वैद्यकातील नोबेल-विजेते संशोधन : समारोप

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
24 Dec 2018 - 9:52 am

नमस्कार,

दि. ४/१०/२०१८ रोजी सुरु केलेली ही लेखमाला आज समाप्त करीत आहे.

pict

Alfred Nobel (१८३३- १८९६) हे कुशल अभियंता आणि संशोधक होते. त्यांची जन्मभूमी स्वीडन तर कर्मभूमी नॉर्वे होती. ते धनाढ्य होते. त्यांनी आपल्या मृत्युपत्राद्वारे मोठी संपत्ती मागे ठेवली. तिचा विनियोग ६ क्षेत्रातील मूलभूत संशोधन अथवा कल्याणकारी काम करणाऱ्या व्यक्तीस (अथवा संस्थेस) पारितोषिक देण्यासाठी केला जातो. ती क्षेत्रे अशी:
१. भौतिकशास्त्र
२. रसायनशास्त्र
३. वैद्यकशास्त्र
४. साहित्य
५. शांतता
६. अर्थशास्त्र ( हे मुळात नव्हते, नंतर स्वीडिश बँकेने चालू केले)

१९०१ पासून ही दरवर्षी जागतिक स्तरावर दिली जातात. वैयक्तिक पारितोषिक जर विभागून दिले गेले तर त्यासाठी ३ व्यक्तींची मर्यादा आहे. एखादे वर्षी जर जागतिक स्तरावरचे कोणतेच संशोधन मूलभूत स्वरूपाचे वाटले नाही तर पुरस्कार दिला जात नाही.

‘नोबेल’ हा जागतिक पातळीवरील मानाचा पुरस्कार समजला जातो. सप्टेंबर २०१८मध्ये यंदाचे पुरस्कार जाहीर होण्यास सुरवात झाली. तेव्हा मनात एकदम एक विचार चमकून गेला. तो म्हणजे वैद्यकशाखेतील आजपर्यंतच्या महत्वाच्या पुरस्कारांबद्दल सामान्यांसाठी काही लिहावे. त्यातून ही लेखमाला जन्मली. हे पुरस्कार गेली ११८ वर्षे दिले जात आहेत. त्यापैकी सुमारे २० संशोधने ही ‘अभूतपूर्व’ आणि ‘क्रांतिकारी’ स्वरूपाची म्हणता येतील. त्यापैकी काही मोजकी या लेखमालेसाठी निवडली. ही निवडताना वाचकाला रंजक वाटतील असे १२ विषय घेतले. संशोधक व मूलभूत संशोधनाची थोडक्यात माहिती आणि त्याचा समाजाला झालेला उपयोग अशा दृष्टीकोनातून हे लेखन केले. येथील सुजाण वाचकांनी प्रतिसादांतून काही शंका विचारल्या. त्यातून त्यांचे आरोग्यविषयक कुतूहल आणि जागरूकता दिसून आली.

१२ विषयांपैकी ‘रक्तगटांचा शोध’ हा सर्वाधिक लोकप्रिय विषय ठरला आणि ते अपेक्षित होते. सुशिक्षित वर्गाला या विषयाबद्दल विशेष ममत्व असते. हल्ली बऱ्याच संस्थांमध्ये आपली वैयक्तिक माहिती साठविताना आपल्या रक्तगटाची नोंद आवर्जून केली जाते. आपल्यातले अनेक जण स्वयंसेवी रक्तदान नियमित करतात. अशा सर्व दृष्टीने हा विषय महत्वाचा ठरतो. त्यामुळे या मालेच्या चौथ्या भागातील ही चर्चा खूप रंगतदार झाली. त्याखालोखाल ९व्या भागातील ‘एड्स’ वरील चर्चाही अर्थपूर्ण झाली. तसेच लेखमालेत वेळोवेळी काही वाचकांनी आणि येथील अन्य डॉक्टरांनी प्रतिसादांतून पूरक माहितीची भर घातल्याने मलाही फायदा झाला.

