जागतिकीकरणाची कहाणी भाग ७: जागतिकीकरण: पुढे काय?

क्लिंटन's picture
क्लिंटन in काथ्याकूट
13 May 2009 - 1:49 pm
गाभा: 

यापूर्वीचे लेखन
जागतिकीकरण म्हणजे काय?
जागतिकीकरणाचे फायदे आणि तोटे
डेव्हिड रिकार्डोचे तत्व
जागतिक व्यापार संघटना
आदर्श जागतिकीकरणातील अडथळे (पूर्वार्ध): सीमाशुल्क
आदर्श जागतिकीकरणातील अडथळे: उत्तरार्ध

जागतिकीकरणावरील लेखमालेच्या शेवटच्या भागात आता आपण पुढे काय या महत्वाच्या प्रश्नाचा विचार करू.यापूर्वीचे लेखन म्हणजे एकाप्रकारे ’थिअरी’ होती. Academicians सोडून थिअरीचा दैनंदिन जीवनात वापर फारसा कोणी करत नाही.तरीही जागतिकीकरणाच्या विविध अंगांचा परिचय व्हावा म्हणून थिअरीचा समावेश केला.पण यापुढचा भागाशी हा आपल्यापैकी सर्वांनाच कधीना कधी सामोरे जावे लागणार आहे म्हणून हा भाग महत्वाचा आहे.चर्चेचे स्वरूप ’ओपन एंडेड’ ठेऊ कारण आता जागतिकीकरणामुळे आपल्यावर होणारा परिणाम, त्याचा उपयोग कसा करून घ्यावा यासारख्या प्रश्नाचे उत्तर व्यक्तिपरत्वे बदलेल. तेव्हा मी या बाबतीत माझे मत लिहित आहे.

सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की सध्याच्या काळात आणि भविष्यात जागतिकीकरण हाच मूलमंत्र होणार आहे. सध्याच्या आर्थिक संकटामुळे समाजवाद किंवा अगदी कम्युनिझम आणा यासारख्या मागण्या होत आहेत पण त्या फार काळ टिकतील असे वाटत नाही.आर्थिक संकट दूर होताच जागतिकीकरण अधिक जोमाने होणार आहे यात शंका नाही.लेखमालेत म्हटल्याप्रमाणे मधल्या काळात अधिक त्रास होणार आहे.आणि त्याविरूध्द कितीही चर्चा केल्या तरी काळाचे चक्र थांबवता येणे खूपच कठिण आहे.तेव्हा हे शोषण आहे की नाही यावर विचार करण्यापेक्षा यापासून आपल्याला कमीतकमी त्रास आणि अधिकाधिक फायदा कसा करून घेता येईल यावर विचार करणे आणि त्या दिशेने पावले उचलणे अधिक श्रेयस्कर ठरणार आहे.

सरकारने काय करावे यावर लंबीचवडी भाषणे देता येतील.पण माझा उद्देश सरकारने काय करावे यापेक्षा आपल्यासारखे सामान्य लोक काय करू शकतो आणि काय करणे गरजेचे आहे हे लिहिणे आहे.ढोबळ मानाने मला पुढील मुद्दे सुचतात.

१. समाजाने आपला Core competence शोधून काढण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीने आपला Core competence कशात आहे हे शोधून काढणे अत्यंत गरजेचे आहे.आणि त्या क्षेत्रात आपण अधिकाधिक प्रगती कशी करू शकतो हे बघितले पाहिजे.या बाबतीत समाजाची भूमिका महत्वाची आहे असे वाटते.आजच वर्तमानपत्रात वाचले की महाराष्ट्रात २२१ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत.प्रत्येक महाविद्यालयात चारही वर्षाचे मिळून सरासरी १००० विद्यार्थी म्हटले तरी यापुढील काळात दरवर्षी महाराष्ट्रातूनच २ लाख अभियंते पदवी घेऊन बाहेर पडतील.आता या दोन लाखांपैकी किती विद्यार्थी स्वत:च्या प्रेरणेने अभियांत्रिकीला जातात आणि किती समाजाचे ’प्रेशर’ म्हणून जातात हा संशोधनाचाच विषय आहे.जर अभियांत्रिकी हा आपला Core competence नसेल तर त्या क्षेत्रात दर्जेदार काम कधीच होऊ शकणार नाही.

