सगळ्याच घटना कशा झटपट घडत गेल्या. दोन आठवड्यापुर्वी सुशिक्षीत बेकार असलेला सन्मित्र भार्गव आज मात्र एका दोनशे एकर पसरलेल्या फार्म हाऊसचा मॅनेजर होता. महिना चक्क आठ हजार रुपये पगार मान्य केला होता माणिकरावांनी.गंमतच आहे नाही.
दोन आठवड्यापुर्वी असाच सकाळी (?) ११-११.३० च्या दरम्यान स्थानिक वर्तमानपत्रे चाळत असताना (सार्वजनिक मोफत वाचनालयात- वर्तमानपत्रे विकत घेवुन वाचण्याची ऐपतच नव्हती म्हणा) मधल्या पानावरची ती जाहिरात वाचण्यात आली. खरेतर ती जाहिरात दोन तीन दिवस रोज येत होती. मी वाचलीही होती पण का कोण जाणे दुर्लक्षच केले होते मी तिकडे.
पाहिजे : फार्म मॅनेजर.
फार्महाऊसच्या देखरेखीसाठी विनापाश, अविवाहित सुशिक्षीत तरुण हवा आहे.
राहणे, खाणे व सर्व सोयी पुरवल्या जातील.
पगार व इतर गोष्टी मुलाखतीदरम्यान ठरवल्या जातील.
भेटा: श्री. माणिकराव जामदग्नि, हॉटेल सर्वोदय, रुम नं. १३,
खाली एक फोन नंबर दिला होता. त्या नंबरवर संपर्क साधण्यास सांगण्यात आले होते. एक गंमत म्हणुन मी फोन केला. कोणीतरी खांडेकर म्हणुन गृहस्थ होते त्यांच्याशी बोललो. त्यांनी मागितला म्हणुन आमच्या घरमालकिणीचा नंबर दिला आणि विसरुन गेलो.
आणि चार पाच दिवसांनी असाच दिवसभर उंडगुन रुमवर पोहोचलो. खरेतर मी रात्री ११ च्या आधी कधीच घरी येत नाही. घरमालकिणीचा भाड्याचा तगादा चुकवायचा असतो ना ! सकाळी सात - साडे सातच्या दरम्यान गपचुप पळ काढायचा आणि रात्री उशीरा सगळे झोपल्यावर हळुच परत यायचं. तसाच आजही आलो तर चंद्या बाहेरच्या पडवीत अभ्यास करत बसला होता. चंद्या म्हणजे आमच्या घरमालकाचं एकुलते एक चिरंजीव. हा पोरगा गेले तीन वर्षे बारावीची परिक्षा देतोय. आजकाल रोज रात्री बाहेर अभ्यास करत बसतो..आई-बाप खुष. बापड्यांना कुठे माहितीये, आपले चिरंजीव रात्र रात्र जागुन कुठला अभ्यास करतात ते. खोटं कशाला बोलु मीच त्याला दर आठवड्याला आशक्याच्या दुकानातुन पिवळ्या कव्हरची पुस्तके आणुन द्यायचो. वाचुन झाली की पठ्ठ्या इमानदारीत परत करायचा, ती परत देवुन दुसरी आणुन द्यायची. त्या बदल्यात दररोज रात्री तो माझ्यासाठी घराचा मुख्य दरवाजा उघडुन द्यायचा.
तर त्या दिवशी परत आलो तेव्हा चंद्या बसलाच होता अभ्यास (?) करत. मला बघताच म्हणाला," सन्म्या, तो कोण खांडेकर तुझ्यासाठी पेटलाय बघ फोनवर. सकाळपासुन चारवेळा फोन आलाय त्याचा. आईसाहेब तर सॉलीड पेटल्या आहेत. उद्या पुन्हा फुलं पडणार तुमच्यावर !
मी कशाला थांबतो घरात? सकाळी ६ वाजताच गुल झालो. ९.३० च्या दरम्यान पुन्हा खांडेकरला फोन केला. तर घरमालकिणीची कसर त्या भ@#ने भरुन काढली. माझ्या आणि मालकिणबाईच्या दोघांच्या नावाने मनापासुन शंख करुन झाल्यावर मग मुद्दलाची गोष्ट सांगितली."हे बघा उद्या माणिकराव शहरात येणार आहेत, त्यांना तुम्हाला भेटायचे आहे. सकाळी दहा वाजता सर्वोदयला हजर राहा."