या समारोपानिमित्ताने वैद्यकशाखेत आजपर्यंत दिल्या गेलेल्या पुरस्कारांबद्दल काही रोचक माहिती नोंदवत आहे:

१. एकूण ११८ वर्षे (१९०१- २०१८) हे पुरस्कार दिले गेले आहेत. त्यापैकी ९ वर्षी ते देण्यात आले नाहीत.
२. पुरस्कार न दिलेला कालावधी साधारण दोन्ही जागतिक महायुद्धा दरम्यानचा आहे.

३. १०९ पुरस्कारांसाठी एकूण २१६ संशोधकांची निवड झाली; त्यापैकी १२ महिला आहेत. ३९ जणांना हा पुरस्कार एकट्यासाठीच (न विभागता) मिळाला.
४. एकूण पुरस्कारांमध्ये क्रमवारीने पहिले तीन देश (पुरस्कार संख्येसह) असे आहेत:
अमेरिका ९३
यु. के. २९
जर्मनी १६

५. वैद्यकातील विजेत्यांमध्ये एकही भारतीय नागरिक नाही. मात्र जन्माने भारतीय असलेले हरगोबिंद खोराना हे एकमेव संशोधक आहेत. त्यांना १९६८चे नोबेल अन्य दोघांबरोबर विभागून मिळाले. पुरस्कार मिळताना खोराना अमेरिकेचे नागरिक होते. त्यांच्या संशोधनाचा विषय “जनुकीय सांकेतिक लिपी आणि प्रथिन निर्मितीचा अभ्यास” हा होता.

६. एकापेक्षा अधिक वेळेस पुरस्कार कोणालाही मिळालेले नाहीत (नोबेलसाठीच्या अन्य शाखांत अशी मोजकी उदा. आहेत).
७. १९२३चे विजेते Frederick G. Banting हे आजपर्यंतचे सर्वात तरुण (वय ३२) संशोधक होते. त्यांचा पुरस्कार इन्सुलिनच्या शोधाचा आहे.

८. १९४७ व २०१४चे पुरस्कार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ते नवरा-बायको अशा जोड्यांना विभागून मिळाले आहेत.
• १९४७: Cori दाम्पत्य (ग्लायकोजेनचा अभ्यास)
• २०१४: Moser दाम्पत्य (विशिष्ट मेंदूपेशींचा अभ्यास)

९. १९३९चे विजेते G. Domagk यांना सत्ताधीश हिटलरच्या हुकुमाने तो पुरस्कार नाकारावा लागला.

. . .
वैद्यकाच्या अनेकविध शाखांमध्ये मूलभूत शोध लावून या सर्व संशोधकांनी मानवजातीवर अनंत उपकार केले आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळालेले आहे. आजपर्यंतच्या सर्व विजेत्यांना विनम्र अभिवादन.

या लेखमालेतील भागवार विषय सूची आता पहिल्या भागाच्या प्रतिसादात समाविष्ट करीत आहे. त्याचा नवीन वाचकांस उपयोग होईल.
येथील सर्व वाचक, प्रतिसादक, संपादक आणि प्रशासकांचे मनापासून आभार !
************************************************
(समाप्त)

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

24 Dec 2018 - 10:12 am | कुमार१

मा. सा. सं. यांना विनंती.

वन's picture

24 Dec 2018 - 11:50 am | वन

संपूच नये असे वाटत होते. रंगतदार झाली हे नक्की. आपण आम्हाला सोप्या भाषेत बरीच उपयुक्त माहिती दिलीत. आज एखादी तपासणी किंवा औषधोपचार आपल्याला अगदी सहज उपलब्ध असतात. पण ते शोधण्यामागे वैज्ञानिकांना किती कष्ट पडतात याची जाणीव यातून झाली. त्यांचा नोबेलने गौरव होणे यथोचित आहे.

अनेक धन्यवाद, डॉक्टर कुमार.
पु ले शु.

अनिंद्य's picture

24 Dec 2018 - 12:09 pm | अनिंद्य

@ कुमार१,

वेगळ्या विषयावरची लेखमाला उत्तम झाली.
पु ले शु

जाता जाता :- संशोधकांना नोबेल पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा 'सुयोग्य सन्मान कसा करावा' याचा वस्तुपाठ असतो.

