बुध-शुक्र युती दिनांक २६/०२/२००८

धोंडोपंत's picture
धोंडोपंत in जनातलं, मनातलं
24 Feb 2008 - 3:00 pm

लोकहो ! दिनांक २६ फेब्रुवारी रोजी बुध आणि शुक्राची युती मकर राशीत होते आहे. दिनांक २६ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता बुध आणि शुक्र हे मकरेत १६ अंशांवर असतील. कोणत्याही दोन किंवा अधिक ग्रहांच्या युतियोगाला फलज्योतिषात फारच महत्व आहे. जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या युतीत असतात तेव्हा ते एकमेकांचे कारकत्व वाढवित असतात किंवा त्याचा नाश करतात. बुध शुक्र युतीबद्दल बोलायचे झाले तर हे दोन ग्रह "अंतर्वर्ती" ग्रह आहेत. म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये हे दोन ग्रह आहेत. त्यांच्या नंतर सूर्यमालेत पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या पुढे मंगळ गुरू शनी वगैरे ग्रह आहेत. "बहिर्वर्ती" हे दोन्ही ग्रह सूर्याला जवळ असल्याने यांच्या भ्रमणाची गती अधिक आहे. हे दोन ग्रह एकमेकांपासून फारफार तर ७६ अंश दूर जाऊ शकतात, त्याहून अधिक नाही. त्यामुळे या दोन ग्रहांमध्ये केवळ युतीयोग, द्विद्वार्दश योग, लाभयोग किंवा अर्धकेंद्रयोगच होऊ शकतो. या दोन ग्रहात षडाष्टक, प्रतियुती, नवपंचम हे योग कधीही होऊ शकत नाहीत. कारण हे तीनही योग ७६ अंशांहून अधिक अंतरावरच होतात. केंद्रयोग ९० अंश, नवपंचम योग १२० अंश, षडाष्टक योग १५० अंश, प्रतियुती १८० अंश. अंतर्ग्रहांच्या युतीसाठी ५ अंश दिप्तांश घ्यावे. बहिर्ग्रहांच्या युतियोगासाठि दिप्तांश ८ ते १० अंश असू शकतात. या दिप्तांशांच्या आत असलेली युति जोरदार फळे देते. शुक्र आणि गुरू हे शुभग्रह आहेत. बलवान चंद्रही शुभग्रह आहे. बुध हा शुभत्वाच्या बाबतीत "संगति संग दोषेण।" या स्वरूपाचा ग्रह आहे. बुध शुभ ग्रहाच्या युतीत असेल तर शुभ फले देतो आणि पापग्रहांच्या युतीत असता अशुभ फले देतो. शुक्राच्या युतीत असलेला बुध मात्र शुभ फलांचा वर्षाव करतो. शुक्र हा कलेचा आणि सौंदर्याचा कारक आहे. तो संपत्ती, समृद्धी आणि ऐहिक सुखाचाही कारक आहे. शुक्राबरोबर युतीत असलेला बुध, शुक्राचे कारकत्व अधिक उजळवतो. बुधाची बुद्धीमत्ता, वाक्पटुत्व, अवखळपणा शुक्राच्या कारकत्वाला उधाण आणतो. ज्यांच्या पत्रिकेत बुधशुक्र युती असते त्यांच्यात पुढील गोष्टी प्रकर्षाने दिसतात:- हे लोक फार मनमोकळे, बोलके आणि सतत आनंदी असतात. स्वभाव हलकाफुलका असतो. बोलण्यात वागण्यात एक प्रकारचा आकर्षकपणा असतो. या लोकांना माणसे जोडायला आवडतात. एकलकोंडे, माणूसघाणे नसतात. ही युती बौध्दिक राशीत असेल ( मिथुन, तुळ व कुंभ) तर यांची बुध्दिमत्ता वाखाणण्याजोगी असते. कोणताही विषय यांना चटकन समजतो. आणि समजलेला विषय हे लोक उत्तमपणे मांडू शकतात. presentation skills हा आजच्या युगातला फार मोठा गुण आहे. या गुण या लोकांकडे प्रचंड असतो. ही युती धनस्थानात बुधाच्या राशीत असेल ( वृषभ, सिंह लग्नाला) तर द्वितीयात बुध येतो. हे लोक फार बडबडे असतात. भेटल्यावर राजकारणापासून समाजकारणापर्यंत, अध्यात्मापासून अभ्यासापर्यंत, ज्ञानापासून विज्ञानापर्यंत, कलेपासून क्रीडेपर्यंत कोणत्याही विषयावर बोलतात. इतके की पुढे ऐकणारा कंटाळतो पण यांच्या तोंडचा पट्टा काही थांबत नाही. त्यांच्या बोलण्याला कोणताही विषय वर्ज्य नसतो. ही युती (धनस्थानातली) जर राहुने बिघडली असेल तर हे लोक थापाडे असतात. या लोकांना स्त्रियांचा सहवास जास्त आवडतो. सिनेमा, नाटक, गाणेबजावणे यांची आवड असते. स्त्रियांशी मैत्री पटकन होते. शुक्रावर मंगळाचे योग असतील तर हे लोक स्त्रियांशी मैत्री करण्यास आसुसलेले असतात. शुक्राची रसिकता, मंगळाचे धैर्य आणि बुधाचे संवादकौशल्य यांचा मिलाफ झाल्यावर काय सांगायचे? विषयसेवनासाठी लागणार्‍या सर्वच गोष्टी वश असता, अजून काय हवे? त्यात राहूची साथ लाभली तर या ग्रहयोगाच्या स्त्रीया परजातीतल्या परपुरुषाबरोबर स्वखुशीने बिघडतात. ही युती जर पंचमात झाली असेल किंवा लाभात झाली किंवा इतर घरात होऊन ती शनीच्या प्रतियोगात असेल तर या लोकांना मुली जास्त होतात. (कन्यासंतती) बुध, शुक्राच्या राशीतली युती साहित्य, वाग्ङ्मयाची आवड देते. तृतीयात किंवा भाग्यात ही युती असेल तर या लोकांच्या हातून अतिशय चांगले लेखन होते. तृतीयातील युतीवर नेपच्यूनचा शुभयोग असेल तर यांना एखादे वाद्य उत्तमरित्या वाजावता येत असते. हस्ताक्षर चांगले असते. एकूण जीवन आनंदी करणारी, जगण्याचे समाधान देणारी, बुद्धिदायक, ऐहिक सुखाची रेलचेल करणारी ही युती आहे. आपला, (सूक्ष्मदर्शी) धोंडोपंत

संस्कृतीसंदर्भप्रश्नोत्तरेमाहितीप्रतिभा

प्रतिक्रिया

अविनाश ओगले's picture

24 Feb 2008 - 8:59 pm | अविनाश ओगले

वा पंत! उत्तम माहिती. सोप्या शब्दात. धन्यवाद.

मदनबाण's picture

25 Feb 2008 - 9:52 am | मदनबाण

लेख फार आवडला.प्रतेक राशी वर काय प्रभाव पडेल या सबंधी अधिक माहिती मिळाल्यास फार आनंद वाटेल.शनी ग्रह पण सध्या जवळ आला आहे,त्याची सुद्धा  माहिती देता आली तर उत्तम.....

प्राजु's picture

25 Feb 2008 - 10:11 am | प्राजु

थोडे सविस्तर लिहाल का?
- (सर्वव्यापी)प्राजु