माणिकरावांना भेटलो आणि मग नशीबाची चाकं अशी काय फिरली की यंव रे यंव !
माणुस तस्सा बरा वाटला. (बरा नसता तरी मी बराच म्हणलं असतं त्याला. दणक्यात आठ हजाराची नोकरी देणारा माणुस वाईट असेलच कसा?) माणिकराव साधारण साठीचे असावेत. धोतर, सदरा, कोट आणि टोपी असा साधाच पोषाख होता. पण कपडा मात्र उंची असावा. बोलायलाही एकदम फटकळ पण मिठ्ठास वाटला म्हातारा. काही गोष्टी मात्र खटकल्या मला. उदा. माझी पगाराची अट, राहण्याची सोय सगळं काही लगेच मान्य केलं त्याने. रजा मात्र पहिल्या वर्षात अजीबात मिळणार नाही म्हणाला. प्रश्न एकच होता...त्या खेड्यात वेळ कसा काढायचा? बघु पैसा महत्वाचा शेवटी.
अरे हो, खेड्यावरुन आठवलं, मुळ गोष्ट सांगायची राहुनच गेली. प्रतापनगरमध्ये माणिकरावांची २०० एकर बागाईत होती. एक जुना चिरेबंदी वाडा होता रानातच. मला त्या वाड्यावरच राहावं लागणार होतं. माणिकरावांना मुलबाळ काही नाही. जे नातेवाईक होते ते त्यांच्या जाण्याची वाट बघत होते. त्यांची पत्नी आजाराने अंथरुणाला खिळलेली. त्यामुळे त्यांना शेताकडे लक्ष देणे व्हायचे नाही. म्हणुन त्यांना शेती व वाड्यासाठी एक केअर टेकर हवा होता. अर्थात त्याने वाड्यावरच राहायला हवे ही त्यांची रास्त अट होती. इव्हन मला सकाळ , संध्याकाळ चहा, नाश्ता, दोन्ही वेळचं जेवण यासाठी एक नोकरपण पुरवण्याचे मान्य केले त्यांनी. त्यांच्या खर्चाने. म्हणजे महिना ८०००/- शिल्लक. क्या बात है, सन्मित्रशेठ, लॉटरीच लागली की तुमची?
तरीसुद्धा मी कोडगेपणा करुन एका महिन्याचा पगार आगाऊ मागितला तर म्हातार्याने थेट हातातच ठेवले पैसे. आतापर्यंत मी आपला मजेमजेत घेत होतो सगळं. पण आता मात्र नाही म्हणायला तोंडच उरलं नाही. दोन तीन दिवसात येतो असं सांगुन तिथुन निघालो. थेट रुमवर आलो. आल्या आल्या तुंबलेलं भाडं देवुन टाकलं. तरी सुद्धा ३-४ हजार शिल्लक होते खिशात. मग काही नवीन कपडे, एक बॆग, काही इतर रोजच्या वापरातल्या सटरफटर गोष्टी विकत घेतल्या. सगळ्या मित्रांना (माझ्या सारख्या कंगाल माणसाचे असे किती मित्र असणार म्हणा) भेटुन घेतलं. निघताना इमानदारीत चंद्याला सल्लाही दिला," बाबारे बास झालं आता, सुधरा थोडं, अभ्यास करा आता."