कुमार१'s picture

24 Dec 2018 - 4:41 pm | कुमार१

वन, अनिंद्य,
प्रतिसाद व प्रोत्साहनाबद्दल आभार!

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Dec 2018 - 6:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

फारच माहितीपूर्ण व रंगतदार लेखमालिका ! जराशी लवकरच संपवली असे वाटले.

असो. लवकरच अजून काही रोचक विषय निवडा, प्रतिक्षा आहे.

कुमार१'s picture

24 Dec 2018 - 7:09 pm | कुमार१

डॉ सुहास. या प्रकारचे लेखन हा एक प्रकारे 'अभ्यास'असतो. म्हणून १० भागांच्या वर नको असे म्हणतो. त्यावर लिहीत बसल्यास सामान्य वाचकास कंटाळा येईल असे वाटले.

नियमित प्रोत्साहनाबद्दल आभार !

सुधीर कांदळकर's picture

24 Dec 2018 - 7:46 pm | सुधीर कांदळकर

समारोप.

खोरानांनी नक्की काय संशोधन केले ते आत्ता थोडेफार कळले. सोप्या भाषेतील आणखी एका लेखाबद्दल धन्यवाद.

एका अप्रतिम मालिकेबद्दल अनेक अनेक धन्यवाद.

हरवलेला's picture

24 Dec 2018 - 9:47 pm | हरवलेला

सुंदर मालिका. सोप्या भाषेत संशोधकांची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

कुमार१'s picture

25 Dec 2018 - 10:03 am | कुमार१

सुधीर व हरवलेला,
प्रतिसाद, प्रोत्साहन व वेळोवेळी दिलेल्या पूरक माहितीबद्दल आभार.

तुषार काळभोर's picture

25 Dec 2018 - 10:31 am | तुषार काळभोर

ही लेखमाला मिपाच्या हॉल ऑफ फेममध्ये नक्की असेल.

बाकी वैद्यकीय तसेच इतर वैज्ञानिक संशोधनही इतके प्रगत झालंय, की इथून पुढे स्वतंत्र व्यक्तींपेक्षा संस्थांना (उदा CERN) नोबेल मिळण्याची शक्यता जास्त असेल.

कुमार१'s picture

25 Dec 2018 - 11:26 am | कुमार१

तुम्ही दाखवलेल्या आपुलकीबद्दल आभारी आहे.
तुमच्यासारख्या सुजाण वाचकांच्या प्रोत्साहनामुळेच हे लेखन करू शकलो.
...संस्था या मुद्द्याशी सहमत.

वन's picture

25 Dec 2018 - 12:47 pm | वन

इथून पुढे स्वतंत्र व्यक्तींपेक्षा संस्थांना (उदा CERN) नोबेल मिळण्याची शक्यता जास्त असेल.
>>> +१

नोबेलच्या इतिहासात अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवले आहेत. काही वेळेस एखादा चमू मिळून संशोधन करतो पण पुरस्कार मात्र एकालाच मिळतो. तेव्हा अन्य जण नाराज होतात. त्यांच्यापैकी काही जण उघड विरोध करतात. त्यामुळे पुरस्कार संस्थेला देणे उचित ठरावे.

चौकटराजा's picture

25 Dec 2018 - 2:07 pm | चौकटराजा

ही मालिका आवश्यक असा साठी होती की आपण सर्व (अगदी आपल्याला तपासणारे डॉ धरून) शरीर धारण करतो . सबब आपल्याला ११ वीत शिकलो त्यापेक्षा काहीशी अधिक फिजिओलॉजी व पॅथॉलॉजी, जनुक शास्त्र माहित असणे जरूर आहे ! त्यायोगे वेळेवर अज्ञानातील आनंदाचा त्याग करून निरामय जगता येईल . त्यासाठी धन्यवाद !