पूर्वी केवळ अभियांत्रिकी क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध होत्या.आज चित्र काही प्रमाणात तरी बदलत आहे.तेव्हा विद्यार्थ्यावर निर्णय घेताना समाजाचा दबाव न येता तो/ती आपल्या Core competence च्या क्षेत्रात पुढे जाऊ शकला/शकली पाहिजे.याविषयी मला एक गोष्ट सांगाविशी वाटते.हा किस्सा सांगितला होता आमच्या शाळेत बक्षिस समारंभास आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी.लोकमान्य टिळक हे प्रकांड पंडित होते आणि बुध्दीमत्तेवर अवलंबून असलेल्या अनेक क्षेत्रांमध्ये त्यांची झेप फार मोठी होती.पण त्यांच्या मुलास शिक्षणात फारशी गती नव्हती.लोकमान्य मंडालेला तुरूंगात असताना ’मी पुढे काय करू’ असा प्रश्न त्यांच्या मुलाने त्यांना विचारला त्यावर उत्तर देताना लोकमान्य एका पत्रात म्हणतात--"तू तुला जे काम आवडते आणि ज्या कामात गती आहे ते कर.तू व्यवसाय म्हणून चांभारकाम निवडलेस तरी काही हरकत नाही.पण जोडे इतके उत्तम बनव की लोकांनी आपण टिळकांनी बनविलेले जोडे वापरतो असे अभिमानाने म्हटले पाहिजे." मला वाटते वैयक्तिक पातळीवर Core competence चे अजून चपखल उदाहरण दिले जाऊ शकणार नाही. (अवांतर: आमच्या शाळेचे मुख्याध्यापक टिळक सर होते.त्यामुळे ’टिळकांनी बनविलेले जोडे’ यावर विद्यार्थ्यांमध्ये हशा पिकला होता)

समाजाची विचारधारा बदलायला वेळ लागेलच पण सुरवात आपल्यापासून करायला काय हरकत आहे?

२. जागतिकीकरणाच्या नव्या युगात बदल खूपच वेगाने घडत जाणार आहेत.तेव्हा प्रत्येकाने चार नव्या गोष्टी शिकायची तयारी ठेवलीच पाहिजे. संगणक क्षेत्रात नोकरीला असलेले मिपाकर त्यांच्या अनुभवातून सांगू शकतीलच की जावा किंवा तत्सम क्षेत्रात सहा महिन्यांची जरी ’गॅप’ पडली तरी किती बरेच मागे पडायला होईल.असेच बदल अनेकविध क्षेत्रांमध्ये होणार आहेत हे गृहित धरायलाच हवे.तसेच आपल्या क्षेत्रात दर्जेदार काम करण्यासाठी पण नव्या गोष्टी शिकणे भाग आहे.आपले काम आणि अपेक्षित मोबदला याचे गुणोत्तर इतरांपेक्षा चांगले हवे. आज नव्या संधी अमेरिकेतून भारतात येत आहेत म्हणून आपण आनंदात आहोत.पण हे गुणोत्तर चांगले राहिले नाही तर भारतातल्या नव्या संधी उठून भविष्यकाळात घाना किंवा नायजेरीयामध्ये जाऊ शकतील.

३. अमेरिकेत आलेल्या आर्थिक संकटामुळे भारतातील अनेकांच्या नोकर्‍या संकटात आल्या आहेत.तेव्हा एकापेक्षा जास्त मार्गाने पैसे कसे मिळतील याचा विचार करणेही गरजेचे आहे.कारण अशी आर्थिक संकटे सांगून येत नसतात.तेव्हा आपण तयारीत असलेले चांगले.

