जागतिकीकरणाची कहाणी भाग ३: डेव्हिड रिकार्डोचे तत्व

क्लिंटन's picture
क्लिंटन in काथ्याकूट
8 May 2009 - 2:02 pm
गाभा: 

यापूर्वीचे लेखन
जागतिकीकरण म्हणजे काय?
जागतिकीकरणाचे फायदे आणि तोटे

मागील भागात आपण जागतिकीकरणाच्या फायद्याचा तोट्यांचा विचार केला. आता या भागापासून आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे वळू या.यात डेव्हिड रिकार्डो या ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञाचे तुलनात्मक सरसता (कम्पॅरेटिव्ह ऍडव्हांटेज) हे तत्व महत्वाचे आहे.

उदाहरण सोपे करायला जगात केवळ दोनच देश आहेत-- भारत आणि अमेरिका असे समजू.तसेच केवळ दोनच वस्तूंचा व्यापार होतो -- कापड आणि धान्य असे समजू. सोयीसाठी दोन्ही देशांचे चलन एकच आहे (रुपया) असे समजू.

समजा अमेरिका या दोन्ही गोष्टी (कापड आणि धान्य) भारतापेक्षा स्वस्तात उत्पादित करू शकत असेल तर वरकरणी असे वाटू शकते की अमेरिका केवळ निर्यातच करणार आणि भारत केवळ आयातच करणार.म्हणजे वरकरणी असे वाटू शकेल की दोन देशांमधील व्यापार केवळ अमेरिकेच्या फायद्याचा असेल. पण डेव्हिड रिकार्डोने त्याच्या तत्वातून दाखवून दिले की या परिस्थितीतही दोन देशांमध्ये दोन्ही देशांना फायदेशीर व्यापार होऊ शकतो.

डेव्हिड रिकार्डोच्या तत्वासाठी असलेली गृहितके अभ्यासण्यापूर्वी Opportunity Cost या संकल्पनेची माहिती करून घेणे गरजेचे आहे.

संकल्पना क्रमांक २: Opportunity Cost
अमेरिकन लेखकांनी लिहिलेल्या अर्थशास्त्रावरील पुस्तकांमध्ये ही संकल्पना समजावून सांगायला एक उदाहरण या ना त्या पध्दतीने नेहमी दिलेले असते. हायस्कूल (१२ वी) झाल्यानंतर विद्यार्थी विद्यापीठात पदवी मिळवायला जातो.समजा त्याचा दरवर्षीचा खर्च (फी,पुस्तके,राहणे-खाणे यांचा) ३०,००० डॉलर आहे.यात फी समजा २०,००० डॉलर, पुस्तके २,००० डॉलर आणि राहणे-खाणे-कपडे यांचा खर्च ८,००० डॉलर आहे असे समजू. तर ४ वर्षांच्या पदवीचा एकूण खर्च किती?वरकरणी हा प्रश्न अत्यंत साधा आणि सरळ वाटेल आणि त्याचे उत्तर ३०,००० गुणिले ४ म्हणजे १२०,००० डॉलर असे वाटेल.पण Opportunity Cost या तत्वाप्रमाणे हे उत्तर दरवर्षी ३०,००० डॉलर नाही आणि एकूण खर्च १२०,००० डॉलर पण नाही.

विद्यार्थी विद्यापीठात गेला नाही आणि घरी राहिला तरी त्याला राहणे-खाणे-कपडे यासाठी खर्च करावाच लागणार आहे.घरी राहिल्यामुळे खर्च अर्थातच कमी येईल. समजा तो दरवर्षी ४,००० डॉलर येत असेल.आणि विद्यापीठात गेल्यामुळे त्याला बाहेर राहावे लागते आणि खर्च वाढून दरवर्षी ८,००० डॉलर होतो.याचाच अर्थ विद्यापीठात गेल्यामुळे विद्यार्थ्याला जास्तीचे ४,००० डॉलर खर्च करावे लागतात.कारण त्याला ४,००० डॉलर घरी राहिला असता तरी खर्च येणारच होता.तेव्हा त्यापासून सुटका नाही.तेव्हा राहणे-खाणे-कपडे यांची Opportunity Cost ही दरवर्षी ८,००० डॉलर नसून ४,००० डॉलर आहे.

