गार्गी अजून जिवंत आहे...

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
25 Oct 2009 - 1:23 am

आज अचानक मंगला आठलेकर यांचं "गार्गी अजून जिवंत आहे" हे पुस्तक हातात पडलं. जन्मतारीख वगैरे नसणार्‍या काळात साधारण १९१४-१५ च्या सुमारास उत्तरप्रदेशात इलाहाबादला जन्मलेल्या गुलाबबाईची ही कहाणी. सातव्या वर्षी लग्न होऊन दहाव्या वर्षी मुलाला जन्म दिलेल्या ह्या गुलाबबाईने इतक्या जुन्या काळात इलाहाबाद-प्रयागसारख्या कट्टर धार्मिक परंपरा असलेल्या शहरात अंत्यसंस्काराच्या कामाला वयाच्या अकराव्या वर्षी सुरवात करून तिने "स्त्रियांनी स्मशानपौरोहित्य का करू नये?" असा प्रश्न तत्कालीन धर्ममार्तंडांना केला होता. ह्या स्त्रीबाबत लेखिका एक दोन पानी लेख वाचते आणि त्या स्त्रीला भेटायचंच या विचाराने तिचा शोध घेते. तिला शोधल्यावर तिच्या कडून, इतरांकडून ऐकलेल्या गुलाबबाई उर्फ अम्मा हे चरित्र - कहाणी व त्यावरील लेखिकेचे ससंदर्भ भाष्य म्हणजे हे पुस्तक "गार्गी अजून जिवंत आहे".

पुस्तक सुरवातीपासूनच पकड घेतं आणि आपल्याला आताही असलेल्या कर्मठ हिंदू समाजाचं दर्शन होऊ लागतं. गुलाबबाईला शोधत असताना लेखिका आधी वाराणसीला जाते. तिथे अशी स्त्री आहे हेच मान्य करणं सोडा, स्त्री ह्या कामात असु शकते ही शक्यताच धुडकावली जाते, तेही आजच्या काळात तेव्हाच लेखिका जेव्हा गुलाबबाईला भेटेल तेव्हा तिची कहाणी कशी असेल याचा अंदाज येऊ लागतो.

अत्यंत गरीब घरात जन्मलेल्या गुलाबबाईची ही कथा, तिच्या शेजारच्या घरात तिने पाहिलेल्या स्त्रीभृणहत्येवरून सुरू होते. मुलगी झाली की तिला माठात लिंपून कोंडून मारून टाकायचे ही त्या काळचा समाजमान्य रीत. त्या मुलीच्या आईच्या इच्छेचा प्रश्नच नसायचा . अशात पहिली मुलगी असूनही बापाने जिवंत ठेवायला परवानगी दिलेली ही मुलगी. बाकी घरात तिच्या पाठीमागचे आठ भाऊ. वडील दारागंज घाटावर "महापात्र" म्हणजेच अंत्यविधी करणार्‍या पंड्यांचे प्रमुख होते. त्याच्याबरोबर जाणार्‍या चिमुकल्या गुलाबचेही मंत्र तोंडपाठ होते. पुढे सातव्या वर्षी लग्न झाले व दहाव्या वर्षी मूल. सासरी सतत जाच. त्यामुळे गुलाब एका खोलीत कोंडून घेऊन व्यायाम करीत असे व तिने चक्क शरीर कमावले होते. तिला पुढे मुलगा झाल्याने त्याला मारण्याचा प्रश्न नव्हता मात्र तेव्हाच गुलाबचे वडील वारले. आता तिच्या माहेरी फक्त गरिबी होती. अश्या वेळी माहेर व सासरची गरिबी व नाकर्त्या नवर्‍याकडे पाहून तिने एक निर्णय घेतला तो अंत्यविधी करून माहेरच्यांचे व घरच्यांचेही पोट भरण्याचा.