तसेच चांगल्या मार्गाने पैसे कमावता येत असतील तर त्या संधीस नाही म्हणून उपयोग नाही.नव्या जगात अनेक वेगवेगळ्या संधी निर्माण होत आहेत त्याचा फायदा करून घेता आला पाहिजे.एक उदाहरण द्यायचे झाले तर कॅट परीक्षा २००९ पासून संगणकावर होणार आहे.त्याचे कारण देताना आय.आय.एम नी म्हटले की २००३ मध्ये ९५,००० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर २००८ मध्ये २५०,००० विद्यार्थ्यांनी.सरकार नवी आय.आय.एम सुरू करणार आहे.पुढील १० वर्षात हाच आकडा १० लाखावर गेला तर त्यात नवल वाटू नये. (आता हा आकडा एवढा वाढेल की नाही मला माहित नाही.पण एक शक्यता आहेच).त्यापैकी अर्ध्या विद्यार्थ्यांनी तरी परीक्षेसाठीचे क्लासेस लावले तरी अनेक लाख विद्यार्थी या शिक्षण उद्योगाचे ’पोटेंशियल’ आहे. सध्या प्रत्येक विद्यार्थी फी म्हणून २०,००० रुपये नक्कीच मोजतो.तेव्हा पुढील १० वर्षांत या उद्योगात किती प्रचंड उलाढाल होईल याची कल्पना केलेलीच बरी.तीच गोष्ट आय.आय.टी जे.ई.ई ची.जर एखाद्याला शिकविण्याच्या पेशात गती आणि आवड असेल तर ’पार्ट टाईम’ काम करायला प्रचंड वाव आहे.जमनालाल बजाज या मुंबईतील अग्रगण्य मॅनेजमेंट संस्थेतून एम.बी.ए झालेले माझे मित्र अशा परीक्षांसाठी ’पार्ट टाईम’ मार्गदर्शन करतात.

भारताच्या १२० कोटी लोकसंख्येपैकी सध्या ३०% लोक मध्यमवर्गीय आहेत.पुढील २० वर्षांत हा आकडा ५०% जाईल असा मॅकिन्झी सारख्या संस्थांचा अंदाज आहे.तेव्हा आणखी २५ कोटी लोक तरी मध्यमवर्गात मोडले जातील.सध्याच्या काळात ४ व्यक्तींचे मध्यमवर्गीय कुटुंब महिन्याला १०-१२ हजार रुपयांची खरेदी करतेच. तेव्हा दरमहा दरडोई ३,००० रुपये गुणिले २५ कोटी लोक एवढे प्रचंड नवे potential भविष्यकाळात आहे.त्यातून प्रचंड प्रमाणावर नव्या संधी निर्माण होऊ शकतील.वर दिलेले शिक्षण उद्योगाचे एक उदाहरण झाले.अशी अनेक उदाहरणे प्रत्येक क्षेत्रात मिळतील.आता ही सगळी भाकिते सत्यात उतरतील का नाही माहित नाही पण भारतीय अर्थव्यवस्थेचा गेल्या १८ वर्षातील ६% सरासरी वाढीचा दर लक्षात घेता हे अशक्य ठरू नये. आणि हा ६% किंवा जास्त वाढीचा वेग १९९१ नंतर नवे आर्थिक धोरण स्विकारल्यानंतरचा (जागतिकीकरणासाठी प्राथमिक पावले उचलल्यानंतरचा) आहे हे अमान्य करता येणार नाही.

तेव्हा जागतिकीकरण हे शोषण आहे का असे विचार करण्यापेक्षा या सगळ्यातून मी पुढे कसा जाईन हा विचार करणे आणि त्यादिशेने पावले उचलणे श्रेयस्कर ठरेल.

४. सध्याच्या इंटरनेट आणि वेगाने होत असलेल्या संपर्काचा फायदा हा की अनेक वेगवेगळे लोक यातून एकत्र येऊ शकतात.२ आठवड्यापूर्वी माझ्याकडे मिपावरील आपले तीन मित्र भेटायला आले होते.त्यांनी मला सांगितले की मिपा हे माध्यम नसते तर ते चांगले मित्र बनायची संधी आलीच नसती.अशी अनेक माध्यमे आज आंतरजालावर आहेत.याचा योग्य पध्दतीने फायदा करून घेतल्यास खूपच चांगले होईल.आणि ’काही झाले तरी मी इतरांबरोबर सहकार्य करणार नाही मी माझे तेवढे बघेन’ अशी मनोवृत्ती नव्या जगात मागे पडण्यासाठीचा खात्रीचा मूलमंत्र आहे.आंतरजालामुळे असे अनेक वेगवेगळे लोक एकत्र यायची संधी आली आहे त्याचा लाभ करता आला तर उत्तमच.