सरळ एस. टी. स्टॆंडवर आलो आणि कोल्हापुरकडे जाणारी एस. टी. पकडली. मधेच कुठल्यातरी पळसेफाट्यापासुन प्रतापनगरला जाण्याचा रस्ता फुटत होता. त्या फाट्यावर मला घ्यायला माणिकरावांची गाडी येणार होती. पळसेफाट्यावर उतरलो तर एक जिपडं वाटच बघत होतं. गावात पोहोचेपर्यंत बर्यापैकी रात्र झाली होती. त्या रात्री माणिकरावांच्या गावातल्या घरातच राहीलो. सकाळी उठल्यावर चहा वगैरे घेवुन माणिकरावांची भेट घेतली आणि गाव बघायला म्हणुन बाहेर पडलो. तसं छोटंसंच पण टुमदार होतं गाव. शंभर एक घरं असतील फार तर. पश्चीम महाराष्ट्रातील कुठल्याही टिपिकल खेड्याप्रमाणेच गाव होता. छोटीशी वेस, वेशीपाशीच मारुतीच मंदिर होतं. तिथुन थोडंसं पुढे आलं की चावडी होती. चावडीपाशीच पाण्याची एक मोठी विहीर होती. ती विहीर मात्र मला आवडली. विहीरीवर सगळे मिळुन एकुण आठ रहाट होते आणि विशेष म्हणजे विहीर पाण्याने गच्च भरलेली होती. क्षणभर मोह झाला की कपडे काढावे आणि मारावा सुर. पण आजुबाजुला पाणी भरणार्या, धुणी-भांडी करणार्या बायका बघितल्या आणि विचार कॅन्सल केला. अर्ध्या तासात सगळा गाव फिरुन मारुतीच्या मंदिरात येवुन विसावलो. दर्शन घेतलं आणि टेकलो थोडावेळ .
"घ्या प्रसाद घ्या", कानावर एक स्नेहाळ आवाज आला तसा चमकुन वर बघीतलं तर समोर प्रसन्न चेहेर्याने हसत पुजारी उभे. मीही हसुन नमस्कार केला आणि प्रसाद घेतला.
"मी दिगंबर पाठक, मारुतीरायाचा पुजारी. गावात सगळे गाव मला आप्पाच म्हणतात. तुम्ही कुठले म्हणायचे पाहुणे? नवीन दिसताय म्हणुन विचारलं , राग मानु नका."
"मी सन्मित्र, सन्मित्र भार्गव, कराडहुन आलोय. माणिकराव जामदग्निंचा नवीन फार्म मॆनेजर म्हणुन. तसा मी त्यांच्या रानातल्या वाड्यातच राहणार आहे आजपासुन."
आप्पा एकदम दचकले. "काय..? माणिकरावांना वेड लागलय की काय? परत जा पोरा, आल्या पावली परत जा! काही खरं नाही, त्या वाड्याचं काही खरं नाही," आप्पा स्वत:शीच बडबडत निघुन गेले.
मी त्यांच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहतच राहीलो. पाच साडे पाच फुट उंची पण शरीर मात्र कमावलेलं व्यायामाचं होतं. याला काय झालं एकदम. मनात विचार आला तेवढ्यात....
"चला, शेवटी म्हातार्याला बकरा सापडला तर."
मी चमकुन मागे बघितले, चावडीवर कुटाळक्या करत बसलेली पोरं माझ्याकडेच बघत होती. पण त्यांचं बोलणं ऐकल्यावर त्यांच्या चेहेर्यावर जे भाव मला अपेक्षित होते ते मात्र नव्हते, खरं तर ती पोरं खुपच गंभीर वाटत होती.
"पावणं, कराडहुन आला जणु .....? आत्महत्याच करायची होती तर कराडात काय कमी जागा होती काय? निदान बॉडी तरी सापडली असती..!!!
मी दचकलोच, उठुन त्यांच्या जवळ गेलो," नमस्कार मी सन्मित्र भार्गव ! तुम्ही काय म्हणालात, जरा पुन्हा एकदा सांगाल का ? मघाशी ते आप्पाजी पण असंच काहीतरी असंबद्ध बोलुन निघुन गेले. मी इथे आत्महत्या करायला आलोय असं का वाटतंय तुम्हाला ?
"माफी करा देवा, आमी आपले मजाक करत होतो. च्यायला माणक्याशी कुणी वैर घा." भराभर सगळे उठुन गेले. मी माणिकरावांच्या घरी परतलो.
आल्या आल्या त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. तसे माणिकराव सटपटले, पण लगेचच त्यांनी सावरुन घेतले.
"काही नाही हो, तुम्ही नका लक्ष देवु त्यांच्याकडे. अहो एवढी मोठी शेती, आता पर्यंत कोणी बघणारं नव्हतं त्यामुळे या लोकांना छोट्या मोठ्या चोर्या करता यायच्या. आता ते बंद होईल ना. या लोकांना स्वत:ला कष्ट करायला नको आणि दुसर्याला करु द्यायला नको."