या कामाला सुरवात करताना तिला सामना कराव्या लागलेल्या प्रश्नांना लेखिकेने चित्रदर्शी शैलीत मांडले आहे. गुलाबला सासरीच काय पण माहेरीही प्रचंड विरोध झाला. ह्या आयुष्यभर झगडण्यात घालवणार्‍या स्त्रीने जेव्हा आपली शेती आपल्याच नोकराकडून मिळवण्याचे ठरविले तो प्रसंग मांडताना लेखिका गुलाबच्या भूमिकेत शिरून लिहिते "मी शेतावर पोचले तेव्हा बैलांच्या साहाय्यानं नांगरणी चालू होती. मी जाऊन सरळ उभी राहिले ती बैलांच्या समोर. दोन्ही हातांनी तो नांगर रेटून धरला. बैल थांबले. त्या नोकराला काय करावं ते कळेना. बाईसमोर हार कशी पत्करणार म्हणून तो चेवाने बैलांवर आसूड उगारणार इतक्यात मी आसूड मधेच अडवला व खेचून घेतला. आणि त्याच्याच पाठीवर तोच आसूड सपासप चालवू लागले"

gargi

हे पुस्तक ह्या असामान्य स्त्रीच्या कथेबरोबरचे ऋग्वेदाकालीन स्त्रीचं स्थान कसं होतं याचाही शोध घ्यायचा प्रयत्न करते. आणि दाखवून देतं की विविध ऋचा, श्लोक हेच दाखवतात की स्त्रियांना मानाचं स्थान तर होतंच पण अगदी अंत्यविधीमध्येही स्त्रियांचा विधीवत् सहभाग असे. इतकंच काय विधवा पुनर्विवाहास देखील मान्यता होती हे. पुढे मनुस्मृतीत मात्र स्त्रियांकडून हे सारं हिरावलेलं दिसतं. एक काळ तो होता जेव्हा स्त्रियांना समान वागणूक हाच धर्म होता व आता एक काळ असा आहे की स्त्री घरातून बाहेर पडण्यासाठी-स्वातंत्र्यासाठी पुरुषाच्या मर्जीवर अवलंबून आहे हा सामाजिक र्‍हास लेखिका ठळकपणे अधोरेखित करण्यात यशस्वी झाली आहे.याशिवाय लेखिका एकदा दारागंज घाटावर जाते जिथे अम्माचे वडील महापात्र होते. तिथे अजूनही स्त्रियांनी हे विधी करणे निषिद्धच मानले जाते. तिथे तेथील पंड्यांची मते वाचून मती कुंठित होते.

मला ह्या पुस्तकातील सर्वात काही आवडलं असेल तर गुलाबबाईचं स्वातंत्र्याचं तत्त्वज्ञान. तुम्ही इतर स्त्रियांना बळ देण्यासाठी काय करता ह्या प्रश्नांवर गुलाबबाईचं उत्तर मार्मिक तर आहेच पण अतिशय चिंतनीय आहे. ती लेखिकेलाच प्रतिप्रश्न विचारते "आजूबाजूच्या स्त्रियांसाठी मी काय करायला हवं होतं असं तुला वाटतं? माझ्यासाठी कुणी काय केलं? मला वडिलांनी स्वातंत्र्य दिलं म्हणशील तर ते माझ्या बहिणींनाही होतंच की! त्यांनी काय केलं त्या स्वातंत्र्याचं? तेव्हा मुळात असं कुणासाठी काही करून कुणी स्वतंत्र होत नसतो. आणि झालाच स्वतंत्र तरी ते स्वातंत्र्य त्याला वापरता येत नाही. कारण बेड्या गळून पडल्या तरी त्या हातापायांचं काय करायचं हेच त्यांना ठाऊक नसतं. मला काय हवंय, आयुष्यात काय करायचंय हे निश्चित झालं की ते मिळविण्यासाठी त्याची आतूनच एक जबरदस्त आस निर्माण होते. हेच स्वातंत्र्य! ते स्वतःलाच मिळवता येतं"
एकही इयत्ता न शिकलेल्या ह्या स्त्रीचं हे तत्त्वज्ञान वाचून लेखिकेइतकेच आपणही विस्मयचकित आणि निरुत्तर होतो हेच खरं.