तसेच अमेरिकेतील जीवनपध्दतीप्रमाणे १२ वी झालेले अनेक विद्यार्थी मॉल किंवा मॅकडॉनल्ड यासारख्या ठिकाणी तासाला कमीतकमी ६-७ डॉलरवर आठवड्याला ४० तास काम करतात.शिकायची इच्छा नसलेले लोक विद्यापीठात न जाता अशाच ठिकाणी काम करून महिन्याला १००० डॉलरपर्यंत कमीतकमी कमावू शकतात.तेव्हा विद्यार्थी शिकायला गेला नाही तर त्याला वर्षाला १२,००० डॉलर इतके उत्पन्न मिळू शकते.पण अभ्यासामुळे त्याला तासाला ४० तास काम करणे शक्यच होणार नाही.समजा त्याला आठवड्यात सरासरी १५ तास काम करणे शक्य झाले तर त्याला वर्षाला ४,५०० डॉलर इतकेच उत्पन्न मिळेल.तेव्हा विद्यापीठात जायची Opportunity Cost म्हणजे त्याने दरवर्षी पाणी सोडलेले ७,५०० डॉलर (१२,००० वजा ४,५००).

तेव्हा ४ वर्षात मिळत असलेल्या पदवीचा खर्च दरवर्षी २०,००० डॉलर फी+राहणे-खाणे-कपडे यांची Opportunity Cost ४,००० डॉलर + काम न करता शिकत राहिल्यामुळे पाणी सोडावे लागलेले ७,५०० डॉलर असा ३१,५०० डॉलर इतका असेल.वरकरणी दिसायला वर्षाला ३०,००० डॉलर खर्च वाटेल पण प्रत्यक्षात खर्च ३१,५०० डॉलर होईल.

तेव्हा Opportunity Cost म्हणजे What you have to give up in order to earn something अशी व्याख्या आहे.रिकार्डोचे हे तत्व कळायला ही संकल्पना समजावून घेणे गरजेचे आहे. आता वळू या रिकार्डोच्या गृहितकांकडे.

१. कापड आणि धान्य या दोन्ही गोष्टींची Opportunity Cost स्थिर आहे.

समजा समाजाने आपल्याकडील सगळे स्त्रोत केवळ कापड उत्पादनासाठी वापरले तर त्यातून १००० वार कापड निर्मिती होत असेल.यात धान्यासाठी योग्य असलेल्या जमिनीवरही कापूस उगवले जात असतील.तेव्हा यापैकी थोड्या जमिनीवर धान्याऐवजी कापूस लावला तर ती जमिन कापसासाठी योग्य असल्यामुळे धान्याचे उत्पादन वाढेल त्या प्रमाणात कापसाचे उत्पादन कमी होणार नाही.म्हणजे १००० वार कापडाऐवजी Production Possibility Frontier वरील दुसरा बिंदू ९०० वार कापड आणि २०० माप धान्य असा असेल.म्हणजे यावेळी २०० माप धान्याची Opportunity Cost १०० वार कापड आहे. समाजाने अधिकाधिक जमिन कापसाकडून धान्याकडे वळवली तर त्यात कापसासाठी योग्य असलेली जमिनही धान्यासाठी वापरली जाईल.या जमिनिची धान्य पिकवायची Productivity पूर्वीपेक्षा कमी असेल. त्यामुळे आणखी २०० माप धान्य पिकविण्यासाठी Opportunity Cost १०० पेक्षा जास्त वार कापड (समजा १५० वार) असेल. याचाच अर्थ धान्याच्या उत्पादनात तेवढीच वाढ होण्यासाठी अधिकाधिक कापूस Opportunity Cost म्हणून मोजावा लागेल.या तत्वाला Law of diminishing returns असे म्हणतात आणि एका मर्यादेनंतर हे तत्व लागू पडते.या कारणामुळे Production Possibility Frontier हे बाहेरून फुगीर असते.

आता रिकार्डो म्हणतो की Opportunity Cost वाढत न जाता स्थिर आहे. याचाच अर्थ २०० माप धान्य मिळवायला प्रत्येक वेळी १०० वार कापड एवढीच Opportunity Cost मोजावी लागेल. त्यात कोणताही बदल होणार नाही.याचाच अर्थ अशा समाजाचे Production Possibility Frontier हे बाहेरून फुगीर न राहता एक सरळ रेषा असेल.

२. समाजातील सर्व स्त्रोत पूर्णपणे वापरले जातील आणि बेकारी नसेल. म्हणजेच समाज नेहमी Production Possibility Frontier वरच असेल.

३. धान्य आणि कापड यांच्या निर्मितीसाठी लागणारी साधनसामुग्री आपापसात mobile असेल म्हणजेच वाटले तर कधीही कापसासाठी लागणारी जमिन धान्यासाठी वापरता येऊ शकेल.मात्र एका देशातील साधनसामुग्री त्याच देशात mobile असेल त्याचा दुसर्‍या देशात वापर करता येणार नाही.

