीला फोन करून झालेला प्रकार कळवायचे म्हणून फोन हातात घेतला, पण आता माऊली मदत करेल?? त्याचा आणि रामदास चा आता काहीही संबंध नव्हता. रामदासाने स्वतः च्या हाताने सर्व संपवले होते. आणि इतके सगळे होऊन माऊली रामदास ची आता मदत का म्हणून करेल?? माऊलीचा नंबर फिरवण्या च्या आधी किसन्याच्या डोक्यात शंभर प्रश्न आले....
जाऊदे काय होईल ते बघू या विचाराने त्याने माऊलीचा फोन फिरवला आणि झालेला प्रकार सांगितला.

माउलीने सर्व ऐकून घेतले. आजपर्यंत माउलीने अशी बरीच आजारपणे पहिली होती, आई वडिलांचे आजारपण, तुकाराम चे आजारपण, स्वतः च्या आणि भावाच्या मुलांचे आजारपण अश्या अनेक वेळा दवाखान्याचे उंबरठे त्याने झिझवले होते. किसन्याचे बोलणे ऐकून घेऊन माउलीने फोन ठेवला आणि तो विचारात पडला.. नेमके काय झाले असेल रामदास ला?????

क्रमश :

कथासमाजजीवनमानप्रकटनविचारलेखमाहितीआरोग्य

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Mar 2020 - 11:26 am | ज्ञानोबाचे पैजार

एकदम मस्त चालली आहे गोष्ट,
एकदम उत्कंठावर्धक,
पुढचा भाग लवकर टाका
पैजारबुवा,

कुमार१'s picture

10 Mar 2020 - 8:28 pm | कुमार१

छान चालली आहे गोष्ट.
पु भा प्र

प्रतिसादाबद्दल धन्यवाद डॉ.

पुढच्या भागात मला तुमची मदत लागेल. पुढील भाग हा वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असल्याने जर काही मिस झाले किंवा चुकीचे आले तर कृपया कंमेंटस मध्ये लिहायला विसरू नका.

योगी९००'s picture

11 Mar 2020 - 9:22 am | योगी९००

हा ही भाग मस्त...

आता त्या माऊलीने त्या रामदासाला बरे केले व नंतर रामदासने परत माऊलीला दगा दिला असा काहीतरी शेवट करू नका. त्या बिचार्‍या माऊलीला पण चांगले दिवस दिसू देत.

बाप्पू's picture

11 Mar 2020 - 2:37 pm | बाप्पू

प्रतिसादाबद्दल धन्यवाद..
सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील भागात मिळतीलच.. !!

शित्रेउमेश's picture

13 Mar 2020 - 8:52 am | शित्रेउमेश

खूप मस्त... पुढे काय होइल ?? एकदम उत्कंठावर्धक..
पुढचा भाग येवुदे लवकर...