सार्‍या ब्रह्मवृंदासमोर याज्ञवल्कल्याच्या बुद्धिमत्तेला आव्हान देणारी गार्गी आता नसली तरी तिथे इलाहाबादच्या मुख्य घाटांवर काम करताना अगदी जिवावर उठलेल्या पंड्यांविरूद्ध दंड थोपटून स्वतःचा घाट बांधणार्‍या ह्या अम्माची कहाणी वाचली की वाचकाला लेखिकेइतकीच "गार्गी अजून जिवंत आहे" ची खात्री पटते. थोडक्यात काय तर गुलाबबाई आपले प्रश्न कसे सोडवले हे मांडताना लेखिका नकळत आपल्या मनात त्याहून बरेच मोठे आणि अस्वस्थ करणारे प्रश्न निर्माण करण्यात यश मिळवते. स्वतःला हे न पडणारे प्रश्न पाडून घेण्यासाठी तरी हे पुस्तक मिळताच वाचा अशी शिफारस!

पुस्तक: गार्गी अजून जिवंत आहे
लेखिका: मंगला आठलेकर
प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे
दुसर्‍या आवृत्तीतील पृष्ठे: ११६
दुसर्‍या आवृत्तीची किंमतः रु. ७०/-

धर्मसमाजशिफारसआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

Nile's picture

25 Oct 2009 - 2:26 am | Nile

सुंदर ओळख! विशेष धन्यवाद.

सुनील's picture

25 Oct 2009 - 6:39 am | सुनील

एका चांगल्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मुक्तसुनीत's picture

25 Oct 2009 - 7:13 am | मुक्तसुनीत

एका उत्तम पुस्तकाची तितकीच सुरेख ओळख करून देणार्‍या ऋषिकेश यांचे अभिनंदन.

आपल्या सुखवस्तू आयुष्यातल्या विवंचनांचे विचार हरघडी आपल्या डोक्यात असतात. या संदर्भात गुलाबबाईंसारख्यांच्या कहाण्या निव्वळ स्फूर्तिदायकच नव्हेत, तर आपल्या विवंचनासुद्धा किती चैनीच्या आहेत याची जाणीव करून देणार्‍या आहेत. आठलेकरानी टिपिकल "रॅग्स टू रिचेस" स्टोरीऐवजी या अशा , अशक्यप्राय लढाईची कहाणीची निवड करावी यात बरेच काही आले.

स्वातंत्र्यादि संकल्पनांबद्दल मांडलेले विचार डोळ्यात अंजन घालणारे आहेत. एक यत्ता न शिकता आयुष्याच्या शाळेने त्याना जे शिकवले - आणि मुख्य म्हणजे त्या शिकल्या - ते आपल्याला जाग आणणारे वाटते. शहाणपणाचा मक्ता कुठल्या पदवीकडे नाही , कुठल्या विद्यापीठाकडे नाही हेच खरे.

सरतेशेवटी एक अवांतर : माकडांच्या धाग्याला काही तासात ५०-६० प्रतिसाद आणि हा धागा दुर्लक्षित होऊन नजरेआड होणार. माझ्या मिसळपावकर मित्रमैत्रिणीनो , थोडा विचार करायला हवाय आपण सार्‍यानी. मी हा मुद्दा मागेसुद्धा मांडलाय नि सगळ्यांचे ताशेरे ऐकले आहेत. तरीसुद्धा इथे तुमचे लक्ष वेधवतो. मौजमजा आहेच ; थोडी ऊर्जा इथेदेखील खर्च होऊ देत.

शाहरुख's picture

25 Oct 2009 - 8:42 am | शाहरुख

माकडांच्या धाग्याला काही तासात ५०-६० प्रतिसाद आणि हा धागा दुर्लक्षित होऊन नजरेआड होणार.

उर्जा खर्च करायचे आवाहन केलंय म्हणून,

प्रतिसाद नाही म्हणून धागा दुर्लक्षित असं थोडीच आहे ? पुस्तकाची नोंद घेण्यात आली आहे.