४. दोन्ही देशात Perfect competition असेल म्हणजे कोणत्याही उद्योगाची monopoly कुठच्याच देशात असणार नाही.

समजा भारत एक वार कापड ५० रुपयात आणि एक माप धान्य ५० रुपयांत उत्पादित करू शकतो.आणि अमेरिका एक वार कापड २०० रुपयात आणि एक माप धान्य १०० रुपयांत उत्पादित करू शकते.याचाच अर्थ भारत दोन्ही गोष्टी अमेरिकेपेक्षा स्वस्तात उत्पादित करू शकतो.

याचाच अर्थ भारतासाठी Opportunity Cost पुढीलप्रमाणे असेल--
१ माप धान्याची Opportunity Cost १ वार कापड
१ वार कापडाची Opportunity Cost १ माप धान्य

आणि अमेरिकेसाठी Opportunity Cost पुढीलप्रमाणे असेल--
१ माप धान्याची Opportunity Cost २ वार कापड
१ वार कापडाची Opportunity Cost ०.५ माप धान्य

याचाच अर्थ Opportunity Cost च्या दृष्टीने विचार केला तर भारत कापड तर अमेरिका धान्य अधिक स्वस्तात उत्पादित करू शकेल.म्हणजेच भारताला कापडाच्या बाबतीत आणि अमेरिकेला धान्याच्या बाबतीत तुलनात्मक सरसता आहे.

डेव्हिड रिकार्डो म्हणतो की अशा परिस्थितीत दोन्ही देशांनी आपल्याला जी गोष्ट स्वस्तात उत्पादित करता येते तीच उत्पादित करावी दोन्ही गोष्टींचे उत्पादन करायच्या भानगडीत पडू नये.म्हणजे भारताने केवळ कापड तर अमेरिकेने केवळ धान्य उत्पादित करावे आणि दुसरी वस्तू आयात करावी.

समजा दोन्ही देश कापड आणि धान्याचे प्रत्येकी १००० युनिट उत्पादित करू शकत असतील.तर दोन्ही देशांचा धान्याचा आणि कापडाचा एकूण खप
२००० युनिट असेल.

रिकार्डोच्या म्हणण्याप्रमाणे भारताने केवळ कापडाचे उत्पादन केले असे समजू.म्हणजे भारत यापूर्वी १००० वार कापड उत्पादित करतच होता.तसेच १००० माप धान्य उत्पादित न करता ते स्त्रोत कापडाच्या उत्पादनासाठी वापरले तर त्यापासून आणखी १००० वार कापड उत्पादित करता येईल. (कारण Opportunity Cost प्रमाणे भारताने १ माप धान्याची किंमत मोजली तर १ वार कापड तयार करता येईल.) म्हणजे भारताचे एकूण कापडाचे उत्पादन २००० वार होईल.

त्याचप्रमाणे अमेरिकेने केवळ धान्याचे उत्पादन केले असे समजू.म्हणजे अमेरिका यापूर्वी १००० माप धान्य उत्पादित करतच होता.त्याच बरोबर १००० वार कापड उत्पादित न करता ते स्त्रोत धान्यासाठी वापरले तर त्यापासून आणखी २००० माप धान्य उत्पादित करता येईल. (कारण Opportunity Cost प्रमाणे अमेरिकेने १ वार कापडाची किंमत मोजली तर त्यातून २ माप धान्य उत्पादित करता येईल.) म्हणजे अमेरिकेचे धान्याचे एकूण उत्पादन ३००० माप होईल.

याचाच अर्थे रिकार्डोने सांगितल्याप्रमाणे केले तर दोन देशांमधील एकूण धान्याचे उत्पादन ३००० माप होईल तर कापडाचे उत्पादन २००० वार होईल. यापूर्वी हेच आकडे प्रत्येकी २००० होते. म्हणजेच भारत देश दोन्ही गोष्टी अधिक स्वस्तात उत्पादन करू शकत असेल तरीही त्यातून रिकार्डोच्या तत्वाप्रमाणे अधिक उत्पादन होऊन दोन्ही देशांमध्ये दोघांनाही फायदेशीर व्यापार होऊ शकतो.

