जागतिकीकरणाची कहाणी भाग १: जागतिकीकरण म्हणजे काय?

क्लिंटन's picture
क्लिंटन in काथ्याकूट
6 May 2009 - 9:51 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,

अहमदाबादमधील भारतीय प्रबंधन संस्थान (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) या संस्थेच्या निवडप्रक्रियेतील पहिला टप्पा हा कॉमन ऍडमिशन टेस्ट आणि दुसरा टप्पा निबंधलेखन आणि वैयक्तिक मुलाखत असा असतो.मला निबंधाचा विषय ’Globalization has failed to live up to its potential' असा होता. मी दिल्लीतील भारतीय विदेश व्यापार संस्था (Indian Institute of Foreign Trade) या संस्थेच्या मुलाखतीलाही गेलो होतो. त्या मुलाखतीमध्ये जागतिकीकरण,परदेश व्यापार यावर प्रश्न विचारतात.तेव्हा या विषयाची तयारी मी आधीच केली होती. IIFT ने क्लिंटनला पळवून लावले पण त्या मुलाखतीसाठी केलेली तयारी अहमदाबादच्या संस्थेच्या मुलाखतीसाठी उपयोगी पडली.मिपावर एक चांगली चर्चा घडवून आणायला हा विषय योग्य आहे असे मला वाटले म्हणून हा लेखप्रपंच. या लेखमालेत माझ्या निबंधातील मुद्दे तर आहेतच आणि इतरही काही मुद्द्यांचा समावेश करत आहे.

सुरवात करू जागतिकीकरण म्हणजे नक्की काय आणि त्याचे उद्दिष्ट काय यापासून.यासाठी मागे जायला हवे मानवजातीच्या विकासाच्या एका जुन्या टप्प्यात--जेव्हा राष्ट्र ही संकल्पना उदयास यायची होती. माणूस अजूनही गुहेतच राहत होता.मूलभूत गरजांपैकी अन्न ही गरज माणूस शिकार करून भागवत होता.वस्त्र म्हणून फारतर जनावरांची कातडी वापरत होता.आणि निवारा म्हणून गुहा होत्याच.अशा अत्यंत कमी गरजा असलेल्या काळात प्रत्येक माणूस आपापली शिकार करून राहू शकत होता.त्यासाठी इतरांवर अवलंबून राहायची गरज नव्हती.नंतरच्या काळात मानवी संस्कृतीचा विकास झाला आणि माणूस छोट्या समूहाने पाण्याच्या स्त्रोताजवळ वस्ती करून राहू लागला.माणसाच्या गरजाही आता वाढल्या.अन्न म्हणून केवळ शिकारीवर अवलंबून न राहता धान्य पिकवले जाऊ लागले.वस्त्राचीही माणसाला गरज भासू लागली.निवारा म्हणून छोटी घरे गरजेची झाली.एकदा घरे झाल्यावर आत लोखंडी,लाकडी,तांबे-पितळेच्या वस्तू गरजेच्या झाल्या.शेतीसाठी नांगर,वाहतुकीसाठी बैलगाड्या आणि रथ गरजेचे झाले. हौस म्हणून सोन्या-चांदीचे दागिनेदेखील गरजेचे झाले. समाजाचे हिंस्त्र श्वापदे आणि शत्रू यापासून संरक्षण करायला सैन्याचीही समाजाला गरज लागू लागली. यात इतरही अनेक गोष्टींचा समावेश करता येईल पण सांगायचा मुद्दा म्हणजे मानवी संस्कृतीचा जसाजसा विकास झाला तशा समाजाच्या गरजाही मोठ्या प्रमाणावर वाढल्या.आता या सगळ्या गरजा प्रत्येक माणूस आपल्या पातळीवर पूर्ण पडायला अपूरा पडू लागला.यातूनच वस्तूविनिमय पध्दती वापरात आली.या पध्दतीचे मूलभूत तत्व असे की प्रत्येकाला गरजा अनंत असतात आणि या सगळ्या गरजा पूर्ण करायला प्रत्येकाकडे वेळ आणि कौशल्य नसते. शेती चांगली करू शकणारा माणूस सोन्याचे दागिने चांगले घडवू शकेलच असे नाही.तसेच सोन्याचे दागिने चांगले घडवणारा मनुष्य चांगली शेती करू शकेल असे नाही.तेव्हा ज्याला शेती चांगली येते त्यानेच सोन्याचे दागिने घडवले तर त्याचा दर्जा चांगला असेल असे नाही.तेव्हा प्रत्येकाने आपल्याला जी गोष्ट चांगली येते ती करावी आणि इतरांबरोबर देवाणघेवाण करावी.म्हणजे सगळ्यांनाच चांगल्या दर्जाच्या वस्तू/सेवा वापरता येतील.नाहीतर शेती चांगली येते अशा माणसास निकृष्ट दर्जाचे सोन्याचे दागिने आणि सोन्याचे दागिने चांगले येतात अशा माणसास कमी दर्जाचे धान्य वापरावे लागेल.