याविषयी आपले मत काय?

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

13 May 2009 - 3:47 pm | श्रावण मोडक

तेव्हा जागतिकीकरण हे शोषण आहे का असे विचार करण्यापेक्षा या सगळ्यातून मी पुढे कसा जाईन हा विचार करणे आणि त्यादिशेने पावले उचलणे श्रेयस्कर ठरेल.
जागतिकीकरण आणि शोषण हा मुद्दा पूर्ण वेगळ्या स्वरूपाचा आहे. शोषण हा जागतिकीकरणाचा एक परिणाम असतो. त्या परिणामाची प्रतिक्रिया म्हणून जागतिकीकरणाला विरोध होतो. तो विरोध नको असेल तर तो परिणाम होणार नाही अशी व्यवस्था करावी लागते. अशी व्यवस्था करायला जाणे म्हणजे त्या आर्थिक प्रतिमानाचाच प्रश्न असतो. कारण ही अशी व्यवस्था करणारी उपाययोजना त्या प्रतिमानाच्या काही मूलाधारानाच छेद देते. त्यामुळे हा मुद्दा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने मांडला जाणे आवश्यक आहे.
मी पुढे कसा जाईन हा विचार केला पाहिजे - बरोबर! माझ्यासारख्यांपुढे प्रश्न येतो तो इतकाच, की माझे तसे पुढे जाणे शोषणावर आधारलेले असेल काय? तशी शक्यताही दिसली तरी माझा मी पुढे जाण्याचा विचार थांबतो. म्हणजे या परिस्थितीत मला पुढेच जावयाचे असेल तर न-नैतीक भूमिका घ्यावी लागेल. किंवा सोशल डार्विनिझ्म हेच खरे हे म्हणावे लागेल.

क्लिंटन's picture

13 May 2009 - 5:01 pm | क्लिंटन

हो कोणत्याही भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवणे वाईटच.अनेकदा खाजगी कंपन्यांमध्ये विशेषत: सप्लाय चेन मध्ये आणि कॉन्ट्रॅक्ट देताना सरकारी कार्यालयाला लाजवेल असा भ्रष्टाचार चालतो. जागतिकीकरणाचा अर्थ आपले पैसे खायचे कुरण पूर्ण जगात पसरले असा अर्थ कोणी घेतला तर ते अत्यंत चुकीचे आहे.

पण शोषण म्हणजे काय हे पण स्पष्ट केले पाहिजे.मागे मी शिव खेरांच्या पुस्तकातील घोड्याचे उदाहरण दिले होते.जिंकणारा घोडा हरणार्‍या घोड्याच्या दहापट पैसे कमावतो.याचा अर्थ तो दहा पटीने जोरात धावतो का?तर तसे नक्कीच नाही.तो धावतोच थोडासाच अधिक जोरात पण त्याचा मोबदला दहापटीने अधिक असतो.आता हे हरलेल्या घोड्याचे शोषण झाले का?असेलही कदाचित.मला आय.आय.एम मध्ये कोणत्याही भ्रष्ट मार्गाचा अवलंब न करता प्रवेश मिळाला आहे.तेव्हा मी ’माझा प्रवेश हे प्रवेश न मिळालेल्याचे शोषण आहे का?’ हा विचार का करू?सध्या मी पायाच्या हाडाच्या जखमेतून सावरत आहे आणि घरच्या घरी थोडेफार लंगडत चालता येऊ लागले आहे.यावेळी मला स्टेशनवरील गाडी पकडून खिडकीतील जागा मिळवायची म्हटले तर ते शक्य होणार नाही.मग खिडकीतली जागा मिळवणारे माझे शोषण करतात का?तेव्हा माझ्या म्हणण्याचा अर्थ असाच की स्पर्धेतून स्वत:च्या प्रयत्नाने पुढे जाणे म्हणजे इतरांचे शोषण नाही.आणि असा विचार करण्यापेक्षा प्रत्येक घोड्याने आपण अधिक जोरात कसे धावू शकू हे बघावे किंवा सरळ शर्यतीतूनच माघार घ्यावी. माझ्या बोलण्याचा अर्थ भ्रष्टाचार करावा किंवा इतरांना फसवून पुढे जावे असा नक्कीच नाही.