आपल्या दैनंदिन व्यवहारातील एक यासारखे उदाहरण घेऊ म्हणजे समजायला ते अधिक सोपे जाईल.एखाद्या वकिलाला न्यायालयात युक्तीवाद करणे आणि संगणकावर टायपिंग करणे या दोन गरजा आहेत.आणि या दोन्ही कामांमध्ये वकिल आपल्या सेक्रेटरीपेक्षा अधिक उजवे आहेत.तरीही वकिलांनी आपला वेळ संगणकावर टायपिंग करण्यात घालवू नये कारण तोच वेळ त्यांनी न्यायालयात युक्तीवाद करायला वापरला तर त्यातून त्यांना नक्कीच फायदा आहे.त्याचप्रमाणे न्यायालयात युक्तीवादासाठीचे एक वाक्य बोलण्यासाठी बहुदा सेक्रेटरीला बराच वेळ खर्च करावा लागेल.इतका वेळ खर्च करण्यापेक्षा सेक्रेटरीने आपला वेळ टायपिंग करण्यासाठी वापरला तर त्यापासून अधिक फायदा आहे.तेव्हा प्रत्येकाने जी गोष्ट अधिक चांगल्या पध्दतीने करता येते ती करावी. याचा अर्थ सेक्रेटरीने आपला कौशल्यसंच (स्कीलसेट) वाढवू नये असा अजिबात नाही.सेक्रेटरीने जरूर वकिलीचा अभ्यास करावा आणि स्वत: वकिल व्हावे.पण तोपर्यंत तरी टायपिंगचे काम करणे सेक्रेटरीला लाभदायक आहे.

डेव्हिड रिकार्डोच्या तत्वात स्थिर Opportunity Cost हे एक गृहितक आहे.प्रत्यक्षात तशी परिस्थिती नसते.अशावेळीही त्याचे तत्व लागू आहे हे दाखवता येऊ शकते.फक्त एक फरक म्हणजे या परिस्थितीत पूर्णपणे Specialization न होता दोन्ही देश दोन्ही गोष्टी कमी-अधिक प्रमाणात उत्पादित करतात.पण ज्या गोष्टीची Opportunity Cost कमी आहे त्या गोष्टीवर अधिक भर दिल्यास त्यापासून फायदा होऊ शकतो हे दाखवता येते.

भारतातील डाव्या आणि उजव्या बाजूंच्या स्वदेशीप्रेमींचा आंतरराष्ट्रीय व्यापाराला विरोध असतो कारण त्यातून आपल्या देशाचे नुकसान होईल असे त्यांना वाटते.पण मागच्या भागात म्हटल्याप्रमाणे आपल्या देशाचा Core competence कशात आहे हे लक्षात घेऊन त्या वस्तू/सेवेच्या उत्पादनावर लक्ष दिल्यास आपल्या देशासाठीही फायदेशीर व्यापार करता येऊ शकतो हे पक्षात येईल.१९९१ साली राव-मनमोहन सिंह यांनी अंमलात आणलेल्या नव्या आर्थिक धोरणांतून भारताला आपल्या सेवा क्षेत्रातील Core competence वर लक्ष द्यायची संधी मिळाली आणि त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली.

मागील लेखाप्रमाणे या लेखातूनही एखादा मुद्दा पूर्णपणे स्पष्ट नसेल किंवा काही तृटी राहिली असेल तर दाखवून द्यावी ही विनंती.

आता यापुढील भागात जागतिक व्यापार संघटनेचा (World Trade Organization) विचार करू.

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

8 May 2009 - 5:45 pm | श्रावण मोडक

वाचतो आहे.
ऑपॉर्च्युनिटी कॉस्टविषयी भारत-अमेरिका यांच्यासंबंधातील उदाहरण कळण्यास कठीण जाते आहे (ही माझ्या बौद्धीक क्षमतेची मर्यादा असू शकते).

क्लिंटन's picture

9 May 2009 - 4:22 pm | क्लिंटन

Opportunity Cost ची संकल्पना अधिक स्पष्ट करायचा प्रयत्न करतो.

समजा एखादा विद्यार्थी २ वर्षांच्या नोकरीनंतर २ वर्षाच्या उच्च शिक्षणासाठी जात आहे.त्या शिक्षणाचा दोन वर्षांचा एकूण खर्च ३ लाख रुपये येईल असे समजू.आणि त्याला सध्या वर्षाला ३ लाख पगार आहे असे समजू.याचाच अर्थ दोन वर्षाच्या काळात तो नोकरी करत नसणार आणि त्याची किंमत त्याला ६ लाख मोजावी लागेल (दरवर्षी ३ लाख). आणि शिक्षणाचा खर्च ३ लाख करावाच लागणार आहे. तेव्हा वरकरणी शिक्षणासाठीचा खर्च ३ लाख वाटला तरी प्रत्यक्षात त्याहूनही तो जास्त आहे.कारण दोन वर्षे नोकरी न केल्यामुळे त्याला आणखी ६ लाखावर पाणी सोडावे लागणार आहे.तेव्हा उच्च शिक्षणाची Opportunity cost एकूण ३+६=९ लाख आहे.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

संदीप चित्रे's picture

8 May 2009 - 7:39 pm | संदीप चित्रे

वाचायला हवा... जरा निवांतपणे नंतर वाचतो.

