कावड , टरबुज अन शक्ती !

पहाटवारा's picture
पहाटवारा in जनातलं, मनातलं
9 Apr 2009 - 2:38 pm

आम्ही या नव्या घरी रहायला येउन २-३ आठवडेच झाले होते.
काल संध्याकाळि घरि येताना गल्लीच्या तोंडाशी थोडि गजबज जाणवलि. तिथे एक मारुतिचे मंदिर आहे.
एरवी एक पुजारि अन एक दोन वयस्क सोडले तर कुणी फारसे दिसले नव्हते.
हिला विचारले, "आज कोणवार गं, बुधवार ना ?"
"ह्म्म !" दिवसभराच्या ऑफिसच्या रगाड्यामुळे दमलेल्या आवाजात तिने ऊत्तर दिले.
"मग बरोबर आहे. ऊद्या हनुमान जयंती ना ! त्याचीच गड्बड असेल." मी थोडेसे मनाशीच बोलल्यासारखे म्हणलो.
"तुला काय माहित? कालनिर्णय तर सापडत नाहिये नविन घरात आल्यापासुन"
"अगं, शुक्रवारिच तर रामनवमीची सुटि होती ना? मग रामनवमी पासुन सहा दिवसांनी हनुमान जयंती! रामाचा जन्म नवमी ला तर मारुतिचा पौर्णिमेला !"
असे म्हणालो, अन जणु काहि आठवणींचे एक पोतेच मनात रिते झाले .. जसे शुभ्र तांदळाचे दाणे !

लहानपणी हनुमान जयंती विसरण्याचा असा कधी प्रश्नच येत नसे. कारण रामनवमी पासुन रोज पहाटे करावा लागणारा मारुतिस्त्रोताचा पाठ!
पहाटेपहाटे आंघोळ वगॅरे ऊरकुन १८ तांदळाचे दाणे घेउन आम्हि तिघे भाउ बसत असु. एकिकडे बाबांची पूजा सुरु असे.
पण जरा कुठे श्लोकामधे आम्च्याकडुन चूक झाली, कि त्यांचे मनातले स्त्रोत्रपठण मोठ्याने सुरु होइ.
मधेच आम्हाला थांबवुन "वाढता वाढता वाढे, भेदिले शून्यमंडळा !" म्हणजे काय हे माहित आहे का? " असे म्हणुन स्तोत्राचा भावार्थ सांगत.
"कशाला इतक्या वेळा म्हणायचे हो एकच स्तोत्र? " असा प्रश्न कधी बाबांना विचारला तर ते म्हणत, " शक्ती अन एकाग्रता येण्यासाठी!"
"नुसते तोंडि काहि म्हणुन कशी शक्ती येइल?"
"अरे, मानसीक शक्ती. शारीरिक शक्ती तर हवीच, पण मानसीक शक्ती जास्त गरजेची असते. जेव्हा मोठा होशील तेव्हा मानसीक शक्तीची जास्त गरज पडेल!"
कशी जास्त गरज पडेल हे तेव्हा कळत नसे, पण पाठ केल्याने "शक्ती " वाढ्ते हे मनात पक्के राहुन त्या १०/१५ दिवसात आम्हि शाळेत कुणाशीहि 'लढायला' एकदम तयार असु.
अशा ह्या रोजच्या साधनेचे फळ मिळे हनुमान जयंतीला. लाल लाल टरबुज अन खोबर्‍याचा प्रसाद !
हनुमान जयंतीला शेवटचा १०८वा पाठ मारुती च्या मंदिरात असे. दर हनुमान जयंतीला हनुमानाच्या मूर्तीला शेंदुर चढवत असत.
पहाटेच लवकर तिथे पोहोचणे हे गरजेचे असे. कारण सकाळपासुन तिथे कावड वाल्यांची गर्दि सुरु होइ.
आमच्या गावी एक प्रथा होती. हनुमान जयंतीच्या आधीपासुन काहि तरुण भक्त मंडळी गोदावरि नदितून कावडिने पाणी घेउन येत.
हनुमान जयंतीच्या दिवशी पहाटेच ते गावातल्या वेग-वेगळ्या मंदिरात पोहोचत.
कावड म्हणजे, एका काठिवर दोन्हि बाजुंना छोट्या घागरि बांधुन, त्यात गोदावरिचे पाणी घेउन, ती काठी खांद्यावर वाहुन आणत. तर असे ते कावड वाले एकदम झुंडिने येत.
जसे मंदिर जवळ येई तसा त्यांचा जोष, मारुती-रामनामाचा घोष अन चालीचा वेग वाढत जाई. शेवटचे काहि अंतर तर ते पळतच येत.
बाकि आमच्यासारखे वाट पहाणारे "कावड आली , कावड आली" चा गदारोळ सुरु झाला कि सावरुन कट्यावर वगॅरे चढुन बसत असु.
त्यांनी कावडितले पाणी हनुमानाच्या शेंदरी मूर्तीवर ओतले की एक मोठा जयघोष होई. त्यांना आपल्या घरच्या प्रसादाचे टरबुज देण्यासाठि आम्हा बच्चे मंडळींची चढाओढ होत असे.
सर्व कावड वाले येउन गेले कि मग, हनुमानाच्या पायावरच्या शेंदराने लावलेले टिळे लेउन, टरबुज, खोबरे खात-खात आम्हि रमत गमत घरि येत असू.
...
"आज नुसते फोडणीचे वरण केले तर चालेल का?" हिच्या प्रश्नाने आठवणींची तार तुटली.
"टोमेटो घाल्शील?" ननुने विचारले.
त्याच्याकडे पहाताना सहज विचार आला, या पीढीला तर काहिच ठाउक नाहि.
त्याला सांगीतले कि ऊद्या हनुमान बाप्पाचा वाढदिवस आहे, तर म्हणाला 'मग केक आणायचा?'
म्हटले, अरे, हनुमान बाप्पाच्या वाढदिवसाला केक नाहि, टरबुज आणतात.
सकाळी त्याला मंदिरात घेउन गेलो. वाटेत त्याला हनुमान बाप्पाला नमस्कार केला कि शक्ति मिळते वगॅरे सांगत होतो.
इथल्या हनुमानाला शेंदूर चढवला नव्हता. पण तरीहि नमस्कार केल्यावर एक प्रकारचा ऊत्साह, प्रसन्नता वाटली.
एरवी सदोदीत चालणारे तोंड बंद ठेउन ननुहि नमस्कार करण्यात मग्न होता.
याला आता मारुती स्तोत्र शिकवायला हवे असा विचार करत असतानाच त्याने विचारले "बाबा, आता मी ओमशी मारामारि करु शकतो? माझ्यात पण शक्ति आली असेल ना आता?"
त्याला काहि ऊत्तर दिले नाहि पण मनात विचार घोळत होते कि आज साहेबाला सांगुन टाकावे कि, 'काहि झाले तरि मलेशिया ट्रिपची लाच देउन
मी हे सरकारी कॉट्रक्ट मिळवण्याच्या त्यांच्या प्रयत्नात मी कधीहि सहभागी होणार नाहि, ऊलट वर तक्रार करेन'

-पहाटवारा

संस्कृतीसमाजजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

9 Apr 2009 - 3:22 pm | पाषाणभेद

आपल साल नेहमी असे होते. काही वेळेस संस्कार वाहत्या पाण्याबरोबर जाऊ देत नाही पण कधीकधी परीस्थीती पाहुन संस्कारांविरुद्ध काम करावे लागते.
ननु हुशार दिसतोय.

समयोचित लेख.
- पाषाणभेद