Nile's picture

25 Oct 2009 - 11:46 am | Nile

खर तर वाद घालायचा नाही आहे पण, तुमचं वैयक्तीक दुर्लक्ष नसेल पण म्हणुन तुम्ही दुर्लक्ष नाही असं कसं म्हणु शकता? :)

असो, भावनाओं को समझो इतकाच इशारा, पुर्णविराम. :)

मस्त कलंदर's picture

25 Oct 2009 - 10:10 am | मस्त कलंदर

एका उत्तम पुस्तकाची तितकीच सुरेख ओळख करून देणार्‍या ऋषिकेश यांचे आभार!!!

स्वातंत्र्यादि संकल्पनांबद्दल मांडलेले विचार डोळ्यात अंजन घालणारे आहेत. एक यत्ता न शिकता आयुष्याच्या शाळेने त्याना जे शिकवले - आणि मुख्य म्हणजे त्या शिकल्या - ते आपल्याला जाग आणणारे वाटते. शहाणपणाचा मक्ता कुठल्या पदवीकडे नाही , कुठल्या विद्यापीठाकडे नाही हेच खरे.

पुस्तक नक्कीच वाचायला हवे!!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

चतुरंग's picture

25 Oct 2009 - 9:46 pm | चतुरंग

धागा दुर्लक्षित आहे असे जरी नसले तरी प्रतिक्रिया देऊन त्यावर मत व्यक्त झाले नाही तर तो मागे पडून दुर्लक्षिला जाऊ शकतो कारण मागील पाने धुंडाळून वाचण्याइतका उत्साह राहीलच ह्याची खात्री नसते (निदान माझे हल्ली बर्‍याचदा असे होते.)

चतुरंग

मिसळभोक्ता's picture

26 Oct 2009 - 10:18 pm | मिसळभोक्ता

माकडांच्या धाग्याला काही तासात ५०-६० प्रतिसाद आणि हा धागा दुर्लक्षित होऊन नजरेआड होणार.

मुसुशेठ,

सॉरी बरं का ! ऋष्या काहीतरी वैचारिक वगैरे लिहिणार आहे, असे कळले असते, तर आम्ही गप्पच बसलो असतो. ह्या ऋष्याची रेषेखालच्या अक्षरांच्या सिद्धहस्त लेखकांशी ओळख करून द्या ना ! तिसर्‍या अंकात तरी बिचार्‍याची वर्णी लागेल.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

मुक्तसुनीत's picture

27 Oct 2009 - 1:41 am | मुक्तसुनीत

तुम्ही किंवा इतर कुणीही "गप्प बसावे" असा माझ्या अवांतरातून एक अर्थ निघत असेल तर मला तसे म्हणायचे नव्हते. कुणी काय लिहावे नि लिहू नये याबद्दल मला काहीही म्हणायचे नव्हते. माझा (त्यावेळचा) प्रतिसाद लिहिताना , त्यावेळी काही तास जुने असलेल्या दोन धाग्यांची तुलना सहज केली आणि त्यातून जे वाटले ते लिहिले. जो जे वांच्छिल तो ते लिहो असे पुलस्वामीच म्हणून गेले आहेत.

विंजिनेर's picture

25 Oct 2009 - 7:30 am | विंजिनेर

पुढे सातव्या वर्षी लग्न झाले व दहाव्या वर्षी मूल. सासरी सतत जाच.

आई गं... कल्पने बाहेरचं आहे.

बाकी परि़क्षण चांगले झाले आहे.

विसोबा खेचर's picture

25 Oct 2009 - 7:42 am | विसोबा खेचर

एका वेगळ्याच पुस्तकाचा सुंदर परिचय! ऋष्या, तुझं कौतूक वाटतं..

आणि दाखवून देतं की विविध ऋचा, श्लोक हेच दाखवतात की स्त्रियांना मानाचं स्थान तर होतंच पण अगदी अंत्यविधीमध्येही स्त्रियांचा विधीवत् सहभाग असे. इतकंच काय विधवा पुनर्विवाहास देखील मान्यता होती हे. पुढे मनुस्मृतीत मात्र स्त्रियांकडून हे सारं हिरावलेलं दिसतं.

हा मनू एक नंबरचा भिकारचोट होता हेच खरं!

तात्या.