नितिन थत्ते's picture

8 May 2009 - 9:25 pm | नितिन थत्ते

हा व्यापार तरच चालू शकेल जर भारताकडे दोघांना पुरेल एवढे कापड आणि धान्य दोन्ही बनवण्याची क्षमता नाही. अन्यथा दोन्ही भारतानेच बनवणे श्रेयस्कर होईल. अशा स्थितीत अमेरिकेला व्यापारावर निर्बंध आणावे लागतील आणि महाग असले तरी अमेरिकेत उत्पादन करावेच लागेल.

या व्यापारातला एक धोका असा की अमेरिकेत दोन्ही गोष्टींचे अधिक मूल्य मिळते म्हणून भारतातून स्थानिक जनतेला टंचाईत ठेवून दोन्ही गोष्टींची अदिकाधिक निर्यात करण्याकडे कल असेल.

भारतातील डाव्या आणि उजव्या बाजूंच्या स्वदेशीप्रेमींचा आंतरराष्ट्रीय व्यापाराला विरोध असतो कारण त्यातून आपल्या देशाचे नुकसान होईल असे त्यांना वाटते.

दोघांचाही विरोध विचित्र कारणांसाठी असतो.
डाव्यांना पाश्चात्यांचे (खरे म्हणजे अमेरिकेचे) काही नको असते. यामागे त्यांच्या जुन्या मार्गदर्शकांचा त्यावेळचा तात्विक विरोध हे कारण असते.
उजव्या (म्हणजे भाजपच्या) लोकांचा विरोध सांस्कृतिक कारणासाठी असतो. ते तुम्हाला कधी मोटारगाड्या वगैरेंना विरोध करताना दिसणार नाहीत. पण पाश्चात्य (पक्षी: ख्रिश्चन) संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात असे वाटणार्‍या गोष्टींना विरोध करताना दिसतील. उदा. कोका कोला, मॅकडोनाल्ड वगैरे.

खराटा
(रंग माझा वेगळा)

धनंजय's picture

8 May 2009 - 9:28 pm | धनंजय

लेख माहितीपूर्ण आहे, आणि उत्साहाने वाचत आहे.

रिकार्डो दाखवतो, की प्रत्येक देशाने आपल्या ठिकाणी सर्वाधिक कार्यक्षमतेते होणारे उत्पादन केले, तर पूर्ण जगाचा हिशोब लावला, तर उत्पादन वाढलेले दिसेल.

परंतु या वाढीव उत्पादनाचा फायदा कोणाला होईल, त्याचा कुठलाच हिशोब दिला जात नाही.

वर अमेरिका-भारत :: शेती-कपडा हे उदाहरण दिलेले आहे, ते इतिहासात पात्रे बदलून घडून आलेले आहे.

१६००-१८०० काळात इंग्लंड-हिंदुस्तान :: कापड-कापूसशेती असे ते उदाहरण होय.
पूर्वी इंग्लंडात थोडासा कपडा निर्माण होई, आणि थोडेसे तंतुकृषि (लोकर) उत्पादन होई.
हिंदुस्तानात काही प्रमाणात कपडा निर्माण होई, आणि काही प्रमाणात कापूस उत्पादन होई.

ऑपर्ज्युनिटी कॉस्टांचा हिशोब करता, भारतात कपाशीचे उत्पन्न अधिक कार्यक्षमपणे होऊ शकत होते, आणि इंग्लंडात यंत्रमागावर कापड उत्पादन अधिक कार्यक्षमपणे होऊ शकत होते.

ब्रिटिश साम्राज्याच्या कृपेने असे उत्पादन-वैशिष्ट्य दोन्ही देशांत सार्वत्रिक झाले. इंग्लंडमध्ये ग्रामीण लोकांना गावांतून हाकून शहराकडे पाठवले, तिथे तंतु-कृषि कमी झाली, कापड कारखाने खूप वाडले. हिंदुस्तानात कपड्याचे हातमाग तोडून लोकांना शेती करायला पाठवले.