म्हणजे मी इतरांच्या गरजा पूर्ण केल्या की इतर लोकही आपल्या गरजा पूर्ण करतील अशी ही व्यवस्था होती.इतरांशी देवाणघेवाण करण्यात कसलाही कमीपणा नाही हे यावरून लक्षात येते.

आता हीच संकल्पना आंतरराष्ट्रीय पातळीवर नेली की तेच जागतिक व्यापाराचे मूलभूत तत्व बनते.भारतासारख्या देशातील लोकांना संगणक प्रोग्रॅमिंगमध्ये गती असेल पण इलेक्ट्रॉनिक वस्तू त्या देशात किफायतशीर पध्दतीने उत्पादित केल्या जाऊ शकत नसतील तर ’आम्ही तुम्हाला सॉफ्टवेअर देतो. त्यातून मिळालेल्या पैशातून आम्ही इतरांकडून हार्डवेअर विकत घेतो’ अशा स्वरूपाचा व्यवहार करण्यात येतो.यातूनच दोन्ही देशांमधील लोकांना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असे दोन्ही चांगल्या प्रतीचे वापरायला मिळते.यात दोन्ही देशांचा फायदाच आहे.अर्थात एका देशात कोट्यावधी लोक राहतात त्यामुळे वैयक्तिक पातळीवर जसे व्यवसायांचे पूर्णपणे 'specialization' झाले तसे देशपातळीवर होऊ शकत नाही.पण त्यातूनही अर्थकेंद्रित (Capital Intensive) आणि मनुष्यबळ केंद्रित (Labor Intensive) अशा स्वरूपाचे वर्गीकरण उद्योगांत होऊ शकते.आणि मनुष्यबळ जिथे स्वस्तात उपलब्ध आहे असे देश (उदा.चीन) दैनंदिन वापरात असलेल्या अनेक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर निर्यात करतात.अशा वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग ’मनुष्यबळ केंद्रित’ असतात.

मुख्य मुद्दा म्हणजे अशा प्रकारच्या व्यापारातून दोन्ही देशांचा (गावातील दोन माणसांप्रमाणेच) फायदा होऊ शकतो.आणि वस्तूंची आयात करण्यात कसलाही कमीपणा नाही.उलट आपण कोणत्या वस्तू/सेवा अधिक चांगल्या आणि स्वस्त उत्पादित करू शकतो त्यावर लक्ष केंद्रित करून आपली निर्यात कशी वाढेल हे बघितले पाहिजे.यात सगळ्यांचाच फायदा आहे.

जसे गावपातळीवरील व्यवहारात प्रत्येक माणूस इतर कोणाही व्यक्तीकडून आपल्याला गरजेची असलेली वस्तू/सेवांची कोणत्याही आडकाठीशिवाय देवाणघेवाण करू शकत असे त्याच पध्दतीने एका देशात निर्माण होत असलेल्या वस्तू/सेवा आणि मनुष्यबळ यांची देवाणघेवाण कोणत्याही आडकाठीशिवाय जगभरात कुठेही होऊ शकणे यालाच खरे जागतिकीकरण म्हणता येईल.

आता जागतिकीकरण या अर्थाने झालेले नाही हे तर उघडच आहे.आता त्यामागची कारणे नंतरच्या लेखांमध्ये. लगेच पुढचा लेख जागतिकीकरणाच्या फायद्या-तोट्यावर.

