पाउली पैंजणांचा मला भार आहे

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
19 Aug 2025 - 11:21 pm

पाउली पैंजणांचा
मला भार आहे..
रात्रीस चांदण्यांचा
अबोल दाह आहे..

शेजावरी स्वप्नकळ्यांचा
मूक शृंगार आहे
कुंकवाचा चंद्रमा
त्यालाही डाग आहे...

नजरेत भावनांचा
भरला बाजार आहे..
आरसा मनाचा
त्यालाही भेग आहे..

अंतरात श्वासांचा
खोल वार आहे..
सावल्यांच्या मिठीत
माझा संसार आहे...

पाउली पैंजणांचा
मला भार आहे..
रात्रीस चांदण्यांचा
अबोल दाह आहे..

-शब्दमेघ..एक मुक्त स्वैर स्वच्छंदी जीवन
(१९ ऑगस्ट २०२५)
(चार वर्षांनंतर पहिल्यांदा)

करुणकविता

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

20 Aug 2025 - 3:43 pm | अभ्या..

अरे वा गणेशा.
पुनरागमनाचे स्वागत.
येउ दे कविता. भले मिपाकाव्यविभागात दुष्काळ आहे पण फुटतील धुमारे तुझ्या ह्या पैंजणनादाने.

Bhakti's picture

20 Aug 2025 - 4:35 pm | Bhakti

ओहो, मस्तच लिहिलंय.

सावल्यांच्या मिठीत
माझा संसार आहे...

कातील!

कर्नलतपस्वी's picture

20 Aug 2025 - 5:02 pm | कर्नलतपस्वी

सुंदर,
अनिल कांबळे यांची

त्या कोवळ्या फुलांचा
बाजार पाहीला मी

आठवली.

खुपच सुंदर.

स्वागत, स्वगृही. दालन ओसाड पडलयं. कवितांनी समृद्ध करा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Aug 2025 - 8:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाउली पैंजणांचा
मला भार आहे..
रात्रीस चांदण्यांचा
अबोल दाह आहे..

वरील ओळींना पैकीच्या पैकी गुण दिले आहेत.

-दिलीप बिरुटे

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Aug 2025 - 3:08 pm | अमरेंद्र बाहुबली

आवडली!

कविता उत्तम आहे. मला तर भारीच कवतिक वाटतं, ज्यांना अशा कविता सुचतात आणि लिहीता येतात त्यांचं.
-- अवांतरः तुमची कविता निर्मितीची प्रक्रिया कशी असते, तसेच 'चार वर्षांनंतर पहिल्यांदा' याबद्दलही लिहावे. म्हणजे एका कवीला कश्यातून, केंव्हा प्रेरणा मिळते/मिळत रहाते, कश्याकश्याने त्यात खंड पडतो/पडू शकतो, चार वर्षांत काही सुचलेच नाही का, की सुचूनही लिहीले गेले नाही, वगैरेवर प्रकाश टाकावा. चित्रकलेच्या बाबतीत माझेही असे होत असते, पण ते का, हे कळत नाही. तुमच्या अनुभवातून काही कळेल कदाचित. अवश्य लिहावे. शुभेच्छा.

यावर काय लिहावे, येथेच लिहावे वेगळे लिहावे, किती लिहावे हे कळेना शेवटी म्हंटले. इथला प्रश्न इथेच थोडक्यात सांगतो..
-
तुम्ही चित्रकार आहात.. आणि मला चित्रकला ही सर्वात उजवी कला वाटते. प्रत्येक रेषेत जीवनाचे रंग उमलतात, हीच खरी चित्रकलेची अनुभूती आहे.

कवितेबद्दल मात्र माझा वेगळा दृष्टिकोन आहे. मला कविता ही फक्त त्या क्षणाची उमटलेली भावना वाटते. म्हणूनच मी तिला ‘कला’ मानत नाही. आणि कला मानली नाही की त्याबद्दल विशेष प्रेमही निर्माण होत नाही – निदान माझं तरी तसंच आहे. त्यामुळे माझ्या कवितांवर वा लिखाणावर मी प्रेम करत नाही. कारण जसं सहजपणे मी मित्रांशी बोलतो, संवाद साधतो, तसंच सहजतेने मी लिहितो. कदाचित म्हणूनच मित्रांना मी कुठल्याच अर्थाने ‘कवी’ वाटत नाही; आणि जसं मी लिहितो तसं कवितेसारखं प्रत्यक्ष बोलणं मला जमत नाही.

खंड / प्रेरणा :
मला वाटतं, कविता असो वा चित्रकला – जर त्या आपण फक्त स्वतःच्या समाधानासाठी केल्या, इतरांना इम्प्रेस करण्यासाठी नव्हे, तर जीवनाच्या प्रवाहात बदलणाऱ्या असंख्य प्राधान्यक्रमांमध्ये त्या मागे पडत जातात. घर, मित्र, जबाबदाऱ्या, नवीन आवडी अशा अनेक गोष्टी येतात. आणि मग जे आधी वाटलं ते हळूहळू मागे राहतं.

सध्या मला बागकामाचा नाद लागलाय. टेरेस आणि गॅलरी झाडांनी, फुलांनी बहरल्या आहेत.
असं होतं आणि मग लिखाणाला खंड पडत राहतो...

तुमचे हि असेच होते काय? बहुतेक असे नसेल.

अगदी, अगदी.

पोटाचा प्रश्न मार्गी लागल्यावर (सुटल्यावर म्हणत नाही,कारण तो कधीच सुटत नाही. सुटल्यावरच सुटतो) विविध छंद जोपासायला प्रयत्न केला. पण मन हे लहान मुला सारखेच, नवे खेळणे मिळाले की जुने फेकून द्यायचे.

सध्या पक्षी निरीक्षण अग्रभागी आहे,बरोबर फोटोग्राफी पुरक छंद.

कवितेबद्दल मात्र माझा वेगळा दृष्टिकोन आहे. मला कविता ही फक्त त्या क्षणाची उमटलेली भावना वाटते.

बाकी,कवीता मात्र प्रचंड आवडतात. क्षणीक अनुभुती जरी असली तरी ठिणगी सारखी असते. कविते मागील कवीची प्रेरणा,मनस्थिती जाणू घेता आली तर आणखीनच मस्त वाटते.

राघव's picture

22 Aug 2025 - 3:44 am | राघव

आवडली! :-)

कानडाऊ योगेशु's picture

22 Aug 2025 - 4:21 pm | कानडाऊ योगेशु

गण्या इज बॅक !
आवडली.

हक्कानं गण्या म्हणणारा मिपा वरती आता फक्त तूच आहेस..

आधी अविनाश काका एक होते.. पण तु खुप्पच चतुर आहेस मित्रा हाताला लागत नाहीस
अविनाश काका असे नव्हते
मी त्यांना नेहमी मिस करतो... आता असते तर सरळ भेटायला गेलो असतो.

प्रचेतस's picture

23 Aug 2025 - 8:32 am | प्रचेतस

मस्त गणेशा.
तुझ्याविना सारा कवीमंच झाला होता उदास
त्याचमुळे काव्यविभाग पडला होता भकास

-
कवी आपलेच आठौले.

सौंदाळा's picture

25 Aug 2025 - 5:19 pm | सौंदाळा

जळजळीत कविता
आवडली