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

श्रावण मोडक's picture

13 May 2009 - 5:20 pm | श्रावण मोडक

क्लिंटन,
पहिल्या परिच्छेदाशी पूर्ण सहमत. दुसऱ्याशीही सहमत. पण तुमचा दुसरा परिच्छेद आणि माझे मूळचे मत यात काही अंतर असल्याने ही स्पष्टीकरणे :
घोड्याचे उदाहरण - शोषणाच्या संदर्भात हे उदाहरण गैरलागू आहे. कारण येथे शोषण होते, असे मी मानतच नाही. ही स्पर्धा आहे. स्पर्धेनुसार निकाल लागेल. हरणारा घोडा बिनकामाचा असेल तर त्या शर्यतीपुरता.
शोषण म्हणजे काय? एक काल्पनिक परिस्थिती मांडतो - जागतिकीकरणाने माझ्यासमोर एका व्यवसायाची संधी आणली आहे. ती करण्यासाठी मला मोठ्या प्रमाणात जमिनीची गरज आहे. ती मी सरकारच्या माध्यमातून संपादित करून घेतो. जमीन ज्यांची आहे त्यांना भरपाई देतो. ही भरपाई आणि त्या जमिनीचे त्यांच्यालेखी जगण्यात असलेले मूल्य यांच्यात ताळमेळ नसेल तर तिथे शोषण होते आहे. कारण जमिनीचा खुला व्यापार झालेला नाही त्या घडीला. तो करण्याऐवजी व्यवस्थेतील भूसंपादनाच्या तरतुदीचा अवलंब करून जमीन हिरावून घेतली गेली आहे. अशा व्यवसायातून माझी उन्नती होणार आहे. ती मी साधावयाची का?
आयआयएम प्रवेश - माझे मत तुमच्यासारखेच आहे. पण एक सूक्ष्म फरक आहे. आयआयएम अॅट व्हॉट कॉस्ट हा माझा मुद्दा असेल. शिक्षण हाही व्यापार हे तत्व ध्यानी घेऊन तिथे सारे होत असेल तर माझा मुद्दा निकालात निघतो. पण आयआयएमसाठी इतर शिक्षणाचा बळी दिला जात असेल तर आयआयएममधला तुमचा प्रवेश रास्त असला तरी, न्यायाच्या भूमिकेत तो बसेलच असे नाही. पण याही ठिकाणी व्यवस्था नामक घटक असतो. त्यानेच हा बदल करावयाचा असतो. तो बदल करण्याची क्षमता जागतिकीकरणाच्या प्रतिमानात नाही. कारण तेथे मुळातच माझे हित, मी पुढे जाणे हाच विचार मूलाधार म्हणून आहे.
पायाची जखम आणि खिडकीची जागा - तुमच्या भूमिकेतून अगदी योग्य. तेथे शोषण झाले का? नाही. जखमी माणूस कमी पडला. पण त्याच्या जायबंदी असण्याच्या जोरावर त्याला मागे ढकलून एखादा खिडकीची जागा मिळवत असेल तर येथे त्या जायबंदी माणसाचे शोषण होते असे म्हणता येऊ शकते.
शोषण कशाला म्हणायचे? माझे उत्तर असे - समान ताकदीची, क्षमतांची, संधीची परिस्थिती नसताना कमकुवतांना व्यवस्थेतील तरतुदींच्या आधारे बलवानांनी नमवून आपले हित साधताना त्या कमकुवतांपुढे जगण्याचा संघर्षच उभा करणारा परिणाम म्हणजे शोषण असे स्थूल मानाने म्हणता येईल.
श्रावण

क्लिंटन's picture

13 May 2009 - 11:31 pm | क्लिंटन

पण आयआयएमसाठी इतर शिक्षणाचा बळी दिला जात असेल तर आयआयएममधला तुमचा प्रवेश रास्त असला तरी, न्यायाच्या भूमिकेत तो बसेलच असे नाही.