प्रतिक्रिया

आपल्या लेखातील विचार बरेचसे पटले. " वैश्विक विचार करा पण कृती स्थानिक पातळीवर करा" (Think globally act locally) हे तत्व आचरणात आणले जाणार नाही, तोपर्यंत जागतीकीकरण यशस्वी होऊ शकणार नाही. बाकी सविस्तर विचार शक्य त्याप्रमाणे मांडेनच. आपल्या पुढील लेखनास शुभेच्छा!

मुशाफिर.

नितिन थत्ते's picture

6 May 2009 - 10:50 pm | नितिन थत्ते

बर्‍याच दिवसांत क्लिंटनसाहेबांचे लेखन वाचायला मिळाले नव्हते. आम्ही समजलो की साहेब अभ्यासात बुडून गेले की काय.
इतक्यात हा लेख आला बरे वाटले.

प्रतिसाद लेख वाचून देईन.

खराटा
(रंग माझा वेगळा)

मराठमोळा's picture

6 May 2009 - 11:08 pm | मराठमोळा

क्लिंटनसाहेब तुमचे लेख नेहमीच माहितीपुर्ण व अभ्यासपुर्ण असतात यात शंकाच नाही.

आजकाल ज्या सुलभतेने वस्तु व सुविधा उपलब्ध आहेत त्याचे कारण जागतिकीकरण हेच आहे.
जागतिक व्यापार वाढावा (सर्व प्रगतीशील देशाना विकास साधता यावा) यासाठीच १९४७ मधे General Agreement on Tariffs and Trade (GATT) या संस्थेची स्थापना झाली होती. नंतर तिची जागा WTO (World Trade Organization) ने घेतली. जागतिक व्यापारासाठी एक Protocol पुरवला गेला.

WTO बद्दल इथे सविस्तर माहिती मिळेल.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

संदीप चित्रे's picture

7 May 2009 - 12:19 am | संदीप चित्रे

अतिशय चांगल्या विषयाला हात घातल्याबद्दल अभिनंदन, क्लिंटन.
-------
तुमचे या आधीचे लेख वाचून ही खात्री आहे की या विषयाबद्दलही मुद्देसूद आणि उत्तम अशी अभ्यासपूर्ण माहिती सोप्या मराठीत असेल :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 May 2009 - 9:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देशांमधे सेवा आणि उत्पादने यांच्या मुक्त प्रवाहाने जनतेचे काय भले होणार ? कोणते हित साधले जाणार ? त्याचे कोणते परिणाम होतात ? ते समजून घ्यायला आवडेल.

भारताचा विचार जेव्हा आपण करु की, साठ रुपये किंवा कमी-अधिक रोजगार मिळवणारे जे नागरिक आहेत, दारिद्ररेषेवरचे जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी जागतिकीकरणाचा वेगळाच अर्थ असणार आहे असे वाटते. जागतिकीकरणामुळे प्रत्येक देशात बहुराष्ट्रीय कंपन्यांना मुक्त व्यापाराची संधी मिळत आहे. जगभरात बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आज लाखो नौक-या दिल्या आहेत त्यांचा हा वेग कमी जास्त असेलही. पण भारतासारख्या बेरोजगारीने त्रस्त असलेल्या देशात व्यवसाय सुरु करणार्‍या प्रत्येक बहुराष्ट्रीय कंपनीला फक्त तिचा धंदा पहायचा असतो, तिला भारतातल्या बेरोजगाराशी, ती दूर करण्याशी काही देणे-घेणे असत नाही. तसेच येथील जनतेच्या श्रमाचे मुल्य वाढावे यात कंपनीला स्वारस्य असत नाही. अशा गोष्टींचा विचार यात असणार आहे.

तेव्हा लक्षात येते की जागतिक वित्तसंस्था , त्यांचे प्रमुख भांडवलदार आणि बहुराष्ट्रीय कंपन्या भारतामधे आणि भारतासारख्या विकसनशील देशांमधे कोणती भुमिका बजावतील असो, ते पुढे येईल म्हणून थांबतो.