मिसळभोक्ता's picture

26 Oct 2009 - 10:19 pm | मिसळभोक्ता

हा मनू एक नंबरचा भिकारचोट होता हेच खरं!

ह्या मनूमुळे हिंदु लोकांचे खूप नुकसान झाले आहे, हे खरेच. मनु हा भिकारचोट ! आणि सनातनी मनुवादी शंभर भिकारचोट !

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

सहज's picture

25 Oct 2009 - 8:02 am | सहज

वाह! काय प्रभावी परिक्षण आहे. गुलाबबाईंचे आयुष्य एक जबरदस्त आवेग दिसतो आहे.

वाचले पाहीजे असे पुस्तक!

धन्यु ऋषिकेश!

प्रभो's picture

25 Oct 2009 - 12:12 pm | प्रभो

वाचले पाहीजे असे पुस्तक!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Oct 2009 - 8:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषी, पुस्तकाची ओळख भारी करुन दिली. गुलाबबाईची कहाणी तर कुछ औरच.

''...आयुष्यात काय करायचंय हे निश्चित झालं की ते मिळविण्यासाठी त्याची आतूनच एक जबरदस्त आस निर्माण होते. हेच स्वातंत्र्य! ते स्वतःलाच मिळवता येतं"

हे खरं तत्त्वज्ञान...!!!

-दिलीप बिरुटे

अजुनही समाज बदलला नाही. स्त्रीभ्रुण हत्या रोखण्यास सरकार जिथे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात अपयशी ठरले आहे,तिथे उत्तरप्रदेशाची कल्पनाच करवत नाही.लोकांची मानसिकता बदलण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. निदान प्रत्येकाने आसपास त्या बद्दल लोकांचे मतर्परिवर्तन गरजेचे आहे.शिक्षित जोडपी देखिल मुलगी आहे समजल्यावर दु:खी होतात त्याचा तर खुप राग येतो. पुस्तकाचा परिचय करुन दिल्याब द्दल आभार.

वेताळ

" तेव्हा मुळात असं कुणासाठी काही करून कुणी स्वतंत्र होत नसतो"
: गुलाबबाई

कोणीही कोणाचीही मानसीकता बदलू शकत नाही.... आणि मतपरिवर्तन काय करणार?

स्त्रियांच सक्शमीकरण आणि सबलीकरण महत्वाचं... कोणी त्या साठी काही करत असेल तर बोला.....

विनायक प्रभू's picture

25 Oct 2009 - 8:54 am | विनायक प्रभू

पुस्तक ओळख

प्रदीप's picture

25 Oct 2009 - 10:43 am | प्रदीप

एका वेगळ्याच विषयावरील पुस्तकाची ऋषिकेशने ओळ्ख जबरदस्त करून दिलेली आहे, त्याबद्दल त्याला मनापासून धन्यवाद.

मंगला आठलेकरांचे दळवींवरील सुंदर पुस्तक माझ्या संग्रही आहे. त्यांच्या लेखनाविषयी माझ्या मनात आदरच होता व तो सदर लेखाने द्विगुणितच झाला असे मी म्हणेन. परंतु आताही उत्तरेत वास्तव इतके भीषण आहे, की सुमारे ८० -९० वर्षांपूर्वी एका स्त्रीस समाजाची इतकी एकल टक्कर घेता आली, आणी तीही यशस्वी, ह्याबद्दल खरोखरीच माझ्या मनात संभ्रम आहे. अगदी आजही, स्त्रीच काय, पण पुरूषसुद्धा तेथील बुरसटलेल्या व जमिनदारांच्या झुंडशाहीने व्यापलेल्या समाजात काहीही आगळे वेगळे करण्याची हिंम्मत दाखवू शकत नाहीत. तेव्हा हे सगळे जसे इथे वर्णित केलेले आहे, तसेच प्रत्यक्षात घडले असेल, तर ते एक आश्चर्यच म्हटले पाहिजे. कदाचित ह्याविषयी पुस्तकात सविस्तर वर्णने आलेली असावीत, व ऋषिकेशने विस्तारभयास्तव त्याविषयी त्याच्या लेखात काही फारसे लिहीले नसावे.