यापुढे इंग्लंड+भारत असा एकत्र हिशोब केला, तर कपाशीचे उत्पादन पूर्वीपेक्षा अधिक होते, आणि कापडाचे उत्पादनही पूर्वीपेक्षा अधिक होते. रिकार्डोच्या गणिताचा ताळा जुळतो.

प्रश्न हा आहे, की या वाढलेल्या जागतिक उत्पादनामुळे आलेली सुबत्ता हिंदुस्तान/इंग्लंड या दोन दोशांनी कुठल्या प्रमाणात वाटून घेतली? रिकार्डोच्या गणितावरून त्याबद्दल आपल्याला काहीच सुगावा लागत नाही, भाकीत करता येत नाही. इतिहासावरून असे दिसते, की हिंदुस्तानातील लोकांना या वाढीव जागतिक उत्पन्नाचा फारसा फायदा मिळाला नाही, तर इंग्लंडला भरपूर फायदा मिळाला.

(कागदोपत्री साम्राज्य असल्याची तितपत गरज नाही. विसाव्या शतकात आणि आज काँगो इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी लागणारे खनिज कार्यक्षमपणे उत्पादन करतो, दक्षिण कोरिया सेल-फोन वगैरे अधिक कार्यक्षमपणे उत्पादन करतो. विशेषउत्पादनच केल्यामुळे खनिज आणि फोन-संच दोन्ही अधिक प्रमाणात बनतात. रिकार्डोचे गणित ++! पण याचा फायदा काँगो आणि दक्षिण कोरिया कुठल्या प्रमाणात वाटून घेतात>)

देशाच्या सरकारांना एकूण जागतिक उत्पादन वाढवण्याची जबाबदारी नसते. (कल्याणकारी किंवा प्रजाहितदक्ष राज्य असेल) तर देशातील प्रजेचे त्यातल्या त्यात बरे व्हावे, अशीच दृष्टी ठेवण्याचे त्यावर बंधन आहे, एकूण जागतिक उत्पादन किती का असेना.

म्हणूनच रिकार्डोच्या गणिताचा दाखला देऊन सरकारांनी काय धोरणे ठेवावीत, असे काही सांगता येत नाही.

एक शक्यता आहे, ती बघूया. पूर्ण भारतात एकच केंद्र सरकार आहे, आणि सर्वांना लोकसभेत करभाराच्या हिश्श्यासाठी दावा सांगता येतो. भारतातल्या भारतात प्रादेशिक स्पेशलायझेशन होऊन अखिल-भारताचे उत्पादन वाढवूया, असे रिकार्डोच्या गणितावरून कदाचित म्हणता येईल. पण बहुधा नाही. महाराष्ट्राने औद्योगिक उत्पन्न करावे, बिहारने शेती-खनिज उत्पन्न करावे, असे स्पेशलायझेशन झाल्याने लोक एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जायला लागले. आणि बराच दंगा झाला. त्यामुळे रिकार्डोचे गणित वापरून भारतातही आंतरप्रांतीय धोरण ठरवता येत नाही. बिहारातले लोक बिहारातच राहावे, इतपत उत्पादनवैविध्य बिहारात असावे, आणि तसेच भरपूर उत्पादनवैविध्य महाराष्ट्रातही असावे, असे म्हणणारे लोक आपल्याला दिसतील.

नितिन थत्ते's picture

8 May 2009 - 10:09 pm | नितिन थत्ते

धनंजय यानी रिकार्डोच्या तत्त्वाच्या मर्यादा नेमके पणाने सांगितल्या आहेत.

दुसरे धनंजय यांच्या लेखातील "प्रश्न हा आहे, की या वाढलेल्या जागतिक उत्पादनामुळे आलेली सुबत्ता हिंदुस्तान/इंग्लंड या दोन दोशांनी कुठल्या प्रमाणात वाटून घेतली" हे वाक्य अधिक तपशीला त जाऊन दोन्ही देशातल्या कोणत्या लोकांनी वाटून घेतल्या असेही विचारता येईल.

कारण दोन्ही बाबतीत मूळ उत्पादकांची (इंग्लंडातील शेतकर्‍यांचे कामगार झालेल्यांची आणि भारतातील विणकरांचे शेतकरी झालेल्यांची) स्थिती हलाखीचीच राहिली. दोन्ही देशातील व्यापार्‍यांचा (शेती ज्यांच्या मालकीची होती त्यांचा आणि कारखाने ज्यांच्या मालकीचे होते त्यांचा) मात्र नक्कीच फायदा झाला. (परत हे मी लिहितोय की मेथांबा?)