-दिलीप बिरुटे

क्लिंटन's picture

7 May 2009 - 5:09 pm | क्लिंटन

जागतिकीकरणावर एक आक्षेप प्रा.बिरूटेंनी घेतला आहे.तोच अनेक लोक घेतात.बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतात रोजगार वाढावा असे वाटत नसते.यात केवळ बहुराष्ट्रीय कंपन्याच काय तर अगदी भारतीय कंपन्यांनाही तसे वाटत नसते.या भांडवलशाही आणि जागतिकीकरणावर आधारीत अर्थव्यवस्थेत दुसर्‍या कोणालाही नोकरी देणे मुळातच बंधनकारक नाही.या अर्थव्यवस्थेत आपली गरज आपण सांगू त्या पगारावर पूर्ण करणारा मनुष्य मिळाला की त्याला नोकरी दिली जाते.जर मालकाने पगार खूपच कमी दिला तर त्या पगारात काम करायला कोणी तयार होणार नाही.याउलट नोकरी मागणार्‍याने भरमसाठ पगाराची अपेक्षा केली तर तेवढा पगार द्यायला कोणी तयार होणार नाही.हे ’मागणी आणि पुरवठ्याचे’ गणित अगदी घरी धुणीभांडी करण्यासाठी असलेल्या बाईपासून कोट्यावधी रुपयांची उलाढाल असलेल्या कंपनीच्या सी.ई.ओ पर्यंत सगळ्यांना लागू पडते.हे शोषण आहे का?असेलही कदाचित.पण सध्याचे जग तसेच आहे हे नाकारून कसे चालेल?शिव खेरांनी ’यू कॅन विन’ पुस्तकात एक उदाहरण दिले आहे.शर्यतीत जिंकणारा घोडा न जिंकलेल्या घोड्याच्या दहापटीने पैसा कमावतो.याचा अर्थ तो दहापट वेगाने धावतो का?तर तसे नक्कीच नाही.तो असतो थोडाचाच अधिक वेगवान.पण त्याचा मोबदला १० पट असतो.आता हे हरलेल्या घोड्याचे शोषण झाले का?पण सध्याच्या स्पर्धात्मक जगात त्याची पर्वा कोणीच करत नाही.आणि हे शोषण आहे की नाही याचा विचार करण्यापेक्षा प्रत्येक घोड्याने आपल्याला अधिक वेगाने कसे धावता येईल हे बघण्यातच त्याचे हित आहे.तेव्हा नोकरीच्या बाजारातील आपली पत कशी वाढेल यामागे लागले तरच सध्याच्या स्पर्धात्मक युगात टिकाव लागेल.अन्यथा नाही.

मग जागतिकीकरणामुळे नक्की काय फायदा होऊ शकेल? हे अधिक विस्ताराने पुढच्या लेखात.

यात विजूभाऊंच्या प्रतिसादावर उत्तर आले आहे.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

दशानन's picture

7 May 2009 - 5:11 pm | दशानन
प्रकाश घाटपांडे's picture

7 May 2009 - 9:20 am | प्रकाश घाटपांडे

ज्ञानेश्वरांचा 'हे विश्वची माझे घर ' हा वैश्विक विचार देखिल जागतिकिकरणाचा संकल्पनात्मक विचार होता.
क्लिंटन सायबाची कुठल्याही गोष्टीची सुरवात करताना आढावा घेण्याची पद्धत आवडली. जागतिकिकरण संकट कि संधी , तारक कि मारक अशा द्वैत विचारांत अडकलेली विचारसरणी खरतर अनेक पैलूंचा आविष्कार आहे.
अवांतर- होल वावर इज अवर ही बी जागतिक ईचारश्रेनी हाय बर्का!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अवलिया's picture

7 May 2009 - 9:44 am | अवलिया

वाचत आहे
आपल्या पुढील लेखनास शुभेच्छा!

--अवलिया

सहज's picture

7 May 2009 - 11:10 am | सहज

वाचत आहे.

दिपक's picture

7 May 2009 - 11:21 am | दिपक

क्लिंटनसाहेब आपले अत्यंत अभ्यासपुर्ण आणि मेहनतीने लिहिलेले लेख वाचले की आम्ही किती अडाणी आणि आळशी आहोत याचा प्रत्यय येतो. पुढील लेख लवकर येउद्यात.