स्वातंत्र्याविषयी गुलाबाबाईंची मते पूर्णपणे पटणारी आहेत. " मुळात असं कुणासाठी काही करून कुणी स्वतंत्र होत नसतो. आणि झालाच स्वतंत्र तरी ते स्वातंत्र्य त्याला वापरता येत नाही. कारण बेड्या गळून पडल्या तरी त्या हातापायांचं काय करायचं हेच त्यांना ठाऊक नसतं".
हे जितके व्यक्तिसमूहाविषयी खरे आहे, तितकेच ते देशाविषयीही आहेच. बाग्लादेश व इ. तिमोर ही अलिकडची ह्या विधानाच्या पुष्ठ्यर्थ दोन ठसठशीत उदाहरणे आहेत.

जाता जाता: उत्तर प्रदेशातीलच एका दलिताने लिहीलेल्या 'मेरा बचपन, मेरे कंधोंपर' ह्या आत्मकथनातून मी वर वर्णिलेल्या विदारक समाजव्यवस्थेचे चित्रण झाले असावे, असे वाटते. ' असे वाटते' म्हणण्याचे कारण हे की ह्या पुस्तकाचा परिचय रेखा देशपांडेंनी फारच विस्कळीत स्वरूपात केला आहे. ह्या पाश्वभूमिवर ऋषिकेशचा नेमक्या शब्दांत लिहीलेला हा लेख उठून दिसतो.

आनंदयात्री's picture

25 Oct 2009 - 10:53 am | आनंदयात्री

उत्तम परिक्षण .. मिळवुन वाचेन नक्की !!

वेदश्री's picture

25 Oct 2009 - 11:00 am | वेदश्री

लवकरच घेणार आता हे पुस्तक! पुस्तकाची अत्यंत प्रभावी आणि सुयोग्य ओळख करून दिल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद, ऋषिकेश!

दशानन's picture

25 Oct 2009 - 11:01 am | दशानन

>>पुस्तकाची अत्यंत प्रभावी आणि सुयोग्य ओळख करून दिल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद, ऋषिकेश!

असेच म्हणतो, छान माहीती.

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

प्रमोद देव's picture

25 Oct 2009 - 11:51 am | प्रमोद देव

पुस्तक खरंच वाचनीय आहे आणि ऋषिकेशने अतिशय समर्थपणे त्याचा परीचय करून दिलाय.

=======
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Oct 2009 - 3:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

एका चांगल्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. स्वातंत्र्याबद्दलची गुलाबबाईंची मतं खूपच पटली; 'डोर' या चित्रपटातील एक पात्र (नाव विसरले, आयेशा टाकियाने काम केलं आहे ते) याच अर्थाचं काहीसं वाक्य म्हणते तेव्हा तेही तेवढंच पटतं.

पुस्तक विकत घेऊन जरूर वाचणार.

अदिती

क्रान्ति's picture

25 Oct 2009 - 9:28 pm | क्रान्ति

परीक्षण आणि परिचय. गुलाबबाईचं स्वातंत्र्याचं तत्वज्ञान खरंच अंतर्मुख करणारं आहे. धन्यवाद ऋषिकेश. अगदी अवश्य वाचणार पुस्तक.

क्रान्ति
अग्निसखा

करुन दिल्याबद्दल ऋषिकेशचे आभार.
गुलाबबाई एकूण क्रांतिकारी व्यक्तिमत्व दिसते आहे. जगावेगळी वाटचाल करताना रूढींच्या निवडुंगांचे फड तुडवत, वेळप्रसंगी कापून काढत, जावेच लागते आणि त्याच्या काट्यांनी रक्तबंबाळ झालेला जीव मग काही अलौकिक घडवतो!
सत्य हे कल्पितापेक्षाही अद्भुत असते ते अशा ठिकाणी पटतेच पटते.
नक्कीच मिळवून वाचावे अशा पुस्तकांच्या यादीत समाविष्ट!

चतुरंग

एकलव्य's picture

25 Oct 2009 - 10:28 pm | एकलव्य

धडाडीच्या आणि अफाट गुलाबबाईंची ओळख करून दिल्याबद्दल मनापासून आभार.