"पण ते आप्पाजी त्यातले नाही वाटले मला, भला माणुस वाटला तो तर." मी माझी शंका सांगितली.
"माणुस भलाच आहे हो, पण आला होता गेल्याच महिन्यात माझ्याकडे, त्याच्या मुलाला वाड्याच्या आणि शेताच्या देखरेखीसाठी थेवुन घ्या म्हणुन. मी त्या बेवड्याला काम द्यायचे नाकारले म्हणुन तो आप्पाजी चिडुन आहे माझ्यावर झाले. बोलता बोलता आम्ही आतल्या खोलीत आलो. मला अचानक गुदमरल्यासारखं झालं. श्वास कोंडल्यावर कसं बेचैन व्हायला होतं ना तसं.
"सन्मित्र, तुम्ही साशंक असाल तर अजुनही नकार देवु शकता. तुम्हाला दिलेले पैसे मी परत मागणार नाही." माणिकराव थोडेसे अस्वस्थ वाटले मला.
"नाही, नाही मी राहीन. एवढ्या हलक्या कानाचा निश्चितच नाहीय मी. तुम्ही बिनघोर राहा. एकदा तुमचे पैसे घेतलेत म्हणल्यावर काम नाकारण्याचा प्रश्नच येत नाही आणि एवढे चांगले काम कोणी का म्हणुन सोडावं?" माझ्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता.
मनात अजुनही थोडी साशंकता होती. दोनशे एकराच्या शेतीवर मी एकटा कसा काय लक्ष ठेवु शकणार होतो. पण.....
दुपारी चारच्या दरम्यान मी रानाकडे जायला निघालो. माणिकराव दुसर्या दिवशी सकाळी येवुन पुर्ण मळा दाखवणार होते. एक गडी बरोबर घेवुन मी वाड्यावर पोहोचलो. वाडा कसला गढीच होती ती. पुर्णपणे दगडांनी बांधलेली. गड्याने ते एखाद्या किल्ल्याच्या दिंडी दरवाज्याप्रमाणे दिसणारे दार उघडले आणि .....
भर्रकन एक पाखरु उडाले. "पारवा होता काय रे तो." मी उगाचच अक्कल पाजळली.
तर त्या गड्याने असं काही पाहीलं माझ्याकडे की मी समजुन गेलोय लोचा झालाय काही तरी.
"न्हाय दादा, वाघुळ होतं पगा !"
आत शिरल्यावर दाराच्या दोन्ही बाजुला छान पडव्या होत्या. त्या संपल्या की जुन्या वाड्यात असतं तसं मधोमध बरंच मोठं मोकळं अंगण. वाडा की गढी दुमजली होती. सगळीकडे स्वच्छ झाडुन घेतलेलं होतं.पण काहीतरी खटकलं मला. काय ते नाही लक्षात आलं पण काहीतरी कमी होतं तिथे. आणि का कुणास ठाऊक, एक विचित्र शांतता पसरलेली होती. एक कसलातरी दुर्गंध म्हणता येइल असा वास आसमंतात भरुन राहीला होता. गड्याला विचारलं तर म्हणाला, मागच्या वावारात कायतरी जनावर मरुन पडलं असंल.म्या घेतो की साफसुफ करुन उद्याच्याला."
त्याने एका खोलीत माझं सामान टाकलं. खोली तशी प्रशस्त, स्वच्छ होती. एक कॊट, एक टेबल, अलमारी , दोन खुर्च्या असं आवश्यक ते सर्व सामान होतं. एक गोष्ट मला खटकली की खोलीला खिडकी मात्र नव्हती.
तुक्याला, म्हणजे गड्याला विचारलं तर तो म्हणाला," दादा हितं कंच्याबी खोलीला खिडकी न्हाई! आता मी येतो दादा, रातच्याला जेवान घेवुन यीन. "
"इथं मुक्कामाला कोणकोण असतं." मी इतक्या वेळ मनात घोळणारा प्रश्न विचारला.तसा तुक्या दचकला इतका वेळ मनोमन टाळलेला प्रश्न आल्यासारखा.
"न्हाय दादा, रातच्याला आमी कुणी बी हितं र्हात न्हाय. दादा, तुमालाबी सांगतु शानं असाल तर अजुनबी निगुन जा परत. आन हितल्या कुटल्या बी चीज वस्तुला हात नगा लावु. "
"का रे बाबा?" हे मात्र मला एकदम अनपेक्षित होतं.
