वैद्यकातील प्रभावी नोबेल-विजेते संशोधन : भाग २

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
8 Oct 2018 - 7:11 am

(१९०१ व १९०४ चे पुरस्कार)
१.

या लेखनाची सुरवात आपल्याला अर्थातच १९०१च्या सलामीच्या पुरस्काराने करायची आहे.

विजेता संशोधक : Emil A v Behring
देश : जर्मनी

संशोधकाचा पेशा : सूक्ष्मजीवशास्त्र
संशोधन विषय : घटसर्प (Diphtheria) या रोगावर प्रतिविषाचे उपचार (serum therapy).

आता आपण घटसर्प हा आजार समजावून घेऊ.
हा एका जिवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. वैद्यकात त्याची नोंद इ.स. पूर्व ५ व्या शतकापासून आढळते. याचा जिवाणू शरीरात एक जहाल विष (toxin) सोडतो. आजाराची सुरवात घसा किंवा त्वचेच्या दाहाने होते. पुढे तो गंभीर स्वरूप धारण करतो ज्यामुळे रुग्णाचा श्वास गुदमरतो किंवा हृदयास गंभीर इजा पोहोचते. त्यामुळे तो प्राणघातक ठरू शकतो. पूर्वी याच्या साथीही येत असत. त्याकाळी हा मुख्यतः मुलांचा आजार होता.
pict

यावर उपचार म्हणून त्या जिवाणूचे विष नष्ट करणारे प्रतिविष (antitoxin) तयार करण्यासाठी Behring आणि अन्य अनेकजण रात्रंदिन झटत होते. १८९०मध्ये Behringने प्राण्यांच्या रक्तापासून असे प्रतिविष तयार केले. त्यावर पुढे अधिक संशोधन होऊन १९१३मध्ये पहिले अधिकृत प्रतिविष उपलब्ध झाले. जिवाणूजन्य आजारांच्या प्रभावी उपचाराची ही नांदी होती. अशा पथदर्शक बहुमोल संशोधनाबद्दल Behringना वैद्यकातील पहिलेवहिले ‘नोबेल’ बहाल करण्यात आले.

Behring यांचा जन्म तत्कालीन प्रशियात झाला. त्यांनी वैद्यकाचे शिक्षण बर्लिनमध्ये घेतले. या अमूल्य संशोधनाबद्दल त्यांना ‘मुलांचा रक्षणकर्ता’ असे गौरवण्यात आले. १९०४ मध्ये त्यांनी प्रतिविष आणि लस तयार करणाऱ्या औषधउद्योगाची स्थापना केली. आज त्यांचे मानाचे नोबेल पदक जिनेव्हातील संग्रहालयात ठेवलेले आहे.

या आजाराचे गंभीर स्वरूप बघता त्याच्या उपचारापेक्षा प्रतिबंधाकडे लक्ष देणे अधिक महत्वाचे होते. त्या अनुषंगाने घटसर्पाची लस (toxoid) कालांतराने तयार झाली. १९२०पासून ती बालकांना दिली जाऊ लागली. हळूहळू ती जगभरात सर्वत्र उपलब्ध झाली. ही लस तयार करताना मूळ जिवाणूचे विष काढून खूप सौम्य केले जाते. ते शरीरात टोचल्यावर शरीर त्याच्या विरोधी प्रतिद्रव्य (antibodies) तयार करते.
मुलांतील व्यापक लसीकरणामुळे हा आजार आता खूप कमी दिसतो. तरीसुद्धा प्रौढांमध्ये हा आजार काही वेळेस आढळून येतो. प्रत्यक्ष आजार झाल्यावर घटसर्प-प्रतिविष हे इंजेक्शनद्वारे द्यायचे असते. ते प्रतिविष तयार करण्यासाठी मूळ विष घोड्यांना टोचतात आणि मग त्यांच्या रक्तातून प्रतिविष मिळवले जाते.

त्याकाळी संसर्गजन्य रोगांनी समजत थैमान घातले होते. त्यांच्या साथी फैलावत. त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय असे. त्या पार्श्वभूमीवर हे संशोधन खूप मोलाचे ठरले. त्यातून अन्य संसर्गजन्य रोगांच्या उपचारांसाठीही अशी प्रतिविषे करण्याची प्रेरणा मिळाली. आपण सर्वजण लसीकरण सार्वत्रिक झाल्यानंतरच्या युगात जन्मलेलो असल्याने खरोखर भाग्यवान आहोत.
* * * * * * *
२.