अर्थातच प्राथमिक शिक्षणाचे महत्व कोणीच नाकारत नाही आणि नाकारू नयेच.कोल्हापुरच्या शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण यावर एक मार्मिक टिप्पणी केली होती.ते म्हणाले,’बहुसंख्यांच्या मीठ भाकरीचे आधी बघू आणि मग मूठभरांच्या पुरणपोळीचे’. तेव्हा आय.आय.एम मध्ये शिक्षण देण्यासाठी प्राथमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असेल तर ते चुकीचे आहे.पण हा सरकारचा निर्णय आहे आणि यात शोषण होतच असले तरी ते एकूण व्यवस्थाच करत आहे कोणी व्यक्ती नाही.आणि जर असे शोषण होत असेल तर कोणत्या वेगळ्या प्रकारे समाजाचे देणे दिले तरी काही प्रमाणात परतफेड होईलच.आणि त्यासाठी खूप भव्यदिव्य काही करायला हवे असे नाही तर आपल्या कंपनीच्या प्रगतीत चांगल्या मार्गाने हातभार लावला आणि त्याद्वारे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या तरी ते चालू शकेल.

बाकी कर्क साहेबांनी म्हटले की शोषण हा जागतिकीकरणाचा डायरेक्ट परिणाम नाही हे मान्य.गोरगरीबांना लुबाडणारे सावकार हे जागतिकीकरण हा शब्द वापरात येण्यापूर्वीपासून आहेतच. मोडक साहेबांनी म्हटलेले जमिन संपादनाचे उदाहरण योग्य आहेच.जर ज्या जमिनीवर सर्वस्व अवलंबून आहे ती ताब्यात घेतली आणि पुरेसा मोबदला दिला नाही तर ते नक्कीच शोषण आहे.पण असे शोषण करणारे अनेक वेगवेगळे लोक असू शकतात त्याचा जागतिकीकरणाशी अर्थाअर्थी संबंध आहे असे नाही.शोषणाचा मुद्दा इथे आणायचे कारण म्हणजे या लेखमालेच्या एका लेखावर प्रा.बिरूटे आणि विजूभाऊ यांच्यासारख्या ज्येष्ठ मिपाकरांच्या प्रतिक्रियांमध्ये शोषणाचा उल्लेख होता. अनेकदा जागतिकीकरण म्हणजे शोषण असा अर्थ unwittingly घेतला जातो. द हिंदू या वर्तमानपत्रातील न्या.व्ही.आर. कृष्ण अय्यर यांच्यासारख्या डाव्या विचारांच्या लेखकांचे लेख वाचल्यावर असा अर्थ वरचेवर घेतला जातो ही गोष्ट माझ्या लक्षात आली.

अवांतर: भारतासारख्या आध्यात्मिक परंपरेच्या देशात पैसा कमावणे हे पाप असे एका अर्थी समजले जाऊ लागले.गुरूचरण दास यांनी त्यांच्या इंडिया अनबाऊंड या पुस्तकात एक मत व्यक्त केले आहे.ते म्हणतात की स्वातंत्र्य आणि दुसरे महायुध्द या काळात लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.धान्याची टंचाई,महागाई हे नियमच झाले.तेव्हा स्वातंत्र्य नुकतेच मिळालेले असलेल्या भारलेल्या वातावरणात व्यापारी,उद्योजक हे चोरच असणार ही भावना एकाप्रकारे प्रबळ झाली.पैसे चांगल्या मार्गाने मिळवले जाऊच शकत नाहीत आणि पैसे मिळविणारा इतरांना लुबाडूनच श्रीमंत होतो हे मत याच भावनेचा spill over effect असेल का?

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

नितिन थत्ते's picture

14 May 2009 - 1:06 pm | नितिन थत्ते

एकदम सहमत.
कर्क आणि क्लिंटन म्हणतात त्याप्रमाणे शोषण हे होतच असते. जागतिकीकरणातून त्या शोषणाला समर्थन मिळते. 'आपल्या (देशी)' टाटांना स्पर्धाशील रहायचे असेल तर त्यांना सिंगूरमध्ये किंवा दाहोदमध्ये खुल्याबाजारातून जमीन घ्या असे सांगून कसे चालेल? ती सरकारच्या माध्यमातून जबरदस्तीने संपादन करूनच द्यावी लागणार!! असे म्हणून या शोषणाचे समर्थन दिले जाते.

अवांतरः अशा सार्‍या सवलती सरकारकडून मिळवून परत लोकांचे स्वस्त गाडीचे स्वप्न पूर्ण केल्याची टिमकी मात्र टाटा आपले 'कर्तृत्व' म्हणून वाजवणार.

