एका लग्नसमारंभाची सफर (भाग १)

जागु's picture
जागु in जनातलं, मनातलं
26 May 2009 - 4:01 pm

काही दिवसांपुर्वी आमच्या शेजारीच एका नात्यातल्या मुलाचे लग्न होते. लग्न मुलीच्या निवास स्थानी सुधागड तालुक्यात होते. त्यांच्या घरी दोन बहीणिंची लग्न दोन तासांच्या फरकाने होती. आमच्या मुलाचे लग्न साडेबारा तर त्याच्या मेव्हणीचे २.३० ला होते.

नवरदेवाच्या घरापासुन विवाहस्थळ २ तासांच्या अंतरावर होते. विवाह स्थळी पोहोचण्यासाठी वर्‍हाडी मंडळींसाठी सुत्रधार मंडळींनी एक बस ठरवली होती. ही बस नवरदेवाच्या घरासमोरच्या रोडवरून ठिक ९.३० ला निघणार होती. आम्ही वर्‍हाडी असल्याने सकाळी घाई गोंधळ करत आटपून नटुन ९.२५ ला नवरा काढण्यासाठी त्याच्या घरी गेलो. नवर देवाची आणि त्याच्या काही जवळच्या माणसांच्या गाड्या लग्नसफरीसाठि सज्ज झाल्या होत्या. आमच्यासाठी ठरवलेली बस अजुन पोहोचली नव्हती. पण नवर्‍याच्या निघण्याच्या गोंधळात तिकडे कोणाचे जास्त लक्ष नव्हते. सुत्रधरांनी आम्हाला सांगितले की बस रस्त्यात आहे ती येईल इतक्यात, तोपर्यंत आम्ही पुढे जातो. तुम्ही लगेच या मागाहुन. मग वाजत्-गाजत बरोब्बर ९.३० वाजता नवरा त्याच्या फुलांच्या शृंगाराने सजलेल्या गाडीत बसला. गाडीसमोर नारळ फुटला आणि नवरा आणि इतर मंडळी आम्हाला बाय बाय करुन पुढे निघाली. जाण्याच्या गोंधळात ही मंडळी नवरा नवरीचे हार रस्त्याच्या कट्यावर विसरून गेली. आमच्या हे लक्षात येताच आम्ही त्यांना फोन करुन कळवले व आम्ही ते सोबत घेऊन येण्याची हमी दिली.

आता उरलेले बस मधुन जाणारे ८-१० बच्चे कंपनी आणि आमचे ३५-४० लोकांचे वर्‍हाड रस्त्यावर बस च्या दिशेने टक लाऊन होते. कुठलीही बस किंवा गाडीचा आवाज आला की ही आपलीच बस आहे असे वाटायला लागले. पण त्यापैकी एकही बस आमच्या समोर उभी राहत नव्हती. मग आमचे हळू हळू आमचे ठरावीक महिला मंडळ, मित्रपरीवार, बच्चे कंपनी आणि इतर असे वेगवेगळे ग्रुप रस्त्याच्या दोन्ही कडांना मिरवू लागले. मग विरंगुळा आणि आम्ही नटलेले होतो म्हणून फोटोसेशन चालू झाले. १०.३० वाजता कुणीतरी कुजबुजले की बस पेट्रोलपंपावर येऊन थांबली आहे. तिला पत्ता सापडत नाही. तेंव्हा आमचे काही तरूण विर बाईक घेऊन पेट्रोल पंपावर बस शोधण्यासाठी गेले. पण तिथे त्यांना कुठलीच बस आपला पत्ता शोधताना दिसली नाही. ते परत आले आणि पुढे गेलेल्या सुत्रधार मंडळींना फोन करुन बसची चौकशी करण्यास सांगितले. थोड्यावेळाने त्यांचा फोन व समजले की बस रस्ता चुकली होती. आता तिला योग्य रस्ता सापडला आहे व ती आता पोहोचेलच. ११ वाजले होते. बच्चे कंपनींच्या पोटात कावळ्यांनी तमाशा घातला होता. त्यामुळे त्यांची मस्ती मंदावली होती. मग आम्ही जवळच्या दुकानात जाऊन त्यांच्यासाठी खाऊ आणुन दिला. उभ राहून पाय दुखल्या मुळे सगळे जण रस्त्याच्या कडेचे दगड, कट्टयांवर आसन मांडून बसली होती.