आता आपण वळूया १९०४च्या नोबेल पुरस्काराकडे. प्रथम त्याची अधिकृत माहिती:

विजेता संशोधक : Ivan Pavlov
देश : रशिया

संशोधकाचा पेशा : शरीरक्रियाशास्त्र
संशोधन विषय : पचनसंस्थेचा मूलभूत अभ्यास

माणसाची सर्व धडपड ही मुळात अन्न मिळवण्यासाठी चालते. आपण जिवंत राहण्यासाठीची ती प्राथमिक गरज. त्या अन्नापासून जर शरीरात उर्जा मिळवायची असेल तर ते आधी नीट पचले आणि शोषले गेले पाहिजे. त्यासाठी निसर्गाने आपल्याला तोंडापासून सुरु होणारी आणि गुदद्वारात संपणारी पचनसंस्था दिलेली आहे. तसेच या यंत्रणेत स्वादुपिंड व यकृत त्यांची रसायने ओतून महत्वाचे काम बजावतात. तिचा सखोल अभ्यास करणे ही वैद्यकातील एक प्राथमिक गरज होती. Pavlov यांनी त्याचा ध्यास घेतला होता. पचनशास्त्र मुळातून समजण्यासाठी त्यांनी कुत्र्यांवर असंख्य प्रयोग केले. पचनसंस्थेच्या कामासाठी मुळात मज्जासंस्थेतून येणारे संदेश हे महत्वाचे आहेत हा त्यांच्या संशोधनाचा निष्कर्ष होता.

त्यांच्या संशोधनातील काही महत्वाची निरीक्षणे नोंदवतो.
१. पचनसंस्थेचे विविध भाग हे जणू वेगवेळ्या रासायनिक प्रयोगशाळा आहेत.

२. खाल्लेल्या अन्नावर यांत्रिक (mechanical) प्रक्रिया झाल्यावर या ‘प्रयोगशाळा’ त्यांची पाचक रसायने त्यावर ओततात.

३. पाचकरसांची निर्मिती ही आपण कुठल्या प्रकारचे अन्न खातो यावर बरीच अवलंबून आहे. हे सिद्ध करण्यासाठी कुत्र्याला दोन प्रकारचे पदार्थ खायला देण्यात आले व नंतर त्याच्या लाळेचे निरीक्षण केले गेले. जेव्हा खाण्यायोग्य किंवा चविष्ट पदार्थ दिले जातात तेव्हा स्त्रवणारी लाळ अगदी घट्ट असते. याउलट जेव्हा खाण्यास अयोग्य किंवा त्रासदायक पदार्थ दिले जातात तेव्हाची लाळ ही अगदी पाण्यासारखी असते.
४. लाळेप्रमाणेच जठर व अन्य पाचकरस देखील अन्नाच्या प्रकारानुसार बदलतात. हा मुद्दा कुत्र्याला ब्रेड, दूध व मांस देऊन सिद्ध केला गेला.
५. थोडक्यात, आपण काय खातो त्यानुसार पाचकरस कसे व किती स्त्रवतात याचे नियंत्रण मज्जासंस्था करत असते. अन्नाचा वास व दृश्य यामुळे तोंडातील मज्जातंतू उद्दीपित होतात व मेंदूकडे संदेश धाडतात. मग तिथून उलट दिशेने संदेश पाठवून पाचकरस निर्मिती होते.

६. अन्नातले पचण्यायोग्य नसलेले वा त्रासदायक पदार्थ बाहेर फेकून देण्याचीही यंत्रणा शरीरात कार्यरत असते.

सर्व सजीवांच्या ‘खाणे’ या मूलभूत क्रियेशी निगडीत असे हे महत्वाचे संशोधन. इथे मला याची सांगड आधुनिक पाककलेच्या शिक्षणाशी घालण्याचा मोह होतोय. यात विद्यार्थ्यांना असे ठसवले जाते की खाद्यपदार्थाचे रंगरूप हेही चवीइतकेच महत्वाचे आहे. किंबहुना आपण एखाद्याला जेवण कसे ‘वाढतो’ (presentation) हेही महत्वाचे असते. गमतीने असे म्हणतात की एखादा पदार्थ आपण तोंडात घेण्यापूर्वीच डोळ्यांनी व नाकाने ‘खात’ असतो ! यातूनच मज्जासंस्था व पचनसंस्थेचे एकत्र गुंफलेले नाते स्पष्ट होते. (‘गुलाबजाम’ चित्रपट पाहिलात की नाही?).