खराटा
(रंग माझा वेगळा)

खुसपट's picture

14 May 2009 - 3:02 pm | खुसपट

उत्तर भारतीय भाजी विकतात तेव्हा ३०-४० टक्के नफा मिळवतात. भैय्या एव्हढ्याच सामान्य बुध्दीची ब्राह्मण मुले भाजी अथवा फळे का विकू इछीत नाहीत? त्यांना कमी पगाराची सरकारी किंवा खाजगी नोकरीच ( साहेबाला नावे ठेवत ) का करायची असते ? भाजी विकल्यास त्याला ब्राह्मण बायको मिळणार नाही म्हणून !!! ही मानसिकता बदलली तरच स्पर्धेत टिकाव लागेल. यशस्वी ( मग तो मराठी असो किंवा कोणीही असो ) माणसाचा दुस्वास करुन आपण यशस्वी होउ शकत नाही.

खुसपट ( व्यवसाय आणि जातीचा अभिमान यांचा अभ्यासक )

प्रत्येकाने आपली मूलभूत कौशल्ये (कोअर कॉम्पेटेन्सी) कडे लक्ष द्यावे हे समुपदेशन योग्यच आहे.

नंदन's picture

14 May 2009 - 1:46 am | नंदन

आवडला. जागतिकीकरणामुळे पुढे काय होईल हा विचार करताना थोडी सांस्कृतिक दृष्टीनेही विचार केला पाहिजे असं मला वाटतं. परस्परांच्या जवळ येणारे समाज, त्यांच्यात होणारी देवघेव हा फायदा असला तरी प्रत्येक समूहाच्या वेगळ्या ओळखीवर - मग त्यात भाषा, संस्कृती, खाद्यपद्धती अशा सार्‍याच गोष्टी आल्या - होणारा परिणाम आणि त्या गोष्टी टिकवून ठेवण्यासाठी करावी लागणारी धडपड ('सर्व्हाय्वल ऑफ द फिटेस्ट'च्या प्रवाहाविरुद्ध जाऊन) हे मुद्देही या संदर्भात महत्त्वाचे वाटतात.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बेसनलाडू's picture

14 May 2009 - 2:12 am | बेसनलाडू

नंदनने मांडलेल्या मताशी सहमत. मात्र लेखमालेचे अधिक्षेत्र केवळ अर्थकारणापुरते मर्यादित असल्याने संस्कृतीबद्दलचा विचार व त्याचा अंतर्भाव लेखमालेत केला नसणे हे समजण्यासारखे वाटते.
एका चांगल्या विचारप्रवर्तक, सुटसुटीत लेखमालेचा आटोपशीर, समयोचित अंत असा हा लेख वाटतो.
(वाचक)बेसनलाडू

क्लिंटन's picture

14 May 2009 - 8:54 am | क्लिंटन

नमस्कार मंडळी,

ही लेखमाला आपल्याला चांगली वाटली याबद्दल आपला आभारी आहे. हा विषय खूपच मोठा आहे आणि सरासरी १०० ओळींच्या ७ लेखांमधून माहिती करून देणे म्हणजे समुद्रातील पाणी शिंपल्याने काढल्यासारखे झाले. पण याचा उपयोग जागतिकीकरणाविषयी वरवरची माहिती करून द्यायला जरी झाला तरी ते चांगले आहे असे वाटते.

चर्चेत भाग घेऊन चांगले योगदान दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2009 - 3:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्यासपूर्ण असे सर्वच भाग छान झालेत !

-दिलीप बिरुटे

अवलिया's picture

15 May 2009 - 7:07 am | अवलिया

हेच म्हणतो

--अवलिया

गुळांबा's picture

14 May 2009 - 7:55 pm | गुळांबा

चांगले आणि सखोल अभ्यासाचे निदर्शक असे व्यासंगी लिखाण. आताच ही लेखमाला
पाहिली. आता सावकाश एक एक लेख वाचून काढीन व सविस्तर प्रतिक्रिया देईन.

मारवा's picture

3 Nov 2015 - 5:55 pm | मारवा

मिपा क्लासिक -९

नया है वह's picture

6 Nov 2015 - 1:49 pm | नया है वह

.