पुढे निघालेल्या वर्‍हाडांपैकी एक दोन माणसे सारखी मधुन मधुन फोन करुन राहीलेल्या दोन सांगकामी मामांबद्दल सारखी विचारपुस करत होते आणि त्यांना घरी जाऊ न देता गाडीत निट घेऊन येण्याचे सल्ले देत होते. ही दोन माणसे साधारण ५० शीच्या आसपासची असतील. कदाचित त्यांची तब्बेत ठिक नसल्यामुळे किंवा तिकडे त्यांना काही त्यांची मदत लागणार असेल म्हणून त्यांची सारखी चौकशी करत असतील.

११.३० झाले तरी बस अजुन आली नाही म्हणून तरुण विरांनी परत बसच्या सुत्रधारांना फोन केला आणि तरुण विरांचे चेहरे काहीशे वेगळेच जाणवले. मग त्यांच्या कुजबुजीतुन समजले की बस रस्त्यातच ब्रेकडाऊन झाली आहे. ती येणार नाही. तुम्ही दुसरी बस करुन या. आता आमचा मेकअप उतरला आणि रागाचा पारा चढला होता. कंटाळल्यामुळे संबंधांनी लाब असलेली काही डोकी आमच्या संख्येतून गळती झाली. तरूण विर परत बस च्या शोधात निघाले.

आपण आता इथेच कुठेतरी पिकनिक करुया, घरू जाऊन मस्त आराम करुया, आता एकदम वरातीलाच येऊया असे बेत आखत लग्नाच्या सुत्रधरांवर आम्ही टिकास्त्रे फेकत होतो. पण ह्यापैकी काहीच करु शकत नव्हतो कारण मुलाच्या लाघवी स्वभावामुळे त्याचे लग्न टाळावे असे कोणालाच वाटत नव्हते. एवढ्यात बस शोधायला गेलेली मंडळी आली आणि एकही बस नसल्याचे घोषित करुन आपआपसात सल्लामसलत करुन ४ सुमो करुन जाण्याचा बेत केला. लगेच धडाधड फोन करून ४ सुमो मागवल्या व त्या १५ मिनीटांत हजर झाल्या.

आता आमच्या वर्गवारीप्रमाणे आम्ही सुमोत जाऊन बसलो. नुकतीच वयात आलेली मुले - मुली व लग्नाचे हार , एकात तरूण, तडफदार पुरुष मित्रमंडळ व २ सांगकामे मामा आणि आमचे महीला मंडळ व त्यांच्या मदतीसाठी एक तरूणविर व एक किशोरवयीन मुलगा आणि एका सुमोत राहीलेली इतर मंडळी. अशाप्रकारे आम्ही ठिक १२ वाजता तो रस्त्याला राम राम करून लग्नसमारंभाच्या प्रवासाला निघालो.

प्रवासविरंगुळा

प्रतिक्रिया

अनंता's picture

26 May 2009 - 4:35 pm | अनंता

जेवण तरी मिळाले का नाही?
सांगा लवकर.

प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

रेवती's picture

26 May 2009 - 4:48 pm | रेवती

पुढे काय झाले?
रेवती

घाशीराम कोतवाल १.२'s picture

26 May 2009 - 5:51 pm | घाशीराम कोतवाल १.२

अहो जेवण मिळाले का कि तिकडे पण पोपट झाला तुमचा?

***********************************************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

संदीप चित्रे's picture

26 May 2009 - 6:44 pm | संदीप चित्रे

त्या अडीच वाजताच्या लग्नालाच पोचलात की काय ?

सँडी's picture

26 May 2009 - 8:21 pm | सँडी

आता आमचा मेकअप उतरला आणि रागाचा पारा चढला होता.
हाहाहा! हे मस्तच. :)

पुढील भाग येउ द्यात लवकर...

प्राजु's picture

26 May 2009 - 8:38 pm | प्राजु

हाहाहा...
वर्‍हाडीमंडळींची चांगलीच कुचंबणा झाली..
पुढे काय झाले?? वाचायला लवकर मिळूदे..:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

समिधा's picture

26 May 2009 - 11:45 pm | समिधा

पुढे काय झाले?

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)