भाजीपाव's picture

26 Oct 2009 - 2:46 am | भाजीपाव

सुंदर परीक्षण आणि परिचय. गुलाबबाईचं स्वातंत्र्याचं तत्वज्ञान खरंच अंतर्मुख करणारं आहे. .... धन्यवाद ऋषिकेश :)

भाग्यश्री कुलकर्णी's picture

26 Oct 2009 - 2:24 pm | भाग्यश्री कुलकर्णी

वाचलं आहे मी हे पुस्तक.खरच फार चांगले पुस्तक आहे ते.

सन्दीप's picture

26 Oct 2009 - 5:16 pm | सन्दीप

परीक्षण आणि परिचय. गुलाबबाईचं स्वातंत्र्याचं तत्वज्ञान खरंच अंतर्मुख करणारं आहे.पुस्तक विकत घेऊन जरूर वाचणार.धन्यवाद ऋषिकेश .

सन्दीप

स्वाती२'s picture

26 Oct 2009 - 5:21 pm | स्वाती२

सुरेख पुस्तक परिचयाबद्दल धन्यवाद. मागे कधीतरी आईने सांगितले होते या गुलाबबाईंबद्दल. आता पुस्तक मिळवून नक्की वाचणार.

चित्रा's picture

26 Oct 2009 - 6:32 pm | चित्रा

असे पुस्तक दिसते आहे. धन्यवाद, पुस्तक परिचयाबद्दल.

ऋषिकेश's picture

27 Oct 2009 - 12:10 am | ऋषिकेश

सर्वांचे प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार

------------------
ऋषिकेश
------------------

प्राजु's picture

27 Oct 2009 - 8:10 am | प्राजु

सुरेख पुस्तक ओळख!!
हे पुस्तक मागवून घेऊन वाचेन.
मनुस्मृती मध्ये
पिता रक्षती कौमार्ये, यौवने भर्ता रक्षती ।
स्थविरे रक्षन्ती पुत्रा: न स्त्री स्वातंत्रमर्हती खलु । ।
असं म्हंटलं आहे..
गुलाबबाईंची स्वातंत्र्याची व्याख्या खरोखर विचार करायला लागते. हात पसरून स्वातंत्र्य मिळत नसतंच, ते मिळवावं लागतं.
ऋषि, धन्यवाद!
- प्राजक्ता
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

28 Oct 2009 - 7:40 pm | धनंजय

(अन्यत्र दिलेला प्रतिसाद येथे पुन्हा देत आहे.)

अत्यंत स्फूर्तिदायक चरित्र आहे. पुस्तक वाचावेसे वाटत आहे.

नाकर्त्या पुरुषांच्या बायकांनी थक्क करणारे प्रयत्न करून कुटुंबांचा चरितार्थ चालवल्याची स्फूर्तिदायक उदाहरणे आपल्याला आजही दिसतात. आमच्या घरी कामाला येणार्‍या बायकांपैकी अनेक स्त्रिया अशा स्वतंत्र धमकीच्या होत्या, म्हणून ही बाब अगदीच क्वचित-दिसणारी नसावी.

मला वाटते लेकरांचे प्रेम आणि जिवाचा आकांत असला तर आईच्या बाहूत समाजाशी झगडायची अगतिक ताकत येत असेल. पण जे गुलाब यांना जमले, ते त्यांच्या बहिणींना जमले नाही.

गुलाब यांची स्फूर्ती आपण घ्यावी. पण पुढे आपला समाज असा असावा, की तो कित्ता गिरवण्यासाठी गुलाब यांच्यासारखा असामान्य चिवटपणा आवश्यक होऊ नये. सामान्य स्त्रीला (किंवा कोणालाही) जर कुशलपणे एखादा व्यवसाय करता येत असेल, तर तो व्यवसाय करता यावा.

गार्गी जिवंत आहे! तिच्या तेजाने माझ्या-तुमच्याइतक्या सामान्य मुलामुलींनीही "जिवंत" व्हावे अशी शुभकामना (आणि प्रयत्न) करूया.