कुमार१'s picture

25 Dec 2018 - 5:27 pm | कुमार१

@ वन, सहमत आहे.
'इन्सुलिन'च्या नोबेलचा किस्सा असाच आहे. ते कोणाला व किती जणांना विभ्गून द्यावे ही समिती पुढची डोकेदुखी होती.
बऱ्याच काथ्याकूटानंतर हे पारितोषिक Frederick Banting आणि JJR Macleod यांना विभागून जाहीर झाले. त्यामध्ये Best चा समावेश न झाल्याने Banting खूप नाराज झाले. पण त्यांनी आपल्या वाट्याच्या बक्षिसाची निम्मी रकम Best ना दिली. तसेच Macleod नी सुद्धा आपली निम्मी रकम Collip ना दिली.

@ चौरा, तुम्ही वेळोवेळी लिहिलेल्या पूरक माहितीमुळेही चर्चेत रंगत आली, धन्यवाद !

सगळ्या भागांना प्रतिक्रिया देणे शक्य झाले नाही, पण सगळे भाग वाचले आणि मस्त झाले आहेत.

कुमार१'s picture

26 Dec 2018 - 8:42 pm | कुमार१

हरकत नाही. तुम्ही वाचले याचा आनंद आहे.
शुभेच्छा !

टर्मीनेटर's picture

27 Dec 2018 - 9:12 am | टर्मीनेटर

मस्त झाली मालिका, बरीच नवीन माहिती मिळाली.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

कुमार१'s picture

11 Oct 2019 - 10:23 am | कुमार१

२०१९ चे वैद्यकातील ‘नोबेल’ Sir P. J. Ratcliffe, G. Semenza, आणि W. G. Kaelin या त्रयीला जाहीर झालेले आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय शरीरातील पेशी आणि ऑक्सिजनचा पुरवठा यासंदर्भात आहे.

सामान्य माणसाच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट म्हणजे या संशोधनाचा भविष्यात उपयोग काय होईल, ही असते. या संशोधनाचे संभाव्य उपयोगे असे आहेत:

१. लाल पेशींचा सखोल अभ्यास होऊन रक्तन्यूनता असलेल्या रुग्णांना प्रगत उपचार शोधले जातील. विशेषतः हे दीर्घकालीन मूत्रपिंड विकाराने बाधित रुग्णांना लागू आहे. या रुग्णांत Erythropoietin हे हॉर्मोन स्त्रवणे खूप कमी होते आणि त्यामुळे रुग्णास रक्तन्यूनता होते. ते हॉर्मोन वाढविणारे औषध आता शोधता येईल.

२. कर्करोगातील उपयोग: या पेशी प्रचंड वेगाने विभाजित होतात आणि त्यामुळे त्यांना ऑक्सिजन कमी पडतो. त्यामुळे काही जनुके उद्दीपित होतात आणि परिणामी या पेशींचा फैलाव शरीरभर होतो. सध्याच्या केमोथेरपीने फक्त पुरेशा ऑक्सिजनयुक्त पेशीच मारल्या जातात. मग या जगलेल्या ऑक्सिजनन्यून पेशी पुढे फोफावतात. त्यातून आजार गंभीर होतो आणि रुग्णास मारक ठरतो. आता याही पेशींना मारणारी औषधे विकसित होतील.

३. करोनरी हृदयविकार आणि पायांच्या रक्तवाहिन्यांचे विकार : हे दोन्ही आजार मधुमेही रुग्णांत बऱ्यापैकी होतात. त्यांत मुळात शरीराच्या एखाद्या भागाचा रक्तपुरवठा खंडित होतो आणि त्यामुळे तिथे ऑक्सिजनची कमतरता होते. त्यातून तिथल्या पेशी मरतात. नव्या संशोधनातून तिथला रक्तपुरवठा वाढविणारी नवी औषधे उदयास येतील.

४. अन्य हृदयविकार आणि काही फुफुसरोगांतही ऑक्सिजन-बिघाड असतो. त्या अनुषंगाने इथेही उपयोग होईल.

कट्टा जमवाच.

कुमार१'s picture

11 Oct 2019 - 11:14 am | कुमार१

अहो मग परवाच्या पुणे कट्ट्याला का नाही आलात !