खराटा
(रंग माझा वेगळा)

बेसनलाडू's picture

8 May 2009 - 10:48 pm | बेसनलाडू

लेख माहितीपूर्ण आहे, यात शंकाच नाही. वाचत आहे. रिकार्डोचे तत्त्व कळले; आणि त्यामुळे धनंजयांनी मांडलेला नफावाटपाचा मुद्दासुद्धा पटला. मला वाटते कर्क यांनीही हा मुद्दा उचलून धरला आहे. त्याबद्दल लेखकाची मते वाचायला आवडतील.
(विद्यार्थी)बेसनलाडू

अडाणि's picture

9 May 2009 - 5:37 am | अडाणि

वरील उदाहरणात थोडीशी गल्लत होतेय असे वाटते...
अमेरिका एक वार कापड २०० रुपयात आणि एक माप धान्य १०० रुपयांत
ह्या हिशोबाने...
अमेरिकेसाठी Opportunity Cost अशी असेल--
१ माप धान्याची Opportunity Cost ०.५ वार कापड
१ वार कापडाची Opportunity Cost माप धान्य
म्हणजे १ माप धान्य जास्त करायला ०.५ वार कापड कमी बनवावे लागेल... तुमचे 'अमेरिकेला धान्याच्या बाबतीत तुलनात्मक सरसता आहे' हे विधान बरोबर वाटते.. पण गणित चुकलेले दिसते...

अर्थात, 'अमेरिकेला धान्याच्या बाबतीत तुलनात्मक सरसता आहे' हे पटले तरी 'भारताला कापडाच्या बाबतीत तुलनात्मक सरसता आहे' हे कसे काय ? ज्र दोन्ही कॉस्ट सारख्याच असतील तर भारताला काय फरक पडतो... काहीही बनवा ना....

-
अफाट जगातील एक अडाणि.

श्रावण मोडक's picture

9 May 2009 - 9:32 am | श्रावण मोडक

असेच काहीसे वाटते. काही तरी गडबड वाटते हे निश्चित.

विजुभाऊ's picture

9 May 2009 - 10:47 am | विजुभाऊ

वरील सर्व उदाहरणात सकल उत्पादनासोबत एकूण अंतर्गत गरज ( कन्झ्युमिंग कॅपॅसिटी) ही कुठेच लक्षात घेतली गेली नाही.
कॉस्ट ऑफ ऑपोर्च्युनिटी रीझन फॉर पेइंग द कॉस्ट ऑफ ऑपॉर्च्युनिटी या घटकाचा कधीच विचार करु शकत नाही.
शिक्षण घेउन अधीक पगार मिळवायला प्रत्येकालाच आवडते पण शिक्षण प्रत्येकाला परवडतेच असे नाही.

आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी

क्लिंटन's picture

9 May 2009 - 4:10 pm | क्लिंटन

अंतर्गत गरज ही एक बदलणारी गोष्ट आहे.२० वर्षांपूर्वी भारतात भ्रमणध्वनी नव्हतेच.अशा गोष्टीचे अस्तित्वच लोकांना माहित नव्हते. पण आज भारतात भ्रमणध्वनींची बाजारपेठ खूप मोठी आणि गरजही मोठी आहे.तेव्हा मागील लेखात लिहिल्याप्रमाणे विविध M -- Men,Money,Material,Machine,Methods यात सुधारणा करत उत्पादनात वाढ करावी.नव्या गोष्टींचा शोध लावावा (भ्रमणध्वनीप्रमाणे) आणि त्या गोष्टींचेही उत्पादन वाढवावे. या बाजारपेठेवर आधारीत अर्थव्यवस्थेत जनताच आपल्याला काय पाहिजे आणि काय नाही हे ठरवेल.उदाहरणार्थ भ्रमणध्वनीची उपयुक्तता लोकांना वाटली नसती तर त्या गोष्टीची आजच्याइतकी मोठी मागणी नसती.अशा अनेक गोष्टी असतील की ज्यांची उपयुक्तता लोकांना वाटली नाही म्हणून त्यांची मागणी उभी राहिली नाही.तसेच कालबाह्य वस्तूंची मागणी कमी होऊन त्यांचे उत्पादन आपोआप कमी करणे उद्योजकांना भाग पडते.उदाहरणार्थ आज व्हिडियो कॅसेटला फारशी मागणी बाजारात नाही.पण ७-८ वर्षांपूर्वीपर्यंत बरीच मागणी होती.पण आज तेवढ्या प्रमाणात मागणी नसल्याने उत्पादित केलेल्या कॅसेट पडून राहतील आणि उत्पादकाला तोटा होईल.म्हणून पूर्वीपेक्षा कॅसेटचे उत्पादन आज कमी होते पण सीडी आणि डिव्हिडीचे जास्त होते.