या पुरस्काराच्या निमित्ताने Pavlov हे नोबेल मिळवणारे पहिले रशियन ठरले. त्यांचा पिंड संशोधकाचा होता आणि मानसशास्त्राचाही गाढा अभ्यास होता. Classical conditioning या विषयातले ते पितामह मानले जातात. त्यांच्या संशोधनाचा उपयोग वागणूक सुधारणा उपचारशास्त्रात केलेला आहे. त्यांनी प्रयोगासाठी वापरलेल्या कुत्र्यांवर मनस्वी प्रेम केले. त्यांचा असाच एक तोंडात नळी घातलेला कुत्रा रशियातील Pavlov संग्रहालयात जतन केलेला आहे.
pict

****************************************************************
(क्रमशः)
लेखातील चित्रे जालावरून साभार !

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

8 Oct 2018 - 9:22 am | कुमार१

मा सा संपादक
विनंती सादर

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Oct 2018 - 12:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर सुरुवात !

संशोधकांच्या कार्याचे आणि/अथवा खाजगी जीवनाचे जरा जास्त तपशील लिहिल्यास वाचायला अजून मजा येईल.

पॉव्हलॉव्हच्या "कंडिशनिंग"चे व्यवहारात हमखास यशस्वी ठरणारे उदाहरण म्हणजे... चिंचेच्या केवळ आठवणीनेच तोंडात खरोखर लाळ निर्माण होणे. याचे वैद्यकशास्त्रात आणि मानसशात्रात अनेक उपयोग होतात.

कुमार१'s picture

8 Oct 2018 - 12:28 pm | कुमार१

डॉ सुहास, उद्घाटनाच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

संशोधकांच्या खाजगी जीवनाचे जरा जास्त तपशील लिहिल्यास वाचायला अजून मजा येईल. >>>>

याबाबत मी जरा संभ्रमात आहे. कार्याचे तपशील जरूर वाढवेन. पण, खासगी जीवन खरेच लिहावे का? बऱ्याचदा ही थोर मंडळी “चक्रम” असतात, त्यांचे घटस्फोट असतात, अन्य संशोधकांबरोबर भांडणेही असतात ! काहींनी तर नोबेल मिळवताना दुसऱ्यांना चक्क फसवलेलेही असते.
.... आणि हे सर्व आपण जालावर वाचतो. त्याची सत्यता ठरवणेही अवघड. त्यामुळे ही ‘कुजबूज’ टाळावी असे मला वाटते.
असो, सूचनेचा विचार जरूर करतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Oct 2018 - 12:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

खूपच खाजगी/वैयक्तिक जीवनाचे तपशील नको, पण, त्यांच्या संशोधनाशी निगडित असलेले भलेबुरे प्रसंग आणि त्यांच्या जीवनातले संघर्ष व चिकाटीचे प्रसंग लेखासाठी उचित (व प्रेरणदायकही) ठरू शकतील. मात्र, केवळ आरोप किंवा अफवांच्या स्वरूपात असलेले तपशील अश्या लेखांत टाळणेच जास्त योग्य होईल, यात संशय नाही.

नवीन लेखमालेची सुंदर सुरुवात. भारी आहात तुम्ही. _/\_

पुढील भागांकडून अपेक्षा वाढवणारी दणकेबाज सुरुवात!
हा भाग आवडला! आगामी लेखांसाठी शुभेच्छा!

.

अनिंद्य's picture

8 Oct 2018 - 5:40 pm | अनिंद्य

@ कुमार१,

'विश्वसनीय संदर्भांवर आधारलेले लेखन' ही तुमची ओळख आहे.
नोबेल विजेत्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची कुजबुज तुम्ही टाळावी असे माझेही मत.

एका विजेत्याला / संशोधनाला एक लेख असे केले तर उत्तम ठरेल.

पु भा प्र

अनिंद्य

श्वेता२४'s picture

8 Oct 2018 - 5:52 pm | श्वेता२४

छान माहिती मिळतेय. वाचायला मजा येतेय. पु.भा.प्र.

@ शलभ : तुमच्यासारख्या वाचकांचे प्रेम व प्रोत्साहन यामुळे हे जमते. विशेष काही नाही.

@ अ आ : अधिक जोमाने पुढचे लेखन करेन. बाकी, प्रतिसादात चलतचित्र डकवण्यात तुमचा हातखंडा आहे. त्याबद्दल तुम्हाला एखादे ‘मिपा-पारितोषिक’ दिले पाहिजे !

@ अनिंद्य :
एका विजेत्याला / संशोधनाला एक लेख असे केले तर उत्तम ठरेल.>>>
त्याने लेख छोटा होईल असे वाटते. एकात दोनमुळे लेखमालेची लांबी नियंत्रित होईल. तरी विषयानुसार बघू .

@ श्वेता : आभार.

पुंबा's picture

8 Oct 2018 - 8:01 pm | पुंबा

मस्त कुमारजी!!
पुभालटा.