खुप खुप धन्यवाद!

क्लिंटन's picture

7 May 2009 - 12:37 pm | क्लिंटन

नमस्कार मंडळी,

माझ्या लेखमालेतील पहिला लेख आपल्याला आवडला याबद्द्ल आपला सगळ्यांचाच आभारी आहे. डेव्हिड रिकार्डोच्या ’कम्पॅरेटिव्ह ऍडव्हांटेज’ या तत्वासाठीचा मराठी प्रतिशब्द (तुलनात्मक सरसता) हा मला माहित नव्हता.तो माहिती करून दिल्याबद्दल कर्कसाहेबांचा आभारी आहे.

या लेखमालेचे स्वरूप पुढीलप्रमाणे ठेवायचा विचार आहे

१. जागतिकीकरण म्हणजे नक्की काय?
२. जागतिकीकरणाचे फायदे-तोटे
३. डेव्हिड रिकार्डोचे तत्व
४. जागतिक व्यापार संघटना
५. जागतिक व्यापारातील अडथळे -- टॅरिफ, आयात-निर्यात कोटा,प्रोटेक्शनिझम (मराठी शब्द?), WTO मधील कळीचा मुद्दा-- शेतमालासाठीच्या सवलती आणि सबसिडी
६. स्थानिक व्यापारकरार-- युनियन आणि ट्रेड ऍग्रीमेन्ट. त्याचे जागतिक व्यापारावर होणारे भलेबुरे परिणाम
७. जागतिकीकरणाच्या युगात आपण (भारत सरकार आणि भारताचे नागरीक) काय करावे याविषयीचे माझे मत

यापैकी पहिले ३ लेख लिहून तयार आहेत.पहिला आधीच प्रकाशित केला आहे.पुढच्या लेखावर शेवटचा हात फिरवून गरज लागल्यास बदल करून आज संध्याकाळपर्यंत दुसरा लेख प्रकाशित करणार आहे. तसेच गरजेप्रमाणे पुढील लेखांच्या मुद्द्यांमध्ये गरज पडल्यास फेरबदल करणार आहे.कोणताच लेख उगीचच लांबलचक होऊ नये पण त्याचवेळी महत्वाचे मुद्दे एकत्र असावेत याविषयीची शक्य ती सगळी काळजी घ्यायचा प्रयत्न असेल.

आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनाबद्द्ल आभारी आहे.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

श्रावण मोडक's picture

7 May 2009 - 2:32 pm | श्रावण मोडक

ही केवळ सूचना आहे. ती तुमच्या आकृतीबंधात बसत नसल्यास बाजूला ठेवावी.
सातव्या लेखाच्या आधी तुम्ही पुन्हा एकदा पहिल्या लेखाच्या अनुषंगाने काय आणि कसे घडत जाऊन कोणते जागतिकीकरण समोर आले आहे याचा आढावा घ्यावा. तुमची मते मांडावीत. पहिल्या लेखात व्याख्येच्या, विचाराच्या अनुषंगाने मांडणी येते. ती खरी उतरली साऱ्या प्रक्रियांतून? अशा प्रश्नाची हाताळणी या लेखात होईल आणि त्या परिप्रेक्ष्यात भारतीयांनी काय करावे याची संदर्भचौकट बदलून एकूण माणसाने काय करावे अशी मांडणी होऊ शकेल. आपल्यापुरती तरी ती मांडणी आवश्यक असतेच. म्हणून ती करावी अशी सूचना आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 May 2009 - 2:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>पहिल्या लेखात व्याख्येच्या, विचाराच्या अनुषंगाने मांडणी येते.

करेक्ट, मलाही जागतिकीकरणाच्या व्याख्यांची अपेक्षा होती.
आणि नंतर त्याचे स्पष्टीकरण. आपण नव्वदीला नवे अर्थधोरण स्वीकारले त्याचेही काही उल्लेख पाहिजे होते असे वाटले.