जॉनविक्क's picture

11 Oct 2019 - 11:36 am | जॉनविक्क

अन तुम्ही याल ही खात्री न्हवती, त्यामुळे मिस झालं, अजूनही पश्चाताप होतोय त्याचा :(

सुधीर कांदळकर's picture

11 Oct 2019 - 11:27 am | सुधीर कांदळकर

बक्षिसाची बातमी चित्रवाणीवर पाहिली तेव्हाच ठरवले होते की तुमच्याकडून याच्या मला थोडेफार कळतील एवढ्या तपशिलांची माहिती घ्यावी. आता आपणहूनच दिलीत. अनेक, अनेक धन्यवाद.

कुमार१'s picture

5 Oct 2020 - 4:44 pm | कुमार१

यंदाच्या नोबेल पुरस्कार घोषणांच्या क्रमांत वैद्यकीयला प्रथम स्थान मिळाले आहे याचा आनंद होतो. आताच काही वेळापूर्वी हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला.

२०२० : वैद्यकीय नोबेल विजेते.

Harvey J. Alter,
Michael Houghton आणि
Charles M. Rice

विषय : हिपटायटीस- सी विषाणूचा शोध.

या शोधापूर्वी हिपटायटीसचे ए व बी हे विषाणू माहित होते. परंतु, रक्ताद्वारे पसरणाऱ्या अन्य यकृतदाहाचे निदान होत नसायचे. त्यांच्या या शोधामुळे या विषाणूच्या जातीचा शोध लागला आणि त्यावरील उपचारांना गती मिळाली.

हार्दिक अभिनंदन !

कुमार१'s picture

4 Oct 2021 - 4:19 pm | कुमार१

2021 चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.
ते अमेरिकेच्या David J व Ardem P या दोघांना विभागून मिळाले आहे.

संशोधनाचा विषय:
स्पर्श आणि तापमानामुळे त्वचेतून मेंदूकडे जाणारे संदेश कसे निर्माण होतात याचा सखोल अभ्यास. रोचक भाग म्हणजे या संशोधनासाठी मिरचीतील एका तीव्र सायनाचा वापर करण्यात आला.

उपयोग:
शरीराच्या विविध आजारांमध्ये जी वेदना जाणवते त्यासंबंधी अधिक अभ्यास करून नवे उपचार शोधता येतील.

कुमार१'s picture

4 Oct 2021 - 4:20 pm | कुमार१

सायनाचा ऐवजी
रसायनाचा असे वाचावे

कुमार१'s picture

30 May 2022 - 9:50 am | कुमार१


नोबेल विजेत्या महिला

ले : आशाराणी व्होरा
अनुवाद : डॉ. विजया देशपांडे

साकेत प्रकाशन

कुमार१'s picture

3 Oct 2022 - 5:45 pm | कुमार१

२०२२चे वैद्यकीय नोबेल Svante Pääbo या स्वीडिश वैज्ञानिकांना उत्क्रांती संदर्भातील संशोधनाबद्दल मिळालेले आहे.

त्यांनी Neanderthals या मानवी पूर्वजांच्या जनुकांचा सखोल अभ्यास केलेला आहे. उत्क्रांती दरम्यान झालेले जनुकीय बदल आणि आजच्या मानवाची संसर्गरोगांच्या विरुद्धची प्रतिकारशक्ती यांचा संबंध यांच्या संशोधनामुळे जोडता येईल.

अभिनंदन !

कुमार१'s picture

3 Oct 2022 - 5:52 pm | कुमार१

सहा वर्षांच्या खंडानंतर वैद्यकीय नोबेल केवळ एका व्यक्तीला मिळालेले आहे.
मधली लागोपाठ सहा वर्षे ते विभागून मिळत होते

Bhakti's picture

3 Oct 2022 - 10:03 pm | Bhakti

+१ अभिनंदन

कुमार१'s picture

2 Oct 2023 - 5:28 pm | कुमार१

* Katalin Karikó ( हंगेरी ) and Drew Weissman (अमेरिका) या वैज्ञानिकांना जाहीर.

* त्यांनी पेशींमधील आरएनए संदर्भातील मूलभूत संशोधन केल्यामुळे एम-आरएनए प्रकारच्या लशीची निर्मिती शक्य झाली.

* या प्रकारची लस कोविड-19 प्रतिबंधासाठी गेली दोन वर्षे वापरली जात आहे.