सुधीर कांदळकर's picture

9 Oct 2018 - 6:57 am | सुधीर कांदळकर

नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण. आवडले.

टॉक्साईड केव्हा देतात आणि सीरम्/अ‍ॅन्टीसीरम केव्हा देतात हे अजिबात ठाऊक नव्हते.

पावलोव हा घंटेचा आवाज आणि आणि कुत्र्याची लाळ यापुरता ठाऊक होता. नवी माहिती मिळाली.

धन्यवाद, पुभाप्र

पुंबा, तुमच्या उत्सुकतेबद्दल कौतुक व आभार.

सुधीर, आभार

पावलोव हा घंटेचा आवाज आणि आणि कुत्र्याची लाळ यापुरता ठाऊक होता.>>>>
बरोबर. ते conditioning चे प्रयोग प्रसिद्ध आहेत.
सा संपादक, अनेक आभार.

लई भारी's picture

9 Oct 2018 - 2:08 pm | लई भारी

आमची पोच आणि पुलेशु!
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण.

राघवेंद्र's picture

9 Oct 2018 - 4:20 pm | राघवेंद्र

कुमारजी मस्त सुरुवात !!!

सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार

स्मिता.'s picture

10 Oct 2018 - 3:35 pm | स्मिता.

एक सुंदर लेखमाला वाचायला मिळणार हे नक्की! या भाग छानच आहे पण थोडी जास्त माहिती चालली असती.
पुढच्या लेखांच्या प्रतिक्षेत.

कुमार१'s picture

10 Oct 2018 - 3:47 pm | कुमार१

स्मिता, धन्यवाद
तुमच्या सूचनेचा जरूर विचार करतो. फक्त होईल काय की संशोधनावर जास्त लिहिले तर वाचक कंटाळेल का असे वाटते.

गुल्लू दादा's picture

10 Oct 2018 - 4:41 pm | गुल्लू दादा
गुल्लू दादा's picture

10 Oct 2018 - 4:41 pm | गुल्लू दादा
गुल्लू दादा's picture

10 Oct 2018 - 4:41 pm | गुल्लू दादा
कुमार१'s picture

10 Oct 2018 - 5:25 pm | कुमार१

बऱ्याच दिवसांनी आपली इथे भेट होतेय. त्याचा आनंद तुमच्या तिहेरी प्रतिसादाने व्यक्त जाहला आहे ! ☺️
धन्यवाद

चौकटराजा's picture

10 Oct 2018 - 6:09 pm | चौकटराजा

अन्नाचे पचन करणारी द्रव्य अन्नातूनच तयार करायची. सर्व रासायनिक प्रक्रिया या रूम टेम्परेचर ला घडवून आणायच्या व त्याही मिट्ट अंधारात. मोठी विस्मयकारक योजना आहे खरी ! माझी एक जिज्ञासा आहे ते अशी की पाचक द्रव्ये म्हणजे एन्झाइम्स म्हणजेच कॅटॅलिस्ट असे विधान बरोबर आहे का ?

कुमार१'s picture

10 Oct 2018 - 6:27 pm | कुमार१

धन्यवाद!

पाचक द्रव्ये म्हणजे एन्झाइम्स म्हणजेच कॅटॅलिस्ट असे विधान बरोबर आहे का ?>>>

होय, मुख्य पाचक ही एंझाइम्स च असतात.
अर्थात त्यांच्या क्रियेपूर्वी जठरातील HCl व यकृतातील bile यांची क्रिया होणे आवश्यक असते.

घटसर्प-प्रतिविष तयार करण्यासाठी मूळ विष घोड्यांना टोचतात आणि मग त्यांच्या रक्तातून प्रतिविष मिळवले जाते.

सापाच्या विषावर प्रतिविष तयार करण्यासाठी पण हीच पद्धत वापरतात असं वाचलेलं आठवतंय.

कुमार१'s picture

11 Oct 2018 - 12:30 pm | कुमार१

आणि धन्यवाद.
बरोबर, त्यासाठी घोडा किंवा मेंढीचा वापर होतो.

कुमार१'s picture

15 Oct 2018 - 6:02 am | कुमार१
वन's picture

4 Nov 2018 - 2:43 pm | वन

छान लेख
आज संसर्गजन्य रोगांवरच्या प्रतिबंध-लशी सहज उपलब्ध आहेत. त्यांचा शोध लागण्यापूर्वी किती भीषण परिस्थिती असेल याची कल्पना येते.
असे शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांना त्रिवार वंदन.

कुमार१'s picture

4 Nov 2018 - 5:30 pm | कुमार१

त्याकाळी मुलांचा आणि एकूणच मृत्यूदर बराच जास्त असे.