-दिलीप बिरुटे

मोडकसाहेब,

आपल्या सूचनांबद्द्ल धन्यवाद्.यापुढील लेखांमधून आणि त्यावरील प्रतिसादांमधून या मुद्द्यांचा विचार केला जाईल असे वाटते.थॉमस फ्रिडमन यांच्या 'वल्ड इज फ्लॅट' या पुस्तकात जागतिकीकरणाच्या तीन टप्प्यांचा उल्लेख आहे.तोच जागतिकीकरणाचा इतिहास किंवा आतापर्यंत काय झाले आहे याचा आढावा आहे असे म्हणता येऊ शकेल.त्यावर आणखी एक लेख लिहायला काहीच हरकत नाही.या लेखमालेचा विचार सुरू केला तेव्हाच सगळी माहिती देण्यासाठी किती लेख लागतील आणि प्रत्येक लेखात काय मुद्दे असावेत याचा विचार केला होता.पण गरजेनुसार त्यात बदल कधीही करता येऊ शकतो. मात्र सगळे लेख मला लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी मिपावर प्रकाशित करायचे आहेत.त्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन.

दुसरा लेख अजून तासाभरात प्रकाशित करायचा प्रयत्न असेल.

धन्यवाद.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

विजुभाऊ's picture

7 May 2009 - 2:10 pm | विजुभाऊ

वस्तुंच्या किमती कमी होणे हे शेवटी मानवी श्रमाचे मूल्य कमी होण्यास कारणीभूत ठरते. जागतिकीकरणाची ही परिणीती असते. शेवटी कोणतिही अर्थव्यवस्था ही सर्वात तळातल्या घटकाच्या शोषणावरच अधारीत असते.
महात्मा गांधींची "सर्वोदय" किंवा "अंत्योदय " ही संकल्पना तळातल्या घटकाचा उदय होईल हे पहाते. पण ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही अर्थात कोनाचे तरी व्हेस्टेड इन्टरेस्ट हे त्याचे कारण आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 May 2009 - 2:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>कोणतिही अर्थव्यवस्था ही सर्वात तळातल्या घटकाच्या शोषणावरच अधारीत असते.
सहमत !!!

टायबेरीअस's picture

7 May 2009 - 9:21 pm | टायबेरीअस

अजून येउद्यात!
-टायबेरीअस

मै तो अकेले ही चला था जानिबे मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"

क्लिंटनसाहेब तुमचे लेख नेहमीच माहितीपुर्ण व अभ्यासपुर्ण असतात यात शंकाच नाही.

अगदी सहमत

तुमचा लेख आला की मी आवर्जून वाचतो किमानपक्षी वाचनखूण साठवून ठेवतो आणि नंतर वाचतो.
अजून येउद्या.

....बबलु

गुळांबा's picture

13 Jun 2009 - 6:22 pm | गुळांबा

गावपातळीवरील व्यवहारात प्रत्येक माणूस इतर कोणाही व्यक्तीकडून आपल्याला गरजेची असलेली वस्तू/सेवांची कोणत्याही आडकाठीशिवाय देवाणघेवाण करू शकत असे

बलुतेदार, बार्टर सिस्टिम हे शब्द आपण विसरुन गेलो आणि तिथेच खरी आपली अवनती चालु झाली. आपली स्वयंपुर्णता आपणच गमावुन बसलो. इथुन कच्चा माल परदेशात जावु लागला आणि परदेशातुन पक्का माल इथे येवु लागला. उदा. कापुस इथुन विलायतेत आणि तिथुन यंत्रावर बनविलेला कपडा इथे. कदाचित हिच गोष्ट गांधीजींना गुलामगिरीची पहिली पायरी वाटली आणि त्यांनी चरख्यावर सुत-कताईचे आवाहन केले. पण ते केवळ एक प्रतिक बनुन राहिले. असो.

या जागतिकिकरणाच्या रेट्यात आता स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन देणेच आपल्या हाती शिल्लक राहिले आहे. पण मनात प्रश्न येतो की आपण स्वदेशी म्हणुन डाबर लाल टुथपावडर वापरायची आणि त्याच्या निर्मात्याने बीएमडब्ल्यु वापरायची म्हणजे गणित एकच झाले ना?