म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्थेत आपल्याला काय हवे आणि किती प्रमाणात हवे आणि काय नको या गोष्टी बाजारच ठरवतो.हे मागणी आणि पुरवठ्याचे गणित सगळे बदल घडवून आणते.यालाच ऍडम स्मिथने ’अदृश्य हात’ म्हटले होते.सरकारने प्रत्येक गोष्टीत लक्ष घालायची गरज नाही.फक्त बेकायदेशीर व्यवहार होत असतील (अमली पदार्थ वगैरे) तर,मंदीच्या काळात अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आणि इतर वेळीही Monetary policy सांभाळण्यासाठी आणि फसवाफसवी होत असेल तर (सत्यमसारखी प्रकरणे) सरकारने मध्ये पडावे अन्यथा नाही अशी ही व्यवस्था आहे. या व्यवस्थेत बहुतांश गोष्टी लोकांवर सोडायच्या असतात.

काही लोक याला ’चंगळवाद’ म्हणतात.अनेकांना असे वाटते की काय करायचा आहे मायक्रोव्हेव किंवा भ्रमणध्वनी! अशी उपकरणे माणसाला परावलंबी बनवतात आणि म्हणून ती नकोतच.यालाही उत्तर तेच की लोकांना काय हवे ते त्यांना ठरवू दे.इतरांसाठी काय चांगले आणि काय वाईट हे ठरवायच्या भानगडीत कोणी पडू नये.ज्यातून हानी होऊ शकेल अशा गोष्टींना (अंमली पदार्थ किंवा इतर बेकायदेशीर आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या गोष्टी) सरकारने बंदी केली आहेच.ती योग्य प्रकारे पार पाडली जात नसेल तर जरूर आवाज उठवा.पण मॅकडॉनल्ड माझ्यासाठी चांगले की वाईट हे इतरांनी सांगू नये. तर मला ते चांगले वाटले तर मी तिथे जाईन आणि ते चांगले वाटले नाही तर तिथे जाणार नाही अशी व्यवस्था आहे.

तेव्हा सांगायचा मुद्दा हा की बाजारपेठेवर आधारीत अर्थव्यवस्थेत अंतर्गत मागणी कशाची आणि किती असावी हे लोकच ठरवतील.

'अंतर्गत गरज' यातून आपल्याला अजून काही वेगळे अभिप्रेत असल्यास सांगावे ही विनंती.

अवांतर:
१. यावरून असे दिसते की भांडवलशाही आणि ऍडम स्मिथचा ’अदृश्य हात’ या गोष्टी आणि लोकशाही राज्यपध्दती यांच्यात लोकांना स्वातंत्र देण्याबाबत साम्य जरूर आहे.याचा अर्थ लोकशाही आहे तिथे भांडवलशाही असते असा नाही पण लोकशाहीशिवाय भांडवलशाही टिकणे फार कठिण आहे.

२. याउलट केंद्रिय नियोजनावर आधारीत अर्थव्यवस्थेत प्रत्येक गोष्ट सरकार ठरवणार अशी व्यवस्था असते.कोणत्या उद्योगाला कच्चा माल किती द्यावा, उत्पादन काय करावे आणि किती प्रमाणात करावे, काय आयात करावे आणि काय निर्यात करावे या सगळ्या गोष्टी सरकार ठरवते.पूर्वीच्या सोविएट युनियनमध्ये आणि पूर्व युरोपात अशी व्यवस्था होती. तसेच राजकिय व्यवस्थेतही त्या देशांमध्ये सरकारमध्ये कोण हवे याविषयीचा निर्णय लोकांवर न सोडला जाता एकतर पॉलिट ब्युरो मध्ये किंवा बंदुकीच्या जोरावर घेतले जात असत (हंगेरी,अफगाणिस्तान).सामान्यत: प्रत्येक गोष्टीत ’तू अमूक कर तमूक कर, असेच कर तसे नको’ अशी इतर कोणाचीही लुडबूड वैयक्तिक जीवनातही झालेली लोकांना सहन होत नाही.आणि अशी लुडबूड या राज्यव्यवस्थेत आणि अर्थव्यवस्थेत सतत होत होती. मला वाटते की अशी शासनप्रणाली आणि अर्थव्यवस्था अपयशी ठरली यामागे हे कारण मोठे असेल.

---विल्यम जेफरसन क्लिंटन