एकदम काहीतरी आठवल्यासारखा तो घाबरला. इकडं तिकडं बघत, स्वत:च्याच थोबाडीत मारत म्हणाला," चुकी झाली, मालक. पुन्यांचान नाय व्हनार. एकडाव माफी करा. मी येतो दादा, सांजच्याला यीन जेवान घेवुन. दार लावुन घ्या तेवडं."
दार लावताना मला प्रथमच जाणवलं. बाहेर सुसाट वारा सुटला होता. वाड्याच्या मधल्या भागात मात्र वर मोकळच होतं तरी आत निरव शांतता होती. पानही हालत नव्हतं. पान...आत्ता लक्षात आलं, इथे झाड काय झुडुपसुद्धा नव्हतं एकही, पान कुठुन येइल.
आणि प्रथमच माझ्या लक्षात आलं आल्या आल्या काय खटकलं होतं ते.
जुन्या वाड्यांमधुन हटकुन आढळणारं तुळशी वृंदावन इथे कुठेच दिसत नव्हतं.
क्रमश:
कथा
प्रतिक्रिया
5 Jun 2009 - 1:46 pm | पाषाणभेद
आता थरार चालु झाला आहे. लवकर उत्सुकता संपवा.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
5 Jun 2009 - 2:03 pm | मराठी_माणूस
उत्सुकता ताणलिय
5 Jun 2009 - 2:26 pm | प्रशु
येऊ देत लवकर
5 Jun 2009 - 2:40 pm | प्रकाश घाटपांडे
उत्कंठावर्धक, आमच्या सारख्या वाचकालाही खिळवुन ठेवलस विशाल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
5 Jun 2009 - 2:50 pm | मस्त कलंदर
उत्सुकता ताणली गेलीय...
लवकर येऊ दे पुढचा भाग!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
5 Jun 2009 - 4:49 pm | अनंता
वाट पाहूनि जीव शिणला.
प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)
5 Jun 2009 - 6:00 pm | रेवती
बापरे!
वातावरणनिर्मीती छान भिती वाटण्याजोगी झालीये.
आता पुढच्या भागाची वाट पहायची.
रेवती
5 Jun 2009 - 7:29 pm | क्रान्ति
भीती वाटायला लागलीय वाड्याचं वर्णन वाचल्यावर. पुढे काय होईल, याची उत्कंठा लागलीय.
@)
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
5 Jun 2009 - 7:57 pm | तिमा
वा राव, काय खिळवून ठेवलाय आमास्नी ! नारायण धारपांचा वारसा चालवताय जनु!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
5 Jun 2009 - 8:58 pm | स्वाती दिनेश
वाड्यावर आता आणखी काय काय होणार आहे त्याची उत्सुकतायुक्त भीती वाटते आहे,:)
पुढचा भाग लवकर येऊ दे.
स्वाती
5 Jun 2009 - 11:24 pm | पिवळा डांबिस
छान सुरवात आहे, विशालराव!
पुढलं वाचायला उत्सुक आहे...
:)
-पिडांकाका
6 Jun 2009 - 2:30 am | चतुरंग
वातावरण निर्मिती झक्कास झालीये! भयकथा पळवा बिगीबिगी! :S :SS
चतुरंग
6 Jun 2009 - 4:48 pm | लिखाळ
मस्त सुरुवात .. पुढे वाचायला उत्सुक आहे... :)
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
6 Jun 2009 - 5:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लै भारी, मोहरल्या भागाच्या वाट पाहून राह्यलो.
6 Jun 2009 - 8:55 pm | अनिरुध्द
:SS वाडा अक्षरशः डोळ्यांपुढे उभाच राहीला. दुसरा भाग लवकर येउद्यात. क्षणभर वाटलं की आम्हालाच बोलावणं येतंय की काय.
7 Jun 2009 - 11:47 am | मराठमोळा
विशालराव,
कथा एकदम जोरदार, वेगवान आणी थरारक..
हा क्रमश: तेवढा आवडला नाही.. :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
8 Jun 2009 - 9:38 am | विशाल कुलकर्णी
सगळ्यांचे आभार. दुसरा भाग टाकला आहे.
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...